व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी कोणती कारकीर्द निवडावी?

मी कोणती कारकीर्द निवडावी?

अध्याय २२

मी कोणती कारकीर्द निवडावी?

‘आता पुढे काय करावे?’ आज ना उद्या तुम्ही या आव्हानात्मक प्रश्‍नाला सामोरे जाल. तुमच्यासमोर गोंधळून टाकणारे विविध पर्याय असतील—वैद्यकीय, व्यापार, कला, शिक्षण, संगणक विज्ञान, अभियांत्रिकी, हस्तकला. कदाचित तुम्हाला त्या युवकाप्रमाणे वाटेल ज्याने म्हटले: “आधीचे राहणीमान टिकवून ठेवणे . . . हे माझ्या मते यशस्वी असणे आहे.” किंवा इतरांप्रमाणे, तुम्ही कदाचित तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न पाहत असाल.

परंतु, यश मिळवण्यात भौतिक संपत्तीशिवाय आणखी इतर गोष्टी समाविष्ट आहेत का? कोणतीही प्रापंचिक कारकीर्द तुम्हाला खरे समाधान देऊ शकते का?

‘ते निरर्थक होते’

झगमगीत, रोमांचक, होतकरू! चित्रपट, टीव्ही आणि पुस्तके सहसा प्रापंचिक कारकिर्दींचे असेच चित्रण करतात. पण, हे तथाकथित यश मिळवण्यासाठी कारकीर्द करू पाहणाऱ्‍यांना मान्यता मिळवण्यासाठी जीवन-मरणाच्या झटापटीत एकामेकांशी चढाओढ करावी लागते. “फास्ट-ट्रॅक, हाय-टेक कारकीर्द असणारे” अनेक अल्पवयीन प्रौढ “असमाधान, चिंता, खिन्‍नता, रिक्‍तपणा, संभ्रमविकृतीसारख्या भावनांची तक्रार करतात तसेच त्यांच्या अनेक शारीरिक तक्रारी देखील असतात” याविषयी डॉ. डग्लस लाबीअर सांगतात.

बऱ्‍याच काळाआधी, राजा शलमोनाने कवडीमोलाच्या जगिक यशाची व्यर्थता उघडकीस आणली. अक्षरशः अमर्याद धनसंपत्ती असून शलमोनाने कारकिर्दीच्या कार्यसिद्धींची चकित करणारी यादी दिली आहे. (वाचा उपदेशक २:४-१०.) तरीही शलमोनाने समाप्तीस असे म्हटले: “मग जी सर्व कामे माझ्या हातांनी केली होती त्यांकडे, आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्यांकडे मी पाहिले, आणि पाहा, सर्व काही व्यर्थता [“मला आढळले की सारेच निरर्थक आहे,” टुडेज इंग्लिश व्हर्शन] आणि वाऱ्‍याच्या मागे लागणे असे होते.”—उपदेशक २:११, पं.र.भा.

नोकरी कदाचित धनसंपत्ती आणि मान्यता मिळवून देईल पण ती कोणाच्या ‘आध्यात्मिक गरजा’ भागवू शकत नाही. (मत्तय ५:३) अशाप्रकारे, संपूर्णतः ऐहिक साध्यतेभोवती आपले जीवन केंद्रित करणाऱ्‍यांसाठी समाधान हे जणू मृगजळ बनते.

समाधान देणारी कारकीर्द

राजा शलमोन सल्ला देतो: “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.” (उपदेशक १२:१३) राज्य संदेशाचा प्रचार करणे हे आज ख्रिश्‍चनांचे प्रमुख कर्तव्य आहे. (मत्तय २४:१४) त्याचप्रमाणे, देवासमोर आपल्या कर्तव्याला गांभीर्याने घेणारे युवक या कार्यात होता होईल तितका संपूर्ण सहभाग घेण्यास प्रवृत्त होतात—प्रचार करण्याकडे त्यांचा स्वाभाविकरित्या कल नसला तरीही. (पडताळा २ करिंथकर ५:१४.) पूर्ण-वेळेच्या प्रापंचिक नोकऱ्‍या मिळवण्यामागे लागण्याऐवजी हजारो लोकांनी पूर्ण-वेळेचे पायनियर सुवार्तिक म्हणून सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. इतरजण, परदेशी मिशनरी म्हणून किंवा वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तरांमध्ये सेवा करतात.

पायनियरींगसाठी एक्सीकिटीव्ह सेक्रेटरीची कारकीर्द जिने सोडली ती एमीली म्हणते: “या कार्याबद्दल मला खरोखरची गोडी निर्माण झालीय.” होय, पूर्ण-वेळेची सेवा ही सर्वात समाधानकारक, रोमांचक कारकीर्द आहे! शिवाय, “देवाचे सहकारी” असण्यापेक्षा एखाद्याला आणखी कोणता मोठा विशेषाधिकार असू शकतो?—१ करिंथकर ३:९.

विद्यापीठातील शिक्षण—फायदेकारक?

बहुतांश पायनियर सेवक अर्ध-वेळेची नोकरी करून स्वतःच्या गरजा भागवतात. पण, नंतर तुम्हाला कुटुंबाची काळजी घ्यावी लागली तर काय? नक्कीच, देवाच्या सेवेत आपले तारुण्याचे दिवस घालवल्याचा कोणालाही पश्‍चात्ताप होणार नाही! तरीही, एखाद्या तरुणाने आधी विद्यापीठातील पदवी प्राप्त केल्यानंतर सेवाकार्य सुरु करावे हे शहाणपणाचे ठरणार नाही का?

अर्थात, एखाद्या ख्रिस्ती युवकाने किती वर्ष शिक्षण घ्यावे याविषयी बायबल काही नियम घालून देत नाही. त्याचप्रमाणे ते शिक्षणाचे खंडनही करत नाही. यहोवा, हा “[महान] शिक्षक” अस्खलित व स्पष्टपणे स्वतःला व्यक्‍त करता यावे म्हणून आपल्या लोकांना प्रोत्साहन देतो. (यशया ३०:२०; स्तोत्र १:२; इब्री लोकांस ५:१२) शिवाय, शिक्षणाने लोकांबद्दलची आणि आपण राहत असलेल्या जगाची आपली समज विस्तारित होऊ शकते.

तथापि, विद्यापीठातील पदवी मिळवण्याकरता लागणारा भरमसाट वेळ आणि पैसा नेहमीच कारणी लागतो का? a हायस्कूल पूर्ण केलेल्यांपेक्षा विद्यापीठातील पदवीधरांना जास्त पगार मिळतो आणि बेरोजगारीची तितकीशी झळ लागत नाही असे आकडेवारी दाखवत असली, तरी तुमच्या महाविद्यालयीन शिक्षणाची योजना करणे (इंग्रजी) हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की ही आकडेवारी केवळ सरासरीची आहे. जेमतेम पदवीधरांनाच जास्त पगार मिळतो; इतरांना अतिशय कमी वेतन दिले जाते. शिवाय, विद्यापीठातील पदवीधरांना मिळणारा पगार केवळ शिक्षण पाहूनच नव्हे, तर “असामान्य क्षमता, प्रेरणा, नोकरीसाठी क्षेत्र संधी, . . . विशेष कौशल्ये” यांसारख्या कारणांमुळे देखील असू शकतो.

“[विद्यापीठाची] पदवी आता पूर्वीसारखी रोजगार क्षेत्रात यश मिळण्याची हमी देत नाही,” असे यु.एस. डिपार्टमेंट ऑफ लेबर म्हणते. “पेशेवाईक, तांत्रिक आणि व्यवस्थापनसंबंधी व्यवसायांमध्ये [विद्यापीठातून पदवीधर झालेल्यांचे] प्रमाण . . . घसरले आहे कारण हे व्यवसाय पदवीधरांची वाढती संख्या सामावून घेण्याइतक्या वेगाने वाढलेले नाहीत. परिणामस्वरूप, कामगार क्षेत्रात १९७० ते १९८४ दरम्यान भरती झालेल्यांमध्ये अदमासे ५ पैकी १ [विद्यापीठातील] पदवीधराने पदवीची आवश्‍यकता नसलेली नोकरी स्वीकारली. पदवीधरांचा हा अतिपुरवठा १९९० च्या दशकाच्या मध्यापर्यंतही राहण्याची शक्यता आहे.”

विचारात घेण्याजोग्या आणखी वास्तविकता

विद्यापीठाची पदवी तुमच्या रोजगार मिळण्याच्या शक्यतांमध्ये सुधार करील अथवा कदाचित करणारही नाही. परंतु, एक वस्तुस्थिती मात्र निर्विवाद आहे: ‘काळाचा संक्षेप करण्यात आला आहे’! (१ करिंथकर ७:२९) केवळ गृहीत धरलेल्या फायद्यांकरता, विद्यापीठात चार अथवा त्यापेक्षा अधिक वर्ष घालवणे हा त्या उर्वरित काळाचा सर्वोत्तम उपयोग ठरेल का?—इफिसकर ५:१६.

विद्यापीठाचे शिक्षण तुम्हाला आध्यात्मिक ध्येयांजवळ नेईल की त्यांपासून परावृत्त करील? लक्षात असू द्या, खूप पैसा मिळवणे हे ख्रिश्‍चनाचे ध्येय नाही. (१ तीमथ्य ६:७, ८) तरीही, यु.एस. विद्यापीठाच्या प्रशासकांनी आजच्या विद्यार्थ्यांचे वर्णन, ‘कारकिर्दीवरच केंद्रित असलेले, भौतिक यशाची चिंता करणारे, आत्मकेंद्रित,’ असे केले. काही विद्यार्थ्यांनी असे म्हटले: “पैसा. पैसाच आमच्या चर्चेचा विषय असतो असं वाटतं.” तीव्र स्पर्धा आणि स्वार्थी भौतिकवादाच्या वातावरणात बुडाल्याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो?

विद्यापीठांमध्ये, १९६० च्या दशकातील दंगेखोर दृश्‍ये कदाचित नसतील. पण, विद्यापीठातील दंगेखोरपणा कमी झाला आहे याचा अर्थ कॅम्पसमधले वातावरण निर्धोक आहे असे नाही. कॅम्पस जीवनाबद्दलच्या एका अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला: “व्यक्‍तिगत आणि सामाजिक बाबतींत पाहता विद्यार्थ्यांना जवळजवळ अमर्याद स्वातंत्र्य असते.” अंमली पदार्थ आणि मद्य यांचा सर्रास वापर होतो आणि लैंगिक स्वैराचार तर अपवाद नसून एक नियम ठरला आहे. तुमच्या परिसरातील विद्यापीठांची हीच गत असल्यास, तेथे राहून नैतिकरित्या शुद्ध राहण्याचे तुमचे प्रयत्न निश्‍चितच निष्फळ ठरतील, नाही का?—१ करिंथकर ६:१८.

उच्च शिक्षण घेण्यात आणि “महत्त्वाच्या धार्मिक तत्त्वांचे अनुपालन” कमी होण्यात संबंध आहे याचा पुरावा आणखी एक चिंतेची बाब आहे. (प्रापंचिक युगातील पवित्र लोक) (इंग्रजी) उत्तम गुण मिळवण्याच्या दबावामुळे काही ख्रिस्ती युवकांनी आध्यात्मिक कार्यहालचालींकडे दुर्लक्ष केले आहे आणि अशाप्रकारे विद्यापीठांमध्ये प्रोत्साहन दिल्या जाणाऱ्‍या जगिक विचारसरणीच्या भीषण हल्ल्यास ते भेद्य ठरले आहेत. आपल्या विश्‍वासाच्या बाबतीत काहींचा नौकाभंग झाला आहे.—कलस्सैकर २:८.

विद्यापीठातील शिक्षणाला पर्याय

या सर्व वास्तविकता विचारात घेता, अनेक ख्रिस्ती युवकांनी विद्यापीठातील शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये—विशेषतः साप्ताहिक ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत—दिल्या जाणाऱ्‍या प्रशिक्षणामुळे नोकरी मिळवण्यात अनेकांना खरोखर फायदा प्राप्त झाल्याचे आढळले आहे. विद्यापीठातील पदवी जवळ नसली, तरीही असे युवक संतुलित असण्यास, स्वतःचे मत व्यक्‍त करण्यात कुशल असण्यास आणि जबाबदारी सांभाळण्याबाबत बरेच कार्यक्षम असण्यास शिकतात. शिवाय, माध्यमिक शाळेत असतानाच काहीजण टाईपींग, कॉम्प्युटर प्रोग्रॅमींग, मोटार दुरुस्ती, मशिन-शॉप वर्क वगैरे क्षेत्रांत कोर्सेस घेतात. अशी कलाकौशल्ये त्यांना अर्ध-वेळेची नोकरी मिळवून देऊ शकतात आणि सहसा त्यांची अतिशय मागणी असते. तसेच, अनेक युवकांना ‘हातांनी काम करणे’ कमीपणाचे वाटत असले तरी बायबल ‘श्रम करण्याला’ मोठेपणा देते. (इफिसकर ४:२८; पडताळा नीतिसूत्रे २२:२९.) स्वतः येशू ख्रिस्ताने सुतारकाम इतक्या निपुणतेने शिकून घेतले, की त्यास “सुतार” असे संबोधले जाऊ लागले!—मार्क ६:३.

काही देशांमध्ये विद्यापीठातील पदवीधरांनी रोजगार क्षेत्र इतके भरून गेले आहे की अतिरिक्‍त कार्य प्रशिक्षणाशिवाय साधीसुधी कामे मिळवणेही कठीण होऊन बसले आहे. पण बहुधा अप्रेन्टिसशिपचे कार्यक्रम, व्यावसायिक अथवा तांत्रिक शाळा आणि विद्यापीठातील अल्पकालीन कोर्सेस असतात जे किमान वेळ आणि पैसा खर्च करण्याद्वारे जास्त मागणी असलेली कौशल्ये शिकवतात. रोजगार आकडेवारीत विचारात घेतला जात नाही अशा एक घटकाचा मात्र विसर पडू देऊ नका: आध्यात्मिक आस्थांना प्राधान्य देणाऱ्‍यांची काळजी घेण्याचे देवाचे अभिवचन.—मत्तय ६:३३.

रोजगार शक्यता आणि शैक्षणिक व्यवस्था ठिकठिकाणी भिन्‍न असतात. युवकांच्या निरनिराळ्या क्षमता आणि कल असतात. त्याचप्रमाणे, ख्रिस्ती सेवाकार्याची कारकीर्द, फायदेकारक असण्याची शिफारस केली जात असली, तरीही ती व्यक्‍तिगत निवडीचीच बाब आहे. म्हणून तुमच्याकरता किती शिक्षण योग्य आहे हे ठरवण्याकरता तुम्ही व तुमच्या पालकांनी यात गोवलेल्या सर्व घटकांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. अशाप्रकारचे निर्णय घेण्यात “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.”—गलतीकर ६:५.

उदाहरणार्थ, तुम्ही विद्यापीठात जावे अशी गळ तुमचे पालक घालत असल्यास, तुम्ही त्यांच्या देखरेखीखाली आहात तोपर्यंत त्यांच्या म्हणण्यानुसार वागण्याशिवाय पर्याय नाही. b (इफिसकर ६:१-३) कदाचित, विद्यापीठाच्या वसतिगृहात राहण्याची सोय करण्याऐवजी घरी राहूनच तुम्ही तिथल्या गोंधळात गुरफटले जाण्याचे टाळू शकता. कोर्सेसच्या बाबतीत निवडक असा, उदाहरणासाठी, जगिक तत्त्वज्ञान शिकण्याऐवजी कामाची कौशल्ये शिकून घेण्यावर लक्ष केंद्रित करा. आपल्या संगतीविषयी दक्ष असा. (१ करिंथकर १५:३३) सभांची उपस्थिती, क्षेत्र सेवा आणि व्यक्‍तिगत अभ्यासाद्वारे स्वतःला आध्यात्मिकरित्या दृढ ठेवा. विद्यापीठात जाण्यास भाग पडलेल्या काही युवकांनी अशा काही कोर्सेसचा अभ्यासक्रम निवडला की ज्यामुळे त्यांना पायनियरींग सुद्धा करता आली.

तुमची कारकीर्द काळजीपूर्वक आणि प्रार्थनापूर्वक निवडा म्हणजे तुम्हाला केवळ व्यक्‍तिगत आनंद मिळवण्यासच नव्हे तर ‘स्वर्गात स्वतःकरता संपत्ति साठवण्यासही’ मदत होईल.—मत्तय ६:२०.

[तळटीपा]

a संयुक्‍त संस्थानांत, विद्यापीठाचा सरासरी खर्च प्रती वर्षी १०,००० डॉलरपेक्षा अधिक होतो! बहुतेकवेळा, विद्यार्थ्यांना त्यांचे हे कर्ज फेडण्याकरता कित्येक वर्षे लागतात.

b तुमच्या पालकांचे समाधान करण्यासाठी चार वर्षांची पदवी मिळवण्याची गरज नसेल. उदाहरणार्थ, संयुक्‍त संस्थानांत, असोसिएट डिग्री अनेक व्यावसायिक आणि सेवाक्षेत्रांमधील नियोक्‍त्‌यांस स्वीकारणीय आहे व ती दोन वर्षात मिळवली जाऊ शकते.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ ऐहिक कारकीर्दी सहसा व्यक्‍तिगत आनंद देण्यात अपेशी का ठरतात?

◻ सर्व देव-भीरू युवकांनी पूर्ण-वेळेच्या सेवेत कारकीर्द करण्याचा विचार का करावा बरे?

◻ उच्च शिक्षणाचे प्रतिपादित फायदे कोणते आहेत आणि अशाप्रकारची प्रतिपादने नेहमीच खरी शाबीत होतात का?

◻ विद्यापीठातील शिक्षणाने कोणते धोके संभवू शकतात?

◻ विद्यापीठातील शिक्षणाऐवजी एखादा युवक कोणकोणत्या पर्यायांचा विचार करू शकतो?

[१७५ पानांवरील संक्षिप्त आशय]

नोकरी एखाद्याला संपत्ती आणि मान्यता मिळवून देईल, पण ती एखाद्याच्या ‘आध्यात्मिक गरजा’ भागवू शकत नाही

[१७७ पानांवरील संक्षिप्त आशय]

“[विद्यापीठाची] पदवी आता रोजगार क्षेत्रात यश मिळण्याची हमी देत नाही”

[१७९ पानांवरील चित्र]