प्रेमाने शिस्त लावण्याचे महत्त्व
अध्याय १०
प्रेमाने शिस्त लावण्याचे महत्त्व
१. आपली मुले आज्ञाधारक होण्यास कशाची जरुरी आहे?
मुले आपोआप आज्ञाधारक, प्रेमळ व चांगल्या वळणाची नसतात, आदर्श व शिस्तीने ती घडवली जातात.
२. अनेक बालमानसतज्ज्ञांची मते पवित्र शास्त्राच्या उपदेशाशी कशी विरोधी आहेत?
२ एक बालमानसतज्ज्ञ म्हणतात: “मातांनो, दर वेळी, मुलाला मारताना तुम्ही त्याचा द्वेष करत आहात हे त्याला दाखवीत असता हे तुम्हाला कळते का?” अनेक तज्ज्ञ मुलांच्या बाबतीत “हात टेकले” अशी विचारसरणी धरतात. परंतु देव त्याच्या वचनात म्हणतो: “जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय. पण जो वेळीच त्याला शिक्षा करतो तो त्याजवर प्रीती करणारा होय.” (नीतीसूत्रे १३:२४) काही दशकापूर्वी मुक्ततेचा पुरस्कार करणाऱ्या बाल संगोपनावरील पुस्तकांना विशेषतः पाश्चिमात्य जगात नुसता ऊत आला होता. शिक्षेमुळे मुलांवर बंधने पडतील व त्याची वाढ खुंटेल असे मानसतज्ज्ञ म्हणत. मार देण्याची कल्पना तर त्यांना असह्यच वाटत होती. त्यांचे सिद्धांत आणि यहोवाचा सल्ला अगदी एकमेकांविरुद्ध होते. देवाचे वचन म्हणते, ‘तुम्ही जे पेराल त्याचेच पीक तुम्हाला मिळेल.’ (गलतीकर ६:७) काही दशके मुक्तता पेरुन काय सिद्ध झाले आहे?
३, ४. घरात योग्य शिस्तीच्या अभावाचा काय परिणाम झालेला आहे? म्हणून काही लोक काय उपाय सुचवितात?
३ गुन्ह्याचे भरघोस पीक तर सर्वांनाच परिचयाचे आहे. औद्योगिक देशात एकूण गंभीर गुन्ह्यात तरुणांच्या गुन्ह्याचे प्रमाण ५० टक्क्याहून अधिक आहे. जगाच्या काही भागात शाळेचे आवार म्हणजे दंगे, मारामाऱ्या, शिवीगाळ, अश्लीलता, विध्वंस, हल्ले, पिळवणूक, जाळपोळ, चोऱ्या, बलात्कार, अमली पदार्थ व खुनाचे माहेरघरच झाले आहे. एका मोठ्या देशातील शिक्षक संघटनेच्या प्रवक्त्याला शिस्तीच्या प्रश्नाचे मूळ, मूल व शाळेचा लवकर संबंध प्रस्थापित न होण्यात सापडले. तसेच कुटुंब संस्थेचा ऱ्हास व मुलांपुढे समंजस वागणुकीचा आदर्श ठेवण्यातील पालकांच्या कुचराईला त्याने दोष दिला. ‘कुटुंबातल्या काही व्यक्ती गुन्हेगार होतात व इतर का होत नाहीत’ या प्रश्नाची दखल घेताना एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिका म्हणतो: “कुटुंबातील शिस्तीबाबतचे धोरण अतिशय गलथान, किंवा अतिशय कडक असेल वा त्यात सुसंगती मुळीच नसेल. ७० टक्के गुन्हेगार माणसांमागे अयोग्य शिस्त हेच कारण असेल, असे अमेरिकन संशोधकांना वाटते.”
४ या परिणामाच्या अनुभवाने अनेकांना आपले मत पूर्ण बदलावे लागले व ते पुन्हा शिस्तीकडे वळाले आहेत.
शिस्तीची छडी
५. मुलाला मार देण्याबद्दल पवित्र शास्त्राचे काय मत आहे?
५ छडीच्या प्रसादाने मुलाच्या प्राणाचे रक्षण होईल, कारण देवाचे वचन म्हणते: “मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नको. कारण त्याला छडी मारिल्याने तो मरणार नाही. तू त्यास छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचीव.” तसेच “बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते. शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते.” (नीतीसूत्रे २३:१३, १४; २२:१५) मुलाच्या हिताची पालकांना कळकळ असेल तर शासन करण्यास, दुर्बलाप्रमाणे अथवा निष्काळजीपणे ते मागे राहणार नाहीत. जरूर असेल तेव्हा सुज्ञपणे व योग्य रीतीने क्रियाप्रवण होण्यास प्रीती त्यांना भाग पाडील.
६. शिस्तीत कशा कशाचा समावेश होतो?
६ शिस्त शिक्षेपुरतीच मर्यादित नाही. ‘ठराविक चौकटीस वा पद्धतीस धरून दिलेले शिक्षण’ असा शिस्तीचा मूळ अर्थ आहे. म्हणूनच नीतीसूत्रे ८:३३ म्हणते: ‘बोधाच्या स्पर्शाने’ नव्हे “बोध ऐकून शहाणे व्हा.” ख्रिस्ती माणसाने, २ रे तीमथ्य २:२४, २५ प्रमाणे “सर्वाबरोबर सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे.” येथील “शिक्षण” हा शब्द ग्रीक भाषेतील शिस्त या शब्दाचा अनुवाद आहे. त्या शब्दाचा इब्रीयांस १२:९ मध्ये तसाच अनुवाद केला आहे: “शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरीत असू तर आपण विशेषेकरून, जो आत्म्यांचा पिता, त्याच्या आधीन होऊन जिवंत राहू नये काय?”
७. पालकांनी शिस्त लावल्याने काय फायदे होतात?
७ गुन्ह्यांकडे कानाडोळा केला तर राज्यकर्ते जसे जनतेचा आदर घालवतात त्याप्रमाणे योग्य शिक्षण न दिल्यास पालकांनाही मुलांचा आदर मिळत नाही. योग्यवेळी दिलेल्या शिक्षेमुळे पालकांना आपल्याविषयी काळजी आहे याचे मुलांना प्रत्यंतर येते. त्यामुळे घरात शांतता नांदते, कारण “ज्यांना तिच्याकडून वळण लागलेले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतीकारक फळ देते.” (इब्रीयांस १२:११) अवज्ञाकारी व वाईट वागणुकीची मुले कोणाही घरात उद्रेकास कारणीभूत ठरतात व ती स्वतःही समाधानी नसतात. “तू आपल्या मुलास शासन कर म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जीवाला हर्ष देईल.” (नीतीसूत्रे २९:१७) खंबीर पण प्रेमळपणे शिक्षा केल्याने मुलाला जणू एक नवा दृष्टिकोन व नव्या संधी प्राप्त होतात. त्यानंतर त्याचा सहवासही अधिक सुखकर होतो. खरोखर शिस्त “शांतीकारक फळ देते.”
८. पालक प्रेमाने शिस्त कशी लावू शकतात?
८ “ज्याच्यावर यहोवा प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो.” (इब्रीयांस १२:६) आपल्या मुलांचे भले चिंतिणाऱ्या पालकांचेही तसेच असते. शिस्त व शिक्षा प्रेमापोटी केलेली असावी. मुलाच्या चुकांमुळे संताप येणे साहजिक आहे. परंतु आपण “सहनशील” असले पाहिजे, असे पवित्र शास्त्र सांगते. (२ तीमथ्य २:२४) राग निवळल्यावर बालिश अपराध फारसा गंभीर वाटणार नाही: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो, अपराधाची गय करणे त्याला भूषणावह आहे.” (नीतीसूत्रे १९:११; तसेच उपदेशक ७:८, ९ पहा.) मूल अतिशय थकलेले असल्यास अथवा आजारी असल्यास शिक्षा कमी करण्यासारखी परिस्थिती असेल. त्याला सांगितलेली गोष्ट तो विसरला असेल. प्रौढांचेही तसे होते, नाही का? चुकीची गय करण्यासारखी नसली तरीही केलेली शिक्षा म्हणजे पालकांच्या असंयमी रागाचा व भावनांचा स्फोट नसावा. शिस्तीत शिक्षणाचा समावेश होतो, आणि अशा क्रोधाच्या स्फोटाने मूल संयम नव्हे तर त्याचा अभाव शिकते. आपली काळजी घेतली जात असल्याची भावना मुलात मुळीच उत्पन्न होत नाही. तोल ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे शांती मिळते.
खंबीर बंधने घालणे
९. नीतीसूत्रे ६:२०-२३ ला अनुसरुन पालकांनी आपल्या मुलांना काय पुरविले पाहिजे?
९ पालकांनी मुलांना मार्गदर्शक तत्त्वे दाखवली पाहिजेत. “माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको; ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर. ती आपल्या गळ्यात बांधून ठेव. तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील, तू निजशील तेव्हा ते तुझे रक्षण करील, तू जागा होशील तेव्हा ते तुजशी बोलेल. कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. बोधाचा वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे.” पालकांची ही शिकवण मुलाला मार्गदर्शन करण्यासाठी व त्याचे रक्षण करण्यासाठी आहे. त्यात मुलांच्या कल्याण व सुखाची त्यांची तळमळ दिसून येते.—नीतीसूत्रे ६:२०-२३.
१०. पालकांनी मुलांना योग्य ते वळण न लावल्यास काय होऊ शकते?
१० शिस्त लावण्यात कुचराई करणारा पिता जबाबदार धरला जातो. प्राचीन इस्राएलात प्रमुख याजक एलीने आपल्या मुलांना लोभी, अनादर करणारे व व्यभिचारी होऊ दिले. त्याने मुलांच्या चुकांचा गुळमुळीत निषेध केला, परंतु त्या थांबवण्यासाठी काहीही कृती केली नाही. देव म्हणाला: “त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःस शापग्रस्त करीत असता त्याने त्यांस आवरले नाही.” (१ शमुवेल २:१२-१७, २२-२५; ३:१३) तसेच आपल्या कर्तव्यात कुचराई करणाऱ्या मातेला काळिमा लागतो: “छडी व वाग्दंड ज्ञान देतात. पण मोकळे सोडलेले पोर [किंवा पोरगी] आपल्या आईला खाली पाहावयास लाविते.”—नीतीसूत्रे २९:१५.
११. मुलांना योग्य मर्यादा घालण्याची काय आवश्यकता?
११ मुलांना योग्य मर्यादा घालून देणे आवश्यक असते. त्याच्या शिवाय ती गोंधळून जातात. मर्यादा असणे व ती पाळणे यामुळे आपण आपल्या भोवतालच्यासारखेच असल्याची जाणीव त्यांना होते. समाजाच्या त्या घटकाशी ती एकरुप होतात व त्याच्यात त्याला स्थानही मिळते, कारण त्या घटकाच्या मर्यादांना ती अनुसरतात. अति स्वैरपणामुळे मुले वाऱ्यावर सोडली जातात व जीवनाच्या धुमश्चक्रीत दिशाहीनपणे भरकटतात. यावरून असे दिसते की मुलांना, मर्यादेविषयी दृढ विश्वास असणारी व तीच (मर्यादा) वारसा पुढच्या पिढीस देणारी प्रौढ माणसे हवी असतात. पृथ्वीतलावर सर्वांनाच मर्यादा आहेत व त्यामुळे प्रत्येकाला सुख व समाधान मिळते हे मुलांना समजले पाहिजे. आपण इतरांच्या व इतरांनी आपल्या स्वातंत्र्याची जाणीव ठेवली तरच त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो. ती सीमा ओलांडल्यास तो मर्यादेचे ‘उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेणारा’ होईल.—१ थेस्सलनीकाकर ४:६.
१२. स्व-शिस्तीचे महत्त्व काय आणि त्याची जोपासना करण्यास पालक मुलांचे कसे साहाय्य करु शकतील?
१२ योग्य बंधने जुमानली नाही तर शिक्षा होतेच हे शिकल्यास मुले स्वतःच्या मर्यादा ओळखतात. पालकांच्या खंबीरपणाने व मार्गदर्शनाने समृद्ध जीवनास आवश्यक असा संयम त्यांच्यामध्ये बाणतो. आपण स्वतःच्या मनाने स्वतःस शिस्त लावून घेतली पाहिजे, नाहीतर इतर कोणाकडून शिक्षा सोसावी लागेल. (१ करिंथकर ९:२५, २७) आपण आत्मसंयमन जोपासल्यास व आपल्या मुलांनाही तसेच करण्यास मदत केल्यास आपले व त्यांचे जीवन आनंदी तसेच अडचणी व दुःखापासून मुक्त होईल.
१३. मुलांना मार्गदर्शक तत्त्वे घालून देताना पालकांनी कोणते महत्त्वाचे मुद्दे ध्यानात ठेवले पाहिजेत?
१३ मुलांना त्यांच्या मर्यादा व मार्गदर्शक तत्त्वे नीट समजतील अशी न्याय्य क्षमाशील असावीत; त्यांच्याकडून अतिरेकी अथवा अतिशय कमी अपेक्षा करू नका. त्यांचे वय लक्षात घ्या, कारण ती त्यास अनुरुप वागतील. त्यांना आकाराने लहान असे प्रौढ समजू नका. प्रेषित म्हणाला, तो जेव्हा लहान मूल होता तेव्हा लहान मुलासारखे वागत असे. (१ करिंथकर १३:११) पण एकदा का समंजस नियम बनविले गेले व ते मुलांनाही कळत असतील, तेव्हा ते तात्काळ व सातत्याने लागू करा. “तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे.” (मत्तय ५:३७) आपल्या शब्दाला जागणारे, तत्त्वाप्रमाणे सुसंगत असणारे पालक मुलांना आवडतात. त्यांना पालकांचा पाठिंबा कळतो व कठीण परिस्थितीत, मदतीची जरुर असताना मदतीसाठी पालकांवर भरवसा ठेवता येईल असे त्यांना वाटते. पालक न्यायी असून योग्य वळण लावण्यात तत्पर असतील तर त्यामुळे मुलांना स्थैर्य व सुरक्षितता जाणवते. आपले काय चुकते व काय नाही हे माहीत असणे मुलांना आवडते व अशा पालकांपाशी त्यांना ते कळतेही.
१४. मुलांनी पालकांचा सल्ला न जुमानल्यास खंबीरपणाला महत्त्व का असते?
१४ पालकांची आज्ञा पाळण्यात मूल कुचराई करते तेव्हा पालकांना त्याच्याशी खंबीरपणे वागावे लागते. अशा वेळी काही पालक शिक्षेच्या धमक्या देतात, काही निरर्थक वाद घालतात तर काही मुलाकडून काम करवून घेण्यासाठी त्याला तऱ्हेतऱ्हेची अमिषे दाखवितात. बहुधा त्याने ते केलेच पाहिजे व तात्काळ केले पाहिजे एवढे निश्चयी सुरात सांगण्याचीच फक्त जरुर असते. समोरुन भरधाव येणाऱ्या मोटारीपुढे मूल धावत जाणार असे दिसल्यास, त्याने काय करावे ते पालक निःसंदिग्ध शब्दात बजावतील. काही संशोधकांनी म्हटल्याप्रमाणे: “बहुतेक सगळे पालक आपल्या मुलांना शाळेत जाण्यास, दात घासण्यास, छपरावर न चढण्यास, आंघोळ करण्यास वगैरे शिकवितात. मुले अनेकदा अडून बसतात, पण तरीही शेवटी सांगितलेले ऐकतात कारण पालकांशी गाठ आहे हे त्यांना ठाऊक असते.” तुम्ही सातत्याने आपल्या तत्त्वांचा व आज्ञांचा पाठपुरावा केलात तरच मुले ‘त्यांना (तत्त्वे व आज्ञांना) नेहमी आपल्या उराशी कवटाळून’ ठेवतील अशी आशा तुम्ही करु शकता.—नीतीसूत्रे ६:२१.
१५. घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे अंमलात आणण्यात पालकांनी सातत्य न दाखविल्यास त्याचा मुलांवर काय परिणाम होतो?
१५ पालक आपल्या वेळोवेळीच्या लहरी व मनःस्थितीप्रमाणे तत्त्वांचा आग्रह धरतील किंवा नाही तसेच चुकीला विलंबाने शिक्षा केल्यास आज्ञाभंगाची संधी घेण्यास व किती आज्ञाभंगानंतरही शिक्षा होत नाही हे पाहण्याद्वारे मुलाच्या अंगी धिटाई येते. चुकीला, विलंबाने शिक्षा झाल्यास प्रौढाप्रमाणे मुलेही गुन्हा करण्यास प्रवृत्त होतात. “दुष्कर्माबद्दल शिक्षा तात्काळ होत नाही म्हणून मानव पुत्राचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते.” (उपदेशक ८:११) यासाठीच जे मनात असेल तेच बोला व बोलाल तेच करा, मग तुम्हीच क्रुर व दयामाया नसलेले आहात असे भासवणारे वागणे, फुरगटणे, वाद यांचा काहीही उपयोग नाही हे तुमच्या मुलाला कळेल.
१६. असमंजस आज्ञा देण्याचे टाळण्यासाठी पालकांनी काय केले पाहिजे?
१६ या करता कृतीपूर्वी विचार हवा. उतावळीने केलेले नियम व आज्ञा अनेकदा असमंजस असतात. “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा.” (याकोब १:१९) शिस्त जर न्याय्य व सातत्याची नसेल तर मुलांची स्वाभाविक न्यायबुद्धी दुखावली जाते व संताप उत्पन्न होतो.
मनोरंजनावर नियंत्रण ठेवा
१७. काम आणि खेळाबाबत मुलांनी कोणता दृष्टिकोन आत्मसात केला पाहिजे?
१७ खेळ बालजीवनाचे एक स्वाभाविक अंग आहे. (जखऱ्या ८:५) मुलाला कामाची आवड व जबाबदाऱ्या हळुवारपणे शिकवताना पालकांनी वरील गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. मग मूल घरातील जी लहान सहान कामे करायला घेईल ती आधी झाली पाहिजेत व खेळ नंतर हा परिपाठ राहावा.
१८. मुलांवर सोबत्यांचा काय परिणाम होतो?
१८ काही “रस्त्यावरची पोरे” होतात तर काही इतरत्र मनोरंजन करत असल्याने आपल्याच घरात परकी होतात. जर त्यांचे सांगाती वाईट असतील तर त्याचा परिणामही वाईट होईल. (१ करिंथकर १५:३३) मुलाचा दृष्टिकोन विस्तृत होण्यासाठी घराबाहेरच्या लोकांची संगतही हवीच. पण जर तीच जास्त झाली किंवा तिच्यावर काही ताबा नसला तर कुटुंबातले संबंध दुरावतात वा तुटूनही जातात.
१९. मुलांना घराची ओढ उत्पन्न होण्यासाठी पालकांनी कोणकोणत्या गोष्टींचे परीक्षण करावे?
१९ ही गोष्ट सुधारतानाच मुलांना घराची ओढ कशी जास्त लागेल याबद्दल पालकांनी स्वतःला विचारले पाहिजे. केवळ सूचना देताना किंवा शिस्त लावतानाच नव्हे तर त्याशिवाय त्यांचे खरे मित्र बनून आणि सोबती बनून ते त्यांच्यासोबत वेळ घालवतात का? मुलाबरोबर खेळण्यास, बसण्यास वेळ नसावा इतके तुम्ही “कामात” आहात का? एकदा का मुलाबरोबर काहीही करण्याची संधी हुकली की ती पुन्हा मिळणार नाही. काळ एकाच दिशेने धावतो व मूलही आहे तसेच न राहता वाढत व बदलत राहते. हा हा म्हणता वर्षे जातात आणि तुमचा तान्हा आता कोठे पावले टाकावयास शिकला असे म्हणता म्हणता तो तरुण झालेला व मुलगी यौवनात आलेली तुम्हाला दिसेल. जीवनात समतोलपणा साधला व आपला वेळ कसा वापरतो याची स्वतःला शिस्त लावून घेतली तरच या अमूल्य वेळेच्या संधी तुमच्या हातून सुटणार नाही किंवा अजून कोवळ्या वयाची असतानाच मुले तुमच्यापासून दुरावल्याचे पाहावे लागणार नाही.—नीतीसूत्रे ३:२७.
२०, २१. घरात दूरदर्शन संच असल्यास पालकांनी कोणती जबाबदारी घेतली पाहिजे व का?
२० जेथे दूरदर्शन हे करमणूकीचे सर्वसाधारण माध्यम असेल तेथे त्याच्या वापरावर मर्यादा घालणे इष्ट असते. काही पालक मुलांना एका ठिकाणी (घरी) बसविण्यास दूरदर्शनाचा उपयोग करतात. ते सोयीचे व दाई ठेवण्यापेक्षा स्वस्तही वाटते. पण प्रत्यक्षात ते अत्यंत महाग पडते. दूरदर्शनवरील कार्यक्रम बहुधा हाणामाऱ्या व उत्तानपणाने भरलेले असतात. यामुळे समस्या सोडविण्याचा सर्वमान्य उपाय म्हणजे हाणामारी करणे व अनैतिक संबंधात जडणे हे वावगे नाही असा समज होतो. अनेक निरीक्षणांमध्ये असे दिसून आले आहे की, या सर्वामुळे माणसाचे मन संवेदनाहीन होते. लहानांवर तर याचा अधिक परिणाम होतो. तुमच्या मुलांनी दूषित नव्हे तर पौष्टिक अन्न खावे याबाबत तुम्ही जागरुक असता. त्यांच्या मनाला मिळणाऱ्या खाद्याविषयी तर तुम्ही विशेष जागरुक असावयास पाहिजे. येशूने दाखविल्याप्रमाणे अन्न आपल्या हृदयात जात नाही, परंतु मनात जे शिरते ते हृदयात पोहोचते.—मार्क ७:१८-२३.
२१ दूरदर्शनवर कोणते कार्यक्रम पाहावे व किती वेळ यावर नियंत्रण ठेवल्याने मुलाच्या विकासावर मोठा परिणाम होतो. दूरदर्शनवर काही मनोरंजक उद्बोधक कार्यक्रम असतात. पण त्यावर नियंत्रण नसल्यास त्याचे व्यसनच लागते व वेळेचा प्रचंड अपव्यय होतो. वेळ म्हणजेच जीवन, तो वेळ अधिक फायद्याच्या गोष्टींसाठी खर्च करता येईल. कारण दूरदर्शनमुळे करणे काहीच नसते तर नुसते पाहाणे होते. यामुळे शारीरिक हालचालच थांबते असे नाही तर वाचन व संभाषणही संपुष्टात येते. कुटुंबात देव-घेव आणि जवळीक अत्यंत आवश्यक आहेत. परंतु एकाच खोलीत, परंतु अवाक्षर न बोलता दूरदर्शन पहात बसल्याने त्या आवश्यकता पूर्ण होत नाहीत. दूरदर्शन पहाण्यात अवास्तव वेळ घालविण्याची समस्या असेल तेथे पालकांनी मुलांमध्ये दूरदर्शनऐवजी इतर उद्योगाबाबत गोडी वाढविली पाहिजे. उदा. वाचन, कौटुंबिक कार्यक्रम, खेळ इ. गोष्टीत स्वतः पालकांनी यात पुढाकार घेतला व उदाहरण घालून दिले तर मुलांना त्याची गोडी लागण्यास मोठा हातभार लागतो.
शिस्त लावताना मुलांशी विचारांची देव-घेव करा!
२२. पालकांनी वापरलेले शब्द मुलांना कळणे महत्त्वाचे का आहे?
२२ एका पालकाने हा अनुभव सांगितला:
“माझा मुलगा तीन वर्षांचा असताना मी त्याला खोटे बोलणे, देवाला खोटे बोलणाऱ्याचा कसा तिटकारा आहे, यावर नीतीसूत्रे ६:१६-१९ व इतर शास्त्रवचनांचा आधार घेऊन भले मोठे व्याख्यान सुनावले. तो ऐकत होता व योग्य असा प्रतिसादही देत आहे असे दिसत होते, पण त्याला मूळ मुद्दाच कळलेला नसावा अशी मला शंका आली. म्हणून मी त्याला विचारले, ‘बाळा, खोटे बोलणे म्हणजे काय हे तुला कळते का?’ तो म्हणाला ‘नाही.’ त्यानंतर नेहमी, माझ्या बोलण्याचा अर्थ काय व शिक्षा का होत आहे हे त्याला निश्चित समजले आहे याची मी नेहमी खात्री करून घेऊ लागलो.”
२३. कोणत्याही विशिष्ट कृतीची योग्यता मुलाला समजावून देण्यात काय गुंतलेले असते?
२३ मुले अगदी तान्ही असताना, “काय करू नये” तेवढेच पालक त्यांना सांगू शकतील. उदा. गरम शेगडीला हात लावणे. पण या प्राथमिक इशाऱ्याबरोबर त्याची कारणेही सांगता येतील. उदाहरणार्थ, थोडक्यात शेगडी “हाय!” आहे आणि तिला हात लावला तर “बाऊ!” होतो. प्रारंभापासून, मुलाला समजू द्या की सर्व काही त्याच्या भल्यासाठी केलेले असते. मग दया, प्रेम व इतरांच्या भल्याविषयी तळमळ हे गुण किती अगत्याचे आहेत ते सांगा. सर्व बंधने व आवश्यक बाबीच्या मुळाशी हेच गुण आहेत याची मुलाला जाणीव करून द्या. तसेच कोणत्याही विशिष्ट कृतीमध्ये या गुणांचे प्रतिबिंब अथवा अभाव कसा दिसून येतो यावर भर द्या. असे सातत्याने केल्यास मुलाच्या केवळ मनावरच नव्हे तर हृदयावरही तुम्ही परिणाम करू शकाल.—मत्तय ७:१२; रोमकर १३:१०.
२४. मुलाने अधिकाराला मान देणे महत्त्वाचे का आहे?
२४ अशा रितीने हळूहळू आज्ञाधारकपणा, अधिकारपदाचा आदर मुलांवर बिंबवला पाहिजे. पहिल्या वर्षापासूनच, मोठ्यांच्या आज्ञा पाळण्याची तयारी वा नाखुषी मुलामध्ये दिसून येते. मुलाची पुरेशी मानसिक वाढ झाल्याबरोबर पालकांची देवापुढील जबाबदारी त्याला समजावून सांगा. याचा मुलाच्या प्रतिसादावर मोठा परिणाम होतो. ही गोष्ट मुलाला कळली नाही तर पालक त्याच्यापेक्षा मोठे व जास्त ताकतीचे असल्यामुळे त्यांनी आज्ञाधारकपणे वागले पाहिजे अशी मुलांची कल्पना होते. परंतु पालकांनी मुलांना जर दाखवून दिले की त्याच्या स्वतःच्या नव्हे तर देवाच्या कल्पना, त्याच्या वचनातील नियम आहेत तर पालकांच्या उपदेशाला व मार्गदर्शनाला इतर कशानेही येऊ शकणार नाही अशी बळकटी मिळेल. मुलाच्या जीवनात संघर्ष येऊ लागला वा त्याला (अथवा तिला) योग्य मूल्यांशी एकनिष्ठ राहण्यात अनेक मोहांना तोंड द्यावे लागेल तेव्हा यामुळे त्यांना बळ व धीर येईल.—स्तोत्रसंहिता ११९:१०९-१११; नीतीसूत्रे ६:२०-२२.
२५. आपल्या मुलाला योग्य रितीने शिस्त लावण्यास पालकांना नीतीसूत्रे १७:९ मधील उपदेशाचा कसा फायदा होईल?
२५ “जो इतरांच्या अपराधावर पांघरूण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो. पण जो गत गोष्टी घोकीत बसतो त्याला मित्र अंतरतात.” (नीतीसूत्रे १७:९) हे मूल व पालकाच्या संबंधातही सत्य आहे. एकदा का मुलाला त्याची चूक दाखविली, त्याला शिक्षा का व्हावी हे त्याला कळले व शिक्षा देऊन झाली की मग प्रेमाने प्रवृत्त होऊन, पालकांनी त्या चुकांची पुन्हा पुन्हा आठवण काढू नये. जे कराल त्यात तुम्हाला चुकीची चीड आहे, मुलाबद्दल चीड नाही हे स्पष्ट होऊ द्या. (यहूदा २३) शिक्षा झाल्यावर औषधाचा ‘डोस’ प्याल्यासारखे मुलाला वाटेल आणि त्या गोष्टीची अनावश्यक वारंवार वाच्यता त्याला अपमानकारक वाटेल. त्यामुळे ते मूल पालक व इतर भावंडांपासून दुरावेल. अयोग्य वळण लागत असल्याची पालकांना काळजी वाटत असल्यास नंतर कधी तरी कौटुंबिक चर्चेत त्यास वाचा फोडावी. मागील कृतीचा नुसता पाढा वाचू नका तर त्यामागील तत्त्वे विचारात घ्या. ती कशी लागू होतात व चिरंतन सुखासाठी ती कशी आवश्यक आहेत हे दाखवून द्या.
शिस्त लावण्याचे वेगवेगळे मार्ग
२६. एकाच प्रकारच्या शिक्षेला सर्व मुलांचा योग्य तो प्रतिसाद का मिळत नाही?
२६ “वाग्दंड समंजसाच्या मनावर ठसतो तसे शंभर फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत.” (नीतीसूत्रे १७:१०) निरनिराळ्या मुलांना वेगवेगळ्या रितीने शिस्त लावावी लागेल. त्यासाठी प्रत्येक मुलाचा स्वभाव आणि कल लक्षात घ्यावा लागेल. एखादे मूल अतिशय हळव्या मनाचे असल्यास दर वेळी चोप देण्यासारख्या शारीरिक शिक्षेची जरुर भासणार नाही. दुसऱ्याला मार देण्याने काहीही उपयोग होणार नाही किंवा नीतीसूत्रे २९:१९ मध्ये वर्णन केलेल्या नोकराप्रमाणे एखादे मूल असेल जे “शब्दांनी सुधारत नाही. त्याला समजते तरी तो पर्वा करीत नाही.” अशा मुलाला शारीरिक शिक्षेची जरुर पडेल.
२७. एका पित्याने आपल्या मुलाचे भिंतीवर लिहिणे कसे थांबवले?
२७ एक माता म्हणते:
“माझा मुलगा जेमतेम दोन वर्षाचा होता तेव्हा त्याने भिंतीवर, जमिनीपासून जवळच लहान लहान लाल खुणा केल्या. त्याच्या वडिलांनी त्याला त्या दाखविल्या आणि त्याबद्दल विचारले. मुलगा मोठे डोळे करुन पहात राहिला. पण त्याच्या तोंडून होय किंवा नाही निघाले नाही. शेवटी वडील त्याला म्हणाले: ‘अरे, मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा मीही भिंतीवर लिहीले होते, त्यात मजा येते नाही का?’ आता मात्र मुलाच्या मनावरचा ताण गेला. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि भिंतीवर लिहिताना किती मजा येते हे तो मोठ्या उत्साहाने सांगू लागला. बाबांना त्याची भावना कळते हे त्याला समजले! परंतु त्यात कितीही मजा वाटत असली तरी भिंत ही लिहिण्याची जागा नव्हे हे त्याला समजावून देण्यात आले. अशा रितीने मुलाशी संभाषणाने जवळीक साधली गेली. त्यानंतर थोड्याशा समजावणीने मुलाचे समाधान झाले.”
२८. पालकांना मुलाशी वाद कसा टाळता येईल?
२८ शिस्त लावताना मुलांना योग्य कारणे दाखवून शिकवणे चांगले आहे. पण त्यांच्याबरोबर हुज्जत घालणे हिताचे नव्हे. आपले मूल काही काम न करण्यासाठी वाद घालू लागल्यावर एका मातेने त्याला सांगितले: “तू ते काम पूर्ण केलेस की आपण बागेत जाऊ.” बागेत जाणे म्हणजे त्या मुलाच्या दृष्टीने खास मौज होती. सांगितलेले काम होईतो ती मजा अनुभवावयास मिळणार नव्हती. थोड्या वेळाने आई पहावयास आली व काम पूर्ण झालेले नसले तर ती म्हणे “अजून नाही झाले? तुझे झाले की जाऊ आपण.” ती वाद घालीत बसली नाही. पण तिला हवे तसेच झाले.
२९. आपल्या चुकांचे अप्रिय परिणाम मुलाला जाणविण्यासाठी काय करता येईल?
२९ चुकाची अप्रिय फळे भोगावी लागल्यावर मुलांना योग्य मूल्यांच्या योग्यतेची जाणीव होण्यास मदत होते. एखाद्या मुलाने कचरा करून ठेवला आहे का? तो त्यालाच उचलावा लागला म्हणजे त्याच्या मनावर सर्वात जास्त परिणाम होईल. तो उद्धट वा अप्रामाणिकपणे वागला आहे का? माफी मागावी लागण्याने या चुकीच्या वळणाला सुधारता येईल. त्याने रागाच्या भरात काही तोड फोड केली असेल. तो पुरेसा मोठा असल्यास ती वस्तू परत करण्यासाठी वा भरून देण्यासाठी त्याला अर्थांजन करावे लागेल. काही मुलांच्या बाबतीत त्यांना मिळणाऱ्या सुविधा वा सवलती नाकारल्यास योग्य तो धडा मिळेल. ख्रिस्ती मंडळीमध्ये चूक करणाऱ्या सदस्याला लज्जा आणण्यासाठी त्याच्याशी सलोख्याचे संबंध तोडण्याचा मार्ग अनुसरला जातो. (२ थेस्सलनीकाकर ३:६, १४, १५) सबंध कुटुंबाने त्याच्याशी तात्पुरता असहकार व अबोला केल्यास मुलावर, मार देण्यापेक्षा अधिक परिणाम होतो. परंतु मुलाला घराबाहेर बसविण्यासारखा अतिरेक होता कामा नये कारण त्यात प्रीती असत नाही. आपल्या कामाची फळे आपण भोगलीच पाहिजेत हे मुलाला दाखवून दिले पाहिजे. यामुळे त्यांना जबाबदारी कळू लागते.
प्रेमाने वळण लावा
३०. मुलांना मार्गदर्शक तत्त्वे आखून देताना समतोलपणा ठेवणे महत्त्वाचे का आहे?
३० “जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे,” “वरून येणार ज्ञान हे . . . समजुतदार . . . असे आहे” हे ध्यानात असू द्या. (फिलिप्पैकर १:१०; याकोब ३:१७) मुले म्हणजे उत्साहाची आगरे असतात. ती संधीची वाटच पहात असतात. त्यांना शिकण्याची, शोध घेण्याची, नवीन गोष्टी करुन पहाण्याची अतिशय ओढ असते. त्यांना मर्यादा आखताना व मार्गदर्शन करताना विवेक दाखवा व बारकाईने निवड करा. अत्यावश्यक काय व अनावश्यक काय हे ठरविताना समतोलता साधण्याची जरूर आहे. एकदा मर्यादा स्पष्ट केल्यावर मुलाच्या प्रत्येक हालचालीवर मिनिटागणीक ताबा ठेवण्यापेक्षा त्या मर्यादेच्या चौकटीत मुलाला पूर्ण स्वातंत्र्य अनुभवू द्या. (नीतीसूत्रे ४:११, १२) नाही तर तुमची मुले ‘चिडीला’ येतील व “खिन्न” होतील. तसेच क्षुल्लक गोष्टींचा मोठा गाजावाजा केल्याने तुम्ही स्वतःही थकून जाल.—कलस्सैकर ३:२१.
३१. शिस्त लावण्यात यहोवा देवाने कसे उदाहरण घालून दिले आहे?
३१ तर पालकांनो, “काही आशा असेल तोवर आपल्या पुत्राला शासन” करा. पण तेही देवाच्या मार्गाला अनूसरून—प्रीतीने करा. देवाचे उदाहरण अनुसरा: “कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसेच यहोवा ज्याच्यावर प्रीती करितो त्याला शासन करितो.” “बोधाचा वाग्दंड जीवनाचा मार्ग” असल्याने, देवाप्रमाणे, तुम्हीही आपली शिस्त बहुमोल व प्रेमळ असू द्या.—नीतीसूत्रे १९:१८; ३:१२; ६:२३.
[अभ्यासाचे प्रश्न]