व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्न ४

मी आपल्या चुका कशा सुधारू शकतो?

मी आपल्या चुका कशा सुधारू शकतो?

हे जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?

चूक कबूल केल्यामुळे तुम्ही आणखी भरवशालायक आणि जबाबदार व्यक्ती बनता.

तुम्ही काय केलं असतं?

कल्पना करा: टिम, हा आपल्या मित्रांसोबत खेळत आहे. तो बॉल फेकतो आणि तो बॉल शेजाऱ्यांच्या कारच्या काचेला लागतो आणि गाडीची काच खळकन्‌ फुटते.

तुम्ही टिमच्या जागी असता तर काय केलं असतं?

थांबा आणि विचार करा!

तुमच्याकडे तीन पर्याय आहेत:

  1. १. तिथून पळून जा.

  2. २. दुसऱ्याचं नाव सांगा.

  3. ३. शेजाऱ्यांना त्याबद्दल सांगा आणि झालेलं नुकसान भरून द्या.

तुम्ही कदाचित पर्याय १ निवडाल. पण आपली चूक कबूल करणं, मग ते काच फोडण्याबाबतीत असो किंवा इतर कुठलीही चूक असो ती कबूल करणं योग्य ठरेल.

आपली चूक कबूल का करावी याची तीन कारणं

  1. १. चूक कबूल करणं योग्य आहे.

    बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “सर्व बाबतीत चांगले [“प्रामाणिकपणे,” NW] वागण्याची आमची इच्छा” आहे.—इब्री लोकांस १३:१८.

  2. २. आपली चूक कबूल करणाऱ्यांना सहसा लोक माफ करतात.

    बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते.”—नीतिसूत्रे २८:१३.

  3. ३. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं करणं देवाला आवडतं.

    बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे.”—नीतिसूत्रे ३:३२.

करीना २० वर्षांची आहे. गाडी वेगाने चालवून नियम तोडल्याबद्दल पोलिसांनी तिला दंडाची पावती दिली. ही गोष्ट तिने बाबांना सांगितली नाही. करीना याविषयी म्हणते, “जवळपास एका वर्षांनंतर बाबांच्या हाती ती पावती लागली, झालं! त्यानंतर तर मला एवढा ओरडा पडला की विचारूच नका!”

करीना यातून काय शिकली? ती म्हणते: “आपल्या चुका लपवल्या तर आपण आणखीनच समस्या वाढवतो. त्या वेळी जरी त्या लपवल्या, तरी नंतर त्यांची किंमत मोजावीच लागते!”

आपल्या चुकांपासून आपण काय शिकू शकतो

बायबलमध्ये म्हटलं आहे: “आपण सगळेच पुष्कळ चुका करतो.” (याकोब ३:२) आणि आधी पाहिल्याप्रमाणे, लगेच चुका कबूल करून आपण दाखवतो की आपण नम्र व जबाबदार आहोत.

आपण चुका कबूल करतो, तेव्हा पहिलं पाऊल उचलतो. दुसरं पाऊल म्हणजे आपल्या चुकांपासून आपण एक धडा शिकतो. वेरा नावाची मुलगी म्हणते: “प्रत्येक वेळी जेव्हा मी चुकते तेव्हा त्यातून काहीतरी धडा शिकते आणि त्यामुळे मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत होते. आणि पुढे तसाच प्रसंग उद्‌भवला, तर तो मी आणखी चांगल्या रीतीने हाताळू शकते.” चला पाहू या तुम्हीही हे कसं करू शकता.

तुम्ही बाबांची बाईक घेतली आणि तिचा अॅक्सिडंट झाला. बाईकचं नुकसान झालं आता तुम्ही काय कराल?

  • याविषयी कुणालाच सांगणार नाही. बाबांना चुकूनही ते कळायला नको असा विचार कराल.

  • जे काही घडलं त्याबद्दल बाबांना सांगाल.

  • बाबांना सांगाल, पण त्यात आपली काहीच चूक नव्हती समोरचाच नीट चालवत नव्हता अशी थाप माराल.

तुम्ही अभ्यास केला नसल्यामुळे परीक्षेत नापास होता. आता तुम्ही काय कराल?

  • पेपर नीट सेट केला नव्हता, कठीण होता असं म्हणाल.

  • नीट अभ्यास केला नाही म्हणून नापास झालो हे कबूल कराल.

  • टिचरचा नाहीतरी माझ्यावर राग होताच म्हणून तिने मला नापास केलं, असा विचार कराल.

झालेल्या चुकांबद्दल विचार करत राहणं हे गाडी चालवताना मागे पाहण्यासाठी असलेल्या आरशात एकटक बघत राहण्यासारखं आहे

आता असा विचार करा, की तुम्ही पहिल्या दृश्यात बाबा आहात आणि दुसऱ्या दृश्यात टिचर आहात. तुम्ही चूक कबूल केली तर तुमच्या बाबांना आणि टिचरला तुमच्याबद्दल काय वाटेल? तुम्ही आपली चूक लपवली तर त्यांना कसं वाटेल याबद्दल विचार करा.

मागच्या वर्षी तुमच्या हातून कोणती चूक झाली होती ते आठवा आणि पुढील प्रश्नांची उत्तरं द्या.

काय चुकलं? आणि तुम्ही काय केलं?

  • कुणाला काहीच सांगितलं नाही.

  • दुसऱ्याचं नाव सांगितलं.

  • आपली चूक कबूल केली.

तुम्ही चूक कबूल केली नाही तेव्हा तुम्हाला कसं वाटलं?

  • बरं झालं वाचलो कुणाला कळलंच नाही!

  • खरं-खरं सांगायला हवं होतं, म्हणून मन सतत खात होतं.

जे झालं त्याला तुम्ही व्यवस्थित रीत्या कसं हाताळू शकला असता?

तुमच्या हातून चूक घडली खरी, पण त्यातून तुम्ही काय शिकलात?

तुम्हाला काय वाटतं?

काही लोक आपली चूक कबूल करायला का घाबरतात?

तुम्ही नेहमीच आपली चूक लपवण्याचा प्रयत्न करता, हे लोकांना कळलं तर ते तुमच्याबद्दल काय विचार करतील?

तुमच्या हातून चूक झाल्यावर तुम्ही ती कबूल करता हे लोकांना माहीत असलं तेव्हा ते तुमच्याबद्दल काय विचार करतील?—लूक १६:१०.