वृद्धापकाळाची वर्षे
अध्याय १३
वृद्धापकाळाची वर्षे
१, २. (अ) मुले मोठी होऊन स्वतंत्र झाल्यावर कोणत्या समस्या उद्भवतात? (ब) वाढत्या वयाच्या प्रश्नांना काही लोक कशा रितीने तोंड देण्याचा प्रयत्न करतात?
आपल्या जीवनात शारीरिक वा बौद्धिक कार्य नसल्यास आपल्याला कंटाळवाणे होते. जीवन निरर्थक वाटते व आपण अस्वस्थ होतो. विवाहित व्यर्क्तिपुढे मुले मोठी होऊन घरातून बाहेर पडली की ही समस्या उपस्थित होते. कारण त्यांच्या जीवनाची त्या आधीची अनेक वर्षे पालकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात गेलेली असतात, आणि मग ती जबाबदारी व त्या अनुषंगाने येणारी कामे एकाएकी संपुष्टात येतात.
२ त्याशिवाय वयोमानापरत्वे शारीरिक बदलही घडून येतात. त्वचेवर सुरकुत्या पडतात, केस पांढरे होऊ लागतात, टक्कल पडू लागते व आधी कधीही न अनुभवलेली दुखणी खुपणी सुरु होतात. थोडक्यात, आपण म्हातारे होऊ लागतो. ही वस्तुस्थिती नाकारुन काही लोक आपण अजूनही तरूण असल्याचा देखावा करण्याची जिवापाड धडपड करतात. कधी नव्हे त्या सामाजिक घडामोडीत त्या व्यक्ती भाग घेऊ लागतात—समारंभांना आवर्जून हजेरी लावतात, खेळात जबरदस्त रस घेतात. या हालचालींच्या गडबडीत काहीतरी काम करावयास मिळते, पण त्यात संपूर्ण समाधान मिळते का? इतरांना आपण खरोखर हवे आहोत अशी भावना त्या व्यक्तिठायी निर्माण होईल का?
३. खेळ-करमणूक आनंददायक असली तरी काय टाळले पाहिजे?
३ खेळातून मनोरंजन जरूर होते आणि मुले लहान असताना तुम्ही ज्या गोष्टी करु शकला नाही, त्यातील काही गोष्टी करण्यास आपल्या उतार आयुष्यात सवड असल्याचे तुमच्या ध्यानी येईल. पण वैयक्तिक मौजमजेमागे लागल्यास गंभीर समस्या उद्भवण्याचा संभव असतो.—२ तीमथ्य ३:४, ५; लूक ८:४-८, १४.
विश्वासूपणाची महत्ता
४, ५. आपण विरुद्ध लिंगाच्या व्यर्क्तिना अजूनही आकर्षक वाटतो असे सिद्ध करण्याच्या प्रौढांच्या धडपडीचा काय परिणाम होऊ शकतो?
४ या वयातही अनेक शौकीनांना आपण विरुद्धलिंगाना अजूनही आकर्षक वाटतो हे सिद्ध करण्याची निकड भासते. सार्वजनिक समारंभात वा इतरत्र आपला वैवाहिक साथी सोडून इतर कोणाबरोबर ते प्रणय-चेष्टा करु लागतात. विशेषतः पुरुष, वयाने लहान असणाऱ्या स्त्रिया वा मुलींशी “संबंध” ठेवतात. शिवाय, सध्याच्या “नवीन नीतीच्या” दिवसात अनेक स्त्रियाही विवाहाबाहेर “संबंधांनी” स्वतःच्या मनाला दिलासा शोधतात. अनेक वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर काहींना नवीन जीवनसाथी घेऊन “नवीन जीवन” जगावेसे वाटू लागते. आपल्या वैवाहिक सोबत्याच्या चुकांकडे बोट दाखवून ते आपल्या वागण्याचे समर्थन करतात. परंतु स्वतःच्या चुका, योग्य नीतीमूल्याचा अभाव व आपल्या वैवाहिक साथीदाराचा विश्वासघात ही हंशावारी नेतात.
५ “जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या (पोर्निआ: गंभीर लैंगिक अनीती) कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो,” असे येशूने म्हटलेले त्यांना माहीत असेल. “कोणत्याही कारणाने” आपली बायको टाकणे योग्य नव्हे असे जरी येशू येथे सांगत असला तरी धर्मातील कायद्याच्या आधारे मिळेल त्या कारणाने ते घटस्फोट घेत असतात. (मत्तय १९:३-९) मग ते दुसरा सोबती गाठतात, जो बहुधा पहिला घटस्फोट घेण्याआधीच नव्या संबंधाने मिळवलेला असतो. पवित्र शास्त्रात देवाने अशा वागणुकीबद्दल काय म्हटले आहे हे जाणूनही, देव दयाळू असल्याने तो “समजून घेईल” असे समर्थन करतात.
६. वैवाहिक बंधनाच्या अवमानाकडे पाहण्याचा यहोवा देवाचा दृष्टिकोन काय आहे?
६ अशा अनैतिक विचारांचा मोह टाळण्यासाठी, यहोवा देवाने संदेष्टा मलाखीमार्फत इस्राएल लोकांना काय म्हटले ते विचारात घेऊ या: “आसवे गाळणे, रडणे व उसासे टाकणे यांनी यहोवाच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञार्पणाकडे [मान्यतेसह] ढुंकून पहात नाही, तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही. तुम्ही म्हणता, असे का? कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातील स्त्रीच्यामध्ये यहोवा साक्षी आहे. ती तुझी सहकारिणी व तुझी कराराची पत्नी असून तू तिजबरोबर विश्वासघाताने वर्तला आहेस; . . . याकरता आपल्या आत्म्याला जपावे व आपल्या तरुणपणीच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करु नये. यहोवा, इस्राएलाचा देव म्हणतो मला सूटपत्राचा तिटकारा आहे.” (मलाखी २:१३-१६) होय, आपल्या वैवाहिक सोबत्याचा विश्वासघात व विवाह-बंधनाचा अवमान यांचा यहोवा देव धिक्कार करतो अशा गोष्टीमुळे जीवनदात्यासोबत असलेले आपले संबंध दुरावतात.
७. वैवाहिक बंधनांना तुच्छ लेखल्याने सुख का मिळत नाही?
७ अशा गोष्टी अधिक चांगल्या जीवनाची सुरुवात करतात का? नाही. अशा लोकांनी केलेल्या दुसऱ्या विवाहाचा पायाही डळमळीतच असतो कारण इतक्या मूल्यवान संबंधाच्या बाबतीत ते बेजबाबदारीने वागले हेच त्यांनी दाखवलेले असते. आधीच्या वैवाहिक सोबत्यापेक्षा नवीन सोबत्यात त्यांना अधिक आकर्षक असे काही दिसलेही असेल. पण ते स्वतःच्या मौजेखातर मिळवण्यासाठी त्यांनी दुसऱ्याला होणाऱ्या दुःखाची पर्वा केलेली नसते. असा हा गुण वैवाहिक सौख्याला मुळीच पूरक नाही.
८. विवाह बंधनात शारीरिक सौंदर्यापेक्षा अधिक मोलाचे काय आहे?
८ आपल्या वैवाहिक सोबत्याशी एकनिष्ठ रहाण्यातील चांगुलपणा शारीरिक सौंदर्यापेक्षा कितीतरी अधिक चांगला आहे. शारीरिक सौंदर्य कालप्रवाहाबरोबर कमी होत जाते. परंतु एकनिष्ठ प्रीतीची शोभा जाणाऱ्या प्रत्येक वर्षाबरोबर वाढत जाते. दुसऱ्या व्यक्तिच्या सुखासाठी झटणे, स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या हिताचे जतन करणे यामुळे अक्षय समाधान मिळते, कारण खरोखरच “घेण्यापेक्षा देण्यात जास्त धन्यता आहे.” (प्रे. कृत्ये २०:३५) दोन व्यक्तींच्या विवाहाला अनेक वर्षे झाली असतील. चांगले दळणवळण राखून त्यांनी एकमेकांचा विश्वास संपादन केला असेल; तसेच जीवनातील कार्ये, ध्येय, आशा-आकांक्षा यात एकमेकांना सहकार्य दिले असेल व तेही प्रीतीने—तर त्यांची जीवने खरोखरच एकवटलेली, एकरुप झालेली असतील. त्यांच्यात मानसिक, भावनिक व आध्यात्मिक साधर्म्य आहे. विवाहाआधी एकमेकांचे अवगुण दिसू न देणारी आंधळी प्रीती जाऊन खरी हृदयाच्या गाभ्यातून उद्भवणारी निष्ठा उत्पन्न होते. त्यामुळे दुसऱ्यांच्या उणीवा व दोष दिसूनही ती एकमेकाला मदत करण्याची संधी बनतात. त्या दोघात खरा विश्वास असतो. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी एकमेकांचा आधार मिळण्याच्या खात्रीमुळे सुरक्षिततेची भावना असते. एकमेकांशी एकनिष्ठ असणे त्यांना स्वाभाविकच वाटते. मीखा ६:८ मध्ये म्हटल्याप्रमाणे: “हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यावाचून यहोवा तुजजवळ काय मागतो?”
प्रौढ मुले—एक नवीन नाते
९-११. (अ) पालक व मुलांचे नाते जीवनात कधीही बदलू नये असा यहोवा देवाचा हेतू आहे काय? (ब) पालकांनी मुलांना देण्याच्या सल्ल्याशी याचा कसा संबंध येतो? (क) आपल्या मुलांची लग्ने झाल्यावर पालकांनी कोणत्या अधिकाराला मान द्यावा?
९ पती-पत्नी यांनी आमरण एकत्र राहिले पाहिजे. परंतु देवाने मुलांचा व पालकांचा असा संबंध असावा अशी व्यवस्था केलेली नाही. लहानाची मोठी होत असताना मुलांना दररोज तुमची गरज होती हे खरे. शारीरिक गरजाच नव्हे तर मार्गदर्शनाचीही जरूर होती. काही गोष्टीत त्यांनी प्रतिसाद व्यक्त केला नव्हता तरी तुम्ही त्यांच्या भल्यासाठी त्या करावयाला लावल्या असतील. पण त्यांनी स्वतःचे घर-दार केल्यावर तुमचे व त्यांचे संबंध काहीसे बदलतात. (उत्पत्ती २:२४) तुमची त्यांच्याविषयीची भावनाही त्यामुळे बदलते असा याचा अर्थ नव्हे. परंतु जबाबदाऱ्या मात्र बदलतात. याकरता ज्या गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी करू इच्छिता त्या कशा करता यातही बदल होण्यास हवा.
१० त्यांना अजूनही कधीकधी सल्ल्याची गरज भासेल व अधिक अनुभव घेतलेल्या पालकांचा योग्य सल्ला मानण्यात त्यांचा शहाणपणाच दिसून येईल. (नीतीसूत्रे १२:१५; २३:२२) परंतु स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या मुलाला वा मुलीला सल्ला देताना शेवटी निर्णय तीच घेणार याची जाणीव आपणाला आहे हे व्यक्त करणे शहाणपणाचे होईल.
११ त्यांचे लग्न झालेले असल्यास वरील गोष्टीला अधिक महत्त्व येते. काही देशात सुनेने सासूच्या अधिकारात राहण्याची पुरातन पद्धत आहे. इतरत्र सासू-सासऱ्यांचे घरात अधिक वजन असते. परंतु त्यामुळे सौख्य मिळते का? आपल्या निर्मात्याला सर्वात चांगले कळते. तो म्हणतो: “पुरुष आपल्या आई-वडिलास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील.” (उत्पत्ती २:२४) सर्व निर्णयांची जबाबदारी पतीच्या वा पत्नीच्या पालकांची नसून पतीवर असते. देवाचे वचन म्हणते: “जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे.” (इफिसकर ५:२३) या व्यवस्थेचा आदर ठेवल्यास आपल्या प्रौढ मुलांसाठी वा नातवंडासाठी केलेल्या कामातील आनंद वृद्धींगत होतो.
इतरांसाठी कामे करण्यात आनंद माना
१२. (अ) मुलांनी आपापली घरे थाटल्यावर पालकांना एकमेकांबद्दलचा आदर कसा वृद्धींगत करता येईल? (ब) आपले जीवन अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी ते आणखी काय करू शकतील?
१२ आपले जीवन उपयोगी, अर्थपूर्ण आहे अशी जाणीव सर्वांनाच असावीशी वाटते. ती गरज भागवणे आपल्याच कल्याणाचे असते. तुमच्या मुलांव्यतिरिक्त इतर अनेकांना तुम्ही तशी मदत करु शकता. तुमच्या स्वतःच्या वैवाहिक सोबत्याबद्दल काय? तुमची मुले मोठी होत असताना तुमचे लक्ष अधिक त्यांच्याकडेच होते. पण आता तुम्ही एकमेकांसाठी बऱ्याच गोष्टी करु शकता, यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होते. परंतु तुमचा चांगुलपणा आपल्या कुटुंबापुरताच मर्यादित का ठेवावा? आजारी पडलेल्या शेजाऱ्यांना मदत करून, एकाकी पडलेल्या वृद्धांबरोबर थोडा वेळ घालवून अथवा नैसर्गिक वा प्रासंगिक आपत्तीमुळे विपन्न झालेल्या लोकांना आर्थिक मदत देऊन तुम्ही आपले क्षेत्र ‘विस्तारू’ शकता. (२ करिंथकर ६:११, १२) विधवांसाठी “सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर” असल्यामुळे अपरिमित प्रीती संपादन केलेल्या दुर्कसचा उल्लेख पवित्र शास्त्र करते. (प्रे. कृत्ये ९:३६, ३९) दुःखी लोकांवर दया करणाऱ्यांची ते प्रशंसा करते. (नीतीसूत्रे १४:२१) देवाला पसंत असलेल्या भक्तीमध्ये “अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार” घेण्याचाही समावेश आहे. (याकोब १:२७) तसेच “चांगले करण्यास व दान करण्यास विसरु नका. अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो” असेही पवित्र शास्त्र सांगते.—इब्रीयांस १३:१६.
१३. इतरांना मदत करण्यामागे कोणता हेतू असल्यास त्यात आनंद वाटतो?
१३ मानवजातीच्या हिताच्या कार्यात मग्न होणे ही सुखाची गुरुकिल्ली आहे का? प्रत्यक्षात त्यामागे आध्यात्मिक हेतू नसेल, जसे की, प्रीती करण्यात देवाचे अनुकरण करण्याची तीव्र इच्छा, तर त्यामुळे वैफल्य निर्माण होईल. (१ करिंथकर १३:३; इफिसकर ५:१, २) ते का? कारण तुमच्या सौजन्याविषयी इतरांनी बेफिकिरी दाखविल्यामुळे किंवा तुमच्या औदार्याचा इतरांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे निराशा पदरी पडण्याची शक्यता असते.
१४, १५. जीवन खऱ्या अर्थाने आनंदी व समाधानपूर्ण कशाने होते?
१४ या उलट, एखाद्या व्यक्तिने आपले जीवन देवाच्या सेवेस खरोखर वाहिले असल्यास आपल्या कार्याने देवास संतोष झाल्याचे जाणल्यामुळे त्याला सर्वाधिक समाधान मिळते. तसेच केवळ आर्थिक परिस्थितीपुरतीच इतरांना मदत करण्याची त्याची कुवत राहात नाही. त्याच्यापाशी “धन्यवादित [यहोवा] देवाच्या गौरवाची सुवार्ता” तसेच तिजमध्ये इतरांना सामील करुन घेण्याचे सद्भाग्य आहे. (१ तीमथ्य १:११) पवित्र शास्त्रातून, वर्तमान समस्या कशा हाताळाव्यात ते व भविष्याविषयी देवाने दिलेली आशा त्याला कळते. अशी ही सुवार्ता इतरांना सांगण्यात व तिचा मूळ आधार यहोवा देव याजकडे त्यांचे लक्ष वेधण्यात केवढा आनंद आहे! स्तोत्रसंहिता १४७:१ मध्ये म्हटल्याप्रमाणे: “यहोवाचे स्तवन करा. कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे मनोरम आहे आणि स्तोत्रे गाणे शुभच आहे.”
१५ जेव्हा आपल्या जीवनाबाबतच्या इच्छेचे आकलन होईल व आपण त्याचा सन्मान करु तेव्हाच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. (प्रकटीकरण ४:११) आपल्या परिस्थितीनुसार शक्य असेल तेव्हा पवित्र शास्त्रातील सत्ये आपण इतरांना माहिती करून दिली तर खरे समाधान मिळेल. तुमची मुले प्रौढ झालेली असली तरी ‘आध्यात्मिक मुलांच्या’ वाढीस हातभार लावण्यातील आनंद तुम्हाला मिळेल. अशा रितीने ज्यांना त्याने मदत केली अशांना लिहिताना प्रेषित पौलाला वाटले तसेच तुम्हालाही वाटेल: “आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? . . . तुम्हीच आहा ना? कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहा.”—१ थेस्सलनीकाकर २:१९, २०.
परिस्थितीप्रमाणे बदल करण्यात लवचीक असा
१६, १७. (अ) समस्या उत्पन्न झाल्यास काय टाळावे? (ब) आपला जीवन साथी मृत झाल्यास एकट्याने आव्हानास तोंड देण्यात कोणाची मदत होते?
१६ आपण आधी करीत होतो तेवढे आता आपल्याने करवत नाही असे हळू हळू आपल्या ध्यानात येते. त्यांनी परिस्थितीशी जुळवून व जरुर ते बदल करुन घेतले पाहिजे. शारीरिक स्वास्थाच्या तक्रारी असतील तर त्यांच्याकडे लक्ष पुरविले पाहिजे. परंतु जीवनातील रोजच्या घडामोडीकडे दुर्लक्ष होण्याइतके त्यात तुम्ही बुडून जाता कामा नये म्हणून समतोल असावे. समस्या असणारच. त्या सोडवण्याच्या दृष्टीने पावले टाकता येत असतील तर तसे करणे उत्तम. पण काळजी करुन काहीही साधत नाही. परिस्थिती वेगळी असावयास हवी होती अशी इच्छा केल्याने ती बदलत नाही. त्यामुळे भूतकाळासारखा विचार करण्यापेक्षा वर्तमानातील संधीचा फायदा घ्या.
१७ तसेच वृद्धापकाळात तुम्ही एकटे उरलात तरी हीच गोष्ट ध्यानी ठेवा. तुमचे वैवाहिक जीवन सुखाचे झाले असेल तर तुम्ही त्याच्या सुखद आठवणी बाळगाल. पण काळ कोणासाठी थांबत नाही, आणि म्हणूनच प्रत्येकाने काळाशी जुळवून घेतले पाहिजे. जीवनात नवनवी आव्हाने येतच असतात. तुमचा देवावर विश्वास आहे अशा निर्धाराने जगाल तर त्या आव्हानांना तोंड देताना तुम्हाला त्याचीही साथ मिळेल.—स्तोत्रसंहिता ३७:२५; नीतीसूत्रे ३:५, ६.
१८-२०. वृद्धापकाळात कोणत्या गोष्टीमुळे जीवन अर्थपूर्ण होईल?
१८ जीवनात क्लेशकारक गोष्टी असल्या तरीही आनंददायक गोष्टीही बऱ्याच असतात. उदाहरणार्थ—चांगले मित्र, इतरांच्या उपयोगी पडण्याच्या संधी, भोजनाचा आस्वाद, सुंदर सूर्यास्त, पक्षांची किलबिल अशा असंख्य गोष्टी आहेत. शिवाय आपली प्राप्त परिस्थिती जरी उत्तम नसली तरी दुष्टाई, दुःख, काळजी, रोग व मृत्यू पासून मानवजातीची सुटका करण्याविषयीचे देवाचे आपल्याला आश्वासन आहे.—प्रकटीकरण २१:४.
१९ आयुष्यात धन-संपत्ती, प्रतिष्ठा इत्यादी ऐहिक गोष्टींवर भर देणाऱ्यांना वृद्धापकाळ कदाचित निरस वाटेल. अशा जीवनाबाबत उपदेशकाचा लेखक म्हणतो: “जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थच आहे.” (उपदेशक १२:८) परंतु अब्राहाम, इसहाक या सारख्या विश्वासू लोकांबाबत पवित्र शास्त्र म्हणते की ते “पुऱ्या वयाचे व चांगले म्हातारे होऊन (संतुष्ट होऊन) वारले.” (उत्पत्ती २५:८; ३५:२९) हा फरक कशामुळे झाला? कारण त्यांचा देवावर विश्वास होता. देवाला योग्य वाटेल त्या समयी मृत जिवंत होतील याविषयी त्यांना खात्री होती. भविष्यकाळात सर्व मानवजातीवर, देव स्थापन करणाऱ्या नीतिमान सरकारावर त्यांनी डोळे लाविले होते.—इब्रीयांस ११:१०, १९.
२० तुम्हीही प्राप्त परिस्थितीत वर्तमानातील समस्या हाताळण्यात सभोवतालच्या चांगल्या गोष्टी, तसेच देवाने राखून ठेवलेल्या उज्ज्वल भवितव्याचा स्वतःस विसर पडू देऊ नका म्हणजे तुमचे जीवन अर्थपूर्ण होईलच, शिवाय वृद्धापकाळीही प्रत्येक दिवशी तुम्हाला समाधान लाभेल.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१७६ पानांवरील चित्रं]
दोन मनांचे मिलन एकजीवपणा वाढवतो