व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बालपणापासून मुलांना वळण लावणे

बालपणापासून मुलांना वळण लावणे

अध्याय ९

बालपणापासून मुलांना वळण लावणे

१-४. लहान मुलाला प्रचंड आकलन शक्‍ती असते याला पुरावा काय?

 नवजात अर्भकाच्या मनाची, कोऱ्‍या कागदाशी तुलना करतात. परंतु खरे तर मातेच्या उदरात असतांनाही त्याच्या मनावर अनेक गोष्टीचे ठसे उमटलेले असतात. तसेच अनुवंशिक वारशामुळे व्यक्‍तिमत्वाचे काही गुण त्यात पक्के झालेले असतात. पण जन्मानंतर प्रचंड ग्रहणशक्‍तिही असते. एक पानच काय, जणू एक पूर्ण ग्रंथालय प्रत्येक पानावर छपाई होण्याची वाटच पाहात असते.

बालकाचा मेंदू त्याच्या प्रौढपणीच्या एक चतुर्थांश असतो. पण तो इतका झपाट्याने वाढतो की फक्‍त दोनच वर्षात त्याचे वजन प्रौढपणीच्या तीन चतुर्थांश भरते! बौद्धिक वाढीची प्रगतीही तशीच होते. संशोधक म्हणतात, पहिल्या चार वर्षात बालकाची जेवढी प्रगती होते तेवढीच पुढे होण्यास तेरा वर्षे लागतात. काही तर म्हणतात, “मुलाच्या पाचव्या वाढदिवसापूर्वी ते ज्या कल्पना, नवीन गोष्टी शिकते त्या त्याच्या पूर्ण आयुष्यातल्या सर्वात कठीण असतात.”

उजवे-डावे, वर-खाली, भरलेला-रिकामा या कल्पना तसेच आकारमान, वजन यातील तरतमभाव आपल्याला किती स्वाभाविक वाटतात. पण बालकाला या आणि इतर अनेक कल्पना शिकाव्या लागतात. संभाषणाची (बोलण्याची) कल्पनाही बाळाच्या मनात ठामपणे रुजवावी लागते.

“माणसाला कराव्या लागणाऱ्‍या बौद्धिक करामतीत भाषा संपादन करणे सर्वात कठीण गोष्ट आहे,” असा भाषेबद्दल काहींनी शेरा दिला आहे. तुम्हाला एखादी नवीन भाषा शिकण्यासाठी धडपडावे लागले असेल तर बहुधा तुम्हीही यास सहमत व्हाल. पण तुम्हाला निदान भाषा कशी असते व कशी वापरावी हे माहीत असण्याचा फायदा मिळतो. बालकाला तो फायदाही नसतो आणि तरीही भाषेची कल्पना आत्मसात करून ती वापरण्याचे कसब त्याच्या मेंदूत असते. एवढेच नव्हे तर द्विभाषिक घरात वा प्रदेशात राहणारी लहान मुले शाळेत जाण्यापूर्वीच दोन भाषा सुलभतेने बोलतात! म्हणजे, बुद्धी असते फक्‍त तिचा विकास व्हावा लागतो.

सुरुवात करावयाची ती तात्काळ!

५. मुलाला कधीपासून वळण लावावे?

आपला सोबती तीमथ्य याला लिहिताना, तीमथ्याला “बाळपणापासून” पवित्र शास्त्राची माहिती असल्याची आठवण प्रेषित पौलाने करून दिली. (२ तीमथ्य ३:१५) बालकाची शिक्षणाची नैसर्गिक आवड ज्याला कळते तो पालक शहाणा. बालक सभोवतालच्या सर्व गोष्टी लक्ष लावून ऐकत व पाहात असते. पालकांना त्यांची जाणीव असो वा नसो मुले माहिती जमवीत असतात, तिचे नीट वर्गीकरण करतात, त्यात भर टाकतात व त्यातून अनुमान काढतात; आणि पालक जागरुक नसतील तर आपल्या इच्छापूर्तीसाठी पालकांना कसा गुंगारा द्यावा हे थोड्याशा वेळात मुलांना उत्तम कळते. या कारणास्तव, देव वचनात दिलेला उपदेश जन्मापासूनच लागू होतो: “मुलाच्या स्थितीस अनुरुप असे शिक्षण त्याला दे म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” (नीतीसूत्रे २२:६) भरपूर प्रेम व मायेच्या संगोपणाने पहिला धडा प्रेमाचा हे ओघाने आलेच. पण त्याच बरोबर जरूर असेल तेथे हळुवारपणे तरीही दृढपणे शिस्त ही हवीच.

६. (अ) मुलांशी कसे बोलणे चांगले? (ब) मुलाने विचारलेल्या असंख्य प्रश्‍नाकडे कोणत्या दृष्टीने पाहावे?

तान्ह्या बाळाशी सतत “बोबडे” बोलू नका तर साधे पण प्रौढ माणसासारखे बोला कारण तेच त्याने शिकावे असे तुम्हाला वाटते. जेव्हा लहान मूल बोलावयास शिकेल तेव्हा तुमच्यावर प्रश्‍नांचा भडिमार करील: ‘पाऊस का पडतो? मी कोठून आलो? तारे दिवसा कोठे जातात? तुम्ही काय करता? हेच का? तेच का?’ आणि त्या प्रश्‍नांना अंतच नसतो! त्या प्रश्‍नांकडे लक्ष द्या, कारण ज्ञान मिळविण्याचे मुलाचे ते उत्तम साधन आहे. प्रश्‍न थोपविल्यास मानसिक वाढ ही थांबविली जाते.

७. लहान मुलांच्या प्रश्‍नांना योग्य उत्तरे कशी देता येतील, व का?

परंतु प्रेषिताने आठवण ठेवली तशी तुम्हीही ठेवा की “मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे. मुलासारखी माझी बुद्धी असे मुलासारखे माझे विचार असत.” (१ करिंथकर १३:११) जमेल तेवढी सुटसुटीत व साधी उत्तरे द्या. जेव्हा मूल विचारते की ‘पाऊस का पडतो?’ तेव्हा त्याला क्लिष्ट उत्तर नको असते. ‘ढगात पाणी मावत नाही म्हणून ते खाली पडते,’ अशासारखे उत्तर पुरेसे असते. मुलाचे लक्ष एका गोष्टीवर फार वेळ राहात नाही, ते झटकन्‌ दुसऱ्‍या विषयाकडे वळते. जड अन्‍न पचेपर्यंत मुलाला जसे दूध देतात त्याप्रमाणे सविस्तर गोष्टी कळत नाहीत तोवर त्याला साधी समजण्यास सोपी माहिती द्यावी.—इब्रीयांस ५:१३, १४ पडताळा.

८, ९. मुलाला हळूहळू वाचावयाला शिकवण्यास काय करता येईल?

शिक्षण प्रगतीशील असावे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे बालपणापासून तीमथ्याला पवित्र शास्त्राची ओळख होती. याचा अर्थ, त्याच्या अगदी बालपणीच्या आठवणीत पवित्र शास्त्र शिकवणीही असतील. आजकाल आई वडील मुलाला हळू हळू वाचावयास शिकवतात त्याप्रमाणे ते असले पाहिजे. तुम्हीही मुलांना वाचून दाखवा. मूल अगदी लहान असताना त्याला मांडीवर बसवून त्याच्या भोवती बाहू टाकून गोड आवाजात वाचा. त्याला कितीही कमी कळत असले तरी सुरक्षित व आनंदी वाटेल. वाचनाचा अनुभव त्याला सुखावह वाटेल. नंतर एक खेळ म्हणून तुम्ही त्याला वर्णमाला शिकवू शकाल. त्यानंतर शब्द बनवा व पुढे शब्दांचे वाक्य करा. शक्य असेल तेवढे शिकणे आनंददायक करा.

उदाहरणार्थ एक जोडपे आपल्या तीन वर्षाच्या मुलाबरोबर मोठ्याने वाचत असे. वाचताना मुलाला कळण्यासाठी ते प्रत्येक शब्दावर बोट ठेवत असत. काही शब्दांसाठी ते थांबत व “देव,” “येशू,” “माणूस,” “झाड” असे शब्द मुलगा सांगत असे. हळू हळू त्याचे वाचण्याजोगे शब्द वाढत गेले, आणि चार वर्षाचा होईतो तो बहुतेक सगळे शब्द वाचू लागला. वाचनानंतर लिहिणे येते. प्रथम सुटी अक्षरे आणि मग पूर्ण शब्द. स्वतःचे नाव लिहिण्यास मुलाला किती तरी आनंद होतो!

१०. प्रत्येक मुलाला स्वतःच्या नैसर्गिक गुणांचा विकास करण्यात मदत करणे सुज्ञपणाचे का आहे?

१० प्रत्येक मुलाचे स्वतंत्र व्यक्‍तिमत्व असते. त्याला त्याच्या नैसर्गिक गुणांना अनुसरून प्रगती करण्यास मदत केली पाहिजे. प्रत्येक मुलाला त्याच्या नैसर्गिक कला गुणांचा विकास करू दिल्यास त्याला इतर मुलांच्या प्रगतीचा हेवा वाटणार नाही. प्रत्येक मुलावर सारखेच व त्याच्या अनुषंगाने प्रेम दाखवावे. वाईट वर्तन सुधारताना वा त्याला आवर घालताना आपणच ठरविलेल्या गोष्टी शिकण्याची त्याच्यावर सक्‍ती करु नका. त्याऐवजी त्याच्या वैयक्‍तिक गुणांचा सर्वोत्तम उपयोग कसा होईल याचे मार्गदर्शन करा.

११. एक मुलाची दुसऱ्‍याशी अन्यायकारक तुलना करणे वेडेपणाचे का आहे?

११ एका मुलापुढे दुसऱ्‍याला बरा अथवा वाईट लेखल्यास मुलांमध्ये स्वार्थी, चढाओढीची भावना उत्पन्‍न होते. मुले लहानपणीच नैसर्गिक स्वार्थी वृत्ती प्रकट करतात. परंतु मुळात हुद्दा, श्रेष्ठत्व व स्वतःच्या मोठेपणाच्या कल्पना त्यांच्यामध्ये नसतात. त्यामुळेच, एकदा त्याच्या शिष्यामधील महत्त्वाकांक्षी विचार व स्वतःच्या मोठेपणाची जाणीव काढून टाकण्यासाठी येशूने एका लहान मुलाचे उदाहरण देऊ केले. (मत्तय १८:१-४) तेव्हा, दोन मुलांमध्ये अन्यायकारक तुलना करु नका. आपण नकोसे आहोत अशी (अव्हेराची) जाणीव मुलामध्ये उत्पन्‍न होईल. प्रथम त्याला वाईट वाटेल. अशीच वागणूक सतत मिळाल्यास त्याच्या मनात प्रतिकूल भावना निर्माण होईल. याउलट एकाचेच पोवाडे सतत गायिले गेल्यास तो मुलगा गर्विष्ठ होईल व इतरांना अप्रिय होईल. एका मुलापेक्षा दुसरा काय आहे यावर त्याच्यावरली तुमची माया अवलंबून ठेवू नका. विविधता आनंददायक असते. एका वाद्यवृंदात अनेक तऱ्‍हेची वाद्ये असल्याने विविधता येते व ते मनोरंजकही होते. विविधता असूनही त्या सर्वात सुसंवाद असतो. वेगवेगळ्या व्यक्‍तिमत्वामुळे कुटुंबात खुमारी व चैतन्य येते. शिवाय सर्वांनी देवाच्या उच्च तत्त्वांचे पालन केल्यास त्यांच्यातील मेळ बिघडणार नाही.

तुमच्या मुलाच्या वाढीस मदत करा

१२. प्रौढाच्या बाबतीतील कोणत्या गोष्टीवरून, मुलांना मार्गदर्शनाची जरुर असते, असे कळते?

१२ देवाचे वचन म्हणते: “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) परंतु माणसे मात्र स्वतःला स्वतंत्र समजतात व म्हणून ईश्‍वरी मार्गदर्शनाकडे पाठ फिरवून ती मानवाने ठरविलेला मार्ग स्वीकारतात. याचा परिपाक म्हणजे त्यांना एकापाठोपाठ एक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते, आणि त्यामुळे देवाचेच मार्गदर्शन योग्य आहे असे शाबीत होते. देव म्हणतो, माणसाला एक मार्ग योग्य वाटतो पण त्याच्या शेवटी नाशच असतो. (नीतीसूत्रे १४:१२) आतापर्यंत अनेक वर्षे माणसे त्यांना योग्य वाटणारा मार्ग अनुसरत आहेत. युद्ध, दुष्काळ आजार व मृत्यू हा त्याचा परिणाम होय. प्रौढाला योग्य वाटणारा मार्ग नाशाकडे जातो तर लहानग्या मुलाला योग्य वाटणारा मार्ग इतरत्र कसा जाईल? चालणाऱ्‍या माणसाला पावले नीट टाकता येत नसतील तर धड चालता न येणाऱ्‍या बालकाला आपल्या आयुष्याचा मार्ग कसा निश्‍चित करता येईल? पालक व बालकासाठी देवच त्याच्या वचनातून मार्गदर्शन करतो.

१३, १४. अनुवाद ६:६, ७ ला अनुसरुन पालकांनी मुलांना कसे शिक्षण दिले पाहिजे?

१३ पालकांना देव सांगतो: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव, आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्याविषयी बोलत जा.” (अनुवाद ६:६, ७) नेहमी योग्य प्रसंग पाहून शिक्षण दिले पाहिजे. सकाळी कामाला व शाळेला जाण्याच्या गडबडीतही सर्व कुटुंब एकत्र न्याहारी करीत असल्यास, त्या अन्‍नासाठी देवाचे आभार मानल्याने देवाकडे लक्ष वेधले जाते. त्या सोबतच कुटुंबाला पोषक इतर आध्यात्मिक गोष्टींचाही समावेश होतो. वेळ असल्यास दिवसातील घडामोडींबाबत अथवा शाळेबाबत एखादा शब्द व घडोघडी येणाऱ्‍या समस्यांवर यथायोग्य सल्लाही त्यात घालता येईल. झोपण्याच्या वेळी, “निजता”ना, पालकांनी मुलांकडे खास ध्यान दिल्यास मुले खूष असतात. त्यावेळी सांगितलेल्या गोष्टी मुलांना फार आवडतात आणि शिक्षण देण्यास त्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. अशा गोष्टींनी पवित्र शास्त्र ओतप्रोत भरलेले आहे. मुलांना ते चित्तवेधक वाटण्यास पालकांनी थोडा प्रेमळपणा आणि कल्पकता दाखवण्याचीच खोटी आहे. तुमच्या आयुष्यातील वैयक्‍तिक अनुभवात मुलांना विशेष रस असतो. त्यातूनही अनेक गोष्टी शिकविता येतात. दरवेळी नवीन गोष्टी कोठून सांगणार असे वाटले तरी अनेकदा मुलांना एकदा ऐकलेली गोष्टच पुनःपुन्हा ऐकाविशी वाटते. असा खास वेळ दिल्याने तुमचे व मुलाचे परस्पर संबंध अधिक मोकळे राहिलेले तुम्हाला आढळून येतील. तसेच झोपण्याच्या वेळी लहान मुलाबरोबर प्रार्थना केल्यास उत्तम मार्गदर्शन व संरक्षण देणाऱ्‍या देवाबरोबर लवकर संबंध प्रस्थापित होण्यासही मदत होते.—इफिसकर ३:२०; फिलिप्पैकर ४:६, ७.

१४ “घरी बसलेले असताना” अथवा “मार्गाने चालत असता” तुम्ही कोठेही असलात तरी मुलांना परिणामकारक उपायांनी वळण लावण्याच्या संधी असतात. काही गोष्टी खेळातून शिकवता येतात. पवित्र शास्त्र अभ्यासाच्या सभेत शिकविलेल्या गोष्टींची मुलांना आठवण देण्यात याचा कसा उपयोग झाला ते एका जोडप्याने सांगितले:

 ‘सहा वर्षाच्या, सभेत फारसे लक्ष न देणाऱ्‍या आमच्या एका मुलाला आम्ही बरोबर नेले. सभेला जाताना मी म्हटले: “आपण एक खेळ खेळू या. घरी परतताना, कोणती गाणी म्हटली, सभेत कोणत्या मुख्य गोष्टी सांगितल्या ते आपल्याला आठवते का पाहू.” घरी जात असताना आम्ही आश्‍चर्याने थक्कच झालो. बहुधा लक्ष न देणाऱ्‍या सर्वात धाकट्याला प्रथम सांगण्याची संधी दिली आणि त्याने बऱ्‍याच गोष्टी आठवून सांगितल्या. त्यात बाकीच्या मुलांनी भर घातली आणि शेवटी आम्ही दोघे बोललो. तापदायक काम वाटण्याऐवजी मुलांना त्यात मजा वाटली.’

१५. मुलाला त्याच्या कामात प्रगती करण्यास उत्तेजन कसे द्यावे?

१५ मूल जसजसे वाढते तसे कल्पना व्यक्‍त करण्यास, चित्रे काढण्यास, काम करण्यास, वाद्य वाजविण्यास शिकते. त्याला काही तरी मिळविल्याचे समाधान वाटते. त्याच्या कामात त्याचे व्यक्‍तिमत्व साकारते. ते त्याला व्यक्‍तिगत रुपाचे वाटते. त्याकडे पाहून तुम्ही ‘शाबास’ म्हणालात की त्या मुलाचा आनंद वाढतो. त्याच्या कामाचे मनापासून कौतुक करा, त्याला उत्तेजन मिळेल. त्याच्यावर टीका करा, मूल दुःखी होईल व त्याची उमेद करपेल. त्याच्या कामात एखाद्या गोष्टीबाबत जरूर असेल तर शंका घ्या, पण त्यामुळे सर्व कामच टाकाऊ आहे असे त्याला वाटू देऊ नका. उदाहरणार्थ, त्याने काढलेले चित्र दुरुस्त करण्यापेक्षा दुसऱ्‍या कागदावर काढून दाखवा त्यामुळे त्याला इच्छा असल्यास स्वतःचे चित्र सुधारण्यास वाव मिळेल. त्याच्या प्रयत्नांना उत्तेजन देऊन तुम्ही त्याच्या वाढीला उत्तेजन द्याल. टिकेचा भडिमार करुन तुम्ही त्याला नाऊमेद कराल अथवा जास्त प्रयत्न करण्याची त्याची इच्छाच घालवाल. गलतीकर ६:४ मध्ये लिहिलेले तत्त्व मुलांनाही लागू होते: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्‍यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.” मुलाला खासकरून त्याच्या प्रथम प्रयत्नांना उत्तेजनाची जरुर असते. जर ते काम त्याच्या वयाच्या मानाने चांगले असेल तर त्याची प्रशंसा करा! नसेल तर त्याच्या प्रयत्नांची प्रशंसा करा व पुन्हा अधिक प्रयत्न करण्यास उत्तेजन द्या; तसे म्हटल्यास पहिल्याच प्रयत्नाने तो काही चालावयासही शिकला नव्हता.

मी लैंगिक गोष्टी कशा समजावून द्याव्यात?

१६. पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे लैंगिक बाबतीतील मुलाच्या प्रश्‍नांना कशा प्रकारची उत्तरे द्यावी?

१६ तुम्ही मुलाच्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन परस्पर संबंधाना उत्तेजन देता आणि अचानकपणे तुम्हाला लैंगिक बाबतीत प्रश्‍न विचारले जातात. तुम्ही स्पष्ट उत्तर देता किंवा ‘दवाखान्यातून बाळ आणले’ असे गुळमुळीत आणि चुकीचे उत्तर देता? तुम्ही खरी माहिती द्याल की मोठ्या मुलांकडून अश्‍लील शब्दात चुकीची माहिती मिळू द्याल? जननेंद्रिये व लैंगिक गोष्टीबाबत पवित्र शास्त्रात अनेक स्पष्ट उल्लेख आहेत. (उत्पत्ती १७:११; १८:११; ३०:१६, १७; लेवीय १५:२) जेथे देव वचनाचे पठण होईल अशा मेळाव्याबाबत देव म्हणाला: “सर्व लोकांना, म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके . . . जमव म्हणजे ते ऐकून शिकतील.” (अनुवाद ३१:१२) “थिल्लर व अश्‍लील” नव्हे तर गंभीर व आदरयुक्‍त वातावरणात मुले असे उल्लेख ऐकतील.

१७-१९. लैंगिक बाबतीत मुलांना हळूहळू अधिक स्पष्टीकरण कसे द्यावे?

१७ खरे म्हटल्यास बहुतेक पालकांना वाटते इतक्या लैंगिक गोष्टी समजावून सांगणे कठीण नाही. मुलांना आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची जाणीव बरीच लवकर होते. तुम्ही त्यांची नावे सांगावीत: हात, पाय, नाक, पोट, कुल्ले, पुरुषाचे जननेंद्रिय, स्त्रीचे जननेंद्रिय. तुम्हीच एकदम जननेंद्रियाबाबात बोलताना हळू आवाजात बोलू लागला नाहीत तर लहान मुलाला त्यास कसलाही “संकोच” वाटणार नाही. एकदा प्रश्‍नांची सरबत्ती सुरु झाली की सर्वच स्पष्टीकरण द्यावे लागेल अशी भीती पालकांना वाटते. मुलाची वाढ जसजशी होत जाईल त्याप्रमाणे प्रत्यक्षात एका वेळी थोडेच प्रश्‍न विचारले जातात. वाढीच्या वेगवेगळ्या टप्यात योग्य शब्द आणि साधी, सामान्य माहिती देणे पुरेसे असते.

१८ उदाहरणार्थ, एके दिवशी ‘बाळ कोठून येते?’ असे विचारले जाते. ‘बाळ आईच्या पोटात वाढते’ असे साधे उत्तर देता येते. बहुधा एवढेच त्यावेळी पुरेसे असते. नंतर मूल विचारते, ‘पण बाळ बाहेर कसे येते?’ तर ‘त्याच्यासाठी खास रस्ता असतो’ एवढे उत्तर त्यावेळी पुरेसे असते.

१९ काही काळाने प्रश्‍न येईल, ‘पण बाळ बनले कसे?’ तुम्ही सांगू शकता ‘आई बाबांना बाळ हवे असते. बाबांचे एक बीज आईच्या बीजाशी एकजीव होते. आणि जमिनीतल्या बीचे वाढून झाड आणि फूल होते तसे बाळ वाढते.’ अशी ही सलग गोष्ट मुलाला कळण्याएवढे तुकडे करून सांगावी. नंतर मूल विचारील ‘बाबांचे बीज आईमध्ये कसे गेले?’ त्यावर तुम्ही म्हणू शकता ‘तुला, मुलगा कसा असतो ते माहीत आहे. त्याला जननेंद्रिय असते. मुलीच्या शरिरात ते राहण्याएवढी जागा असते. अशारितीने बी पेरले जाते. माणसे तशीच बनलेली आहेत. त्यामुळे बाळ आईच्या पोटात बनते नि वाढते, आणि शेवटी बाळ बनून बाहेर येते.’

२०. लैंगिक बाबतीत पालकांनीच मुलांना स्पष्टीकरण देणे बरे का?

२० खोट्या गोष्टी किंवा त्याविषयी “संकोच” व लाज दाखविल्याने ती गोष्ट अप्रिय वा घृणास्पद असेल असे वाटते. त्यापेक्षा तो विषय प्रामाणिकपणे हाताळलेला नक्कीच बरा. (तीत १:१५ पडताळून पहा.) तसेच आपल्या पालकांकडून, मुलाला वस्तुस्थिती कळलेली बरी. पालक त्यांना स्पष्टीकरणाबरोबर एकमेकांवर प्रीती करणाऱ्‍या व बाळाचा मायेने सांभाळ करण्याची जबाबदारी पत्करलेल्या विवाहित लोकांनाच मुले का व्हावीत हे सांगतात. यामुळे विषयाला हितकारक आध्यात्मिक दर्जा प्राप्त होतो, नाहीतर अयोग्य वातावरणात माहिती मिळाल्यामुळे ते सर्व किळसवाणे वाटते.

जीवनातील महत्त्वाचे धडे देणे

२१. मुलांमधील कोणत्या कलामुळे, पालकांनी योग्य आदर्श घालून देणे महत्त्वाचे आहे?

२१ येशूने आपल्या काळातील लोकांची लहान मुलांशी तुलना केली. तो म्हणाला: “आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला, तरी तुम्ही नाचला नाही. आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाहीत.” असे आपल्या सोबत्यांना म्हणणाऱ्‍या मुलाप्रमाणे ते होते. (मत्तय ११:१६, १७) मुलांच्या खेळात, प्रौढांच्या वागण्याची, त्यांच्या उत्सवाची व अंत्यसंस्काराची नक्कल होती. अनुकरण करण्याच्या मुलांच्या नैसर्गिक कलेमुळे त्यांना वळण लावण्यात पालकांनी घालून दिलेल्या उदाहरणाचा फार मोठा वाटा असतो.

२२. पालकांच्या वागण्याचा मुलांवर काय परिणाम होतो?

२२ तुमचे मूल जन्मापासून तुमच्याकडून शिकत असते. तुम्ही जे बोलता त्यापासूनच नव्हे तर तुम्ही ते कसे म्हणता, म्हणजे बाळाशी, सहचाराशी व इतरांशी तुम्ही केवढ्या आवाजात बोलता, त्यातूनही ते शिकते. पालक एकमेकांशी, कुटुंबातील इतरांशी व पाहुण्यांसोबत कसे वागतात याकडे त्याचे लक्ष असते. चालायला, मोजायला वा मुळाक्षरे शिकण्यापेक्षा या बाबतीतील तुमच्या उदाहरणाने अत्यंत महत्त्वाचे धडे मुलाला मिळतात. यामुळे जगण्याचा निर्भेळ आनंद देणाऱ्‍या ज्ञानाचा व बुद्धीचा पाया घातला जातो. लिहिण्यावाचण्या इतपत मोठे झाल्यावर, त्या उदारहणामुळे मूल नीतीमूल्याची शिकवण तत्परतेने ग्रहण करते.

२३, २४. पालकांना त्याच्या मुलांनी ठराविक मूल्ये आत्मसात करावीशी वाटत असतील तर त्यांनी स्वतः काय केले पाहिजे?

२३ “देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा आणि . . . तुम्हीही प्रीतीने चाला,” असा प्रेषित ख्रिस्ती जनास कळकळीचा उपदेश करतो. त्याच्या आधीच, देवाचे अनुकरण म्हणजे काय ते त्याने दाखविले: “सर्व प्रकारची कटुता, संताप, क्रोध, आक्रस्ताळेपणा व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्याठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.” (इफिसकर ४:३१, ३२; ५:१, २) मोठ्याने तावातावाने बोलणे, रडकी गाऱ्‍हाणी, उद्धट वर्तन, उग्र संताप या सारखे चिडकेपणाचे धडे लहान मुलाने ऐकलेले व पाहिलेले असतील तर त्याच्या मनावर पडलेला ठसा पुसणे अत्यंत कठीण असते. जर तुम्ही दयाळू व इतरांचा विचार करणारे असाल, जर तुमची नैतिक मूल्ये उच्च व तत्त्वे चांगली असली तर तुमचे मूल या सर्वात तुमचे अनुकरण करील. तुमच्या मुलांनी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही वागा; मुलांनी जसे असावेसे तुम्हाला वाटते तसे स्वतः व्हा.

२४ पालकांनी दुटप्पी वर्तन, एक उपदेशासाठी आणि दुसरे आचरणासाठी, मुलांसाठी एक व स्वतःसाठी दुसरे, करू नये. तुम्ही स्वतः खोटे बोलत असाल तर मुलांना खरे बोलावयास सांगण्यात काय हाशिल? त्यांना दिलेली अभिवचने पूर्ण केली नाहीत तर, ते अभिवचनानुरुप राहतील अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता? पालकांनी एकमेकांचा आदर केला नाही तर मुलांनी आदर शिकावा असे ते कोणत्या तोंडाने म्हणणार? पालकांच्या वागण्यात नम्रता मुलाला दिसली नाही तर त्याच्या मूल्यात नम्रतेचा समावेश कसा होईल? पालकांचे सर्वच नेहमी योग्य असते अशी कल्पना करून दिल्यास, सदोष स्वभावामुळे पालकांच्या चुका झाल्या तरी मुलाला त्या गोष्टी योग्य आहेत असेच वाटण्याचा धोका असतो. बोलावयाचे पण तसे न वागणे म्हणजे दांभिक परुशांसारखेच होय. त्यांच्या बाबतीत येशू म्हणाला: “ते जे काही तुम्हास सांगतील ते आचरीत व पाळीत जा पण त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका. कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत.” तेव्हा पालकांनो, तुम्हाला घरात धाकटे परूशी नको असतील तर मोठे परुशी होऊ नका!—मत्तय २३:३.

२५. मुलांना प्रीतीबद्दल कसे शिकवले पाहिजे?

२५ पाहिल्यामुळे मुले प्रथम प्रीतीबद्दल शिकतात व प्रेम मिळाल्यामुळे देण्यास शिकतात. प्रीती विकत घेता येत नाही. पालक मुलांवर भेटीचा वर्षाव करू शकतील. पण प्रीती ही खिशाची नव्हे तर हृदयाची गोष्ट, आध्यात्मिक विषय, आहे. खऱ्‍या प्रेमाची जागा भेट वस्तू कधीही घेऊ शकणार नाहीत. प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्याची किंमतच कमी होते. भेटवस्तूपेक्षा तुमचा वेळ, तुमचे बळ, तुमचे प्रेम द्या. तुम्हालाही तेच परत मिळेल. (लूक ६:३८) देवासाठीच्या आपल्या प्रेमाबद्दल, १ योहान ४:१९ मध्ये म्हटल्याप्रमाणे “पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो.”

२६, २७. मुलांना दानातील आनंद कसा शिकवता येईल?

२६ प्रथम मिळाल्यामुळे मुले देण्यास शिकतात. देण्यातला, सहभागी होण्यातला, सेवेतला आनंद त्यांना शिकवता येतो. तुम्हाला, इतर मुलांना, इतर प्रौढ लोकांना देण्यातला—दानातला—आनंद पाहण्यास त्यांना शिकवा. मुलांनी प्रौढांना वस्तू देण्यापेक्षा त्या मुलाजवळ राहाव्या अशी अनेकांची चुकीची कल्पना असते. एक गृहस्थ म्हणाले:

 “एखाद्या मुलाने त्याच्या खाऊमधून थोडा मला दिल्यास मी तो नाकारीत असे. त्याला आवडणारी वस्तू न घेण्याने मी दया दाखवीत आहे असे मला वाटत असे. सगळा खाऊ त्याच्याजवळ राहिल्याने त्याला आनंद व्हावा अशी माझी कल्पना होती, पण तसे झाले नाही. तेव्हा माझ्या लक्षात आले की मी त्याचे औदार्य, त्याची भेट, आणि त्याचाही धिक्कार करीत होतो. त्यानंतर मात्र देण्यातला आनंद त्याला मिळावा म्हणून अशा भेटी मी नेहमी स्वीकारू लागलो.”

२७ पहिले तीमथ्य ६:१८ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलाने “परोपकारी आणि दानशूर” व्हावे असा एका जोडप्याचा प्रयत्न होता. त्यामुळे पवित्र शास्त्र अध्ययनासाठी सभेला जाताना तिथल्या दानपेटीत टाकण्यासाठी नेलेले पैसे त्याच्या हातून पेटीत टाकत असत. यामुळे आध्यात्मिक गोष्टींना मदत करणे तसेच त्याच्याशी निगडीत भौतिक गरजा पुरवणे हे त्याच्या मनावर ठसवले गेले.

२८, २९. चुकांबद्दल माफी मागण्यास मुलांना कसे शिकवता येईल?

२८ उत्तम आदर्श पुढे ठेवल्यास मुले जशी प्रीती व औदार्य शिकतात तसेच योग्य वेळी माफी मागण्यास शिकतात. एक पालक म्हणाले: “माझी मुलांबाबत जेव्हा चूक होते तेव्हा मी ती कबूल करतो. माझी चूक का झाली हे मी त्यांना थोडक्यात सांगतो. माझ्यातही दोष असतात हे माहीत असल्याने मी समजावून घेईन या जाणीवेने तीही स्वतःची चूक माझ्याजवळ कबूल करतात.” पुढील घटनेवरून या गोष्टीची प्रचिती येते. एकदा एका कुटुंबात एक अपरिचित पाहुणे आलेले असतात. वडील घरातील इतरांशी त्याची ओळख करून देत होते. पाहुणे म्हणाले:

“सर्व उपस्थितांची ओळख करुन देण्यात आली आणि इतक्यात एक लहानसा मुलगा खोलीत हसत आला. वडील म्हणाले, ‘शर्टावर आमरस सांडून घेतलेले, हे आमचे शेंडेफळ.’ त्या मुलाचे हास्य पार लोपले आणि त्याच्या चेहऱ्‍यावर दुःख उमटले. संकोचामुळे रडू कोसळणार असे दिसताच वडिलांनी मुलाला आपल्याजवळ ओढून म्हटले, ‘चुकले माझे, मी असे म्हणायला नको होते.’ एक हुंदका देऊन मुलगा खोलीतून पळाला. पण दोन मिनिटात स्वच्छ शर्ट घालून स्वारी हसत परत आली.”

२९ अशा नम्रतेने प्रेमाचे बंधन नक्कीच अधिक दृढ होतात. पुढे, जीवनातील लहान मोठ्या समस्यांकडे कशा दृष्टिकोनातून पाहावे ते मुलाला पालक समजावून सांगू शकतात. क्षुल्लक गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यास, स्वतःचीच गंमत करण्यास, तसेच आपणा बाबतीत इतरांनी परिपूर्णता अपेक्षू नये हे जसे स्वतःला वाटते, तेच इतरांबद्दलही करण्यास मुलांना शिकवता येते.

शाश्‍वत मूल्ये द्या

३०-३२. पालकांनी आपल्या मुलांना शाश्‍वत मूल्ये लहान वयात शिकवणे महत्त्वाचे का आहे?

३० शाश्‍वत मूल्ये कोणती याबद्दल आजकाल अनेक पालक स्वतःच संभ्रमात पडलेले आहेत. यामुळे अनेक मुलांना जीवनमूल्ये शिकविलेली नसतात. आपल्या मुलांना घडविण्याचा हक्क स्वतःला आहे किंवा नाही याबाबतही काही पालक साशंक असतात. जर हे पालकांनी केले नाही तर इतर मुले, शेजारी, चित्रपट व टेलिव्हिजन ते काम करतील. दोन पिढ्यांमधील मतभेद, युवकांचे बंड, अमली पदार्थ, नवनीती, लैंगिक ‘क्रांत्या’, स्वैराचार या सर्वाची पालकांना भिती वाटते. परंतु वस्तुस्थिती अशी असते की हे प्रश्‍न त्याच्या जीवनात उत्पन्‍न होण्याआधीच मुलाच्या व्यक्‍तिमत्वाची खूपच प्रगती झालेली असते.

३१ एका विज्ञान पत्रिकेत दिलेल्या संशोधनाच्या माहितीमध्ये म्हटले आहे की, “शाळेत जाण्यापूर्वीच माणसाचे व्यक्‍तिमत्व बव्हंशी निश्‍चित झालेले असते. शाळेत जाण्यापूर्वीच्या मुलांच्या मनावर परिणाम करता येतो व त्याची मते घडविता येतात हे सर्वांनाच माहीत असते. तरीही आम्हाला संशोधनानंतर असे आढळून आले आहे की बालपणी त्यांना आलेल्या अनुभवांमुळे बनलेला स्वभाव बदलणे कठीण असते किंवा काही वेळा मुळीच बदलता येत नाही.”

३२ स्वभावातील दोष सुधारता येतात. पण महत्त्वाची वर्षे हातून जाऊ दिली तर काय होते हे दुसऱ्‍या संशोधकाने सांगितले: “पहिली सात वर्षे मूल घडविण्याजोगे असते. त्यानंतर जितके जास्त थांबाल तेवढी त्याच्या भोवतालची परिस्थिती बदलावी लागेल. प्रत्येक वर्षाबरोबर बदलाची शक्यता कमी कमी होत जाते.”

३३. मुलांना कोणत्या अत्यंत महत्त्वाच्या कल्पना शिकवल्या पाहिजेत?

३३ लहान मुलांना अनेक मूलभूत कल्पना शिकाव्या लागतात पण त्यातही काय सत्य आणि काय असत्य, काय बरोबर आणि काय चूक या सर्वात महत्त्वाच्या असतात. इफिसमधील ख्रिस्ती बांधवाना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलाने त्यांना, अचूक ज्ञान मिळविण्याविषयी कळकळीची विनंती केली. तो म्हणाला: “यापुढे आपण बाळासारखे होऊ नये म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्‍या युक्‍तिने, प्रत्येक शिकवणरुपी वाऱ्‍याने हेलावणारे व फिरणारे असे होऊ नये. तर आपण प्रीतीने सत्याला धरून, मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे.” (इफिसकर ४:१३-१५) सत्य आणि सचोटी, चांगले व हितकर अशाबद्दलची आवड मुलामध्ये निर्माण करण्यात पालक तत्पर राहिले नाहीत तर चुका व अयोग्य मार्गांना तोंड देण्यात मुले हतबल ठरतील. पालकांना जवळ-जवळ लक्षात येण्याआधी मुलाची पहिली ४-५ वर्षे उडून जातात ती अशी निसटून जाऊ देऊ नका. ही सुरुवातीची अत्यंत महत्त्वाची वर्षे तुमच्या मुलाला योग्य मूल्ये शिकवण्यास वापरा. तुम्ही भविष्यातली काळजी व डोकेदुखी वाचवाल.—नीतीसूत्रे २९:१५, १७.

३४. स्थिर शाश्‍वत मूल्ये का महत्त्वाची असतात, आणि त्याचा मूळ उगम कोठे आहे?

३४ प्रेरित प्रेषित म्हणतो, “ह्‍या जगाचे बाह्‍य स्वरुप लयास जात आहे.” भौतिक भावनिक व नीतीमूल्याच्या बाबतीत ते सार्थ आहे. (१ करिंथकर ७:३१) जगात स्थैर्य फारसे नाहीच. शेवटी तीही माणसेच असल्याने ते एखादेवेळी अयशस्वी होतील याची पालकांनीही जाणीव ठेवली पाहिजे. त्यांना आपल्या मुलांच्या भल्याची कळकळ असेल व त्यांच्या भवितव्याची काळजी असेल तर पालकांनी मुलांना शाश्‍वत मूल्ये दाखवून दिली पाहिजेत. कोणत्याही प्रश्‍नासाठी वा कोणत्याही समस्येला देव वचनात, पवित्र शास्त्रात, खात्रीचे व उपयुक्‍त उत्तर मिळेल असे मुलांच्या मनावर बालपणापासून ठसविले पाहिजे. जीवन कितीही गूढ व गोंधळात टाकणारी परिस्थिती आली तरीही देववचन त्याच्या “पावलाकरिता दिव्यासारखे व . . . मार्गावर प्रकाशासारखे” होईल.—स्तोत्रसंहिता ११९:१०५.

३५. आपल्या मुलांना वळण लावणे किती महत्त्वाचे आहे?

३५ होय, त्यांना जीवनात सदैव आधार देणारी मूल्ये मुलात जोपासण्याची ही सुवर्ण संधी आहे. कोणतेही काम मुलांना वळण लावण्याइतके मोठे वा महत्त्वाचे नाही. त्यांच्या जन्मापासून, बालवयात सुरवात केली पाहिजे!

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११७ पानांवरील चित्रं]

शिकण्याच्या कलेस एक सुखावह अनुभव बनवणे