व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रामाणिकता—खरोखरच सर्वोत्तम धोरण आहे का?

प्रामाणिकता—खरोखरच सर्वोत्तम धोरण आहे का?

अध्याय २७

प्रामाणिकता—खरोखरच सर्वोत्तम धोरण आहे का?

खोटे बोलण्याचा मोह तुम्हाला कधी झाला आहे का? आपण खोली आवरली आहे असे अरुणने आईला सांगितले. पण खरे पाहता, त्याने सगळा पसारा खाटेखाली सरकवला होता. रिचर्डनेही अशाचप्रकारे आपल्या पालकांना उल्लू बनवण्याचा मूर्ख प्रयत्न केला. अभ्यास न केल्यामुळे नव्हे तर ‘शिक्षक आपल्यावर खार खात होते’ म्हणून आपण नापास झालो असे त्याने त्यांना सांगितले.

अशा या स्पष्ट चालबाजी, पालकांच्या तसेच इतर प्रौढांच्या लगेच लक्षात येतात. तरीही, ते फायद्याचे आहे असे युवकांना भासते तेव्हा खोटे बोलण्याचा निदान प्रयत्न तरी करण्याचे, जरासा फेरफार करण्याचे किंवा धडधडीत ठकबाजी करण्याचे ते मुळीच सोडत नाहीत. संकटप्रसंगांना पालक नेहमीच शांतपणे स्वीकारत नाहीत हेही खरेच. अपेक्षित वेळेपेक्षा तुम्ही दोन तास उशिराने घरी पोहंचता तेव्हा, मला वेळेचे भानच राहिले नाही हे लाजिरवाणे सत्य कबूल करण्याऐवजी रस्त्यात मोठा अपघात झाला असे सांगण्याचा मोह तुम्हाला कदाचित होऊ शकतो.

शाळेमध्ये प्रामाणिकता प्रदर्शित करण्यासंबंधी आणखी एक आव्हान असू शकते. विद्यार्थ्यांना गृहपाठ सहसा एखाद्या बोज्याप्रमाणे वाटतो. जीवघेणी चढाओढ तर नेहमीच लागलेली असते. संयुक्‍त संस्थानांतच, निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी फसवाफसवी करतात किंवा यापूर्वीही केली आहे असे सर्वेक्षणांवरून दिसून येते. पण, लबाडी कदाचित आकर्षविणारी आणि फसवेगिरी सर्वात सोपी पद्धत वाटत असली तरी अप्रामाणिकपणाचा काही फायदा होतो का?

खोटे बोलणे—ते फायद्याचे का ठरत नाही

कदाचित शिक्षा चुकवण्याकरता खोटे बोलणे त्या वेळेपुरते फायदेकारक वाटू शकते. पण बायबल इशारा देते: “लबाड बोलणारा सुटणार नाही.” (नीतिसूत्रे १९:५) खोटेपणा उघडकीस येईल आणि शिक्षा दिली जाईल अशी शक्यता अधिक आहे. मग तुमचे पालक केवळ तुमच्या आधीच्या चुकीमुळेच नव्हे तर तुम्ही त्यांच्याशी खोटे बोललात यामुळेही तुमच्यावर चिडतील!

शाळेत कॉपी करण्यासंबंधी काय? कॅम्पस ज्युडिशियल प्रोग्रॅम्सचे डायरेक्टर म्हणतात: “शाळेमध्ये अप्रामाणिक असणाऱ्‍या विद्यार्थ्याला भवितव्यातील शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी गमावण्याचा मोठा धोका असतो.”

हे खरे की, अनेकजण यात फसले जात नाहीत. कॉपी केल्याने तुम्ही पास तर व्हाल पण त्याचे दीर्घ पल्ल्याचे परिणाम काय आहेत? फसवेगिरी करून जलतरण तास बुडवणे मूर्खपण असल्याचे तुम्हाला निश्‍चितच मान्य असेल. नाहीतरी, सर्वजण पाण्यात मौजमजा करताना जमिनीवर राहायला कोणाला आवडते! समजा, तुम्हाला तलावात कोणी ढकललेच तर तुमच्या अप्रामाणिक सवयींमुळे तुम्ही बुडू शकता!

पण गणितात किंवा वाचनात अप्रामाणिक असण्याविषयी काय? त्याचे परिणाम सुरवातीला इतके काही स्पष्ट नसतील हे खरे आहे. पण, तुम्ही मूलभूत शैक्षणिक कलाकौशल्ये विकसित केली नसल्यास, रोजगार क्षेत्रात तुमच्यावर बुडण्याची पाळी येईल! त्याचप्रमाणे, अप्रामाणिकपणे मिळवलेला डिप्लोमा इतका काही जीवन रक्षक शाबीत होणार नाही. बायबल म्हणते: “असत्य जिव्हेने मिळविलेले धन इकडेतिकडे उडून जाणाऱ्‍या वाफेसारखे आहे.” (नीतिसूत्रे २१:६) असत्याने मिळवलेले कोणतेही फायदे वाफेइतक्याच अल्पकाळासाठी टिकतात. मग, शाळेत खोटे बोलण्यापेक्षा आणि अप्रामाणिक असण्यापेक्षा मेहनती असून अभ्यास करणे किती उत्तम! “उद्योग्याचे विचार समृद्धि करणारे असतात,” असे नीतिसूत्रे २१:५ म्हणते.

खोटे बोलणे व तुमचा विवेक

मिशेल नामक एका तरुणीने आपल्या भावावर एक जपून ठेवलेली छोटी वस्तू मोडल्याचा खोटा आरोप केला, पण नंतर तिला राहावले नाही आणि तिने आपल्या पालकांजवळ लबाडी कबूल केलीच. “मला पुष्कळदा वाईट वाटायचं,” असे मिशेल म्हणते. “माझ्या पालकांनी माझ्यावर भरवसा केला होता आणि तो मी तोडला.” यावरून, देवाने मानवांना विवेकशक्‍ती दिली आहे हे उत्तमरित्या प्रदर्शित होते. (रोमकर २:१४, १५) दोषभावनांमुळे मिशेलचा विवेक तिला टोचत राहिला.

अर्थात, एखादा कदाचित आपल्या विवेकाकडे दुर्लक्ष करील. पण तो जितके अधिक खोटे बोलतो तितकाच या चुकीप्रती असंवेदनशील बनतो—‘त्याची सदसद्‌विवेक बुद्धी तर डाग दिल्यासारखीच बनते.’ (१ तीमथ्य ४:२) तुम्हाला खरोखर असंवेदनशील विवेक हवा आहे का?

खोटे बोलण्याबाबतीत देवाचा दृष्टिकोन

यहोवाने ‘लबाड बोलणाऱ्‍या जिव्हेचा’ द्वेष केला आहे आणि तो “द्वेष करितो.” (नीतिसूत्रे ६:१६, १७) सरतेशेवटी, दियाबल सैतानच “लबाडीचा बाप” आहे. (योहान ८:४४) त्याचप्रमाणे, बायबल खोटे आणि तथाकथित नैतिक कारणांसाठी बोललेले खोटे यात कोणताही भेद करत नाही. “कोणतीहि लबाडी सत्यापासून नाही.”—१ योहान २:२१.

म्हणून ज्या कोणाला देवाचा मित्र बनायचे असेल त्याने प्रामाणिकतेचे धोरण स्वीकारले पाहिजे. पंधरावे स्तोत्र असा प्रश्‍न करते: “हे परमेश्‍वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरांवर कोण राहील?” (वचन १) पुढील चार वचनांमध्ये दिलेल्या उत्तराचा आपण विचार करू या:

“जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो.” (वचन २) हे वर्णन चोराचे किंवा एखाद्या भामट्याचे वाटते का? आपल्या पालकांशी खोटे बोलणाऱ्‍याचे किंवा ढोंग करणाऱ्‍याचे हे वर्णन आहे का? निश्‍चितच नाही! म्हणून तुम्हाला देवाचा मित्र बनायचे असल्यास, तुम्ही प्रामाणिक असावयास हवे, केवळ कृतींमध्ये नव्हे तर मनापासून सुद्धा तसे असले पाहिजे.

[तो] आपल्या जिभेने चुगली करीत नाही. आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्‍याची निंदा करीत नाही.” (वचन ३) कोणा दुसऱ्‍याविषयी दुष्ट, खोचक बोलणे करणाऱ्‍या युवकांची तुम्ही कधी सोबत केली आहे का? अशाप्रकारच्या भाषणात सामील न होण्याचा दृढ निर्धार करा!

[तो] अधमाला तुच्छ लेखितो, परमेश्‍वराचे भय बाळगणाऱ्‍यांचा सन्मान करितो. आपण वाहिलेल्या शपथेने स्वत:चे अहित झाले तरी ती मोडीत नाही.” (वचन ४) जे युवक खोटे बोलतात, फसवेगिरी करतात किंवा अनैतिक गोष्टींविषयी बढाई मारतात अशांना आपले मित्र बनवू नका; तुम्हाकडूनही ते तीच अपेक्षा करतील. बॉबी नामक एका युवकाने निरीक्षिले: “एखाद्या मित्रासोबत खोटे बोलण्यात सहभागी झाल्याने तुम्ही संकटात सापडू शकता. तो भरवशालायक मित्र नाही.” प्रामाणिकतेचे दर्जे अनुसरणारे मित्र शोधा.—पडताळा स्तोत्र २६:४.

जे आपला शब्द पाळतात अशांची यहोवा प्रशंसा करतो किंवा त्यांना “सन्मान” देतो हे तुम्ही निरीक्षिले आहे का? कदाचित येत्या शनिवारी तुम्ही घरात काही मदत कराल असा शब्द दिला असेल पण आता तुम्हाला त्या दिवशी दुपारी बॉल खेळायला बोलवले असेल. दिलेला शब्द क्षुल्लक समजून आईबाबांवर सर्वकाही काम टाकून तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जाल का, की तुम्ही आपला दिलेला शब्द पाळाल?

“आपला पैसा वाढीदिढीला लावीत नाही, निरपराध्यांची हानि करण्याकरिता लाच घेत नाही, तो. जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.” (वचन ५) फसवेगिरी आणि अप्रामाणिकतेचे मुख्य कारण लोभ आहे हे खरे नाही का? परीक्षांमध्ये कॉपी करणारे विद्यार्थी, स्वतः अभ्यास करून न मिळवलेल्या मार्कांची हाव धरतात. लाच घेणारे लोक न्यायापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देतात.

आपला हेतू साध्य करण्यासाठी प्रामाणिकतेच्या नियमांत फेरफार करणाऱ्‍या राजनैतिक आणि व्यापारी नेत्यांकडे काहीजण बोट दाखवतात हे खरे आहे. पण, अशा लोकांचे यश जास्तीतजास्त केव्हापर्यंत असते? स्तोत्र ३७:२ उत्तर देते: “ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात.” त्यांच्या अप्रामाणिकतेत ते पकडले गेले नाहीत आणि बदनाम झाले नाहीत तरीही शेवटी त्यांच्यासमोर यहोवा देवाचा न्यायदंड आहेच. उलटपक्षी, देवाचे मित्र ‘कधीच ढळणार नाहीत.’ त्यांचे अनंतकालिक भवितव्य खात्रीशीर आहे.

“प्रामाणिक विवेक” विकसित करणे

मग, कोणत्याही प्रकारची लबाडी टाळण्याकरता ठोस आधार नाही का? प्रेषित पौलाने स्वतःविषयी आणि आपल्या साथीदारांविषयी म्हटले: “आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे.” (इब्री लोकांस १३:१८) अशाचप्रकारे तुमचा विवेक असत्य गोष्टींप्रती संवेदनशील आहे का? नसल्यास, बायबल आणि बायबल आधारित साहित्य जसे की, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांचा अभ्यास करून त्यास तालीम द्या.

बॉबी या तरुणाने असेच केले आणि त्यास उत्तम परिणाम लाभले. खोटे बोलून समस्या झाकू नयेत हे तो शिकला आहे. आपल्या पालकांकडे जाऊन प्रामाणिकपणे सर्व बाबींची चर्चा करण्यास त्याचा विवेक त्याला प्रवृत्त करतो. काही वेळा असे केल्यावर त्याला शिक्षा देण्यात आली. तथापि, प्रामाणिक असल्याचे त्याला ‘समाधान’ वाटते असे तो कबूल करतो.

सत्य बोलणे नेहमीच सोपे नसते. पण जी व्यक्‍ती सत्य बोलण्याचा निर्धार करते ती शुद्ध विवेक, आपल्या खऱ्‍या मित्रांसोबत चांगला संबंध आणि सर्वात उत्तम म्हणजे, देवाच्या मंडपात ‘पाहुणा’ म्हणून वस्ती करण्याची सुसंधी टिकवून ठेवील! म्हणून, प्रामाणिकता केवळ सर्वोत्तम धोरणच नव्हे, तर सर्व ख्रिश्‍चनांकरता ते अगदी साजेसे धोरण आहे.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ कोणत्या काही परिस्थितींमध्ये खोटे बोलण्याचा मोह होऊ शकतो?

◻ खोटे बोलल्याने किंवा फसवेगिरी केल्याने फायदा का होत नाही? व्यक्‍तिगत निरीक्षण किंवा अनुभवावरून तुम्ही हे स्पष्ट करू शकता का?

◻ एखादी लबाड व्यक्‍ती आपला विवेक कसा नष्ट करते?

स्तोत्र १५ वाचा. ही वचने प्रामाणिकतेच्या विषयाला कशी लागू होतात?

◻ एखादा युवक प्रामाणिक विवेक कसा विकसित करू शकतो?

[२१२ पानांवरील संक्षिप्त आशय]

‘शाळेमध्ये अप्रामाणिक असणाऱ्‍या विद्यार्थ्याला भवितव्यातील शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी गमावण्याचा मोठा धोका असतो’

[२१६ पानांवरील संक्षिप्त आशय]

बायबल खोटे आणि तथाकथित नैतिक कारणांसाठी बोललेले खोटे यात कोणताही भेद करत नाही

[२१४ पानांवरील चित्र]

अवज्ञाकारितेची सफाई देण्याचे फसवे प्रयत्न बहुधा पालकांच्या लक्षात येतील