व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमची पालकीय भूमिका

तुमची पालकीय भूमिका

अध्याय ८

तुमची पालकीय भूमिका

१-३. (अ) पालकांवर अपत्य जन्माचा काय परिणाम होतो? (ब) आई व वडिलांना पालकत्वाची आपापली भूमिका कळणे अगत्याचे का आहे?

 जीवनात अनेक घटनांचा आपल्या जीवनावर फारच थोडा परिणाम होतो. पण काहींचा मात्र प्रभावी परिणाम होतो व तो बराच काळ टिकतो. बालकाचा जन्म हा या दुसऱ्‍या वर्गात मोडतो. त्यानंतर नवरा बायकोचे जीवन पार बदलून जाते. लहानशी असली तरी ही नवी व्यक्‍ती आपल्या आवाजाने व उपस्थितीने स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देते; तिच्याकडे दुर्लक्ष करणेच अशक्य असते.

पालकांना जीवन समृद्ध व आनंदी वाटावे. पण त्यात आव्हान आहे आणि यश मिळविण्यासाठी त्या आव्हानाला दोन्ही पालकांनी मिळून तोंड दिले पाहिजे. तुम्ही दोघांनी बालकाला उत्पन्‍न केले, त्यामुळे बालकाच्या वाढीसाठी, जन्मापासूनच तुम्हा दोघांनाही महत्त्वाच्या भूमिका कराव्या लागतील. अशा वेळी मनःपूर्वक एकजुटीच्या व निगर्वी सहकार्याची नितांत गरज असते.

प्रत्येक पालकाच्या भूमिकेची व त्यांच्यातील सुसंवादाची जाण असल्यास बाळाच्या गरजा योग्यरित्या पूर्ण होऊ शकतात. शिवाय त्याचे सुखद फळही मिळते. यात संतुलनाची फारच गरज असते. मनाचा कल समंजसपणाकडे असला तरी भावनांमुळे परिस्थितीचा तोल बिघडतो. अतिरेकी भूमिका घेण्याकडे आपला कल जाण्याची शक्यता असते—कधी दुर्लक्ष तर कधी फाजील संवेदनाशील. पित्याने कुटुंब प्रमुखाची जबाबदारी उचलली पाहिजे पण त्यात त्याने अतिरेक केल्यास तो शिरजोर होतो. मुलांना शिक्षण देण्यात व वळण लावण्यात आईचा सहभाग असणे फारच चांगले. परंतु पित्याला दूर सारून या जबाबदाऱ्‍या तिने अंगावर घेण्याने कुटुंब विस्कळीत होते. चांगली गोष्ट चांगली असतेच पण तिचा अतिरेक केल्याने ती वाईट होण्याचा संभव असतो.—फिलिप्पैकर ४:५.

मातेची कसोटी

४. मातेपासून बाळाला कोणकोणत्या गोष्टींची अपेक्षा असते?

नवजात अर्भक त्याच्या गरजांसाठी सर्वस्वी आईवर अवलंबून असते. तिने प्रेमाने त्या पुरविल्या तर बाळाला सुरक्षित वाटते. (स्तोत्रसंहिता २२:९, १०) त्याचे पोट भरले पाहिजे. त्याला स्वच्छ व उबदार ठेवले पाहिजे. पण फक्‍त शारीरिक गरजा पुरवून भागत नाही. भावनात्मक गरजाही तितक्याच महत्त्वाच्या असतात. बाळाला प्रेम लाभले नाही तर त्याला असुरक्षित वाटते. बाळ आपले लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याची गरज किती आहे हे मातेला लवकरच कळून येते. पण त्याच्या रडण्याकडे सतत दुर्लक्ष केल्यास मूल आजारी पडते. बराच काळ प्रेमाला पारख्या झालेल्या मुलांची भावनात्मक वाढ खुंटते.

५-७. नवीन संशोधनाला अनुसरुन आईच्या प्रेमाचा व काळजीचा बालकावर काय परिणाम होतो?

वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रयोगातून हेच सिद्ध होते की, बोलून, हाताळून, थोपटून, कुशीत घेऊन प्रेम न केल्यास मुले आजारी पडतात किंवा मरूनही जातात. (यशया ६६:१२ पडताळा; १ थेस्सलनीकाकर २:७.) इतरांनाही ते करता येईल, परंतु जिच्या उदरात मूल वाढले तीच त्याला सर्वात योग्य आहे यात वाद नाही. आई आणि बाळात स्वाभाविक ओढ असते. तिला जसे स्वाभाविकपणे आपले मूल जवळ घ्यावेसे वाटते तसेच अर्भकही स्वाभाविकपणे तिच्या दुधाला आसुसलेले असते.

संशोधनात दिसून आलेले आहे की तान्ह्या मुलांचा मेंदू अत्यंत क्रियाशील असतो. तसेच श्रवण, दृष्टी व घ्राणेंद्रिये यांना उत्तेजन केल्याने मानसिक वाढीला चालना मिळते. जेव्हा एखादे अर्भक स्तनपान करते तेव्हा आईच्या त्वचेची ऊब व वासही त्याला कळतात. ती त्याला पाजत असताना बहुतेक सतत ते तिच्या चेहऱ्‍याकडे पाहाते. तिचे बोलणे आणि गाणेच नव्हे तर तिच्या हृदयाचे स्पंदनही त्याला ऐकू येते. तो आवाज त्याने तिच्या उदरात असल्यापासून ऐकलेला असतो. एका नॉर्वेजियन प्रकाशनात बालमानसतज्ज्ञ ॲनी मॅरीत डुवे म्हणतात:

“डोळ्यांच्या बाहुल्यांची हालचाल मेंदूची क्रियाशीलता दर्शविते. त्यावरून सतत स्पर्श होत राहिला, फक्‍त स्तनपान करवितानाच नव्हे तर इतर अनेक प्रकारे—तर त्वचा बरीच उत्तेजित होते व मानसिक क्रियेला उत्तेजन मिळते; की ज्यामुळे पुढे वयात बौद्धिक पातळी वाढते.”

याचा अर्थ उचलताना, कुशीत घेताना, अंघोळ घालताना, आणि अंग पुसताना बाळाला ज्या ज्या वेळी आईचा सतत स्पर्श होत असतो, त्यामुळे मिळणारे उत्तेजन बाळाच्या वाढीला तसेच मोठेपणी तो कोण होईल ते ठरविण्यास मोठा हातभार लावते. रात्रीची झोपमोड आणि रडणाऱ्‍या बाळाला समजावणे हे काही सुखद नसते. परंतु भविष्यातील फायद्याची जाणीव, झोपमोडीचा तोटा भरून काढू शकते.

प्रेम मिळाल्यामुळे प्रेम करण्यास शिकणे

८-१०. (अ) आईच्या प्रेमातून बालक काय शिकते? (ब) याला महत्त्व का आहे?

भावनात्मक वाढीसाठी बाळाला प्रेम मिळणे अत्यंत आवश्‍यक आहे. प्रेम मिळाल्यामुळे, इतर प्रेम कसे करतात याची उदाहरणे पाहून ते प्रेम करायला शिकते. देवावरच्या प्रीतीबद्दल बोलताना १ ले योहान ४:१९ म्हणते: “आपण प्रीती करतो कारण प्रथम त्याने आपणावर प्रीती केली.” प्रेमाचे पहिले धडे देण्याचे काम आईवरच पडते. मुलाकडे वाकून त्याच्या जवळ चेहरा नेऊन, आई त्याच्या छातीवर हलकेच हात ठेवून त्याला घुसळते आणि म्हणते: ‘ठो दे, ठो दे, ठो दे!’ बाळाला अर्थातच हे शब्द माहीत नसतात (त्यांना फारसा अर्थही नसतोच) पण बाळ मात्र हात पाय उडवून हसत असते, कारण ते ओळखते की तो खेळकर हात आणि आवाजाचा सूर म्हणत आहे: ‘बाळा, मला तू आवडतोस, मला तू आवडतोस!’ त्याला धीर मिळतो व सुरक्षित वाटते.

तान्ह्या अर्भकांना व लहान मुलाना प्रेम मिळाल्याची जाणीव असते; आणि त्याची नक्कल म्हणून तीही तशीच वागतात. आईच्या गळ्यात हात टाकून उत्साहाने मुके घेतात. त्यावरील आईच्या उबदार भावनात्मक प्रतिक्रियेने ती खूष होतात. प्रेम देण्यात आणि मिळण्यात आनंद असतो व प्रेम दिल्याने प्रेम मिळते हा महत्त्वाचा धडा ते शिकू लागतात. (प्रे. कृत्ये २०:३५; लूक ६:३८) पुराव्यावरुन असे दिसते की अगदी सुरवातीपासूनच आईशी जिव्हाळा निर्माण झाला नाही तर नंतर इतरांशी घनिष्ठ जिव्हाळा व जबाबदारीचे संबंध निर्माण करण्यात त्या मुलांना मोठे प्रयास पडतात.

१० मुले जन्मापासून तात्काळ शिकण्यास प्रारंभ करीत असल्याने पहिली काही वर्षे अत्यंत कसोटीची असतात. त्यावेळी मातेच्या प्रेमाची गरज असते. जर ती प्रेम—फाजील लाड नव्हेत—व्यक्‍त करण्यात व शिकविण्यात यशस्वी झाली तर ती चिरकल्याण करू शकते. परंतु त्यात ती अयशस्वी झाल्यास कधीही भरून न येणारा तोटा होतो. उत्तम माता होण्यात मोठे आव्हान आहे तसेच त्यात मोठे समाधानही मिळते. त्यातील ताण व जबाबदाऱ्‍या जमेस धरूनही, जगातील इतर कोणता “व्यवसाय” त्याच्या इतका महत्त्वाचा वा टिकाऊ समाधान मिळवून देणारा आहे?

पित्याची महत्वपूर्ण भूमिका

११. (अ) पित्याला मुलाच्या मनात स्थान कसे निर्माण करता येईल? (ब) हे अगत्याचे का आहे?

११ मुलाच्या अर्भकावस्थेत त्याच्या आईचे स्थान महत्त्वाचे असावे हे स्वाभाविक होय. परंतु बाळाच्या जन्मापासून त्याच्या जगात पित्यालाही स्थान असावे. मूल तान्हे असतानाही—संगोपनास मदत करून, त्याच्याशी खेळून, रडत असल्यास त्याचे सांत्वन करून—पित्याला त्याच्याशी संबंध प्रस्थापित करता येईल व केलेही पाहिजेत. अशा रितीने मुलाच्या मनात पित्याचे स्थान नक्की होते. हळूवारपणे पित्याच्या भूमिकेला अधिकाधिक प्राधान्य मिळाले पाहिजे. ही सुरुवातच उशीरा केल्यास, पुढे अनेक प्रश्‍न उभे राहतात. विशेषतः मूल वयात आल्यावर त्याच्यात शिस्त ठेवणे कठीण होऊन बसते. वयात येणाऱ्‍या मुलाला वडिलांच्या सल्ल्याची अतिशय जरूर भासते. परंतु त्यांच्यात आधीच चांगले संबंध निर्माण केलेले नसतील तर अनेक वर्षाची ही दरी थोड्याशा दिवसात भरून येऊ शकत नाही.

१२, १३. (अ) कुटुंबात पित्याची भूमिका कोणती? (ब) पित्याने आपली जबाबदारी पार पाडण्याचा, मुलांच्या अधिकाराकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर कसा परिणाम होतो?

१२ मुलगा असो वा मुलगी वडिलांच्या मर्दानी गुणामुळे त्याचे व्यक्‍तिमत्व समतोल व विविध पैलूंनी समृद्ध होण्यास फार मोठा हातभार लागतो. देव वचनात स्पष्ट आहे की पिता हा कुटुंब प्रमुख असतो. त्याने कुटुंबाच्या गरजा भागविल्या पाहिजेत. (१ करिंथकर ११:३; १ तीमथ्य ५:८) परंतु, “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर यहोवाच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.” मुलांच्या बाबतीत, “यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा” अशी बापांना आज्ञा दिलेली आहे. (अनुवाद ८:३; इफिसकर ६:४) आपल्या अपत्याबद्दलच्या स्वाभाविक प्रेमाने व त्याहूनही अधिक, सृष्टीकर्त्यापुढील आपल्या जबाबदारीच्या जाणीवेने आपल्यावर सोपविलेले देवाचे काम उत्तम रितीने पार पाडण्यास त्याने प्रवृत्त झाले पाहिजे.

१३ आईचा उबदारपणा, ममता व दयाळूपणा याबरोबर वडिलही आपल्या सामर्थ्याने व योग्य मार्गदर्शनाने स्थैर्य आणतात. पिता आपली कामगिरी कशा रितीने पार पाडतो याचा, अधिकाराकडे पाहण्याच्या—मग तो अधिकार मानवी असो की ईश्‍वरी—मुलांच्या दृष्टिकोनावर मोठा परिणाम होतो. ती अधिकाराला किती मान देतील व कुरकुर न करता दुसऱ्‍यांच्या मार्गदर्शनाखाली ती काम करतील की नाही हे त्यावर अवलंबून असते.

१४. वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शांचा त्यांच्या मुलांवर किंवा मुलींवर काय परिणाम होतो?

१४ मुलगा असेल तर, तो मोठा झाल्यावर त्याचे व्यक्‍तिमत्व मिळमिळीत व अस्थिर होईल की निश्‍चयी, बाणेदार व जबाबदार होईल हे ठरण्यास, ते वडिलांनी घालून दिलेले उदाहरण व परिस्थिती हाताळण्याची त्यांची पद्धत यावर बरेच अवलंबून असते. त्याचा परिणाम तो कशा प्रकारचा कडक, असमंजस व कठोर किंवा शहाणा, समजूतदार व दयाळू पती किंवा पिता नंतर बनेल यावर होतो. घरात मुलगी असली तर तिचे वडिलांशी असलेले संबंध व त्याचा तिच्यावरील प्रभाव यामुळे तिचा पुरुष जातीकडे बघण्याचा दृष्टीकोन घडविला जातो व पुढे तिच्या संसाराच्या यशस्वीतेला हातभार लावण्यास किंवा अडखळण्यात याचा परिणाम होतो. पित्याच्या वर्चस्वाचा असा परिणाम बालमनावर जन्मापासून होतो.

१५, १६. (अ) शिकविण्याची कोणती जबाबदारी, पवित्र शास्त्र पित्यावर ठेवते? (ब) ती जबाबदारी योग्य रितीने कशी पार पाडता येईल?

१५ मुलांना योग्य शिकवण देण्यात पित्याची जबाबदारी केवढी मोठी आहे हे देवाने त्याच्या लोकांना दिलेल्या सुचनेवरून दिसून येते. अनुवाद ६:६, ७ म्हणते: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता, त्याविषयी बोलत जा.”

१६ देववचनातले नुसते शब्दच नव्हे तर त्यातील संदेशही दररोज मुलांच्या मनावर बिंबवला पाहिजे. तशी संधी सतत असते. बागेतली फुले, हवेतले कीटक, झाडावरले पक्षी किंवा खारी, समुद्राकाठचे शिंपले, डोंगरावरचे वृक्ष, रात्री आकाशात लुकलुकणारे तारे हे सर्व सृष्टीकर्त्याबद्दल जे सांगतात ते तुमच्या मुलांना तुम्ही समजावून सांगितले पाहिजे. स्तोत्रकर्ता म्हणतो: “आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करितो. रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करिते.” (स्तोत्रसंहिता १९:१, २) या सर्व गोष्टी तसेच दैनंदिन जीवनातून उदाहरणे देऊन, योग्य मूल्यांवर भर देऊन व देवाच्या उपदेशाची योग्यता व फायदे दाखवून पिता आपल्या मुलाचे मन व हृदय घडवू शकतो. देव आहे हेच नव्हे तर “त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देतो” अशी ठाम निष्ठा हाच भविष्याचा दृढ पाया तो त्याला देतो.—इब्रीयांस ११:६.

१७, १८. (अ) पित्याने मुलांना कशी शिस्त लावावी? (ब) अनेक नियम करण्यापेक्षा जास्त परिणामकारक काय आहे?

१७ शिस्त लावणे हाही पित्याच्याच जबाबदारीचा एक भाग आहे. इब्रीकर १२:७ विचारते, “ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे?” चीड येईल किंवा छळ होईल इतका त्याचा अतिरेक मात्र पित्याने होऊ देता कामा नये. देवाचे वचन पित्याला सांगते: “बापांनो, आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्‍न होतील.” (कलस्सैकर ३:२१) बंधने जरुर हवीत, पण कधी कधी ती इतकी वाढतात की डोईजड होतात व नाऊमेद करतात.

१८ प्राचीन काळातील परुशी, नियमांचे मोठे चाहते होते. त्यांनी अशा नियमांचे डोंगर जमविले आणि दांभिकाचे पीक काढले. जास्त नियम केल्यास समस्या सुटतील अशा विचारसरणीमुळे मनुष्याला अपयश मिळाले आहे. परंतु माणसाच्या हृदयालाच हात घालणे हा खरा मार्ग होय, असे जीवनातील अनुभवावरुन दिसते. यास्तव, नियम कमी करा; त्याऐवजी ज्या दिशेने देव दाखवतो त्याच दिशेतील तत्त्वे आत्मसात करा: “मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्याच्या हृदयपटांवर लिहीन.”—इब्रीयांस ८:१०.

पिता व माता सहकारी आहेत

१९. घरात चांगले संबंध निर्माण करण्यासाठी काय केले पाहिजे?

१९ बहुधा पिता कुटुंबासाठी कमवितो. तो कामावरून परततो तेव्हा थकलेला असेल, आणि त्याला आणखी काही कामे करावयाची असतील. परंतु त्याने आपल्या पत्नीसाठी व मुलांसाठी वेळ काढला पाहिजे. त्याने आपल्या कुटुंबाशी जवळचे संबंध ठेवले पाहिजेत, कौटुंबिक चर्चेसाठी, कामासाठी तसेच मनोरंजनासाठी वेळ काढला पाहिजे. अशा रितीने कुटुंबातील ऐक्य, दृढ संबंध जोपासले जातात. मुले होण्यापूर्वी त्याने व पत्नीने बराच वेळ घराच्या चार भिंती बाहेर काढला असेल. पण पुढेही तसेच इतरत्र जाणे, उशीरा घरी येणे हे पालकांच्या जबाबदारीला धरून होणार नाही. त्यांच्या अपत्याविरुद्ध तो अन्याय असेल. त्याच्या अनियमितपणाची व बेजबाबदारीची किंमत मोजावीच लागेल. मुलात जीवनाला स्थैर्य व नियमितपणा असल्यास प्रौढांप्रमाणे मुलांचीही प्रगती चांगली होते व त्यामुळे मानसिक, शारीरिक व भावनात्मक स्वास्थ्य लाभते. कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात चढ-उतार असतातच त्यात पालकांनी ही भर घालण्याची मुळीच जरूर नाही.—मत्तय ६:३४ पडताळा; कलस्सैकर ४:५.

२०. मुलांना शिस्त लावण्याच्या प्रयत्नात ऐक्य टिकवण्यासाठी पालकांनी काय केले पाहिजे?

२० मुलांना हाताळण्यात—त्यांना शिकविण्यात, त्यांच्यावर बंधने घालण्यात, शिस्त लावण्यात, त्यांच्यावर प्रीती करण्यात आई व वडिलांनी एकमेकांना सहकार्य दिले पाहिजे. “आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही.” (मार्क ३:२५) मुलांना शिस्त लावण्याबाबत पालकांनी आधीच सल्लामसलत करावी, म्हणजे त्यांच्यातील मतभेद मुलांपुढे उघड होत नाहीत. नाही तर ‘फोडा आणि झोडाची’ संधीच दिली जाईल. एखाद्या वेळी एका पालकाकडून घाईमुळे अथवा संतापाने अतिरेकी शिक्षा दिली जाईल किंवा संपूर्ण वस्तुस्थिती पाहिल्यावर ती अनाठायी असेल. शक्य असल्यास पालकांनी खाजगीपणात त्यावर बोलावे व ज्याची चूक असेल त्या पालकाने व्यक्‍तिशः त्या मुलाशी बोलून अन्याय निस्तरावा. परंतु खाजगी बोलणे शक्य नसल्यास व आपल्या सहकाऱ्‍यास पाठिंबा देणे म्हणजे अन्यायालाच पाठिंबा देत आहोत असे वाटल्यास दुसऱ्‍या पालकाने, ‘तुम्हाला राग का आला ते मला कळते. मलाही तसेच वाटले असते पण तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल, आणि ती म्हणजे . . . ,’ असे काही म्हणून नजरेतून सुटलेली गोष्ट दाखवून द्यावी. यामुळे मुलांसोबत तट वा मतभेद न दाखविता, परिस्थिती निवळण्यास मदत होईल. ईश्‍वरप्रेरित नीतीसूत्र म्हणते तसे: “गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणाऱ्‍यांजवळ ज्ञान असते.”—नीतीसूत्रे १३:१०; तसेच उपदेशक ७:८ पहा.

२१. शिस्त लावण्याची जबाबदारी एका पालकावर टाकून चालेल काय? किंवा का चालणार नाही?

२१ इब्री शास्त्रवचनात शिस्तीच्या दोन भूमिका सांगितल्या आहेत: “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.” ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनेही तेच सांगतात: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा, कारण ते योग्य आहे.” कधी कधी, मुलांना शिस्त लावण्याचे काम त्याच्या पत्नीचे आहे असे पुरुषास वाटते. तर कधी पत्नीस वाटते ते पतीचे काम आहे व म्हणून ‘थांब तुझ्या बाबांना घरी तर येऊ दे!’ एवढीच धमकी त्या अयोग्य वर्तन करणाऱ्‍या मुलाला देते. परंतु कुटुंबात सौख्य राहण्यास व प्रत्येक पालकास मुलांचा आदर व प्रेम मिळण्यासाठी ही जबाबदारी दोघांनी मिळून पार पाडली पाहिजे.—नीतीसूत्रे १:८; इफिसकर ६:१.

२२. मुलाच्या विनंतीचा विचार करताना काय टाळावे, का?

२२ मुलांना पालकांचे आपसातील सहकार्य व जबाबदारी पार पाडण्याची तयारी दिसली पाहिजे. काही मागत असलेल्या मुलाला ‘जा, आईला विचार’ असेच वडिलांचे उत्तर नेहमी मिळाले किंवा आईनेही, नेहमी परत वडिलांकडे पाठविले तर ज्याला शेवटी “नाही” म्हणावे लागते त्याला खलनायक बनविल्यासारखे होते. परंतु कधी वडील म्हणतील ‘हो, तू थोडा वेळ बाहेर जा, पण पाने कधी वाढणार ते आईला विचारून जा’ किंवा एखाद्या गोष्टीला होकार देताना आईला त्यात वावगे काही आढळणार नाही पण वडिलांचे मत विचारावेसे वाटेल. या सर्वात मुले त्या दोघांना एकमेकाविरुद्ध करून आपला डाव साधणार नाहीत याची दोघांनी खबरदारी घेणे इष्ट होय. शहाणी पत्नीही आपल्या अधिकाराचा फायदा घेऊन नवऱ्‍याशी स्पर्धा करणार नाही. मुलाचे फाजील लाड करुन ती मुलांचे प्रेम वडिलांऐवजी स्वतःकडे वळविणार नाही.

२३. कुटुंबात नेहमी फक्‍त पित्यानेच निर्णय घ्यावयाचे असतात का?

२३ प्रत्येक व्यक्‍तिच्या मताला वा निर्णयाला खास महत्त्व मिळावे असे प्रसंग कुटुंबात घडतात. संबंध कुटुंबाच्या स्वाथ्याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी पित्यावर असते, बहुधा कुटुंबातील इतरांशी बोलून व त्याच्या इच्छा समजावून घेऊनच हे निर्णय घेतले जातात. स्वयंपाकघर आणि घरगुती इतर गोष्टीबाबत माता निर्णय घेऊ शकते. (नीतीसूत्रे ३१:११, २७) जसजशी मुले मोठी होतात तसे, खेळ, कपडे व इतर वैयक्‍तिक बाबतीत काही निर्णय ती घेऊ शकतात. पण योग्य तत्त्वे पाळण्याबाबत, मुलांच्या सुरक्षिततेबाबत तसेच इतरांच्या हक्कांबाबत पालकांनी मुलांवर योग्य तेवढी नजर ठेवली पाहिजे. यामुळे हळूहळू मुलांना निर्णय घेण्याची सवय लागते.

तुम्हा पालकांना मान लाभणे सोपे आहे का?

२४. मुलांनी पालकांना मान देण्यात, पालकांवर कोणती जबाबदारी पडते?

२४ मुलांना सांगितले आहे: “तुमच्या आई-वडिलांचा मान राखा.” (इफिसकर ६:२; निर्गम २०:१२) त्यांनी तसे करण्याने देवाच्या आज्ञेचाही सन्मान होतो. हे तुम्ही त्यांना सुलभ करता का? पत्नींनो, आपल्या पतीचा आदर करा, त्यांना मान द्या असे तुम्हाला सांगितले आहे. देवाच्या वचनाने पतीला दिलेल्या जबाबदाऱ्‍या तो पार पाडीत नसेल तर तुम्हालाही त्याला मान देणे जड जाते ना? पतींनो आपली सोबतीण म्हणून तुम्ही आपल्या पत्नीचा आदर करावा व तिचा प्रेमाने सांभाळही करावा. पण तिची मदत होत नसल्यास तुम्हाला ते कठीण जात नाही काय? याचप्रमाणे तुम्हाला मान द्यावा ही देवाची आज्ञा पाळण्यास आपल्या मुलांना सुलभ करा. शांततामय घर, उच्च तत्त्वे, स्वतःच्या वागणूकीतून उत्तम उदाहरण देऊन तसेच योग्य शिक्षण, चांगले वळण, व जरूर असेल तेव्हा प्रेमळ शिस्त लावून तुम्ही त्यांचा आदर मिळवा.

२५. मुलांना वळण लावण्याच्या बाबतीत पालकात दुमत असल्यास कोणत्या समस्या उभ्या राहतात?

२५ शलमोन राजा म्हणतो, “एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते.” (उपदेशक ४:९) दोघे एकत्र चालत असताना एक पडल्यास त्याला उठविण्यास दुसरा असतो. त्याचप्रमाणे कुटुंबातही पती व पत्नी ही आपापल्या भूमिकेत एकमेकाला मदत व धीर देतात. पालकत्वाच्या जबाबदारीत अनेक गोष्टी दोघेही करू शकतात. ही गोष्ट कुटुंबाच्या ऐक्याला हितकारक होते. मुलांना वळण लावण्याच्या समाईक जबाबदारीमुळे ती दोघे एकमेकांच्या अधिक जवळ यावीत. मुलाला कसे वळण व शिस्त लावावी याबाबत कधी कधी मतभेद होतात. कधी माता आपल्या मुलाकडे इतके लक्ष देते की पतीला दुर्लक्षित झाल्यासारखे वाटते व रागही येतो. त्यामुळे त्याचा मुलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक तर तो मुलाकडे फारसे लक्ष देणार नाही किंवा तो मुलाकडेच लक्ष देऊन पत्नीकडे दुर्लक्ष करील. अशा रितीने पती किंवा पत्नीचा तोल गेल्यास त्याची जबर किंमत मोजावी लागते.

२६. नवीन बाळावर मातेला बहुतेक वेळ खर्च करावा लागत असल्यास, मोठ्या मुलाला हेवा वाटू नये म्हणून काय करता येईल?

२६ आधीच एक मोठे मूल असताना आणखी नव्या बालकाचा जन्म झाला म्हणजे दुसरी समस्या उभी राहाते. मातेला बराचसा वेळ नव्या बाळाबरोबर घालवावा लागतो. मग मोठ्या मुलाला हेवा अथवा दुर्लक्षित वाटू नये म्हणून पित्याला त्याच्याकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल.

२७. पती-पत्नीत एकाचा, यहोवा देवावर विश्‍वास नसल्यास मुलांच्या आध्यात्मिक विकासासाठी काय करता येईल?

२७ एकट्या पेक्षा दोघे बरे. पण कोणीच नसण्यापेक्षा एक बरा. तशी परिस्थितीच उद्‌भवल्यामुळे पित्याच्या मदतीविना मातेलाच मुलांना मोठे करावे लागेल. किंवा तशी परिस्थिती पित्यावर ओढवेल. अनेकदा धर्ममतांमुळे घरात फूट असेल—यहोवा देवाचा सेवक असल्याने आई-वडिलांपैकी एकाचा पवित्र शास्त्राच्या शिकवणीवर पूर्ण विश्‍वास असेल तर दुसऱ्‍याचा नसेल. जेथे पिता समर्पित ख्रिस्ती असेल तेथे मुलांना वळण व शिस्त लावण्याची योग्य दिशा ठरविण्यात कुटुंबप्रमुख म्हणून त्याचा अधिक अधिकार असतो. तरीही त्याला बरीच सहनशीलता, सोशिकपणा व संयम दाखवावा लागेल. महत्त्वाच्या मुद्यांवर त्याने आपले मत ठाम ठेवले पाहिजे. पण इतर वेळी डिवचणी असली तरी समंजस व दयाळू असले पाहिजे. तसेच परिस्थितीप्रमाणे लवचीकही असावे. जर पत्नी ख्रिस्ती असेल तर पतीचा कल कसा आहे यावर तिचा मार्ग अवलंबून राहील. कारण ती त्याला आज्ञांकित आहे. त्याला पवित्र शास्त्रात रस वाटत नाही, की बायकोला तिच्या विश्‍वासाची जोपासना केल्यामुळे व तो आपल्या मुलावर लादण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो तिला विरोध करीत असतो? पती तिला विरोध करीत असल्यास प्रेषिताने दाखविलेला मार्ग तिने अनुसरावा: पत्नीच्या आदरयुक्‍त वर्तनाने व जबाबदाऱ्‍या उत्तमप्रकारे पार पाडल्यामुळे “वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने (त्याला) मिळवून घेतले जावे.” मुलांना पवित्र शास्त्राच्या तत्त्वांप्रमाणे वळण लावण्यास मिळतील त्या संधी तिने घेतल्या पाहिजेत.—१ पेत्र ३:१-४.

घरातील वातावरण

२८, २९. घरात कसे वातावरण असावे, का?

२८ घरात प्रेमाचे वातावरण निर्माण करण्याची भूमिका दोघा पालकांची असते. हे जर मुलांना जाणवले तर त्यांना वाटणारी भिती वा चुका ते पालकांना न सांगता मनातल्या मनातच दाबून ठेवणार नाहीत. ते सर्व खुल्या दिलाने पालकांना सांगू शकतात व पालकही सर्व जाणून घेऊन प्रेमळपणे त्यांना हाताळतील हे त्यांना कळते. (१ ले योहान ४:१७-१९ पडताळा; इब्रीयांस ४:१५, १६.) घर म्हणजे नुसता निवारा राहणार नाही तर स्वर्गच होईल. पालकांच्या प्रेमाने मुलांचा आनंद वाढेल आणि बहरेल.

२९ उसाच्या रसात कापूस बुडविला तर त्यात पाणी शोषले जावे अशी तुम्ही अपेक्षा करत नाही. त्याच्या भोवती जे असेल तेच त्यात शोषले जाईल. कापूस पाण्यात टाकल्याशिवाय त्यात पाणी कसे शिरेल? मुलेही आपल्या भोवतालची परिस्थिती शोषून आत्मसात करतात. त्यांना त्यांच्या भोवताली केलेल्या गोष्टी व लोकांची वागणूक जाणवते व कापसाप्रमाणे तेही ती आत्मसात करतात. मानसिक तणाव असो वा शांती असो, तुमच्या भावना मुलांना जाणवतात. तान्ही मुलेही सभोवतालचे वातावरण आत्मसात करतात. त्यामुळे घरातले वातावरण श्रद्धापूर्ण, प्रेमळ, धार्मिक व यहोवा देवावर विसंबणारे असणे अत्यावश्‍यक आहे.

३०. आपण मुलांपुढे चांगला आदर्श ठेवीत आहोत किंवा नाही हे ठरविण्यास पालकांनी स्वतःला कोणते प्रश्‍न विचारावेत?

३० स्वतःला विचारा: तुम्ही आपल्या मुलांकडून कोणत्या दर्जाची अपेक्षा करता? तुम्ही दोघे त्या दर्जाचे आहात का? तुमच्या कुटुंबात कशाला महत्त्व आहे? तुम्ही आपल्या मुलांना कोणता आदर्श घालून देता? तुम्ही सदा कुरकुरता, दुसऱ्‍याचे दोष दाखविता, दुसऱ्‍यांवर टीका करता व निराशावादी नकारात्मक भूमिका घेता का? अशाच प्रकारातील तुमची मुले व्हावी हे तुम्हाला वाटते का? की तुम्ही आपल्या कुटुंबासाठी उच्च नीतीमूल्ये ठरविता, स्वतः ती पाळता व मुलांकडूनही तशीच अपेक्षा करता का? या कुटुंबातील एक होण्यास काही आवश्‍यक गोष्टी केल्या पाहिजेत, ठराविक वर्तन व कल स्वागतार्ह नाहीत हे त्यांना कळते का? आपण कोणाचे तरी आहोत ही जाणीव मुलांना हवी असते, म्हणून कुटुंबातील नीतीमूल्ये योग्यपणे पाळल्यास तुम्ही त्यांना पसंती व स्वीकार दाखवा. अपेक्षिलेला दर्जा गाठण्याची लोकांची जात्या प्रवृत्ती असते. तुम्ही आपल्या मुलाला सतत वाईट म्हटले तर तो तुमचे शब्द खरे करुन दाखवील. त्याच्याकडून चांगल्याची अपेक्षा ठेवली तर तसे वागण्यास तुम्ही त्याला प्रोत्साहन द्याल.

३१. पालकांच्या मार्गदर्शनाला कशाचा पाठिंबा असावा?

३१ आपल्या बोलण्यापेक्षा वागण्याने लोक चांगले वा वाईट ठरतात. मुलेही कृतीकडे जेवढे लक्ष देतील तितके बोलण्याकडे देणार नाहीत व दांभिकपणा सहसा त्यांच्या नजरेतून सुटत नाही. जास्त बोलण्याने त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. जसे बोलाल तसे वागण्यात जागरुक राहा.—१ योहान ३:१८.

३२. कोणाचे मार्गदर्शन नेहमी स्वीकारावे?

३२ तुम्ही आई असा किंवा वडील, तुमच्या भूमिकेत आव्हान आहे. पण जीवनदात्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या आव्हानास तोंड दिल्यास उत्तम फल प्राप्त होते. जणू देवाचे काम करीत आहोत या भावनेने, सद्‌सद्‌विवेकबुद्धीला स्मरून आपापली भूमिका पार पाडा. (कलस्सैकर ३:१७) अतिरेक टाळा, तोल सांभाळा, तुमच्या मुलांसह सर्वांना “तुमचा समंजसपणा कळून येवो.”—फिलिप्पैकर ४:५.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१०० पानांवरील चित्रं]

आईचा प्रेमळ शब्द, कटाक्ष आणि स्पर्श बाळाला म्हणतो: “बाळ तू मला आवडतो”

[१०४ पानांवरील चित्रं]

मुलांसोबत तुम्ही कधी काही कार्यक्रम योजिता का?