व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मला नोकरी कशी मिळवता (आणि टिकवता!) येईल?

मला नोकरी कशी मिळवता (आणि टिकवता!) येईल?

अध्याय २१

मला नोकरी कशी मिळवता (आणि टिकवता!) येईल?

सिनियर स्कोलास्टिक या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणात हायस्कूलमधील काही सिनियर मुलांना त्यांच्या मते कोणती ध्येये “अति महत्त्वाची” होती हे विचारण्यात आले. चौऱ्‍याऐंशी टक्के मुलांनी उत्तर दिले: “पक्की नोकरी मिळणं.”

कदाचित व्यक्‍तिगत अथवा घरातील खर्च भागवण्यासाठी तुम्ही शाळेनंतर नोकरी शोधत असाल. किंवा पूर्ण-वेळेचा सुवार्तिक होण्याकरता तुम्ही कदाचित अर्ध-वेळेची नोकरी शोधत असाल. (अध्याय २२ पाहा.) काहीही असले, तरी जागतिक चलनवाढ आणि अकुशल कामगारांची मर्यादित मागणी यांमुळे तुमच्यासारख्या युवकांना नोकऱ्‍या मिळणे कठीण होऊन बसले आहे. तर मग, तुम्ही नोकरीच्या क्षेत्रात सहजगत्या प्रवेश कसा करू शकता?

शाळा—नोकरीचे प्रशिक्षण देणारे ठिकाण

कामगारांची भरती करण्यात अनेक वर्षांचा अनुभव असलेले क्लीवलंड जोन्स असा सल्ला देतात: “हायस्कूलचे उत्तम शिक्षण प्राप्त करा. उत्तम लिहिण्याला, वाचण्याला आणि बोलण्याला अत्यंत महत्त्व आहे. सुव्यवस्थित असण्याचेही शिकून घ्या, म्हणजे तुम्ही कामगार जगातील लोकांना हाताळू शकाल.”

बस चालकाला, वाहनांच्या येण्याची व निघण्याची वेळापत्रके वाचता आली पाहिजेत. कंपनीतल्या कामगारांना जॉब-कंप्लीशन तिकिटे किंवा अशाप्रकारचे इतर अहवाल कसे भरावेत हे माहीत असले पाहिजे. सेल्सक्लर्कस्‌ना हिशोब करता आला पाहिजे. जवळजवळ सर्वच प्रकारच्या कामासाठी दळणवळणाची कलाकौशल्ये आवश्‍यक आहेत. शाळेत असताना या कुशलतांवर प्रावीण्य मिळवले जाऊ शकते.

चिकाटी सार्थ ठरते

“शाळा संपलेली असून तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास वैतागून हात टेकू नका,” असे जोन्स म्हणतात. “दोन-तीन इंटरव्ह्यू देऊन मग घरी जाऊन वाट पाहत बसू नका. अशातऱ्‍हेने तुम्हाला नोकरीवर कधीच बोलवले जाणार नाही.” सुरेश हा तरुण, नोकरी मिळवण्याकरता सात महिने भटकत होता. “मी स्वतःची अशी समजूत घालत असे: ‘काम मिळवणं हेच माझं काम आहे,’” असे सुरेश म्हणतो. “शनिवार-रविवार सोडून मी आठ आठ तास नोकरीच्या शोधात सात महिन्यांपर्यंत पायपीट करत होतो. सकाळी जरा लवकरच सुरवात करून दुपारी चार वाजेपर्यंत ‘काम’ करीत असे. कितीतरी वेळा असं झालंय की रात्रीच्या वेळी माझे पाय सुजलेले असायचे. दुसऱ्‍या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नोकरीच्या शोधात निघायला मला ‘मानसिक तयारी’ करावी लागायची.”

सुरेशने कोणत्या कारणामुळे हिंमत हारली नाही? “कंपनीच्या कचेरीत असताना मला प्रत्येक वेळी, ‘नेटाने यत्न करा,’ हे येशूचे शब्द आठवायचे. एके दिवशी मी कामावर लागलेला असेन आणि हे वाईट दिवस संपतील असा विचार मी करायचो.”—लूक १३:२४.

नोकऱ्‍या कोठे शोधाव्यात

तुम्ही ग्रामीण भागात वास्तव्य करत असल्यास, शेतांमध्ये किंवा मळ्यांमध्ये अथवा इतर कोणत्याही प्रकारची अंगमेहनत करण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. तुम्ही मोठ्या नगरात किंवा शहरात राहत असल्यास, वृत्तपत्रामध्ये नोकरीविषयक जाहिराती पाहा. या जाहिरातींवरून एखाद्या कामासाठी कोणती पात्रता हवी आहे याची कल्पना मिळू शकते आणि तुम्ही त्या नोकरीसाठी का लायक आहात हे मालकाला स्पष्ट करण्यासाठी मदतही मिळू शकते. पालक, शिक्षक, रोजगार एजन्सीस, आस्थापना कचेऱ्‍या, मित्र आणि शेजारी हे आणखी काही उगम आहेत जेथून तुम्ही मदत मिळवू शकता.

नोकरी टिकवणे

दुर्दैवाने, आर्थिक दबावांमुळे बेरोजगारी निर्माण होते तेव्हा सर्वात आधी, रोजगार असलेल्या युवकांना कामावरून काढले जाते. पण, हे तुमच्या बाबतीत घडेलच असे नाही. “जे लोक काम करण्याची इच्छा बाळगतात आणि मालकाने सांगितलेले काम करण्यास इच्छुक मनोवृत्ती प्रदर्शित करतात अशांनाच नोकरीवर ठेवले जाते,” असे श्री. जोन्स म्हणतात.

तुमची मनोवृत्ती म्हणजे तुमची मनःस्थिती—स्वतःच्या कामाबद्दल त्याचप्रमाणे तुम्ही ज्यांच्यासाठी व ज्यांच्यासोबत काम करता यांबद्दल तुमचे विचार. तुमची मनोवृत्ती तुमच्या कामाच्या दर्जात प्रतिबिंबित होईल. तुमचा मालक केवळ तुमच्या उत्पादनावरच नव्हे तर तुमच्या मनोवृत्तीवर आधारून तुमचे मूल्य ठरवेल.

“केवळ सूचना पाळणे एवढेच नव्हे तर सतत देखरेखीविना आवश्‍यकतेपेक्षा अधिक काम तुम्ही करू शकता हे तुमच्या मालकाला दाखवून द्या,” असे जोन्स पुढे म्हणतात. “कारण एका दुर्मिळ कामगार क्षेत्रात, पुष्कळ वर्षांपासून असलेले कामगार टिकतातच असे नाही पण जे उत्पादनाला मोलाचा हातभार लावतात ते टिकतात.”

सुरेशला याची सत्यता आढळली. तो म्हणतो: “मी नेहमीच माझ्या मालकाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आवश्‍यक असेल तेव्हा माझ्या आराखड्यात तडजोड करण्यास, सूचना पाळण्यास आणि माझ्या सुपरव्हाईझरस्‌सोबत आदराने वागण्यास मी इच्छुक होतो.” यावरून, “आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा, माणसांना संतोषविणाऱ्‍या नोकरांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीति बाळगून पाळा,” हे बायबलचे आर्जवणे मनी येते.—कलस्सैकर ३:२२.

भयावर मात

तुम्ही नव्यानेच नोकरीवर रुजू झाला असल्यास, पहिल्या काही दिवसांकरता भीती वाटणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. तुम्हाला कदाचित असा विचार येत असेल: ‘ते मला पसंत करतील का? मी ते काम करू शकेन का? त्यांना माझं काम पसंत पडेल का? मी बावळटासारखं तर दिसणारा नाही ना?’ येथे तुम्हाला जरा दक्षता बाळगावी लागेल नाहीतर ही भीती तुमचा सकारात्मक दृष्टिकोन नष्ट करील.

कंपनीबद्दल अधिक माहिती मिळवल्याने लवकरात लवकर रुळण्यास आणि तणाव दूर करण्यास मदत मिळू शकते. पाहा, ऐका आणि वाचा. योग्य वेळी तुमच्या सुपरव्हाईसरला नोकरीविषयी आणि तुमच्या कामाविषयी रास्त प्रश्‍न विचारा—यामुळे तुम्ही निर्बुद्धासारखे दिसणार नाहीत. स्वतःला प्रश्‍न करा, ‘माझ्या विभागाशी, कंपनीच्या संपूर्ण उद्देशाशी माझ्या कामाचा काय संबंध आहे?’ याची उत्तरे तुम्हाला कामाच्या उत्तम सवयी आणि कामाचे समाधान प्राप्त करण्यास मदत करू शकतात.

सहकामगारांसोबत जमवून घ्या

सर्व प्रकारच्या कामांमध्ये इतर लोकांशी व्यवहार हा असतोच. यास्तव, इतरांशी चांगले नातेसंबंध राखण्याविषयी माहिती असणे एखादी नोकरी टिकवून ठेवण्याकरता अत्यावश्‍यक असते. “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.” (रोमकर १२:१८) असे केल्याने नोकरीच्या ठिकाणी अनावश्‍यक बडबड किंवा संतप्त वितंडवाद टाळण्यास तुम्हाला मदत मिळू शकते.

काहीवेळा तुम्ही ज्या लोकांसोबत काम करता त्यांच्या पार्श्‍वभूमी आणि त्यांचे व्यक्‍तिमत्त्व तुमच्यापासून निराळे असते. पण, एखादी व्यक्‍ती भिन्‍न असल्यामुळे कनिष्ठ आहे असा विचार करू नका. निराळे असण्याच्या त्याच्या हक्काचा आदर करा. अनादराने वागवलेले कोणालाही आवडत नाही; त्यामुळे आपण कवडीमोल असल्याचे त्यास जाणवते. आपण सगळ्यांना आवडणारे आणि प्रिय असे—कोणीतरी असावे—असे प्रत्येकाला वाटते. सहकामगारांना आणि मालकाला आदराने वागवून पर्यायाने त्यांच्याकडून आदर मिळवा.

चहाडखोरपणा करू नका

“हे करणे धोक्याचे आहे,” असे सुरेश म्हणतो, “कारण चहाडखोरीमुळे तुमचे मालक किंवा इतरांविषयी वाईट छाप पडू शकते.” लोकवार्ता, माहिती मिळवण्याचा उत्तम स्रोत नाही आणि तुम्हाला काही भलतेच ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. या इतरांचा नावलौकिक—त्याचप्रमाणे तुमचा नावलौकिक देखील खराब करणारी लोकवार्तेतील गपशप बहुधा तिखटमीठ लावलेल्या चर्चा असतात. म्हणून, चकाट्या पिटण्याच्या इच्छेस मारून टाका.

हे देखील लक्षात असू द्या, की रडगाणे गाणारी व्यक्‍ती कोणालाही आवडत नाही. कामावर तुम्हाला कशाचा त्रास असल्यास, लोकवार्तेद्वारे त्याची दवंडी पिटवू नका. तुमच्या सुपरव्हाईसरशी जाऊन बोला. तथापि, त्यांच्या कचेरीत जाऊन रागाच्या भरात असे भलेबुरे सुनावू नका की ज्या कठोर शब्दांचा नंतर तुम्हाला खेद वाटेल. त्याचप्रमाणे, व्यक्‍तीवर हल्ला करण्याचा पाश टाळा. वास्तविकतेला धरून असा. समस्या समजावून देताना होता होईल तितके स्पष्ट आणि प्रामाणिक असा. कदाचित, तुम्ही अशी सुरवात करू शकता, ‘मला तुमची जरा मदत हवीय . . . ’ किंवा, ‘कदाचित माझं म्हणणं चुकीचं असेल पण मला वाटतं की. . . ’

वक्‍तशीरपणा महत्त्वाचा आहे

नोकरी गमवण्याची दोन मुख्य कारणे म्हणजे कामावर उशिरा येणे आणि कामाला दांड्या मारणे. एका मोठ्या औद्योगिक शहराच्या रोजगार आणि प्रशिक्षण संचालकाने तरुण कामगारांविषयी म्हटले: “त्यांनी सकाळी लवकर उठणे, आज्ञा पाळणे, शिकून घेतले पाहिजे. त्यांनी या गोष्टी कधीच शिकल्या नाहीत, तर बेरोजगारीची ही विकृती कायम राहते.”

सुरेशला वक्‍तशीरपणात अळमटळम केल्याने धडा मिळाला. “आळशीपणामुळे मी तीन महिन्यातच माझी पहिली नोकरी गमावली,” असे तो दुःखाने सांगतो, “आणि यामुळे इतर नोकऱ्‍या मिळवणं आणखीनच कठीण होऊन बसलं.”

इमानदारीचे मूल्य

कामगारांची भरती करणारे जोन्स म्हणतात: “इमानदारी एखाद्याला नोकरी टिकवण्यास मदत करू शकते.” इमानदार असण्यात, केवळ वस्तुंची चोरी न करणे एवढेच नाही तर अधिक वेळेकरता सुटी घेऊन वेळेची चोरी न करणे देखील समाविष्ट होते. इमानदार कामगार मौल्यवान आणि भरवशाचा मानला जातो. उदाहरणार्थ, कापडाच्या भव्य दुकानात कामास असणाऱ्‍या यहोवाच्या एका तरुण साक्षीदाराने इमानदारपणाचा एक चांगला नावलौकिक मिळवला होता.

“एकदा काय झालं,” तो आठवून सांगतो, “मॅनेजरला स्टॉकरूममध्ये कपड्यांखाली लपवलेली एक वस्तू आढळली. दुकानातल्या एका कामगाराने चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. दुकान बंद करण्याची वेळ झाली तेव्हा मी सहज मॅनेजरच्या कचेरीत गेलो, तर तिथं सर्व कामगार उपस्थित होते हे पाहून मला आश्‍चर्यच वाटलं. सर्व कामगारांची तपासणी करण्यासाठी त्यांना तिथं बोलवलं होतं. मला एकट्यालाच तपासणीसाठी बोलवलं नव्हतं.”

अनेक ख्रिस्ती युवकांनी अशाचप्रकारचे अनुभव घेतले आहेत आणि ते मौल्यवान कामगार ठरले आहेत. म्हणून, काम मिळवण्याकरता प्रयास करा. चिकाटी राखा. हार मानू नका. मग, तुम्हाला इतक्या परिश्रमांनंतर हवी असलेली नोकरी मिळाल्यावर ती टिकवून ठेवण्याकरता कष्ट करा!

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ तुमच्या शालेय अभ्यासाचा परिणाम नोकरी मिळण्याच्या क्षमतेवर कसा होऊ शकतो?

◻ नोकरी शोधताना चिकाटी राखणे महत्त्वाचे का आहे?

◻ नोकरीचा शोध तुम्ही कोणत्या ठिकाणी करू शकता आणि कोणत्या लोकांकडे विचारपूस करू शकता?

◻ नोकरीची मुलाखत पार पाडण्यासंबंधाने काही सल्ले कोणते आहेत?

◻ नोकरीवरून काढले जाऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता?

[१६६ पानांवरील संक्षिप्त आशय]

“उत्तम लिहिण्याला, वाचण्याला आणि बोलण्याला अत्यंत महत्त्व आहे”

[१७० पानांवरील संक्षिप्त आशय]

“मी स्वतःची समजूत घालत असे: ‘काम मिळवणं हेच माझं काम आहे’”

[१६८, १६९ पानांवरील चौकट/चित्र]

नोकरीच्या मुलाखती हाताळणे

“नोकरीच्या मुलाखतीसाठी जाण्याआधी, लक्षात असू द्या, पहिली छाप ही चिरस्थायी छाप असते,” असा सल्ला क्लीवलंड जोन्स हे नोकरीविषयक सल्लागार देतात. ते, मुलाखतीला जाताना जीन्स आणि स्पोर्टस्‌ शू न घालण्याची ताकीद देऊन नीटनेटके असण्याच्या गरजेवर जोर देतात. व्यक्‍तीचा जसा पेहराव तसेच कामही असेल असा निष्कर्ष मालक बहुधा काढतात.

कचेरीतल्या नोकरीसाठी अर्ज दिला असल्यास व्यावसायिकासारखा पेहराव करा. कंपनीतल्या कामासाठी अर्ज दिला असल्यास स्वच्छ व इस्त्री केलेली पँट व शर्ट आणि नीट दिसणारे बूट घाला. तुम्ही महिला असल्यास, सभ्य पेहराव करा आणि सौंदर्य प्रसाधने जरा बेतानेच वापरा. कचेरीतल्या नोकरीसाठी अर्ज दिला असल्यास, प्रासंगिक पेहरावासोबत चांगले सँडल घाला.

नोकरीच्या मुलाखतीला जाताना नेहमीच एकटे जा, असा इशारा जोन्स देतात. तुम्ही सोबत आईला किंवा मित्रांना आणले तर तुम्ही अद्याप अपरिपक्व आहात असा निष्कर्ष मालक काढू शकतात.

‘समजा मालकांनी आधीच्या कामाच्या अनुभवाबद्दल विचारले, तर मी काय उत्तर द्यावे?’ असा प्रश्‍न तुमच्या मनात असेल. थापा मारू नका. बहुतेकवेळा अतिशयोक्‍ती केल्याचे मालकांच्या सहज लक्षात येते. प्रामाणिक असा.

तुम्ही “खरोखरच्या” पहिल्याच नोकरीच्या शोधात असला तरीही तुम्हाला आधीच्या कामाचा अनुभव कदाचित मिळाला असेल याबद्दल तुम्ही अजाण असाल. तुम्ही कधी उन्हाळ्यात एखादी नोकरी केली का? किंवा तुम्ही कधी लहान मुलांची काळजी घेतली आहे का? घरातले काही कामकाज नियमित करण्याची कामगिरी तुम्हावर होती का? उपासनेच्या ठिकाणी काही कामे पार पाडण्याची जबाबदारी तुम्हाला देण्यात आली होती का? जाहीर व्याख्यान देण्याचे प्रशिक्षण तुम्ही कधी घेतले आहे का? असे असल्यास, तुम्हाला जबाबदारी उचलता येते हे दाखवण्यासाठी मुलाखतीच्या वेळी या गोष्टींचा उल्लेख अथवा तुमच्या बायोडेटात त्यांचा समावेश करू शकता.

मालकांना आणखी एक महत्त्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे, त्यांच्या कंपनीबद्दल आणि दिल्या जाणाऱ्‍या नोकरीबद्दल तुमची आवड. तुम्हाला काम करायचे आहे आणि तुम्ही ते करू शकता हे त्यांना पटवून द्या. “मला त्यातून काय फायदा” अशा मनोवृत्तीमुळे मुलाखत घेणाऱ्‍याची तुमच्याबद्दलची आस्था लगेचच नाहीशी होऊ शकते.

पूर्ण अथवा अर्ध-वेळ नोकरीचा अर्ज भरणे आणि ती मिळवणे हे असे आव्हान आहे ज्याला तुम्ही यशस्वीरित्या तोंड देऊ शकता. त्याचप्रमाणे ती नोकरी फक्‍त तुमच्याकरताच नव्हे तर इतरांचीही मदत करण्याचे साधन ठरते तेव्हा मिळणारे समाधान द्वीगुणित होते.

[Box on page 171]

नोकरीच्या मुलाखतीत काय करावे

प्रौढांसारखे, गंभीर असा. मालकाला योग्य आदरासह अभिवादन करा. त्यांना “यार” असे संबोधू नका किंवा “अरे तुरे”च्या भाषेत बोलू नका तर “सर” असे संबोधा.

खुर्चीत ताठ बसा, पाय जमिनीवर स्थिर ठेवा; दक्ष असा. पूर्व तयारीमुळे तुम्हाला शांत, आत्मविश्‍वासी आणि निश्‍चिंत असण्यास मदत होईल.

प्रश्‍नाचे उत्तर देण्याआधी विचार करा. विनयशील, अचूक, प्रामाणिक आणि मनमोकळे असा. संपूर्ण माहिती द्या. स्वतःची बढाई मारू नका.

स्वतःसोबत तुमच्या नोकऱ्‍या, त्यांच्या तारखा, पगार, कामाचे प्रकार, कामे सोडण्याची कारणे या सर्वांची यादी असलेली एक गाईड शीट ठेवा.

तुम्हाला हव्या असलेल्या कामामध्ये प्रगती करायला तुमचे प्रशिक्षण आणि कार्यानुभव, कशाप्रकारे मदत करील हे दाखवण्यास तयार असा.

संदर्भांकरता, तुमच्याविषयी आणि तुमच्या कामाविषयी माहिती असलेल्या तीन विश्‍वासहार्य लोकांची नावे (आणि संपूर्ण पत्ते) द्या.

आत्मविश्‍वासी, उत्साही असा पण थापा मारू नका. चांगली भाषा वापरा आणि स्पष्ट बोला. विनाकारण बडबड करू नका.

लक्षपूर्वक ऐका; शालीन आणि व्यवहारचतुर असा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या भावी मालकासोबत वादविवाद करू नका.

तुम्ही नोकरीसाठी किती योग्य आहात केवळ हे जाणण्यातच मालकाला रस असतो. व्यक्‍तिगत, घरगुती किंवा आर्थिक समस्यांचा उल्लेख करू नका.

तुम्हाला ती नोकरी मिळणार नाही असे दिसल्यास, कंपनीमध्ये भवितव्यात निर्माण होणाऱ्‍या इतर नोकरींविषयी मालकाकडून सल्ला प्राप्त करा.

मुलाखतीनंतर लगेचच मालकाला आभार प्रदर्शनाचे संक्षिप्त पत्र पाठवा. a

[तळटीपा]

a उगम: हाऊ टू “सेल युवरसेल्फ” टू ॲन एम्प्लॉयर न्यूयॉर्क राज्य रोजगार सेवा कार्यालयाचे माहितीपत्रक.

[Pictures on page 167]

शाळेत शिकलेली कलाकौशल्ये एके दिवशी नोकरीसाठी मूल्यवान शाबीत होतील