मी काय वाचतो ते महत्त्वाचे आहे का?
अध्याय ३५
मी काय वाचतो ते महत्त्वाचे आहे का?
राजा शलमोनाने इशारा दिला: “ग्रंथरचनेला काही अंत नाही; बहुत ग्रंथपठण देहास शिणविते.” (उपदेशक १२:१२) शलमोन येथे वाचन करू नका असे म्हणत नव्हता; तो फक्त निवडक असण्याबद्दल तुम्हाला सल्ला देत होता.
सतराव्या शतकातील फ्रेंच तत्त्ववेत्ता रेनी डेसकार्टेस यांनी म्हटले: “उत्कृष्ट पुस्तके वाचणे गतकाळातील सुशिक्षित लोकांसोबत संभाषण करण्यासारखं असतं. त्यास निवडक संभाषण सुद्धा म्हणता येऊ शकेल ज्यामध्ये लेखक स्वतःच्या मते उत्तम असलेले विचार व्यक्त करतो.” तथापि, सर्वच लेखकांसोबत “संभाषण” करणे इष्ट नसते त्याचप्रमाणे त्यांचे सर्वच विचार काही “उत्तम” नसतात.
म्हणून सतत उद्धृत केले जाणारे बायबल तत्त्व पुन्हा एकदा लागू होते: “कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) होय, ज्या लोकांसोबत तुम्ही संगती ठेवता त्यांचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडू शकतो. आपल्या मित्रासोबत पुष्कळ वेळ घालवल्यावर तुम्ही त्याच्यासारखेच वागायला, बोलायला आणि विचार करायला लागलात असे तुमच्या लक्षात कधी आले का? तसे पाहिल्यास, पुस्तक वाचणे म्हणजे लेखकासोबत तासन्तास संभाषण करण्यासारखे आहे.
म्हणून मत्तय २४:१५ (पं.र.भा.) येथे येशूने दिलेले तत्त्व यथायोग्य आहे: “वाचणाऱ्याने समजून घ्यावे.” तुम्ही जे काही वाचता त्याचे परीक्षण करून त्याचे महत्त्व समजून घेण्यास शिका. सर्व मानव थोड्याफार प्रमाणात कलुषित असतात आणि नेहमीच वास्तविकतांचे अगदी हुबेहूब वर्णन देत नसतात. म्हणून, तुम्ही जे वाचता अथवा ऐकता ते सर्वच डोळे मिटून स्वीकारू नका: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.”—नीतिसूत्रे १४:१५.
जीवनातील कोणत्याही तत्त्वज्ञानाचे स्पष्टीकरण देणारे साहित्य वाचण्याविषयी तुम्ही विशेषतः सावध असले पाहिजे. उदाहरणार्थ, किशोरवयीनांसाठी असलेल्या नियतकालिकांमध्ये संकेतभेटींपासून विवाहपूर्व लैंगिक संबंधांपर्यंत सगळ्या विषयांवर सल्ला दिलेला असतो—तथापि, हा सल्ला एखाद्या ख्रिश्चनाकरता नेहमीच योग्य असतो असे नाही. त्याचप्रमाणे, गूढ तत्त्वज्ञान विषयक पुस्तकांबद्दल काय?
बायबल इशारा देते: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, . . . असलेले तत्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.” (कलस्सैकर २:८) बायबल, आणि या पुस्तकासारखीच इतर बायबल आधारित प्रकाशने आणखी उत्तम सल्ला पुरवतात.—२ तीमथ्य ३:१६.
रोमांस कादंबऱ्या—अनपायकारक वाचन?
एकट्या संयुक्त संस्थानांत, सुमारे २ कोटी लोकांना रोमांस कादंबऱ्या वाचण्याचा छंद आहे. अर्थात, देवानेच प्रेमात पडण्याची आणि विवाह करण्याची इच्छा पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये घातली. (उत्पत्ति १:२७, २८; २:२३, २४) म्हणून, बहुतांश कादंबऱ्यांमध्ये रोमांस इतक्या प्रामुख्याने सामावलेले असते यात काहीच आश्चर्य नाही, आणि हे नेहमीच आक्षेपार्ह नसते. काही रोमांस कादंबऱ्यांनी तर उत्कृष्ट साहित्य असण्याची ख्यातीही मिळवली आहे. पण, आधुनिक दर्जांनुसार या जुन्या कादंबऱ्या नीरस मानल्या जात असल्यामुळे, अलीकडील लेखकांना नवीन प्रकारच्या रोमांस कादंबऱ्या काढणे फायदेकारक वाटले आहे. कथेला आणखी रंगत आणि मूड यावा म्हणून काहीजण अजूनही ऐतिहासिक किंवा मध्यकालीन सेटिंग वापरतात. इतर, समकालीन शैली आणि सेटिंग वापरतात. तथापि, कमीअधिक फेरबदल असलेल्या या आधुनिक रोमांस कादंबऱ्यांचे तेच रटाळ कथानक असते: नुकतेच प्रेमात पडलेले हिरो-हिरोईन आपल्यासमोर येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत असतात.
हिरो देखणा, मगरूर आणि सहसा अतिशय आत्मविश्वासी असतो. पण हिरोईन मात्र नाजूक आणि भोळीभाबडी, बहुधा हिरोपेक्षा वयाने १० ते १५ वर्षे लहान असते. सहसा, तो तिच्याशी तुसडेपणाने वागत असला, तरी ती त्याच्यावर इतकी भाळलेली असते की तिला त्याच्याविना राहावत नसते.
एक दिवाना प्रतिस्पर्धी देखील असतोच. तो जरी नम्र आणि सभ्य असला, तरी हिरोईनला आपल्या प्रेमपाशात अडकवण्यास किंवा भुलवण्यास तो यशस्वी होत नाही. पण हिरोईन मात्र आपल्या निर्मोही हिरोवर जिवापाड
प्रेम करत राहते आणि शेवटी तिच्या सौंदर्याच्या जादूने त्याच्या पाषाणहृदयाला पाझर फुटतो व तो तिच्याविषयी आपले चिरंतन प्रेम असल्याचे उघडपणे कबूल करतो. पूर्वीची चूक-भूल माफ करून ते आनंदाने लग्न करतात आणि सुखाने नांदू लागतात . . .प्रेम हे प्रणय कथांप्रमाणे असते का?
अशा काल्पनिक कथा वाचल्याने वास्तविकतेविषयीचा तुमचा दृष्टिकोन अस्पष्ट होऊ शकतो का? १६ वर्षांच्या वयापासून, रोमांस कादंबऱ्या वाचू लागलेली काजल आठवून सांगते: “उंच, सावळ्या आणि देखण्या; मोहून टाकणाऱ्या, भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या तरुणाचा मी शोध करू लागले.” ती कबूल करते: “मी एखाद्या तरुणाशी संकेतभेटी करत असले, आणि तो शालीन व सभ्य असला तरीपण त्याने जर चुंबन घेतले नाही किंवा स्पर्श केला नाही तर तो नीरस वाटायचा. मी कादंबऱ्यांमध्ये वाचली होती तशीच रोमांचकता मला हवी होती.”
आपल्या विवाहानंतरही काजल रोमांस कादंबऱ्या वाचत राहिली आणि ती म्हणते: “माझा सुखी संसार आणि कुटुंब होतं, पण ते पुरेसं वाटत नव्हतं . . . कादंबऱ्यांमध्ये वर्णन केलेली शिरशिरी, रोमांचकता आणि रोमहर्ष मला हवा होता. माझ्या विवाहात काहीतरी कमी पडतंय असं मला वाटू लागलं.” तथापि, बायबलच्या साहाय्याने काजलला हे समजले की, फक्त आकर्षक किंवा ‘रोमांचक’ असून फायदा नाही तर पतीने आपल्या पत्नीला त्यापेक्षा अधिक काही दिले पाहिजे. ते म्हणते: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वत:वरच प्रीति करितो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही; तर तो त्याचे पालनपोषण करितो.”—इफिसकर ५:२८, २९.
तसेच रोमांस कादंबऱ्यांचे तेच ते विषय, अशक्य कोटीतील काल्पनिक शेवट आणि मतभेदांवरील सहज उपाय यांबद्दल काय? ती मुळीच वास्तविक नसतात. काजल आठवून सांगते: “माझ्या पतीसोबत वाद झाला की, त्याच्यासोबत बातचीत करण्याऐवजी मी हिरोईनच्या लकबी अनुसरायचे. मग माझ्या पतीने हिरोसारखा प्रतिसाद दिला नाही की मी चिडायचे.” “स्त्रियांनो, . . . तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा,” असा हा बायबलचा सल्ला पत्नींकरता अधिक वास्तविक आणि व्यावहारिक नव्हे का?—कलस्सैकर ३:१८.
लैंगिक मजकूर
रंजक गोष्ट अशी, की किशोरवयीन, काही शहरांमधील सार्वजनिक पुस्तकालयांमध्ये उपलब्ध असलेल्या लैंगिकतेविषयी प्रक्षोभक रोमांस कादंबऱ्या अधिक मागवतात. त्या तुमच्याकरता हानीकारक ठरू शकतात का? १८ वर्षांची कॅरेन म्हणते: “त्या पुस्तकांमुळे खरंच तीव्र कामोत्तेजना आणि उत्सुकता वाटायची. हिरोसोबतच्या कामुक दृश्यात हिरोईनला जो अत्यानंद आणि परमसुख वाटायचं ते मी अनुभवावं अशी मला आसक्ती वाटू लागली. म्हणून, संकेतभेटी करताना,” ती म्हणते, “मी त्याच संवेदना पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे मी व्यभिचार केला.” पण, तिचा अनुभव तिने वाचलेल्या आणि कल्पना केलेल्या हिरोईन्सप्रमाणे होता का? कॅरेनला आढळले: “या भावना लेखकांच्या मनातील कल्पना असतात. त्या वास्तविक नसतात.”
खरे म्हणजे, कामवासनेच्या कल्पना निर्माण करणे हा काही लेखकांचा हेतू असतो. एक प्रकाशक रोमांस कादंबऱ्यांच्या लेखकांना कोणत्या सूचना देतो त्या जरा पाहा: “कामुक दृश्यांमध्ये, हिरोच्या चुंबनांनी आणि स्पर्शांनी निर्माण होणाऱ्या वासनांवर आणि चेतवणाऱ्या संवेदनांवर जास्त भर देण्यात यावा.” लेखकांना आणखी असा सल्ला दिला जातो की, प्रणय कथांमुळे “वाचकात, रोमांच, तणाव आणि तीव्र भावनिक व विषयासक्त प्रतिसाद निर्माण झाला पाहिजे.” स्पष्टतः, अशाप्रकारचे वाचन केल्याने “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना . . . हे जिवे मारा,” हा बायबलचा बोध अंगीकारण्यास एखाद्याला मदत होणार नाही.—कलस्सैकर ३:५.
निवडक असणे
म्हणून, अनैतिक भावना चेतवणाऱ्या किंवा अवास्तविक अपेक्षा उत्पन्न करणाऱ्या कादंबऱ्या टाळणे सर्वात उत्तम. त्याऐवजी इतर प्रकारची पुस्तके जसे की इतिहासाची किंवा विज्ञानाची पुस्तके का वाचू नयेत बरे? कथा
सवंग असतात असे नाही, कारण अशा कथा-कादंबऱ्या असतात की ज्या केवळ मनोरंजकच नव्हे तर त्यांचे शैक्षणिक मूल्य देखील असते. पण एखाद्या कादंबरीत लैंगिकता, अर्थहीन हिंसा, गूढ चालीरीती, किंवा लैंगिक स्वैराचारी, निर्दयी अथवा स्वार्थी असणाऱ्या ‘हिरोंचा’ उल्लेख असल्यास, त्या वाचण्यात आपला वेळ का वाया घालवावा?म्हणून जपा. एखादे पुस्तक वाचण्याआधी त्याचे मुखपृष्ठ आणि पुस्तकावरील आवरण नीट तपासा; त्या पुस्तकात काही आक्षेपार्ह आहे का ते पाहा. पण, दक्षता बाळगल्यावरही जर पुस्तक अहितकर निघालेच तर ते पुस्तक टाकण्याचे नैतिक सामर्थ्य बाळगा.
याच्या उलट, बायबल आणि बायबलसंबंधी प्रकाशने वाचल्याने तुमचे नुकसान नव्हे तर लाभच होईल. उदाहरणार्थ, एका जपानी मुलीने म्हटले की, बायबल वाचल्याने आपल्या मनातून लैंगिक विचार काढून टाकण्यास तिला मदत मिळाली—जी समस्या सहसा युवकांमध्ये आढळते. “मी नेहमी बायबल अगदी माझ्या उशीजवळच ठेवते आणि झोपण्याआधी ते नक्की वाचते,” असे ती म्हणते. “एकटी असताना आणि काहीच करत नसते तेव्हा (जसं की झोपी जाताना) माझ्या मनात काहीवेळा असे लैंगिक विचार येतात. अशावेळी बायबल वाचलं की मला खरोखर मदत मिळते!” होय, बायबलमधील विश्वासू लोकांसोबत “संभाषण” केल्याने तुम्हाला नैतिक बळकटी मिळू शकते आणि तुमच्या आनंदात आणखीनच भर पडू शकते.—रोमकर १५:४.
चर्चेसाठी प्रश्न
◻ वाचनाच्या साहित्याविषयी तुम्ही निवडक का असावे?
◻ रोमांस कादंबऱ्या युवकांच्या इतक्या मनपसंत का असतात? पण त्यांचे कोणते धोके आहेत?
◻ तुम्ही उचित वाचन साहित्य कसे निवडू शकता?
◻ बायबल आणि बायबल आधारित प्रकाशने वाचण्याचे काही लाभ कोणते आहेत?
[२८७ पानांवरील संक्षिप्त आशय]
“माझा सुखी संसार आणि कुटुंब होतं, पण ते पुरेसं नव्हतं . . . कादंबऱ्यांमध्ये वर्णन केलेली शिरशिरी, रोमांचकता आणि रोमहर्ष मला हवा होता. माझ्या विवाहात काहीतरी कमी पडतंय असं मला वाटू लागलं”
[२८३ पानांवरील चित्र]
इतकी हजारो पुस्तके उपलब्ध असल्यामुळे, निवडक असण्याची गरज आहे
[२८५ पानांवरील चित्र]
रोमांस कादंबऱ्यांसारखी पुस्तके वाचण्यात लोक तल्लीन होऊ शकतात पण ती प्रेम व विवाहाविषयीचा श्रेयस्कर दृष्टिकोन शिकवतात का?