मी विवाहाकरता तयार आहे का?
अध्याय ३०
मी विवाहाकरता तयार आहे का?
विवाह हा काही खेळ नव्हे. इतर कोणत्याही मानवापेक्षा पती-पत्नीमध्ये एक कायमस्वरूपी बंधन असावे असे देवाने उद्देशिले होते. (उत्पत्ति २:२४) म्हणून विवाहसोबती असा आहे की, ज्याच्यासोबत स्वेच्छेने किंवा नाईलाजास्तव तुम्हाला जीवन कंठावे लागेल.
कोणत्याही विवाहात “हालअपेष्टा” ह्या भोगाव्या लागतातच. (१ करिंथकर ७:२८) परंतु, वर्तन विज्ञानाच्या प्राध्यापिका, मार्सिया लॉसवेल्ल असा इशारा देतात: “विवाह टिकेल की नाही यासंबंधी बोलताना, अतिशय लहान वयात विवाह करणाऱ्यांना सहसा यश मिळत नसते हे कुणीही मान्य करील.”
इतक्या नवजवानांचे विवाह विफल का ठरतात? तुम्ही विवाहाकरता तयार आहात की नाही हे ठरवण्याशी या उत्तराचा कदाचित पुष्कळ संबंध असू शकतो.
मोठ्या अपेक्षा
“विवाह म्हणजे काय याविषयी आम्हाला काडीची माहिती नव्हती,” असे एक किशोरवयीन मुलगी कबूल करते. “आम्हाला वाटलं होतं, की मनात येईल तेव्हा यायचं-जायचं, मनमर्जी करायची, वाटेल तर भांडी घासायची नाही तर तशीच पडू द्यायची, पण खरं तर तशी परिस्थिती नव्हती.” अनेक युवकांचे विवाहाबद्दल असेच पोरकट दृष्टिकोन असतात. त्यांच्या मते ते रोमँटिक स्वप्नच असते. किंवा फक्त प्रौढ दिसण्याकरता ते विवाह करतात. पण इतरांना मात्र, केवळ घरातील, शाळेतील किंवा समाजातील संकट चुकवायचे असते. एका मुलीने आपल्या होणाऱ्या पतीला असे सांगितले: “विवाह झाल्यानंतर मला अतिशय आनंद होईल. मग मला स्वतःला निर्णय घ्यावे लागणार नाहीत!”
पण, विवाह म्हणजे स्वप्न नव्हे की समस्यांवर तरणोपाय नव्हे. उलट, त्याने नवीनच समस्या सामोऱ्या येतात. “पुष्कळ किशोरवयीन भातुकलीचा खेळ समजून लग्न करतात,” असे मिनी म्हणते जिला विसाव्या वर्षी पहिले मूल झाले. “किती गंमत वाटते! बाळ म्हणजे एखादी गोंडस, खेळायची बाहुलीच आहे असं वाटतं, पण खरं तर तसं नाहीय.”
अनेक युवकांना लैंगिक संबंधांविषयी देखील अवास्तविक अपेक्षा असतात. १८ वर्षांच्या वयात विवाह केलेल्या एका तरुणाने म्हटले: “लग्न झाल्यानंतर मला असं दिसलं की हा लैंगिक संबंधांचा रोमांच लवकरच विरून जातो आणि मग आमच्यासमोर खरोखरच्या समस्या येऊ लागल्या.” किशोरवयीन जोडप्यांच्या एका अभ्यासात असे आढळले, की आर्थिक समस्यांच्या पाठोपाठ बहुतेक वादविवाद लैंगिक संबंधांवरून व्हायचे. यात कसलीही शंका नाही, कारण समाधानकारक वैवाहिक संबंध निःस्वार्थीपणा आणि आत्मसंयम यांतून परिणीत होतात—हे गुण सहसा युवकांनी विकसित केलेले नसतात.—१ करिंथकर ७:३, ४.
सुज्ञपणे, बायबल ख्रिश्चनांना “ऐन तारुण्याचा काळ” ओसरल्यावर विवाह करण्याचे उत्तेजन देते. (१ करिंथकर ७:३६) वासना उफाळलेल्या असताना विवाह केल्यामुळे तुमची विचारसरणी विकृत होऊ शकते आणि भावी सोबत्यातील वैगुण्यांकडे दुर्लक्ष होऊ शकते.
आपापल्या भूमिकांसाठी तयार नसलेले
एक किशोरवयीन वधू आपल्या पतीबद्दल म्हणते: “आता आम्ही विवाहित असल्यामुळे, जेव्हा त्याला लैंगिक संबंध ठेवायचा असतो तेव्हाच तो माझ्याजवळ येतो. त्याला वाटतं, त्याचे मित्र माझ्याइतकेच महत्त्वाचे आहेत. . . . मला वाटलं होतं, की मीच त्याचे सर्वस्व असेन पण तो माझा गैरसमज होता.” यावरून तरुणांमध्ये सर्वसामान्य असलेली चुकीची कल्पना ठळक होते: लग्न झाल्यावरही ते अविवाहित पुरुषांसारखी जीवनशैली जगू शकतात असे त्यांना वाटते.
एकोणीस वर्षांची वधू, तरुण पत्नींमधील एक सर्वसामान्य समस्या दाखवते: “घर आवरून स्वयंपाक करण्याऐवजी मला टीव्ही पाहत बसायला आणि मस्तपैकी झोपायला आवडतं. माझे सासूसासरे घरी येतात तेव्हा मला लाज वाटते कारण त्यांचं घर अगदी टापटीप असतं आणि माझ्या घरात मात्र नेहमीच पसारा असतो. मला धड स्वयंपाक सुद्धा करता येत नाही.” एखादी मुलगी घरगुती कामकाजात गुणी नसते तेव्हा त्या विवाहात केवढी अडचण येते! “विवाहात खरोखरच वचनबद्धता असावी लागते,” असे मिनीने (आधी उल्लेखिलेली) म्हटले. “हा बाहुला-बाहुलीचा खेळ नव्हे. विवाहसोहळ्याचा आनंदीआनंद संपलेला असतो. लवकरच दैनंदिन जीवनाची रटाळ कहाणी सुरू होते आणि ते सोपं नसतं.”
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याच्या दैनंदिन दगदगीविषयी काय? मिनीचा नवरा मनीष म्हणतो: “मला आठवतं, माझ्या पहिल्या नोकरीसाठी मला
सकाळी ६ वाजता उठावं लागायचं. मी विचार करायचो: ‘काय जिवाला ताप आहे, यातून कधी सुटका मिळेल, देव जाणे. मला यातून कधी विसावा मिळेल का?’ आणि मला कायकाय सोसावं लागतं याची जाणीव मिनीला मुळीच नाही असा विचार घरी आल्यावर सतत असायचा.”पैशांची चणचण
याद्वारे तरुण विवाहित जोडप्यांमधील आणखी एका वैवाहिक वादाचे कारण सामोरे येते: पैसा. अठ्ठेचाळीस किशोरवयीन जोडप्यांनी हे कबूल केले की, विवाहाच्या तीन महिन्यांनंतर “घरखर्च” ही त्यांची सर्वात मोठी समस्या होती. सुमारे तीन वर्षांनी, यातील ३७ जोडप्यांना तोच प्रश्न केला गेला. पुन्हा एकदा पैशांची अडचण पहिल्या क्रमांकावर होती—आणि आता तर त्यांची चिंता अधिकच वाढली होती! बिलने असा प्रश्न केला, “संतुष्टी मिळण्याकरता हव्या असलेल्या गोष्टी खरेदी करायला पुरेसा पैसा नसला तर या जगण्यात काय मजा? . . . पुढचा पगार मिळेपर्यंत पैसा पुरत नसल्यावर मग भांडणं आणि अशांतता सुद्धा होऊ शकते.”
किशोरवयीनांमध्ये पैशांच्या समस्या सर्वसामान्य असतात कारण त्याच लोकांमध्ये बेकारीचे प्रमाण उच्च असते आणि वेतन मात्र कमी. “मी माझ्या कुटुंबाला पुरवू शकत नसल्यामुळे आम्हाला माझ्या आईवडिलांसोबत राहावं लागलं,” असे रॉयने कबूल केले. “यामुळे खरोखर डोक्याचा ताण वाढला कारण आम्हाला मूलही होतं.” नीतिसूत्रे २४:२७ सल्ला देते: “तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर, मग आपले घर बांध.” बायबल काळात, कुटुंबाची देखभाल करण्यास समर्थ होण्याकरता पुरुष कष्ट करत. अशाप्रकारची पुरेशी तयारी करण्यात अपेशी ठरल्यामुळे, पुष्कळ तरुण पतींना आज कर्त्या-पुरुषाची भूमिका भारी वाटते.
पण भौतिक गोष्टींविषयी एखाद्या जोडप्याची बालिश मनोवृत्ती असल्यास, मोठ्या रक्कमेचा पे चेक मिळूनही आर्थिक अडचणी काही संपणार नाहीत. एका अभ्यासाने प्रकट केले, की “किशोरवयीन आपल्या नवीनच संसारासाठी अशा वस्तू खरेदी करण्याची अपेक्षा करायचे की ज्यातील अनेक वस्तू खरेदी करायला त्यांच्या पालकांना संभवतः अनेक वर्षे लागली होती.” लागलीच या भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा निश्चय केल्याने १ तीमथ्य ६:८-१०.
अनेक जणांनी डोक्यावर भरमसाट कर्ज करून घेतले. ‘अन्नवस्त्राने’ तृप्त असण्याची प्रौढ मनोवृत्ती नसल्याने त्यांनी आपल्या विवाहातील तणाव आणखीनच वाढवला.—‘दोन टोकं’
मॉरीन आठवून सांगते: “माझं डॉनवर प्रेम होतं. तो अतिशय देखणा, उत्तम खेळाडू आणि खूप प्रसिद्ध होता . . . आमचा विवाह यशस्वी ठरायला हवाच होता.” पण तसे झाले नाही. त्यांच्यात इतका संताप निर्माण झाला की, मॉरीनच्या म्हणण्यानुसार “डॉनच्या प्रत्येक गोष्टीने मला चीड यायची—इतकंच काय तर, जेवताना त्याच्या मचमच करण्याच्या आवाजाचीही मला चीड यायची. शेवटी, आम्हाला असह्य झालं.” त्यांचा विवाह दोन वर्षात कोलमडला.
समस्या? “आमच्या जीवनातील ध्येये दोन विरुद्ध टोकांवर होती,” असे मॉरीन सांगते. “मग मला कळालं, की माझ्या विचारांशी ताळमेळ बसेल असा कोणी मला हवाय. पण डॉनला स्पोट्र्सशिवाय काही सुचतच नव्हतं. १८ वर्षांच्या वयात मला महत्त्वपूर्ण वाटणाऱ्या गोष्टींचं अचानक काहीच मूल्य राहिलं नाही.” सहसा आपल्या विवाहासाठी इष्ट असणाऱ्या गोष्टींविषयी युवकांचा पोरकट दृष्टिकोन असतो, बहुधा देखण्या स्वरूपाला प्राधान्य दिले जाते. नीतिसूत्रे ३१:३० ताकीद देते: “सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे.”
आत्म-परीक्षण करणे
जी व्यक्ती देवाला गंभीरपणे नवस करते पण तो “केल्यावर मग विचार करीत” बसते अशा व्यक्तीला बायबल उतावीळ म्हणते. (तिरपे वळण आमचे.) (नीतिसूत्रे २०:२५) तर मग, विवाहासारखी गंभीर शपथ घेण्याआधी शास्त्रवचनांच्या प्रकाशात स्वतःची पारख करून घेणे सुज्ञतेचे नव्हे का? तुमच्या जीवनातील ध्येये आहेत तरी कोणती? विवाहाचा यांवर कसा परिणाम होईल? केवळ लैंगिक संबंध ठेवण्याकरता किंवा समस्या टाळण्याकरता तर तुम्ही विवाह करू इच्छित नाही ना?
त्याचप्रमाणे, पती अथवा पत्नीची भूमिका स्वीकारण्यासाठी तुम्ही कितपत तयार आहात? घर सांभाळण्याएवढे किंवा उदरनिर्वाह करण्याएवढे तुम्ही समर्थ आहात का? तुमची सतत आपल्या पालकांशी बाचाबाची होत असल्यास, विवाहसोबतीबरोबर तुमचे पटेल का? विवाहासोबत येणाऱ्या परीक्षा आणि आव्हानांना तुम्ही तोंड देऊ शकाल का? पैशांचा व्यवहार करण्याच्या बाबतीत, तुम्ही खरोखरच “पोरपणाच्या गोष्टी” सोडून दिल्या आहेत का? (१ करिंथकर १३:११) यात तुम्ही कितपत योग्य ठरता यावर तुमच्या पालकांकडे निःसंशये पुष्कळसे सांगण्याजोगे असेल.
विवाह एकतर परमसुखाचा किंवा अति दुःखाचा स्रोत ठरू शकतो. त्याकरता तुम्ही कितपत तयार आहात यावर पुष्कळसे निर्भर करते. तुम्ही किशोरवयीन असल्यास, संकेतभेटी करू लागण्यापूर्वी थोडा वेळ थांबून का राहू नये बरे? थांबल्याने तुमचे नुकसान होणार नाही. पण तुम्ही विवाहाचे गंभीर—आणि कायमस्वरूपी—पाऊल उचललेच व उचलाल तेव्हा ते तुम्हाला त्याकरता खऱ्या अर्थाने तयार राहण्यास संधी देईल.
चर्चेसाठी प्रश्न
◻ काही युवकांना विवाहाबद्दल कोणते पोरकट दृष्टिकोन असतात?
◻ केवळ लैंगिक संबंध ठेवण्यासाठी विवाह करणे अवास्तविक आहे असे तुम्हाला का वाटते?
◻ काही युवकांनी पती अथवा पत्नीच्या भूमिकेसाठी तयार नसल्याचे कसे शाबीत केले आहे?
◻ सहसा तरुण जोडप्यांमध्ये पैशासंबंधी गंभीर समस्या का उद्भवतात?
◻ विवाहसोबत्याची निवड करण्यात काही युवक कोणती चूक करतात?
◻ विवाहासाठी तयार असण्याविषयी तुम्ही स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकता? या माहितीचा विचार केल्यावर तुमच्या मते तुम्ही विवाह करण्यास कितपत तयार आहात?
[२४० पानांवरील संक्षिप्त आशय]
“विवाह टिकेल की नाही यासंबंधी बोलताना, अतिशय लहान वयात विवाह करणाऱ्यांना सहसा यश मिळत नसते हे कुणीही मान्य करील.”—मार्सिया लॉसवेल्ल, वर्तन विज्ञानाच्या प्राध्यापिका
[२३७ पानांवरील चित्र]
अनेक युवक विवाह करतात तेव्हा त्यांची काहीशी अशीच स्थिती असते