व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ती पवित्र शास्त्राची स्पष्ट शिकवण आहे का?

ती पवित्र शास्त्राची स्पष्ट शिकवण आहे का?

ती पवित्र शास्त्राची स्पष्ट शिकवण आहे का?

त्रैक्यत्व खरे आहे तर मग ते पवित्र शास्त्रात स्पष्टपणे व सुसंगतपणे दिसले पाहिजे. ते का बरे? कारण प्रेषितांनी पुष्टी दिली त्याप्रमाणे पवित्र शास्त्र हे देवाने मानवजातीला पुरविलेले स्वतःचे प्रकटीकरण आहे. वस्तुतः आपल्याला देवाला संतोषविणारी भक्‍ती करावयाची असल्यामुळे देवाची माहिती असण्याची गरज आहे, तेव्हा तो कोण आहे हे पवित्र शास्त्राने आपल्याला स्पष्टपणे सांगितलेच पाहिजे.

पहिल्या शतकातील विश्‍वासधारकांनी शास्त्रवचने ही देवाकडील खऱ्‍या प्रकारातील प्रकटीकरण आहे असे मानले. पवित्र शास्त्र त्यांच्या विश्‍वासाचा मूळाधार, शेवटचा पर्याय असे होते. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने बिरुया शहरातील लोकांना प्रचार केला तेव्हा “त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.”—प्रे. कृत्ये १७:१०, ११.

त्या काळी देवाच्या ख्यातनाम माणसांनी कशाचा अधिकार म्हणून वापर केला होता? प्रे. कृत्ये १७:२, ३ आम्हास सांगतेः “पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे . . . त्यांच्याबरोबर शास्त्रातून विवाद केला. त्याने शास्त्राचा संदर्भ दाखवून उलगडा करुन . . . प्रतिपादन केले.”

शिक्षणाचा आधार म्हणून येशूने सुद्धा शास्त्रवचनांचा वापर करुन आपले उदाहरण घालून दिले. त्याने वेळोवेळी म्हटले की, “असे लिहिले आहे.” “त्याने . . . संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयींच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.”—मत्तय ४:४, ७; लूक २४:२७.

अशाप्रकारे येशू, पौल व पहिल्या शतकातील विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांनी आपल्या शिक्षणाचा मूलभूत आधार म्हणून पवित्र शास्त्रवचनांचा वापर केला. त्यांना ठाऊक होते की, “सर्व शास्त्रवचने ही ईश्‍वरप्रेरित असून ती सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतीशिक्षण ह्‍यासाठी उपयोगी आहेत; ते यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.”—२ तीमथ्य ३:१६, १७; तसेच १ करिंथकर ४:६; १ थेस्सलनीकाकर २:१३; २ पेत्र १:२०, २१ हे सुद्धा पहा.

पवित्र शास्त्र “सुधारणूक” करु शकते तर मूलभूत शिक्षण असे मानल्या जाणाऱ्‍या त्रैक्याविषयी त्याने स्पष्ट स्वरुपाची माहिती पुरविण्यास हवी. पण वेदांती लोक आणि इतिहासकार ही पवित्र शास्त्राची स्पष्ट शिकवण असल्याचे म्हणतात का?

“त्रैक्य”—पवित्र शास्त्रात?

एक प्रॉटेस्टंट प्रकाशन म्हणतेः “त्रैक्य हा शब्द पवित्र शास्त्रात सापडत नाही. . . . ४थ्या शतकापर्यंत चर्चच्या वेदांतीय शिक्षणात त्याला स्थान नव्हते.” (द इलट्रेटेड बायबल डिक्शनरी) एक कॅथोलिक अधिकार सांगतो की, त्रैक्य “देवाच्या वचनातील थेट व लगेचच मिळणारे [तत्व] नाही.”—न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ.

द कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ आणखी असे म्हणतोः “शास्त्रवचनात अशी एकही संज्ञा नाही की जिच्यामुळे तीन ईश्‍वरी व्यक्‍ती एक असल्याचे संबोधता येते. τριας [त्रिआस] हा शब्द (ज्याचा अनुवाद नंतर लॅटिनमध्ये त्रिनिटास असा करण्यात आला) प्रथमतः अंत्युखियाच्या थिऑफिलसच्या सुमारे इ. स. १८० मधील लिखाणात आढळतो. . . . यानंतर लवकरच तो त्रिनिटास या लॅटिन रुपात टर्टुलिनच्या लिखाणात दिसतो.”

तथापि, टर्टुलिनने त्रैक्य शिकविले असा पुरावा आढळत नाही. त्रिनिटास—ए थिऑलॉजिकल एन्सायक्लोपिडिआ ऑफ द होली त्रिनिटी हे कॅथोलिक प्रकाशन सांगते की, टर्टुलिनच्या काही शब्दांचा वापर नंतर काहीजणांनी त्रैक्याचे वर्णन करण्यासाठी केला. तरीपण नंतर हा इशारा दिला गेलाः “तथापि, प्रथा आहे म्हणून घाईने निर्णय घेता येणार नाही, कारण त्याने मुळात ते शब्द त्रैक्य वेदांतास अनुलक्षून वापरले नव्हते.”

इब्री शास्त्रवचनांची साक्ष

“त्रैक्य” हा शब्द पवित्र शास्त्रात आढळत नसला तरी त्रैक्य असल्याची निदान कल्पना तरी त्यात स्पष्टरित्या शिकविण्यात आली आहे का? उदाहरणार्थ, इब्री शास्त्रवचने (“जुना करार”) काय प्रकट करतात?

द एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन कबूल करतोः “इब्री पवित्र शास्त्रात त्रैक्याचे तत्व नाही असे आत्ताचे वेदांती एकमताने मान्य करतात.” शिवाय न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ असे म्हणतोः “पवित्र त्रैक्याची शिकवण जु[ना] क[रार] मध्ये नाही.”

याचप्रमाणे, यहुदी प्रामाण्य एडमंड फोर्टमन आपल्या द ट्रियून गॉड या प्रकाशनात कबूल करतातः “जुना करार . . . पिता, पुत्र व पवित्र आत्मा मिळून असणाऱ्‍या त्रैक्य देवाविषयी काहीही सांगत नाही. . . . देवाच्या मस्तकपदी [त्रैक्याचे] अस्तित्व आहे असा कोणी पवित्र लेखकाने संशय धरला होता असा कोणाताही पुरावा आढळत नाही. . . . [जुन्या करारात] व्यक्‍तींचे त्रैक्य असल्याचा काही प्रस्ताव, पडछाया किंवा ‘पडद्याआड लपवलेले चिन्ह’ आढळते का हे पाहणे म्हणजे पवित्र लेखकांच्या शब्दांच्या व लिखाणाच्या हेतूच्या पलिकडे जाणे आहे.”—तिरप्या वळणांचा अक्षरप्रकार आमचा.

इब्री शास्त्रवचनांचे केलेले परिक्षण वरील विवेचनांना पुष्टी देणारे ठरेल. अशाप्रकारे प्रेरित इब्री शास्त्रवचनांच्या खऱ्‍या यादीतील ३९ पुस्तकात त्रैक्याच्या शिकवणीचा स्पष्ट निर्देश कोठेच आढळत नाही.

ग्रीक शास्त्रवचनांची साक्ष

तर आता, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने (“नवा करार”) त्रैक्याविषयी स्पष्टरित्या काही भाष्य करतात का?

द एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन म्हणतोः “नवीन करारात देखील त्रैक्याच्या तत्त्वाविषयी माहिती नाही याबद्दल वेदांती लोक एकमत प्रदर्शित करतात.”

जेसुईट पंथीय फोर्टमन सांगतातः “नवीन कराराचे लेखक . . . त्रैक्याविषयी औपचारिकरित्या वा सिद्धांतरित्या काहीही सांगत नाहीत. एका देवात तीन समान दैवी व्यक्‍ती आहेत असे स्पष्ट शिक्षण ते देत नाहीत. . . . तीन वेगवेगळी दैवी जीवने व कार्ये एकाच देवत्वात सामावलेली आहेत या त्रैक्याच्या शिकवणीचा मागमूस आपल्याला कोठेही आढळत नाही.”

द न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ ब्रिटेनिका निरिक्षितोः “नव्या करारात त्रैकत्व हा शब्द किंवा त्याविषयीचे तत्त्व हे आढळत नाही.”

बर्नहार्ड लोसे त्यांच्या ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ ख्रिश्‍चन डॉक्ट्रीन या पुस्तकात सांगतातः “नव्या कराराबाबत पाहू जाता त्यात त्रैक्याचे खरे तत्त्व सापडू शकत नाही.”

याचप्रमाणे द न्यू इन्टरनॅशनल डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट थिऑलॉजी म्हणतेन[वीन] क[रार] यात त्रैक्याचे प्रगत झालेले तत्त्व आढळत नाही. ‘पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे समान घटकाचे आहेत अशा आशयाची घोषणा पवित्र शास्त्रात नाही’ [असे प्रॉटेस्टंट वेदांती कार्ल बार्थ म्हणाले].”

याले विश्‍वविद्यालयाचे प्राध्यापक ई. वॉशबर्न हॉपकीन यांनीही ही पुष्टी दिलीः “येशू व पौल यांना त्रैक्याचे तत्त्व माहीत नव्हते; . . . त्या तत्त्वाविषयी त्यांनी काहीही सांगितले नाही.”—ओरिजिन ॲण्ड एव्होल्युशन ऑफ रिलिजन.

इतिहासकार आर्थर वैगल यांचे निरिक्षण आहेः “येशू ख्रिस्ताने या घटनेचा कधीही उल्लेख केला नाही, आणि ‘त्रैक्य’ हा शब्द पवित्र शास्त्रात कोठेही आढळत नाही. ही कल्पना चर्चने आमच्या प्रभूच्या मृत्युनंतर तीनशे वर्षांनंतर ग्रहण केली.”—द पॅगानिझम इन आवर ख्रिश्‍चॅनिटि.

अशाप्रकारे इब्री शास्त्रवचनांची ३९ पुस्तके तसेच ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची २७ पुस्तके त्रैक्य तत्त्वाचे कसलेही स्पष्ट शिक्षण देत नाही.

आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी ते शिकवले होते का?

आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी त्रैक्याचे शिक्षण दिले का? इतिहासकार आणि वेदांती यांनी मांडलेली पुढील विवेचने लक्षात घ्याः

“मूळ ख्रिस्ती धर्मात त्रैक्याचे तत्त्व नव्हते; ते नंतर सिद्धांतात अधिक विस्तारितपणे जोडण्यात आले.”—द न्यू इन्टरनॅशनल डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेन्ट थिऑलॉजी.

“आरंभीच्या खिस्तीजनांनी आपल्या विश्‍वासात [त्रैक्याच्या] तत्त्वाचा अवलंब करण्याचा कधीही विचार केला नव्हता. त्यांनी आपली निष्ठा देवपित्याला वाहिली तसेच येशू ख्रिस्त या देवाच्या पुत्राला वाहिली; तसेच त्यांनी पवित्र आत्म्याविषयी ओळख बाळगली होती. . . . पण या तिघांचे मिळून त्रैक्य बनते, ते समसमान आहेत आणि एकातच विलीन आहेत असा त्यांनी कधीच विचार केला नाही.”—द पॅगानिझम इन आवर ख्रिश्‍चॅनिटि.

“आरंभाला ख्रिस्ती विश्‍वास त्रैक्यवादी नव्हता. . . . तसाच तो प्रेषितीय आणि उत्तर-प्रेषितीय युगातही नव्हता, हेच न[वीन] क[रार] आणि आरंभीच्या ख्रिस्ती लिखाणात प्रवर्तित होते.”—एनसायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन ॲण्ड एथिक्स.

“चवथे शतक संपण्याच्या आधीच्या काळापर्यंत ‘एका देवात तीन व्यक्‍ती’ हे तत्त्व स्थापित झाले नव्हते, तसेच ते ख्रिस्ती जीवन आणि विश्‍वासाचा अंगीकार यातही विलीन झाले नव्हते. . . . ॲन्टे-नेसियन फादर्समध्ये अशी ही मानसिक कल्पना किंवा विचारधारा यत्किंचितही उदयास आली नव्हती.”—न्यू कॅथोलिक एनसायक्लोपिडिआ.

ॲन्टे-नेसियन फादर्स यांनी काय शिकविले

ख्रिस्ताच्या जन्मानंतर आरंभाच्या शतकात ॲन्टे-नेसियन फादर्स धर्मशिक्षक होते अशी ओळख रोमन चर्चने दिली आहे. त्यांनी जे शिक्षण दिले ते लक्षात घेणे मनोरंजक आहे.

इ. स. १६५ मध्ये कालवश झालेल्या जस्टीन मार्टीन यांनी मानवीप्रकृतीपूर्वी अस्तित्वात असणाऱ्‍या येशूला निर्माण झालेला देवदूत, “ज्याने सर्व निर्माण केले त्या देवापासून वेगळा” असे संबोधिले. त्यांनी आणखी म्हटले की, येशू हा देवापेक्षा कनिष्ठ होता आणि “निर्माणकर्त्याची त्याच्यासंबंधाने जी इच्छा होती व जे काही करायला त्याने त्याला सांगितले त्या व्यतिरिक्‍त त्याने काहीही केले नाही.”

इ. स. २०० मध्ये निवर्तलेल्या इरेनियस यांनी म्हटले की, मानवीप्रकृतीपूर्वीचा येशू याला देवापेक्षा वेगळे अस्तित्व होते व तो देवापेक्षा कनिष्ठ होता. त्यांनी म्हटले की, “एकच खरा देव,” जो “सर्वांवर आहे आणि ज्याच्याशिवाय इतर कोणीही राहू शकत नाही” त्याच्या बरोबरीचा येशू नव्हता.

इ. स. २१५ च्या सुमाराला निवर्तलेल्या अलेक्झांड्रियाच्या क्लेमेंत यांनी मानवीप्रकृतीपूर्वीच्या येशूला “प्राणी” असे म्हटले पण देवाविषयी, तो “अनिर्मित आणि अविनाशी व एकच खरा देव” असे म्हटले. त्यांनी म्हटले की, पुत्र हा “एकाच सर्वशक्‍तीमान पित्याच्या नंतर आहे” पण त्याच्या बरोबरीचा नाही.

इ. स. २३० मध्ये वारलेल्या टर्टुलिनने देवाच्या सार्वभौमत्वाविषयीचे शिक्षण दिले. त्यांनी प्रतिपादिलेः “पुत्र हा पित्यापेक्षा वेगळा आहे, कारण तो [पिता] श्रेष्ठ आहे. त्यानेच जन्म दिला आहे म्हणून जन्मलेल्यापेक्षा आणि त्यानेच पाठविण्याचे कार्य केले म्हणून जो पाठविण्यात आला त्याच्यापेक्षा वेगळा आहे.” त्यांनी आणखी म्हटलेः “एक असा काळ होता जेव्हा पुत्र नव्हता. . . . सर्व गोष्टींच्या आधी देव एकटाच होता.”

इ. स. २३५ च्या सुमाराला निर्वतलेल्या हिप्पोलायटस यांनी म्हटले की, देव हा “एकच देव, पहिला व एकटाच, सर्वांचा उत्पन्‍नकर्ता आणि प्रभु” आहे, याला “त्याच्या बरोबरीचा कोणीही नव्हता . . . पण तो एक व एकटाच होता; आणि यानेच आपल्या इच्छेने पूर्वी कधी काहीही अस्तित्वात नसता अस्तित्वात आणले” ज्यामध्ये निर्मिण्यात आलेला मनुष्यप्रकृतीपूर्वीचा येशू आहे.

इ. स. २५० च्या सुमाराला वारलेल्या ऑरिजन यांनी म्हटले की, “पिता व पुत्र हे दोन्ही वेगवेगळे आहेत . . . दोन्ही भिन्‍न आहेत,” आणि “पित्याच्या तुलनेत [पुत्र] हा फारच लहान ज्योत आहे.”

ऐतिहासिक पुराव्याचा सारांश लिहिताना अल्वान लॅमसन द चर्च ऑफ द फर्स्ट थ्री सेंच्युरीज प्रकाशनात म्हणतातः “आधुनिक काळात प्रसिद्ध असलेल्या त्रैक्याच्या तत्त्वाला . . . जस्टीन [मारटर] च्या साहित्यात कसलाही थारा मिळत नाही; आणि हेच परिक्षण सर्व ॲन्टे-नेसियन फादर्सच्या विवेचनांविषयी म्हणजे ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर तीन शतकात उद्‌भवलेल्या सर्व ख्रिस्ती लेखकांविषयी सांगता येईल. हे खरे की, त्यांनी पिता, पुत्र आणि . . . पवित्र आत्मा यांच्याविषयी भाष्य केले, पण आजचे त्रैक्याचे भाष्यकर्ते जसे म्हणतात त्याप्रमाणे ते समसमान आहेत किंवा आकड्यांच्या दृष्टीकोनातून म्हणजे तीन मिळून एक आहेत असे त्यांनी म्हटले नाही. त्यांनी दिलेली शिकवण आजच्या शिक्षणाच्या विरुद्ध होती.”

अशाप्रकारे पवित्र शास्त्र आणि इतिहासाने दिलेली साक्ष हे स्पष्ट करते की, त्रैक्य पवित्र शास्त्रीय काळी आणि त्यानंतरच्या कित्येक शतकांमध्ये अपरिचित होते.

[७ पानांवरील चौकट]

“देव-मस्तकपदात [त्रैक्याचे] अस्तित्व असल्याचा थोडाही संशय कोणा पवित्र लेखकाने बाळगला होता असा कोणताच पुरावा नाही.”—द ट्रियून गॉड