प्रीती—“एकतेचे अतुट बंधन”
अध्याय ६
प्रीती—“एकतेचे अतुट बंधन”
१-६. (अ) पती-पत्नी स्वतःच्याच भावनांमध्ये गुंग राहतील तर काय होईल? (ब) शास्त्रातील कोणत्या तत्त्वांकडे लक्ष दिल्यास गंभीर भांडणे टळतील?
‘कधीही पान वेळेवर का वाढत नाही?’ दिवसभराच्या श्रमाने आणि वाट पाहाण्याने कंटाळलेला नवरा चिडचिडला.
२ ‘उगाच कुरकुरु नका. होतच आलं आहे.’ तिनेही चिडून सांगितले. तिचाही दिवस काही सुखात गेला नव्हता.
३ ‘पण तू नेहमीच उशीर करतेस. तुझं कधीच कसं वेळेवर होत नाही?’
४ ‘साफ खोटं!’ ती खेकसली. ‘जरा मुलांकडे पहात जा, मग असे कुरकूर करणार नाही. ती काही फक्त माझीच मुलं नाहीत, तुमचीही आहेत!’
५ असा नवरा-बायकोमध्ये राईचा पर्वत होतो. दोघेही संतापतात आणि अबोला धरतात. शब्दाशी शब्द वाढत जातात आणि दोघेही कष्टी आणि रागीट होतात. सगळ्या संध्याकाळचा विचका होतो. हे दोघांनाही टाळता आले असते. दोघेही स्वतःच्या विचारात गुरफटले होते. दुसऱ्याच्या विचारांना त्यात स्थान नव्हते. मग भडकलेल्या डोक्यांचा उद्रेक झाला.
६ अशा समस्या वेगवेगळया विषयात उद्भवतात. उदाहरणार्थ, पैसा किंवा एखाद्या नवऱ्याला वाटते की आपली पत्नी आपल्याला इतरांमध्ये मिसळू देत नाही. तो तिच्याशिवाय कोठे गेला तर ती हिंपुटी होते. एखाद्या गंभीर कारणाने अथवा अनेक बारीक-सारीक कारणांनी तणाव निर्माण होतो. कारण काहीही असले तरी त्याला कसे तोंड द्यावे याबद्दल आपण येथे विचार करू. तणाव वाढणार अशी चिन्हे दिसताच दोघांपैकी एकाने “दुसरा गाल” पुढे करण्याची, “वाईटाबद्दल वाईट अशी फेड” न करण्याची व “बऱ्याने वाईटाला जिंकण्याची” तयारी दर्शविली पाहिजे. (मत्तय ५:३९; रोमकर १२:१७, २१) यासाठी आत्मसंयम व प्रौढत्वाची गरज असते. त्यासाठी ख्रिस्ती प्रीती असावी लागते.
प्रीतीचा खरा अर्थ
७-९. (अ) १ करिंथकर १३:४-८ मध्ये प्रीती कशी वर्णिली आहे? (ब) ही कोणत्या प्रकारची प्रीती आहे?
७ प्रीती कशी असावी व कशी नसावी याविषयी यहोवा देवाने व्याख्या केली आहे. १ करिंथकर १३:४-८ म्हणते, “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहात नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्वकाही सहन करते सर्व काही मानण्यास सिद्ध असते, सर्वाची आशा धरते, सर्वासंबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही.”
८ प्रेम अनेक गोष्टींवर अवलंबून असेल, उदाहरणार्थ शारीरिक ओढ, कौटुंबिक नाते, परस्परांच्या मैत्रीची आवड. परंतु पवित्र शास्त्र सांगते की खरी प्रीती, परस्पर ओढ व आवड यापेक्षा दुसऱ्याचे सर्वबाबतीत उत्तम चिंतणारी अशी असावी. अशा प्रीतीमुळे वेळ पडल्यास पालक मुलांच्या बाबतीत अथवा यहोवा देव त्याच्या भक्तांना करतो तशी खरडपट्टी काढावी लागते अथवा शिक्षा द्यावी लागते. (इब्रीयांस १२:६) त्यात भावना असतातच. पण दुसऱ्यांशी वागताना योग्य न्याय अथवा तत्त्वांना त्यामुळे मुरड पडता कामा नये. तशी प्रीती सर्वांशी सहानुभूती राखण्यास व समतेने वागण्यास मदत करते.
९ आपल्या कौटुंबिक जीवनात या प्रीतीचा फायदा कसा होतो हे अधिक चांगल्या रितीने कळण्यासाठी १ करिंथकर १३:४-८ येथे दिलेल्या प्रीतीच्या व्याख्येचा आपण अधिक सखोल अभ्यास करू.
१०, ११. आपण सहनशील व दयाळू वैवाहिक साथीदाराकडून काय अपेक्षा करू?
१० “प्रीती सहनशील आहे परोपकारी आहे.” तुम्ही आपल्या सहचऱ्याच्या बाबतीत सहनशील आहात काय? चीड येण्यासारखी परिस्थिती असली, तुमच्यावर खोटे आरोप केले गेले तरी तुम्ही संयम बाळगता का? यहोवा देव आपल्या सर्वांबाबत सहनशील आहे. ‘देवाची ममता लोकांना पश्चात्तापाकडे नेणारी आहे.’ सहनशीलता व परोपकारीपणा ही देवाच्या आत्म्याची फळे आहेत.—रोमकर २:४; गलतीकर ५:२२.
११ प्रीती चुकीला पाठिंबा देत नाही, पण म्हणून ती ‘टोचून खोचून’ बोलत नाही. ती अधीर नसते. ती परिस्थिती लक्षात घेते. (१ पेत्र ४:८; स्तोत्रसंहिता १०३:१४; १३०:३, ४) आणि गंभीर बाबतीतही क्षमा करण्यास तयार असते. “माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?” असा प्रश्न येशूला विचारत असता, आपण सहनशील आहोत असे पेत्राला नक्कीच वाटले असावे. येशू उत्तरला: “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.” (मत्तय १८:२१, २२; लूक १७:३, ४) प्रीती पुन्हा पुन्हा क्षमा करते तिच्या दयेला अंत नसतो. असे तुम्ही आहात का?
१२, १३. मत्सर कशा प्रकारे प्रकट होऊ शकतो आणि त्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न का करावा?
१२ “प्रीती हेवा करीत नाही.” अकारण हेवा करणाऱ्या सहचऱ्याबरोबर राहाणे अतिशय कठीण असते. असा मत्सर शंकेखोर आणि हुकूमत, गाजविणारा असतो. त्याच्या पोरकटपणामुळे आजुबाजूच्या इतरांना मैत्रीने व नैसर्गिक वागणे जड जाते. उत्स्फूर्त देण्याने आनंद मिळतो तो आडमुठा हट्ट पूर्ण करण्यात मिळत नाही.
१३ पवित्र शास्त्र विचारते “मत्सरापुढे कोण टिकेल?” अपूर्ण देहाच्या कर्मांपैकी हे एक आहे. (नीतीसूत्रे २७:४; गलतीकर ५:१९, २०) असुरक्षिततेच्या भावनेत आपल्या कल्पनेची भर पडल्यामुळे येणारा मत्सर तुमच्या मनात उत्पन्न होत असल्याचे तुम्हास जाणवते काय? दुसऱ्याचे दोष काढणे कठीण नसते. परंतु आपले स्वतःचे दोष समजावून घेणे फायद्याचे असते. “जेथे मत्सर व तट पडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे.” (याकोब ३:१६) मत्सर विवाह बंधनात विष कालवितो. मत्सरी बंधनांनी तुमचा साथीदार सुरक्षित राहणार नाही, तर प्रेमळ वर्तन, सहानुभूती व विश्वासाने राहील.
१४, १५. (अ) बढाई मारण्यात प्रीतीचा अभाव कसा दिसून येतो? (ब) आपल्या वैवाहिक साथीदारास तुच्छ लेखण्याऐवजी एखाद्याने काय केले पाहिजे?
१४ “प्रीती बढाई मारीत नाही. फुगत नाही.” अनेकांना ही सवय असते पण बढाई मारलेली ऐकायला कोणालाच आवडत नाही. उलट बढाईखोर माणसाचा हा गुण माहीत असणारे त्यामुळे अडचणीत पडतात. स्वतःबद्दल मोठमोठ्या गप्पा मारुन काही फुशारकी मिरवतात. इतर काही हीच गोष्ट जरा फरकाने करतात. ते इतरांवर टीका करुन त्यांना कःपदार्थ लेखून त्यांच्या तुलनेत आपणच मोठे असल्याचे दर्शवितात. अशा रितीने काही लोक इतरांना लहान लेखून स्वतःस मोठे ठरवितात. आपल्या वैवाहिक सोबत्याला कमी लेखणे हे एकप्रकारे स्वतःविषयी बढाई मारण्याचाच एक प्रकार होय.
१५ आपल्या वैवाहिक सोबत्याच्या उणीवाबद्दल तुम्ही चार चौघात बोलता का? त्यामुळे तुमच्या सोबत्यास काय वाटेल याचा तुम्ही विचार करता का? त्याने तुमच्या उणीवा उघड केल्या तर तुम्हाला काय वाटेल? तुमच्या सोबत्याचे तुमच्यावर प्रेम आहे असे वाटेल? छे, स्वतःची स्तुती करून अथवा दुसऱ्याला टाकून बोलून “प्रीती बढाई मारीत नाही.” आपल्या सोबत्याविषयी बोलताना गौरवपर बोला; त्यामुळे तुमचे संबंध दृढ होतील. स्वतःविषयी बोलताना, नीतीसूत्रे २७:२ मधील उपदेश ध्यानी ठेवा: “स्वमुखाने नव्हे तर इतरांनी, आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी.”
१६. प्रेमळ व्यक्ती कोणत्या असभ्य प्रसंगाना टाळील?
१६ प्रीती “गैरशिस्त वागत नाही.” व्यभिचार, दारुडेपणा, संतापाचे झटके, अशा अनेक ठळकपणे जाणवणाऱ्या असभ्य गोष्टी आहेत. (रोमकर १३:१३) या सर्व गोष्टी प्रीतीच्या विरुद्ध असून वैवाहिक बंधनाला अहितकारक आहेत. उद्धटपणा, अश्लील भाषण व हावभाव तसेच वैयक्तिक अस्वच्छता यातून सभ्यतेचा अभाव जाणवतो. आपल्या सोबत्यास न आवडणाऱ्या अशा गोष्टी टाळण्यास तुम्ही केवढे जागरुक आहात? तुम्ही त्याच्याशी अथवा तिच्याशी सहानुभूती, शिष्टाचार व आदराने वागता का? या सर्व गोष्टीवरच सुखी, टिकाऊ वैवाहिक जीवन अवलंबून असते.
१७. निस्वार्थी व्यक्ती भांडण कसे टाळील?
१७ प्रीती “स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही.” ती आत्मकेंद्रित नसते. या प्रकरणाच्या सुरुवातीला सांगितलेल्या व्यक्ती अशा असत्या तर किती बरे झाले असते. जेवणाला उशीर झाल्याबद्दल नवरा बायकोवर चिडला नसता. आणि तिनेही प्रतिटोले हाणले नसते. नवरा थकलेला असल्यामुळे चिडचिडा झालेला आहे. हे बायकोने जाणले असते तर उलट खेकसण्याऐवजी ती म्हणाली असती, ‘अगदी होतच आलयं. दिवसभराच्या श्रमाने तुम्ही थकला आहात. जरा ग्लासभर गार सरबत घ्या. तोवर माझी पानं मांडून होतील.’ स्वतःचा विचार न करता नवरा जर समजूतदार असता तर जेवण लवकर व्हावे म्हणून काही मदत करता येईल का असे त्याने विचारले असते.
१८. प्रीती संतापणे कसे टाळील?
१८ तुमचा सोबती जे करतो-बोलतो त्याने तुम्ही सहज चिडता का? की त्याच्या वागण्यामागील भावनांची जाणीव ठेवता? ते सहज—विशिष्ट हेतू विरहित—असून तुम्हाला छेडण्याचा त्याचा उद्देश नसेल. तुम्ही प्रीती करीत असाल तर तुम्ही ‘रागात असताना सूर्य मावळणार नाही.’ (इफिसकर ४:२६) नाउमेद झाल्यामुळे तुमच्या सोबत्याने खरोखरच तुम्हाला दुःख होईल असे काही म्हटले किंवा केले तर? रागाचा पारा उतरल्यावर त्याबाबतीत चर्चा करेपर्यंत तुम्ही थांबता का? दोघांचे हित मनात ठेवून परिस्थिती हाताळल्यास अविचारी भाषण टाळता येईल. “ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते.” “जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करितो” अधिक कलहास चेतना देत नाही. (नीतीसूत्रे १६:२३; १७:९) वाद वाढविण्याच्या व आपलेच म्हणणे शाबीत करण्याच्या प्रवृत्तीला आवर घातल्याने तुम्ही प्रीतीला विजय मिळवून द्याल.
१९. (अ) ‘अनीतीत आनंद मानण्यात’ काय गोवलेले असते? (ब) ते का टाळावे?
१९ खरी प्रीती “अनीतीत आनंद मानीत नाही तर सत्यासंबंधी आनंद मानते.” आपल्या सोबत्यास फसविण्यात तिला चतुराई वाटत नाही—मग ती बाब वेळेची, पैशाची किंवा इतर सोबतच्या संबंधाची असो. नीतीमत्तेचा देखावा करण्यासाठी ती अर्ध सत्याची कास धरीत नाही. अप्रामाणिकपणामुळे विश्वास संपुष्टात येतो. खऱ्या प्रीतीसाठी तुम्ही दोघांनी सत्य आचरण्यात आनंद मानला पाहिजे.
खऱ्या प्रीतीत बळ व सहनशक्ती असते
२०. (अ) प्रीती ‘सर्व काही सहन’ कसे करते? (ब) ती ‘सर्व काही खरे मानण्यास सिद्ध’ कशी होते? (क) ती ‘सर्वाची आशा कशी धरते’? (ड) ती ‘सर्वांसंबंधाने धीर कशी धरते’?
२० “ती सर्वकाही सहन करिते, सर्वकाही मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरिते, सर्वांसंबंधाने धीर धरते.” दोन विवाहित व्यक्ती एकमेकांशी जुळवून घेण्यास स्वतःला मुरड घालण्यास शिकताना त्यांच्यातील निकटसंबंधावर बराच ताण पडतो. त्यावेळी त्यांची प्रीती तो ताण सहन करते. कठीण प्रसंग आला तरीही प्रीती देव-वचन मान्य करून ते आपल्या जीवनात लागू करण्यास झटते. आणि अप्रामाणिक व्यक्तिशी भोळसटपणे वागली नाही तरी अकारण शंकेखोरही असत नाही. उलट ती विश्वास व्यक्त करते. शिवाय ती सर्व चांगल्या गोष्टींची आशा धरते. पवित्र शास्त्रातील उपदेश आचरणात आणल्यास शक्य तेवढा फायदा होईल या खात्रीवरच ही आशा आधारलेली असते. प्रीती ही अशी निश्चित, आशावादी व भविष्यावर नजर लावून असते. ती चंचल किंवा क्षणभंगुर मोह नव्हे. कठीण प्रसंग कोसळल्यासही त्या त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा धीर तिच्यात असतो. ती अविचल असते. ती बलवान असते आणि त्या बलासह ती दयाळू, हळुवार, नम्र व सहवासास सुखद असते.
२१, २२. प्रीती कधी अंतर देत नाही हे कोणत्या प्रसंगांनी स्पष्ट होते?
२१ अशी प्रीती, “कधी अंतर देत नाही.” कठीण परिस्थितीमुळे आर्थिक ओढाताण झाल्यास काय होते? अशी प्रीती असलेली पत्नी, आपल्या साथीदाराला सोडून इतरत्र सुखाचे जीवन शोधण्याचा विचार न करता, असेल त्यात हात राखून संसार करते किंवा पतीच्या मिळकतीला हातभार लावते. (नीतीसूत्रे ३१:१८, २४) पण समजा पत्नीनेच आजाराने बरीच वर्षे अंथरुण धरले तर कसे? अशी प्रीती असलेला पती तिच्या सर्व गरजा पुरवितो. ती जी कामे करू शकत नाही ती करण्यात घरी मदत करतो व आपली अक्षय निष्ठा प्रदर्शित करतो. या बाबतीत देवाने स्वतः उदाहरण घालून दिलेले आहे. देवाचे विश्वासू सेवक कोणत्याही परिस्थितीत असले तरी कोणी त्यांना ‘देवाच्या प्रीतीपासून विभक्त करू शकणार नाही.’—रोमकर ८:३८, ३९.
२२ कोणती समस्या अशा प्रीतीवर मात करेल? तुमच्या वैवाहिक जीवनात ती आहे का? तुम्ही व्यक्तिशः ती आचरता का?
प्रीती वृद्धिंगत करणे
२३. आपण प्रेमळ कृती करू किंवा नाही हे कशावरून ठरते?
२३ स्नायूप्रमाणे प्रीतीही सतत उपयोगाने बळकट होते. उलटपक्षी विश्वासाप्रमाणे क्रियाविरहीत प्रीती निर्जीव असते. अंतस्थ भावनांनी प्रवृत्त केलेले शब्द व कृती हृदयापासून निघालेले आहेत असे म्हटले जाते—त्यात आपल्या अंतस्थ हेतूंचे प्रतिबिंब दिसते. “अंतःकरणात जे भरुन गेले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो.” परंतु आपल्यामध्ये दुष्ट विचार असल्यास “अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात.”—मत्तय १२:३४, ३५; १५:१९; याकोब २:१४-१७.
२४, २५. प्रीती व्यक्त करण्याची तुमची इच्छा तुम्ही कशी बळकट करू शकता?
२४ तुम्ही आपल्या हृदयात कोणते विचार व भावना उत्पन्न करता? देवाने अनेक रितीने प्रीती कशी प्रदर्शित केली आहे याचे जर तुम्ही दररोज मनन कराल, त्याचा कित्ता गिरविण्याचा प्रयत्न कराल तर सद्विचारांना बळकटी येईल. अशी प्रीती तुम्ही प्रदर्शित कराल तेव्हा तुमचे बोलणे चालणेही तिच्या अनरुपच होईल. तसेच ती तुमच्या अंतःकरणावर खोलवर कोरली जाईल. रोजच्या बारीक-सारीक गोष्टीतही प्रीती प्रदर्शित केल्याने ती सवयीची होईल. मग कधी मोठा प्रसंग उद्भवल्यावर, खोलवर रूजलेली ही प्रीती त्या प्रसंगाशी सामना देण्यास तुम्हाला मदत करील.—लूक १६:१०.
२५ आपल्या सोबत्यामध्ये प्रशंसनीय असे काही तुम्हाला आढळते का? तसे बोलून दाखवा! एखादी चांगली गोष्ट करण्याचा तुम्हाला हुरुप आला आहे काय? ती तात्काळ करा! प्रीती मिळविण्यासाठी आपण ती दिली पाहिजे. अशा आचरणाने तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ याल, एकरुप व्हाल. तुमच्यामधील प्रीती वृद्धिंगत होईल.
२६, २७. सर्व गोष्टींची सहभागिता केल्याने प्रीती कशी वाढते?
२६ प्रीती वाढवायची असेल तर तिची सहभागिता इतरांमध्ये करा. पहिला मानव आदाम नंदनवनात राहात होता. त्याच्या शारीरिक गरजा भागेल अशी सर्व प्रकारची सुबत्ता तेथे होती. प्रथमपासून त्याच्या सभोवती सुंदर गोष्टी होत्या. कुरणे व फुले, वनराई व ओढे एवढेच नव्हे तर, पृथ्वीचा रखवालदार या नात्याने त्याच्या अधिपत्याखालील अनेक प्रकारचे प्राणीही त्याच्या सभोवती होते. तसे जरी असले तरी एक उणीव राहिली होती: या सुंदर नंदनवनाची शोभा उपभोगण्यास त्याला कोणी मानवी भागीदार नव्हता. सूर्यास्ताचा सुंदर देखावा एकट्याने पाहताना तो पाहण्यासाठी त्याचा सौंदर्यास्वाद घेण्यास एखादी प्रिय व्यक्ती आपल्यासोबत हवी होती असे तुम्हाला कधी वाटले आहे का? किंवा एखादी खळबळजनक बातमी तुम्हापाशी होती पण ऐकणाराच कोणी नव्हता असे घडले आहे का? आदामाची हीच स्थिती होती. ती उणीव जाणून यहोवा देवाने त्याचे विचार व भावना यात सहभागी होईल अशी सहचरी आदामास दिली. भागीदारीमुळे दोन व्यक्ती जवळ येतात व त्यामुळे तेथे प्रीती मूळ धरते व वाढते.
२७ विवाह म्हणजे भागीदारी. कदाचित, प्रेमाचा एक नेत्रकटाक्ष, स्पर्श, एखादा हळुवार शब्द, किंवा नुसते निःशब्द एकत्र बसणे. बिछाने घालणे, भांडी विसळणे, आपल्या अंदाज पत्रकात बसत नाही म्हणून ती मागत नसलेली गोष्ट घेण्यासाठी पैसे साठवणे, एखाद्याचे काम लवकर होत नसल्यास त्यास दुसऱ्याने हातभार लावणे, ही प्रत्येक कृती प्रीती प्रदर्शित करू शकते. काम आणि खेळ, आनंद आणि दुःख, हार आणि जीत, तसेच मनाचे विचार व अंतःकरणाच्या भावनेत सहभागी होणे, म्हणजेच प्रीती होय. एकाच ध्येयात सहभागी होऊन ते मिळून साध्य करा. यामुळेच दोन व्यक्ती एक होतात आणि प्रीती वाढते.
२८. सेवेमुळे प्रीती कशी वाढते?
२८ आपल्या साथीदाराच्या सेवेने, त्याच्याविषयी वाटणारी प्रीती परिपक्व होते. स्वयंपाक करणे, अंथरुणे घालणे, घर स्वच्छ करणे, कपडे धुणे व घराकडे लक्ष देणे अशा रितीने पत्नी बहुधा सेवा करते. मात्र सर्व गोष्टींची तरतूद पुरवून, म्हणजे ती तयार करत असलेले अन्न, बनवत असलेला बिछाना, स्वच्छ करत असलेले घर व धुत असलेले कपडे देऊन पती सेवा करतो. ही सेवा, ही दान-वृत्ती सुख देते व प्रीती वृद्धिंगत करते. येशूने म्हटल्याप्रमाणे घेण्यापेक्षा देण्यात अधिक आनंद आहे. किंवा सेवा करून घेण्यापेक्षा सेवा करण्यात अधिक आनंद असतो. (प्रे. कृत्ये २०:३५) त्याने आपल्या शिष्यांना सांगितले: “तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे.” (मत्तय २३:११) अशा दृष्टिकोनामुळे चढाओढ नाहीशी होऊन आनंदी वातावरणास मदत होईल. इतरांची सेवा केल्याने आपली इतरांना गरज आहे अशी जाणीव आपल्यात निर्माण होते. आपले जीवन अर्थपूर्ण वाटते. त्यामुळे स्वाभिमान उत्पन्न होऊन माणसाला समाधान प्राप्त होते. विवाहात पती व पत्नी, दोघांना सेवेच्या व असे समाधान मिळविण्याच्या अनेक संधी प्राप्त होतात. त्यामुळे प्रीतीमध्ये त्याचे विवाह-बंधन अधिक दृढ होते.
२९. देवाचे सेवक नसलेल्यांनाही प्रीती का आकृष्ट करते?
२९ विवाहित जोडप्यातील एकच पवित्र शास्त्र तत्त्वे पाळणारा ख्रिस्ती सोबती असला व दुसरा नसला तर कसे? यामुळे त्या ख्रिस्ती सोबत्याच्या वागण्यात बदल व्हावा का? मूलतः काहीही बदल होऊ नये. देवाच्या हेतूविषयी तो ख्रिस्ती सोबती जास्त बोलणार नाही, परंतु त्याचे वागणे तसेच राहील. विश्वास न ठेवणाऱ्या सोबत्याच्या मूलभूत गरजा यहोवाची भक्ती करणाऱ्या माणसाप्रमाणेच असतात व अनेक बाबतीत त्याची प्रतिक्रियाही सारखीच असते. रोमकर २:१४, १५ मध्ये असे म्हटले आहे: “ज्यांना नियम नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करीत असतात तेव्हा, त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत, म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवितात. त्यांच्याबरोबर त्यांची सद्सद्विवेकबुद्धीही त्यांना साक्ष देते. आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असतात.” ख्रिस्ती सद्वर्तनाचे बहुधा कौतुक होते व अशा वर्तनाने प्रीती वाढण्यास मदत होते.
३०. फक्त नाट्यमय प्रसंगीच प्रीती व्यक्त करावयाची असते का? तुम्ही असे का म्हणता?
३० प्रेम व्यक्त होण्यासाठी ती नाट्यमय प्रसंगाची वाट पाहात नाही. काही अंशी प्रीती वस्त्रासारखी असते. तुमचे वस्त्र कशाने बांधलेले असते? दोरखंडाच्या दोन-चार मोठ्या गाठींनी? की धाग्याच्या हजारो टाक्यांनी? हजारो छोट्या छोट्या टाक्यानीच. शब्दशः वस्त्रांप्रमाणे तेच आध्यात्मिक ‘वस्त्रा’लाही लागू आहे. दररोज गोळा होणारे छोटे गोड बोल आणि कृती आपल्याला वस्त्राप्रमाणे “सजवतात” व आपण कसे आहोत ते दर्शवतात. अशी आध्यात्मिक “वस्त्रे” जीर्ण होत नाहीत व कापडाच्या वस्त्राप्रमाणे टाकाऊ होत नाहीत. पवित्र शास्त्रामध्ये म्हटल्याप्रमाणे ते “अविनाशी वस्त्र” आहे.—१ पेत्र ३:४.
३१. कलस्सैकर ३:९, १०, १२, १४ मध्ये प्रीतीविषयी कोणता उत्तम सल्ला आढळतो?
३१ तुमचा विवाह “एकतेचे अतुट बंधन” व्हावा असे तुम्हाला वाटते का? मग कलस्सैकर ३:९, १०, १२, १४ मध्ये म्हटल्याप्रमाणे करा: “जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाका आणि जो नवा मनुष्य . . . त्याला तुम्ही धारण करा . . . करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा . . . पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वावर धारण करा.”
[अभ्यासाचे प्रश्न]