व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हस्तमैथुन—ते किती गंभीर आहे?

हस्तमैथुन—ते किती गंभीर आहे?

अध्याय २५

हस्तमैथुन—ते किती गंभीर आहे?

“देवाच्या नजरेत हस्तमैथुन चुकीचं आहे का असा विचार मी करतेय. भवितव्यात त्याचा परिणाम माझ्या शारीरिक व/अथवा मानसिक प्रकृतीवर होईल का आणि पुढं माझं लग्न झाल्यावर काय?”—पंधरा वर्षांची मेलिसा.

अनेक युवकांना हे विचार भेडसावत आहेत. कारण? हस्तमैथुन सर्वसामान्य झाले आहे. अहवालानुसार, सुमारे ९७ टक्के पुरुषांनी आणि ९० टक्क्यांपेक्षा अधिक महिलांनी २१ वर्षांचे होईपर्यंत कधी न कधी हस्तमैथुन केलेले असते. शिवाय, खालीलपैकी सर्व प्रकारच्या रोगांसाठी—चामखीळ व लाल पापण्या ते फेफरे व मानसिक व्याधींपर्यंतच्या सर्व विकारांसाठी ही सवय कारणीभूत आहे असे म्हटले गेले आहे.

विसाव्या शतकातील वैद्यकीय संशोधक आता असे भयसूचक दावे करत नाहीत. खरे पाहता, डॉक्टरांचा असा विश्‍वास आहे की, हस्तमैथुनाने कोणताच शारीरिक रोग संभवत नाही. पुढे, विल्यम मास्टर्स आणि वर्जिनिया जॉन्सन हे संशोधक म्हणतात की, “हस्तमैथुन कितीही वेळा केले जात असले, तरी त्याने मानसिक रोग होतो यासाठी कोणताच प्रस्थापित वैद्यकीय पुरावा नाही.” असे असले, तरीही त्याचे दुष्परिणाम आहेतच! त्याचप्रमाणे अनेक ख्रिस्ती युवकांना या सवयीविषयी चिंता वाटणे योग्य आहे. “मी [हस्तमैथुन] करू लागलो, तेव्हा जणू यहोवा देवाला निराश करू लागलो असं मला वाटायचं,” असे एका तरुणाने लिहिले. “काहीवेळा मी अतिशय खिन्‍न होत असे.”

हस्तमैथुन म्हणजे नेमके काय आहे? ते किती गंभीर आहे आणि पुष्कळ युवकांना ही सवय मोडण्यास जड का जाते?

युवकच सहज का बळी पडतात

लैंगिक भावना चेतवण्यासाठी मुद्दामहून केलेला उद्‌क्षोभ म्हणजेच हस्तमैथुन. ऐन तारुण्यात कामुक वासना तीव्र होतात. शरीरात सोडले जाणारे शक्‍तिशाली होर्मोन्स पुनरुत्पादक अवयवांवर परिणाम करतात. अशाप्रकारे, हे अवयव आल्हाददायक शिरशिरी उत्पन्‍न करू शकतात याची जाणीव तरुणाला होते. काहीवेळेस तर लैंगिक गोष्टींचा विचार न करताही एखादा युवक लैंगिकरित्या प्रक्षोभित होऊ शकतो.

उदाहरणार्थ, विविध चिंता, भीती किंवा नैराश्‍य यांनी उत्पन्‍न होणाऱ्‍या तणावांमुळे मुलाच्या संवेदनशील चेता संस्थेवर परिणाम होऊन तो लैंगिकरित्या उत्तेजित होऊ शकतो. मग वीर्य उत्पन्‍न झाल्याने तो लैंगिकरित्या उत्तेजित अवस्थेत जागा होऊ शकतो. किंवा झोपेत रेतस्खलन होऊ शकते व त्यासोबत सहसा कामोत्तेजक स्वप्न देखील पडू शकते. त्याचप्रमाणे, काही तरुण मुली देखील अकारण उत्तेजित होऊ शकतात. अनेकांना आपल्या मासिकचक्राआधी किंवा नंतर तीव्र कामासक्‍ती जाणवते.

म्हणून अशाप्रकारची कामोत्तेजना तुम्ही अनुभवली असल्यास, घाबरण्याचे काहीएक कारण नाही. तरुण शरीराचा हा सर्वसामान्य प्रतिसाद आहे. अशा संवेदना अति तीव्र असल्या तरीही त्या हस्तमैथुनासारख्या नाहीत कारण त्या बहुतेक अनैच्छिक असतात. त्याचप्रमाणे, तुम्ही मोठे होत जाल तसे या संवेदनांची तीव्रता लोप पावेल.

तथापि, या नवख्या संवेदनांबद्दल कुतूहल आणि नाविन्य वाटल्यामुळे काही युवक मुद्दामहून आपल्या लैंगिक अवयवांना हाताळतात अथवा मुठळ्या मारतात.

‘मानसिक इंधन’

एका व्यभिचारी स्त्रीशी गाठ पडलेल्या तरुणाविषयी बायबल वर्णन करते. त्याचे चुंबन घेऊन ती त्यास म्हणते: “ये, चल . . . आपण प्रेमानंदाने आराम पावू.” मग काय होते? तर “तो तत्काळ तिच्या मागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो.” (नीतिसूत्रे ७:७-२२) स्पष्टतः, या युवकाच्या वासना, हार्मोन्स क्रियाशील असल्यामुळे नव्हे तर त्याने पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टींनी उत्तेजित झाल्या.

अशाचप्रमाणे, एक तरुण कबूल करतो: ‘मी मनात जे काही भरत होतो तेच हस्तमैथुनाच्या संपूर्ण समस्येचे मूळ ठरले. अनैतिकता दाखवणारे टीव्ही कार्यक्रम आणि काही वेळा केबल टीव्हीवरून विवस्त्रता प्रदर्शित करणारे कार्यक्रम मी पाहत असे. ही दृश्‍ये इतकी धक्कादायक असतात की ती मनात रेंगाळत राहतात. ती माझ्या मनात पुन्हा पुन्हा डोकवायची आणि हस्तमैथुनासाठी जणू मानसिक इंधन पुरवायची.’

होय, एखादी व्यक्‍ती जे वाचते, पाहते किंवा ऐकते त्याचप्रमाणे ज्याविषयी बोलते व मनन करते त्यानेच हस्तमैथुनास खतपाणी मिळते. एका २५ वर्षांच्या स्त्रीने कबूल केल्याप्रमाणे: “माझी ती सवय सुटतच नव्हती. पण मी रोमान्स कादंबऱ्‍या वाचायचे आणि यामुळे या समस्येत आणखीनच भर पडली.”

“ट्रँक्वीलायझर”

ही सवय मोडणे इतके कठीण का असू शकते त्याचे निःसंशये सर्वात मोठे कारण कोणते हे या तरुणीच्या अनुभवावरून प्रकट होते. ती पुढे म्हणते: “बहुधा मी दबाव, तणाव किंवा चिंता घालवून देण्यासाठी हस्तमैथुन करत असे. डोकं शांत करण्यासाठी मद्यपी जसा पेय घेतो त्यासारखंच ते तात्पुरतं सुख होतं.”

सुझन आणि अविंग सार्नोफ हे संशोधक असे लिहितात: “कुणी अपमानास्पद वागणूक दिली किंवा कशाविषयी भीती वाटते तेव्हा स्वतःचं समाधान करायला हस्तमैथुन करण्याची काहींना सवयच जडते. तथापि, इतरजण कदाचित अधूनमधून म्हणजे तीव्र भावनिक तणाव असतानाच अशाप्रकारे अलिप्त होतील.” इतर जण जेव्हा, अस्वस्थ, खिन्‍न, एकलकोंडे किंवा तणावात असतात तेव्हा ते या सवयीकडे वळतात असे दिसते; ही सवय त्यांच्या समस्या घालवून देणारे जणू “ट्रँक्वीलायझर” बनते.

बायबल काय म्हणते?

एका युवकाने विचारले: “हस्तमैथुन हे अक्षम्य पाप आहे का?” बायबलमध्ये हस्तमैथुनाचा मुळी उल्लेखच नाही. a बायबल काळात ही सवय ग्रीक-भाषिकांमध्ये सर्वसामान्य होती आणि तिचे वर्णन करण्यासाठी अनेक ग्रीक शब्द उपयोगात आणले जात असत. पण यातील एकही शब्द बायबलमध्ये वापरलेला नाही.

बायबलमध्ये हस्तमैथुनाचे थेट खंडन केलेले नाही याचा अर्थ ते अपायकारक नाही असा आहे का? मुळीच नाही! हस्तमैथुनास व्यभिचारासारख्या गंभीर पापांसोबत गणले गेले नसले तरी निश्‍चितच ही एक ओंगळ सवय आहे. (इफिसकर ४:१९) यास्तव, देव वचनाची तत्त्वे दर्शवतात, की या ओंगळ सवयीचा तीव्र प्रतिकार केल्याने तुम्ही ‘स्वतःचे हित’ साधता.—यशया ४८:१७.

“कामवासना” चेतवणे

“तुमचे अवयव म्हणजे . . . कामवासना . . . हे जिवे मारा,” असे बायबल आर्जवते. (कलस्सैकर ३:५) “कामवासना” सर्वसामान्य लैंगिक भावनांना नव्हे तर काबूत नसलेल्या आसक्‍तीला सूचित करते. पौलाने रोमकर १:२६, २७ येथे वर्णन केल्यानुसार, अशाप्रकारची “कामवासना” गंभीर कृत्यांमध्ये गोवले जाण्यास कारणीभूत ठरू शकते.

परंतु, हस्तमैथुन या वासनांना ‘जिवे मारून’ टाकत नाही का? नाही, त्याउलट, एका युवकाने कबूल केल्यानुसार: “हस्तमैथुन करताना आपण गल्लत इच्छांचा विचार करतो आणि त्यामुळे वासना आणखीनच वाढते.” सहसा अनैतिक मनोरथांत रमून विषयसुख वाढवले जाते. (मत्तय ५:२७, २८) यास्तव, अनुकूल परिस्थितीत, एखादी व्यक्‍ती सहजगत्या अनैतिकतेत पडू शकते. हेच एका युवकाच्या बाबतीत घडले, ज्याने कबूल केले: “स्त्रीसोबत संबंध न ठेवता हस्तमैथुनाच्या साहाय्याने निराशा घालवता येते असा माझा एके काळी ग्रह होता. तरीही, संभोग करण्याची तीव्र इच्छा मला झाली.” त्याने व्यभिचार केला. हस्तमैथुन करणारे बहुतांश पौगंड व्यभिचार देखील करत होते हे संपूर्ण राष्ट्रातून घेतलेल्या अभ्यासाद्वारे प्रकट झाले यात काही आश्‍चर्य नाही. त्यांची संख्या कौमार्यात असलेल्यांपेक्षा ५० टक्क्यांनी अधिक होती!

मानसिक व भावनिकरित्या अशुद्ध करणारे

हस्तमैथुनामुळे मानसिकरित्या भ्रष्ट करणाऱ्‍या मनोवृत्ती मनात ठसवल्या जातात. (पडताळा २ करिंथकर ११:३.) हस्तमैथुनाच्या वेळी एखादी व्यक्‍ती स्वतःच्याच शारीरिक संवेदनांत गर्क होऊन जाते—पूर्णतः आत्म-केंद्रित असते. लैंगिक संबंध प्रेमापासून वेगळा होतो आणि तणाव घालवणाऱ्‍या प्रतिसादाकरता त्याचा वापर केला जातो. पण कामेच्छा, पुरुष आणि त्याच्या पत्नीमधील प्रेमाचे वक्‍तव्य असलेल्या लैंगिक संबंधांमध्ये तृप्त कराव्यात असा देवाचा हेतू होता.—नीतिसूत्रे ५:१५-१९.

हस्तमैथुन करणारा, विरुद्ध लिंगी व्यक्‍तीला केवळ उपभोग्य वस्तू—म्हणजेच लैंगिक तृप्ती मिळवण्याचे साधन म्हणून पाहू शकतो. अशाप्रकारे, हस्तमैथुनाद्वारे शिकवलेल्या गैर मनोवृत्ती एखाद्याच्या ‘आत्म्याला’ किंवा प्रबळ मानसिक प्रवृत्तीला भ्रष्ट करतात. काही प्रकरणांत तर हस्तमैथुनाद्वारे निर्माण झालेल्या समस्या विवाहानंतरही कायम राहतात! म्हणून, उचितपणे देवाचे वचन आर्जवते: “प्रियजनहो, . . . देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू.”—२ करिंथकर ७:१.

दोषाबद्दल समतोल दृष्टिकोन

या वाईट सवयीवर मात करण्यात अनेक युवक सामान्यपणे यशस्वी होतात तरी अधूनमधून त्यांचा प्रतिकार शिथिल पडतो. सुदैवाने, देव अतिशय कृपाळु आहे. “हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस,” असे स्तोत्रकर्ता म्हणाला. (स्तोत्र ८६:५) एखादा ख्रिस्ती, हस्तमैथुनाच्या आहारी जातो तेव्हा त्याचे अंतःकरण सहसा स्वतःचे खंडन करत असते. तरीही, बायबल म्हणते, “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते.” (१ योहान ३:२०) देव केवळ आपल्या पापांचेच निरीक्षण करत नाही. त्याच्या ज्ञानाचा मोठेपणा, क्षमायाचनेची आपली कळकळ सहानुभूतिपूर्वक ऐकण्यास त्याला प्रवृत्त करते. एका तरुणीने म्हटल्यानुसार: “मला काही प्रमाणात दोषी वाटलंच, पण यहोवा किती प्रेमळ देव आहे व तो माझं अंतःकरण वाचू शकतो आणि माझे प्रयत्न आणि हेतू तो जाणतो हे कळाल्यामुळे कधीकधी उणे पडल्यावर अति खिन्‍न न होण्यास मला मदत होते.” तुम्ही हस्तमैथुनाच्या इच्छेचा प्रतिकार केल्यास व्यभिचाराचे गंभीर पाप तुमच्या हातून घडण्याची शक्यता नसते.

सप्टेंबर १, १९५९ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकाने म्हटले: “एखादी वाईट सवय आपल्या पूर्वीच्या जीवनशैलीत आपल्या कल्पनेपेक्षाही इतक्या खोलवर रुजलेली असेल की पुष्कळदा आपण त्यामुळे अडखळत व पडत [असू]. . . . निराश होऊ नका. तुम्ही अक्षम्य पाप केले आहे असा निष्कर्ष काढू नका. अगदी असाच विचार तुम्ही करावा अशी सैतानाची इच्छा आहे. तुम्हाला दुःख किंवा अस्वस्थता वाटते यावरूनच पुष्टी मिळते, की तुम्ही इतके वाहवत गेलेला नाहीत. देवाकडे क्षमेची, तुम्हाला शुद्ध करण्याची आणि मदत देण्याची नम्र आणि कळकळीची याचना करण्याचा कंटाळा कधीच करू नका. आपल्या त्याच त्या कमजोरीमुळे त्याच्याकडे कितीदाही जावे लागले तरी एखादे मूल जसे आपल्या वडिलांकडे अडचणीत सापडल्यावर जाते त्याचप्रमाणे त्याच्याकडे जा आणि यहोवा स्वतःच्या अपात्री कृपेमुळे तुमची प्रेमाने मदत करील आणि तुम्ही प्रांजळ असल्यास, तो तुम्हाला शुद्ध विवेक देईल.”

हा “शुद्ध विवेक” कसा मिळवता येऊ शकतो?

[तळटीपा]

a ‘आपले वीर्य जमिनीवर पाडल्यामुळे’ देवाने ओनानला मारून टाकले. तथापि, हे हस्तमैथुन नसून संभोगात व्यत्यय आणण्याचा प्रकार होता. शिवाय, आपल्या मृत भावाचे वंश पुढे चालवण्याकरता स्वार्थीपणाने दिराच्या धर्माशी अनुसरून लग्न न केल्यामुळे ओनानला मारून टाकण्यात आले. (उत्पत्ति ३८:१-१०) लेवीय १५:१६-१८ येथे उल्लेखिलेल्या ‘वीर्यपाताविषयी’ काय? स्पष्टतः, हे हस्तमैथुनास नव्हे तर, झोपेतील रेतस्खलन त्याचप्रमाणे विवाहातील लैंगिक संबंधांना अनुलक्षून आहे.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ हस्तमैथुन काय आहे आणि त्याविषयी काही सर्वसामान्य गैरसमज कोणते आहेत?

◻ युवकांमध्येच सहसा तीव्र लैंगिक वासना का उद्‌भवते? हे चुकीचे आहे असे तुम्हाला वाटते का?

◻ हस्तमैथुन करण्याची इच्छा कोणत्या गोष्टींनी प्रवृत्त होऊ शकते?

◻ एखाद्या युवकाला हस्तमैथुनामुळे काही अपाय होतो का?

◻ तुमच्या मते हस्तमैथुन कितपत गंभीर पाप आहे? त्यावर मात करताना समस्या उद्‌भवत असल्या तरी त्याचा प्रतिकार करणाऱ्‍या युवकाविषयी यहोवाचा काय दृष्टिकोन आहे?

[२०० पानांवरील संक्षिप्त आशय]

काहींना दबावाखाली अथवा तणावाखाली, एकलकोंडे किंवा खिन्‍न असताना हस्तमैथुन करण्याची तीव्र इच्छा जाणवते

[२०२ पानांवरील संक्षिप्त आशय]

‘मी मनात जे काही भरत होतो तेच हस्तमैथुनाच्या संपूर्ण समस्येचे मूळ ठरले’

[२०४ पानांवरील संक्षिप्त आशय]

“मी [हस्तमैथुन] करू लागलो, तेव्हा जणू यहोवा देवाला निराश करू लागलो असं मला वाटायचं”

[१९८ पानांवरील चित्र]

हस्तमैथुनामुळे तीव्र दोषभाव वाटत असले तरी देवाकडे कळकळीने क्षमायाचना केल्याने आणि या सवयीचा प्रतिकार करण्यासाठी झटल्याने एखाद्या व्यक्‍तीला चांगला विवेक प्राप्त होऊ शकतो

[२०३ पानांवरील चित्र]

उत्तेजक चित्रपट, पुस्तके आणि टीव्ही कार्यक्रम सहसा हस्तमैथुनासाठी ‘मानसिक इंधन’ ठरतात