व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंमली पदार्थांना नकार का द्यावा?

अंमली पदार्थांना नकार का द्यावा?

अध्याय ३४

अंमली पदार्थांना नकार का द्यावा?

“मी हळव्या मनाचा मुलगा आहे,” असे माईक हा २४ वर्षांचा तरुण म्हणतो. “काहीवेळा मला भीती वाटते आणि माझ्या वयाची इतर मुलं माझ्यावर दादागिरी सुद्धा करतात. मला विषण्णता, असुरक्षितता वाटते आणि काहीवेळा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केलाय.”

छत्तीस वर्षांची ॲन स्वतःला “भावनिकरित्या अपरिपक्व” आणि “कम-स्वाभिमान” असल्याचे समजते. ती म्हणते: “मला सर्वसामान्य जीवन जगायला अतिशय कठीण वाटतं.”

माईक आणि ॲनने तरुण असताना जो निर्णय घेतला त्याचे परिणाम म्हणजेच अंमली पदार्थांच्या प्रयोगाचे परिणाम ते आता भोगत आहेत. लाखो युवक आज हेच करतात—कोकेन ते गांज्यापर्यंतचे सर्व अंमली पदार्थ टोचून घेतात, गिळतात, सुंगतात आणि ओढतात. काही युवकांच्या दृष्टीने, ‘अंमली पदार्थ घेणे’ हा समस्यांपासून सुटका मिळवण्याचा एक मार्ग आहे. इतरजण उत्सुकतेपोटी यात सामील होतात. आणखी इतरजण विषण्णता किंवा कंटाळा घालवण्यासाठी अंमली पदार्थांचा उपयोग करतात. एकदा त्याची सुरवात केली की मग फक्‍त त्यातून लाभणारा सुखभ्रम अनुभवण्यासाठी अनेकजण अंमली पदार्थांचा उपयोग करत राहतात. १७ वर्षांचा गौरव म्हणतो: “मी फक्‍त नशेकरता [गांजा] ओढतो. आराम मिळावा म्हणून किंवा सामाजिक कारणांसाठी नव्हे. . . . सवंगड्यांच्या दबावामुळेही मी ओढू लागलो नाही, तर मला पाहिजे होतं म्हणून मी ओढू लागलो.”

कोणत्याही प्रकारे, आज ना उद्या तुम्ही अंमली पदार्थांच्या संपर्कात याल अथवा ती थेट तुम्हाला दिली जातील अशी चांगलीच शक्यता आहे. “आमच्या शाळेतले रखवालदार सुद्धा पॉट [गांजा] विकतात,” असे एक तरुण म्हणतो. मादक पदार्थ उघडपणे ठेवली जातात आणि विकली जातात. परंतु, अंमली पदार्थ अतिशय प्रसिद्ध असले तरीही त्यांना नकार देण्याकरता उचित कारण आहे. ते कसे?

मादक पदार्थ वाढ खुंटवितात

माईक आणि ॲनप्रमाणे समस्यांपासून सुटका मिळवण्याकरता अंमली पदार्थांचा उपयोग करणाऱ्‍या युवकांचा विचार करा. आधीच्या अध्यायात दाखवण्यात आल्यानुसार, जीवनातील आव्हानांना तोंड देऊन, यश अनुभवून, अपयश सहन करून भावनिक वाढ होते. आपल्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी जे युवक रासायनिक पदार्थांचा आडोसा घेतात ते आपला भावनिक विकास खुंटवितात. समस्यांना तोंड देण्यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्ये विकसित करण्यात ते अपयशी ठरतात.

इतर कोणत्याही कौशल्याप्रमाणे, तोंड देण्याच्या क्षमतेला सवयीची गरज असते. स्पष्ट करण्यासाठी: तुम्ही कधी कुशल सॉकर खेळाडूला पाहिले आहे का? तो आपले डोके आणि पायांचा असा उपयोग करतो की पाहून आश्‍चर्यच वाटते! पण, ह्‍या खेळाडूने हे कौशल्य कसे विकसित केले? अनेक वर्षे सराव करून. खेळण्यात निपुण होईपर्यंत तो पायाने बॉल मारण्यास, त्यासोबत पळण्यास, हुलकावणी देण्यास वगैरे वगैरे शिकत राहिला.

समस्यांना तोंड देण्याच्या क्षमता विकसित करणे ह्‍यासारखेच आहे. त्यासाठी सराव—अनुभव लागतो! तरीही, नीतिसूत्रे १:२२ येथे बायबल विचारते: “अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हास कोठवर आवडणार? . . . मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार?” जो युवक मादक पदार्थाने निर्माण केलेल्या सुखभ्रमात लपतो त्याला ‘भोळेपण आवडते’; जीवन जगण्यासाठी आवश्‍यक असलेले ज्ञान आणि समस्यांना सामोरे जाण्याच्या क्षमता तो विकसित करत नाही. आपल्या किशोरवयीनासोबत बातचीत करणे (इंग्रजी) हे पुस्तक अंमली पदार्थांचा उपयोग करणाऱ्‍या किशोरवयीनांबद्दल म्हणते: “जीवनातील दुःखद प्रसंग या पदार्थांविना सहन करणे हे कधीच त्यांच्या अंगवळणी पडत नाही.”

सुटका मिळवण्यासाठी मादक पदार्थांचा उपयोग केलेली ॲन कबूल करते: “गेल्या १४ वर्षांकरता मी माझ्या समस्या सोडवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.” माईकने देखील असेच म्हटले: “११ वर्षांचा असल्यापासून मी अंमली पदार्थांचा वापर केलाय. मी २२ वर्षांचा असताना अंमली पदार्थ घेण्याचे थांबवल्यावर मला लहान मुलासारखं वाटू लागलं. मग, सुरक्षा मिळवायला मी इतरांवर अवलंबून राहू लागलो. मादक पदार्थांचा वापर सुरू केल्यापासून माझा भावनिक विकास खुंटला हे माझ्या लक्षात आलं.”

“विकासाचे ते सर्व वर्ष मी वाया घालवले,” असे फ्रँक म्हणतो ज्याने वयाच्या १३ व्या वर्षापासून अंमली पदार्थांचा दुरुपयोग केला. “जेव्हा मी अंमली पदार्थ घेण्याचे सोडून दिले तेव्हा जीवनाला तोंड द्यायला मी बिलकुल तयार नव्हतो ही दुःखद गोष्ट मला कळाली. मी पुन्हा एकदा १३ वर्षांचा मुलगा बनलो आणि इतर सर्व पौगंडांप्रमाणेच मलाही तीच भावनिक उद्विग्नता अनुभवावी लागली.”

मादक पदार्थांमुळे माझ्या चांगल्या प्रकृतीचा नाश होऊ शकतो का?

हे चिंतेचे आणखी एक क्षेत्र आहे. बहुतांश युवकांना हे कळते की तथाकथित जहाल ड्रग्जमुळे मृत्यू होऊ शकतो. पण गांज्यासारख्या सौम्य ड्रग्जबद्दल काय? त्यांच्याविषयी तुमच्या कानी पडत असलेले इशारे केवळ धास्ती निर्माण करणाऱ्‍या युक्‍त्‌या आहेत काय? याचे उत्तर पाहण्यासाठी आपण गांजा या मादक पदार्थावर लक्ष केंद्रित करू या.

गांज्यावर (ज्याला पॉट, चरस, हशिश, मारिजुआना किंवा भांग देखील म्हणतात) तज्ज्ञांमध्ये पुष्कळ वादविवाद झाला आहे. तसेच, या प्रसिद्ध मादक पदार्थाविषयी पुष्कळशा गोष्टी माहीत नाहीत हे कबूल आहे. एक कारण म्हणजे, गांजा अतिशय गुंतागुंतीचा आहे; गांज्याच्या एका सिगारेटीच्या धुरात ४०० पेक्षा अधिक रासायनिक घटक असतात. सिगारेटीच्या धुरामुळे कर्करोग संभवतो हे कळायला डॉक्टरांना ६० पेक्षा अधिक वर्षे लागली. त्याचप्रमाणे, गांज्यातील ४०० घटक मानवी शरीराला काय हानी पोहंचवतात हे कोणाला निश्‍चित माहीत व्हायला कदाचित अनेक दशके लागतील.

तथापि, हजारो संशोधक वृत्तांचा अभ्यास केल्यावर, यु.एस. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन या प्रतिष्ठित संस्थेच्या काही तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला: “आजपर्यंत प्रकाशित करण्यात आलेला वैज्ञानिक पुरावा दर्शवतो की, गांज्यामुळे पुष्कळ मानसिक तसेच जैविक परिणाम उद्‌भवतात व यातील काही परिणाम निदान विशिष्ट परिस्थितींमध्ये तरी मानवी आरोग्याला हानीकारक ठरतात.” यातील काही हानीकारक परिणाम कोणते आहेत?

गांजा—तुमच्या शरीरावर कोणता परिणाम करतो

उदाहरणासाठी, फुफ्फुसांचा विचार करा. गांज्याचे कट्टर समर्थकही मान्य करतात, की धूर घेणे शक्यतः चांगले असू शकत नाही. गांज्याच्या धुरात, तंबाखूच्या धुराप्रमाणे टारसारखे अनेक विषारी पदार्थ असतात.

डॉ. फॉरेस्ट एस. टेनंट, ज्युनियर यांनी गांजा ओढलेल्या संयुक्‍त संस्थानांतील ४९२ लष्करी सैनिकांचे सर्वेक्षण घेतले. त्यातील सुमारे २५ टक्के लोकांचा “हशिश ओढल्याने घसा बसला होता आणि सुमारे ६ टक्के लोकांनी आपल्याला ब्राँकायटीस झाल्याचे कळवले.” आणखी एका अभ्यासात, मारिजुआना ओढणाऱ्‍या ३० पैकी २४ लोकांना श्‍वसननलिकेचे ‘विकार जडल्याचे आढळले की जे कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यांमध्ये होतात.’

होय, अशांना नंतर प्रत्यक्षात कर्करोग जडेल असे खात्रीने कोणीही सांगू शकत नाही. तरीपण तुम्हाला ती जोखीम पत्करायला आवडेल का? शिवाय, बायबल म्हणते की, देव “जीवन, प्राण . . . सर्वांना देतो.” (प्रेषितांची कृत्ये १७:२५) आपल्या फुफ्फुसांना आणि घशाला दुखापत पोहंचवणारा पदार्थ मुद्दामहून ओढल्यावर जीवनदात्याला तुम्ही आदर दाखवत असाल का?

उपदेशक १२:६ येथे मानवी मेंदूला काव्यरूपात “सोन्याचा कटोरा” म्हटले आहे. तुमच्या मुठीपेक्षा थोडासा मोठा व जवळजवळ तीन पौंड वजन असून मेंदू हा केवळ तुमच्या आठवणींचे एकमेव मूल्यवान पात्र नाही तर तुमच्या संपूर्ण चेतासंस्थेचे कमांड सेंटर देखील आहे. हे लक्षात ठेवून, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनचा इशारा लक्षात घ्या: “गांज्याचे मेंदूवर तीव्र परिणाम होतात त्याचप्रमाणे रासायनिक आणि इलेक्ट्रोफिसिओलॉजिकल बदल देखील होतात हे आम्ही खात्रीने सांगू शकतो.” सध्या तरी, गांज्यामुळे मेंदूवर कायमचा परिणाम होतो असा कोणताही निर्णायक पुरावा नाही. तथापि, गांजा कोणत्या ना कोणत्या प्रकारे ह्‍या ‘सोन्याच्या कटोऱ्‍याला’ हानी पोहंचवू शकतो ही संभावना क्षुल्लक समजून तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये.

त्याचप्रमाणे केव्हा न केव्हा तुमचा विवाह होईल आणि तुम्हाला मुले होतील या शक्यतेविषयी काय? “प्रयोगासाठी वापरल्या जाणाऱ्‍या प्राण्यांना मोठ्या मात्रेत [गांजा] देण्यात आला तेव्हा जन्म दोष” निर्माण होतात असे वृत्त इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनने दिले आहे.” तेच परिणाम मानवांवरही होतात का हे अद्याप तरी सिद्ध झालेले नाही. तथापि, हे लक्षात असू द्या की, जन्म दोष (जसे की, हार्मोन डीईएसने निर्माण होणारे) सहसा अनेक वर्षांनंतर निदर्शनास येतात. म्हणून, गांजा ओढणाऱ्‍यांच्या मुलांच्या—आणि नातवंडांच्या—भवितव्यात काय आहे ते अद्याप पाहावयाचे आहे. डॉ. गेब्रीएल नाहास म्हणतात की, गांजा ओढणे हे “आनुवंशिक चक्र” असू शकते. संतती ही “परमेश्‍वराने दिलेले धन आहे” असे मानणारी व्यक्‍ती अशा जोखिमा पत्करील का?—स्तोत्र १२७:३.

अंमली पदार्थ—बायबलचा दृष्टिकोन

अर्थात, गांजा हा अनेक प्रसिद्ध असलेल्या मादक पदार्थांपैकी केवळ एक आहे. पण, यावरून सुखभ्रमाकरता मनःस्थिती बदलवणारे पदार्थ न घेण्याकरता पुष्कळ कारण आहे हे उत्तमरित्या स्पष्ट होते. बायबल म्हणते: “बल हे तरुणांस भूषण आहे.” (नीतिसूत्रे २०:२९) तरुण व्यक्‍ती असल्याने, तुमचे आरोग्य निश्‍चितच उत्तम आहे. मग ते गमावण्याची जोखीम तरी का पत्करावी?

तथापि, आणखी महत्त्वाचे म्हणजे, आपल्याजवळ याविषयावरील बायबलचा दृष्टिकोन आहे. ते आपल्याला, रासायनिक दुरुपयोगाद्वारे “विचारशीलता” नष्ट करायला नव्हे तर ती “सांभाळून” ठेवण्यास सांगते. (नीतिसूत्रे ३:२१) ते पुढे आर्जवते: “म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.” खरोखर, अंमली पदार्थांचे सेवन करण्यासारख्या वाईट सवयी टाळून ज्यांनी ‘स्वतःला सर्व अशुद्धतेपासून शुद्ध’ केले आहे केवळ अशांनाच देव अभिवचन देतो: “‘मी तुम्हाला स्वीकारीन.’ ‘आणि मी तुम्हाला पिता असा होईन.’”—२ करिंथकर ६:१७–७:१.

तथापि, अंमली पदार्थांना नकार देणे सोपी गोष्ट नसेल.

सवंगडी आणि त्यांचा दबाव

नातेवाईक आणि निकटचे मित्र असलेल्या ज्यो आणि फ्रँक यांनी उन्हाळ्यात एकदा एक निर्णय घेतला. “कुणीही काहीही करो,” असे ज्यो, त्या दोघांमधला धाकटा म्हणाला, “पण आपण कधीच अंमली पदार्थ घ्यायचे नाहीत.” मग दोन्ही युवकांनी हा करार करून हात मिळवले. पण, केवळ पाच वर्षांनंतर, अंमली पदार्थांशी संबंधित असलेल्या अपघातात ज्यो आपल्या कारमध्ये मृतावस्थेत सापडला. त्याचप्रमाणे, फ्रँक अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन झाला होता.

खोट कोठे होती? याचे उत्तर, बायबलमधील या निकडीच्या इशाऱ्‍यातून मिळते: “फसू नका. कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) ज्यो आणि फ्रँक हे दोघेही चुकीच्या लोकांसोबत मिसळले. मादक पदार्थ घेणाऱ्‍या मुलांशी त्यांनी आपला सहवास वाढवला तेव्हा ते सुद्धा अंमली पदार्थ घेऊ लागले.

मुले आणि पौगंडांमधील आत्मनाशक वर्तन (इंग्रजी) हे पुस्तक निरीक्षण करते: “तरुण लोकांना सहसा आपल्या जवळच्या मित्राकडूनच विविध अंमली पदार्थांच्या संपर्कात आणले जाते किंवा ‘व्यसन’ लावले जाते . . . रोमहर्षक किंवा सुखद अनुभव दुसऱ्‍यानेही अनुभवावा असा कदाचित [त्याचा] हेतू असेल.” सुरवातीला उल्लेखिलेला माईक याची सत्यता पटवून म्हणतो: “मला सवंगड्यांच्या दबावाचा सामना करायला सर्वात कठीण वाटलं. . . . मी पहिल्या वेळी गांजा ओढला तेव्हा, इतर मुलांनी ओढला म्हणून मीही ओढला होता आणि मला त्यांच्याशी जुळवून घ्यायचं होतं.”

स्पष्ट शब्दात सांगायचे झाल्यास, तुमचे मित्र अंमली पदार्थांचा वापर करू लागले तर अनुरूप होण्याकरता, जुळवून घेण्याकरता तुम्हावर देखील तीव्र भावनिक दबाव येतील. तुम्ही आपली मित्रमंडळी बदलली नाही तर तुम्ही देखील अंमली पदार्थ वापरू लागाल अशी पूर्ण शक्यता आहे.

“सुज्ञांची सोबत धर”

“सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो,” असे नीतिसूत्रे १३:२० म्हणते. उदाहरणार्थ, तुम्हाला सर्दी लागू नये म्हणून काळजी घेत असताना तुम्ही सर्दी झालेल्या लोकांशी निकट संपर्क टाळणार नाही काय? पौगंडांतील समवयस्क दबाव (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते, “त्याचप्रमाणे, आपल्याला . . . मादक पदार्थांचा प्रादुर्भाव टाळायचा असल्यास . . . आपण निरोगी समतोल परिस्थिती राखली पाहिजे आणि हानीकारक प्रवृत्तींचा संपर्क कमी केला पाहिजे.”

तुम्हाला अंमली पदार्थांना नकार द्यायचा आहे का? मग तुमची संगती कोणासोबत आहे यावर लक्ष ठेवा. देव-भीरु ख्रिश्‍चनांची मैत्री शोधा जे अंमली पदार्थांपासून मुक्‍त असण्याच्या तुमच्या निर्धारास पाठबळ देतील. (पडताळा १ शमुवेल २३:१५, १६.) त्याचप्रमाणे, निर्गम २३:२ मधील शब्द देखील लक्षात घ्या. मूलतः, शपथपूर्वक साक्ष देणाऱ्‍या साक्षींसाठी ते देण्यात आले असले, तरी युवकांकरता ते उत्तम सल्ला ठरतात: “दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्‍या बहुजनसमाजास अनुसरू नको.”

जो विनाहरकत आपल्या सवंगड्यांना अनुसरतो तो दासासारखाच असतो. रोमकर ६:१६ येथे बायबल म्हणते: “आज्ञापालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करिता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहा, . . . हे तुम्हाला ठाऊक नाही काय?” म्हणूनच, बायबल युवकांना “विचारशीलता” विकसित करण्यास उत्तेजन देते. (नीतिसूत्रे २:१०-१२) स्वतःकरता विचार करण्याचे शिका, म्हणजे स्वच्छंदी युवकांचे अनुसरण करण्याच्या नादी तुम्ही लागणार नाही.

हे खरे की, मादक पदार्थ आणि त्यांचे परिणाम यांविषयी तुम्हाला कुतूहल वाटत असेल. पण, मादक पदार्थांचा लोकांवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी स्वतःचे मन आणि शरीर अशुद्ध करण्याची गरज नाही. मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्‍या तुमच्या वयाच्या लोकांचे निरीक्षण करा—खासकरून पुष्कळ कालावधीपासून व्यसनाधीन असलेल्यांचे निरीक्षण करा. ते जागृत आणि तल्लख वाटतात का? त्यांनी आपले मार्क चांगल्या स्तरावर कायम राखलेत का? की ते इतके मंद आणि अस्थिर असतात की काहीवेळा त्यांच्या भोवती काय होत आहे याचेही त्यांना भान नसते? अशा व्यक्‍तींचे वर्णन करण्यासाठी खुद्द मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्‍यांनीच एक संज्ञा दिली: “बर्न-आऊट्‌स” (पूर्णतः क्षीण झालेले). तथापि, पुष्कळ “बर्न-आऊट्‌स” जिज्ञासेपोटी अंमली पदार्थांचे सेवन करू लागले होते. म्हणूनच, “दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे” होऊन अहितकर कुतूहल दाबून टाकण्यास बायबल ख्रिश्‍चनांना आर्जवते.—१ करिंथकर १४:२०.

तुम्ही नकार देऊ शकता!

यु.एस. नॅशनल इन्स्टिट्यूटने मादक पदार्थांच्या सेवनाविषयी प्रकाशित केलेली पुस्तिका आपल्याला अशी आठवण करून देते: “मादक पदार्थास नकार देणे . . . हा तुमचा हक्क आहे. जे मित्र तुमच्या निर्णयावर दबाव आणतात ते तुमच्या स्वतंत्र व्यक्‍ती असण्याच्या हक्कांचा हळूहळू नाश करत असतात.” तुम्हाला कोणी मादक पदार्थ देऊ केल्यास काय? नाही म्हणण्याचे धाडस करा! याचा अर्थ, मादक पदार्थांचे सेवन किती वाईट आहे यावर भाषण दिले पाहिजे असा होत नाही. त्याच पुस्तिकेने फक्‍त, “नाही, मला ओढायचं नाहीय” किंवा “नको, मला चिंता नको” किंवा “मला माझं शरीर दूषित करायचं नाहीय,” असे पटकन उत्तर द्यायला सुचवले. पण, ते आग्रहच करू लागले तर तुम्हाला ठाम निश्‍चयासह नकार द्यावा लागेल! तुम्ही ख्रिश्‍चन आहात असे इतरांना सांगितल्यानेही संरक्षण मिळू शकते.

प्रौढ होणे ही सोपी गोष्ट नाही. पण, अंमली पदार्थांचा उपयोग करून तुम्ही वाढत्या वयाचा त्रास टाळण्याचा प्रयत्न करू लागला, तर पुढे जबाबदार, प्रौढ व्यक्‍ती बनण्यामध्ये गंभीर अडथळा निर्माण होऊ शकतो. समस्यांना तोंड देण्यास शिका. दबाव अधिक असल्याचे भासल्यास, रासायनिक पळवाट काढू नका. पालकासोबत किंवा इतर जबाबदार प्रौढांसोबत बातचीत करा जे तुम्हाला समस्या सोडवण्यास मदत करू शकतात. तसेच बायबलचे आर्जवणे देखील लक्षात ठेवा: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार . . . राखील.”—फिलिप्पैकर ४:६, ७.

होय, यहोवा देव तुम्हाला नकार देण्याचे सामर्थ्य देईल! इतरांना तुमचा दृढनिश्‍चय खचवण्यास कधीच वाव देऊ नका. माईक आर्जवतो त्यानुसार: “अंमली पदार्थांचा प्रयोग करून पाहू नका. तुम्ही उर्वरित जीवनात पस्तावाल!”

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ इतके युवक अंमली पदार्थ का घेतात?

◻ मादक पदार्थ घेतल्याने तुमची भावनिक वाढ कशी खुंटू शकते?

◻ गांज्याचा शरीरावर कसा परिणाम होतो याबद्दल कोणती माहिती आहे?

◻ सुखभ्रमाकरता मादक पदार्थ घेण्याविषयी बायबलचा दृष्टिकोन काय आहे?

◻ मादक पदार्थांपासून मुक्‍त असण्याकरता आपल्या संगतीविषयी सावध असणे महत्त्वाचे का आहे?

◻ मादक पदार्थांना नकार देण्याचे काही मार्ग कोणते आहेत?

[२७४ पानांवरील संक्षिप्त आशय]

“आमच्या शाळेतले रखवालदार सुद्धा पॉट [गांजा] विकतात,” असे एक युवक म्हणतो

[२७९ पानांवरील संक्षिप्त आशय]

“मादक पदार्थांचा वापर सुरू केल्यापासून माझा भावनिक विकास खुंटला हे माझ्या लक्षात आलं.”—माईक, पूर्वी अंमली पदार्थांचे सेवन करणारा

[Box on page 278]

गांजा—नवीन वंडर ड्रग?

काचबिंदू आणि दम्याच्या उपचारावर आणि केमोथेरपीच्या वेळी कर्क रुग्णांना जाणवणारी मळमळ कमी करण्यात गांजाचे औषधी महत्त्व आहे अशा दाव्यांवर पुष्कळ गोंधळ माजला आहे. या दाव्यांमध्ये थोडीफार सत्यता आहे असे यु.एस. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनचा अहवाल कबूल करतो. पण, याचा अर्थ नजीकच्या भवितव्यात डॉक्टर गांजा ओढण्याची शिफारस करू लागतील असा होतो का?

शक्यतः नाही, कारण गांज्यातील ४०० पेक्षा अधिक रासायनिक घटक उपयुक्‍त असले, तरी गांजा ओढणे हा अशाप्रकारची औषधे घेण्याचा तर्कशुद्ध मार्ग मुळीच नसेल. प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. कार्लटन टर्नर असे म्हणतात, “गांजा घेणे म्हणजे पेनिसिलीनकरता लोकांना बुरशी आलेला ब्रेड खायला सांगण्यासारखे असेल.” म्हणून, गांज्यातील घटक कधी खरी औषधे झालीच, तर ते त्यांच्यासारखीच गांज्यातील “अनुजात किंवा सदृश” रासायनिक घटक असतील ज्यांची शिफारस डॉक्टर करतील. म्हणूनच, यु.एस. सेक्रेटरी ऑफ हेल्थ ॲण्ड ह्‍यूमन सर्व्हिसेसने असे लिहिले: “गांज्याच्या संभाव्य औषधी महत्त्वामुळे, आरोग्यावर होणाऱ्‍या गांज्याच्या दुष्परिणामांचा प्रभाव कोणत्याही प्रकारे बदलत नाही यावर जोर देण्याची गरज आहे.”

[२७५ पानांवरील चित्र]

मादक पदार्थांना नकार देण्याचे धाडस करा!

[Picture on page 276, 277]

आता अंमली पदार्थ घेऊन आपल्या समस्या चुकवल्यास . . . प्रौढ या नात्याने समस्यांना तोंड देणे तुम्हाला कठीण वाटेल