व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मला माझ्या शिक्षकांशी कसे जमवून घेता येईल?

मला माझ्या शिक्षकांशी कसे जमवून घेता येईल?

अध्याय २०

मला माझ्या शिक्षकांशी कसे जमवून घेता येईल?

“पक्षपात करणारे शिक्षक मला मुळीच आवडत नाहीत,” असं मिनी नामक युवती म्हणते. तुम्हालाही तसंच वाटत असावं यात शंका नाही. तरीही, १९८१ मधील १,६०,००० अमेरिकन युवकांच्या एका सर्वेक्षणात ७६ टक्के मुलांनी शिक्षकांवर कोणत्या न कोणत्या प्रकारच्या पक्षपाताचा दोष लावला!

युवकांच्या मते उत्तम गुण मिळण्याजोग्या कार्यासाठी जेव्हा कमी गुण मिळतात तेव्हा त्यांना राग येतो. शिस्तीचा अतिरेक होतो किंवा ती अनावश्‍यक असते अथवा जातीय भेदामुळे दिली जाते तेव्हा त्यांना ती आवडत नाही. शिक्षकाच्या आवडत्या मुलाकडे खास लक्ष किंवा त्याला खास वागणूक दिली जाते तेव्हा ते चिडतात.

शिक्षक तर परिपूर्ण नाहीतच हे मान्य आहे. सर्वांप्रमाणे, त्यांच्याही आपापल्या प्रवृत्ती, समस्या आणि होय, पूर्वग्रह असतात यात काहीच वावगे नाही. तथापि, बायबल इशारा देते: “मन उतावळे होऊ देऊन रागावू नको.” (उपदेशक ७:९) शिक्षकही “पुष्कळ चुका [करितात]. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय.” (याकोब ३:२) म्हणून तुम्ही आपल्या शिक्षकाला संशयाचा फायदा देऊ शकता का?

फ्रेडी नामक एका युवकाने निरीक्षिले, की त्याचे शिक्षक “सर्वांवर खेकसत होते.” फ्रेडी अतिशय चातुर्याने आपल्या शिक्षकांकडे गेला आणि त्यांच्या या तिरसट वागण्याचे कारण त्याला सापडले. “माझ्या कारने सकाळी मला त्रास दिला,” असे शिक्षक म्हणाले. “ऐन रस्त्यातच इंजिन गरम झालं आणि मला कामाला उशीर झाला.”

शिक्षक व त्यांची आवडती मुले

शिक्षकांच्या आवडत्या मुलांवर जी खास मेहेरबानी केली जाते त्याविषयी काय? शिक्षकांना देखील असामान्य दबाव आणि तणावांना तोंड द्यावे लागते हे लक्षात असू द्या. पौगंड असणे (इंग्रजी) या पुस्तकात शिक्षकांचे वर्णन “गंभीर कचाट्यात” अडकलेले असे केले आहे जेथे त्यांना अशा युवकांचे ध्यान धरून ठेवावे लागते “ज्यांची मने सहसा इतरत्र भरकटत असतात . . . त्यांच्यासमोर, १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळेकरता एकाग्र राहत नसलेले अतिशय चंचल, विकर्षित होणारे किशोरवयीन असतात.”

मग, एखादा शिक्षक अभ्यासू, लक्ष देणाऱ्‍या विद्यार्थ्याकडेच जास्त ध्यान देत असल्यास, किंवा त्याला अथवा तिला आदराने वागवत असल्यास ती आश्‍चर्याची गोष्ट आहे का? जेव्हा तुमच्यापेक्षा ‘पुढेपुढे करणाऱ्‍यांकडे’ अधिक लक्ष दिले जाते तेव्हा तुम्हाला ते सहन होणार नाही हे खरे आहे. पण, जोपर्यंत तुमच्या शैक्षणिक गरजांकडे दुर्लक्ष होत नाही तोपर्यंत एखादा मेहनती विद्यार्थी शिक्षकांचा आवडता असला तर तुम्ही अस्वस्थ का व्हावे अथवा तुम्हाला मत्सर का वाटावा बरे? यापेक्षा, स्वतः मेहनती होणे अधिक उत्तम असेल.

वर्गात युद्ध

एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाबद्दल म्हटले: “आम्हीच त्यांच्यासोबत वाकड्यात शिरलोय असं ते विचार करत राहिले आणि म्हणून आमच्यावर खार खात राहिले. ते आमचे शिक्षक अतिशय शंकेखोर होते.” तथापि, अनेक शिक्षकांना वाटते की त्यांना काही प्रमाणात “संशयखोर” असण्याचा हक्क आहे. बायबलने भाकीत केल्यानुसार, हे “कठीण दिवस” आहेत आणि विद्यार्थी सहसा “असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी” असतात. (२ तीमथ्य ३:१-३) यास्तव, यु.एस. न्यूझ ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट यात असे म्हटले होते: “अनेक शहरी जिल्ह्यांच्या शाळांतील शिक्षकांना हिंसेचे भय असते.”

एक माजी शिक्षक रोलंड बेट्‌स शिक्षकांविषयी असे म्हणतात: “डिवचून आणि चिडवून अखेरीस भडकण्याआधी शिक्षक कितपत नमतं घेतात किंवा सहन करतात . . . हे पाहण्याचा मुले आपला जन्मसिद्ध अधिकार समजतात . . . नवीन शिक्षकाला जवळजवळ असह्‍यच झालंय असं पाहिल्यावर ते आणखी डिवचतात.” तुम्ही अथवा तुमचे वर्गसोबती शिक्षकाला त्रास देण्यामध्ये सामील आहात का? मग, तुमच्या शिक्षकांची प्रतिक्रिया पाहून आश्‍चर्य करू नका.

बायबल म्हणते: “जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो.” (उपदेशक ७:७) काही शाळांमध्ये सर्रास असलेल्या भीती आणि अनादराच्या वातावरणात काही शिक्षक चिडतात आणि कडक शिक्षा करणारे बनतात हे समजण्याजोगे आहे. पौगंडावस्थेवरील कौटुंबिक संदर्भ पुस्तक (इंग्रजी) असे निरीक्षण करते: “जे विद्यार्थी . . . आपल्या वागणुकीद्वारे शिक्षकांच्या अभिप्रायांना महत्त्व देत नाहीत अशांनाही सहसा जास्त महत्त्व दिले जात नाही.” होय, तुसडे शिक्षक बहुधा आपल्या विद्यार्थ्यांमुळेच तसे बनतात!

वर्गात केलेल्या क्रूर चेष्टांच्या परिणामांचाही विचार करा. तरुण लोक, बदली शिक्षकांना जी “यातना, पीडा” देतात त्याविषयी वॅलरी ही तरुणी जरा अतिशयोक्‍ती करून सांगते. रोलंड बेट्‌स असेही म्हणतात: “बदली शिक्षकांचे वर्ग त्यांचे इतक्या निर्दयीपणे जाच करतात, की बहुतेकवेळा त्यांना असह्‍य होईस्तोवर खिजवले जाते.” शिक्षा काही दिली जाणार नाही हे ठामपणे माहीत असल्याने विद्यार्थ्यांना अचानक वात्रटपणाने वागण्यात मजा येते—एकसाथ सर्वजण आपली पुस्तके किंवा पेन्सिली जमिनीवर टाकतात. नाहीतर, ‘मठ्ठपणाचे नाटक’ करतात आणि शिक्षकांचा एकही शब्द कळत नाही असे दाखवून त्यांना गोंधळून टाकतात. “त्यांच्यासमोर अडखळणे आणायला आम्हाला मजा येते,” असे बॉबी म्हणतो.

तथापि, वर्गात क्रूरपणा केल्यावर बदल्यात दुष्ट, तुसड्या स्वभावाचा शिक्षक मिळाला तर त्याबद्दल आश्‍चर्य करू नका. (पडताळा गलतीकर ६:७.) सुवर्ण नियम लक्षात ठेवा: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) वर्गातील वात्रटपणात भाग घेण्यास नकार द्या. तुमच्या शिक्षकाच्या बोलण्याकडे लक्ष द्या. सहयोग द्या. कदाचित, कालांतराने ते इतक्या तुसडेपणाने वागणार नाहीत—निदान तुमच्याशी तरी.

‘माझ्या शिक्षकाला मी पसंत नाही’

काही वेळा एकमेकांचे पटत नसल्याने किंवा कोणत्या तरी गैरसमजामुळे तुमचे शिक्षक तुमच्याशी वाकड्यात शिरले असतील; जिज्ञासू वृत्तीला बंडखोरपणा अथवा विनोदबुद्धीला मूर्खपणा समजला जातो. त्याचप्रमाणे, एखाद्या शिक्षकाला तुम्ही आवडत नसल्यास, तुम्हाला गोंधळून टाकण्याची किंवा मानहानी करण्याची त्याची वृत्ती असेल. त्यामुळे परस्पर वैरभाव वाढत राहील.

बायबल म्हणते: “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. . . . शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.” (रोमकर १२:१७, १८) तुमच्या शिक्षकांच्या विरोधात न जाण्याचा प्रयत्न करा. अनावश्‍यक झगडे टाळा. तुमच्या शिक्षकाला तक्रार करण्यासाठी कोणतेही ठोस कारण देऊ नका. तर उलट, नीट वागण्याचा प्रयत्न करा. ‘नीट? आणि त्यांच्यासोबत?’ असे तुम्ही म्हणाल. होय, वर्गात आल्यावर शिक्षकाला आदराने अभिवादन करून शिष्टाचार प्रदर्शित करा. तुमची निरंतर शालीनता—एवढेच नव्हे तर, वेळोवेळी स्मित केल्यानेही—तुमच्याविषयीचे त्यांचे मत बदलू शकते.—पडताळा रोमकर १२:२०, २१.

प्रत्येकच वेळेस, हसून गोड करता येत नाही हे कबूल. पण उपदेशक १०:४ असा सल्ला देते: “तुजवर अधिपतीचा [किंवा अधिकार असलेल्या व्यक्‍तीचा] क्रोध झाला [तुम्हाला शिक्षा करण्याद्वारे] तर आपली जागा सोडू नको, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात.” त्याचप्रमाणे, “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते” हे देखील लक्षात असू द्या.—नीतिसूत्रे १५:१.

‘मला चांगले गुण मिळायला हवे होते’

ही सर्वसामान्य तक्रार आहे. या समस्येविषयी तुमच्या शिक्षकांशी बोलून पाहा. नाथानाने राजा दावीदाची एक गंभीर चूक उघड करण्याचे कठीण काम कसे पार पाडले त्याविषयी बायबल आपल्याला सांगते. राजमहालात मोठमोठ्याने दोषारोप करत नाथान घुसला नाही तर चतुरपणे तो दावीदाकडे गेला.—२ शमुवेल १२:१-७.

तुम्ही देखील अशाचप्रकारे नम्रपणे आणि शांतचित्ताने आपल्या शिक्षकाकडे जाऊ शकता. पूर्वी शिक्षक असलेले ब्रुस वेबर आपल्याला अशी आठवण देतात: “विद्यार्थ्यातील बंडखोरपणा शिक्षकात हेकेखोरपणा निर्माण करतो. तुम्ही आरडाओरडा करून अथवा अतिशय अन्याय झाल्याचा दावा करून बदला घेण्याची भाषा करू लागला तर काहीच निष्पन्‍न होणार नाही.” प्रौढासारखे वागून पाहा. कदाचित, शिक्षकांची गुण देण्याची पद्धत समजावून देण्यात तुम्ही त्यांच्याकडे मदत मागून सुरवात करू शकता. मग, वेबर म्हणतात की, “तुम्हाला मार्क देण्यात काही चूक झाली आहे असे म्हणण्याऐवजी काही गोष्टी शिक्षकांच्या नजरेतून निसटल्या असतील किंवा एकूण मार्कांची बेरीज करताना काही घोटाळा झाला असावा हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. तुमच्या शिक्षिकेच्याच गुण देण्याच्या पद्धतीचा उपयोग करा; आणि तुमच्या गुणात कुठं चूक दिसते ते तिला दाखवून द्या.” गुण बदलले नाही तरी तुमच्या प्रौढत्वाचा सकारात्मक प्रभाव शिक्षिकेवर कदाचित होईल.

आपल्या पालकांना कळवा

तथापि, काही वेळा फक्‍त बातचीत व्यर्थ ठरते. सुझनचा अनुभव घ्या. हुशार विद्यार्थी असून तिचे शिक्षक तिला नापास करू लागले तेव्हा तिला धक्काच बसला. समस्या? सुझन एक यहोवाची साक्षीदार असल्यामुळे तिला ती आवडत नव्हती हे तिने कबूलही केले. “मी खूप निराश झाले,” असे सुझन म्हणते, “आणि काय करावं कळत नव्हतं.”

सुझन आठवून सांगते: “मी हिंमत करून माझ्या आईला [जी एकटी पालक आहे] या शिक्षिकेविषयी सांगितले. ती म्हणाली, ‘बरं, मी तुझ्या शिक्षिकेशी बोलून पाहते.’ ओपन हाऊसच्या वेळी तिने माझ्या शिक्षिकेला काय समस्या आहे ते विचारलं. मला वाटलं होतं की आई फारच संतप्त होईल म्हणून, पण तसं मुळीच झालं नाही. ती शांतपणे तिच्याशी बोलली.” सुझनला दुसऱ्‍या एका शिक्षिकेने शिकवण्याची व्यवस्था त्या शिक्षिकेने केली.

हे मान्य आहे, की नेहमीच गुंत्याची उकल होत नाही, त्याचप्रमाणे काही वेळा तुम्हाला सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. पण या वर्षी, तुम्ही शिक्षकांशी शांतीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तर पुढचे वर्ष तर आहेच, त्यावेळी तुमची नव्याने सुरवात असेल, कदाचित वेगळे वर्गसोबती असतील—आणि शिक्षकही नवीन असतील ज्यांच्यासोबत जमवून घ्यायला तुम्हाला शिकावे लागेल.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ तुमच्याशी पक्षपात करणाऱ्‍या शिक्षकाबद्दल तुम्ही कसा दृष्टिकोन राखू शकता?

◻ तथाकथित आवडत्या मुलांकडे शिक्षक इतके लक्ष का देतात?

◻ कंटाळवाण्या शिक्षकाकडून तुम्ही कसे शिकू शकता?

◻ काही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांशी तुसडेपणाने का वागतात?

◻ वर्गात तुम्ही सुवर्ण नियमाचा अवलंब कसा करू शकता?

◻ गुण देण्यात अथवा तुमच्याबरोबर व्यवहार करण्यात पक्षपात होत आहे असे वाटल्यास तुम्ही काय करू शकता?

[१५८ पानांवरील चित्र]

आपल्या आवडत्या मुलांकडे शिक्षक अधिक लक्ष देत असल्यामुळे चीड येऊ शकते

[१६३ पानांवरील चित्र]

“अनेक शहरी जिल्ह्यांच्या शाळांतील शिक्षकांना हिंसेचे भय असते.”—यु.एस. न्यूझ ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट

[१६०, १६१ पानांवरील चौकट/चित्र]

‘माझी शिक्षिका कंटाळवाणी आहे!’

पौगंडावस्थेवरील कौटुंबिक संदर्भ पुस्तक (इंग्रजी) असे म्हणते: “काही सर्वेक्षणे दाखवतात की बहुतांश पौगंडावस्थेतील विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दल टीका करतात आणि ते कंटाळवाणे आहेत किंवा त्यांना विनोदबुद्धी नाही अशी तक्रार करतात.” आज ना उद्या, तुम्हाला सुद्धा ‘रडकुंडीला’ आणण्याइतके कंटाळवाणे शिक्षक कदाचित मिळतील. तुम्ही काय करू शकता?

एका अलीकडील प्रयोगात असे निष्पन्‍न झाले की, औद्योगिक कला, शारीरिक शिक्षण आणि संगीत अशा वर्गांमध्ये एखाद्या किशोरवयीनाची एकाग्रता जास्त असते. परंतु, भाषा आणि इतिहासाच्या वर्गांमध्ये मात्र ती ढासळते.

शारीरिक शिक्षणाचे अथवा संगीताचे शिक्षक, अभ्यासाच्या विषयाच्या शिक्षकांपेक्षा जास्त प्रतिभावान असतात का? तसे काही नसते. स्पष्टतः, अभ्यासाच्या विषयांबद्दल अनेक विद्यार्थ्यांची केवळ नकारात्मक मनोवृत्ती असते. तसेच, एखादा विषय कंटाळवाणा आहे असे विद्यार्थ्यांनी मनात ठरवलेच, तर सोक्रेटीससारख्या वाकबगार शिक्षकालाही त्यांचे लक्ष धरून ठेवणे कठीण जाईल! तर मग, विशिष्ट विषयांबद्दल तुमच्या मनोवृत्तीत थोडाफार बदल करण्याची गरज आहे का? शिकत असलेल्या गोष्टींमध्ये अधिक रस घेतल्याने शाळा कंटाळवाणी वाटणार नाही.

काही वेळा शिकण्याची हौस असणारी मुले देखील त्यांचे शिक्षक “चांगले नसल्याची” तक्रार करतात. पण मग, “चांगले” शिक्षक म्हणजे नमके कोण? एका तरुण मुलीने म्हटले: “मला माझी गणिताची शिक्षिका आवडते कारण ती खूप विनोदी आहे.” आपले इंग्रजीचे शिक्षक ‘अतिशय गंमतीजमती करत’ असल्यामुळे एका मुलाने त्यांचे गुणगान गायिले.

पण आवडता असणे अथवा गंमतीदार असणे हा शिक्षकाकरता फायदा असला, तरी याचा अर्थ ते “इतरांना शिकविण्यास योग्य” आहेत असा होत नाही. (२ तीमथ्य २:२) बायबल येथे आध्यात्मिक योग्यतांचा उल्लेख करत असले, तरी एखाद्या चांगल्या शिक्षकाला आपला विषय माहीत असला पाहिजे या वस्तुस्थितीस ते ठळकपणे मांडते.

ज्ञान आणि लोभस व्यक्‍तिमत्त्व प्रत्येकालाच लाभत नाही हे दुर्दैव आहे. उदाहरणासाठी, प्रेषित पौल देव वचनाचा शिक्षक म्हणून अतिशय योग्य होता. तरीही, पौलाच्या दिवसातील काही ख्रिश्‍चनांनी “त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे,” अशी तक्रार केली. पौलाने उत्तरले: “जरी भाषण करण्यात [मी] अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसा नाही.” (२ करिंथकर १०:१०; ११:६) काहींनी पौलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून वक्‍ता या नात्याने केवळ त्याच्या तथाकथित त्रुटी पाहिल्या असल्या, तर त्यांनी मौल्यवान ज्ञान गमावले होते. तुम्ही शाळेच्या बाबतीत ही चूक करू नका! एखादे शिक्षक “चांगले नाहीत” असे ठरवण्याआधी स्वतःला विचारा, ‘त्यांच्या विषयाबद्दल त्यांना चांगली माहिती आहे का? मी त्यांच्यापासून काही शिकू शकतो का?’

जो शिक्षक कंटाळवाणा वक्‍ता असतो त्याच्याकडे नेहमीपेक्षा अधिक लक्ष द्यावे लागते. तुमचे लक्ष त्याच्या बोलण्यावर राहण्यासाठी टिपणी घ्या. वर्गातील निरस चर्चांसोबत घरी अतिरिक्‍त अभ्यास करा.

स्वतः शिक्षिका असलेल्या बार्बरा मेयर म्हणतात: “ज्या शिक्षकांनी कित्येक वेळा त्याच त्या धड्यांची पुनरुक्‍ती केलीय त्यांचा तो नित्यक्रम बनतो.” मग त्यात जिवंतपणा आणण्यासाठी तुम्ही काय करू शकता? “हात वर करून आणखी माहिती विचारा . . . त्यांच्याकडून होता होईल तितकी माहिती मिळवा.” शिक्षकाला हे नापसंत असेल का? आदराने केल्यास नाही. (कलस्सैकर ४:६) मेयर म्हणतात: “मग तुम्हाला आढळेल की तुमचे शिक्षक वर्गात येताना वरवरच्या ज्ञानापेक्षा जरा जास्तच तयारी करून येतात.”

उत्साह संसर्गजन्य असतो, आणि तुमची शिकण्याची इच्छा कदाचित शिक्षकात काही जीव आणील. अर्थात, शंभर टक्के बदल होण्याची अपेक्षा करू नका. त्याचप्रमाणे, असे काही वर्ग असतील की तुम्हाला ते कसेबसे सहन करावेच लागतील. पण, तुम्ही चांगले ऐकणारे असला आणि जे काही होत असते त्यामध्ये तुम्हाला खरोखरच रस असला, तर तुम्ही अजूनही शिकू शकता—कंटाळवाण्या शिक्षकाकडूनही.

[१६२ पानांवरील चित्र]

शालेय हिंसेतील वाढीमुळे शिक्षकाचे काम कठीण बनले आहे

[१६४ पानांवरील चित्र]

तुमच्याबाबतीत काही अन्याय झाला आहे असे वाटल्यास, आदरणीय पद्धतीने आपल्या शिक्षकांची भेट घ्या