व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्रैक्याचे स्पष्टीकरण कसे देण्यात येते?

त्रैक्याचे स्पष्टीकरण कसे देण्यात येते?

त्रैक्याचे स्पष्टीकरण कसे देण्यात येते?

रोमन कॅथोलिक चर्च म्हणतेः “ख्रिस्ती धर्माचे केंद्रीय तत्त्व सूचित करण्यासाठी त्रैक्य हा शब्दप्रयोग वापरण्यात येतो. . . . अशाप्रकारेच अथेनेशियन तत्त्वाला अनुसरुनः ‘पिता हा देव आहे, पुत्र हा देव आहे, आणि पवित्र आत्मा हा देव आहे, तरीपण ते तिघे वेगवेगळे देव नाहीत तर एकच देव आहेत.’ या त्रैक्यात . . . सर्व व्यक्‍ती अनादि आणि समसमान आहेतः सर्वच अनिर्मित आणि सर्व सर्वशक्‍तीमान आहेत.”—द कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ.

या तत्त्वाशी ख्रिस्तीधर्मराज्यातील जवळजवळ सर्व चर्चेस सहमत आहेत. उदाहरणार्थ, ग्रीक सनातनी चर्च सुद्धा त्रैक्याला “ख्रिस्ती धर्मातील मूलभूत तत्त्व” मानून पुढे म्हणतेः “जे ख्रिस्ताचा देव म्हणून स्वीकार करतात तेच ख्रिस्ती आहेत.” आवर ऑर्थोडक्स ख्रिश्‍चन फेथ या पुस्तकात हेच चर्च म्हणतेः “देव त्रैक्य आहे. . . . पिता हा सर्वतोपरि देव आहे. पुत्र हा सर्वतोपरि देव आहे. पवित्र आत्मा हा सर्वतोपरि देव आहे.”

अशाप्रकारे, त्रैक्य म्हणजे “एका देवात वसणाऱ्‍या तीन व्यक्‍ती” असा सर्वसाधारण विचार केला जातो. यातील कोणालाही सुरवात नाही, प्रत्येक जण अनादि काळापासून आहे असे मानले जाते. प्रत्येक जण हा सर्वसमर्थ आहे, यापैकी एकही दुसऱ्‍यापेक्षा श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही असे मानण्यात येते.

अशाप्रकारची विचारधारा अनुसरण्यास कठीण वाटते का? कित्येक प्रामाणिक विश्‍वासधारकांना ते गोंधळाचे, सर्वसाधारण विचारसरणीच्या विरुद्ध आणि अनुभवाशी सदृश्‍य नसणारे वाटते. ते विचारतात की, पिता हा देव आहे, पुत्र हा देव आहे आणि पवित्र आत्मा हा देव तर मग, तीन देव नसून एक देव होणे कसे शक्य आहे?

“मानवी आकलनशक्‍तीच्या पलिकडे”

हा गोंधळ सर्वत्र पसरलेला दिसतो. द एनसायक्लोपिडिआ अमेरिकाना याचे परिक्षण आहे की, त्रैक्याचे तत्त्व हे “मानवी आकलनशक्‍तीच्या पलिकडे” असल्याचे पुष्कळांना वाटते.

त्रैक्याचा स्वीकार करणाऱ्‍या पुष्कळांना असेच वाटते. प्रख्यात फ्रेंच व्यक्‍ती, युजन क्लार्क म्हणतातः “देव एक आहे आणि देव तीन देखील आहेत. असे काही निर्मितीत आपल्याला दिसत नसल्यामुळे हे आपल्याला समजू शकत नाही, मात्र स्विकारावे लागते.” धर्मपुढारी जॉन ओʹकनर म्हणतातः “हे अत्यंत गहन रहस्य आहे हे आपल्याला माहीत आहे, ज्याची समज घडणे दुरास्पात आहे.” तसेच पोप जॉन पॉल २ यांनीही “त्रैक्य-देवाचे अतर्क्य गूढ” याविषयीही भाष्य केले.

याचप्रमाणे ए डिक्शनरी ऑफ रिलिजस नॉलेज हा शब्दकोष म्हणतोः “हे तत्त्व म्हणजे काय, किंवा याचे कसे सविस्तरपणे स्पष्टीकरण देता येईल त्याविषयी त्रैक्यत्ववादी आपसात सहमत होत नाहीत.”

या कारणामुळेच, न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ याने पुढे दिलेले विवेचन का मांडले ते आपल्याला कळू शकेल. तो म्हणतोः “‘त्रैक्याचा प्रचार कसा करावा?’ या प्रश्‍नाचा भडिमार रोमन कॅथोलिक पाठशाळेतील त्रैक्य प्रणाली शिकविणाऱ्‍या शिक्षकांवर अधूनमधून होत राहतो. हा प्रश्‍न जर विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्‍या गोंधळाचा सूचक आहे तर या तत्त्वप्रणालीच्या पुरस्कर्त्यांनाही तो कमी गोंधळाचा नाही हे स्पष्ट आहे.”

या परिक्षणाचे सत्य आपल्याला ग्रंथालयात जाऊन त्रैक्य तत्त्वाला पाठिंबा देणाऱ्‍या पुस्तकांचे परिक्षण करण्याद्वारे कळू शकते. त्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी बरेच लिखाण झाले. तरीपण गोंधळात टाकणाऱ्‍या वेदांतीय संज्ञा आणि विवेचने याच्या खडतर चक्रव्यूहातून बाहेर पडल्यावर देखील संशोधकाचे समाधान होऊ शकत नाही.

याविषयी जेसुईट पंथीय जोसेफ ब्रेकन आपल्या व्हॉट आर दे सेईंग अबाऊट द त्रिनिटी? या पुस्तकात कळवतातः “पाठशाळेच्या शिक्षणक्रमात त्रैक्याविषयीचे शिक्षण मोठ्या प्रयासाने मिळविलेले पाळक त्रैक्याच्या रविवारी सुद्धा लोकांना व्यासपीठावरुन या तत्त्वाचे स्पष्टीकरण देताना गोंधळून जातात. . . . ज्याची समजच योग्यपणे घडली गेली नाही अशाविषयी रटाळपणे भाष्य करुन लोकांना कंटाळवाणे तरी का करावे?” ते असेही म्हणतातः “त्रैक्य हा औपचारिक विश्‍वासाचा भाग झाला, पण याचा दैनंदिन ख्रिस्ती जीवन व उपासना यावर थोडा किंवा यर्त्किचितही [परिणाम] दिसून येत नाही.” इतके असले तरीही हे तत्त्व चर्चेसचे “केंद्रीय तत्त्व” आहे!

कॅथोलिक वेदांतीय हन्स कंग यांनी आपल्या ख्रिश्‍चॅनिटी ॲण्ड द वर्ल्ड रिलिजन्स या पुस्तकात हे विचार मांडले आहेत की, चर्चेसना ख्रिस्तेत्तर लोकांसोबत आपली वाटचाल लक्षवेधक रितीने का ठेवता आली नाही याचे एक कारण त्रैक्याचे तत्त्व आहे. ते म्हणतातः “सुविद्य मुस्लीमांनाही ते कळत नाही. तसेच यहुद्यांना देखील त्रैक्याचे आकलन होऊ शकले नाही. . . . त्रैक्याच्या या तत्त्वामुळे एक देव आणि देवत्वातील तीन व्यक्‍ती यात जो फरक घडविण्यात आला आहे तो मुस्लीमांचे समाधान करीत नाही. सिरियाक, ग्रीक आणि लॅटिनपासून ही जी वेदांतीय संज्ञा उचलण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांना प्रकाशित होण्याऐवजी गोंधळात पडल्याचे वाटते. मुस्लीमांना तो शब्दखेळ वाटतो. . . . देवाचे तादात्म्य व अद्वितीयतेच्या भावनेमध्ये कोणीतरी अशी भर का घालावी की ज्यामुळे ते तादात्म्य व अद्वितीयता कमी दर्जाची होईल किंवा रद्दच होईल?”

“देव गोंधळात टाकणारा नाही”

अशी ही अव्यवस्था माजविणारी तत्त्वप्रणाली कोठून आली? द कॅथोलिक एनसायक्लोपिडिआ असा दावा करतेः “हे तत्त्व इतके गूढ आहे की ते आधीच ईश्‍वरी प्रकटीकरण असे गृहीत धरण्यात आले आहे.” कार्ल रानर व हर्बट वोर्गीमलर आपल्या थिऑलॉजिकल डिक्शनरी मध्ये म्हणतातः “त्रैक्य एक गूढ आहे . . . पूर्णार्थाने . . . , ते उलगड्याशिवाय समजूच शकत नाही, आणि उलगड्यानंतर देखील ते पूर्णतयः सुगम वाटत नाही.”

तथापि, त्रैक्य हे गोंधळात टाकणारे एक गूढ आहे म्हणून ते ईश्‍वरी प्रकटीकरणाद्वारे आले असावे हे मतप्रतिपादन आणखी एक समस्या निर्माण करते. ती का बरे? कारण ईश्‍वरी प्रकटीकरण हे मुळात देवाविषयी असा दृष्टीकोण प्रतिपादित करीत नाहीः “देव गोंधळात टाकणारा नाही.”—१ करिंथकर १४:३३, रिव्हाईज्ड स्टँडर्ड व्हर्शन (रि.स्टँ.).

त्या विधानाचा अर्थ लक्षात घेतला तर देव, स्वतःविषयी गोंधळात टाकणाऱ्‍या तत्त्वप्रणालीला जबाबदार असणार का की, जे इब्री, ग्रीक आणि लॅटीन प्रामाण्यांना खरेच विवेचीत करता येत नाही?

याचप्रमाणे, ‘एकच खरा देव आणि त्याने ज्याला पाठविले त्या येशू ख्रिस्ताला ओळखण्यासाठी’ लोकांनी खरेच वेदांती असण्याची गरज आहे का? (योहान १७:३) तसे आहे तर मग, केवळ थोड्या यहुदी धर्मपुढाऱ्‍यांनीच येशूला मसीहा या अर्थी का ओळखले बरे? उलटपक्षी, येशूचे शिष्य तर गरीब शेतकरी, कोळी, जकातदार आणि गृहिणी या गटातील होते. या सर्वसाधारण लोकांना येशूने देवाविषयीचे जे शिक्षण दिले त्याची इतकी खात्री पटली होती की तेच शिक्षण त्यांना इतरांनाही शिकवता आले आणि आपल्या विश्‍वासाखातर त्यांची जीव देण्याची तयारी देखील होती.—मत्तय १५:१-९; २१:२३-३२, ४३; २३:१३-३६; योहान ७:४५-४९; प्रे. कृत्ये ४:१३.

[४ पानांवरील चित्रं]

येशूचे शिष्य धार्मिक पुढारी नव्हे तर गरीब, साधारण लोक होते