व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्न ३

मी माझ्या आई-बाबांशी कसं जुळवून घेऊ शकतो?

मी माझ्या आई-बाबांशी कसं जुळवून घेऊ शकतो?

हे जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?

तुम्ही जितकं जास्त आपल्या आई-बाबांशी जुळवून घ्याल तितकंच तुमचं जीवन सोपं होईल.

तुम्ही काय केलं असतं?

कल्पना करा: बुधवारचा दिवस आहे, दुपारची वेळ आहे. १७ वर्षांचा जेफ्री आपली कामं संपवून आता कुठं मोकळा झाला आहे. थोडा वेळ आराम तर मिळायलाच हवा, म्हणून तो आपल्या आवडत्या खुर्चीवर बसून टी.व्ही लावतो.

तेवढ्यात बाबा आत येतात आणि जेफ्रीला तिथं बसलेला पाहून चिडतात.

“जेफ्री! इथं टी.व्ही समोर बसून वेळ काय वाया घालवतोयस, त्यापेक्षा आपल्या लहान भावाला होमवर्क पूर्ण करण्यासाठी मदत कर! तुला सांगितलेली एकही गोष्ट तू ऐकत नाहीस!”

“झालं सुरू यांचं,” असं जेफ्री पुटपुटतो पण त्याचं बोलणं त्यांना स्पष्ट ऐकू येतं.

बाबा थोडं पुढे येऊन म्हणतात, “काय बोललास, परत बोल एकदा?”

“मी कुठं काय बोललो!” जेफ्री डोळे फिरवून बोलतो.

आता मात्र बाबांचा पारा आणखी चढतो. “माझ्याशी बोलताना नीट बोल जरा!” असं ते त्याला खडसवून सांगतात.

समजा तुम्ही जेफ्रीच्या जागी असता तर तुम्ही हा वाद कसा टाळू शकला असता?

थांबा आणि विचार करा!

आपल्या आई-बाबांशी बोलणं गाडी चालवण्यासारखं आहे. गाडी चालवता-चालवता समजा समोर “रस्ता बंद” असा बोर्ड दिसला तर तिथंच थांबण्यापेक्षा तुम्ही गाडी वळवून दुसरा रस्ता शोधून, पुढे जाऊ शकता.

एक उदाहरण पाहू या:

“बाबांशी बोलणं कठीणच आहे. कधीकधी त्यांच्याशी बोलत असताना थोड्या वेळाने ते मला विचारतात, ‘तू मला काही सांगत होतीस का? सॉरी माझं लक्ष नव्हतं.’” असं लिआ नावाची मुलगी म्हणते.

लिआकडे कमीतकमी तीन पर्याय आहेत.

  1. १. ती बाबांवर चिडू शकते.

    लिआ ओरडते, “काय हो बाबा! मी तुम्हाला इतकी महत्त्वाची गोष्ट सांगत होते!”

  2. २. बाबांशी बोलायचं सोडून देऊ शकते.

    लिआ कंटाळते आणि तो विषय तिथंच थांबवते.

  3. ३. योग्य वेळेची वाट पाहून पुन्हा तो विषय बाबांसमोर मांडू शकते.

    लिआ नंतर बाबांशी समोरासमोर बोलते किंवा आपल्या प्रॉब्लमविषयी त्यांना लिहिते.

तुम्ही लिआला कुठला पर्याय सुचवाल?

हे लक्षात घ्या: लिआच्या बाबांचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं आणि त्यामुळे ती का वैतागलेली आहे हे त्यांना माहीत नाही. जर लिआ पर्याय १ निवडते, तर ती त्यांच्यावर का ओरडली ते त्यांना कळणारच नाही. या पर्यायामुळे लिआ काय सांगण्याचा प्रयत्न करतेय हे त्यांना समजणार नाही. शिवाय, तिच्या या वागण्यामुळे त्यांचा अनादर होईल. (इफिसकर ६:२) त्यामुळे हा पर्याय निवडल्यानं कुणाचाच फायदा होणार नाही.

जर रस्ता बंद असेल तर आपण दुसरा रस्ता शोधतो, तसंच आई-बाबांशी जुळवून घेण्याचा मार्गदेखील तुम्ही शोधून काढू शकता

पर्याय २ सोपा वाटत असला, तरी तो योग्य ठरणार नाही. का बरं? आपले प्रॉब्लम्स नीट सोडवता यावेत यासाठी तिला बाबांशी बोलावं लागेल. आणि बाबांना तिला तेव्हाच मदत करता येईल जेव्हा तिला नेमकं कशाची गरज आहे, किंवा तिला कुठली गोष्ट सतावत आहे हे त्यांना माहीत असेल. गप्प बसल्यानं काहीच साध्य होत नाही.

पर्याय ३ निवडला, तर लिआ एका अर्थानं “रस्ता बंद” याला शेवट समजणार नाही. याउलट ती योग्य वेळी तो विषय काढायचं ठरवेल. आणि तिने त्यांना पत्र लिहून सांगण्याचं ठरवलं असेल, तर तेही योग्यच असेल. कारण तिने आपल्या भावना कागदावर उतरवल्यामुळे तिचं मन हलकं होईल.

पत्राद्वारे सांगितल्यामुळे तिला नेमकं काय म्हणायचं आहे ते ती नीट सांगू शकेल. लिआचे बाबा जेव्हा ते पत्र वाचतील तेव्हा त्यांना हे समजेल की, त्या वेळी ती त्यांना नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे ते तिची परिस्थिती नीट समजून घेतील. म्हणून पर्याय ३ हा लिआ आणि तिचे बाबा या दोघांसाठी फायद्याचा ठरू शकतो. समोरासमोर बोलणं किंवा पत्राद्वारे आपले विचार कळवणं हे पर्याय बायबलमधील सल्ल्यानुसार आहेत. त्यामध्ये म्हटलं आहे, “शांतीला  . . . पोषक होणाऱ्या गोष्टींच्या मागे आपण लागावे.”—रोमकर १४:१९.

लिआकडे आणखी कोणते पर्याय असू शकतात?

आणखी एखाद्या पर्यायाविषयी विचार करा. मग विचार करा की या पर्यायाचे काय परिणाम होतील.

जे मनात आहे ते स्पष्ट बोला

तुम्ही आपल्या आई-बाबांना जे सांगितलं आणि त्यांना जे समजलं यामध्ये बराच फरक असू शकतो.

जसं की:

आज तुझा मूड का खराब आहे? कॉलेजमध्ये काही झालं का? असं आई-बाबांनी तुम्हाला विचारलं पण तुम्ही असं उत्तर दिलं “काही नाही.”

तर त्यांना तुम्ही असं म्हटल्यासारखं वाटेल: “तुम्हाला नाही समजणार माझा प्रॉब्लम, मला कसं वाटतंय हे तुमच्यापेक्षा माझे मित्रच चांगलं समजू शकतात.”

समजा तुमच्यासमोर एक कठीण समस्या आहे आणि तुमचे आई-बाबा तुम्हाला मदत करू इच्छितात पण जर तुम्ही असं म्हटलं “तुम्ही काळजी करू नका, मी काढेन यातून काहीतरी मार्ग.”

  • तर त्यांना काय वाटू शकतं?

  • याऐवजी तुम्ही काय म्हणू शकला असता?