व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मला मोहातून कसे सावरता येईल?

मला मोहातून कसे सावरता येईल?

अध्याय २८

मला मोहातून कसे सावरता येईल?

युवकांसाठी असलेल्या एका नियतकालिकाने लिहिले, “अनेक किशोरवयीनांच्या बाबतीत फिदा होणे सर्दीपडशांप्रमाणे सर्वसामान्य आहे.” सहसा सर्वच युवक या स्थितीतून गुजरतात आणि त्यांचा स्वाभिमान व विनोदबुद्धी तशीच्या तशीच राहून जवळजवळ सर्वचजण प्रौढत्वात यशस्वीपणे पदार्पण करतात. तथापि, तुम्ही कोणावर तरी भुलता तेव्हा ती हास्यास्पद गोष्ट नसते. एक युवक आठवून सांगतो, “मी निराश झालो होतो कारण मी काहीच करू शकत नव्हतो. ती माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे हे मला ठाऊक होतं पण मला ती खूप आवडायची. मी भानावरच नव्हतो.”

फिदा होण्याचे पृथक्करण

कोणाबद्दल तीव्र भावना असणे काही पाप नाही—अर्थात त्या अनैतिक किंवा अनुचित (म्हणजेच कोणा विवाहित व्यक्‍तीबद्दल) नसल्या तरच. (नीतिसूत्रे ५:१५-१८) तथापि, तरुण असताना तुमच्या विचारांवर आणि कृतींवर सहसा ‘तरुणपणाच्या वासनांचे’ वर्चस्व असते. (२ तीमथ्य २:२२) तारुण्यामुळे निर्माण झालेल्या नवीन आणि तीव्र वासनांवर नियंत्रण राखायला शिकत असताना एखाद्या युवकामध्ये प्रणय भावना उसळत असतील—पण त्या व्यक्‍त करायला कोणीच नसेल.

शिवाय, “मुलांच्या तुलनेत मुली लवकर मानसिकरित्या स्थिर होतात आणि लोकांमध्ये मिसळू लागतात.” परिणामस्वरूप, “शिक्षकांच्या” किंवा त्यांच्यापेक्षा इतर मोठ्या, असाध्य पुरुषांच्या तुलनेत “आपल्या वर्गातील मुले त्यांना प्रौढ आणि आकर्षक वाटत नाहीत.” (सेवेंटीन नियतकालिक) म्हणून, आवडता शिक्षक, पॉप सिंगर किंवा वयाने मोठी असलेली दुसरी परिचयाची व्यक्‍ती “आदर्श” पुरुष आहे अशी कल्पना मुलगी करू लागते. मुले देखील अशाचप्रकारे दिवाने होतात. तथापि, अशा दूरच्या व्यक्‍तींबद्दल वाटणारे प्रेम वास्तव असण्यापेक्षा स्पष्टतः काल्पनिकच असते.

फिदा होणे—ते हानीकारक का असू शकते

सहसा, हे फिदा होणे काही जास्त काळ टिकत नसले तरीही एखाद्या युवकाला त्यामुळे पुष्कळ हानी होऊ शकते. एक कारण असे, की किशोरांना प्रिय असलेल्या अनेक वस्तू महत्त्व देण्याच्या पात्रतेच्या नसतात. एका सुज्ञ पुरुषाने म्हटले: “मूर्खत्व अति प्रतिष्ठित स्थानी स्थापीत होते.” (उपदेशक १०:६) यास्तव, एखाद्या गायकाचा मधूर आवाज किंवा उल्लेखनीय सौंदर्य असल्यामुळे त्याला आदर्श मानले जाते. परंतु, त्याची नीतिमूल्ये स्तुत्य असतात का? किंवा समर्पित ख्रिस्ती या नात्याने तो किंवा ती “प्रभूमध्ये” आहेत का?—१ करिंथकर ७:३९.

बायबल अशीही ताकीद देते: “जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे.” (याकोब ४:४) देव जिचे वर्तन तुच्छ लेखत असेल अशा व्यक्‍तीवर भाळल्याने देवासोबतची तुमची मैत्री धोक्यात येणार नाही का? त्याचप्रमाणे, बायबल अशी आज्ञा करते, “स्वतःस मूर्तीपासून दूर राखा.” (१ योहान ५:२१) कोणी युवक कोणा गायकाच्या चित्रांनी आपली संपूर्ण खोली भरून टाकतो तेव्हा तुम्ही यास काय म्हणाल? त्याला “मूर्तिपूजा” हा शब्द शोभणार नाही का? मग अशाने देव संतुष्ट होईल हे कसे शक्य आहे?

काही युवक तर आपल्या कारणमीमांसेवर कल्पनातरंगांचे वर्चस्व असण्यास वाव देतात. एक तरुणी म्हणते: “त्याला माझ्याबद्दल काय वाटतं हे मी त्याला कधीही विचारलं तर—त्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही असंच तो नेहमी म्हणतो. पण त्याच्या बघण्यावरून आणि वागण्यावरून मी सांगू शकते की ते खरं नाही.” त्या तरुणाने आपली नावड विनयशीलतेने सांगण्याचा प्रयत्न केलेला असूनही ती त्याचा नकार मान्य करायला तयार नाही.

सुप्रसिद्ध पॉप सिंगरवर भाळलेली आणखी एक मुलगी लिहिते: ‘त्याने माझा प्रियकर बनावा ही माझी इच्छा आहे आणि ते खरं व्हावं म्हणून मी प्रार्थना सुद्धा केलीय! त्याचा अल्बम जवळ घेऊन मी झोपायचे कारण तेवढीच मी त्याच्या जवळ जाऊ शकत होते. आता माझी स्थिती अशी आहे की, मी त्याला प्राप्त करू शकले नाही, तर मी आत्महत्या करीन.’ जो देव आपल्याला “मर्यादेने” त्याची सेवा करण्यास आज्ञा देतो त्याला अशाप्रकारची अनुचित आसक्‍ती संतोषविणारी असेल का?—रोमकर १२:३.

नीतिसूत्रे १३:१२ येथे बायबल म्हणते: “आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते.” यास्तव, अशक्य असलेल्या नातेसंबंधाबद्दल प्रणय आशा करू लागणे अहितकर, एक-तरफी प्रेम आहे जे “अवसाद, चिंता आणि सामान्य दुखणी . . . निद्रानाश किंवा आळस, छातीत दुखणे किंवा दम लागणे” यांस कारणीभूत ठरते असे डॉक्टर सांगतात. (पडताळा २ शमुवेल १३:१, २.) एका मुलावर भाळलेली मुलगी म्हणते: “मला भूक लागत नाही. . . . माझं अभ्यासात लक्ष लागत नाही. मी . . . दिवस न्‌ रात्र त्याचेच स्वप्न पाहत असते. . . . मी अतिशय त्रासलेल्या स्थितीत आहे.”

कल्पनातरंगास तुमच्या जीवनावर वर्चस्व करू दिल्याने तुम्ही किती दुरावस्था करून घेता याचा विचार करा. डॉ. लॉरेन्स बॉमन असे निरीक्षण करतात की, जास्त काळ न टिकणाऱ्‍या या फिदा होण्याची पहिली लक्षणे म्हणजे, “शाळेच्या अभ्यासात धीमे होणे.” आणखी दुसरा परिणाम म्हणजे, मित्र-कुटुंबियांपासून दुरावणे. पुष्कळदा पाणउतारा देखील होऊ शकतो. “मला हे मान्य करायला लाज वाटते, पण जूडीवर मी जेव्हा फिदा झालो होतो तेव्हा अगदी मूर्खासारखा वागलो होतो,” असे लेखक गिल श्‍वाट्‌र्झ म्हणतात. ही आशिकी संपल्यावर पुष्कळ काळानंतरही, कोणामागे लागणे, लोकांसमोर तमाशा करणे आणि एकंदर, स्वतःचीच फसवणूक करणे या आठवणी तशाच राहू शकतात.

वास्तविकतेला तोंड देणे

पृथ्वीवरील सर्वात सुज्ञ मनुष्य, राजा शलमोन, एका मुलीवर भाळला होता जिने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्याने तिच्यावर इतक्या सुंदर कविता रचल्या की तशा आजपर्यंत कोणीही लिहिल्या नसतील; त्यात तो तिला “चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी निर्मळ” म्हणतो—पण सगळे व्यर्थ!—गीतरत्न ६:१०.

तथापि, शलमोनाने तिची मनधरणी करण्याचे प्रयत्न सरतेशेवटी सोडून दिले. तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा आपल्या भावनांवर नियंत्रण कसे मिळवू शकता? “जो आपल्या मनावर भरवसा ठेवितो तो मूर्ख,” असे बायबल म्हणते. (नीतिसूत्रे २८:२६) तुम्ही प्रणयाच्या कल्पनाविश्‍वात गुरफटले जाता तेव्हा हे विशेषकरून खरे ठरते. परंतु, “जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो.” याचाच अर्थ, सर्व गोष्टींबद्दल वास्तविक दृष्टिकोन बाळगला पाहिजे.

“उचित आणि निराधार आशा यातील फरक कसा करता येईल?” असे डॉ. होवर्ड हॅल्पर्न विचारतात. “काळजीपूर्वक आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून वास्तविकतांकडे पाहण्याद्वारे.” या गोष्टींचा विचार करा: “या व्यक्‍तीसोबत खरा प्रेमसंबंध निर्माण होण्याची किती शक्यता आहे? ती एखादी सुप्रसिद्ध व्यक्‍ती असल्यास, तुम्ही कदाचित तिला कधी भेटणारही नाही! त्याचप्रमाणे, शिक्षकासारखी वयाने मोठी असलेली कोणी व्यक्‍ती असल्यास शक्यता तितक्याच विरळ आहेत.

शिवाय, तुम्हाला पसंत असलेल्या व्यक्‍तीने आतापर्यंत तुमच्यामध्ये काही आस्था प्रदर्शित केली आहे का? नसल्यास, भवितव्यात सगळे काही बदलेल असा विश्‍वास करण्याचे एखादे खरे कारण आहे का? की, त्याच्या अथवा तिच्या प्रांजळ शब्दांतून आणि कृतीतून तुम्ही प्रेमभाव असल्याचा अर्थ काढत आहात? अनेक राष्ट्रांमध्ये पुरुषांनी प्रणयचेष्टा करण्यात पुढाकार घेण्याची रीत असते. एखादी तरुणी, कोणा इच्छा नसलेल्या व्यक्‍तीच्या हात धुऊन मागे लागल्यास ती स्वतःची नालस्ती करून घेऊ शकते.

शिवाय, त्या व्यक्‍तीने चक्क प्रतिसाद दिल्यास तुम्ही काय कराल? तुम्ही वैवाहिक जबाबदाऱ्‍या उचलण्यास तयार आहात का? नसल्यास, हवेत मनोरे बांधण्याचे सोडून देऊन “आपल्या मनातून खेद दूर” करा. “प्रेम करण्याचा समय” असतो आणि तो कदाचित काही वर्षांनंतर म्हणजेच तुम्ही मोठे झाल्यावर येईल.—उपदेशक ३:८; ११:१०.

भावनांचे परीक्षण करणे

डॉ. चार्ल्स जॅस्ट्रो असे निरीक्षण करतात: “फिदा झालेल्या व्यक्‍तीला तो किंवा ती ‘सर्वोत्तम प्रियकर/प्रेयसी’ म्हणून आदर्श समजतात तेव्हा मात्र हे दिवानेपण असते; म्हणजेच, एखाद्या सोबत्यामध्ये जे गुण असायला हवेत ते सर्व त्या व्यक्‍तीमध्ये आहेत असा ते निष्कर्ष काढतात.” तथापि, अशा प्रकारचा “उत्कृष्ट प्रियकर/प्रेयसी” कोणीच नसते. “कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत,” असे बायबल म्हणते.—रोमकर ३:२३.

म्हणून स्वतःला प्रश्‍न विचारा: ज्या व्यक्‍तीवर माझं मन जडलंय तिला मी खरोखर किती चांगल्यारितीने ओळखतो? मी एखाद्या प्रतिमेच्या प्रेमात पडलोय का? या व्यक्‍तीमधील वैगुण्यांकडे मी डोळेझाक करत आहे का? तुमच्या स्वप्नातल्या प्रियाकडे फक्‍त एकदाच वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहणे तुम्हाला तुमच्या रोमँटिक खुळातून शुद्धीवर आणण्यास पुरेसे आहे! या व्यक्‍तीबद्दल तुम्हाला जे प्रेम वाटते त्याचे परीक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे. लेखिका कॅथी मॅकॉय म्हणतात: “अपरिपक्व प्रेम क्षणात निर्माण होऊ शकतं आणि क्षणात नाहीसं होऊ शकतं . . . यात, स्वतःवर लक्ष केंद्रित असतं आणि आपण प्रेमात पडलोय या कल्पनेच्याच प्रेमात तुम्ही पडलेले असता . . . अपरिपक्व प्रेम निरंतर सहवासासाठी आसुसलेले, हव्यासी आणि ईर्ष्यावान असतं. . . . अपरिपक्व प्रेम परिपूर्णतेची अपेक्षा करतं.”—१ करिंथकर १३:४, ५ यातील फरक पडताळा.

त्याला किंवा तिला विसरून जाणे

पण कितीही कारणमीमांसा केली तरीही तुम्हाला विसरून जाणे कठीणच वाटते हे मान्य आहे. पण तुम्ही या समस्येत भर टाकण्याचे टाळू शकता. उत्तेजक रोमांस कादंबऱ्‍या वाचणे, टीव्हीवरील प्रेमकथा पाहणे किंवा नुसते विशिष्ट प्रकारचे संगीत ऐकल्यानेही एकाकीपणाच्या भावना तीव्र होऊ शकतात. म्हणून अशा स्थितीचा विचार करत बसू नका. “सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो.”—नीतिसूत्रे २६:२०.

काल्पनिक रोमांस, तुमच्यावर खरेच प्रेम करणाऱ्‍या आणि तुमची काळजी घेणाऱ्‍या व्यक्‍तीची जागा घेऊ शकत नाही. ‘फटकून राहू’ नका. (नीतिसूत्रे १८:१) तुमचे पालक अतिशय मदतदायी आहेत हे कदाचित तुम्हाला प्रत्ययास येईल. आपल्या भावना लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, काहीतरी भानगड आहे असे कदाचित त्यांनी ओळखूनही घेतले असेल. त्यांच्याकडे जाऊन आपले चित्त त्यांना का देऊ नये? (पडताळा नीतिसूत्रे २३:२६.) एखादा प्रौढ ख्रिस्ती देखील कदाचित कान देईल.

“नेहमी काही ना काही करण्यात दंग असा,” असे किशोर लेखिका एस्तेर डेवीडोवीट्‌झ आर्जवतात. एखादा छंद जोपासा, व्यायाम करा, भाषा शिकू लागा, बायबलमधील संशोधन करण्याचा प्रकल्प हाती घ्या. उपयुक्‍त कार्यहालचालींमध्ये गर्क असल्याने सतावणाऱ्‍या भावना पुष्कळ कमी होऊ शकतात.

फिदा झाल्यानंतर सावरणे सोपे नाही. पण कालांतराने दुःख कमी होईल. तुम्ही स्वतःविषयी आणि आपल्या भावनांविषयी पुष्कळ काही शिकून घेतले असेल आणि भवितव्यात कधी खरे प्रेम झालेच तर कसे वागावे याकरता तुमची चांगली तयारी झालेली असेल! पण ‘खरे प्रेम’ असल्याचे तुम्ही कसे ओळखणार?

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ युवकांमध्ये फिदा होणे इतके सर्वसामान्य का आहे?

◻ सहसा कोणावर किशोरावस्थेतील रोमँटिक कल्पनातरंग केंद्रित असतात आणि का?

◻ फिदा होणे हानीकारक का असू शकते?

◻ या मोहातून सावरण्यासाठी एखादा युवक काय करू शकतो?

◻ प्रणयाच्या कल्पनातरंगात भर घालण्याचे एखादा युवक कसे टाळू शकतो?

[२२३ पानांवरील संक्षिप्त आशय]

‘मला भूक लागत नाही. माझं अभ्यासात लक्ष लागत नाही. मी दिवस न्‌ रात्र त्याचेच स्वप्न पाहत असते. मी अतिशय त्रासलेल्या स्थितीत आहे’

[२२० पानांवरील चित्र]

वयाने मोठ्या, असाध्य विरुद्धलिंगी व्यक्‍तींवर भुलणे अतिशय सामान्य गोष्ट आहे

[२२१ पानांवरील चित्र]

या व्यक्‍तीकडे शांतचित्ताने, वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहिल्यावर तुमच्या रोमँटिक कल्पना दूर होतील