माझे मार्क मला कसे सुधारता येतील?
अध्याय १८
माझे मार्क मला कसे सुधारता येतील?
प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांसमोर ‘तुम्हाला सर्वात जास्त चिंता कशाची वाटते?’ हा सवाल उभा केल्यावर ५१ टक्के मुलांचे उत्तर होते ‘मार्कांची’!
म्हणून युवकांना सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे शाळेतले गुण आहेत यात काही आश्चर्य नाही. गुणांमुळे पदवीधर होणे किंवा मागे पडणे, चांगल्या पगाराची किंवा कमी पगाराची नोकरी मिळणे, पालकांकडील कौतुक किंवा त्यांचा संताप अशा प्रकारचे प्रतिसाद मिळू शकतात. हे मान्य आहे की, गुण आणि चाचण्या यांचे आपापले महत्त्व आहे. येशू ख्रिस्ताने देखील वेळोवेळी विशिष्ट बाबींविषयी आपल्या शिष्यांना समजले आहे की नाही हे तपासून पाहिले. (लूक ९:१८) तसेच शाळांमधील मोजमाप व मूल्यमापन (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते त्यानुसार: “चाचण्यांच्या निकालावरून प्रत्येक विद्यार्थी कुठे हुशार आणि कुठे कमजोर आहे हे प्रकट होऊ शकते व ते निकाल पुढील अभ्यासासाठी प्रेरक साधने ठरू शकतात.” पालकांना, शाळेत तुमची प्रगती होत आहे की नाही याची देखील कल्पना गुणांवरून मिळू शकते.
समतोल साधणे
तथापि, गुणांविषयी अधिक चिंता करीत बसल्याने नाशकारक ताणतणाव निर्माण होऊ शकतात आणि भयानक चढाओढ उद्भवू शकते. पौगंडावस्थेवर आधारित एक पाठ्यपुस्तक असे निरीक्षण करते की विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी “चढाओढीच्या गुंत्यात सापडू शकतात ज्यामध्ये शिकण्यावर भर देण्याऐवजी गुण आणि वर्गातील नंबर यावर भर दिला जातो.” परिणामस्वरूप, डॉ. विल्यम ग्लासर यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, विद्यार्थी, “चाचणीत काय काय असणार याची विचारपूस करण्यास फारच लवकर शिकतात . . . आणि केवळ तेवढ्याच साहित्याचा अभ्यास करून येतात.”
उपदेशक ४:४) जीवघेणी चढाओढ, भौतिक धनसंपत्तीसाठी असो किंवा शैक्षणिक पुरस्कारांसाठी असो, ती व्यर्थच आहे. देव-भीरू युवकांना, शाळेत परिश्रमपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत याची जाणीव असते. पण शिक्षणाला जीवनात महत्त्वाचे स्थान देण्याऐवजी ते आध्यात्मिक आस्थांची ध्येये ठेवून आपल्या भौतिक गरजांची काळजी घेण्याबद्दल देवावर भरवसा ठेवतात.—मत्तय ६:३३; कारकीर्द निवडण्याविषयी अध्याय २२ पाहा.
राजा शलमोनाने इशारा दिला: “मग मी सर्व उद्योग व कारागिरी ही पाहिली; ही सर्व चढाओढीमुळे होतात. हाहि व्यर्थ व वायफळ उद्योग होय.” (शिवाय, शिक्षण म्हणजे, परीक्षांमध्ये गुण मिळवण्याची धडपड नव्हे. शलमोनाने ज्यास “विचारशीलता” म्हटले, म्हणजेच कच्ची माहिती गोळा करून त्यातून योग्य, व्यावहारिक निष्कर्ष काढण्याची कला विकसित करणे हे गोवलेले आहे. (नीतिसूत्रे १:४) अंदाज बांधणे, शेवटल्या क्षणी तयारी एवढेच काय तर कॉपी करून कसेबसे काठावर पास होणारा युवक खऱ्या अर्थाने विचार करण्यास कधीही शिकत नाही. नंतर चेकबुकमधील हिशेब पाहता आला नाही तर गणितात जास्त गुण मिळवण्याचा काय फायदा?
यास्तव, गुणांना अंतिम ध्येय नव्हे तर शाळेतील प्रगती पाहण्याचे सहायक साधन म्हणून लेखणे महत्त्वाचे आहे. तथापि, तुमच्या क्षमता दाखविणारे गुण तुम्ही कसे मिळवू शकता?
शिकण्याची जबाबदारी अंगी घ्या!
लिंडा निल्सेन या शिक्षिकेच्या मते, मठ्ठ विद्यार्थी “[शाळेतील] आपल्या असमाधानकारक कामगिरीचा दोष त्यांच्या नियंत्रणापलीकडील कारणांवर लावतात: अयोग्य प्रश्नपत्रिका, पक्षपाती शिक्षक, फुटके नशीब, दैव, हवामान इत्यादी.” परंतु बायबल म्हणते: “आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही.” (नीतिसूत्रे १३:४) होय, कमी गुण मिळण्याचे खरे कारण सहसा आळशीपणाच असतो.
पण, हुशार विद्यार्थी शिकण्याची जबाबदारी अंगी घेतात. ‘टीन
नियतकालिकाने हायस्कूलमधील (उच्च माध्यमिक) उत्तम कार्यसिद्धी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे एकदा मत विचारले. त्यांचे रहस्य? “व्यक्तिगत प्रेरणा, प्रगतीपथावर राहण्यास मदत करते,” असे एकाने म्हटले. “आराखडा बनवणे आणि आपल्या वेळेचे नियोजन करणे,” असे दुसऱ्याने म्हटले. “स्वतःकरता ध्येय राखली पाहिजेत,” असे आणखी एकाने म्हटले. होय, तुमचे गुण किती चांगले आहेत हे बहुतांश तुमच्या नियंत्रणापलीकडील कारणांवर नव्हे तर तुमच्यावर—शाळेत परिश्रमपूर्वक अभ्यास करण्याचा आणि मेहनती असण्याचा किती प्रयास करत आहात यावर निर्भर असते.‘पण मी खरंच अभ्यास करतो’
कदाचित असाच दावा अनेक युवक करतील. रक्त आटवूनही आपल्याला प्रतिफळ मिळत नाही असे त्यांचे प्रांजळ मत असते. तथापि, काही वर्षांआधी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील (अ.सं.सं.) संशोधकांनी सुमारे ७७० विद्यार्थ्यांचे मत घेऊन त्यांच्या विचारानुसार शालेय पाठासाठी ते किती कष्ट घेतात असे विचारले. गंमत म्हणजे, कमी मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचेही असे मत होते की आपण इतर सर्वांप्रमाणेच प्रयास करतो! तथापि, त्यांच्या अभ्यासाच्या सवयींचे परीक्षण केल्यावर, उत्तम कार्यसिद्धी असणाऱ्या आपल्या शाळासोबत्यांच्या तुलनेत ते खरे पाहता अतिशय कमी गृहपाठ करत असल्याचे आढळून आले.
यातून शिकण्यासारखा धडा? कदाचित तुम्ही देखील तुम्हाला वाटते तितक्या परिश्रमाने अभ्यास करत नसाल आणि म्हणून काही बदल करण्याची आवश्यकता असेल. शैक्षणिक मानसशास्त्राचे नियतकालिक (इंग्रजी) यामधील एका लेखाने दर्शवले की केवळ, “गृहपाठाचा अवधी वाढवल्याने हायस्कूलमधील विद्यार्थ्याचे गुण वाढू शकतात.” खरे म्हणजे, “दर आठवड्याला १ ते ३ तास गृहपाठ केल्याने सर्वसामान्य अक्षम विद्यार्थी, गृहपाठ न करणाऱ्या सर्वसामान्य सक्षम विद्यार्थ्याएवढेच गुण मिळवू शकतो.”
प्रेषित पौलाला ध्येय साध्य करण्यासाठी लाक्षणिक अर्थाने ‘आपले शरीर कुदलावे लागले.’ (१ करिंथकर ९:२७) तुम्हाला सुद्धा स्वतःच्या बाबतीत कडक असण्याचे धोरण अंमलात आणावे लागेल, विशेषतः टीव्ही किंवा इतर विकर्षणे अभ्यासापासून तुमचे मन सहजगत्या वळवत असतात तेव्हा, “गृहपाठ पूर्ण होईपर्यंत टीव्ही बंद!” अशी एखादी खूण टीव्हीवर लावू शकता.
तुमच्या अभ्यासाचे वातावरण
खास अभ्यासासाठी एखादे शांत ठिकाण असल्याने आपणापैकी अनेकांना त्याचा फायदा होऊ शकतो. तुमच्या स्वतःच्या खोलीत तुमच्यासोबत आणखी दुसरे कोणी राहत असल्यास किंवा तुमच्या घरात जेमतेमच जागा असल्यास तडजोड करा! प्रत्येक सायंकाळी एक-दोन तासांकरता अभ्यासाला म्हणून कदाचित स्वयंपाक खोली किंवा घरातल्या कोणाच्या तरी बेडरूमचा वापर करता येईल. किंवा अखेरचा उपाय म्हणून सार्वजनिक ग्रंथालय अथवा एखाद्या मित्राचे घर पाहा.
शक्य असल्यास, ऐसपैस मेज किंवा टेबलाचा वापर करा ज्यावर तुम्ही तुमचे साहित्य पसरून ठेवू शकता. पेन्सिल आणि पेपर वगैरे जवळच ठेवा म्हणजे तुम्हाला वारंवार उठावे लागणार नाही. सांगावयास खेद वाटतो, पण फोन खणाणत राहतो किंवा पाहुण्यांची ये-जा चालू असते तेव्हा जसे लक्ष लागत नाही त्याचप्रमाणे टीव्ही किंवा रेडिओ चालू असल्यावरही एकाग्रता नष्ट होते.
डोळ्यांना त्रास होणार नाही असा पुरेसा प्रकाश असण्याची देखील खात्री करा. चांगला प्रकाश अभ्यासाचा थकवा कमी करतो व तुमच्या डोळ्यांची सुरक्षा देखील करतो. तसेच शक्य असल्यास, खोलीत खेळती हवा असल्याचे व खोलीचे तापमान योग्य असल्याचे तपासून पाहा. उष्ण खोलीपेक्षा थंड खोलीमुळे अभ्यासाचे अधिक उत्साहवर्धक वातावरण निर्माण होते.
पण तुम्हाला अभ्यास करण्याची इच्छाच नसल्यास काय? आपल्या इच्छेनुसार वागण्याचे सुख आपल्याला जीवनात क्वचितच मिळते. प्रापंचिक नोकरीवर असताना, दररोज कामावर जावेच लागते—मग जाण्याची इच्छा असो किंवा नसो. म्हणून, गृहपाठ हा आत्मशिस्तीचा सराव, भावी कार्यानुभवाची तालीम आहे असे समजा. याबाबतीत कडक असा. एक शिक्षक असा सल्ला देतात: “शक्यतो, अभ्यास दररोज त्याच ठिकाणी आणि त्याच वेळी केला पाहिजे. अशाप्रकारे, नियमित अभ्यासाची सवय लागेल आणि . . . यामुळे अभ्यासाप्रती तुमची अनिच्छा कमी होईल.”
तुमच्या अभ्यासाचा नित्यक्रम
फिलिप्पैकर ३:१६ (पं.र.भा.) येथे पौलाने, “त्या नियमाने चालावे” असे प्रोत्साहन ख्रिश्चनांना दिले. पौल येथे ख्रिस्ती जीवनाच्या नियमाविषयी बोलत होता. तथापि, नियम किंवा विशिष्ट गोष्टी करण्याचा नित्यक्रम, अभ्यासाच्या पद्धतीबाबतीत देखील मदतदायी ठरतो. उदाहरणार्थ, तुम्ही ज्याचा अभ्यास करणार आहात त्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न करा. लागोपाठ, मिळत्याजुळत्या विषयांचा (जसे की, दोन परदेशी भाषा) अभ्यास करण्याचे टाळा. प्रत्येक विषयानंतर थोडासा विश्राम घ्या, विशेषतः तुमचा गृहपाठ खूप असतो तेव्हा.
नेमलेल्या पाठात जास्त वाचन गोवलेले असल्यास, तुम्ही निम्नलिखित पद्धत अनुसरून पाहू शकता. प्रथम, तुमचे साहित्य काय आहे ते तपासा. नेमलेल्या साहित्यावरून एकदा नजर फिरवा, उपशिर्षक, तक्ते वगैरे पाहा जेणेकरून एकूण कल्पना मनात येईल. त्यानंतर, अध्यायाचे शीर्षक किंवा मुख्य वाक्यांवर आधारित प्रश्न तयार करा. (यामुळे वाचन साहित्यावर तुमचे मन एकाग्र राहते.) आता, वाचन करत असताना या प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रत्येक परिच्छेद किंवा विभाग वाचून झाल्यावर, पुस्तकात न पाहता तुम्ही जे काही वाचले ते म्हणण्याचा प्रयत्न करा किंवा आठवून पाहा. मग, नेमून दिलेला संपूर्ण पाठ पूर्ण केल्यावर शीर्षके तपासून प्रत्येक विभागाच्या बाबतीत आपल्या स्मरणशक्तीची परीक्षा घेऊन उजळणी करा. या पद्धतीमुळे वाचलेला ८० टक्के भाग आठवणीत ठेवण्यास विद्यार्थ्यांना मदत मिळाली आहे असा काहींचा दावा आहे!
एक शिक्षक आणखी असे म्हणतात: “एखादी वास्तविकता अलग नसून नेहमीच इतर माहितीशी संबंधित असते हे विद्यार्थ्याने समजून घेणे महत्त्वाचे असते.” म्हणून, तुम्ही ज्याचा अभ्यास करता त्याचा संबंध तुम्हाला आधीच माहीत असलेल्या आणि तुम्ही अनुभवलेल्या गोष्टींशी जोडून पाहा. शिकत असलेल्या गोष्टीचे व्यावहारिक मूल्य शोधा.
मनोवेधक गोष्ट अशी की, देव-भीरू युवकाला यामुळे खरा फायदा प्राप्त होतो. कारण बायबल म्हणते: “परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय.” (नीतिसूत्रे १:७) उदाहरणासाठी, भौतिकशास्त्राचे नियम शिकून घेणे म्हणजे अतिशय कंटाळवाणे वाटत असावे. पण, निर्मितीद्वारे देवाचे ‘अदृश्य गुण स्पष्ट दिसतात’ हे माहीत असल्याने शिकत असलेल्या गोष्टी आणखी अर्थभरीत होतात. (रोमकर १:२०) अशाचप्रकारे, इतिहास देखील यहोवाच्या उद्देशांच्या पूर्ततेचा उल्लेख करतो. सात जागतिक सत्तांची (सध्याच्या अँग्लो-अमेरिकन संयोगासहित) चर्चा चक्क बायबलमध्ये केलेली आहे!—प्रकटीकरण १७:१०; दानीएल, अध्याय ७.
तुम्ही शिकत असलेल्या गोष्टींचा संबंध तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टींशी अथवा तुमच्या ख्रिस्ती विश्वासाशी जोडल्यास, वास्तविकता अर्थपूर्ण वाटू लागतात, ज्ञान प्रगत होऊन समजबुद्धीत परिणीत होते. त्याचप्रमाणे, शलमोनाच्या निरीक्षणानुसार “समंजसाला ज्ञानप्राप्ति होणे सोपे असते.”—नीतिसूत्रे १४:६.
‘पुढच्या आठवड्यात चाचणी असेल’
हे शब्द ऐकून तुमची तारांबळ उडण्याची गरज नाही. सर्वात प्रथम, तुमच्या बोलण्यावरून ही कशाप्रकारची चाचणी म्हणजे निबंध चाचणी असेल की अनेक पर्याय असलेली चाचणी असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे, चाचणी आधीच्या काही दिवसांदरम्यान चाचणीत काय येईल याबद्दलच्या सुगाव्यांकडे लक्ष द्या. (“नंतरचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे” किंवा “हे नक्की लक्षात ठेवा” हे वैशिष्ट्यपूर्ण सुगावे आहेत असे सिनियर स्कोलॅस्टीक नियतकालिक म्हणते.) नंतर, तुमच्या नोंदी, पाठ्यपुस्तके आणि नेमलेला गृहपाठ यांची उजळणी करा.
“तिखे तिख्याला पाणीदार करिते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करितो,” अशी आठवण शलमोन आपल्याला करून देतो. (नीतिसूत्रे २७:१७) कदाचित, एखादा मित्र किंवा पालक तुमच्याकडून उत्तरे पक्के करवून घेण्यास किंवा वर्गपाठाच्या साहित्याचे पाठांतर करवून घेण्यास आनंदाने तयार होतील. मग परीक्षेच्या आदल्या रात्री जास्त दगदग करून घेऊ नका आणि रात्रभर चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा. “चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?” असे येशूने विचारले.—मत्तय ६:२७.
अपयश
पास होण्याचा अतिशय प्रयास केल्यावरही चाचणीत नापास झाल्यावर तुमचा आत्म-सन्मान उद्ध्वस्त होऊ शकतो. पण मॅक्स रॅफर्टी हे शिक्षक आपल्याला आठवण करून देतात: “आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला किती माहिती आहे, किती चांगले मार्क मिळतात यावर आपली कार्यसिद्धी ठरवली जाते . . . जीवन म्हणजे मजाच मजा असा विचार करायला लावून जी शाळा मुलांशी चेष्टा करते ती शाळा नव्हे. ती स्वप्ननगरी आहे.” चाचणीत नापास होण्याच्या मानखंडनेमुळे तुम्हाला स्वतःच्या चुकांवरून धडा शिकण्यास आणि सुधारणा करण्यास प्रेरणा मिळाली तर त्याचा काही फायदा होईल.
पण, असमाधानकारक प्रगतीपत्रक घेऊन निराशित पालकांचा सामना करण्याविषयी काय? काही वेळा, असे करण्याच्या भीतीने आत्यंतिक फसव्या चालबाजी शोधून काढल्या आहेत. “मी किचन टेबलावर प्रगतीपत्रक ठेवून माझ्या खोलीत गेलो की थेट दुसऱ्या दिवशीच बाहेर पडायचो,” असे एक युवक आठवून सांगतो. आणखी एक असे म्हणतो, “मी तर शेवटल्या क्षणीच आईला प्रगतीपत्रक दाखवायचो. सकाळी ती कामाला निघायच्या ऐन घाईत असताना तिच्याकडे प्रगतीपत्रक नेऊन म्हणायचो, ‘तुझी सही हवीय.’ तेव्हा
माझ्याकडे विचारपूस करायला तिच्याजवळ वेळच नसायचा”—निदान त्या क्षणी तरी. काही युवकांनी तर आपल्या प्रगतीपत्रकांवर चक्क खोटे मार्क लिहिले!तथापि, शाळेत तुमची कामगिरी कशी आहे हे जाणून घेण्याचा तुमच्या पालकांना हक्क आहे. साहजिकच, तुमच्या गुणांवरून तुमच्या क्षमता दिसून याव्यात अशी त्यांची अपेक्षा असते, आणि तुमचे गुण सरासरीपेक्षा कमी असल्यास, उचित शिक्षा मिळण्याची तुम्ही अपेक्षा करू शकता. म्हणून आपल्या पालकांसोबत प्रामाणिक असा. तसेच, “आपल्या बापाचा बोध [ऐका], आपल्या आईची शिस्त सोडू [नका].” (नीतिसूत्रे १:८) तुमच्या मते, तुमच्याकडून खूपच अपेक्षा केली जात असल्यास, याविषयी त्यांच्याशी बातचीत करा.—अध्याय २ मधील “मी माझ्या पालकांना कसे सांगू?” या शिर्षकाची पुरवणी पाहा.
गुण हे महत्त्वाचे असले, तरी व्यक्ती या नात्याने तुमचे मूल्य ठरवण्यात ते अखेरचे प्रमाण नाहीत. तरीसुद्धा, शाळेत असलेल्या वेळेचा फायदा उचला आणि होता होईल तितके शिकून घ्या. हा प्रयास तुमच्या गुणांमधून प्रतिबिंबित होईल ज्यामुळे तुम्हाला—त्याचप्रमाणे तुमच्या पालकांना—आनंद व समाधान मिळेल.
चर्चेसाठी प्रश्न
◻ गुणांद्वारे कोणता उद्देश निष्पन्न होतो आणि त्यांबद्दल समतोल दृष्टिकोन राखणे महत्त्वाचे का आहे?
◻ शिकण्याची व्यक्तिगत जबाबदारी घेणे महत्त्वाचे का आहे?
◻ शाळेनंतरच्या कार्यहालचालींत भाग घेण्यासंबंधाने कोणत्या गोष्टी विचारात घ्यावयास हव्यात?
◻ आपले गुण सुधारण्याचे काही मार्ग कोणते आहेत?
◻ चाचण्यांकरता तुम्ही कशी तयारी करू शकता?
◻ अपयशाबद्दल तुमचा दृष्टिकोन काय असावा आणि अशाप्रकारचे अपयश आपल्या पालकांपासून तुम्ही लपवून ठेवावे का?
[१४१ पानांवरील संक्षिप्त आशय]
अंदाज बांधणे, शेवटल्या क्षणी तयारी एवढेच काय तर कॉपी करून कसेबसे काठावर पास होणारा युवक खऱ्या अर्थाने विचार करण्यास कधीही शिकत नाही
[१४४, १४५ पानांवरील चौकट/चित्र]
शाळेनंतरच्या कार्यहालचालींबाबत काय?
अनेक तरुणांना वाटते की शाळेनंतरच्या कार्यहालचालींमुळे कार्यसिद्धीची भावना प्राप्त होते. “जितके क्लब होते त्या प्रत्येकात माझं नाव होतं,” असे बाल्टीमोर, मॅरीलंड (अ.सं.सं.) येथील एक मुलगा आठवून सांगतो. “मला ज्या गोष्टी आवडतात त्या करण्यात मला आनंद वाटायचा. मला मोटारीचे काम करायला आवडायचं म्हणून ऑटोमोटिव्ह क्लबमध्ये भरती झालो. संगणक आवडतात म्हणून त्या क्लबमध्ये. ऑडियो आवडतो म्हणून त्या क्लबमध्ये.” विशेषतः, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळेनंतरच्या कार्यहालचालींमध्ये भाग घेण्याचा आग्रह करण्यात येतो.
तथापि, पूर्वी स्वतः शिक्षक असलेल्या एका यु.एस. फेडरल सरकारी अधिकाऱ्याने सावध राहा! यास सांगितले: “विद्यार्थी संभवतः शाळेतील पाठाऐवजी अभ्यासक्रमात नसलेल्या कार्यहालचालींत अधिक वेळ खर्च करून नित्याने चांगले गुण मिळवत नाहीत.” होय, अभ्यासक्रमात नसलेल्या कार्यहालचालींची बाब येते तेव्हा समतोल राखणे सोपी गोष्ट नसते. शाळेच्या सॉफ्टबॉल संघासोबत खेळणारी कॅथी नामक मुलगी अशी म्हणते: “खेळून आल्यावर मी इतकी थकून जायचे की बाकीचं कोणतंच काम करायला त्राण नसायचे. माझ्या शालेय पाठावर त्याचा परिणाम झाला. म्हणून या वर्षी मी नाव दिलंच नाही.”
या व्यतिरिक्त आध्यात्मिक धोके देखील आहेतच. एक ख्रिस्ती पुरुष आपल्या किशोरवयीन काळाबद्दल आठवून सांगतो: “मला वाटलं मी या तीन गोष्टीत मेळ घालू शकतो: शाळेचा पाठ, ट्रॅक संघासोबत प्रॅक्टिस आणि आध्यात्मिक कार्यहालचाली. पण तिन्ही गोष्टींचा मेळ बसला नाही, की प्रत्येकवेळी माझ्या आयुष्यातील आध्यात्मिक गोष्टींचाच त्याग व्हायचा.”
शाळेतील दोन खेळ संघात सामील असणारा थेमन नामक युवक मान्य करतो: “[आध्यात्मिक सूचनेकरता] मी [राज्य] सभागृहात सभांना उपस्थित राहू शकत नव्हतो कारण आम्ही मंगळवारी बाहेरगावी जायचो, गुरुवारी बाहेरगावी जायचो, शनिवारी सुद्धा बाहेरगावी जायचो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे दोनला घरी पोहोंचायचो.” “शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी” असली तरी “सुभक्ति तर सर्व बाबतीत उपयोगी आहे” हे मनात बाळगणे अत्यावश्यक आहे.—१ तीमथ्य ४:८.
त्याचप्रमाणे, नैतिक धोक्यांचाही विचार करा. तुम्हाला सहवास, चांगला नैतिक प्रभाव पाडणाऱ्या हितकर मित्रांसोबतचा सहवास मिळेल का? संभाषणाचा विषय कोणता असेल? संघातील सोबती किंवा क्लबच्या सदस्यांचा तुमच्यावर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो का? १ करिंथकर १५:३३ म्हणते, “कुसंगतीने नीति बिघडते.”
मनोवेधक गोष्ट अशी की, यहोवाच्या साक्षीदारांपैकी अनेक युवकांनी शाळेनंतरचा समय क्रिडेपेक्षा आणखी फायदेकारक असलेल्या कामात खर्च करण्याचे ठरवले आहे: ते म्हणजे, निर्माणकर्त्याला जाणून घेण्यात इतरांची मदत करणे. कलस्सैकर ४:५ सल्ला देते: “बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधि साधून घ्या.”
[Pictures on page 143]
अभ्यासाच्या सवयींबाबतीत ढिले असणारे विद्यार्थी बहुधा . . . नापासच होतात
[Pictures on page 146]
शाळेनंतरच्या कार्यहालचाली व तुमच्या गृहपाठामध्ये समतोल साधणे सोपी गोष्ट नाही
[१४८ पानांवरील चित्र]
असमाधानकारक प्रगतीपत्रक पाहून पालक निश्चितच चिडतील. पण तुमच्या मते, ते अवाजवी अपेक्षा करत असल्यास याविषयी त्यांच्याशी बातचीत करा