अंतःकरणापासून आदर मिळवणारा पती
अध्याय ४
अंतःकरणापासून आदर मिळवणारा पती
१, २. आदर कसा प्राप्त होतो, आणि हे येशू ख्रिस्ताकरवी कसे उत्तम प्रकारे विवेचीत आहे?
आदर, हा कोणा एकास तुम्ही मान देण्याचा हुकूम करून प्राप्त होत नसतो. तर तुमचे बोलणे व वागणे तसेच तुम्ही जे काही आहात त्यानुसार तुम्ही आदर मिळवत असता.
२ याचे उत्तम उदाहरण ख्रिस्त येशूमध्ये सापडते. शिक्षण देण्याच्या त्याच्या पद्धतीद्वारे त्याने उत्तम शिक्षक असल्याचा आदर मिळवला. डोंगरावरील त्याचे प्रवचन संपल्यावर “लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले.” त्याला तो आदर कशामुळे प्राप्त झाला? इतर व्यर्क्तिच्या विचारांवर नव्हे तर तो देवाचे वचन पवित्र शास्त्रावर आधारित राहिल्यामुळे मिळाला. त्याचा मुख्य आधार यहोवा देव व त्याचे सत्य वचन, हा होता. येशूने त्याचे मित्र व शत्रू या दोघांकडूनही आदर मिळवला.—मत्तय ७:२८, २९; १५:१-९; योहान ७:३२, ४५, ४६.
३. इफिसकर ५:३३ पत्नीवर कोणती जबाबदारी ठेवते, आणि याकरता पतीला काय करण्यास हवे?
३ इफिसकर ५:३३ [NW] मध्ये सूचना दिली आहे की “पत्नीने आपल्या पतीचा अंतःकरणापासून आदर करावा.” पण हा आदर मिळवण्यात पतीने मेहनती असण्यास हवे; नाहीतर या सुचनेनुसार असण्यात त्याच्या पत्नीला फार कठीण जाईल. हा आदर मिळवण्यास, पवित्र शास्त्रात आखून दिल्याप्रमाणे पती आपली भूमिका कशी पूर्ण करू शकतो?
योग्य प्रकारे मस्तकपद चालवणे
४. पवित्र शास्त्र पतीला कोणते स्थान देते?
४ विवाह योजनेत पवित्र शास्त्र पतीला मस्तकपद नेमून म्हणते: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या, अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपआपल्या पतीच्या अधीन असावे.” (इफिसकर ५:२२-२४) मग ही योजना कुटुंबाच्या सौख्यानंदात खरोखरची भर टाकणारी असेल का? काही स्त्रिया ज्याला त्या पुरूषी मर्दुमकी म्हणतात त्याविरूद्ध बोलतात. ही मर्दुमकी म्हणजेच स्त्रियासोबतच्या नातेसंबंधात त्यांचा जो दर्जा त्याबद्दलची निरर्थक फुशारकी किंवा अभिमान बाळगावयाचा. असे जरी असले तरी असल्या प्रकारातील पुरूषी मर्दुमकीला पवित्र शास्त्र पाठिंबा देत नाही.
५. मस्तकपदाबद्दल पतीने काय ओळखून असावे, आणि कोणाचे उदाहरण अनुसरावे?
५ पवित्र शास्त्र या गोष्टीवर जोर देते की, फक्त स्त्री नव्हे तर पुरूषही मस्तकपदाच्या अधीन आहे. पवित्र शास्त्रातील, पहिले करिंथकर अध्याय ११ व ३ रे वचन आम्ही पाहिले तर त्यात प्रेषित पौलाने पुढील शब्द करिंथकरास लिहिलेले आढळतात: “प्रत्येक पुरूषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरूष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे. हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.” पुरूषाच्या मस्तकपदी ख्रिस्त आहे म्हणून मस्तक या नात्याने देव आणि ख्रिस्त यांच्याकडून उदाहरण आणि शिक्षक म्हणून तुम्ही, म्हणजेच पतीने, मस्तकपद कसे चालवावयाचे हे शिकले पाहिजे.
६. यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्याकडून मस्तकपदाबद्दल पती काय शिकू शकतात?
६ यहोवा, ख्रिस्तावर जे मस्तकपद चालवतो ते वात्सल्यपूर्णतेतील आहे आणि त्याच्या प्रतिसादास ख्रिस्ताचे म्हणणे होते, “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे.” (स्तोत्रसंहिता ४०:८; इब्रीयांस १०:७) येशू ख्रिस्ताचे मस्तकपदही प्रेमळ आहे. जे कोणी त्याचे शिष्य बनतात त्यांना तो म्हणतो: “मी मनाचा सौम्य व लीन आहे . . . माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल.” (मत्तय ११:२९) जिला शास्त्रवचने वधुसमान संबोधतात त्या त्याच्या मंडळीच्या सदस्यांना त्याच्या मस्तकपदाखाली असला विसावा खरोखरी प्राप्त झालेला आहे. त्याने त्यांचा स्वार्थीपणाने उपयोग करून घेतला नाही तर त्याच्या प्रीतीत तो आत्मत्यागी होता. हेही एक अशाप्रकारचे मस्तकपद आहे ज्याचे अनुकरण पतींनी पत्नींच्या बाबतीतही अनुसरावे: “पतींनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपआपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले . . . त्याचप्रमाणे पतीनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही. तर तो त्याचे पालनपोषण करतो जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करितो . . . तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी. आणि पत्नीने आपल्या पतीचा अंतःकरणापासून आदर करावा.” (इफिसकर ५:२५-२९, ३३) तुम्ही जर ख्रिस्ताच्या मस्तकपदास अधीन असल्याचे उदाहरण समोर ठेवले तर तुमच्या पत्नीकरिता पती या नात्याने तुम्हाला अंतःकरणपूर्वक आदर प्रदर्शित करणे एक अवघड गोष्ट वाटणार नाही—तर प्रत्यक्षात तो एक आनंद ठरेल.
७, ८. योग्यपणे मस्तकपद चालवण्यात पती अपुरे पडतात अशा काही मार्गांचा उल्लेख करा.
७ मोठी समस्या तर तेव्हाच उद्भवण्याची संभावना असते जेव्हा अपूर्णावस्थेमुळे आणि स्वाभाविक स्वार्थबुद्धीमुळे पती काही वेळा कुटुंब प्रमुख या नात्याने आदराची अपेक्षा करीत असतो पण त्याच्या पत्नीबद्दलची प्रीती आणि समजूतदारपणा प्रदर्शित करण्यात खुळा पडतो. वेळोवेळी अशाही स्त्रिया आढळतात ज्या म्हणतात: तिचा पती तिजवर प्रेम करतो असे तिला मुळीच वाटत नाही; तो जे जवळ येतो ते केवळ त्याच्या स्वतःच्या मौजेकरता, इच्छापूर्तीकरता. शिवाय काही पत्नींची तक्रार आहे की त्यांचे पती फक्त हुकुमशहा आहेत. हे कदाचित त्याच्या मस्तकपदास बळकवण्याचे पत्नीने जे प्रयत्न केले असतील त्यांच्या परिणामाचे फळ असेल, की तो अशा बळकावू वृत्तीचा प्रतिकार करत असेल. किंवा तो पुरूष अशा वातावरणात वाढलेला असेल जेथील अनेक पती उद्धट, मगरूर आणि हुकुमशहा असतील. कारण कोणतेही असो, मस्तकपदाचा असा एक दुरूपयोग आदर मिळवून देत नाही.
८ दुसऱ्या बाजूस पाहता, मस्तकपदाचा अनादर करण्याऐवजी काही पती पदत्याग करतात. सर्व निर्णय घेण्याचे काम ते त्यांच्या पत्नीवर सोडतात. किंवा पत्नीला: “तितकीशी घाई माझ्यामागे लावू नको” असे सांगताना ते स्वतःच एवढी दिरंगाई करतात की ज्यामुळे सबंध कुटुंबाचे नुकसान होते. ते शारीरिकतेत कदाचित आळशी किंवा तितकेसे निरूपयोगी नसतील पण तेच जर ते मानसिक प्रयत्नात बुजले तर त्याचा परिणाम त्याच्यासारखाच असेल ज्याचा उल्लेख नीतीसूत्रे २४:३३, ३४ मध्ये सापडतो: “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी धरून जरा निजतो असे म्हणत जाशील तर दारिद्य्र तुला दरोडेखोराप्रमाणे, गरीबी तुला हत्यारबंद माणसाप्रमाणे गाठील.”
९, १०. कुटुंबावर परिणाम करणारे निर्णय घेतेवेळी पतीने कोणाचे विचार विचारात घ्यावेत?
९ तेच तुम्ही स्थिर, सहनशक्ती असलेले व निर्णय घेता येणारे असाल तर आपल्या पत्नीचा आदर मिळवाल. पण याचा अर्थ असा होत नाही की घरात कोणाचाच विचार घ्यावयाचा नाही, किंवा तुमच्या पत्नीचे विचार तुमच्या विचाराशी तितकेसे जुळत नाहीत म्हणून त्यांच्याकडे गंभीरतेने कधीच लक्ष द्यावयाचे नाही. पवित्र शास्त्र अहवालात सुरवातीच्या काळात अब्राहाम आणि साराच्या प्रपंचात एक घोर समस्या उद्भवली, ज्यात त्यांचा पुत्र इसहाक आणि त्यांची दासी हागारचा पुत्र गुंतलेला होता. साराने तोडगा सुचविला जो, या प्रकरणात अब्राहामाच्या भावनांशी जुळणारा नव्हता. पण अब्राहामास देवाने म्हटले: “सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक.”—उत्पत्ती २१:९-१२.
१० यावरून आम्ही हे अनुमान काढू नये की पतीने नेहमीच त्याच्या पत्नीच्या इच्छांना मान्यता द्यावी. पण तेच जे निर्णय कुटुंबावर परिणाम करणारे ठरतील त्याची तिजबरोबर चर्चा करणे हितावह ठरू शकते, व ज्यात तिला तिचे विचार आणि भावना मोकळेपणाने मांडण्याचे प्रोत्साहन द्यावे. दळणवळणाचा मार्ग नेहमी खुला ठेवा, नेहमी सहानुभूतीदर्शक असा आणि जे निर्णय तुम्ही घ्याल त्यात तिच्या आवडीचा केवढा भार आहे याचा बारकाईने विचार करा. मस्तकपद चालविण्यात कधीही साहेबांसारखे किंवा जुलूमशहा असू नका, तर लीनता प्रदर्शित करा. तुम्ही पूर्णत्वात नाही, तुम्हाकडूनही चूका होणार व जेव्हा त्या घडतील, तेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीकडून समजूतदारपणाची अपेक्षा कराल. जेव्हा असे प्रसंग उद्भवतील त्यावेळी जिचा पती नम्रवृतीचा आहे अशा पत्नीला जिचा सोबती अभिमानी, गर्विष्ठ आहे तिजपेक्षा मस्तकपदास आदर देणे अधिक सोपे जाईल.
चांगली देखरेख करणारा असावा
११, १२. (अ) जीवनावश्यक वस्तुंची पुरवणी करण्यात पतीवर कोणती जबाबदारी आहे? (ब) या पुरवणूकीत प्रत्यक्षात संयुक्त प्रयास उचलले जातात ते कसे?
११ कुटुंबाच्या जीवनास आवश्यक गोष्टींच्या गरजा पुरविण्याची जबाबदारी पतीवर आहे. पहिले तीमथ्य ५:८ हे स्पष्ट करते: “जर कोणी स्वकीयांची व विशेषकरुन आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे, तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.” आज जगण्याकरता अनेक देशात, पुष्कळसा पैसा लागतो, म्हणून तुम्ही, पतीने असा निर्णय घेतला पाहिजे जो ही गरज पूर्ण करण्यावर नियंत्रण राखील. तुम्हास कदाचित असेही आढळेल की पैसे कमावून घरी आणण्यासोबतच, तुम्हा दोघांच्याही एकमताचे अंदाजपत्रक तुमच्या पत्नीसोबत बसून तयार करण्याची गरज आहे. हे केवळ पैसा जपून खर्च करण्यावर नियंत्रण ठेवील. ते तुमच्या स्वतःचा निर्वाह—साधनातच भागविण्यात मदत करील आणि काही वेळा पगार दिनाआधी पैसे संपल्यामुळे ज्या वादविवादांना सुरवात होते ते टाळण्यात बरेच साहाय्य करील.
१२ अनेक प्रकरणात, कुटुंबाच्या खर्चाकरता जरी पती पैसा मिळवून आणीत असेल तरी याचा विसर पडू देऊ नये की तो पैसा संयुक्त प्रयत्नामुळेच मिळविलेला असतो. आपण स्वतःच सर्व काही करतो असे तुम्हा पतींना वाटते तर, अंमळ बसून हा विचार कधी केला का की, बाजार करण्यास, स्वयंपाकाला, भांडी, कपडे धुण्यास आणि मुलांना सांभाळण्यास गडी किंवा बाई ठेवली तर त्याचा केवढा खर्च येणार. सामान्यतः तुमची पत्नी ही सर्व कामे उरकीत असते, जी तिच्यावतीने जणू आर्थिक भागिदारी असते. याशिवाय ती जर घरचा सर्व जमाखर्च व्यवस्थितपणे ठेवत असेल तर तिलाच “हिशेबनीस” नेमून या आधीच्या यादीत जोडावे. नीतीसूत्रे १८:२२ जे म्हणते ते अगदी सत्य आहे: “ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो.”
१३. जेव्हा भौतिक वस्तुंचा प्रश्न येतो, त्यावेळी विवाहित जोडप्याने कोणता दृष्टिकोन टाळावा, व हे त्यांच्या हिताचे कसे ठरेल?
१३ जीवनावश्यक गोष्टी पुरवीत राहण्यात, तुम्हाकरता आणि तुमच्या पत्नीकरता जो धोका सदोदित समोर असतो तो म्हणजे जडवादपणावरील दृष्टिकोन आणि त्याचा जीवनावर होणारा परिणाम याकडे दुर्लक्ष होऊ देणे. कुटुंबाच्या सौख्यानंदाच्या पायाला यांच्यापैकी थोडक्याच ‘वस्तुंनी वाळवी’ लागू शकते. “आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही” असे, पवित्र शास्त्र लेखक पौल म्हणतो. “[याकरता] आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे. परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत. आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” भौतिक वस्तुंना संपन्न करणारा जीवनी मार्ग केवढीही जहागिरी मिळवून देवो पण कौटुंबिक नातेसंबंध खिळखिळे होत चालल्याचे व तुटलेल्याच्या दुःखाची तूट तो भरून काढू शकणार नाही. आध्यात्मिक आणि भावनात्मक तूट भौतिक वस्तुंच्या मिळवणूकीच्या भारापेक्षा किती तरी पटीने मोठी असते.—१ तीमथ्य ६:७-१०.
१४. कोणाही व्यक्तीच्या जीवनात भौतिक वस्तू महत्त्वाचे स्थान पटकावून आहेत हे कशावरून निश्चित होते?
१४ जडवादपणा म्हणजे भौतिक वस्तुचे सर्वसाधारण धनीपण नव्हे तर त्यांची हाव बाळगणे, हे आहे. कोणी व्यक्ती गरीब व जडवादी असू शकते पण तेच कोणी धनवान व आध्यात्मिक विचारांचीही असू शकेल. त्यांचे हृदय कोठे लागून आहे यावर सर्व अवलंबून आहे. येशूने म्हटले आहे: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात, आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाहीत कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल.”—मत्तय ६:१९-२१.
१५, १६. भौतिक गरजा भागविण्याची उत्तम दखल घेत असतानाच, आनंदी कौटुंबिक वातावरण टिकवण्यात पतीने आणखीन काय करण्यास हवे?
१५ पती जो भौतिक वस्तुंची गरज भागविण्यात वाकबगार असेल तो वेळोवेळी अशा शास्त्रवचनीय उपदेशाची आठवण करील आणि भौतिक मार्गी जरूर त्या सर्व गोष्टींची पूरवणूक करीत असता कुटुंबाला आध्यात्मिक तरतूदीही उपलब्ध करून देण्यास वेळ खर्च करील, जीवनावश्यक भौतिक वस्तुंची रेलचेल असावी म्हणून सर्व वेळ नोकरीत व पैसा कमविण्यात खर्च करून कुटुंबाकरता आध्यात्मिक मार्गी उभारणी करणारे, काही करण्यास पुरेसा वेळ व शक्ती राहू न देण्यात काय लाभ? जीवनात उद्भवणाऱ्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यास जरूर ती सुज्ञता मिळविण्यास वेळ खर्च करून कुटुंबास उचित धर्मतत्त्वांना खंबीरपणे चिटकून राहणारे बनविले पाहिजे. देव वचनाचे वाचन आणि त्याची आपसात चर्चा करण्यास वेळ देऊन व विशेष म्हणजे सर्वांनी एकत्र बसून प्रार्थना करण्याने हे साध्य होऊ शकते. कुटुंब प्रमुख या नात्याने हे करण्यात नेतृत्व करण्याची जबाबदारी, पतींनो, तुम्हावर आहे. जो वेळ आणि परिश्रम खर्च केला जाईल त्याच्या मोलापेक्षा, जे फायदे मिळवाल ते अधिक मोलाचे असतील. देवाकडील अभिवचन हतबल ठरणार नाही की, “तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतीसूत्रे ३:६.
१६ आपल्या पावलास मार्गदर्शन मिळावे म्हणून जो पती उत्पन्नकर्त्याकडे, दृष्टी लावतो त्याला उपदेशक ७:१२ मधील सल्ल्यात गुणग्राहकता वाटते की “ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करते.” याकरता एक उत्तम पूरक या नात्याने त्याच्या घरकुलाच्या भौतिक गरजा पुऱ्या करण्यास तो परिश्रम करील. तरीसुद्धा, तो त्याची आशा ‘चंचल धनावर नव्हे तर जो जिवंत देव त्याच्यावर ठेवील.’ आध्यात्मिक गोष्टीवर प्रथम जोर देण्यात तो स्वतःचे उदाहरण ठेवील ते याचकरता की “जे खरे जीवन ते बळकट धरण्यास” दोघांचेही, त्याचे व त्याच्या पत्नीचेही साहाय्य होईल. (१ तीमथ्य ६:१७-१९) भौतिक आणि आध्यात्मिक अशा या दोन्ही, गरजांची पुरवणूक करण्यात पती जे श्रम उचलतो तेच त्याला देवभिरू पत्नीकडून आदर मिळवून देतात.
तिला आदर दाखविणे
१७-१९. पत्नीस “आदर” देण्याचा पवित्र शास्त्रीय आदेश लैंगिक नातेसंबंधात कसा लागू कराल?
१७ प्रेषित पेत्र पतीबरोबर त्यांच्या पत्नीबद्दल बोलताना त्यांना सांगतो: “त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा . . . त्यांना मान द्या.” (१ पेत्र ३:७) याच वचनांत पेत्र पतीना हे स्पष्ट करतो की, पत्नीबरोबर राहणाऱ्या पतीने तिला हा मान “सुज्ञतेने” द्यावा.
१८ हे निश्चितच लैंगिक नातेसंबंधास अनुलक्षून आहे. स्त्रीच्या स्वाभाविक आणि भावनात्मक ठेवणीशी पतीचा अपरिचितपणा पत्नीत थंडावा आणीत असतो. “पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा,” परंतु ‘ती अधिक नाजूक व्यक्ती आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवून,’ ते करावे असा सल्ला पवित्र शास्त्र देते. (१ करिंथकर ७:३) तुम्ही जर खरोखरी ‘तिला मान देणारे असाल’ तर जेव्हा ती फार थकलेली असेल किंवा महिना भरातील ऋतुमतीच्या त्राग्याच्या दिवसात असेल त्या काळात तुम्ही निर्दय आणि हक्क मागणारे, आपला मनोविकार उद्रेक पुरा करण्याचा हट्ट बाळगणारे नसाल. (पडताळा लेवीय २०:१८) तसेच जेव्हा समागम करीत असाल त्यावेळीही केवळ स्वतःच्याच मौजेकडे पाहत राहून तिच्या गरजांकडे दुर्लक्ष करणारे असू नका. जीवनातील या क्षेत्रात प्रतिसाद देण्यात पुरुषापेक्षा स्त्री मंद असते. कोमलता आणि प्रेम दाखविण्याची तिजकडील एक खास गरज असते. पतींना असे सांगण्यात आले की “पत्नीला तिचा हक्क द्यावा.” पवित्र शास्त्र, घेण्यावर नव्हे तर देण्यावर अधिक जोर देते.
१९ अर्थात त्या प्रकारचे देणे हे केवळ एखाद्याच्या विवाह सोबत्याकरता खास राखलेले आहे. हे खरे की आजच्या काळात अनेक पुरूष बाहेरच्या स्त्रीयांबरोबर “संबंध” ठेवून आहेत. पण शेवटी परिणाम काय? स्वतःच्या घरकुलाच्या सौख्यानंदाकडे दुर्लक्ष! ते त्यांच्या पत्नींना जरूर तो ‘आदर’ देण्यात असमर्थ ठरतात, यामुळे त्यांच्या पत्नींनी त्यांना आदर देण्याचा मुळाधार पुरवला जात नाही. सर्वाधिक म्हणजे, ते प्रत्यक्षात विवाह संबंधाचा अनादर करतात, ज्याची योजना स्वतः देवाने केलेली आहे. यामुळे जे मनःस्ताप, क्लेश होतात त्यांना दृष्टीसमोर ठेवूनच इब्रीकर १३:४ आर्जविते: “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्याचा देव न्याय करील.”
२०. इफिसकर ५:२८ मध्ये सूचित असल्यानुसार, इतर कोणत्या मार्गी पत्नीला आदर दाखवता येईल?
२० पत्नीस आदर द्यावा याचा परिसर लैंगिक समागमापुरताच नाही. इतर गोष्टीतही तेच असावे; ज्या पतीला त्याचा आदर खरोखरी दाखविला जातो त्याने हे प्रदर्शित केले पाहिजे की त्याजठायी त्याच्या पत्नीबद्दल उच्च प्रतीची मते असावीत. यात असे नाही की तिला त्याने चौथऱ्यावर चढवावे आणि स्वतःस तिचा गुलाम बनवावे. तर ते जसे आम्ही या आधी वाचले होते तसे इफिसकर ५:२८ नुसार असावे: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करितो.” जो पुरूष या प्रमाणे करतो तो त्याच्या पत्नीला हलक्या कनिष्ठ दर्जाची म्हणून कधीच वागविणार नाही ही खात्री! जेवणाच्या वेळी, त्याला असे कधीच वाटणार नाही की निवडक भाग व मिष्ठान्न हे केवळ त्याच्याच शरीराच्या पोषणाकरता आहेत व त्यातून उरलेले, सोडलेले तिच्याकरता पुरे. तो जर तिजवर “आपलेच शरीर” समजून प्रेम करतो तर असे कधीच करणार नाही. तसेच स्वतःलाच हरप्रकारच्या उंची व महागड्या पेहरावांनी भूषवित बसण्यापेक्षा तो आपल्या पत्नीची अधिक काळजी बाळगून असेल व तिच्या कपड्याच्या बाबतीत तिने समाधानी राहावे म्हणून त्याला जेवढे शक्य होईल ते सर्व करील. कोणीही पुरूष, त्याच्या मर्जीनुरूप एखादी गोष्ट करण्यात त्याला अपयश आले तर स्वतःस बडवीत नाही. तसेच कोणताही ख्रिस्ती पती, काही वेळा त्याच्या अपेक्षेप्रमाणे करण्यात त्याच्या पत्नीची चूक झाली म्हणून तिला कधीही मारणार नाही. याउलट, जर कोणी तिला क्रुरतेने वागविले तर तो तिच्या मदतीला धावून जाईल. कारण स्वतःच्या शरीराप्रमाणे तो तिजवर प्रेम करत असतो.
२१, २२. पत्नीची भूमिका पार पाडण्यात पती तिचे कसे साहाय्य करू शकतो?
२१ ज्या क्षेत्रात तुमच्या गरजा एकसमान असतात त्याची रसिकता बाळगून तुम्हास जर तुमच्या पत्नीला ‘आदर द्यावासा’ वाटतो तर तुम्हा दोघातील मानसिक तफावती कोणकोणत्या आहेत त्या ओळखून असणे बरे! मुळात पाहता स्त्रीला कोणातरी अधिकार छत्राखाली काम करण्यास फार आवडते पण तो योग्यतेत चालवलेला असावा. याचमार्गी यहोवा देवाने त्यांची निर्मिती केलेली आहे. स्त्रीला पुरूषाकरता सहकारी, आणि त्याचे गौरव म्हणून उत्पन्न केले. (उत्पत्ती २:१८) पण तेच जर देखरेख फारच बारकाईची व कटकटीची असली व तिला कोणत्याच गोष्टीत पुढाकार घेण्याचा व अंगच्या कौशल्यास प्रदर्शित करण्याचा वाव नसला तर कदाचित त्या स्त्रीला कोंडमारा होत असल्यासारखे वाटू लागेल व तिच्या जीवनातून मौजमजेस पिळून काढले जात आहे म्हणून चीडचीड करण्यास हळूवार सुरवात होते.
२२ जिच्याकडे लक्ष पुरवण्याची अत्यंत गरज आहे ती दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीला ही स्वाभाविकपणे समज असते की तिची तेथे गरज आहे हे दाखवावे, बोलावे. साहाय्यक पतीची अनेक पत्नीठायी गुणग्राहकता असते पण तेच जो पती कोणाही वेळी व कामात नेहमीच पत्नीला मागे सारत असतो व आपणावर सर्व घेतो त्याला बरे करण्यापेक्षा अधिक नुकसान किंवा इजा केल्याचे प्रत्ययास येईल. तेच तुम्ही समजदार आणि गुणग्राहक राहून तिला ही जाणीव दिली की, तिची तुम्हाला गरज आहे, तुम्ही तिला तिचा आदर देत आहात व तुम्ही दोघे मिळून एक संघ या सारखे कामे करता आणि त्यात “माझे” किंवा “तुझे” किंवा “मी” किंवा “तू” नसून “आम्ही” आणि “आमचे” आहे, तरच तुम्ही तुमच्या बायकोची निष्ठा प्राप्त करण्यात पुष्कळसे खरोखरी करत आहात असे सिद्ध होईल. तुमच्या पत्नीची केवढी आवड तुम्हाठायी आहे व तिची तुम्हास केवढी गरज आहे हे कधी तुम्ही तिजजवळ बोलला आहात का? ते तुम्ही तिला पगार देऊन करीत नाही; तर इतर मार्गी ते तुम्ही प्रदर्शित केले पाहिजे.
तिच्या स्त्री गुणांची प्रशंसा करा
२३. सर्वसाधारणपणे भावनांमध्ये पुरुष आणि स्त्रिया आपसात विसंगत आहेत ते कसे?
२३ एक स्त्री मानसशास्त्रज्ञीने लिहिले: “मूलभूतपणे पाहता पुरूष नुसता विचार करतो पण स्त्रीला हृदय स्पर्श होतो.” तसे पाहता, एक गुण, स्वतः दुसऱ्याहून अधिक चांगला नसतो तर ते केवळ बहुविध आहेत. भावनाविरहित लोकांची आम्ही पर्वा करीत नाही, तसेच अविचारी लोकांची आम्हास आवड नसते. हे स्पष्ट आहे की स्त्रीठायी संभाव्य परिणामाची अस्पष्ट भावना व विचारांची क्षमता असते, आणि तेच पुरूषांबद्दलही खरे आहे. पण सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या भावनांना अधिक वेगाने उबळ येते; तेच, पुरूष प्रकरणास ज्या व्यवहार्य मार्गाने हाताळणे बरोबर असेल असे त्याला वाटते त्यानुसार भावनेच्या आहारी जाण्याच्या बाजूस कलण्याच्या तयारीत असतो. अर्थात, काही अपवाद वगळता ही एक आणखीन तफावत आहे जी पती आणि पत्नीला एकमेकांचे सहकारी बनवते. तिच्या भावनाप्रधान व्यक्तित्वासोबतच, लोकाबद्दल ती जी सदिच्छा बाळगून असते ती तिला पुरूषापेक्षा अधिक बोलकी बनविते. शिवाय तिला कोणीतरी प्रत्युत्तर देणारे हवे आणि यातच अनेक पती अपयशी ठरतात.
२४. आपल्या पत्नीचे लक्ष देऊन ऐकणे व तिजशी बोलणे हे पतीकरता महत्त्वाचे का आहे?
२४ तुम्ही तुमच्या पत्नीशी बोलता का? ते केवळ तुमच्या कामाबद्दलचे नव्हे, तर तिजबद्दलही बोलता का? तुम्ही त्यात रस बाळगून आहात का? आणि तिला तसे प्रदर्शित करता का? तिचा दिवस कसा गेला? मुलांचे काही घडले का? घाईघाईने घरी येऊन असे विचारू नका की, ‘जेवणाला काय केलेत?’ आणि जेवल्यानंतर वर्तमानपत्रात डोके खूपसून ती काही बोलण्याचा प्रयत्न करू लागली की अगदी कंटाळून उत्तर देऊ नका. तुमच्या पत्नीबद्दल आस्था बाळगून असा. तिचे विचार, तिच्या हालचाली, तिच्या भावना काय आहेत यांची दखल घ्या. तिच्या योजनांबद्दल प्रोत्साहन द्या, तिच्या कामगिरीबद्दल तिची प्रशंसा करा. तिने जे काही केले त्याबद्दल जर तिची प्रशंसा केली तर तिने ज्यांच्याकडे कदाचित दुर्लक्ष केले असेल ती कामेही करण्यास सुरुवात करील. टीका ही जशी विषासमान कुत्सीक तशीच मनोभंगही करणारी असते, पण अस्सल प्रशंसा, जेथे उचित तेथे प्रामाणिकपणे केल्यास ती दुःखनिवारक आणि आत्म्यास खेद देण्याऐवजी संवेदक ठरेल!—नीतीसूत्रे १२:१८; १६:२४.
२५, २६. (अ) एखादी छोटीशी भेटवस्तू पत्नीला कोणता संदेश पोहोचविते? (ब) तिजकरता कोणत्या प्रकारची देणगी महत्त्वाची असते?
२५ तुम्ही तिला प्रासंगिक भेटवस्तू देता का? ती मूल्यवान असावी असे काही नाही तरी ‘मला तुझी आठवण होती,’ हे दाखविणारी एखादी लहानशी वस्तुही पुरे! तुम्ही हे करता का? कोणा विशिष्ट प्रसंगीच नव्हे तर कोणाही दिवशी, अकस्मात कोणा वेळी आणि इतर कोणाही कारणास्तव नव्हे तर, केवळ तुम्हास वाटले म्हणून तुम्ही तसे करता का? आश्चर्यचकित करणारी दाने व प्रसंग नेहमी अतिशय आनंदविणारी असतात. तुम्हास अतिशय आवडणारा एखादा खाद्यपदार्थ तयार करून ती काही वेळा आश्चर्यचकित करते त्यावेळी तुम्हाला आनंद वाटतो ना? तर आश्चर्याच्या बदल्यात आश्चर्य परत करा व तिलाही आनंदवा. छोट्याशा आठवण वस्तू, पण प्रेमाने सुचविलेल्या असल्या तर मोठमोठ्या किंमतीची बक्षीसे वेळोवेळी देण्यापेक्षा मूल्यवान वाटते—पण ते देणे कुरकुरविरहित व कर्तव्यपालनाच्या आठवणीने करावे. “संतोषाने देणारा देवाला आवडतो.” (२ करिंथकर ९:७) पत्नींनीही हेच करावे. जेवण जरी पसंतीचे नसले तरी आठवण ठेवा: “पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनात द्वेष वागविणे त्यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी!”—नीतीसूत्रे १५:१७.
२६ सर्वात महत्त्वाचे देणे म्हणजे स्वतःस देणे, म्हणजेच—तुमचा वेळ, तुमचे परिश्रम, तुमचे लक्ष आणि तुमचे विचार—व खास करून त्यांना जे, तुम्हास अतिप्रिय आहेत. अनेकास हे अवघड जाते. त्यांना प्रेमाचे बोलणे मूर्ख संवेदनाचे संभाषण वाटते व कमपुरुषी वाटते. पण जर तुमच्या पत्नीवर तुमचे खरे प्रेम आहे तर तुम्ही हे आठवणीत ठेवाल की, एक दृष्टिक्षेप, स्पर्श आणि बोल यांचे स्त्रीकरता केवढे मोल असते. पण या गोष्टींचा अभाव असला की तिला जीवन विरोधक, कष्टमय, असंतुष्ट वाटू लागते. याकरता पवित्र शास्त्रातील गीतरत्न पुस्तकातील उदाहरण अनुसरा. जो बोलत असतो त्याने इतरांकरता आदर आणि सद्भावना व्यक्त करणे हे चांगले असते. उबदार अंतःकरणाच्या लोकांकडे लोक बिनाविरोध आकर्षिले जातात. मग ही उबदार व्यक्ती कोण असू शकते? ती व्यक्ती जी, ज्यांची आस्था बाळगून असते त्यांना त्यांच्याबद्दलची तिची सहानुभूती आणि आस्था व्यक्त करील. या प्रकारातील उबदारपणा संसर्गजन्य असतो. तो देणाऱ्याकडे नक्की परतणार.—गीतरत्न १:२, १५; लूक ६:३८.
२७, २८. (अ) पतीने, त्याचे मस्तकपद तो यथास्थितपणे चालवीत आहे किंवा नाही हे निश्चित करण्यास स्वतःस काय विचारावे? (ब) या प्रकरणाबद्दल आस्था बाळगून असावे ते का?
२७ पती, तुम्ही स्वतःस विचारा: माझ्या पत्नीस आदर देता येण्याएवढे माझे मस्तकपद, सोयीचे आहे का? जसे मी स्वतःवर तसे माझ्या पत्नीवर प्रेम करतो का? किंवा मी, केवळ आपल्याच इच्छापूर्तीस आणि आवश्यकतांना प्रधान स्थान देत असतो? तिच्या गरजांची मी केवढी दखल घेतो? कौटुंबिक निर्णय घेण्याआधी, तिचा दृष्टिकोन, तिच्या इच्छा मी ऐकतो का? निर्णय घेतेवेळी तिच्या स्वाथ्यास दृष्टिसमोर ठेवतो का? एक नाजूक, स्त्री पात्र म्हणून मी तिला आदर देतो का? तिजबरोबर, माझे दळणवळण खुले आहे का, आणि मी तिजपाशी माझे हृदय उघडे करतो का?
२८ हे सर्व करण्यात तुम्ही अगदी निष्णात असू शकणार नाही. तरी तुम्ही सतत सुसंगत व नम्र प्रयत्न करत राहिल्यास तुम्हाठायी ही शाश्वती बळावत जाईल की जरी बरीच वाटचाल करावी लागली तरी पत्नीकडील अंतःकरणपूर्वक आदर प्राप्त करणारा व देवाला आवडणारा असा पती तुम्ही अंशाअंशाने बनत आहात.
[अभ्यासाचे प्रश्न]
[४९ पानांवरील चित्रं]
अगदी छोट्या गोष्टींचाही खूप अर्थ होतो