व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरे प्रेम असल्याचे मी कसे ओळखावे?

खरे प्रेम असल्याचे मी कसे ओळखावे?

अध्याय ३१

खरे प्रेम असल्याचे मी कसे ओळखावे?

प्रेम—आपल्याच दुनियेत रमलेल्या प्रेमींच्या मते ते एखाद्याला पछाडणारे खूळ आहे, जीवनात कधीतरी एकदाच मंत्रमुग्ध करून टाकणारे सुख. त्यांचा विश्‍वास असा असतो की, प्रेम हा हृदयाचा मामला असून त्यास कोणी समजू शकत नाही तर फक्‍त अनुभवू शकतो. प्रेम सर्वांवर विजय मिळवून सर्वकाळ टिकते . . .

अशा या रोमांसच्या कल्पना. प्रेमात पडणे हा अतिशय सुखद अनुभव असू शकतो यात काहीच संशय नाही. पण खरे प्रेम आहे तरी काय?

पहिल्याच नजेरत प्रेम?

डेवीड, जॅनेटला पहिल्यांदा एका पार्टीत भेटला. तिचा सुडौल बांधा आणि हसताना तिचे केस डोळ्यावर कसे पडायचे ते पाहून तो अगदी भाळलाच. जॅनेट त्याच्या भुऱ्‍या डोळ्यांनी आणि विनोदी बोलण्याने मोहीत झाली. जणू पहिल्याच भेटीत दोघांचंही प्रेम झालं!

पुढील तीन आठवड्यांमध्ये डेवीड आणि जॅनेट जणू एका अतूट बंधनात गुंतले गेले. मग एका रात्री जॅनेटला तिच्या पहिल्या प्रियकराकडून फोन आला आणि सगळे काही संपले. सांत्वन मिळवण्यासाठी तिने डेवीडला फोन केला. पण, आपल्याला धोका दिला आहे असे समजून आणि गोंधळून जाऊन त्याने पाठ फिरवली. त्यांच्या मते सर्वकाळ टिकणारे त्यांचे प्रेम त्याच रात्री विरघळले.

चित्रपट, पुस्तके आणि टीव्हीवरील कार्यक्रम तुम्हाला पहिल्या भेटीतले प्रेम सर्वकाळ टिकते असे भासवतील. रंगरूपामुळे दोन व्यक्‍ती एकमेकांकडे आकर्षिल्या जातात हे मान्य आहे. एका तरुणाने म्हटल्यानुसार: “एखाद्या व्यक्‍तीचं व्यक्‍तिमत्त्व ‘पाहणं’ कठीण असतं.” पण एखादे नाते केवळ काही तासांचे किंवा दिवसांचे असते तेव्हा कोणत्या गोष्टीवर “प्रेम” जडते? ती व्यक्‍ती जी प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न करते त्यावर नव्हे का? खरे म्हणजे, तुम्हाला त्या व्यक्‍तीचे आचारविचार, आशा, भय, योजना, सवयी, कौशल्ये किंवा क्षमता यांविषयी कवडीचीही माहिती नसते. तुम्ही ‘अंतःकरणांतील गुप्त मनुष्यपणाला’ नव्हे तर केवळ बाह्‍य स्वरूपाला भेटलेला असता. (१ पेत्र ३:४) अशाप्रकारचे प्रेम किती टिकाऊ असू शकते?

“दिसतं तसं नसतं”

शिवाय, बाह्‍य स्वरूप फसवे असू शकते. बायबल म्हणते: “सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे.” बक्षीसावरील झगमगीत आवरणावरून आत काय आहे याबद्दल काहीच कल्पना येत नाही. खरे तर, अतिशय शोभिवंत आवरणातही फालतू बक्षीस गुंडाळलेले असू शकते.—नीतिसूत्रे ३१:३०.

नीतिसूत्रे म्हणते: “डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी.” (नीतिसूत्रे ११:२२) बायबल काळात नथ घालणे हा लोकप्रिय शृंगार होता. त्या उत्कृष्ट, सहसा चोख्या सोन्याच्या असत. साहजिकच, एखाद्या स्त्रीने घातलेली अशी ही नथ चटकन तुमच्या नजरेत भरली असती.

उचितपणे, हे नीतिसूत्र, बाह्‍य स्वरूपांनी सुंदर असलेल्या ‘तारतम्यहीन’ स्त्रीची तुलना ‘डुकराच्या नाकांतील सोन्याच्या नथीशी’ करते. तारतम्यहीन स्त्रीला सौंदर्य शोभत नाही; तिच्यावर तो दागिना व्यर्थ ठरतो. दीर्घ पल्ल्यात, शोभिवंत नथीमुळे जसे डुक्कर सुंदर दिसणार नाही त्याचप्रमाणे ती देखील काही केल्या आकर्षक वाटणार नाही! म्हणून, एखाद्या व्यक्‍तीचे स्वरूप पाहून तिच्या ‘प्रेमात पडणे’—आणि तिच्या व्यक्‍तिमत्त्वाकडे दुर्लक्ष करणे ही किती मोठी चूक आहे.

“सर्वात कपटी”

तथापि, काहींची अशी धारणा असते, की माणसाचे मन प्रेमाच्या बाबतीत अगदीच अचूक असते. ‘तुमचं मन काय म्हणतं ते ऐका, बस्स’ असा वाद ते करतात. ‘मग खरं प्रेम कोणतं हे तुम्हाला कळेलच!’ दुर्दैवाने, वास्तविकता या कल्पनेच्या उलटच आहेत. एका सर्वेक्षणानुसार १,०७९ तरुण लोकांनी (१८ ते २४ वयोगटातील) तोपर्यंत सरासरी सात प्रेम प्रकरणे अनुभवल्याचे सांगितले. अनेकांनी कबूल केले, की त्यांची गत प्रेम प्रकरणे केवळ दिवानगी होती—निव्वळ सरती, ओझरती भावना. तरीही, या युवकांनी “सतत त्यांच्या सद्य अनुभवाचे वर्णन प्रेम म्हणून केले!” तथापि, आज ना उद्या यातील अनेकजण सद्य प्रकरणांनाही गत काळातील प्रकरणांप्रमाणेच—निव्वळ दिवानगी म्हणूनच समजतील.

दुःखाची गोष्ट अशी, की दर वर्षी हजारो जोडपी ‘प्रेमात असण्याच्या’ भ्रमात राहून विवाह करतात पण अल्पावधीतच आपण गंभीर चूक केल्याचे त्यांच्या निदर्शनास येते. दिवानेपणामुळे “भोळेभाबडे स्त्री-पुरुष कापले जाणाऱ्‍या मेंढरांप्रमाणे विवाहात भुलविले जातात,” असे रे शॉर्ट यांनी लैंगिक संबंध, प्रेम की दिवानेपण (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात म्हटले.

“जो आपल्या मनावर भरवसा ठेवितो तो मूर्ख.” (नीतिसूत्रे २८:२६) पुष्कळदा, आपल्या अंतःकरणाचा निर्णय चुकीचा किंवा फसवा असतो. खरे पाहता, बायबल म्हणते: “हृदय [मन] सर्वात कपटी आहे.” (यिर्मया १७:९) तरीही, वर उल्लेखिलेले नीतिसूत्र पुढे म्हणते: “पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो.” दिवानगी आणि बायबलमध्ये वर्णिलेले प्रेम—अंतर न देणारे प्रेम—यातील फरक जाणल्यास तुम्ही देखील इतर युवकांनी भोगलेले धोके आणि निराशा चुकवू शकता.

प्रेम विरुद्ध दिवानेपण

“दिवानेपण अंध असतं आणि त्यास अंधळेच राहायला आवडतं. त्यास वास्तविकतेकडे पाहायला आवडत नाही,” असे २४ वर्षांचा कॅल्विन म्हणतो. १६ वर्षांच्या केन्याने म्हटले, “तुम्ही एखाद्या व्यक्‍तीवर भाळलात की त्याचं प्रत्येक कृत्य योग्य आहे असंच तुम्हाला वाटतं.”

दिवानेपण हे फसवे प्रेम आहे. ते अवास्तविक आणि आत्म-केंद्रित असते. ‘त्याच्याबरोबर असताना मला मोठेपणा वाटतो. मला झोप येत नाही. हे इतकं आश्‍चर्याचं आहे की मला विश्‍वासच बसत नाही’ किंवा ‘तिच्या सहवासात मला अतिशय छान वाटतं,’ असले उद्‌गार भाळलेल्या व्यक्‍तींकडून सहसा ऐकायला मिळतात. यात कितीवेळा “मला” असा उल्लेख आला आहे? स्वार्थीपणावर उभारलेला नातेसंबंध ढासळणार हे निश्‍चित! तथापि, खऱ्‍या प्रेमाविषयी बायबलचे वर्णन पाहा: “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही.”—१ करिंथकर १३:४, ५.

प्रेम “स्वार्थ पाहत” नसल्यामुळे बायबल तत्त्वांवर आधारित असलेले प्रेम आत्म-केंद्रित किंवा स्वार्थीही नसते. हे खरे की, एखाद्या जोडप्याला एकमेकांबद्दल तीव्र प्रणय भावना आणि आकर्षण असेल. पण समंजसपणा आणि दुसऱ्‍या व्यक्‍तीबद्दल गाढ आदर यांद्वारे यांमध्ये समतोल साधला जाऊ शकतो. तुम्ही खरोखरच प्रेमात पडता तेव्हा स्वतःप्रमाणेच दुसऱ्‍या व्यक्‍तीचे हित आणि आनंद या गोष्टींची तुम्हाला कदर वाटते. भारावून टाकणाऱ्‍या भावनेमुळे तुम्ही उत्तम निर्णयशक्‍ती नष्ट करत नाही.

खऱ्‍या प्रेमाचे उदाहरण

याकोब आणि राहेलचा बायबल अहवाल याचे हुबेहूब वर्णन देतो. हे जोडपे एका विहिरीजवळ भेटले जेथे राहेल आपल्या पित्याच्या मेंढरांना पाणी पाजावयास आली होती. “राहेल बांध्याने सुरेख व दिसावयास सुंदर होती” म्हणूनच नव्हे तर ती यहोवाची उपासक होती म्हणून याकोब तिला पाहून लागलीच आकर्षित झाला.—उत्पत्ति २९:१-१२, १७.

एक संपूर्ण महिना राहेलच्या घरात राहिल्यावर त्याने राहेलवर आपले प्रेम असल्याचे आणि विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. केवळ रोमँटिक दिवानगी? मुळीच नाही! त्या एका महिन्यात त्याने राहेलला स्वाभाविक रूपात—ती आपल्या पालकांशी आणि इतरांशी कसा व्यवहार करी, गुरे राखण्याचे काम कसे करी, यहोवाच्या उपासनेस किती गांभीर्य देत असे हे सर्व पाहिले. निःसंशये, त्याने तिच्यातले “गुण” आणि “दुर्गुण” दोन्ही निरखले. यास्तव, तिच्यावरील त्याचे प्रेम अनियंत्रित वासना नसून समंजसपणा आणि गाढ आदर यांवर आधारलेले निःस्वार्थ प्रेम होते.

यामुळे, तिला पत्नी म्हणून प्राप्त करण्यासाठी तो तिच्या वडिलांकडे सात वर्षे काम करायला तयार होता हे तो सांगू शकला. निश्‍चितच, कोणतीही दिवानगी तितका काळ टिकू शकली नसती! फक्‍त खरे प्रेम, दुसऱ्‍याबद्दल निःस्वार्थ आस्था यांमुळेच ती वर्षे त्याला “केवळ थोड्या दिवसांसारखी” भासली असतील. खरे प्रेम असल्यामुळे, त्या काळादरम्यान ते आपली शुद्धता टिकवू शकले.—उत्पत्ति २९:२०, २१.

त्याला वेळ लागतो!

म्हणून खरे प्रेम वेळेमुळे ढळत नाही. अर्थात, कोणाविषयीच्या तुमच्या भावनांचे परीक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे थोडा वेळ जाऊ देणे. शिवाय, अस्मिता नामक एका युवतीने निरीक्षण केल्यानुसार: “एखादी व्यक्‍ती, ‘हे पाहा मी असा आहे. आता माझ्याविषयी तुला सगळं माहीत आहे’ असे म्हणून तुमच्यासमोर त्याचे व्यक्‍तिमत्त्व मांडत नाही.” नाही, तुम्हाला पसंत असलेल्या व्यक्‍तीला जाणून घेण्यास वेळ तर लागतोच.

वेळेमुळे तुमच्या प्रणय भावनेचे परीक्षण बायबलच्या दृष्टिकोनातून करण्यासही वाव मिळतो. लक्षात असू द्या, प्रेम “गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही.” तुमचा साथीदार तुमच्या योजना सफल व्हाव्यात म्हणून उत्सुक आहे का—की त्याला अथवा तिला केवळ स्वतःचीच चिंता आहे? तुमचे विचार, तुमच्या भावना यांबद्दल तो अथवा ती योग्य आदर प्रदर्शित करतो/करते का? त्याने अथवा तिने स्वार्थी वासना तृप्त करण्यासाठी “गैरशिस्त” वागण्याची तुमच्यावर जबरदस्ती केली आहे का? ही व्यक्‍ती तुम्हाला इतरांसमोर टाकून बोलते की तुमची प्रशंसा करते? असे हे प्रश्‍न, अधिक वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून आपल्या भावनांचा अंदाज लावायला तुमची मदत करतील.

घाईघाईचा रोमांस आपत्तीस आमंत्रण देतो. “मी लवकरच प्रेमात आकंठ बुडाले,” असे २० वर्षांची जिल म्हणते. दोन महिने रोमांसने झपाटल्यानंतर तिने विवाह केला. पण मग, आधी झाकून ठेवलेले दोष वर येऊ लागले. जिल तिचा असुरक्षितपणा आणि आत्म-केंद्रित प्रवृत्ती प्रदर्शित करू लागली. तिचा पती, रिक आधीसारखा आकर्षक राहिला नाही आणि तो स्वार्थी बनला. विवाहाच्या सुमारे दोन वर्षांनी, जिल आपल्या पतीवर खेकसून म्हणाली की तो “घृणास्पद,” “आळशी” आणि “नालायक” आहे. रिकने बदल्यात तिच्या थोबाडीत एक लगावून दिली. ढळाढळा अश्रू गाळीत जिल घरातून—आणि विवाहातून चालती झाली.

बायबलचा सल्ला अनुसरल्याने त्यांना निश्‍चितच आपला विवाह टिकवून ठेवण्यास मदत मिळाली असती. (इफिसकर ५:२२-२३) पण विवाहाआधी त्यांनी एकमेकांचा परिचय करून घेतला असता तर सर्वकाही कसे सुरळीत पार पडले असते! त्यांचे प्रेम कोणा “प्रतिमेकरता” नव्हे तर वैगुण्ये आणि क्षमतांसहित खऱ्‍या व्यक्‍तिमत्त्वाकरता असले असते. त्यांच्या अपेक्षा आणखी वास्तविक असल्या असत्या.

खरे प्रेम एका रात्रीत विकसित होत नाही. त्याचप्रमाणे, उत्तम वैवाहिक सोबती बनणारी व्यक्‍ती अतिशय रूपवान असेल असे काही नाही. उदाहरणार्थ, बार्बरा असे कबूल करते की तिला भेटलेला एक तरुण सुरवातीला इतका काही आकर्षक वाटला नव्हता. “पण माझा त्याच्याशी परिचय होत गेला तसं,” बार्बरा म्हणते “सर्वकाही बदललं. स्टीफनला इतरांबद्दल किती काळजी वाटायची आणि स्वतःच्या हितांपुढे तो इतरांचे हित कसं पाहायचा ते मी निरखलं. या गुणांमुळे तो एक चांगला पती बनेल हे मला ठाऊक होतं. मला तो आवडू लागला आणि त्याच्यावर मी प्रेम करू लागले.” परिणामस्वरूप, आनंदी विवाह निष्पन्‍न झाला.

म्हणून तुम्ही खरे प्रेम कसे ओळखू शकता? तुमचे मन कदाचित काही सांगेल पण तुमच्या बायबल प्रशिक्षित बुद्धीवर भरवसा करा. त्या व्यक्‍तीच्या बाह्‍य ‘प्रतिमेपेक्षा’ त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या नातेसंबंधाला बहरण्यास वेळ द्या. लक्षात ठेवा, दिवानेपण अल्पावधीत उफाळून टोकाला पोहंचते पण मग ते ओझरते. खरे प्रेम, वेळ उलटतो तसतसे वाढत जाते आणि मग ते “पूर्णता करणारे बंधन” बनते.—कलस्सैकर ३:१४.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ एखाद्याचे स्वरूप पाहून त्याच्या प्रेमात पडण्यामध्ये कोणता धोका आहे?

◻ खरे प्रेम ओळखण्याकरता तुमच्या मनावर भरवसा केला जाऊ शकतो का?

◻ प्रेम आणि दिवानेपण यातील काही फरक कोणते आहेत?

◻ संकेतभेटी करणारी जोडपी सहसा अलग का होतात? हे नेहमीच चुकीचे असते का?

◻ रोमांसचा अंत झाल्यावर, तुम्हाला टाकून दिले आहे या भावना तुम्ही कशा सहन करू शकता?

◻ एकमेकांचा परिचय करून घेण्यासाठी अवधी जाऊ देणे महत्त्वाचे का आहे?

[२४२ पानांवरील संक्षिप्त आशय]

तुम्ही व्यक्‍तीच्या प्रेमात पडला आहात की केवळ ‘प्रतिमेच्या?’

[२४७ पानांवरील संक्षिप्त आशय]

“दिवानेपण अंध असतं आणि त्यास अंधळेच राहायला आवडतं. त्यास वास्तविकतेकडे पाहायला आवडत नाही.”—२४ वर्षांचा एक तरुण

[२५० पानांवरील संक्षिप्त आशय]

मी आता फक्‍त ‘कसा आहेस?’ विचारण्यापुरताच संबंध ठेवू शकते. मी कोणालाही माझ्यासोबत घनिष्ट नातं ठेवू देत नाही

[२४८, २४९ पानांवरील चौकट/चित्र]

प्रेमभंगातून मी कसे सावरू शकतो?

तुम्ही याच व्यक्‍तीशी विवाह करणार हे निश्‍चित असते. तुम्हाला एकमेकांची संगत आवडते, तुमच्या समान आवडीनिवडी असतात आणि तुम्हाला एकमेकांबद्दल आकर्षणही वाटते. मग अचानक, तुमचा हा नातेसंबंध संपुष्टात येतो, तळपायाची आग मस्तकात पोहंचते—किंवा हतबल झाल्यासारखे तुमच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतात.

प्रेमाचे रसायनशास्त्र (इंग्रजी) या पुस्तकात डॉ. मायकल लिबोविट्‌झ, प्रेमाच्या उफाळ्यांची तुलना शक्‍तिशाली मादक पदार्थाच्या नशेसोबत करतात. पण मादक पदार्थाप्रमाणेच, अशाप्रकारचे प्रेम संपुष्टात आले तर ‘व्यसननिवृत्ती लक्षणे’ उद्‌भवू शकतात. मग, ते प्रेम दिवानेपण असो अथवा ‘खरे’ असो. दोन्हींमुळे मुग्ध करणारी नशा चढू शकते—किंवा नातेसंबंध संपुष्टात आल्यावर अत्यंत पीडादायक निराशा संभवू शकते.

नातेसंबंध तुटल्यावर त्याग, दुःख आणि कदाचित संतापाच्या भावनांमुळे भवितव्याबद्दलचा तुमचा दृष्टिकोन बिघडू शकतो. एक तरुणी स्वतःचे वर्णन “घायाळ” असे करते कारण तिला धोका देण्यात आला होता. “मी आता [विरुद्धलिंगी व्यक्‍तीला] फक्‍त ‘कसा आहेस?’ विचारण्यापुरताच संबंध ठेवू शकते. मी कोणालाही माझ्यासोबत घनिष्ट नातं ठेवू देत नाही.” एका नातेसंबंधात, जितकी अधिक वचनबद्धता असते, तितकेच तीव्र दुःख, प्रेमभंग झाल्यावर होते.

होय, तुम्हाला वाटेल त्या व्यक्‍तीशी प्रणयाराधन करण्याची फारच मोठी किंमत असते: नाकारले जाण्याची खरी शक्यता. खरे प्रेम वाढेल याची कोणतीही खात्री नसते. म्हणून, कोणी तुम्हासोबत प्रामाणिक हेतूंनी प्रणयाराधन करू लागले पण नंतर मात्र त्याने विवाह करणे सुज्ञपणाचे ठरणार नाही असा निष्कर्ष काढला तर तो तुमच्यासोबत अनुचित व्यवहार झाला आहे असे नाही.

समस्या अशी आहे की, कितीही चातुर्याने आणि चांगुलपणाने प्रेमभंगाचा प्रसंग हाताळला तरीही वाटायचे ते दुःख वाटणारच आणि नाकारल्याचे जाणवणारच. तथापि, यामुळे स्वाभिमान गमावण्याची गरज नाही. तुम्ही या व्यक्‍तीच्या नजरेत “योग्य” नव्हता याचा अर्थ तुम्ही दुसऱ्‍या कोणा व्यक्‍तीच्या नजरेत योग्य ठरणार नाहीत असा होत नाही!

संपुष्टात आलेल्या या रोमांसचा शांतवृत्तीने विचार करण्याचा प्रयत्न करा. कदाचित या प्रेमभंगामुळे—भावनिक अपरिपक्वता, अनिर्णायकपणा, तडजोड न करण्याची वृत्ती, अधीरता, तुमच्या भावनांबद्दल अविचारीपणा—अशा या तुमच्या प्रियकराच्या त्रुटी उजेडात येतील. अशाप्रकारचे गुण एखाद्या विवाहसोबत्यासाठी मुळीच इष्ट नसतील.

हा प्रेमभंग पूर्णतः एकतरफी आहे आणि विवाह सुरळीत चालला असता अशी खात्री तुम्हाला असल्यास काय? निश्‍चितच तुमचे विचार दुसऱ्‍या व्यक्‍तीला कळवायचा हक्क तुम्हाला आहे. कदाचित फक्‍त काही गैरसमज झाले असतील. भावनिक होऊन आरडाओरड केल्याने आणि खेकसल्याने काहीएक साध्य होत नाही. तसेच, तो अथवा ती अलग होण्याचा आग्रहच करत असेल तर ज्या व्यक्‍तीला तुमच्याविषयी काही भावना नाहीतच अशा व्यक्‍तीसमोर हात पाय जोडून, अश्रू गाळून प्रेमाची याचना करण्याची काही गरज नाही. “शोधण्याचा समय व गमावण्याचा समय” असतो असे शलमोन म्हणाला.—उपदेशक ३:६.

खरे म्हणजे, विवाह करण्याची प्रामाणिक इच्छा नसलेल्या व्यक्‍तीने केवळ तुमचा उपयोग करून घेतला आहे अशी शंका बाळगण्यास तुम्हाकडे ठोस कारण असल्यास काय? तुम्हाला बदला घेण्याची काहीएक गरज नाही. त्याचा अथवा तिचा फसवेपणा देवाच्या नजरेतून चुकलेला नाही याची खात्री बाळगा. त्याचे वचन म्हणते: “निर्दय स्वतांवर संकट आणितो.”—नीतिसूत्रे ११:१७; पडताळा नीतिसूत्रे ६:१२-१५.

वेळोवेळी एकाकीपणा किंवा रोमँटिक आठवणी कदाचित तुम्हाला पीडित करत असतील. तसे असल्यास, मनसोक्‍त रडणे केव्हाही चांगले. तसेच एखाद्या कामात दंग होणे, कदाचित शारीरिक कार्यहालचालीत किंवा ख्रिस्ती सेवेत दंग राहिल्यानेही मदत मिळू शकते. (नीतिसूत्रे १८:१) आपले मन आनंदी आणि उभारणीकारक गोष्टींवर लावा. (फिलिप्पैकर ४:८) एखाद्या घनिष्ट मित्राला तुमच्या समस्या सांगा. (नीतिसूत्रे १८:२४) स्वतंत्र राहण्याइतके तुम्ही मोठे झाला असला, तरी तुमचे पालकही कदाचित पुष्कळ सांत्वन देतील. (नीतिसूत्रे २३:२२) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवाजवळ मन मोकळे करा.

आता तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या काही गुणांबाबत सुधारणा करण्याची गरज तुम्हाला दिसून येईल. विवाहसोबती कसा असावा याबद्दलची तुमची कल्पना आता आधीपेक्षा अधिक स्पष्ट झाली असेल. त्याचप्रमाणे, प्रेम करणे व गमावणे या दोहोंचा अनुभव घेतला असून इष्ट व्यक्‍ती भेटली तर कदाचित अधिक सुज्ञपणे तुम्ही प्रणयाराधन कराल—अशी इष्ट व्यक्‍ती भेटण्याची शक्यता तुम्ही विचार करता त्यापेक्षा कदाचित अधिक असेल.

[Chart on page 245]

हे प्रेम आहे की दिवानेपण?

प्रेम दिवानेपण

१. दुसऱ्‍या व्यक्‍तीचे १. ते स्वार्थी, संकुचित असते.

निःस्वार्थपणे हित पाहणे एखाद्याचा असा विचार असतो,

‘यातून मला काय प्राप्त होते?’

२. रोमांस रंगात यायला २. रोमांस लगेच सुरू होतो,

वेळ लागतो कदाचित महिने कदाचित काही तासांत

अथवा वर्षे लागतात किंवा दिवसांत

३. दुसऱ्‍या व्यक्‍तीचे संपूर्ण ३. तुम्हाला दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या

व्यक्‍तिमत्त्व आणि आध्यात्मिक शारीरिक स्वरूपाचे अतिशय

गुण पाहून तुम्ही आकर्षण वाटते अथवा त्याबद्दलच

आकर्षित होता रस असतो. (‘त्याचे डोळे किती

स्वप्नील आहेत.’ तिचा बांधा किती

सुडौल आहे’)

४. त्याचा परिणाम हा की ४. नाशकारक, दुरावस्था

तुम्ही चांगली व्यक्‍ती बनता घडविणारा परिणाम

५. तुम्ही एकमेकांना वास्तविक ५. अवास्तविक असते. दुसरी

दृष्टिकोनातून पाहता, त्याच्या व्यक्‍ती परिपूर्ण भासते.

अथवा तिच्या चुका पाहता व्यक्‍तिमत्त्वातील गंभीर

तरीही त्याच्यावर प्रेम करता दोषांविषयीच्या चिंतादायक

शंकांकडे दुर्लक्ष केले जाते

६. तुमच्यामध्ये मतभेद होतात ६. वादविवाद वारंवार होत

पण मसलत करून तुम्ही असतात. कोणताच मार्ग

आपापसांत ते मिटवू शकता निघत नसतो. पुष्कळशा

वादविवादातून चुंबनाद्वारे

“मार्ग” काढला जातो

७. दुसऱ्‍या व्यक्‍तीला द्यावेसे ७. घेणे किंवा प्राप्त करणे

आणि सामील करावेसे वाटते यावर जोर दिला जातो

विशेषतः कामेच्छा तृप्त

करण्याच्या बाबतीत

[२४४ पानांवरील चित्र]

रूपवान पण तारतम्यहीन स्त्री अथवा पुरुष म्हणजे, “डुकराच्या नाकांत जशी सोन्याची नथ”

[२४६ पानांवरील चित्र]

इतरांसमोर सतत तुमचा अपमान करत असलेल्या व्यक्‍तीला निश्‍चितच तुमच्याबद्दल खरे प्रेम नसेल