व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी शाळा सोडावी का?

मी शाळा सोडावी का?

अध्याय १७

मी शाळा सोडावी का?

जॅक २५ पेक्षा अधिक वर्षांपासून शाळेतील हजेरी घेणारा अधिकारी आहे. यामुळे, शाळेला दांडी मारणाऱ्‍याला जॅकने आधी ऐकली नसेल अशी सबब सांगणे भाग पडते. “मुलांनी मला सगळ्या प्रकारच्या सबबी सांगितल्या आहेत,” तो म्हणतो, “जसं कुणी सांगतात, सर मला बरं नसल्यासारखं वाटत होतं . . . ‘अलास्कामधले माझे आजोबा वारले,’ वगैरे.” जॅकची “आवडती” सबब? “इतकं धुकं होतं की शाळाच सापडली नाही.” ही तीन मुलांनी सांगितलेली सबब.

ऐकणाऱ्‍यालाच गोंधळून टाकणारे हे संशयास्पद बहाणे, अनेक युवकांना शाळेबद्दल वाटणाऱ्‍या तिटकाऱ्‍याचे वर्णन देतात; बहुतेकवेळा यामध्ये बेपर्वा मनोवृत्तीपासून (“सगळं चालतं”) ते उघड शत्रुत्व (“शाळेचं नाव काढू नकोस”) समाविष्ट असते. उदाहरणार्थ, समीर शाळेला जायला उठायचा पण लगेच त्याला मळमळू लागायचे. तो म्हणतो, “मी शाळेजवळ आलो की घामेघूम होऊन जीव अतिशय घाबरा व्हायचा . . . मला घरी जावंच लागायचं.” अशाप्रकारे, अनेक युवकांना शाळेविषयी मनात धास्तीच भरते—डॉक्टरांच्या भाषेत याला शाळेचे भयगंड असे म्हणतात. तो बहुधा, शाळेतील हिंसा, समवयस्कांचा क्रूरपणा आणि चांगले मार्क मिळवण्याच्या दबावामुळे निर्माण होतो. असे युवक (पालकांनी जबरदस्तीने पाठवल्यामुळे) कदाचित शाळेला जातीलही, पण ते सतत व्याकूळ असतात एवढेच काय तर, शारीरिक यातना देखील सहन करत असतात.

म्हणूनच शाळेत न जाण्याचे ठरवणाऱ्‍या युवकांची संख्या धक्कादायक आहे! एकट्या संयुक्‍त संस्थानांत, प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमधील अंदाजे पंचवीस लाख विद्यार्थी दररोज अनुपस्थित असतात! द न्यूयॉर्क टाईम्स यातील एका लेखाने यात भर घालून म्हटले, की न्यूयॉर्क शहरातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये इतके जण (जवळजवळ एक तृतीयांश) “सतत अनुपस्थित” असतात की, “त्यांना शिकवणे अशक्यप्राय असते.”

इतर युवक आणखी टोकाची भूमिका घेत आहेत. “शाळा फारच कंटाळवाणी, अतिशय कडक होती,” असे वॉल्टर नामक एक तरुण म्हणाला. हायस्कूलमध्ये (माध्यमिक शाळेत) असतानाच त्याने शाळा सोडली. ॲन्टोनिया नामक मुलीने देखील असेच केले. तिला शाळेचा अभ्यास कठीण वाटायचा. “वाचत असलेलं काहीच माझ्या डोक्यात शिरत नव्हतं तर मी अभ्यास तरी कसा करणार?” असा प्रश्‍न तिने केला. “तिथं बसून मी आणखीनच ढ होत होते, म्हणून मी शाळाच सोडली.”

जगभर, शालेय व्यवस्था गंभीर समस्यांनी ग्रस्त आहेत हे मान्य आहे. पण म्हणून शाळेला कंटाळून ती सोडून द्यावी का? शाळा सोडल्याने नंतर तुमच्या जीवनावर कोणते परिणाम होऊ शकतील? शाळा पूर्ण होईपर्यंत शाळा न सोडण्याची उचित कारणे आहेत का?

शिक्षणाचे मूल्य

मायकल हायस्कूलचा समतुल्य डिप्लोमा घेण्यासाठी शाळेला पुन्हा जाऊ लागला. कारण विचारल्यावर तो म्हणाला, “शिक्षणाची गरज आहे हे मला जाणवलं.” पण ‘शिक्षण’ म्हणजे नेमकं काय? विविध प्रभावी वस्तुस्थितींची घोकंपट्टी करण्याची क्षमता? जसा विटांचा ढिगारा म्हणजे घर नाही त्याचप्रमाणे एवढ्यालाच शिक्षण म्हणत नाहीत.

शिक्षणाने तुम्हाला यशस्वी प्रौढ जीवनाकरता तयार केले पाहिजे. १८ वर्षांपासून विद्यालयातील शाखेचे मुख्य असलेले ॲलन ऑस्टिल, “विचार करणे, अडचणी सोडवणे, उचित-अनुचित यातील भेद, स्पष्टपणे विचार करण्याची मूळ क्षमता, माहिती म्हणजे काय व अंशतः आणि संपूर्ण यांतील संबंध या सर्व गोष्टींचे शिक्षण देणाऱ्‍या शिक्षणाबद्दल [ते बोलले]. अशाप्रकारचे निर्णय घेणे आणि भेद जाणणे, कसे शिकावे हे शिकून घेणे म्हणजेच शिक्षण होय.”

शाळेचा याजशी कसा संबंध आहे? अनेक शतकांआधी राजा शलमोनाने “भोळ्यांस चातुर्य, तरुणाला ज्ञान व विचारशीलता प्राप्त करून” देण्याकरता नीतिसूत्रे लिहिली. (नीतिसूत्रे १:१-४, NW) होय, अननुभवीपणा तारुण्यातच असतो. तथापि, शाळा तुम्हाला विचारशीलता शिकवून ती विकसित करण्यास मदत करू शकते. ही क्षमता, मात्र वास्तविकता तोंडपाठ करण्याची नव्हे तर त्यांचे विश्‍लेषण करून त्यांतून उपयुक्‍त कल्पना निर्माण करण्याची आहे. अनेकांनी शाळेच्या शिकवण्याच्या पद्धतींची आलोचना केली असली, तरी शाळा तुम्हाला तुमच्या बुद्धीचा उपयोग करण्यास लावते. भूमितीचे प्रश्‍न सोडवण्याचा किंवा काही ऐतिहासिक तारखा पाठ करण्याचा तुमच्या जीवनाशी काही संबंध नाही असे कदाचित तुम्हाला त्यावेळी वाटेल हे खरे आहे. पण द हायस्कूल सर्व्हाइव्हल गाईड यात बार्बरा मेयर यांनी लिहिल्यानुसार: “शिक्षकांना चाचण्यांमध्ये समाविष्ट कराव्याशा वाटतात त्या सर्व वास्तविकता आणि ज्ञान सर्वांच्याच लक्षात राहणार नाही, पण अभ्यास कसा करावा व योजना कशी आखावी या कौशल्यांचे कधीच विस्मरण होणार नाही.”

शिक्षणाच्या दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास केलेल्या विद्यापीठातील तीन प्राध्यापकांनी देखील असाच निष्कर्ष काढला की, “सुशिक्षित लोकांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर समकालीन जगाचे अधिक विस्तारित आणि सखोल ज्ञान असते त्याचप्रमाणे तेच लोक अधिककरून ज्ञान मिळवतात व जेथून कोठून माहिती मिळते त्याप्रती अधिक जागृत असतात. . . . वयोवृद्ध झाल्यावर आणि अनेक वर्षे शाळेसोबत संपर्क नसतानाही हे परिणाम तसेच्या तसे टिकल्याचे आढळून आले आहे.”—शिक्षणाचे टिकाऊ परिणाम (इंग्रजी).

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या ख्रिस्ती जबाबदाऱ्‍या पार पाडण्यास शिक्षण तुम्हाला कार्यक्षम करू शकते. तुम्ही अभ्यासाच्या चांगल्या सवयी संपादन केल्या असल्यास आणि वाचन कलेत प्रावीण्य मिळवले असल्यास, देव वचनाचा अभ्यास तुम्ही अधिक सहजपणे करू शकता. (स्तोत्र १:२) स्वतःला व्यक्‍त करण्यास शाळेत शिकून घेतल्यामुळे तुम्ही बायबलची सत्ये अधिक सुलभरितीने इतरांना शिकवू शकता. अशाचप्रकारे इतिहास, विज्ञान, भूगोल आणि गणिताचे ज्ञान देखील उपयुक्‍त ठरते आणि ते तुम्हाला विविध पार्श्‍वभूमी, आवडीनिवडी आणि विश्‍वास बाळगणाऱ्‍या लोकांशी व्यवहार करण्यास मदत करील.

शाळा आणि नोकरी

शाळेचा, नोकरी मिळण्याच्या भावी शक्यतांवर देखील प्रचंड प्रभाव असतो. तो कसा?

सुज्ञ राजा शलमोनाने कुशल कारागिराविषयी म्हटले: “त्याचे स्थान राजासमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.” (नीतिसूत्रे २२:२९) हे आज देखील खरे आहे. “कौशल्ये नसल्यामुळे, जीवनातील अनेक संधींना तुम्ही मुकाल,” असे यु.एस. डिपार्टमेंट ऑफ लेबरचे अर्नस्ट ग्रीन यांनी सांगितले.

म्हणून, जे लोक शाळा सोडून देतात त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता कमीच असते हे समजण्याजोगे आहे. वॉल्टरला, (ज्याचा आधी उल्लेख आलेला आहे) चांगलीच अद्दल घडली. “पुष्कळदा मी नोकरीसाठी अर्ज भरलेत पण मला बोलवलं नाही कारण माझा डिप्लोमा झाला नव्हता.” त्याने हेही कबूल केले: “काहीवेळा लोक असे शब्द वापरतात जे मला कळत नाहीत आणि मग मला त्यांच्यासमोर अडाण्यासारखं वाटतं.”

हायस्कूलमध्ये असताना शाळा सोडलेल्या १६ ते २४ वयोगटातील युवकांची बेरोजगारी, “त्यांच्या पदवीधर झालेल्या सवंगड्यांपेक्षा दुप्पट आणि एकूण बेरोजगारीच्या प्रमाणानुसार जवळजवळ तिप्पट आहे.” (द न्यूयॉर्क टाईम्स) “जे लोक आपले शिक्षण चालू ठेवत नाहीत ते संधी दवडत असतात,” असे लेखक एफ. फिलिप्प राईस, पौगंड (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात म्हणतात. ज्या व्यक्‍तीने शाळा सोडली आहे तिने साहजिकच सर्वात किरकोळ काम पार पाडण्याचे मूलभूत कौशल्य देखील संपादन केलेले नसते.

साक्षरतेविषयी लबाडी (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात पॉल कॉपरमन लिहितात: “एखाद्याला आचाऱ्‍याच्या कामासाठी कमीतकमी सातवी पास, मेकॅनिकच्या कामासाठी आठवी पास आणि बदली कारकूनाच्या कामासाठी नववी किंवा दहावी पास असावे लागते असे अलीकडील अभ्यास दाखवतो.” ते पुढे असे म्हणतात: “म्हणून शिक्षक, परिचारिका, लेखापाल किंवा इंजिनियरची नोकरी यापेक्षा जरा अधिक किमान वाचन क्षमतेची मागणी करील हा उचित निष्कर्ष आहे असे माझे ठाम मत आहे.”

स्पष्टतः, जे विद्यार्थी वाचनासारखी मूलभूत कलाकौशल्ये शिकण्याचा खरोखर प्रयास करतात त्यांना नोकरीच्या आणखी उत्तम संधी मिळतील. पण शाळेला गेल्याने आणखी कोणता कायमस्वरूपी फायदा प्राप्त होऊ शकतो?

उत्तम व्यक्‍ती

तो कायमस्वरूपी फायदा म्हणजे तुमच्या क्षमता आणि तुमची वैगुण्ये जाणणे होय. अलीकडेच संगणक क्षेत्रात नोकरी करू लागलेल्या मिशेलने निरीक्षिले: “शाळेत असताना तणावपूर्ण परिस्थितीत काम कसं करावं, परीक्षेला कसं तोंड द्यावं आणि स्वतःला कसं व्यक्‍त करावं हे मी शिकले.”

‘अपयशाविषयी कसा दृष्टिकोन राखावा हे मी शाळेतून शिकले,’ असे आणखी एक युवती म्हणते. स्वतःच्या अपयशांसाठी स्वतःला नव्हे तर इतरांना दोष देण्याची तिची वृत्ती होती. इतरांना शाळेच्या शिस्तबद्ध नित्यक्रमाचा लाभ झाला आहे. यासाठी अनेकजण शाळांची टीका करतात व त्यामुळे या कोवळ्या मनांवर दडपण येते असा दावा करतात. पण शलमोनाने मात्र युवकांना ‘ज्ञान व शिस्त संपादण्यास’ उत्तेजन दिले. (नीतिसूत्रे १:२) शिस्त जोपासणाऱ्‍या शाळांनी अनेक शिस्तबद्ध पण तरीही सर्जनशील व्यक्‍ती निर्माण केल्या आहेत.

म्हणून तुमच्या शालेय जीवनाचा तुम्ही संपूर्ण लाभ घ्यावा हे शहाणपणाचे आहे. तुम्ही ते कसे करू शकता? तुमच्या शालेय कार्यापासूनच सुरवात करू या.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ पुष्कळ युवकांना शाळेबद्दल नकारात्मक दृष्टिकोन का आहे बरे? याबद्दल तुमचे काय मत आहे?

◻ शाळा एखाद्या व्यक्‍तीला विचारशीलता विकसित करण्यास मदत कशी करते?

◻ शाळा सोडल्याने नोकरी मिळण्याच्या तुमच्या भावी क्षमतेवर कसा परिणाम होऊ शकतो आणि का?

◻ शाळा न सोडल्याने आणखी इतर कोणते व्यक्‍तिगत फायदे परिणीत होऊ शकतात?

[१३५ पानांवरील संक्षिप्त आशय]

“तिथं बसून मी आणखीनच ढ होत होते, म्हणून मी शाळाच सोडली”

[१३८ पानांवरील संक्षिप्त आशय]

“एखाद्याला आचाऱ्‍याच्या कामासाठी कमीतकमी सातवी पास, मेकॅनिकच्या कामासाठी आठवी पास आणि बदली कारकूनाच्या कामासाठी नववी किंवा दहावी पास असावे लागते असे अलीकडील अभ्यास दाखवतो.”

[Pictures on page 136]

तुम्हाला शाळेत शिकवली जाणारी शिस्त तुमच्या उर्वरित जीवनात फायदेकारक ठरू शकते

[१३७ पानांवरील चित्र]

शाळेत शिकवली जाणारी मूलभूत कलाकौशल्ये ज्यांनी संपादलेली नाहीत त्यांच्याकरता नोकरीच्या शक्यता फारच कमी असतात