व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कधीतरी एकदा मौजमजा करण्यास काय हरकत आहे?

कधीतरी एकदा मौजमजा करण्यास काय हरकत आहे?

अध्याय ३७

कधीतरी एकदा मौजमजा करण्यास काय हरकत आहे?

शुक्रवारी संध्याकाळी, पॉलीन a ख्रिस्ती सभांना जात असे. तिला तिथल्या चर्चा आवडायच्या पण काहीवेळा आपण येथे आहोत आणि आपल्या मैत्रिणी मात्र मौजमजा करताहेत याची तिला खंत वाटायची.

सभा संपवून, घरी जाताना पॉलीन तिथल्या एका किशोरवयीनांच्या क्लबजवळून जात असे. ती म्हणते: “तिथल्या मोठ्याने चालणाऱ्‍या संगीताने आणि झगमगणाऱ्‍या प्रकाशाने आकर्षित होऊन मी जाता जाता खिडकीमधून झाकून पाहायचे आणि त्यांच्यासारखी मजा मलाही करता आली असती तर किती बरं झालं असतं अशी कल्पना करायचे.” कालांतराने, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत मौजमजा करण्याची इच्छा तिच्या जीवनातली सर्वात प्रमुख गोष्ट बनली.

ख्रिस्ती असल्यामुळे तुम्हाला देखील पॉलीनप्रमाणे आपण कशाला तरी मुकत आहोत असे काहीवेळा वाटत असावे. सर्वांच्या तोंडात असलेला तो टीव्ही कार्यक्रम तुम्हाला पाहायचा आहे पण तुमच्या पालकांचे म्हणणे आहे की त्यात फार हिंसाचार आहे. तुम्हाला तुमच्या शाळेतल्या मुलांसोबत हिंडायला फिरायला जायचे असेल पण तुमच्या पालकांच्या मते ती ‘कुसंगती’ आहे. (१ करिंथकर १५:३३) तुम्हाला त्या पार्टीला जायचे असेल जेथे सर्व शाळासोबती येणार असतील पण आईवडील परवानगी देत नाहीत.

तुमचे शाळासोबती आपल्या मर्जीने केव्हाही येतात आणि जातात, चित्रपट पाहायला जातात आणि पहाट होईपर्यंत पार्ट्यांमध्ये मौज करत असतात पण त्यांचे पालक काहीच दखल घेत नाहीत. म्हणून तुम्हाला त्यांच्या स्वातंत्र्याचा हेवा वाटत असेल. तुम्हाला काही वाईट कृत्य करायचे असते असे नाही. फक्‍त कधीतरी एकदा मौजमजा करायची असते.

करमणूक—देवाचा दृष्टिकोन

मौजमजा करण्यात काहीच वावगे नाही याची खात्री बाळगा. शेवटी यहोवा देव एक ‘आनंदी देव’ आहे. (१ तीमथ्य १:११) म्हणून सुज्ञ पुरुष शलमोनाकरवी, तो म्हणतो: “हे तरुणा, आपल्या तारुण्यांत आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल.” परंतु, शलमोनाने नंतर इशारा दिला: “ह्‍या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.”—उपदेशक ११:९, १०.

तुमच्या कृतींचा देव जाब घेईल हे ठाऊक असल्यामुळे, करमणुकीचा अर्थच बदलतो. कारण मौजमजा करणाऱ्‍या व्यक्‍तीचे देव खंडन करत नसला, तरी “सुखविलासाची आवड” धरणाऱ्‍या व्यक्‍तीचा, केवळ पुढच्या मौजमजेच्या क्षणासाठी जिवंत असणाऱ्‍या व्यक्‍तीचा तो स्वीकार करत नाही. (२ तीमथ्य ३:१, ४) हे का बरे? राजा शलमोनाचा विचार करा. आपल्या प्रचंड धनसंपत्तीद्वारे त्याने प्रत्येक सुखाचा मनमुराद आनंद लुटला. तो म्हणतो: “माझे नेत्र ज्याची म्हणून वांच्छा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. मी कोणत्याहि आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरिले नाही.” परिणाम? “सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता.” (उपदेशक २:१०, ११) होय, दीर्घ पल्ल्यात, सुखविलासी जीवनामुळे केवळ रिक्‍तपणा आणि निराशा तुमच्या वाट्याला येते हे देवाला ठाऊक आहे.

तुम्ही अशुद्ध चालीरीतींपासून म्हणजेच, मादक पदार्थांचे सेवन आणि विवाहपूर्व लैंगिक संबंध यांसारख्या सवयींपासून मुक्‍त असावे अशी अपेक्षा देखील देव तुमच्याकडून करतो. (२ करिंथकर ७:१) तरीही, किशोरवयीन मौजमजेखातर ज्या गोष्टी करतात अशा अनेक गोष्टींमुळे या चालीरीतींमध्ये गुरफटले जाण्याचा धोका आहे. उदाहरणार्थ, एका तरुणीने, कोणाचीही देखरेख नसलेल्या शाळासोबत्यांच्या एका एकत्रीकरणात जायचे ठरवले. “स्टिरिओवर लावलेलं संगीत मस्त होतं, डान्स चांगला होता, अल्पोपहार चांगला होता आणि आम्ही पोट दुखेपर्यंत हसलो,” असे ती आठवून सांगते. पण मग, “कुणीतरी गांजा आणला. मग दारू आणली. त्यावेळी मात्र वातावरण हाताबाहेर जाऊ लागलं.” लैंगिक अनैतिकता घडली. त्या मुलीने दुखाने कबूल केले: “तेव्हापासून मी दुःखी आणि विषण्ण आहे.” प्रौढांच्या देखरेखीविना अशी एकत्रीकरणे किती सहजपणे “बेभान पार्ट्या” किंवा रंगेलपणा यांमध्ये परिवर्तित होतात!—गलतीकर ५:२१, बाइंग्टन.

तथापि, तुम्ही आपला फावला वेळ कसा घालवता याविषयी तुमच्या पालकांना चिंता असेल यात मुळीच आश्‍चर्य नाही आणि म्हणूनच तुम्ही कोठे जाऊ शकता आणि कोणासोबत संगती करू शकता यावर ते कदाचित निर्बंध घालत असतील. त्यांचा हेतू? देवाच्या इशाऱ्‍याचे पालन करण्यासाठी तुमची मदत करणे: “आपल्या मनांतून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत.”—उपदेशक ११:१०.

मौजमजा करणाऱ्‍यांचा हेवा वाटतो?

हे सर्वकाही विसरून मौज करणाऱ्‍या युवकांच्या स्वातंत्र्याचा मत्सर वाटू लागणे सोपे आहे. पॉलीनने ख्रिस्ती सभांना येणे बंद केले आणि ती सुखविलासी लोकांसोबत मिसळू लागली. “मला ज्या ज्या गोष्टींविरुद्ध ताकीद मिळाली होती त्याच सर्व मी करू लागले होते,” असे ती म्हणते. सरतेशेवटी, पॉलीनच्या ह्‍या मौजमस्तीमुळे तिला अटक झाली आणि वाह्‍यात मुलींकरता असलेल्या शाळेत तिला दाखल करण्यात आले!

बऱ्‍याच काळाआधी स्तोत्र ७३ च्या लेखकाचे विचार देखील पॉलीनसारखेच होते. “दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो,” असे तो कबूल करतो. मग, नीतिमान तत्त्वांनुसार जगण्याच्या मूल्याविषयी तो शंका देखील करू लागला. “मी आपले मन स्वच्छ राखिले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचित हे सगळे व्यर्थ,” तो म्हणाला. पण मग त्याला भले मोठे अंतर्ज्ञान प्राप्त झाले: दुष्ट लोक “निसरड्या जागांवर उभे” असून विपत्तीच्या सीमेवर धडपडत आहेत!—स्तोत्र ७३:३, १३, १८.

पॉलीनने हा धडा शिकला—कठीण मार्गाने. मनसोक्‍त ऐश केल्यावर, तिने देवाची कृपा पुन्हा मिळवण्याकरता आपल्या जीवनात संपूर्ण बदल केला. दुसऱ्‍या बाजूला पाहता, ‘मौजमस्तीची’ अतिशय मोठी किंमत मोजावी लागते हे समजून घेण्यासाठी अटक करवून घेण्याची, लैंगिकरित्या संक्रमित होणारा एखादा रोग स्वतःला जडवून घेण्याची किंवा मादक पदार्थांच्या वेदनादायक व्यसननिवृत्ती लक्षणांतून गुजरण्याची तुम्हाला गरज नाही. मौजमजा करण्यासाठी, अशा जोखिमांपासून मुक्‍त असलेले इतर अनेक लाभदायक, उभारणीकारक मार्ग आहेत. त्यातील काही कोणते आहेत?

हितकर मौजमजा

अमेरिकी युवकांच्या एका सर्वेक्षणातून असे प्रकट झाले की, किशोरवयीनांना “अधूनमधून कौटुंबिक सहली आणि अशाच इतर कार्यहालचाली आवडतात.” कुटुंब मिळून काही करणे हे फक्‍त मजेचे नाही तर त्यामुळे कौटुंबिक एकता देखील वाढते.

याचा, एकत्र मिळून फक्‍त टीव्ही पाहण्यापेक्षाही अधिक काही अर्थ होतो. डॉ. अँथनी पीट्रोपिंटो म्हणतात: “टीव्ही इतरांसोबत पाहिला तरी खरं म्हणजे ती एक-एकट्यांचीच कार्यहालचाल असते ही त्यातील समस्या आहे. . . . तरीही, टीव्ही पाहण्यात आधुनिक कुटुंब जे दंग होऊन जाते त्यापेक्षा घरातील खेळ, अंगणातील खेळ, जेवणाची ट्रीट, हस्तकलेचे प्रकल्प आणि मोठ्याने केलेले वाचन यांमुळे दळणवळण, सहयोग आणि बौद्धिक प्रेरणेला वाव असतो.” सात मुलांचे पिता जॉन असे म्हणतात: ‘जर सबंध कुटुंबाने मिळून अंगणाची सफाई किंवा घराला रंग लावण्याची कामं केली तर ही कामं सुद्धा आनंददायक असू शकतात.’

तुमचे कुटुंब अशा गोष्टी एकत्र मिळून करत नसल्यास, पुढाकार घेऊन त्यांच्याबद्दल तुमच्या पालकांना सुचवा. कुटुंबाच्या सहली किंवा प्रकल्पांच्या काही मनोवेधक आणि रोमांचक कल्पनांचा विचार करण्याचा प्रयत्न करा.

तथापि, स्वतः मौजमजा करण्यासाठी तुम्हाला नेहमीच इतरांसोबत राहण्याची गरज नाही. आपल्या संगतीविषयी काळजीपूर्वक असणाऱ्‍या मेरीने एकटे राहून मौजमजा करण्याचे शिकून घेतले आहे. “मी पियानो आणि व्हायोलिन वाजवते आणि त्याचा सराव करण्यात काही वेळ घालवते,” असे ती म्हणते. शीतल, आणखी एक किशोरवयीन मुलगी असेच म्हणते: “मला आनंद मिळावा म्हणून कधी कधी मी गोष्टी किंवा कविता लिहिण्यात वेळ घालवते.” तुम्ही देखील वाचन, सुतारकाम किंवा एखादे वाद्य वाजवण्याच्या कुशलता विकसित करून आपल्या वेळेचा उपयुक्‍त वापर करण्यास शिकू शकता.

ख्रिस्ती एकत्रीकरणे

अधूनमधून, मित्रांसोबत एकत्र मिळणे देखील आनंददायी असू शकते. तसेच, अनेक ठिकाणी मनोरंजनाच्या पुष्कळ हितकर कार्यहालचाली आहेत. बोलिंग, स्केटींग, सायकल चालवणे, बेसबॉल आणि बास्केटबॉल ह्‍या कार्यहालचाली उत्तर अमेरिकेत सर्वसामान्य आहेत. याहूनही पुढे जाऊन तुम्ही एखाद्या वस्तूसंग्रहालयाला किंवा प्राणीसंग्रहालयाला भेट देऊ शकता. आणि हो, सह-ख्रिस्ती युवकांसोबत फक्‍त संगीत ऐकायला किंवा चांगला टीव्ही कार्यक्रम पाहायला देखील एकत्र येऊ शकता.

तुम्ही आपल्या पालकांना, एखादे औपचारिक एकत्रीकरण योजण्यासाठी देखील सांगू शकता. त्यामध्ये विविध गोष्टी म्हणजे पार्टी खेळ आणि समूह गायन अशा गोष्टी योजून त्यास मनोरंजक बनवा. जर तुमच्या कोणा मित्रांना वाद्य वाजवता येत असले, तर वाजवून दाखवण्यास त्यांना आग्रह केला जाऊ शकतो. चांगले जेवण देखील एखाद्या प्रसंगात आणखी रंगत आणते पण म्हणून पुष्कळ प्रकार किंवा खर्चीक असण्याची गरज नाही. काहीवेळा पाहुणे विविध खाद्यपदार्थ आणू शकतात.

बॉल खेळण्यासाठी किंवा पोहण्यासाठी जवळपास एखादे उद्यान किंवा असेच एखादे ठिकाण आहे का? तर मग सहल का काढू नये? पुन्हा एकदा, प्रत्येक कुटुंब जेवणाची व्यवस्था आपापसात करू शकते म्हणजे कोणा एकालाच आर्थिक भुर्दंड भोगावा लागणार नाही.

मर्यादशीलता ही गुरुकिल्ली आहे. संगीताचा आस्वाद घेण्याकरता ते कानठाळ्या बसण्याइतक्या जोरात असण्याची गरज नाही तसेच मजा यावी म्हणून नाचणे अश्‍लील किंवा कामुक असण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे, जीवघेणी स्पर्धा न करता घराबाहेरील खेळांचा आनंद लुटता येतो. तरीही, एक पालक असे सांगतात: “काही युवकांमध्ये इतकी बाचाबाची होते की ते अगदी मारामारी करण्यावरच उतरतात.” ‘एकमेकांना चिथावू’ नये हा बायबलचा सल्ला अनुसरून अशा कार्यहालचाली आनंददायक ठेवा.—गलतीकर ५:२६, पं.र.भा.

तुम्ही कोणाला आमंत्रण द्यावे? बायबल म्हणते, “बंधुवर्गावर प्रीति करा.” (१ पेत्र २:१७) तुमच्या एकत्रीकरणात फक्‍त समवयस्कांनाच का बोलवावे? आपला सहवास विशाल करा. (पडताळा २ करिंथकर ६:१३.) एका पालकाने निरीक्षिले: “सहसा, वयस्कर लोकांना, काही कार्यहालचालींमध्ये भाग घेता येत नसला, तरी ते निदान येऊन पाहण्याचा तरी आनंद मिळवू शकतात.” प्रौढांच्या उपस्थितीमुळे सहसा गोष्टी नियंत्रणाबाहेर जात नसतात. पण, सबंध ‘बंधुवर्गाला’ एकाच एकत्रीकरणात बोलावणे शक्य नसते. शिवाय, लहान एकत्रीकरणांवर नियंत्रण राखणे सोपे असते.

ख्रिस्ती एकत्रीकरणांमध्ये एकमेकांची आध्यात्मिक उभारणी करण्यास सुद्धा वाव मिळतो. हे खरे आहे, की काही युवकांच्या मते, एखाद्या एकत्रीकरणात आध्यात्मिक गोष्टी समाविष्ट केल्या तर सगळी मजा नाहीशी होते. एक ख्रिस्ती मुलगा तक्रार करतो, “आमचं एकत्रीकरण असतं तेव्हा, ‘चला, बायबल काढा आणि बायबल खेळ खेळा’ असंच असतं.” तथापि, स्तोत्रकर्ता म्हणाला: “जो पुरुष . . . परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो . . . तो धन्य.” (स्तोत्र १:१, २) म्हणून बायबलवर आधारित चर्चा—किंवा खेळ सुद्धा अतिशय आनंददायक असू शकतात. कदाचित, तुम्हाला फक्‍त शास्त्रवचनांबद्दल आपले ज्ञान तल्लख करण्याची गरज असेल जेणेकरून तुम्हाला आणखी जास्त सहभाग घेता येईल.

दुसरी एक कल्पना म्हणजे, विविध लोकांना ते ख्रिस्ती कसे बनले हे कथन करण्यास सांगणे. किंवा कोणाला तरी विनोदी गोष्टी सांगण्यास लावून उबदार आणि विनोदी वातावरण निर्माण करा. सहसा या गोष्टींमधून मौल्यवान धडे शिकायला मिळतात. एखाद्या एकत्रीकरणात, या पुस्तकातील काही अध्यायांच्या आधारे देखील मनोरंजक सामुहिक चर्चा केली जाऊ शकते.

करमणुकीमध्ये समतोल साधा

कधीतरी एकदा मौजमजा करण्याविषयी येशू ख्रिस्ताचा निश्‍चित विरोध नव्हता. तो कानामधील एका विवाहसोहळ्यास उपस्थित राहिला होता जेथे खाणेपिणे, संगीत, नाच आणि उभारणीकारक सहवास निःसंशये होते असे बायबल सांगते. येशूने तर चमत्कारिकपणे द्राक्षारस पुरवून तो विवाहसोहळा पार पाडण्यात हातभार देखील लावला!—योहान २:३-११.

पण, येशूच्या जीवनात फक्‍त पार्ट्याच पार्ट्या नव्हत्या. त्याने आपला पुष्कळसा वेळ आध्यात्मिक आस्थांच्या मागे, लोकांना देवाच्या इच्छेविषयी शिकवण्यात घालवला. तो म्हणाला: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.” (योहान ४:३४) तात्पुरत्या विरंगुळ्यापेक्षा देवाची इच्छा केल्यामुळे येशूला अधिक कायमस्वरूपी सुख लाभले. आजसुद्धा, ‘प्रभूच्या कामात पुष्कळ करण्याजोगे’ आहे. (१ करिंथकर १५:५८; मत्तय २४:१४) पण, अधूनमधून तुम्हाला करमणूक करावीशी वाटलीच तर संतुलित, हितकर मार्गाने ती करा. एका लेखकानुसार: “जीवनात सतत ॲक्शन आणि मनोरंजन असू शकत नाही—आणि तसं असलंच तर तुम्ही थकून गेला असता!”

[तळटीपा]

a तिचे खरे नाव नाही.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ काही ख्रिस्ती युवक जगिक युवकांचा हेवा का करतात? तुम्हाला कधी तसे वाटले आहे का?

◻ देव युवकांना त्यांच्या वर्तनाविषयी कोणता इशारा देतो आणि याचा त्यांच्या करमणुकीच्या निवडीवर कसा परिणाम झाला पाहिजे?

◻ देवाच्या नियमांचे आणि तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्‍या युवकांचा हेवा करणे मूर्खपणाचे का आहे?

◻ (१) कुटुंबाच्या सदस्यांसोबत, (२) स्वतः आणि (३) सह-ख्रिश्‍चनांसोबत हितकर करमणूक अनुभवण्याचे काही मार्ग कोणते आहेत?

◻ करमणुकीच्या बाबतीत येशू ख्रिस्ताने समतोलपणाचे उदाहरण कसे मांडले?

[२९७ पानांवरील संक्षिप्त आशय]

“तिथल्या मोठ्याने चालणाऱ्‍या संगीताने आणि झगमगणाऱ्‍या प्रकाशाने आकर्षित होऊन मी जाता जाता खिडकीमधून झाकून पाहायचे आणि त्यांच्यासारखीच मजा मलाही करता आली असती तर किती बरं झालं असतं अशी कल्पना करायचे”

[३०२ पानांवरील संक्षिप्त आशय]

“कुणीतरी गांजा आणला. मग दारू आणली. त्यावेळी मात्र वातावरण हाताबाहेर जाऊ लागलं”

[२९९ पानांवरील चित्र]

बायबल तत्त्वांचे अनुसरण करणारे युवक खरोखरच मौजमजा चुकवतात का?

[३०० पानांवरील चित्र]

एखादा छंद जोपासणे हा फावल्या वेळेचा उपयोग करण्याचा एक हितकर मार्ग आहे

[३०१ पानांवरील चित्र]

निरनिराळ्या कार्यहालचाली योजल्या जातात आणि विविध वयोगटातील लोक सामील होतात तेव्हा ख्रिस्ती एकत्रीकरणे अधिक आनंददायक असतात