व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या पालकांची अंतःकरणे आनंदित करणे

आपल्या पालकांची अंतःकरणे आनंदित करणे

अध्याय १२

आपल्या पालकांची अंतःकरणे आनंदित करणे

१. आपल्या पालकांना मान देणे योग्य का आहे?

 अद्याप आपण लहान असू, यौवनात पदार्पण करत असू अथवा प्रौढ पुरुष किंवा स्त्री असू तरी आपण कोणाची तरी मुले आहोत. बाल्यावस्थेपासून प्रौढतेपर्यंत त्यांनी आपल्यावर खर्ची केलेल्या वीस-एक वर्षाचे कष्ट, पैसा व आत्मत्यागाचे मोल करणे कठीण आहे. आणि ज्याची आपण त्यांना परतफेड करु शकत नाही असेही काहीतरी प्रत्येकाला आपल्या पालकांनी दिले आहे. आपण त्यांच्यापासून इतर काही मिळवलेले असो वा नसो आपले जीवन मात्र त्यांनीच आपल्याला दिले आहे. त्यांच्याशिवाय आपण अस्तित्वातच आलो नसतो. हे वादातीत सत्यच “आपला बाप व आपली आई यांचा मान राख” ही आज्ञा मान्य करण्यास पुरेसे कारण देत आहे. “अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे: ‘ह्‍यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे.’”—इफिसकर ६:२, ३.

२. आपण आपल्या पालकांचे ऋणी आहोत असे का मानावे?

आपल्याला निर्माण करणाऱ्‍या परमेश्‍वराचे, जीवनाचा प्रथम स्त्रोत म्हणून आपण ऋणी असलो तरी आपल्या पालकांविषयी देखील आपण आपले ऋण मान्य केले पाहिजे. त्यांनी आपल्याला दिलेल्या गोष्टींची परतफेड म्हणून आपण त्यांना काय देऊ शकतो? देवाचा पुत्र म्हणाला की जगातील सर्व संपत्ती जीवन विकत घेण्यास अपुरी आहे. कारण जीवनाचे मोलच करता येत नाही. (मार्क ८:३६, ३७; स्तोत्रसंहिता ४९:६-८) देवाचे वचन सांगते: “एकमेकांवर प्रीती करणे ह्‍याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका.” (रोमकर १३:८) आपले पालक व आपण जिवंत असेपर्यंत आपल्याला त्यांच्यावर विशेष प्रीती करावीशी वाटली पाहिजे. त्यांनी आपल्याला जीवन दिले तसे आपण त्यांना देऊ शकत नसलो तरी त्यांचे जीवन विशेष आनंददायी होईल असे काही करु शकतो. त्यांना आनंद व समाधान देऊ शकतो. आपण त्यांची संतती असल्याने इतर कोणापेक्षा आपण ते विशेषकरून करु शकतो.

३. नीतीसूत्रे २३:२४, २५ ला अनुसरून मुलाच्या कोणत्या गुणांमुळे पालकांना आनंद होतो?

नीतीसूत्रे २३:२४, २५ मध्ये म्हटल्याप्रमाणे: “धार्मिकाचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याजविषयी आनंद पावतो. तुझी माता-पितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो.” आपल्या मुलांबद्दल व त्यांच्या कामाबद्दल अभिमान व समाधान वाटावे असे पालकांना वाटणे स्वाभाविक आहे. आमच्या पालकांनाही असेच वाटते का?

४. कलस्सैकर ३:२० मुलांना काय करण्यास सांगते?

आपण त्यांचा मनापासून आदर करतो व त्यांचा सल्ला ऐकतो किंवा नाही यावर बहुतांशी ते अवलंबून आहे. “मुलांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई-बापांची आज्ञा पाळा. हे प्रभूला संतोषकारक आहे,” असा युवकांना देवाचा उपदेश आहे. (कलस्सैकर ३:२०) “सर्व गोष्टीत” याचा अर्थ असा होत नाही की पालकांनी देव-वचनाशी विसंगत गोष्टी करण्याचा अधिकार गाजवावा. मात्र हे खरे की, आपण लहान असताना आपल्याला सर्व गोष्टीत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांची आहे.—नीतीसूत्रे १:८.

५. आपल्या मुलांकडून काय अपेक्षा बाळगता येतील याबद्दल एखादी तरुण व्यक्‍ती स्वतःला काय विचारु शकते?

तुम्ही अजून लहान आहात का? एके दिवशी तुम्हीही पालक व्हाल. तुमचा आदर करणारी मुले तुम्हाला आवडतील की उर्मट, ऐकण्याची बतावणी करुन तुमच्या गैरहजेरीत अवज्ञा करणारी आवडतील? नीतीसूत्रे १७:२५ म्हणते की आनंददायक होण्याऐवजी, “मूर्ख मुलगा आपल्या बापाला दुःख देतो आणि आपल्या जन्मदात्रीला क्लेश देतो.” तुम्ही जसा त्यांना विशेष आनंद देऊ शकता तसे इतरांपेक्षा तुम्हीच त्यांना दुःख व निराशेच्या गर्तेतही लोटू शकता. त्यांना काय वाटेल हे तुमच्या वागणुकीवर अवलंबून राहील.

ज्ञान मिळवण्यास बराच काळ लागतो

६. वयपरत्वे ज्ञान वाढते हे कोणत्या उदाहरणावरून दाखवता येईल?

ज्ञान मिळवण्यात वयाचा मोठा वाटा असतो याची तरुणांनी जाणीव ठेवावी. तुम्ही आता दहा वर्षाचे आहात का? तुम्ही पाच वर्षाचे होता त्यापेक्षा तुम्हाला बरीच जास्त माहिती आहे हे तुम्ही जाणता. तुम्ही १५ वर्षाचे आहात? तुम्ही १० वर्षाचे होता त्याहून आता तुम्हाला अधिक कळते की नाही? तुम्ही वीशीला पोहोचत आहात का? तुम्हाला १५ व्या वर्षापेक्षा आता जास्त समज आहे हे तुम्ही जाणले पाहिजे. गतकाळाचा विचार करून वयाप्रमाणे ज्ञान वाढते हे कळणे सोपे आहे. पण तेच पुढे दृष्टी टाकून हे सत्य स्वीकारण्यास कठीण जाते. तरुण व्यक्‍तीला स्वतः कितीही ज्ञानी आहोत असे जरी वाटले तरी भविष्यात अधिक ज्ञान मिळते, मिळवले पाहिजे हे त्याने किंवा तिने लक्षात घेतले पाहिजे.

७. रहबाम राजाला मिळालेल्या सल्ल्यावरून आपल्याला ज्ञानाबाबत कोणता धडा मिळतो?

या सर्वाचा हेतू काय? तुमचे पालक वयाने व अनुभवाने तुमच्यापेक्षा मोठे असल्याने जीवनातील समस्यांशी समजूतदारपणे तोंड देण्यास तुमच्यापेक्षा अधिक समर्थ आहेत. बहुतेक तरुणांची हे स्वीकारण्याची तयारी नसते. वयोवृद्ध माणसांना ते “जुनी खोंडे” म्हणून संबोधतात. काही असतीलही, पण जसे काही तरुणही बेपर्वा वृत्तीचे असतात म्हणून सर्वच तसे नसतात, तसेच बहुतेक मोठे लोक “जुनी खोंडे” नसतात. मोठ्या लोकांपेक्षा स्वतःला शहाणे समजणे हे तरुणांकरता असामान्य नाही. इस्राएलाच्या एका राजाने हीच चूक केली व त्याचे अनर्थकारक परिणाम झाले. शलमोनानंतर ४१ वर्षांचा रहबाम गादीवर आला तेव्हा त्यांच्यावरील भार हलका करावा अशी लोकांनी त्याला विनंती केली. रहबामाने वृद्धांचा सल्ला घेतला व त्यांनी त्यास दयाळू होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तो तरुणांकडे वळला व त्यांनी त्यास कठोर होण्याचा सल्ला दिला. हा सल्ला त्याने मानला. परिणाम? इस्राएलाच्या १२ तील १० वंशांनी त्या विरूद्ध बंड पुकारले व रहबामाच्या हाती सहाव्या हिश्श्या एवढे राज्य राहिले. तरुणांनी नव्हे तर वृद्धांनी योग्य सल्ला दिला होता. “वृद्धाच्या ठायी ज्ञान असते; दीर्घायु मनुष्याच्या ठायी समज असते.”—ईयोब १२:१२; १ राजे १२:१-१६; १४:२१.

८. पालक व इतर मोठ्या माणसांच्या बाबतीत कोणत्या दृष्टिकोनास पवित्र शास्त्र उत्तेजन देते?

आपले पालक तरुण नाहीत म्हणून त्यांचा सल्ला कालबाह्‍य समजू नका. उलट देववचनात म्हटल्याप्रमाणे: “तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या मातेला तू तुच्छ मानू नको.” वय आदराला पात्र असते. “पिकलेल्या केसासमोर उठून उभा रहा; वृद्धाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग. मी यहोवा आहे.” अनेक तरुण या आज्ञेकडे दुर्लक्ष करतात हे खरे. पण त्यामुळे त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या पालकांनाही, सौख्य प्राप्त झालेले नाही.—नीतीसूत्रे २३:२२; लेवीय १९:३२.

आपले कर्तव्य करा

९. कुटुंबातील एखाद्या घटकाने अकारण कुरकुर वा बंड केल्यास त्याचा कुटुंबावर काय परिणाम होतो?

तुमच्या कृत्यांचा इतरांवर परिणाम होतो हे नाकारता येणार नाही. कुटुंबातील एकाला दुःख झाल्यास सर्वांना अस्वस्थ वाटते. तसेच एकजण कुरकुरणारा वा बंडखोर असेल तर कुटुंबाची शांतता भंग पावते. कौटुंबिक सौख्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य केले पाहिजे.—१ करिंथकर १२:२६ पडताळा.

१०. मुलांनी चांगली कामे करावयास शिकणे हितावह का आहे?

१० तुम्ही हितकारक, विधायक गोष्टी करु शकता. कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी पालक झटत असतात. तुम्ही लहान असाल व घरातच असाल तर तुम्हीही मदत करु शकता. जीवनाचा बराचसा वेळ कामात जातो. काहीजण त्याबद्दल कुरकुर करतात. परंतु तुम्ही चांगल्या हेतुने व चांगले काम करण्यास शिकलात तर त्यातून मोठे समाधान प्राप्त होते. या उलट जो स्वतःचे काम करीत नाही पण स्वतःसाठी इतरांनी कामे करण्याची अपेक्षा जो ठेवतो त्याला ते समाधान कधी कळतच नाही. पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे जसा “धूर डोळ्यास” तसा तो इतरांना नकोसा होतो. (नीतीसूत्रे १०:२६; उपदेशक ३:१२, १३) म्हणून घरात कामे सांगितली म्हणजे मन लावून ती नीट करा आणि आपल्या पालकांना संतोष द्यावयाचा असल्यास न सांगता इतरही कामे करुन टाका. ती कामे बहुधा तुम्हाला आवडतील—कारण त्यांना आनंद देण्यासाठी तुम्ही ती मनापासून केलेली असतील.

११. मुलांच्या बोलण्या-वागण्यामुळे पालकांचा गौरव कसा होऊ शकेल?

११ लोकांवर लहान मुलांची छाप पडल्यास बहुधा नेहमी ते मूल कोणाचे आहे याविषयी विचारपूस करतात. लहान वयात दाविदाने असामान्य धीटाई व विश्‍वास प्रदर्शित केला तेव्हा शौल राजाने तात्काळ विचारले: “हा तरुण पुरुष कोणाचा पुत्र?” (१ शमुवेल १७:५५-५८) तुम्ही आपल्या कुटुंबाचे नाव धारण करता. तुम्ही कसे वागता व तुमचे व्यक्‍तित्व यावर त्या नावाची व ते तुम्हाला देणाऱ्‍या पालकांची किंमत केली जाते. तुम्ही अनेक मार्गांनी शेजाऱ्‍यासोबत व शाळेत दयाळूपणाने वागून इतरांना आदर, मैत्री व मदत देऊन—आपल्या पालकांना गौरवू शकता. त्याबरोबरच तुम्ही आपल्या निर्माणकर्त्याचाही गौरव करीत असता.—नीतीसूत्रे २०:११; इब्रीयांस १३:१६.

१२. मुलांना वळण लावणाऱ्‍या पालकांच्या प्रयत्नाला मुलांनी सहकार्य देणे बरे का ठरते?

१२ तुमच्या पालकांचा आनंद तुमच्या आनंदाशी निगडित असतो. तुमच्या जीवन-प्रवासास उत्तम सुरुवात व्हावी यासाठी तुम्हाला शिक्षण देण्यात ते झटत असतात. तुम्ही त्यांना सहकार्य दिल्यास त्यांना आनंद होईल. कारण तुमचे भले व्हावे अशीच त्यांची इच्छा असते. ईश्‍वरप्रेरित लेखकाने म्हटल्याप्रमाणे: “माझ्या मुला, तुझे चित्त सुज्ञ असेल तर माझ्या माझ्याच चित्ताला आनंद होईल.” (नीतीसूत्रे २३:१५) तुम्हाला खऱ्‍या ज्ञानाचे मार्गदर्शन करण्याच्या ईश्‍वरी जबाबदारीची तुमच्या पालकांना जाणीव असल्यास ती नीट पार पाडण्यास तुमचे सहकार्य द्या. “सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील.”—नीतीसूत्रे १९:२०.

१३. पालकांनी घातलेल्या बंधनांकडे मुले योग्य दृष्टिकोनातून पहावयास कशी शिकतील?

१३ आपले पालक आपल्यापासून अतिशय अपेक्षा करतात वा अतिशय बंधने घालतात असे तुम्हास कधी कधी वाटेल. पण शिस्त लावण्यास संतुलन साधणे तितकेसे सोपे नाही. पुढे जेव्हा तुमचे स्वतःचे कुटुंब असेल तेव्हा तुम्हालाही तेच प्रश्‍न सामोरे येतील. जर तुमचे पालक तुम्हाला काही ठराविक मित्रांच्या संगतीत राहण्यास विरोध करत असतील किंवा मुलामुलींच्या इतर मुलामुलींशी असलेल्या संबंधावर नियंत्रण ठेवत असतील तर थांबा आणि क्षणभर विचार करा की आपले पालक बेपर्वा व निष्काळजी असण्यापेक्षा शिस्त लावणारे असलेले बरे नव्हेत काय! (नीतीसूत्रे १३:२०; ३:३१) त्यांचा बोध ऐका. तुमचा स्वतःचा फायदा होईल, व त्यांनाही आनंद होईल.—नीतीसूत्रे ६:२३; १३:१; १५:५; इब्रीयांस १२:७-११.

१४, १५. कुटुंबात संघर्ष निर्माण झाल्यास मुलांनी पवित्र शास्त्रातील कोणते तत्त्व अनुसरल्यास घरात शांतता नांदेल?

१४ घरात उद्‌भवणाऱ्‍या अनेक प्रसंगांना तुम्ही कारणीभूत नसाल हे खरे. पण त्यावरील तुमच्या प्रतिक्रियेचा घरातील वातावरणावर परिणाम होतो. पवित्र शास्त्र सल्ला देते की, “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने रहा.” (रोमकर १२:१८) हे करणे तेवढेसे सोपे नसते. आपण सगळे वेगवेगळे आहोत व प्रत्येक प्रसंगाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी व प्रतिक्रिया वेगवेगळी असते. त्यामुळे विचार व इच्छा आकांक्षामध्ये संघर्ष निर्माण होतो. आपल्या भावाशी किंवा बहिणीशी संघर्ष निर्माण झाल्यास ते स्वार्थी आहेत असे तुम्हाला वाटेल. अशावेळी तुम्ही काय कराल?

१५ काही मुले तात्काळ आपल्या आईकडे अथवा वडिलांकडे जाऊन त्याविरुद्ध कागाळ्या करतात किंवा आपलेच म्हणणे खरे करण्यासाठी कायदा हातात घेऊन ती मारामारी करतात. पण प्रेरित शास्त्रवचन म्हणते: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो.” (नीतीसूत्रे १९:११) कसा? विवेकामुळे तो दुसऱ्‍यांच्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहण्यास शिकतो (दुसऱ्‍याचे कृत्य अनवधानाचे असेल किंवा मुद्दाम केलेले नसेल असा विचार तो करतो). तसेच त्याला स्वतः अनेकदा केलेल्या चुकांचीही आठवण होते. (देवाने केलेल्या क्षमेबद्दल त्याला केवढी कृतज्ञता वाटत असते!) शिवाय आपल्या भावाची व बहिणीची चूक असली तरी आपल्या रागाने सर्व घराची शांतता भंग करणेही चुकीचेच आहे याचीही त्याला जाणीव होते. अशा समजुतदार माणसाबद्दल ते नीतीसूत्र पुढे म्हणते: “अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.”—तसेच कलस्सैकर ३:१३, १४ पहा.

१६. देवाचे भय बाळगणाऱ्‍या पालकांना मुलांच्या कशा वागण्याने आनंद होईल?

१६ मुळात देवाचे भय बाळगणाऱ्‍या पालकांना ज्यामुळे आनंद होतो त्याच गोष्टींमुळे यहोवा देवालाही आनंद होतो. त्यांना ज्यामुळे दुःख होते त्यामुळेच यहोवालाही वाईट वाटते. (स्तोत्रसंहिता ७८:३६-४१) यहोवाचे अंतःस्थ हेतू ज्या पालकांना माहीत नाहीत ते पालक, आपल्या मुलांची या जगातली लोकप्रियता, किर्ती, धन इ. गोष्टी पाहून आनंदित होतात. परंतु यहोवा ज्यांचा देव आहे अशा पालकांना माहीत आहे की हे सध्याचे जग व त्याची वासना नाहीशी होतील—“पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१५-१७) याकरता, त्यांच्या मुलांनी उत्पन्‍नकर्त्याच्या आज्ञांचे पालन करावे, त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे गुण प्रतिक्षेपित करावेत, हेच त्यांना खरा आनंद देईल. हे अगदी खरे की त्यांच्या मुलांनी शाळेतील अभ्यासात उत्तम प्रगती दाखवली तर देवभिरु पालकांना केवढा आनंद होतो. पण तेच शाळेत किंवा इतरत्रही मुलांची वागणूक देवाकडील दर्जास आणि अपेक्षेस निष्ठावंत असल्याचे प्रतिक्षेपित करते तर त्याहूनही अधिक आनंद होईल, याशिवाय त्याच लेकरांनी आयुष्यात प्रौढावस्थेस पोहोचेपर्यंत यहोवाच्याच मार्गी सौख्यानंद मिळवण्याचे प्रयत्न जारी ठेवले तर खरोखरी त्यांना केवढा आनंद वाटेल.

पालकांची काळजी घेण्याची जबाबदारी

१७-१९. आपल्या पालकांच्या ऋणाची जाणीव, वयात आलेली मुले कशा रीतीने दाखवू शकतील?

१७ आम्ही मोठे होऊन जरी पालकांचे घर सोडून गेलो तरी आईवडिलांबद्दल वाटणारी काळजी कमी होता कामा नये. त्यांना जीवनात सदैव आनंद मिळावा असे आपणास वाटले पाहिजे. मोठा स्वार्थत्याग करुन त्यांनी अनेक वर्षे आपली काळजी वाहिलेली असते. त्याची आपल्याला जाणीव आहे हे दर्शवण्यासाठी आपण काय करु शकतो?

१८ “आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर” या वचनाची आठवण ठेवली पाहिजे. (मत्तय १९:१९) आपण कामात गुंतलेले असू. पण आपण पत्र पाठविले तसेच भेटलो की, आपल्या पालकांना फार फार बरे वाटते याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.

१९ जसजसा काळ जातो त्याप्रमाणे वेगवेगळ्या रीतीने “सन्मान” प्रदर्शित करता येईल. त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्यास, तुमच्यासाठी त्यांनी केलेल्या गोष्टींची तसेच यहोवाच्या नीतीमान अपेक्षांची जाणीव दाखवा. वृद्धांबद्दल प्रेषित पौल लिहितो: “कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्‍तिनुसार वागून आपल्या वडिलधाऱ्‍या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे. कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.”—१ तीमथ्य ५:३, ४.

२०, २१. (अ) मत्तय १५:१-६ ला अनुसरुन पालकांना मान देण्यात कशाचा अंतर्भाव होतो? (ब) अशा रीतीने पालकांचा सन्मान करण्याची जबाबदारी काही कारणांनी टळू शकेल का?

२० पालकांच्या ‘सन्मानामध्ये’ आर्थिक मदतीचा अंतर्भाव होतो हे पवित्र शास्त्रात स्पष्टपणे सांगितलेले आहे. एका प्रसंगी परुशांनी येशूला व त्याच्या शिष्यांना रुढींचे उल्लंघन केल्याबद्दल हटकले. तेव्हा प्रत्युत्तरादाखल येशू म्हणाला: “तुम्हीही आपल्या रुढींनी देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने असे म्हटले आहे की ‘तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर’ आणि ‘जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ परंतु तुम्ही म्हणता की, ‘जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, “मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे” त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये.’ अशा प्रकारे तुम्ही आपल्या रुढींनी देवाचे वचन रद्द केले आहे.”—मत्तय १५:१-१६.

२१ त्यांचे धन व मालमत्ता ही “देवाला अर्पण” केले आहे ही घोषणा केल्याने आपल्या पालकांच्या जबाबदारीतून ते मुक्‍त होत असत. परंतु येशूचे असे मत नव्हते. आज आपण हे ध्यानात घेतले पाहिजे. अनेक देशात ‘सार्वजनिक कल्याण केंद्रा’मार्फत वृद्धांच्या काही गरजा पूर्ण केल्या जातात हे खरे. पण ती तरतूद खरोखरच पुरेशी आहे का? जर नसेल किंवा तशाप्रकारची कोणतीही तरतूद नसेल तर पालकांचा सन्मान करणारी मुले जरूर ती मदत करतील. प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे आपल्या वृद्ध व गरजू पालकांची काळजी वाहणे हे ‘सुभक्‍तिचे,’ कुटुंबाच्या निर्मात्या यहोवा देवाच्या भक्‍तीचे लक्षण आहे.

२२. आर्थिक मदतीशिवाय आपण आपल्या पालकांना आणखी काय दिले पाहिजे?

२२ तथापि, आपल्या वृद्धापकाळात त्यांना अन्‍न, वस्त्र व निवारा मिळाल्यास आणखी कशाचीही गरज नाही असे समजू नका. त्यांच्या भावनिक व आध्यात्मिक गरजाही आहेत. त्यांना प्रीतीचा व तुमच्या सद्‌भावनेच्या दिलासाची जरुरी, कधी तर अत्यंत निकडीची असते. आपल्यावर कोणी प्रेम करते, आपण कोणाचे तरी आहोत, आपण एकटे नाहीत अशा जाणीवेची आपल्याला जन्मभर निकड असते. मुलांनी आपल्या पालकांच्या आर्थिक अथवा भावनात्मक गरजांकडे पाठ फिरवू नये. “जो आपल्या बापाशी दंडेली करतो व आपल्या आईला हाकून लावतो, तो लज्जा व अप्रतिष्ठा आणणारा मुलगा होय.”—नीतीसूत्रे १९:२६.

२३. एखादे मूल आपल्या पालकांच्या आनंदाला कसे कारणीभूत ठरू शकेल?

२३ वयात आल्यापासून मुलांचे आपल्या पालकांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. अनेक मुले दुःख व निराशेला कारणीभूत होतात, परंतु तुम्ही आपल्या पालकांना मान द्याल, त्यांचा सल्ला ऐकाल, त्यांना निरलस प्रेम आणि स्नेहसंगत द्याल तर तुम्ही त्यांना सदैव आनंद द्याल. होय, “तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो.”—नीतीसूत्रे २३:२५.

[अभ्यासाचे प्रश्‍न]