व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मला यशस्वी प्रणयाराधन करता येणे शक्य आहे का?

मला यशस्वी प्रणयाराधन करता येणे शक्य आहे का?

अध्याय ३२

मला यशस्वी प्रणयाराधन करता येणे शक्य आहे का?

“बहुतांश निष्फळ ठरलेले विवाह खरे म्हणजे निष्फळ ठरलेले प्रणयाराधन असते. यावर जितका भर दिला जाईल तितका कमीच आहे,” असे पॉल एच. लँडीस हे कौटुंबिक जीवनविषयक संशोधक म्हणाले. या विधानाच्या अचूकतेसाठी लुईस हमी देऊ शकते. ती म्हणते: “अँडी कसा व्यक्‍ती होता हे जाणून घेण्याआधीच मी त्याच्यावर प्रेम करू लागले ही माझी सर्वात मोठी घोडचूक होती. आमच्या प्रणयाराधनेच्या वेळी आम्ही दोघेच असायचो. म्हणून या ‘आदर्श’ स्थितींबाहेर तो कसा वागतो हे मी कधी पाहिलंच नाही.” त्यांचा विवाह घटस्फोटाने विस्कळीत झाला. अशी दुःखमय घटना टाळण्याचा उपाय? यशस्वी प्रणयाराधन!

संकेतभेटींआधी

“सुज्ञ पुरुष [अथवा स्त्री] आपण कोठे चाललोय हे निरखतो [निरखते] आणि तपासतो [तपासते].” (नीतिसूत्रे १४:१५, द ॲम्प्लिफाईड बायबल) तुमचा परिचय नसलेल्या व्यक्‍तीबद्दल प्रेमभावना जागृत केल्याने विपत्तीस आमंत्रण मिळते—मग ती व्यक्‍ती आकर्षक वाटली तरीही. परिणामस्वरूप, अशा व्यक्‍तीशी तुमचा विवाह होऊ शकतो की ज्यामध्ये तुम्हा दोघांच्या भावना आणि ध्येयांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असेल! म्हणून प्रथम त्या व्यक्‍तीचे चारचौघांत निरीक्षण करणे सुज्ञपणाचे ठरू शकते कदाचित विरंगुळ्याच्या वेळी तुम्ही असे करू शकता.

“मी सुरवातीलाच जास्त जवळीक राखली तर माझ्या भावना माझ्या निर्णयशक्‍तीला झाकून टाकतील हे मला ठाऊक होतं,” असे मनोहरन जो गेल्या दहा वर्षांपासून आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे तो म्हणतो. “म्हणून मी सुंदरीला तिच्या नकळत दूरूनच निरखू लागलो. ती इतरांशी कशी वागते, ती थिल्लर आहे का हे मी पाहू शकलो. असंच इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी करताना तिची परिस्थिती आणि ध्येये मी जाणून घेतली.” त्याचप्रमाणे त्या व्यक्‍तीला ओळखत असलेल्या कोणाशी बोलूनही लोकांचे त्याच्या किंवा तिच्याबद्दल कसे मत आहे हे शोधून काढण्यास मदत मिळते.—पडताळा नीतिसूत्रे ३१:३१.

पहिल्या संकेतभेटी

कोणी व्यक्‍ती तुमच्याकरता इष्ट विवाहसोबती आहे असा निष्कर्ष काढल्यावर त्या व्यक्‍तीकडे जाऊन तिच्याशी सुपरिचित होण्याची इच्छा तुम्ही व्यक्‍त करू शकता. a सकारात्मक प्रतिसाद मिळेल असे गृहीत धरून तुमची पहिली संकेतभेट अतिशय शानदार असण्याची काही गरज नाही. कदाचित कुठे जेवायला जाऊन किंवा समूहांमध्ये सामील होऊनही तुम्हाला हे नाते पुढे वाढवायचे आहे का ते ठरवण्यासाठी एकमेकांशी सुपरिचित होण्यास मदत मिळेल. वातावरण काहीसे अनौपचारिक ठेवल्याने दोघांनाही सुरवातीला वाटणारी अस्वस्थता काही प्रमाणात दूर होऊ शकते. त्याचप्रमाणे, तुमच्यातील कोणा एकाला आस्था राहिली नाही तर आधीच शब्द न देता तुम्ही त्यागले जाण्याच्या—किंवा लाजविणाऱ्‍या—भावना कमी करू शकता.

ही संकेतभेट कोणत्याही प्रकारची असली, तरी वेळेवर जा, जातेवेळी नीटनेटका, उचित पेहराव करून जा. संवादचातुर्य प्रदर्शित करा. लक्षपूर्वक ऐका. (याकोब १:१९) अशा बाबींमध्ये कोणतेही काटेकोर नियम नसले, तरी एखाद्या तरुणाने स्थानीय शिष्टाचार अनुसरावेत. यामध्ये त्या तरुणीसाठी दरवाजा उघडणे किंवा तिला आधी बसू देणे अशाप्रकारचे शिष्टाचार समाविष्ट असू शकतात. एखाद्या तरुणीने, राजकुमारीसारखी वागणूक मिळण्याची अपेक्षा न करता तिच्या सोबत्याच्या प्रयत्नांना शालीनतेने सहयोग देण्यास हवा. एकमेकांना आदर देऊन एखादे जोडपे भवितव्याकरता कित्ता राखू शकतात. ‘अधिक नाजूक व्यक्‍ती म्हणून पत्नीशी सुज्ञतेने सहवास ठेवण्यास’ पतीला आज्ञापिले आहे. त्याचप्रमाणे, “पत्नीने आपल्या पतीची भीड” राखली पाहिजे.—१ पेत्र ३:७; इफिसकर ५:३३.

हात धरणे, चुंबन घेणे किंवा आलिंगन देणे उचित आहे का, आणि असल्यास, कोणत्या प्रसंगी? स्वार्थी कामवासनेने नव्हे तर खरेपणाने प्रेम व्यक्‍त केले जाते तेव्हा अशाप्रकारचा जिव्हाळा शुद्ध आणि उचित असू शकतो. बायबलमधील गीतरत्नाचे पुस्तक दाखवते की, शुलेमकरीण आणि मेंढपाळ मुलगा जो तिचा प्रियकर होता व ज्याच्याशी लवकरच तिचा विवाह होणार होता त्या दोघांमध्ये काही उचित प्रेमभाव व्यक्‍त करण्यात आले होते. (गीतरत्न १:२; २:६; ८:५) पण त्या चारित्र्यवान जोडप्याप्रमाणेच, आपल्यामधील प्रेमभाव अश्‍लील किंवा लैंगिक अनैतिकतेला प्रवृत्त करणारे नसावेत याची खबरदारी एखादे जोडपे घेईल. b (गलतीकर ५:१९, २१) तर्कशुद्धपणे, जेथे परस्पर वचनबद्धता होते आणि विवाह होणार असतो अशाप्रकारच्या नातेसंबंधातच असे प्रेमभाव व्यक्‍त व्हावेत. आत्मसंयम दाखवून यशस्वी प्रणयाराधनेच्या प्राथमिक ध्येयाकडे दुर्लक्ष होण्याचे तुम्ही टाळू शकता, व ते ध्येय म्हणजे . . .

‘अंतःकरणातील गुप्त मनुष्यपण’ ओळखणे

एका संशोधन गटाने, विवाह आणि कुटुंब नियतकालिक (इंग्रजी) या मे १९८० च्या अंकात असे वृत्त दिले: “एकमेकांमधील आंतरिक व्यक्‍तींच्या तुलनात्मकरित्या संपूर्ण जाणीवेसह लोक विवाह करतात तेव्हा असे विवाह टिकण्याची आणि यशस्वी होण्याची अधिक शक्यता असते.” होय, तुमच्या साथीदाराच्या ‘अंतःकरणातील गुप्त मनुष्यपण’ जाणणे महत्त्वपूर्ण आहे.—१ पेत्र ३:४.

तरीही, दुसऱ्‍याच्या अंतःकरणाचे हेतू ‘बाहेर काढण्यास’ परिश्रम आणि समंजसपणा लागतो. (नीतिसूत्रे २०:५) म्हणून तुमच्या साथीदाराचे आंतरिक व्यक्‍तित्व पाहण्यास मदत करतील अशा कार्यहालचालींचे नियोजन करा. सुरवातीला, कदाचित एखाद्या चित्रपटाला जाणे किंवा कॉन्सर्टला जाणे पुरेसे असेल, पण संभाषणास वाव देणाऱ्‍या कार्यहालचालींत (जसे रोलर-स्केटींग, बोलिंग आणि प्राणि-संग्रहालयांना आणि आर्ट-गॅलेरींना भेटी देणे) भाग घेतल्याने एकमेकांशी सुपरिचित होण्यास मदत होईल.

तुमच्या साथीदाराच्या भावनांची झलक मिळण्याकरता सहज प्रश्‍न विचारा जसे की, ‘तुम्ही रिकाम्या वेळात काय करता?’ ‘पैशाची दिक्कत नसती तर तुम्हाला काय करायला आवडलं असतं?’ ‘देवाच्या उपासनेतील कोणता पैलू तुम्हाला जास्त आवडतो? का?’ यांमुळे, तुमच्या साथीदाराकडून मनापासूनचे प्रतिसाद लाभतात ज्यांवरून तुमच्या साथीदाराला कोणती गोष्ट मूल्यवान वाटते हे कळून चुकते.

हे नाते जसे वाढत जाते आणि तुम्ही दोघे गंभीरपणे विवाहाचा विचार करू लागता तशी तुमची नीतिमूल्ये; तुम्ही कोठे व कसे राहाल; आर्थिक बाबी, त्याचप्रमाणे तुम्ही दोघेही नोकरी करणार की नाही; मुले; विवाहामध्ये प्रत्येकाच्या भूमिकेबद्दलच्या कल्पना; आणि तत्काळ व दीर्घकालिन ध्येये व ती साध्य करण्यासाठी तुम्ही काय योजना करता अशा महत्त्वपूर्ण बाबींविषयी गंभीर चर्चा करण्याची गरज असते. अनेक तरुण यहोवाचे साक्षीदार शाळा पूर्ण केल्यावर पूर्ण-वेळेचे सेवक बनतात आणि विवाहानंतरही तशीच सेवा करण्याची इच्छा प्रदर्शित करतात. तुमची आध्यात्मिक ध्येये सुसंगत आहेत का याची खात्री करण्याची वेळ आताच आहे. त्याचप्रमाणे, तुमच्या विवाहावर प्रभाव पाडणाऱ्‍या कदाचित गतकाळातील गोष्टी प्रकट करण्याचाही हाच समय आहे. यामध्ये कोणतेही भारी कर्ज किंवा बाध्यता समाविष्ट होऊ शकतात. आरोग्याविषयी जसे की, एखादा गंभीर रोग आणि त्याचे परिणाम यांविषयी देखील निखालस चर्चा केली पाहिजे.

अशा चर्चांमध्ये, एलीहूचे उदाहरण अनुसरा, जो म्हणाला: “मी थेट अंतःकरणातून आणि प्रामाणिकपणे बोलतो.” (ईयोब ३३:३, द होली बायबल इन द लँग्वेज ऑफ टुडे, विल्यम बेक यांचे) आपल्या प्रणयाराधनेने आनंदी वैवाहिक जीवनास आपल्याला कसे तयार केले याचे स्पष्टीकरण देताना, एस्तेर म्हणाली: “माझे विचार निराळे असायचे तेव्हा मी कधीच ‘चालवून घ्यायचा’ प्रयत्न केला नाही किंवा मी जेसोबत सहमत आहे असे म्हटले नाही. आताही मी तसं करत नाही. मी नेहमी प्रामाणिक असायचा प्रयत्न करते.”

आपल्या सोबत्याला भलतेसलते प्रश्‍न आपण विचारू नयेत या भीतीने नाजुक विषयांकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्या विषयांना क्षुल्लक लेखू नका. बेथने जॉनसोबत प्रणयाराधन करताना ही चूक केली. बेथ म्हणाली, भवितव्यासाठी पैशांची बचत करावी आणि पैसा उधळू नये असे तिचे मत होते. आपण सहमत आहोत असे जॉनने दर्शवले. बेथने पुढे कोणतीच विचारपूस केली नाही आणि पैशांच्या बाबतीत दोघांचे विचार एकच असतील असे गृहीत धरले. पण असे झाले की, भवितव्यासाठी बचत करणे म्हणजे नवीन स्पोट्‌र्स कार खरेदी करण्यासाठी बचत करणे अशी जॉनची कल्पना होती! पैसा कसा खर्च करावा यावरील मतभेद विवाहानंतर दुःखदायकपणे सामोरे आले.

अशा गैरसमजुती टाळता येऊ शकतात. आधी उल्लेखिलेली लुईस आपल्या प्रणयाराधनेचा विचार करून सांगते: “मी पुष्कळ प्रश्‍न विचारायला हवे होते, जसे की, ‘मला दिवस गेले आणि तुम्हाला बाळ नको असेल तर तुम्ही काय कराल?’ किंवा, ‘आपल्यावर कर्ज झालं, आणि मला घरी राहून बाळाची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही कसं चालवाल?’ मी लक्षपूर्वक त्याचा प्रतिसाद ऐकला असता.” अशाप्रकारच्या चर्चा अंतःकरणातील त्या गुणांना वर आणतील ज्या विवाहाआधी दिसून येणे उत्तम असेल.

त्याची किंवा तिची वागणूक पाहा!

“एखादी व्यक्‍ती जेव्हा फक्‍त तुमच्यासोबत असते तेव्हा ती अतिशय चांगल्यारितीने वागू शकते,” असे एस्तेर म्हणाली. “पण दुसरे लोकही असतात तेव्हा बहुधा त्यांना अनपेक्षित स्थितीत टाकले जाऊ शकते. तुमचा कोणी मित्र तुमच्या सोबत्याला असं काही म्हणेल जे त्याला आवडणार नाही. आता तणावाखाली तो कसा प्रतिसाद देतो हे तुम्हाला पाहायला मिळते. तो त्या व्यक्‍तीवर खेकसेल की उपरोधिकपणे बोलेल?” ती शेवटी म्हणते: “प्रणयाराधनेच्या वेळी एकमेकांच्या कुटुंबांसोबत आणि मित्रांसोबत असल्याने पुष्कळ मदत मिळाली.”

मनोरंजनाव्यतिरिक्‍त एकत्र काम करण्यात वेळ घालवा. देव वचनाचा अभ्यास आणि ख्रिस्ती सेवा यांसारख्या ख्रिस्ती कार्यहालचालींमध्ये सामील व्हा. त्याचप्रमाणे, विवाहानंतर ज्या गोष्टी नेहमी कराव्या लागतील अशी दररोजची कामे करा—किराणा मालाची खरेदी, स्वयंपाक, भांडी घासणे आणि घरसफाई. वास्तविक परिस्थितींमध्ये एकत्र असल्याने—मग तुमचा सोबती संतप्त असला तरी—तुम्ही मुखवट्यापलीकडे पाहू शकता.

गीतरत्नामधील मेंढपाळ मुलग्याने, आपल्याला प्रिय असणारी मुलगी निराश असताना किंवा तळपत्या उन्हात राबत असताना—घाम गाळीत आणि थकलेल्या स्थितीत तिला पाहिले. (गीतरत्न १:५, ६; २:१५) त्याचप्रमाणे, धनसंपन्‍न राजा शलमोनाच्या मोहांचा तिने निष्ठेने कसा विरोध केला ते पाहिल्यावर, तो उद्‌गारला: “माझ्या प्रिये, तू सर्वांगसुंदर आहेस; तुझ्यांत काही व्यंग नाही.” (गीतरत्न ४:७) निश्‍चितच ती परिपूर्ण होती असा त्याचा अर्थ नव्हता तर तिच्यात मूलतः कोणतीही नैतिक न्यूनता किंवा कलंक नव्हता असा होता. तिचे शारीरिक सौंदर्य तिच्या नैतिक शक्‍तीने वाढले होते जे तिच्या कोणत्याही कमजोरपणापेक्षा वरचढ ठरत होते.—पडताळा ईयोब ३१:७.

अशाचप्रकारे ठरवण्यासाठी वेळ लागतो. म्हणून प्रणयाराधनेची घाई करू नका. (नीतिसूत्रे २१:५) बहुधा पुरुष अथवा स्त्री एकमेकांची मनधरणी करण्याचा सर्वस्वी प्रयत्न करतील. पण पुरेसा वेळ दिल्यावर, वाईट सवयी आणि प्रवृत्ती आपणहून प्रकट होतात. जे जोडपे वेळ जाऊ देते इतकेच नव्हे तर प्रणयाराधनेच्या काळात त्याचा सर्वोत्तम उपयोग देखील करते त्या जोडप्यास विवाहानंतर तडजोड करणे संभवतः सोपे जाईल. मतभेद झालेच तर ते त्यांस सोडवू शकतात या आत्मविश्‍वासासह ते विवाहाचा जाणतेपणाने निर्णय घेऊ शकतात. यशस्वी प्रणयाराधनेने त्यांना यशस्वी आणि आनंदी विवाहाकरता तयार केले आहे.

[तळटीपा]

a जेथे संकेतभेटी करण्याची प्रथा आहे आणि ख्रिश्‍चनांकरता ते उचित वर्तन असल्याचे मानले जाते अशा देशांमध्ये हे लागू होते. बहुधा पुरुष पुढाकार घेतो, पण एखादा तरुण बुजऱ्‍या स्वभावाचा किंवा लाजरा असल्यास, एखाद्या तरुणीने आपल्या भावना सभ्यतेने व्यक्‍त केल्यास कोणतेही शास्त्रवचनीय तत्त्व त्यावर प्रतिबंध घालणार नाही.—पडताळा गीतरत्न ८:६.

b पाहा अध्याय २४, “विवाहपूर्व लैंगिक संबंधांस मी कसा नकार द्यावा?”

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ प्रणयाराधनेचा मुख्य हेतू काय आहे, आणि वैवाहिक सुखाकरता ती किती महत्त्वपूर्ण आहे?

◻ दुसऱ्‍या व्यक्‍तीचे ‘आंतरिक मनुष्यपण’ जाणून घेण्यास तुम्हाला काय मदत करील?

◻ कोणत्या प्रकारची संभाषणे यशस्वी प्रणयाराधनेस हातभार लावतात?

◻ विविध परिस्थतींमध्ये एकत्र वेळ घालवणे मदतदायी का आहे?

◻ एखाद्या नातेसंबंधात काही खोट आहे हे कशावरून दिसते?

◻ एखादे प्रणयाराधन कधी थांबवावे?

[२५५ पानांवरील संक्षिप्त आशय]

“एकमेकांमधील आंतरिक व्यक्‍तींच्या तुलनात्मकरित्या संपूर्ण जाणीवेसह लोक विवाह करतात तेव्हा असे विवाह टिकण्याची आणि यशस्वी होण्याची अधिक शक्यता असते.”—विवाह आणि कुटुंब नियतकालिक

[२५६, २५७ पानांवरील चौकट/चित्र]

आम्ही अलग व्हावे का?

रोमांस जेव्हा निर्णय घेण्याच्या महत्त्वपूर्ण ठिकाणी येऊन पोहंचतो तेव्हा शंका निर्माण होणे ही काही असामान्य गोष्ट नाही. पण या शंका तुम्ही संकेतभेटी करत असलेल्या व्यक्‍तीमधील गंभीर त्रुटी अथवा नातेसंबंधातील त्रुटी यांतून निर्माण होत असल्यास काय?

उदाहरणार्थ, एकमेकांवर प्रेम करणाऱ्‍या लोकांमध्येही काही वेळा मतभेद होऊ शकतात हे खरे आहे. (पडताळा उत्पत्ति ३०:२; प्रेषितांची कृत्ये १५:३९.) पण प्रत्येकच गोष्टीत तुमचे मतभेद होत असल्यास, प्रत्येक चर्चेत भांडणे होऊ लागल्यास, किंवा तुमच्या नातेसंबंधात नेहमी बिनसणे आणि जमणे हे चालतच राहिल्यास, सावध असा! ४०० डॉक्टरांच्या अभिप्रायांनुसार असे दिसून आले की, सतत भांडाभांडी करणे हे “विवाहासाठी भावनिकरित्या तयार नसणे” याचे मोठे लक्षण असून “जोडप्यात असा मतभेद झाला असेल ज्याचा पुन्हा कधीच समेट होणार नाही” याचेही ते कदाचित चिन्ह असेल.

भावी सोबत्यामध्ये तुम्हाला त्रासदायक व्यक्‍तिमत्त्वातील त्रुटी दिसून आल्या असतील हे आणखी एक चिंतेचे कारण असू शकते. राग, किंवा जरासा स्वार्थीपणा, अपरिपक्वता, चंचलपणा किंवा हट्टीपणा निदर्शनास आल्यामुळे या व्यक्‍तीसोबत उर्वरित जीवन कंठायला आवडेल का असा विचार तुमच्या मनात येऊ लागेल. तरीही अनेकजण अशा चुकांकडे दुर्लक्ष करतात किंवा सफाई देण्याचा प्रयत्न करतात आणि कोणत्याही किंमतीवर जमलेच पाहिजे असा जणू ठाम निर्धारच करतात. हे असे का?

खरे ख्रिश्‍चन प्रणयाराधनेस गंभीर बाब समजतात—आणि तसे समजणे उचित आहे—म्हणून ज्या व्यक्‍तीशी संकेतभेटी केल्या जातात तिच्याशी विवाह केलाच पाहिजे अशी सक्‍ती काहींना वाटू लागते. या व्यक्‍तीला तोंड द्यावे लागेल आणि तिचे मन दुखावेल अशीही भीती त्यांना वाटू शकते. आपल्याशी दुसरे कोणी विवाह करणार नाही अशी भीती इतरांना कदाचित वाटेल. तथापि, समस्यायुक्‍त प्रणयाराधन रेटण्यासाठी ही उचित कारणे नाहीत.

विवाहाची शक्यता पाहणे हा प्रणयाराधनेचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे, एखाद्या ख्रिश्‍चनाने योग्य विश्‍वास राखून प्रणयाराधन केले असल्यास, त्यात काही खोट निर्माण झाल्यावर त्याला अथवा तिला ते पुढे चालू ठेवण्याची कोणतीही बाध्यता नाही. त्याऐवजी, ‘मला कदाचित कुणी दुसरं भेटणार नाही’ अशी सबब देऊन अवनत होत चाललेले नाते लांबवत राहणे चुकीचे आणि स्वार्थीपणाचे नसणार का? (पडताळा फिलिप्पैकर २:४.) म्हणून एकत्र मिळून समस्या टाळणे नव्हे तर त्यांना तोंड देणे हे महत्त्वाचे आहे. तुम्ही संकेतभेटी करत असलेल्या व्यक्‍तीकडे वेधक दृष्टीने पाहून सुरवात करा.

उदाहरणार्थ, ही स्त्री अधीन राहणारी, सद्‌गुणी पत्नी ठरेल याचा काही पुरावा आहे का? (नीतिसूत्रे ३१:१०-३१) हा पुरुष आत्मत्यागी प्रेम दाखवणारा आणि योग्य सांभाळ करणारा असेल याचा काही पुरावा आहे का? (इफिसकर ५:२८, २९; १ तीमथ्य ५:८) एखादी व्यक्‍ती देवाचा आवेशी सेवक असण्याचा दावा करत असेल पण अशा विश्‍वासाच्या दाव्याला पाठपुरावा देणारी काही कृत्ये आहेत का?—याकोब २:१७, १८.

अर्थात, एखादे नाते निर्माण करायला तुम्ही पुष्कळ वेळ आणि भावना खर्ची घातल्या असल्यास, केवळ तो अथवा ती परिपूर्ण नसल्याचे कळाल्यामुळे ते नाते संपुष्टात आणू नका. (याकोब ३:२) कदाचित तुम्ही सहन करू शकता अशा त्या व्यक्‍तीच्या त्रुटी असतील.

पण तसे नसल्यास काय? एकमेकांशी याबद्दल बातचीत करा. ध्येये अथवा दृष्टिकोनांमध्ये तुमचे मूलभूत फरक आहेत का? की फक्‍त गैरसमज झाले आहेत? तुम्हा दोघांनाही ‘आपले चित्त स्वाधीन’ करण्यास आणि अधिक शांतपणे समस्या सोडवण्यास शिकून घेण्याची गरज आहे का? (नीतिसूत्रे २५:२८) जर चीड आणणाऱ्‍या व्यक्‍तिमत्त्वातील प्रवृत्तींमुळे तुम्ही व्याकूळ असला, तर तो अथवा ती आपल्या त्रुटी नम्रपणे मान्य करून सुधार करण्याची इच्छा व्यक्‍त करतो/करते का? तुम्हाला संवेदनशील, मनाला लावून घेण्याच्या बाबतीत सुधार करण्याची गरज आहे का? (उपदेशक ७:९) ‘एकमेकांना प्रीतीने वागवून घेणे’ हे यशस्वी विवाहाचे जीवनावश्‍यक रक्‍त आहे.—इफिसकर ४:२.

आपला नातेसंबंध नष्ट करण्याऐवजी एकमेकांशी चर्चा केल्याने भवितव्यात हा नातेसंबंध वाढण्याची किती शक्यता आहे ते प्रकट होऊ शकेल! पण या चर्चेमुळे आणखीनच निराशाजनक दुरावा निर्माण झाला तर येणाऱ्‍या संकटाच्या स्पष्ट चिन्हांकडे कानाडोळा करू नका. (नीतिसूत्रे २२:३) विवाहानंतर सर्व सुरळीत होण्याची बहुतेक आशा नाही. अशावेळी प्रणयाराधन थांबवण्यातच तुमच्या दोघांचे हित आहे.

[२५३ पानांवरील चित्र]

चारचौघांत एकमेकांचे निरीक्षण केल्याने प्रणयभाव विरहित परिचय करून घेऊ शकता

[२५४ पानांवरील चित्र]

विनयशीलता आणि शिष्टाचाराचे स्थानीय नियम पाळल्याने परस्पर आदराचा नमुना मांडला जातो जो विवाहातही अनुसरला जाऊ शकतो

[२५९ पानांवरील चित्र]

प्रणयाराधनेतून काहीच निष्पन्‍न होत नसल्याचे स्पष्ट होते तेव्हा एकमेकांशी चर्चा करून हा नातेसंबंध तेथेच थांबवण्याची का गरज आहे याचे स्पष्टीकरण देणे हीच सर्वात चांगली गोष्ट असेल