प्रश्न १
माझी ओळख काय आहे?
तुम्ही काय केलं असतं?
कल्पना करा: कॅरनला पार्टीला येऊन फक्त दहाच मिनिटं झाली आहेत. आणि तिला मागून ओळखीचा आवाज ऐकू येतो.
“इथं एकटीच काय उभी आहेस?”
कॅरन मागे वळते आणि पाहते तिची मैत्रीण जेसीका, हातात दोन बियरच्या बॉटल्स घेऊन उभी आहे. एक बॉटल पुढे करत ती म्हणते, “एवढी मज्जा तर आपण करूच शकतो, नाही का?”
खरं पाहिलं तर कायद्यानुसार कॅरनचं वय मद्यपान करण्याचं नाही. पण जेसीका तिची मैत्रीण असल्यामुळे कॅरन विचार करते की तिला वाटू नये ‘ही अगदीच बोरींग आहे’. तसंपण जेसिका एक चांगली मुलगी आहे. तिनं जर पिण्याचं ठरवलं असेल तर ते चुकीचं नक्कीच नसेल. कॅरन स्वतःचीच समजूत काढते ‘फक्त बियरच तर आहे, मी काही ड्रग्स वगैरे घेत नाहीये.’
तुम्ही कॅरनच्या जागी असता तर काय केलं असतं?
थांबा आणि विचार करा!
अशी परिस्थिती उद्भवल्यास, योग्य निर्णय घेण्यास तुम्हाला कशामुळे मदत मिळेल? तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे, की तुमची स्वतःची ओळख काय आहे. तुमची ओळख म्हणजे तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात. तुम्ही कोणत्या गोष्टींवर विश्वास करता, तुमची मूल्यं काय आहेत, तसंच कोणत्या तत्त्वांनुसार तुम्ही जगता या सर्व गोष्टींची जाणीव असणं गरजेचं आहे. ही जाणीव असल्यास, इतर कुणाच्या बोलण्यानुसार नाही, तर आपले निर्णय स्वतः घेण्यास आपण सक्षम असू.—१ करिंथकर ९:२६, २७.
अशा प्रकारचं बळ तुम्हाला कुठून मिळेल? पुढील प्रश्नांवर विचार केल्यास तुम्हाला मदत होईल.
१ माझ्यात कोणते चांगले गुण आहेत?
तुमचे चांगले गुण, क्षमता तुम्हाला माहीत असल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल.
बायबलमधील उदाहरण: बायबलमधील एका पुस्तकाचा लेखक पौल, याने असं लिहिलं: मी “जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसा नाही.” (२ करिंथकर ११:६) पौलाला शास्त्रवचनांचं चांगलं ज्ञान होतं. त्यामुळे जरी इतरांनी त्याला नावं ठेवली तरी तो ठाम राहिला. त्यांच्या नकारात्मक बोलण्यामुळे, त्याने आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही.—२ करिंथकर १०:१०; ११:५.
आत्मपरीक्षण करा: दिलेल्या जागेत तुमच्यात असलेलं एखादं कौशल्य लिहा.
आता तुमच्या एका चांगल्या गुणाबद्दल लिहा. (उदाहरणार्थ: प्रेमळ, उदार, भरवशालायक, दिलेली वेळ पाळणं)
२ माझ्यात कोणत्या कमतरता आहेत?
ज्या प्रकारे एखाद्या मजबूत साखळीतील एक कडी कमजोर असल्यास साखळी तुटू शकते, त्याच प्रकारे तुमच्यात असलेल्या एखाद्या कमतरतेवर जर तुम्ही मात केली नाही तर तुमचं चांगलं नाव खराब होऊ शकतं.
बायबलमधील उदाहरण: पौलाला आपल्या कमतरतांची जाणीव होती. त्याने असं लिहिलं: “माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो; तरी माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.”—रोमकर ७:२२, २३.
आत्मपरीक्षण करा: तुमच्या कोणत्या कमतरतांवर तुम्हाला मात करायची आहे?
३ माझी ध्येयं कोणती आहेत?
तुम्ही गाडीत बसून ड्रायव्हरला पेट्रोल संपेपर्यंत, नुसतंच एका इमारतीच्या भोवती गोल-गोल फिरायला सांगाल का? असं करणं शहाणपणाचं ठरणार नाही आणि महागसुद्धा पडेल!
आपण काय शिकतो? जीवनात ध्येयं असतील तर आपल्याला दिशा मिळेल आणि आपण उगाच फिरत राहणार नाही. कारण आपल्याला जीवनात काय करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कशी योजना करायला पाहिजे हे आपल्याला माहीत असेल.
बायबलमधील उदाहरण: पौलाने असं लिहिलं: “मीही . . . अनिश्चितपणे धावत नाही.” (१ करिंथकर ९:२६) जीवनाच्या प्रवाहात असंच वाहत राहण्याऐवजी पौलाने ध्येयं ठेवली आणि त्यानुसार तो आपलं जीवन जगला.—फिलिप्पैकर ३:१२-१४.
आत्मपरीक्षण करा: अशा तीन ध्येयांविषयी लिहा जी तुम्हाला पुढील वर्षभरात गाठायची आहेत.
४ माझी ठाम मतं काय आहेत?
तुमची मतं ठाम नसतील तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. सरडा सहसा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे रंग बदलतो. त्याचप्रमाणे तुम्हीही सोबत्यांमध्ये मिसळण्यासाठी त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, तर याचा अर्थ तुमची स्वतःची वेगळी ओळख नाही.
पण याउलट जेव्हा तुमचं वागणं तुमच्या ठाम मतांवर आधारित असतं, तेव्हा इतरांचा तुमच्यावर प्रभाव पडत नाही; म्हणजे तुम्ही तुमची ओळख टिकवून ठेवता.
बायबलमधील उदाहरण: संदेष्टा दानीएल तरुण असताना आपल्या कुटुंबापासून दूर होता. असं असलं तरी त्याने देवाचे नियम पाळण्याचा आपल्या मनात “निश्चय केला” होता. (दानीएल १:८) यामुळे तो स्वतःच्या मतांवर ठाम राहिला.
आत्मपरीक्षण करा: तुमची कोणती ठाम मतं आहेत? जसं की, तुमचा देवावर विश्वास आहे का? तुमचा विश्वास कोणत्या गोष्टींवर आधारित आहे? कोणत्या पुराव्यांमुळे तुमची खातरी पटली आहे की देव खरोखरंच अस्तित्वात आहे?
चांगल्या वागणुकीबद्दल देवाने दिलेले दर्जे तुमच्या भल्यासाठीच आहेत, असा तुमचा विश्वास आहे का? जर असा विश्वास आहे तर का?
तुम्हाला हलक्याशा वाऱ्यानं इथं-तिथं सहज उडत जाणाऱ्या एका सुकलेल्या पानासारखं व्हायला आवडेल, की एका मजबूत झाडासारखं जे प्रचंड वादळातदेखील टिकून राहतं? आपली ओळख पक्की केल्यानं तुम्ही त्या झाडासारखे व्हाल, आणि ‘माझी ओळख काय आहे?’ या प्रश्नाचं उत्तरही देऊ शकाल.