व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?

विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?

अध्याय २३

विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?

‘तुम्ही एकमेकांवर प्रेम करत असल्यास हे चालण्याजोगे आहेत का? की विवाह होईस्तोवर तुम्ही थांबून राहावे?’ ‘मी अद्याप कुमारी आहे. माझं कुठं चुकतंय का?’ अशाप्रकारचे भरमसाट प्रश्‍न युवकांच्या मनात असतात.

तथापि, “किशोरवयीन असताना लैंगिक संबंध न ठेवलेली तरुण व्यक्‍ती अपवादात्मक आहे,” असा निष्कर्ष ॲलन गुटमॅकर इन्स्टिट्यूटने आपल्या १९८१ च्या अहवालात सादर केला. “१० पैकी आठ पुरुषांनी आणि १० पैकी सात महिलांनी किशोरावस्थेत असतानाच संभोग केल्याचे वृत्त आहे.”

‘आणि का करू नये?’ असा प्रश्‍न तुम्ही मांडाल. शेवटी, प्रिय असण्याची भावना नैसर्गिकच आहे. त्याचप्रमाणे, तुम्ही तरुण असता तेव्हा तुमच्या वासना मन विचलित करण्याइतपत तीव्र असू शकतात. शिवाय, सवंगड्यांचा प्रभाव तर असतोच. विवाहपूर्वी लैंगिक संबंध ठेवण्यात मजा येते आणि तुम्हाला कोणी प्रिय असले, तर जवळीक ठेवावीशी वाटणे साहजिकच आहे असे ते तुम्हाला सांगतील. काहीजण तर असेही म्हणतील, की लैंगिक संबंध ठेवल्याने तुम्ही आपले पुरुषत्व किंवा स्त्रीत्व सिद्ध करत असता. जगापेक्षा निराळे असू नये या भावनेने लैंगिक जवळीक ठेवण्यास तुम्हावर दबाव आणला जात असल्याचे वाटेल.

सर्वसामान्य अभिप्रायाच्या अगदीच उलट, सर्वच युवकांना आपले कौमार्य गमावण्याची घाई लागलेली नसते. उदाहरणासाठी, एस्तेर या अविवाहित तरुणीचा विचार करा. ती वैद्यकीय तपासणीसाठी गेली होती तेव्हा तिच्या डॉक्टरांनी तिला थेट प्रश्‍न केला: “तू कोणती गर्भनिरोधक पद्धत वापरतेस?” एस्तेरने जेव्हा “कोणतीच नाही,” असे उत्तर दिले तेव्हा तिचे डॉक्टर उद्‌गारले: “काय! तुला गर्भवती व्हायचंय का? काहीच न वापरता गर्भधारणा होणार नाही अशी अपेक्षा कशी करतेस?” एस्तेरने उत्तर दिले: “कारण मी लैंगिक संबंध ठेवतच नाही!”

तिचे डॉक्टर थक्क होऊन तिच्याकडे पाहतच राहिले. “माझा विश्‍वासच बसत नाही,” ते म्हणाले. “इथं १३ वर्षांची मुलं येतात आणि त्यांचं कौमार्य गमावलेलं असतं. तू खरंच लाखात एक आहेस.”

एस्तेर कशामुळे “लाखात एक” बनली? “शरीर जारकर्मासाठी [त्याचप्रमाणे विवाहपूर्व लैंगिक संबंधांकरता] नाही . . . जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा,” ही बायबलची सूचना तिने तंतोतंत पाळली. (१ करिंथकर ६:१३, १८) होय, विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवणे देवाविरुद्ध गंभीर पाप असल्याचे तिने ओळखले! १ थेस्सलनीकाकर ४:३ म्हणते, “देवाची इच्छा ही आहे की . . . तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे.” पण, बायबल विवाहपूर्व लैंगिक संबंधाचा निषेध का करते?

दुष्परिणाम

बायबल काळातही काहीजण विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवत असत. एखादी अनैतिक स्त्री, “ये, चल, आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ; आपण प्रेमानंदाने आराम पावू,” असे म्हणून एखाद्या तरुणाला बोलवत असावी. (नीतिसूत्रे ७:१८) तथापि, बायबल ताकीद देते की आज उपभोगलेले सुख उद्या दुःखाचे कारण ठरू शकते. “कारण परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते.” तो पुढे म्हणतो, “तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तरवारीसारखी तीक्ष्ण होते.”—नीतिसूत्रे ५:३, ४.

एक संभाव्य दुष्परिणाम म्हणजे, लैंगिकरित्या संक्रमित रोग जडणे होय. एखाद्या लैंगिक प्रकरणामुळे कायमची हानी पोहंचली आहे, कदाचित अफलत्व किंवा गंभीर शारीरिक समस्या उद्‌भवली आहे हे अनेक वर्षांनी लक्षात आल्यावर केवढा मनःस्ताप होतो याची कल्पना करा! नीतिसूत्रे ५:११ इशारा देते: “तुझा देह व तुझी शक्‍ति क्षीण झाल्यावर तू शोक करिशील.” विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवल्याने अनौरस संतती (पाहा पृष्ठे १८४-५), गर्भपात आणि अकाली विवाह—यासोबत त्या प्रत्येकाचे दुःखद परिणाम देखील होतात. होय, विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवणारी व्यक्‍ती खरोखरच ‘आपल्या शरीराबाबत पाप करिते.’—१ करिंथकर ६:१८.

हे सर्व धोके ओळखून, डॉ. रिचर्ड ली यांनी जीवशास्त्र आणि औषधाचे येल नियतकालिक (इंग्रजी) यात लिहिले: “गर्भधारणा रोखण्यात आणि गुप्तरोगांचा उपचार करण्यात मोठमोठे विजय प्राप्त केल्याचा टेंभा आपण आपल्या तरुण लोकांसमोर मिरवत असतो पण सर्वात विश्‍वसनीय आणि स्पष्ट, स्वस्त आणि बिनविषारी, गर्भधारणा व गुप्तरोगांच्या त्रासाचा प्रतिबंध करणाऱ्‍या—कौमार्याच्या प्राचीन, आदरणीय त्याचप्रमाणे निरोगी अवस्थेकडे दुर्लक्ष करतो.”

दोष आणि निराशा

शिवाय, अनेक युवकांच्या बाबतीत विवाहपूर्व लैंगिक संबंध अतिशय निराशाजनक शाबीत झाले आहेत. त्याचा परिणाम? दोष आणि कम-स्वाभिमानाच्या भावना. तेवीस वर्षांच्या डेन्‍नीसने मान्य केले: “माझी अतिशय निराशा झाली—मी विचार केला तसं स्वर्गसुख अथवा प्रेमाची ऊब वगैरे त्यात मुळीच नव्हती. त्याउलट, हे कृत्य किती अघोर होतं याची जाणीवंच मला खूप झोंबली. मला आत्म-संयम नव्हता याची मला अतिशय लाज वाटली.” एका तरुणीने कबूल केले: “मी शुद्धीवर आले तेव्हा मला घृणा वाटू लागली. . . . पार्टी संपली आणि मला मात्र स्वतःचा तिरस्कार, किळस आणि ओंगळपणा वाटू लागला. ‘परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तू आपल्या दोघांना का रोखलं नाहीस?’ या त्याच्या म्हणण्यानं मला आणखीनच किळस वाटली.”

डॉ. जे सेगल यांच्या मते अशा प्रतिक्रिया सहसा ऐकायला मिळतात. २,४३६ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लैंगिक जीवनाचा अभ्यास केल्यावर त्यांनी असा निष्कर्ष काढला: “असमाधानकारक आणि निराशाजनक ठरलेले पहिले [लैंगिक संभोगाचे] अनुभव, समाधानकारक आणि सुखदायक अनुभवांपेक्षा जवळजवळ दुप्पट होते. आपला अनुभव सांगताना पुरुष व स्त्रिया दोघेही कबूल करतात की ते अतिशय निराश झाले होते.” लैंगिक संबंधांबाबतीत विवाहित जोडप्यांमध्ये देखील काहीवेळा अडचणी उद्‌भवतात. परंतु, खरे प्रेम आणि वचनबद्धता असलेल्या विवाहात, अशाप्रकारच्या समस्या बहुधा सोडवल्या जाऊ शकतात.

लैंगिक स्वैराचाराची किंमत

काही युवकांना जवळीक ठेवण्याविषयी कोणत्याच प्रकारची दोषभावना वाटत नाही आणि म्हणून विषयवासना तृप्त करण्याच्या हेतूने ते विविध सोबत्यांसोबत लैंगिक संबंध ठेवतात. संशोधक रॉबर्ट सोरेंसन यांनी किशोरवयीन लैंगिकतेच्या अभ्यासात असे निरीक्षिले की हे युवक आपल्या स्वैराचाराची किंमत मोजतात. सोरेंसन लिहितात: “आमच्या व्यक्‍तिगत मुलाखतींमध्ये, अनेक [स्वैराचारी युवक] प्रकट करतात की, . . . काहीच हेतू न बाळगता व आत्म-तृप्तीसाठी कार्य करत असल्याचा ते विश्‍वास करतात.” यांपैकी शेचाळीस टक्के युवक या विधानाशी सहमत होते: “आता मी ज्या तऱ्‍हेने जीवन जगतोय तसेच जगत राहिलो तर माझ्या सर्व क्षमता व्यर्थ ठरणार आहेत.” या लैंगिक स्वैराचारी युवकांमध्ये “स्वाभिमान आणि स्व-आदर” यांची उणीव असल्याचे सोरेंसन यांना पुढे आढळले.

अगदी नीतिसूत्रे ५:९ च्या म्हणण्यानुसार: अनैतिकतेत सामील होणारे स्वतःची “अब्रू दुसऱ्‍यांच्या हाती” देतात.

त्यानंतरच्या सकाळी

एकदा कोणा जोडप्याने निषिद्ध संबंध ठेवले, तर त्यानंतर ते एकमेकांकडे सहसा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागतात. मुलाला, मुलीप्रती आपल्या भावना आधीप्रमाणे उत्कट वाटणार नाहीत; ती इतकी काही आकर्षक नाही असेही त्याला वाटू शकते. दुसऱ्‍या बाजूला पाहता, मुलीला भ्रष्ट झाल्यासारखे वाटेल. अम्नोन हा तरुण, तामार या कुमारिकेसाठी किती बेचैन होता तो बायबल अहवाल आठवा. तरीही, तिच्याशी संभोग केल्यावर, “अम्नोनास तिचा अत्यंत तिरस्कार वाटला.”—२ शमुवेल १३:१५.

मारीया नावाच्या मुलीलाही असाच अनुभव आला. लैंगिक संबंध ठेवल्यावर, तिने कबूल केले: “मला स्वतःचा (माझ्या कमजोरपणामुळे) आणि माझ्या मित्राचा द्वेष वाटू लागला. ज्या लैंगिक संबंधांमुळं आम्ही आणखी जवळ येऊ असं आम्हाला वाटलं त्या संबंधांमुळं खरं पाहता आमचं नातंच तुटलं. त्याला पुन्हा पाहण्याची इच्छा सुद्धा मला होत नव्हती.” होय, विवाहपूर्व लैंगिक संबंधामुळे एखादे जोडपे अशी रेषा पार करते, की ज्यावरून त्यांना परतता येत नाही!

कौटुंबिक जीवनाच्या क्षेत्रात नावाजलेले संशोधक पॉल एच. लँडीस असे निरीक्षण करतात: “[विवाहपूर्व लैंगिक संबंधाच्या] तात्पुरत्या परिणामस्वरूप कदाचित नातेसंबंध बळकट होतही असतील पण त्याचे दीर्घकालीन परिणाम निराळेच असतील.” खरे पाहता, लैंगिक संबंध न ठेवणाऱ्‍या युगुलांपेक्षा लैंगिक संबंध ठेवणाऱ्‍या जोडप्यांमध्ये भंग पावण्याची शक्यता अधिक असते! त्याचे कारण? निषिद्ध लैंगिक संबंध, द्वेष आणि बेभरवसा यांस कारणीभूत ठरतात. एका युवकाने कबूल केले: “काही लोक, संभोग केल्यानंतर विचार करतात, ‘ज्याअर्थी तिने माझ्याशी संबंध ठेवले त्याअर्थी आणखी इतरांशीही ठेवलेच असतील.’ खरं पाहता, मला तसंच वाटलं. . . . मी अतिशय मत्सरी, शंकेखोर आणि संशयी बनलो.”

हे खऱ्‍या प्रीतीपेक्षा किती वेगळे आहे, जी प्रीती “हेवा करीत नाही . . . गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही.” (१ करिंथकर १३:४, ५) चिरस्थायी नातेसंबंध वाढवणारी प्रीती अंध वासनेवर आधारित नसते.

पाक राहण्याचे फायदे—शांती आणि स्व-आदर

तथापि, निष्कलंक राहिल्याने एखाद्या युवकाला आपत्तीकारक परिणाम टाळण्यासच नव्हे तर त्याहून अधिक मदत मिळू शकते. आपल्या प्रियकराबद्दल अत्यंत प्रेम असतानाही निष्कलंक राहिलेल्या तरुणीविषयी बायबल सांगते. परिणामस्वरूप ती अभिमानाने म्हणू शकली: “मी तटासारखी होते, माझे कुच बुरूजांसारखे होते.” ती ‘हेलकावणाऱ्‍या दारासमान’ नव्हती की जे अनैतिक दबावाखाली सहज ‘उघडले जात होते.’ नैतिकदृष्ट्या ती, दुर्गम बुरूज व अशक्यप्राय तट असलेल्या किल्ल्यासमान होती! “निर्मळ,” [NW] असे म्हणवले जाण्यास ती पात्र ठरली आणि म्हणून आपल्या भावी पतीबद्दल म्हणू शकली, “मी आपल्या वल्लभाच्या दृष्टीने कृपाप्रसादास पात्र झाले.” तिच्या स्वतःच्या मनःशांतीने त्या दोघांच्या संतुष्टीत भर पडली.—गीतरत्न ६:९, १०; ८:९, १०.

आधी उल्लेख केलेल्या एस्तेर या चारित्र्यवान मुलीला तीच आंतरिक शांती आणि स्व-आदर लाभला. ती म्हणाली: “मी स्वतःविषयी समाधानी होते. सहकर्मचारी माझी टर उडवत, तरी माझं कौमार्य इतकं दुर्लभ असल्यामुळे मी ते एखाद्या मौल्यवान हिऱ्‍याप्रमाणे जपलं.” शिवाय, एस्तेरसारख्या युवाजनांना दोषी विवेक सतावत नाही. १९ वर्षांच्या स्टिफन या ख्रिश्‍चनाने म्हटले, “यहोवा देवासमोर चांगला विवेक असणे सर्वात महत्त्वाचे आहे आणि त्याची जागा आणखी काहीही घेऊ शकत नाही.”

‘पण एखादे जोडपे लैंगिक संबंध न ठेवता एकमेकांशी परिचित कसे होणार?’ अशा बुचकळ्यात काही युवक पडतात.

चिरस्थायी जवळीक वाढवणे

मात्र लैंगिक संबंध ठेवल्याने किंवा चुंबन घेण्याद्वारे अथवा अशाच इतर प्रकारांनी जिव्हाळा व्यक्‍त केल्यानेही कायमस्वरूपी नातेसंबंध निर्माण होत नसतो; ॲन नामक तरुण स्त्री इशारा देते: “मी अनुभवानिशी हे शिकले की काही वेळा खूपच लवकर तुम्ही शारीरिकरित्या जवळ येऊ शकता.” एखादे जोडपे एकमेकांवर प्रेमवृष्टी करण्यात आपला वेळ घालवते तेव्हा अर्थपूर्ण दळणवळण नाहीसे होते. यामुळे ते कदाचित अशा गंभीर मतभेदांकडे डोळेझाक करतील की जे विवाहानंतर पुन्हा उद्‌भवू शकतात. ॲन ही नंतर दुसऱ्‍या एका पुरुषाशी—जिच्यासोबत तिने कालांतराने विवाह केला—भेटीगाठी करू लागली तेव्हा नको एवढी शारीरिक जवळीक न राखण्याची तिने खबरदारी घेतली. ॲन सांगते: “समस्या सोडवण्यात आणि जीवनातल्या आमच्या ध्येयांविषयी चर्चा करण्यात आम्ही वेळ घालवला. मी कोणत्या प्रकारच्या व्यक्‍तीशी विवाह करतेय ते मला कळालं. विवाहानंतर मला एकामागून एक आश्‍चर्याचे सुखद धक्के मिळाले.”

ॲन व तिच्या प्रियकराला अशाप्रकारचा आत्मसंयम बाळगण्यास कठीण गेले का? “हो, निश्‍चितच!” ॲन कबूल करते. “मी स्वभावानेच जिव्हाळा दाखवणारी व्यक्‍ती आहे. पण आम्ही जिव्हाळा दाखवण्याच्या धोक्यांविषयी बातचीत केली आणि एकमेकांची मदत केली. आम्हा दोघांनाही देवाला खूष करायचे होते आणि आमचा भावी विवाह आम्हाला भ्रष्ट होऊ द्यायचा नव्हता.”

परंतु, एखाद्या नव्या पतीला अथवा पत्नीला लग्नाआधी लैंगिक अनुभव असणे मदतीचे ठरत नाही का? नाही, या उलट, ते वैवाहिक घनिष्टतेस हिरावते! विवाहपूर्व संबंधांमध्ये आत्म-तृप्ती, लैंगिक संबंधांच्या शारीरिक पैलूंवर भर असतो. अनियंत्रित वासनेमुळे परस्परांसाठी त्यापुढे आदर राहत नाही. अशाप्रकारच्या स्वार्थी सवयी लागल्यावर, त्या मोडण्यास जड जातात आणि कालांतराने त्या नातेसंबंधास उद्‌ध्वस्त करू शकतात.

तथापि, विवाहात, हितकर घनिष्ट नातेसंबंध निर्बंध, आत्मसंयम यांची अपेक्षा करतो. घेण्यावर नव्हे तर ‘लैंगिकसंबंधीचा आपला हक्क देण्यावर’ भर असला पाहिजे. (१ करिंथकर ७:३, ४) निष्कलंक राहिल्याने असा आत्मसंयम विकसित करण्यास मदत मिळते. स्वतःच्या मनीषांपुढे दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या हिताबद्दल निःस्वार्थ चिंता राखण्यास ते तुम्हाला शिकवते. त्याचप्रमाणे, वैवाहिक समाधान केवळ शारीरिक कारणांमुळेच मिळत नाही हे देखील लक्षात ठेवा. सेमूर फिशर हे समाजशास्त्रज्ञ म्हणतात, की एखाद्या स्त्रीचा लैंगिक प्रतिसाद तिला वाटणारी “घनिष्टता, निकटता आणि निर्भरता” यांवर आणि “आपल्या पत्नीला ओळखून घेण्याच्या [पतीच्या] क्षमतेवर व . . . तिचा त्याच्यावर किती विश्‍वास आहे” यावर सुद्धा अवलंबून असतो.

मनोवेधक गोष्ट अशी, की अभ्यासलेल्या १७७ विवाहित महिलांपैकी विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवलेल्या तीन चतुर्थ्यांश महिलांनी विवाहानंतरच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्येच लैंगिक समस्या उद्‌भवल्याचे वृत्त दिले. शिवाय, दीर्घकालीन लैंगिक समस्या असल्याचे वृत्त दिलेल्या सर्वांनी “विवाहपूर्व संभोग केला होता.” संशोधनाने पुढे असे दाखवून दिले की, विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवलेल्यांची विवाहानंतर जारकर्म करण्याची शक्यता दुप्पट असते! बायबलचे शब्द किती सत्य आहेत: “जारकर्म . . . विवेक नष्ट करि[तो].”—होशेय ४:११.

म्हणून तुम्ही ‘जे काही पेराल त्याचेच तुम्हाला पीक मिळेल.’ (गलतीकर ६:७, ८) वासनेचे पीक पेरा आणि मग शंका व असुरक्षिततेच्या भरमसाट पीकाची कापणी करा. परंतु, आत्मसंयम पेराल, तर विश्‍वास आणि सुरक्षिततेच्या पीकाची कापणी कराल. आधी उल्लेखिलेल्या एस्तेरच्या सुखी विवाहाला आता अनेक वर्षे उलटली आहेत. तिचा पती म्हणतो, “घरी आल्यावर, आम्ही दोघे कोणाचे नाहीत, फक्‍त एकमेकांचे आहोत हे जाणण्याचा आनंद अवर्णनीय आहे. या आत्मविश्‍वासाच्या भावनेची जागा इतर कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही.”

विवाह होईस्तोवर धीर धरणाऱ्‍या लोकांना आपण देवाला संतुष्ट करत आहोत हे जाणल्याने मनःशांती देखील प्राप्त होते. तरीही, आजकालच्या काळात शुद्ध राहणे हे मुळीच सोपे नाही. त्यासाठी तुम्हाला काय मदत करू शकते?

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ तुम्हाला परिचित असलेल्या युवकांमध्ये विवाहपूर्व लैंगिक संबंध किती प्रचलित आहेत? त्यामुळे तुम्हाकरता काही समस्या अथवा दबाव निर्माण होतात का?

◻ विवाहपूर्व लैंगिक संबंधांचे काही नकारात्मक दुष्परिणाम कोणते आहेत? अशाप्रकारे दुःख सोसाव्या लागलेल्या काही युवकांविषयी तुम्हाला माहिती आहे का?

◻ किशोरवयीन गर्भधारणेच्या अडचणीवर गर्भनिरोध हा उपाय आहे का?

◻ निषिद्ध लैंगिक संबंध ठेवल्यावर काहींना अपराधीपणाची भावना आणि निराशा का वाटते?

◻ लैंगिक जवळीक एखाद्या अविवाहित जोडप्याला एकमेकांच्या समीप येण्यास मदत करील असे तुम्हाला वाटते का? तुम्ही असे उत्तर का देता?

◻ विवाहपूर्व भेटीगाठी करताना एखादे जोडपे एकमेकांशी परिचित कसे होऊ शकते?

◻ तुमच्या मते विवाह होईस्तोवर कौमार्य टिकवून ठेवण्याचे काय फायदे आहेत?

[१८२ पानांवरील संक्षिप्त आशय]

“किशोरवयीन असताना लैंगिक संबंध न ठेवलेली तरुण व्यक्‍ती अपवादात्मक आहे.”—ॲलन गुटमॅकर इन्स्टिट्यूट

[१८७ पानांवरील संक्षिप्त आशय]

“अतिशय निराशा झाली—मी विचार केला तसं स्वर्गसुख अथवा प्रेमाची ऊब वगैरे त्यात मुळीच नव्हती”

[१९० पानांवरील संक्षिप्त आशय]

विवाहपूर्व लैंगिक संबंधांमुळे एखादे जोडपे ती रेषा ओलांडते की ज्यावरून त्यांना परतता येत नाही!

[१८४, १८५ पानांवरील चौकट/चित्र]

‘छे! अशा परिस्थितीत मी कधीच सापडणार नाही’—किशोरवयीन गर्भधारणेची समस्या

“दर वर्षी १० मधील एकापेक्षा अधिक किशोरवयीन मुलींना दिवस जातात, आणि हे प्रमाण वाढतच आहे. या प्रकारावर आळा न घातल्यास, १० तरुणींपैकी चार जणी आपल्या किशोरावस्थेतच निदान एकदा तरी गर्भवती राहतील.” असे वृत्त किशोरवयीन गर्भधारणा: न सुटलेली समस्या (इंग्रजी) देते. कोणत्या प्रकारच्या मुली गर्भवती होतात? त्याविषयी पौगंडावस्था या नियतकालिकाने म्हटले: “दिवस गेलेल्या शालेय-वयीन मुली समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांतल्या . . . सर्व जातींतल्या, विश्‍वासांतल्या, देशाच्या सर्व ग्रामीण तसेच शहरी भागांतल्या असतात.”

सहसा मुलींना गर्भवती होण्याची इच्छा नसते. ४०० पेक्षा अधिक गर्भवती किशोरवयीनांच्या आपल्या उल्लेखनीय अभ्यासात फ्रँक फरस्टंबर्ग जुनियर यांनी निरीक्षिले की, “बहुतांश जणींनी मुलाखतीत वारंवार असं म्हटलं, ‘असं घडेल हे मला वाटलं नव्हतं.’”

पण, आपल्या काही मैत्रिणी लैंगिक संबंधांचा उपभोग घेऊनही गर्भवती राहिल्या नाहीत हे पाहून आपणही असे करू शकतो असा तर्क काहींनी केला. फरस्टंबर्ग असेही म्हणतात: “अनेकांनी असे म्हटले, की ‘लगेचच’ गर्भ राहील असे त्यांना वाटले नव्हते. इतरांनी विचार केला की, ‘कधीतरी एकदा’ लैंगिक संबंध ठेवल्याने आपल्याला दिवस जाणार नाहीत . . . जितका अधिक काळ त्यांना दिवस गेले नाहीत तितकेच अधिक धोके स्वीकारण्याची जास्त शक्यता होती.”

तथापि, सत्य हे आहे की, एखादी व्यक्‍ती लैंगिक संबंध ठेवते त्या प्रत्येक वेळी तिला गर्भ राहण्याचा धोका असतो. (५४४ मुलींच्या एका गटात ‘जवळजवळ एक-पचमांश जणी लैंगिक संभोग सुरू केल्यावर सहा महिन्यांच्या आतच गरोदर राहिल्या.’) रॉबिन या अविवाहित मातेप्रमाणे अनेकजणी, मुद्दामहून गर्भनिरोधक पद्धतींचा उपयोग न करण्याचे निवडतात. अनेक तरुणींना वाटते त्यानुसार आपल्या आरोग्याला गर्भनिरोधक गोळ्यांनी हानी पोहंचेल अशी तिला भीती होती. ती पुढे मान्य करते: “मी गर्भनिरोधक पद्धती वापरू लागले असते, तर मी काहीतरी चूक करतेय हे स्वतःला कबूल करावे लागले असते. ते मला शक्य नव्हतं. म्हणून मी जे काही करत होते त्याचा विचार मनातून काढून बरंवाईट काही घडणार नाही अशी आशा करू लागले.”

अशाप्रकारची कारणमीमांसा अविवाहित मातांमध्ये सामान्य आहे. फरस्टंबर्गच्या अभ्यासात, “एखाद्या स्त्रीला लैंगिक संबंध ठेवण्याकरता विवाह होईपर्यंत थांबून राहणे महत्त्वाचे आहे असे जवळजवळ निम्म्या किशोरवयीन मुलींनी म्हटले . . . त्यांच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये स्पष्ट भेद होता हे नाकारून चालणार नाही . . . त्यांनी एक प्रकारचे दर्जे संपादले होते आणि निराळ्याच दर्जांप्रमाणे राहण्याचे शिकून घेतले होते.” या भावनिक झगड्यामुळे “आपल्या लैंगिक वर्तनाचे परिणाम वास्तविक पद्धतीने हाताळण्यास या स्त्रियांना विशेषतः जड गेले.”

गर्भनिरोधक पद्धतींच्या वापरामुळेही एखादी मुलगी अविवाहित मातृत्व चुकवू शकेल अशी हमी मिळत नाही. बालकांची बालके (इंग्रजी) हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते: “प्रत्येक पद्धतीला अपयशाचे प्रमाण असतेच. . . . अविवाहित किशोरवयीन मुलींनी नित्याने गर्भनिरोधक पद्धतींचा वापर केला तरी . . . दर वर्षी [संयुक्‍त संस्थानांत] ५,००,००० जणींना गर्भ धारणा होईलच.” त्यानंतर, पॅट नामक एका १६ वर्षीय अविवाहित मातेचे खेदपूर्ण शब्द उद्धृत केले आहेत: “मी नियमाने [गर्भनिरोधक गोळ्या] घेत होते. मी खरोखर एकही दिवस चुकवला नाही.”

“फसू नका” अशी ताकीद बायबल देते. “देवाचा उपहास व्हावयाचा नाही. कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” (गलतीकर ६:७) व्यभिचारातून अनिष्ट कापणी मिळू शकणाऱ्‍या अनेक मार्गांपैकी केवळ एक मार्ग म्हणजे गर्भधारणा होय. अनैतिकतेत गुरफटलेल्या इतर सर्वांप्रमाणे अविवाहित माता सुदैवाने, मन फिरवून राजा दावीदाप्रमाणे पश्‍चात्तापी मनोवृत्तीने देवाकडे येऊ शकतात; दावीद, ज्याने अशी प्रार्थना केली: “मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.” (स्तोत्र ५१:२) अशा पश्‍चात्तापी जणांना आपली मुले “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्यास देव त्यांच्या प्रयत्नांना आशीर्वादित करील.—इफिसकर ६:४.

तरीपण, विवाहपूर्व लैंगिक संबंध टाळणे हेच सर्वात बरे! विवाहपूर्व लैंगिक संबंधाचा काहीच दुष्परिणाम होणार नाही असे जे सांगतात त्यांचे ऐकू नका.

[१८३ पानांवरील चित्र]

अनैतिक लैंगिक संबंध ठेवल्यानंतर, तरुण व्यक्‍तीला बहुधा भ्रष्ट अथवा मानखंडना झाल्यासारखी वाटते

[१८६ पानांवरील चित्र]

लैंगिकरित्या संक्रमित रोग बहुधा विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवल्याने संभवतात

[१८८ पानांवरील चित्र]

जिव्हाळ्याच्या अति प्रदर्शनाने एखाद्या जोडप्याला नैतिक धोके संभवू शकतात आणि अर्थपूर्ण दळणवळण नाहीसे होऊ शकते

[१८९ पानांवरील चित्र]

वैवाहिक आनंद फक्‍त जोडप्यातील शारीरिक संबंधावरच निर्भर नसतो