दळणवळणाचा मार्ग खुला ठेवणे
अध्याय ११
दळणवळणाचा मार्ग खुला ठेवणे
१, २. दळणवळण म्हणजे काय? त्याला महत्त्व का आहे?
दळणवळणामध्ये नुसत्या बोलण्यापेक्षा अधिक काही समावलेले असते. प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे तुमचे बोलणे ऐकणाऱ्याला समजू शकले नाही तर, “तुम्ही वाऱ्याबरोबर बोलणारे व्हाल.” (१ करिंथकर १४:९) तुम्ही काय बोललात ते तुमच्या मुलांना समजते का? ती काय म्हणत आहेत हे तुम्हाला खरेच कळते का?
२ विचार, कल्पना व भावना एका मनाकडून दुसऱ्या मनापर्यंत पोहोंचल्या तरच ते खरे दळणवळण असते. प्रीतीला गृहसौख्याचे हृदय म्हटल्यास दळणवळणास जीवनदायी रक्तासमान म्हणता येईल. विवाहित जोडप्यामध्ये दळणवळण खुंटल्यास संकटे ओढावतात. तीच अवस्था पालक व मुलात उत्पन्न झाल्यास तेवढीच गंभीर समस्या ओढवते.
दूरदर्शी दृष्टिकोन ठेवणे
३. मुलांच्या कोणत्या अवस्थेत दळणवळणात खंड पडण्याची शक्यता असते?
३ मुलांच्या बाल्यावस्थेत पालक व मुलात दळणवळण खुंटण्याचे भय नसते तर ती “वयात” येऊ लागल्यावर असते. अशी परिस्थिती निर्माण होते याची पालकांनी जाणीव ठेवावी. मुलांचे बाल्य तुलनात्मक दृष्ट्या समस्याविरहीत असल्याने पुढेही त्यांचे आयुष्य तसेच राहील अशी अपेक्षा बाळगणे अवास्तव होईल. समस्या नक्कीच येतील. त्या सोडवण्यास व कमी करण्यात दळणवळणाचा मोठा हातभार लाभतो. याची जाणीव ठेवून पालकांनी दूरदृष्टी ठेवली पाहिजे. कारण “एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा.”—उपदेशक ७:८.
४. कुटुंबातील सर्व वैचारिक देव-घेव बोलण्यातूनच व्हावी का? स्पष्ट करा.
४ कुटुंबातील दळणवळण सुरु होण्यास, वाढवण्यास व ते सुरक्षित चालण्यास अनेक गोष्टी लागतात. अनेक वर्षांच्या सहवासाने पती-पत्नीमध्ये गाढ विश्वास, निष्ठा व परस्परात समजुतदारपणा निर्माण होतो. त्यामुळे शब्दाविनाही दळणवळण शक्य होते—एक दृष्टिक्षेप, स्मित, स्पर्श, यातूनही ते एकमेकांशी बोलू शकतात. मुलांशी दळणवळण साधण्यासाठीही असाच भक्कम पाया घालण्याकडे त्यांनी कटाक्ष ठेवला पाहिजे. तान्हे मूल बोलू लागण्याआधीच पालक, सुरक्षितता व प्रेमाच्या भावना त्याला कळवतात. मुलांची वाढ होत असताना कुटुंबातील सर्व एकत्र होऊन काम करीत असतील, खेळत असतील व त्यातूनही महत्त्वाचे म्हणजे एकत्रितपणे देवाची भक्ती करीत असतील तर दळणवळणास बळकटी येते. ही देव घेव सुरळीतपणे व सतत चालू राहण्यास मात्र कष्ट व शहाणपणा लागतो.
आपले विचार व्यक्त करण्यास मुलास उत्तेजन देणे
५-७. (अ) मुलांच्या बोलण्यावर कडक बंधने घालण्यापासून सावध असणे चांगले का आहे? (ब) पालक आपल्या मुलांना नम्रता व सौजन्य कसे शिकवू शकतील?
५ “मुलांनी मोठ्या माणसांमध्ये बोलता कामा नये” या अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. कधीकधी ते बरोबरही आहे. देव-वचनात म्हटल्याप्रमाणे “मौन धरण्याचा व बोलण्याचा समय असतो” हे मुलांनी शिकले पाहिजे. (उपदेशक ३:७) मुलांना लोकांचे लक्ष आकर्षिण्याची अतिशय इच्छा असते. स्वतंत्र विचार व्यक्त करण्याच्या मुलांच्या प्रवृत्तीला पालकांनी अकारण दडपू नये. कोणत्याही अनुभवावर लहान मुलांची प्रतिक्रिया प्रौढासारखीच असावी अशी अपेक्षा करु नका. प्रौढ माणूस कोणत्याही प्रसंगाकडे—जीवननाट्यातील एक अंक या दृष्टीने पाहातो. लहान मूल मात्र तात्कालिक प्रसंगामुळे इतके प्रभावित होते की त्याला इतर सर्व गोष्टींचा विसर पडतो. एखादे लहान मूल धावत येऊन उत्साहाने आपल्या आई किंवा वडिलांना एखाद्या घटनेबद्दल सांगू लागल्याबरोबर त्यांनी चिडून “केवढ्याने बोलतोस!” असे म्हटल्यास त्या मुलाचा उत्साह पार निघून जातो. लहान मुलांच्या बडबडीत फारसा अर्थ नसतो. परंतु त्याचे विचार व्यक्त करण्यास उत्तेजन देऊन त्याच्या पुढील आयुष्यात ज्या गोष्टींची तुम्हाला माहिती हवी असते किंवा माहिती असण्याची जरुरी असते त्या तुमच्यापासून लपवण्यापासून तुम्ही त्याला परावृत्त कराल.
६ सभ्यता व विनयशीलतेने दळणवळणाला मदत होते. मुलांनी विनय शिकला पाहिजे. तसेच पालकांनीही मुलांशी बोलताना व इतर वेळीही त्यांचे उदाहरण घालून दिले पाहिजे. वेळोवेळी त्यांना तंबी देण्याची जरुरी पडेल. आवश्यक तेव्हा ती दिली पाहिजे—वाटल्यास कठोरपणेही. (नीतीसूत्रे ३:११, १२; १५:३१, ३२; तीत १:१३) परंतु मुलांचे बोलणे सतत थांबवले, खोडून टाकले किंवा त्याहूनही वाईट म्हणजे पालकांनी त्यांना तुच्छ लेखले व अवहेलना केली तर ती मोकळेपणाने बोलेनाशी होतील—किंवा इतर कोणाकडे मन मोकळे करतील. मुलगा वा मुलगी प्रौढ होत राहते तसतसा हा अनुभव जास्त येतो. दिवस सरल्यावर आपल्या मुलांबरोबरचे आपले संभाषण आठवून स्वतःला विचारा—किती वेळा मी त्याचे कौतुक केले, उत्तेजन व शाबासकी दिली किंवा प्रशंसा केली? त्याचबरोबर, मुले ‘खचतील’ असे असमाधान दर्शविणारे, चीड व संताप व्यक्त करणारे मी किती बोललो? आपल्या फेर तपासणीच्या निष्कर्षाचा तुम्हाला अचंबा वाटेल.—नीतीसूत्रे १२:१८.
७ पालकांनी संयम व सोशिकपणा बाळगला पाहिजे. तरुण मुले उताविळीने वागतात. मोठी माणसे बोलत असताना आपल्या मनात आलेल्या गोष्टी ती मुले एकदम बोलून टाकतात. अशा वेळी पालक त्यांना सरसकटपणे बोलतील. परंतु त्यावेळी त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून संयमाचे उदाहरण घालून देणे शहाणपणाचे असते. थोडक्यात त्याचे उत्तर देऊन मुलाला विनयाची व दुसऱ्यांचा विचार करण्याची आठवण करून द्यावी. “माणूस ऐकावयास शीघ्र बोलावयास धीमा, रागास मंद असावा” हा उपदेश येथेही लागू होतो.—याकोब १:१९.
८. मार्गदर्शनासाठी आपल्याकडे येण्यास पालक मुलांना कसे उत्तेजन देऊ शकतील?
८ मुलांना समस्या आल्यास त्यांनी तुम्हाला सल्ला विचारावा अशी तुमची इच्छा असते. तुम्हीही जीवनाच्या समस्यांसाठी मार्गदर्शन स्वीकारता व कोणाशी तरी आज्ञाधारक आहात हे दाखवून तुम्ही मुलांना जवळ येण्यास उत्तेजन द्याल. आपल्या मुलांशी जवळीक साधण्यास अनुसरलेल्या एका मार्गाबद्दल बोलताना एक बाप म्हणाला:
“बहुतेक दररोज रात्री मी मुलांबरोबर झोपण्याच्या वेळी प्रार्थना करतो. बहुधा ती बिछान्यात असतात आणि मी शेजारी गुडघे टेकलेल्या स्थितीत असतो. आणि त्यांना मिठीत घेतो. मी एक प्रार्थना म्हणतो आणि एकामागोमाग तीही ती प्रार्थना म्हणतात. मग बरेच वेळा ती माझा मुका घेतात आणि म्हणतात ‘बाबा, तुम्ही मला फार आवडता’ आणि मग आपल्या मनातले काहीतरी सांगतात. आपल्या बिछान्याच्या उबेत आणि वडिलांच्या कुशीत ती त्यांच्या समस्यांना तोडगा शोधतात किंवा प्रेमाचे चार शब्द बोलतात.”
जेवणाच्या वेळी किंवा इतर वेळीही तुमची प्रार्थना ठराविक नव्हे तर उत्स्फूर्त, मनापासून केलेली असल्यास व त्यात तुमचा देवाशी असलेला संबंध प्रकट होत राहिल्यास तुमचे आपल्या मुलांशी असलेले संबंध दृढ होण्यास फारच उपयोग होतो.—१ योहान ३:२१; ४:१७, १८.
बदलाचा काळ
९. लहान मुलांशी तुलना करता वयात येणाऱ्या मुलांच्या गरजा व समस्यांबद्दल काय म्हणता येईल?
९ यौवन हा बदलाचा काळ असतो. त्यावेळी तुमचा मुलगा व मुलगी लहान नसते. पण अजून प्रौढही झालेली नसतात. युवकांच्या शरीरात बदल घडून येत असतात व याचा त्यांच्या भावनांवरही परिणाम होतो. युवकांच्या समस्या व गरजा बाल्यावस्थेतील काळापेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे पालकांनीही त्या समस्येविषयीचा आपला पवित्रा हाताळला पाहिजे. कारण बाल्यावस्थेत जी पद्धत उपयोगी ठरली ती यौवनावस्थेत उपयुक्त ठरेलच असे नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी कारणे सांगावी लागतील यासाठी दळणवळणाची अधिक जरुर पडते.
१०. (अ) लैंगिक विषयाबाबत साधे स्पष्टीकरण तरुणांना पुरेसे का होत नाही? (ब) लैंगिक विषयाबद्दल पालकांनी आपल्या मुलांशी कशा रितीने चर्चा राहू द्यावी?
१० उदाहरणार्थ तुमचे मूल लहान असताना लैंगिक विषयाबद्दल तुम्ही दिलेले साधे स्पष्टीकरण युवकांना पुरेसे होणार नाही. त्यांना स्वतःला लैंगिक भावना जाणवतात, परंतु लज्जेमुळे ती आई-वडिलांना प्रश्न विचारत नाहीत. अशावेळी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. परंतु लहानपणी मुलांशी कामात, खेळात सहभागी होऊन दळणवळणाची सवय केलेली असली तरच हे शक्य होईल. लेकरांना आधीच त्याबद्दल नीट समजावून सांगितलेले असेल तर मुलांना रेत-रस्खलनाविषयी व मुलींना मासिक पाळी विषयी बागुलबोवा वाटणार नाही. (लेवीय १५:१६, १७; १८:१९) एखाद्या वेळी सोबत फिरावयास गेलेले असताना, हस्त मैथुनाचा विषय काढून वडील त्याला सांगू शकतात की अनेक मुलांची अशी समस्या असते तेव्हा, ‘तू त्याबाबतीत काय करतोस?’ किंवा ‘याबाबतीत तुला काही समस्या वाटते का? असे विचारु शकतात. तसेच संबंधित विषयावर कुटुंबात चर्चा होऊ शकते. तेव्हा आई व वडिलांनी स्पष्ट व सभ्यतेने ती हाताळली पाहिजेत.
युवकांच्या गरजा जाणणे
११. वयात येणारी मुले व प्रौढांत काय फरक असतो?
११ “ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर; आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर.” (नीतीसूत्रे ४:७) पालक या नात्याने तुम्ही मुलांना ओळखा, त्यांच्या भावनांची कदर करा. आपण स्वतः लहान असतानाची परिस्थिती विसरु नका. त्याचप्रमाणे हेही ध्यानात ठेवा की प्रत्येक प्रौढ एकदा लहान होता व बालपण म्हणजे काय हे त्याला कळते. पण लहानांना प्रौढत्वाची कल्पनाच नसते. यौवनात पदार्पण केलेल्यांना मुलांसारखे वागवलेले पसंत पडत नाही. पण तो प्रौढही नाही तसेच त्याला प्रौढांच्या विषयात रसही नसतो. अजून त्याच्यात बराच खेळकरपणा असतो. त्यासाठी त्याला मोकळीक मिळाली पाहिजे.
१२. पालकांनी आपल्याला कसे वागवावे असे तरुणांना वाटते?
१२ युवकांना या दशेत पालकांकडून काही गोष्टींची खास गरज भासते. त्यांना समजावून घ्यावयास हवे; त्याहून अधिक म्हणजे त्यांना व्यक्ती म्हणून वागणूक हवी असते. त्यांची प्रौढत्वाकडे चाललेली वाटचाल लक्षात घेऊन त्यांना यथायोग्य मार्गदर्शन हवे असते. आपण इतरांना हवेसे वाटावे, तसेच आपण केलेल्या गोष्टीचे कौतुकही व्हावे असे त्यांना वाटत असते.
१३. पालकांनी घातलेल्या बंधनावर तरुणांची कशी प्रतिक्रिया होऊ शकेल व का?
१३ यौवनात बंधने झुगारण्याची वृत्ती डोके वर काढू लागल्यास पालकांनी अचंबा करु नये. पुढील स्वातंत्र्याच्या वाटेवर असल्याने तसेच स्वतःच्या आवडी-निवडी व कामाच्या पद्धतीच्या कल्पना यामुळे तसे होणे नैसर्गिक आहे. तान्ह्या मुलांची सतत काळजी घ्यावी लागते, लहान मुलांना संरक्षण द्यावे लागते पण पुढे ती वाढू लागल्यावर त्यांचे कार्यक्षेत्रही वाढू लागते. कुटुंबाबाहेरील व्यर्क्तिशी संबंध वाढू लागतात. अशा स्वातंत्र्याकडे झुकणारी मुले व मुली सांभाळणे फार जड जाते. पालकांना स्वतःच्या अधिकाराचे उल्लंघन वा डावलणे, मुलांच्या भल्यासाठी शक्य नसते. परंतु हे चिंता लावणारे वागणे कशामुळे आहे याची जाणीव ठेवल्यास दळणवळण सुरळीत चालू शकते तसेच मुलांचा योग्य समाचारही घेता येतो.
१४. अधिक स्वातंत्र्याच्या मुलांच्या इच्छेला पालकांना कसे यशस्वीरीत्या तोंड देता येईल?
१४ मुलगा वा मुलीच्या अधिक स्वातंत्र्याच्या धडपडीस पालकांनी कसे तोंड द्यावे? त्यांची ही धडपड चिमटीत धरलेल्या र्स्प्रिगप्रमाणे असते. एकदम सोडल्यास अतिशय वेगाने ती कोणत्या दिशेस उडेल ते सांगता येत नाही. ती फार वेळ धरून ठेवल्यास स्वतःतर थकालच शिवाय तिचा लवचिकपणाही कमी झालेला असेल. परंतु व्यवस्थितपणे हळूहळू सोडल्यास ती आपल्या जागी नीट उभी राहील.
१५. येशूची प्रौढत्वाची वाढ पालकांच्या मार्गदर्शनाखाली झाली हे कशावरून दिसून येते?
१५ अशा संरक्षित वाढीचे उदाहरण येशूच्या बाबतीत पहावयास मिळते. यौवनाच्या आधीच्या येशूच्या अवस्थेबाबत लूक २:४० मधील वृतांत म्हणतो: “तो बालक वाढत वाढत बलवान होत गेला, व ज्ञानाने परिपूर्ण होत गेला; आणि त्याच्यावर देवाची कृपा होती.” त्याच्या वाढीत त्याच्या पालकांचा भाग निश्चये होता कारण परिपूर्ण असला तरी त्याला ज्ञान आपोआप प्राप्त होणार नव्हते. त्या वृतांतात सांगितल्याप्रमाणे येशूला शिक्षण देण्यासाठी त्यांनी सातत्याने आध्यात्मिक वातावरणाची जोपासना केली. तो १२ वर्षाचा असताना वल्हांडणाच्या सणासाठी सर्व कुटुंब यरुशलेमेत होते त्यावेळी येशू मंदिरात गेला व तेथील शास्त्र्यांबरोबर संभाषणात गुंतला. त्याच्या पालकांनी आपल्या १२ वर्षाच्या मुलाला तेवढे स्वातंत्र्य दिले होते हे उघड आहे. ते यरुशलेम सोडून निघाले तेव्हा तो मागेच राहिला तो परतणाऱ्या इतर नातेवाईक अथवा मित्रमंडळीबरोबर असावा असे त्यांना वाटले. तीन दिवसानंतर तो त्यांना मंदिरात सापडला. तेथे तो वडील वर्गाला शिकवत नव्हता तर; “त्यांचे भाषण ऐकताना व त्यांस प्रश्न करताना सापडला.” त्याला शोधताना त्यांना फार कष्ट पडल्याचे त्याच्या आईने नजरेस आणून दिले. येशूनेही त्यांचा अवमान न करता उत्तर दिले की परतण्याच्या वेळी कोठे शोधावयाचे हे त्यांना माहीत असेल असे त्याला वाटले. त्याला हालचालीचे थोडे स्वातंत्र्य दिलेले असले तरी वृतांत पुढे म्हणतो की “येशू त्यांच्या आज्ञेत राहिला.” म्हणजेच यौवनात पदार्पण करताना त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व बंधनांना अनुसरुन त्याने आपले जीवन घडवले व तो “ज्ञानाने शरीराने, आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला.”—लूक २:४१-५२.
१६. वयात येणाऱ्या मुलांबरोबर समस्या उत्पन्न झाल्यास पालकांनी काय ध्यानात ठेवावे?
१६ असेच पालकांनी वयात येणाऱ्या आपल्या मुलाला किंवा मुलीला योग्य मार्गदर्शन व देखरेखीसह हळूहळू स्वतःचे निर्णय घेऊ देऊन स्वातंत्र्य व स्वावलंबन शिकवावे. अडचणी उत्पन्न होतात तेव्हा त्यांचे कारण समजत असल्याने पालक, पराचा कावळा करण्याचे टाळतील. अनेकदा युवक हेतुपुरस्पर पालकांविरुद्ध भूमिका घेत नाहीत, परंतु स्वातंत्र्य कसे प्रस्थापित करावे ते योग्यपणे त्यास कळलेले नसते एवढेच. त्यामुळे कधी कधी पालक नको त्या गोष्टीबाबत गजहब करतात. जर गोष्ट फारशी गंभीर नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे फारच श्रेयस्कर ठरेल. परंतु गंभीर असल्यास खंबीर झाले पाहिजे, ‘चिलटे गाळून काढून उंट गिळू नका.’—मत्तय २३:२४.
१७. वयात येणाऱ्या मुलांवर बंधने घालताना पालकांनी कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात?
१७ वयात येणाऱ्या आपल्या मुला-मुलींवर योग्य तेवढीच बंधने ठेवून पालक त्यांच्याशी उत्तम नातेसंबंध जोपासू शकतात. “वरुन येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते” तसेच ते “समजुतदार” व “दयेने पूर्ण” आणि “निर्दंभ” असते हेही लक्षात ठेवा. (याकोब ३:१७) चोरी, व्यभिचार, मूर्तिपूजा यासारख्या गंभीर बाबी घृणास्पद आहेत असे पवित्र शास्त्र दाखविते. (१ करिंथकर ६:९, १०) बाकीच्या अनेक बाबतीत मात्र गोष्ट कोणत्या थराला गेली यावर ती योग्य वा अयोग्य आहे हे ठरते. अन्न चांगले असते परंतु ते जास्त खाल्यास आपण अधाशी बनतो. नृत्य, खेळ, पार्ट्या, वगैरे गोष्टींचेही तसेच आहे. अनेकदा काय केले यापेक्षा कसे केले, कोणाच्या सहवासात केले याला महत्त्व असते. खादाडपणाला वाईट म्हणताना खाण्यावर आपली टीका नसते. तसेच काहीजण गोष्टी पराकोटीला नेण्यापर्यंत करीत राहतात वा त्या अयोग्य परिस्थिती आणतात म्हणून आपल्या तरुण मुलांच्या थोड्या फार वागणुकीला पालकांनी विरोधाच्या कडव्या आच्छादनात गुंडाळत राहावे असे नाही.—कलस्सैकर २:२३ पडताळा.
१८. पालकांनी आपल्या मुलांना मित्रमंडळींबद्दल सावधानतेचा इशारा कसा द्यावा?
१८ सर्व तरुण-तरुणींना मित्र-मैत्रिणी असाव्यात असेच वाटते. त्यातले फारच थोडे “आदर्श” मित्र असतील पण मग तुमच्याही मुलात थोडे फार दुर्गुण आहेतच ना? काही मित्रांचा सहवास हितावह न वाटल्याने तुम्ही आपल्या मुलांवर तसे बंधन घालू पहाल. (नीतीसूत्रे १३:२०; २ थेस्सलनीकाकर ३:१३, १४; २ तीमथ्य २:२०, २१) इतरांच्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टी चांगल्या व काही वाईट आढळतील. एखाद्याच्या एका गुणामुळे त्याची संगत पूर्णपणे टाळण्यापेक्षा आपल्या मुलांना त्याचे चांगले गुण दाखविताना वाईट गुणांबद्दलही इशारा द्यावा. व त्या मित्राचा त्या बाबतीत फायदा करुन देण्याकडे मुलांचे लक्ष वेधवावे.
१९. लूक १२:४८ मध्ये सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे मुलांना स्वातंत्र्याचा योग्य दृष्टिकोन कसा शिकवता येईल?
१९ वाढत्या स्वातंत्र्याबरोबर जबाबदाऱ्याही वाढतात. हे मुलांच्या निदर्शनास आणून दिल्यास त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन उत्पन्न होतो. “ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल.” (लूक १२:४८) मुले जसजशी जास्त जबाबदारीने वागू लागतात तसतसे पालकही त्यांच्यावर जास्त विश्वास टाकतात.—गलतीकर ५:१३; १ पेत्र २:१६.
सल्ला व शिस्त वदवणे
२०. दळणवळणातील खंड टाळण्यासाठी अधिकाराशिवाय कशाची गरज आहे?
२० तुमच्या परिस्थितीची समजावणूक नसताना एखाद्याने तुम्हाला सल्ला दिला तर तो तुम्हाला चुकीचा वाटतो. त्यात त्याने तो सल्ला मानावयास भाग पाडले तर तुम्हाला ते अपायकारक वाटते. पालकांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे की “बुद्धीमानाचे हृदय ज्ञानाचा शोध करिते” व “ज्ञानी मनुष्य आपले बल दृढ करितो.” (नीतीसूत्रे १५:१४; २४:५) तुम्हाला मुलांवर अधिकार असेल पण ज्ञान व समजुतदारपणाची त्याला जोड दिल्यास त्यांच्याशी दळणवळण सुलभ होईल. मुलांच्या चुका सुधारताना समजुतदारपणा न दाखविल्यास “पीढी तफावत” निर्माण होते व दळणवळण थंडावते.
२१. गंभीर चुका केलेल्या मुलांना पालकांनी कसे हाताळावे?
२१ तुमच्या मुलाने अडचणी ओढवून घेतल्या, गंभीर चुका केल्या; किंवा तुम्हाला चकीत करुन सोडणाऱ्या चुका केल्या तर तुम्ही काय कराल? चुकीकडे दुर्लक्ष कधीही करु नका. (यशया ५:२०; मलाखी २:१७) पण कधी नव्हे इतकी तुमच्या मुलाला तुमची मदत व मार्गदर्शन यांची गरज आहे हे ध्यानात घ्या. यहोवा देवाप्रमाणे तुम्हीही ‘चल ये आपण सर्व गोष्टी ठीक-ठाक करु; शिवाय परिस्थिती गंभीर असली तरी हाताबाहेर गेलेली नाही’ असे म्हणू शकता. (यशया १:१८) संतापाच्या भरात रागवाल तर दळणवळण संपुष्टात येईल. हातून चुका घडलेल्या बहुतेक मुलांचे म्हणणे असते की: ‘मी माझ्या आई-वडिलांशी बोलू शकलो नाही. ते माझ्यावर रागावले असते.’ इफिसकर ४:२६ म्हणते: “जर तुम्ही रागावला असाल तर चिडीमुळे पापाप्रत जाऊ नका.” (न्यू इंग्लिश बायबल) तुमचा मुलगा व मुलगी काही सांगत आहे तोवर आपल्या भावनांना आवर घाला. ते ऐकून घेण्यात तुम्ही दाखविलेल्या संयमामुळे तुम्ही नंतर सुचविणार असलेली सुधारणा ऐकणे त्यांना सोपे जाईल.
२२. आपण मुलांपुढे हात टेकले असे पालकांनी कधीही का दाखवू नये?
२२ एखाद्या वेळी ती एक स्वतंत्र घटना नसून अनिष्ट गुणाचा प्रादुर्भाव होण्याची लक्षणे असतील. शिस्त अत्यावश्यक असली तरीही पालकांनी एका शब्दानेही किंवा वृत्तीने असे दाखवता कामा नये की त्यांनी मुलापुढे हात टेकलेले आहेत व यापुढे काहीही करणे त्यांच्या आटोक्यात नाही. तुमचा सोशिकपणा तुमच्या प्रेमाची ग्वाही देईल. (१ करिंथकर १३:४) वाईटाने वाईटाचा मुकाबला करण्यापेक्षा त्याला चांगल्याने जिंका. (रोमकर १२:२१) “आळशी,” “बंडखोर,” “बेकार,” “हाताबाहेर गेलेला” अशा शब्दात सर्वांपुढे तरुणांची अवहेलना केल्याने फक्त नुकसानच होते. प्रीती आशा सोडीत नाही. (१ करिंथकर १३:७) एखादा तरुण अपराध करुन घर सोडून जाईल. त्याने केलेल्या गोष्टीला पाठिंबा न दर्शवता पालक त्याच्या परतीला दार उघडे ठेवू शकतात. ते कसे? त्याची नव्हे तर त्याच्या मार्गाची त्यांना चीड आहे हे दाखवून त्याच्यात चांगले गुण आहे व शेवटी तेच जिंकतील यावरची त्यांची श्रद्धा त्याला दाखवून देतील. असे झाल्यास येशूने दिलेल्या दाखल्यातील उधळ्या मुलाप्रमाणे, घरी आपल्यावर कोणी रागवणार नाही व तुच्छही लेखणार नाही या खात्रीने तो घरी परतेल.—लूक १५:११-३२.
वैयक्तिक योग्यतेची जाणीव
२३. आपण कुटुंबाचे मोलाचे घटक आहोत असे तरुणांना वाटू देणे महत्त्वाचे का आहे?
२३ सर्व मनुष्यमात्रांना स्वतःच्या अस्तित्वाची, इतरांनी दखल घ्यावी, आपला स्वीकार करावा व पसंती दर्शवावी अशी इच्छा असते. तो स्वीकार व संमती मिळवावयाची असल्यास त्या व्यक्तिने स्वैराचारी बनण्याची आवश्यकता नाही. ज्या संगतीत तो राहतो त्यात त्यांनी घालून दिलेल्या वर्तनाच्या बंधनाच्या चौकटीत त्याने राहावयास हवे. तरुणांनाही आपल्या कुटुंबाचा भागीदार असण्याच्या भावनेची गरज भासते. यास्तव, कुटुंबाच्या सुस्थितीला हातभार लावणारे, त्यासाठी योजना करुन निर्णय घेणारे ते अत्यंत मोलाचे घटक आहेत असे त्यांना वाटू द्या.
२४. एका मुलाला दुसऱ्याचा हेवा वाटू नये म्हणून पालकांनी काय करण्याचे टाळावे?
२४ प्रेषित म्हणतो: “आपण पोकळ अभिमान बाळगणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.” (गलतीकर ५:२६) मुलाने वा मुलीने चांगली गोष्ट केल्यावर त्याची प्रशंसा केल्याने असा आत्मा उद्भवण्यास प्रतिबंध लागेल. पण एखाद्यालाच सतत आदर्श मानून दुसऱ्याची त्याच्याशी तुलना करून कमीपणा दाखवत गेल्यास हेवा व चीड उत्पन्न होते. प्रेषित म्हणतो: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.” (गलतीकर ६:४) प्रत्येक तरुणाला त्याच्या कुवतीप्रमाणे तो आहे तसा इतरांनी स्वीकार करावा व त्यासाठी त्याच्या पालकांनी त्याच्यावर प्रीती करावी, असे वाटत असते.
२५. वैयक्तिक लायकीची जाणीव मुलात निर्माण करण्यास पालक काय करु शकतील?
२५ जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पेलण्याचे शिक्षण देऊन पालक आपल्या मुलात वैयक्तिक लायकीची जाणीव निर्माण करण्यास मदत करु शकतात. सचोटी, सत्यप्रियता व इतरांशी योग्य वर्तन ठेवून ते मुलांना बालपणापासून शिक्षण देत असतात. मग या पायावर पुढे हे सर्व गुण मानव समाजात कसे लागू पडतात याचे शिक्षण दिले जाते. कोणत्याही कामाची जबाबदारी घेऊन ते पार पडेपर्यंत त्याला चिकटून राहण्याच्या शिक्षणाचाही त्यातच समावेश होतो. होय, तरुणपणी “ज्ञानाने वाढत असता”ना येशूनेही आपल्या मानलेल्या वडिलांकडून, योसेफाकडून धंद्याचे शिक्षण घेतले असावे. कारण तो ३० वर्षाचा झाल्यावर व देवाच्या राज्याचे काम करु लागल्यावरही लोक त्याला “सुतार” असे संबोधित असत. (मार्क ६:३) मालकाची व गिऱ्हाईकाची योग्य सेवा कशी करावी आणि त्यांना खुष कसे करावे ते मुलांनी लहान वयात शिकणे फार इष्ट—मग ते काम निरोप पोहोचवण्यासारखे साधे का असेना; आपले काम परिश्रमपूर्वक मन लावून व विश्वासूपणे केल्यास त्यांना स्वाभिमान बाळगता येतो. तसेच इतरांचा आदर व कौतुकही प्राप्त होते. त्यामुळे ते आपल्या पालकांनाच भूषणावह होतात असे नाही तर “आपल्या तारणाऱ्या देवाच्या शिक्षणास शोभा” आणतात.—तीत २:६-१०.
२६. मुलगी ही कुटुंबातील उपयुक्त घटक असल्याचे कोणत्या प्राचीन रिवाजावरून दिसून येते?
२६ मुलीही घरकाम शिकून घरात व बाहेरही कौतुक व प्रशंसेला पात्र होऊ शकतात. पवित्र शास्त्र काळी, लग्नात मुलगी देण्यासाठी वराकडून हुंडा घेण्यात येत असे कारण त्यात घरातली मुलीची उपयुक्तता दर्शवली जाई. ती दुसऱ्या घरी गेल्यावर कुटुंबाची होणारी हानी भरुन काढण्याचा दृष्टिकोन त्यात होता यात शंका नाही.—उत्पत्ती ३४:११, १२; निर्गम २२:१६.
२७. शिक्षणाच्या संधीचा सदुपयोग का करून घेतला पाहिजे?
२७ सध्याच्या परिस्थितीचे आव्हान स्वीकारण्यासाठी मुलांना सिद्ध करण्यास शिक्षणाच्या संधीचा पुरेपुर फायदा करुन घेतला पाहिजे. “आपल्या लोकांनी आपल्या अगत्याच्या गरजा पुरविल्या जाव्या म्हणून चांगली कृत्येही [प्रामाणिक नोकऱ्या, न्यू इंग्लिश बायबल] करण्यास शिकावे म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत” या प्रेषितांच्या उपदेशात तरुणांनाही गृहीत धरले आहे.—तीत ३:१४
पवित्र शास्त्राच्या नीतीनियमामुळे मिळणारे संरक्षण
२८, २९. (अ) इतरांच्या संगतीबद्दल पवित्र शास्त्र काय सल्ला देते? (ब) हा सल्ला मानण्यास पालक आपल्या मुलांना कशी मदत करू शकतात?
२८ आसपासच्या वस्तीमुळे किंवा शाळांमुळे आपली मुले वाममार्गी मुलांच्या संगतीत राहून स्वनुकसानी बनतील अशी साधार भीती पालकांना वाटते हे समजण्यासारखे आहे. “कुसंगतीने नीती बिघडते” या देववचनाची सत्यता पालकांना ठाऊक असेल. त्यामुळे ‘सगळेजण असे करतात, मग मी का करु नये?’ या मुलांच्या विनवण्या ते मान्य करण्यास सहसा तयार होत नाहीत. बहुधा सगळेच तसे करत नसतील. पण ती गोष्ट चूक वा अयोग्य असल्यास इतर करतात या कारणास्तव तुमच्या मुलाने करणे योग्य नाही. “दुर्जनांचा [वा वाईट मुलांचा] हेवा करु नको. त्यांच्या संगतीची इच्छा धरू नको; त्यांचे अंतःकरण बलात्कार करण्याचा (लुटण्याचा) बेत करते; त्यांच्या वाणीतून घातपाताचे बोल निघतात. सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते. समंजसपणाने ते मजबूत राहते.”—१ करिंथकर १५:३३; नीतीसूत्रे २४:१-३.
२९ शाळेत आणि आयुष्यातही तुम्हाला मुलांची सदैव पाठराखण करता येत नाही. पण शहाणपणाने आपले कुटुंब वाढवून तुम्ही नीतीमत्तेचे चांगले पाठ व योग्य मूल्ये त्यांच्या मार्गदर्शनार्थ त्यांच्यासोबत पाठवू शकता. “ज्ञान्याची वचने पराण्यासारखी असतात.” (उपदेशक १२:११) प्राचीन काळी लांब काठीच्या टोकास अणकुचीदार टोक बसवलेले असे हे पराणे जनावरांना सरळ मार्गावर पुढे चालत ठेवण्यास टोचणी म्हणून उपयोगात आणीत. पराण्याप्रमाणेच देवाची सुज्ञ वचने आपल्याला सुमार्गावर चालवतील. आपण वाट सोडल्यास ती आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला टोचून आपला मार्ग बदलावयास लावतील. मुलांच्या अक्षय कल्याणासाठी असे शहाणपण त्यांच्या सोबतीला द्या. आपल्या उदाहरणाने व उपदेशाने ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. खरी मूल्ये त्यांच्या मनात रुजवा म्हणजे मैत्री जोडताना तीही इतरांत त्याच मूल्यांचा शोध घेतील.—स्तोत्रसंहिता ११९:९, ६३.
३०. ईश्वरी नैतिक-मूल्ये पालक आपल्या मुलांना कशी देऊ शकतात?
३० घरात ही नीतीमूल्ये पाळली जात असतील व त्यांचा आदर होत असेल तर ती मुलांच्या मनावर बिंबतील हे ध्यानात ठेवा. मुलांचा कल जसा असावा असे तुम्हाला वाटते तसा तो स्वतः प्रकट करा. आपल्या घरात व कुटुंबात मुलांना थोरांचे प्रेम, क्षमा, योग्य स्वातंत्र्य, तसेच न्याय व आपलेपणा मिळेल याची खबरदारी घ्या. या सर्वांतून देवाने देऊ केलेली नीतीमूल्ये त्यांच्यापर्यंत अशी पोहचवा की ते कुटुंबातून बाहेर पडताना आपणाबरोबर नेऊ शकतील. यापेक्षा उत्तम वारसा तुम्ही त्यांना देऊ शकणार नाही.—नीतीसूत्रे २०:७.
[अभ्यासाचे प्रश्न]