त्रैक्य “सिद्ध करुन दाखविणारी वचने” यांच्याविषयी काय?
त्रैक्य “सिद्ध करुन दाखविणारी वचने” यांच्याविषयी काय?
त्रैक्याला पाठबळ देणारी काही शास्त्रवचने आहेत असे म्हटले जाते. तरीपण या वचनांचे वाचन करताना आपण हे ध्यानात ठेवावे की, शास्त्रवचनीय व ऐतिहासिक पुरावा त्रैक्याला आधार देत नाही.
आधार म्हणून घेण्यात आलेल्या कोणाही शास्त्रवचनाला सबंध पवित्र शास्त्राचे जे सुसंगत शिक्षण आहे त्याच्या संदर्भात विचारात घेण्यास हवे. अशा शास्त्रवचनांचा खरा अर्थ सभोवतालच्या वचनांचा संदर्भ लक्षात घेतल्यास स्पष्टपणे कळून येतो.
एकात तिघेजण
न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ अशी तीन “सिद्ध करुन दाखविणारी वचने” प्रस्तुत करते, तथापि हेही कबूल करतेः “पवित्र त्रैक्य जु[ना] क[रार] यात शिकविण्यात आलेले नाही. याविषयीचा अगदी प्राचीन पुरावा प्रेषित पौलाच्या लिखाणात आढळतो व तो खासपणे २ करिंथकर १३:१३ [काही भाषांतरात वचन १४], आणि १ करिंथकर १२:४-६ मध्ये दिसतो. शुभवर्तमानात त्रैक्याचा पुरावा केवळ एकदाच व तो मत्तय २८:१९ मध्ये बाप्तिस्म्याच्या नमुन्यात दिसतो.”
द न्यू जरुसलेम बायबल मध्ये त्या वचनांत तीन “व्यक्तींचा” अनुक्रमे असा उल्लेख केला गेला आहे. दुसरे करिंथकर १३:१३ (१४) तिघांना याप्रकारे एकत्र जोडतेः “प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत असो.” पहिले करिंथकर १२:४-६ म्हणतेः “कृपादानांचे वेगवेगळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभु एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी देव एकच आहे जो सर्वात सर्व कार्ये करणारा आहे.” तसेच मत्तय २८:१९ मध्ये असे वाचण्यात येतेः “यास्तव, तुम्ही जा, आणि सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; आणि यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या.”
ही वचने देव, ख्रिस्त आणि पवित्र आत्मा त्रिमस्तकीय देवात सामावलेले आहेत, तिघे सत्व, सामर्थ्य आणि सनातनत्व यात बरोबरीचे आहेत असे म्हणतात का? नाही. ते सांगत नाहीत. या अर्थाने या वचनांचे प्रतिपादन करणे म्हणजे कोणीतरी तिघे कोठे एकत्र भेटले व तिघे एकत्र झाले असे म्हणण्यासारखे आहे.
मॅक्लीनटॉक आणि स्ट्राँग यांचा सायक्लोपिडिआ ऑफ बिब्लिकल, थिऑलॉजिकल ॲण्ड एक्लेसियास्टिकल लिटरेचर म्हणतो की, “अशा प्रकारचे संदर्भ, नाव देण्यात आलेल्या तीन गोष्टींचे कथन करतात, . . . पण हे तिघे ईश्वरी गुणांचे आहेत आणि तिघा जणांत एकाच प्रकारचा ईश्वरी सन्मान आहे हे सिद्ध करीत नाहीत.”
तो संदर्भग्रंथ त्रैक्याचा पुरस्कर्ता असला तरी २ करिंथकर १३:१३ (१४) विषयी सांगतोः “तिघात एकाच प्रकारचा अधिकार किंवा एकसारखाच गुण आहे असे अनुमान आपल्याला निश्चितपणे काढता येत नाही.” मत्तय २८:१८-२० बद्दल तो ग्रंथ म्हणतोः “ते वचन, जसेच्या तसे घेतले तरी तेथे ज्या तिघांचा उल्लेख आहे त्यांचे व्यक्तीत्व, किंवा त्यांची समानता वा ईश्वरीपणा याविषयीचा निर्णायक निर्णय देऊ शकत नाही.”
येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा देखील देव, येशू आणि पवित्र आत्मा यांचा अशाच संदर्भात उल्लेख आला आहे. येशूने “देवाचा आत्मा कबुतरासारखा उतरताना . . . पाहिला.” (मत्तय ३:१६) तथापि, यामुळे ते तिघे एक आहेत असे दिसत नाही. पवित्र शास्त्रात अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांचा पुष्कळ वेळा एकत्र उल्लेख आला आहे पण यामुळे ते एक आहेत असा अर्थबोध होत नाही. पेत्र, याकोब व योहान यांचीही नावे नेहमी एकत्र घेण्यात आली आहेत, पण यामुळे ते तिघे एक बनत नाहीत. आणखी एक गोष्ट ही की, देवाचा आत्मा येशूवर बाप्तिस्म्याच्या प्रसंगी आला तेव्हा त्या वेळेपावेतो येशूचा आत्म्याने अभिषेक झाला नव्हता हे सिद्ध होते. असे आहे तर मग, तो त्रैक्याचा एक भाग कसा बनू शकतो जेथे पवित्र आत्म्याचे सदा वास्तव्य असावयास हवे?
तिघे एक असण्यासंबंधीचा आणखी एक संदर्भ पवित्र शास्त्राच्या काही जुन्या भाषांतरात १ योहान ५:७ मध्ये दिसतो. परंतु, हे शब्द मुळात पवित्र शास्त्रात नव्हते तर ते बऱ्याच काळानंतर त्यामध्ये घालण्यात आले असे प्रामाण्य कबूल करतात. या कारणास्तव या बनावट वचनाला कित्येक आधुनिक अनुवादकांनी आपल्या भाषांतरातून योग्यपणे काढून टाकले आहे.
बाकीची “सिद्ध करुन दाखविणारी वचने” केवळ दोघांच्या—पिता व येशू यांच्या—नातेसंबंधावर आधारलेली आहेत. यापैकींच्या काहींचा आपण विचार करु.
“मी आणि पिता एक आहो”
योहान १०:३० मध्ये आढळणारे ते वचन, जरी यात तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख आलेला नसला तरी त्रैक्याला आधार देते या निमित्ताने वारंवार वापरले जाते. पण येशूनेच स्वतः दाखवून दिले की, पित्यासोबत “एक” असण्याचा त्याचा काय अर्थ होता. योहान १७:२१, २२ मध्ये त्याने देवाला प्रार्थना करताना असे म्हटले की, त्याच्या अनुयायांनी “एक व्हावे; . . . जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे, . . . जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे.” येथे येशूने केलेल्या प्रार्थनेचा अर्थ त्याच्या सर्व अनुयायांनी मिळून एक व्यक्ती व्हावे असा होता का? नाही. तर त्याच्या म्हणण्याचा हा अर्थ होता की, जसा तो व त्याचा पिता हे विचार व उद्देशात एक आहेत त्याचप्रमाणे त्याच्या शिष्यांचेही असेच एकीकरण व्हावे.—पहा, १ करिंथकर १:१०.
पहिले करिंथकर ३:६, ८ मध्ये पौल म्हणतोः “मी लाविले, अप्पुलोसाने पाणी घातले, . . . लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत.” पौलाचा हा अर्थ नव्हता की, तो आणि अप्पुलोस एकात दोघे अशा व्यक्ती होते; त्याचा अर्थ होता की ते दोघेही उद्देशात एक होते. “एक” यासाठी जो ग्रीक शब्द (हेन) पौलाने येथे वापरला तो नपुंसकलिंगी आहे व शब्दशः तो “एक (काम)” सूचित करतो व त्यात सहकार्याची एकता सुचवितो. येशूने योहान १०:३० मध्ये पित्याशी असणाऱ्या नातेसंबंधाविषयीची स्पष्टता करण्यासाठी हाच शब्द वापरला. तोच शब्द त्याने योहान १७:२१, २२ मध्येही वापरला. अशाप्रकारे “एक” (हेन) या शब्दाचा दोन्ही ठिकाणी वापर करुन येशूने विचार व उद्देश यांचे ऐक्य याविषयीचे भाष्य केले.
योहान १०:३० विषयी जॉन केल्वीन (पूर्वीचा त्रैक्य मतवादी) याने कॉमेंट्री ऑन द गॉस्पल अकॉर्डिंग टु जॉन या पुस्तकात म्हटले आहेः “प्राचीन लोकांनी या वचनाचा वापर ख्रिस्त हा . . . पित्यासोबतच्या एकाच सत्वाचा आहे हे दाखविण्यासाठी चुकीने केला होता. पण येथे ख्रिस्त सत्वाच्या एकपणाविषयी नव्हे तर पित्यासोबत त्याचे जे ऐक्य आहे त्याविषयी बोलत आहे.”
योहान १०:३० वचनानंतरचा लगेचचा संदर्भ पडताळून पाहिला तर येशूचे शब्द, तो देव असल्याचा दावा करीत नव्हता हे प्रभावीपणे सांगतात. चुकीच्या निर्णयाप्रत पोहोचलेल्या व त्याला दगडमार करण्याची इच्छा धरणाऱ्या यहुद्यांना त्याने विचारलेः “ज्याला पित्याने नेमून या जगात पाठविले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटल्यावरुन मजवर दुर्भाषण केल्याचा आरोप का करता?” (योहान १०:३१-३६, न्यू.इं.बा.) नाही, येशूने कधीही स्वतःला देव जो पुत्र म्हटले नाही, तर देवाचा पुत्र असे म्हटले.
‘स्वतःला देवासमान करतो’?
त्रैक्याला आधार देण्यासाठी आणखी एक जे वचन दाखवण्यात येते ते आहे योहान ५:१८. ते म्हणते की, यहुदी (योहान १०:३१-३६ प्रमाणेच) येशूला जिवे मारु पहात होते कारण तो “देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करीत” होता.
पण, कोणी असे म्हटले की येशू स्वतःला देवासमान करीत होता? येशूने नाही. त्याने तर उलट त्याच्यावर जो खोटा आरोप लादण्यात आला त्याचे समर्थन पुढील (१९ व्या) वचनात केलेः “आपल्यावरील आरोपाचे खंडण करुन येशू म्हणालाः . . . ‘पुत्राला काहीही स्वतः होऊन करता येत नाही; तो पित्याला जे काही करताना पाहतो तेच करतो.’”—जे.बी.
याद्वारे येशूने यहुद्यांना हे दाखवून दिले की, तो देवाच्या बरोबरीचा नव्हता व यासाठीच त्याला स्वतःच्या मर्जीनुरुप काही करता येत नव्हते. सर्वसमर्थ देवाशी तुल्य असणारा कोणी “मला स्वतःला काही करता येत नाही” असे कधी म्हणू शकेल याची तुम्हाला कल्पना करवेल का? (पडताळा दानीएल ४:३४, ३५.) अशाप्रकारे योहान ५:१८ आणि १०:३० चा संदर्भ दाखवितो की, येथे यहुद्यांनी त्रैक्यवाद्यांप्रमाणे चुकीचा निष्कर्ष काढला तेव्हा येशूने योग्य समर्थन सादर केले. ही केवढी लक्षवेधक गोष्ट आहे!
“देवाच्या बरोबरीचा”?
फिलिप्पैकरांस पत्र २:६ मध्ये, १६०९ च्या डुए व्हर्शन (डु.व्ह.) नुसार येशूबद्दल असे सांगण्यात आले आहेः “तो देवाच्या रुपात असताना देवाच्या बरोबरीचा असण्याचा हक्क हिरावून घेण्याचा त्याने विचार केला नाही.” १६११ च्या किंग जेम्स व्हर्शन (किं.जे.) आवृत्तीतही असेच वाचण्यात येते. अशाप्रकारच्या काही वचनांचा वापर कित्येक जण करुन येशू देवाच्या बरोबरीचा होता या कल्पनेला आधार देतात. पण या वचनाचा अनुवाद इतर भाषांतरे कसा सादर करतात याकडे लक्ष द्याः
१८६९: “जो, देवाच्या स्वरुपाचा असताना त्याने देवाच्या बरोबरीचा असण्याविषयीचा विचार केला नाही.” द न्यू टेस्टमेंट, जी. आर. नॉयसतर्फे.
१९६५: “त्याने—खरेपणाने दैवी स्वभावाचा होता! तरी—स्वतःला आत्मविश्वासपूर्वक देवाच्या बरोबरीचा केले नाही.” डास निवू टेस्टमेंट, सुधारलेली आवृत्ती, फ्रेड्रीक फॅफ्लीनतर्फे.
१९६८: “तो देवाच्या स्वरुपाचा असताना देवाच्या बरोबरीचा विचार करण्याचा अधाशीपणा त्याने स्वतः कधी केला नाही.” ला बिब्लिआ काँकॉर्डटा.
१९७६: “त्याच्याठायी नेहमीच देवाचा स्वभाव होता, तरीही आपण आपल्या शक्तीने स्वतःला देवासमान करण्याचा प्रयत्न करावा असे त्याने कधीच मनात आणले नाही.” टुडेज इंग्लिश व्हर्शन.
१९८४: “तो देवाच्या स्वरुपाचा होता तरीही आपण स्वतः देवाच्या बरोबरीचे असावे असा बळजबरीचा विचार त्याने कधी केला नाही.” न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स.
१९८५: “तो देवाच्या स्वरुपात होता तरी देवाच्या बरोबरीचा असणे या हक्कप्राप्तीचा त्याने विचार केला नाही.” द न्यू जेरुसलेम बायबल.
तथापि, काहींचा असा दावा आहे की, ही अधिक अचूक भाषांतरे देखील असे प्रतिपादित करतात की, (१) येशू आधीपासूनच देवाच्या बरोबरीचा होता तरीही तो धरुन राहण्याची त्याची इच्छा नव्हती किंवा (२) जे त्याचे समान पद आधीपासून होते ते बळजबरीने धरुन ठेवावे असे जरुरीचे नव्हते.
याविषयी राल्फ मार्टीन द ईपिस्टल ऑफ पॉल टू फिलिपियन्स मध्ये मूळ ग्रीक भाषेसंबंधाने म्हणतात की, “क्रियापदाचा अर्थ, मूळ अर्थ ‘बळकावणे’, ‘हिंसाचाराकरवी हिरावून घेणे’ यापासून ‘धरुन ठेवणे’ असा फिरवता येऊ शकतो का हे अजूनही प्रश्नार्थक आहे.” द एक्सपोझिटर्स ग्रीक टेस्टमेंट देखील म्हणतेः “αοπαζω [हार․पाʹझो] किंवा त्याचा व्याकरणातील कोणताही प्रकार ‘पद राखून ठेवणे,’ ‘टिकविणे’ असा अर्थ देत असल्याचा एकही उतारा आम्हाला आढळत नाही. त्याचा निर्विवाद अर्थ ‘बळकावणे,’ ‘हिंसाचाराने हिरावून घेणे’ असा होतो. यामुळेच ‘ग्रहण करणे’ या खऱ्या अर्थाचा ‘धरुन ठेवणे’ असा विपर्यास करण्याची अनुज्ञा दिली जाऊ शकत नाही.”
वर असणाऱ्या गोष्टीद्वारे हे दिसते की, डुए आणि किंग जेम्स या भाषांतरांनी त्रैक्याच्या प्रणालीस आधार द्यावा म्हणून नियमांना वाकविले आहे. फिलिप्पैकर २:६ चे ग्रीक भाषेतील वास्तविक वाचन, देवाच्या बरोबरीचा असणे ही योग्य गोष्ट आहे असा येशूने विचार केला होता हे म्हणण्यापेक्षा अगदीच विरुध्द अर्थाची स्पष्टता देते की, ती गोष्ट योग्य आहे असा येशूने विचार केला नव्हता.
सहाव्या वचनाचा अर्थ कसा लक्षात घेण्यास हवा याविषयीची मदत सभोवताली असणाऱ्या वचनांचा (३-५, ७, ८, डुए) संदर्भ दाखवितो. फिलिप्पैकरांना असे आर्जविण्यात आलेः “आपण लीन होऊन दुसऱ्यांना आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे.” यानंतर पौल या मनोवृत्तीविषयी ख्रिस्ताचे उल्लेखणीय उदाहरण देतोः “अशीच मनोवृत्ती तुम्हामध्येही असावी, जी ख्रिस्त येशूमध्ये देखील होती.” कोणती? ‘देवाच्या बरोबरीचा असणे हा विचार करणे म्हणजे चोरी नाही’ हीच का? नाही. हे तर जो मुद्दा सांगितला गेला आहे त्याच्या अगदी विरुद्ध असेल! वस्तुतः ‘आपणापेक्षा देवाला श्रेष्ठ मानणाऱ्या’ येशूने ‘देवासोबत बरोबरी करण्याचा विचार’ राखला नाही;
उलटपक्षी, त्याने “स्वतःला लीन केले आणि मरणापर्यंत आज्ञांकित ठेवले.”अर्थात, येथे सर्वसमर्थ देवाच्या कोणा भागाविषयीची चर्चा करण्यात आली नाही. तर येथे येशू ख्रिस्ताविषयीचे भाष्य आहे, ज्याने पौलाने आधीच दाखविलेल्या मुद्याविषयी परिपूर्ण उदाहरण मांडले—म्हणजे, लीनतेचे महत्त्व आणि आपल्या सर्वोच्च निर्मात्या यहोवा देवास आज्ञांकितपणा.
“मी आहे”
योहान ८:५८ मध्ये कित्येक भाषांतरे, जसे की, द जेरुसलेम बायबल येशूला असे म्हणताना सांगतेः “अब्राहामापूर्वी मी आहे.” येथे येशू, त्रैक्यवादी जसे शिकवितात त्याप्रमाणे त्याला “मी आहे” ह्या किताबाने ओळखले जात होते असे सांगत होता का? तसेच त्या लोकांचा दावा आहे त्याप्रमाणे येशू हा इब्री शास्त्रवचनातील यहोवा देव होता असा याचा अर्थ आहे का, कारण निर्गम ३:१४ मध्ये किंग जेम्स व्हर्शन मध्ये असे म्हटले आहे की, “देवाने मोशेला म्हटलेः ‘मी आहे तो आहे”?
निर्गम ३:१४ (किं.जे.) मध्ये आढळणारी “मी आहे” ही संज्ञा देवाचा किताब या अर्थाने वापरली असून ती, देव खराच अस्तित्वात आहे आणि त्याने वचन दिलेल्या गोष्टी पूर्ण करील याकरता वापरली आहे. या संज्ञेविषयी माहिती देताना द पेंटेटॉच ॲण्ड हाफ्टोरास् हे डॉ. जे. एच. हर्टझ् यांनी संपादिलेले प्रकाशन म्हणतेः “दास्यत्वात असलेल्या इस्राएलांना त्याचा हा अर्थ होताः ‘जरी त्याने आपले महासामर्थ्य तुम्हाविषयी व्यक्त केले नाही, तरी तो निश्चितपणे प्रदर्शित करणार; तो सनातन आहे आणि तो तुम्हाला निश्चये मुक्त करील.’ कित्येक आधुनिक भाषांतरकार राशी [पवित्र शास्त्र व तालमूदचे फ्रेंच व्याख्याते] यांचे अनुकरण करुन [निर्गम ३:१४ चा] अनुवाद ‘मी असावयाचा तोच असणार’ असे सादर करतात.”
योहान ८:५८ मध्ये करण्यात आलेले भाष्य हे निर्गम ३:१४ मध्ये देण्यात आलेल्या संज्ञेपेक्षा अगदीच भिन्न आहे. येशूने तेथे केलेल्या भाष्याचा एखादे नाम वा पदवी सूचित करण्यासाठी उल्लेख केला नव्हता, तर त्याकरवी तो मानवीप्रकृतीपूर्वीच्या आपल्या अस्तित्वाची स्पष्टता करीत होता. याकरताच, काही पवित्र शास्त्र आवृत्त्या योहान ८:५८ कसे सादर करतात ते लक्षात घ्याः
१८६९: “अब्राहामापूर्वी मी होतो.” द न्यू टेस्टमेंट, जी. आर. नोएसतर्फे
१९३५: “अब्राहाम जन्मला त्यापूर्वी मी अस्तित्वात होतो!” द बायबल—ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन, जे. एम. पी. स्मिथ ॲण्ड ई. जे. गुडस्पीडतर्फे.
१९६५: “अब्राहामाचा जन्म होण्याआधीच मी होतो.” डास निवू टेस्टमेंट, जॉर्ग झिंकतर्फे.
१९८१: “अब्राहाम जन्मण्याआधी मी जिवंत होतो!” द सिंपल इंग्लीश बायबल.
१९८४: “अब्राहाम अस्तित्वात येण्याआधी मी होतो.” न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स.
अशाप्रकारे जो ग्रीक शब्द येथे वापरण्यात आला त्याचा खरा विचार हा आहे की, देवाचा निर्मित असा “ज्येष्ठ,” येशू, अब्राहामाचा जन्म होण्याआधीच्या बऱ्याच काळापासून अस्तित्वात होता.—कलस्सैकर १:१५; नीतीसूत्रे ८:२२, २३, ३०; प्रकटीकरण ३:१४.
ही विचारधारा खरी आहे हे संदर्भ देखील दाखवितो. या खेपेला यहुद्यांचा विचार येशूला धोंडमार करायचा होता, कारण ते म्हणाले की, येशूला अद्याप ५० वर्षे झाली नव्हती तरी त्याने “अब्राहामाला पाहिले आहे” असे त्याने म्हटले होते. (वचन ५७) तद्वत, आपल्या वयाविषयीची खरी सत्यता त्यांना कळवावी ही येशूची स्वाभाविक प्रतिक्रिया होती. यासाठीच त्याने स्वाभाविकपणे त्यांना हे म्हटलेः “अब्राहाम जन्मण्याआधी मी जिवंत होतो!”— द सिंपल इंग्लीश बायबल.
“शब्द देव होता”
किंग जेम्स व्हर्शन मध्ये योहान १:१ असे वाचण्यात येतेः “प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.” त्रैक्यवाद्यांचा असा दावा आहे की, पृथ्वीवर येशू ख्रिस्त बनून आलेला “शब्द” (ग्रीक, हो लोʹगस) स्वतःच सर्वसमर्थ देव होता.
परत एकदा हे लक्षात आणा की, येथे सुद्धा संदर्भ हा अचूक ज्ञानाची पार्श्वभूमि देतो. किंग जेम्स व्हर्शन सुद्धा म्हणते कीः “शब्द देवासह होता.” (तिरप्या अक्षरांचे वळण आमचे.) जो कोणी इतर व्यक्ती“सह” किंवा बरोबर आहे तो दुसऱ्या व्यक्तीसारखा नसतो. याच्याच सहमतात, जसुईट पंथीय जोसेफ ए. फिट्झमायर यांच्याकरवी संपादण्यात आलेले जर्नल ऑफ बिब्लिकल लिटरेचर परिक्षिते की, योहान १:१ च्या उत्तरार्धाविषयीचा अर्थ “तो” देव असा प्रतिपादित केला तर मग, “आधीच्या वाक्याचा त्यामुळे घोटाळा होईल,” जे म्हणते की, शब्द हा देवासह होता.
या वचनाचा इतर भाषांतरे कसा अनुवाद करतात तेही लक्षात घ्याः
१८०८: “आणि शब्द एक देव होता.” द न्यू टेस्टमेंट इन ॲन इम्प्रुव्हड व्हर्शन, अपॉन द बेसिस ऑफ आर्चबिशप न्यूकम्स न्यू ट्रान्स्लेशनः वीथ ए करेक्टेड टेक्स्ट्.
१८६४: “आणि हा शब्द एक देव होता.” द एम्फॅटिक डायग्लॉट, इंटरलिनियर वाचन, बेंजामिन विल्सनतर्फे.
१९२८: “आणि शब्द हा दैवी होता.” ला बायबल डु सन्टेनायर, एलʹईव्हान्जिल सेलन जीन, मौरीस गौगुलतर्फे.
१९३५: “आणि शब्द दैवी होता.” द बायबल—ॲन अमेरिकन ट्रान्स्लेशन, जे. एम. पी. स्मिथ आणि ई. जे. गुडस्पीडतर्फे.
१९४६: “आणि शब्द दैवी प्रकारातील होता.” डास निवू टेस्टमेंट, लुडवीग थिम्मेतर्फे.
१९५०: “आणि शब्द हा एक देव होता.” न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन ऑफ द ख्रिश्चन ग्रीक स्क्रिपचर्स.
१९५८: “आणि शब्द हा एक देव होता.” द न्यू टेस्टमेंट, जेम्स एल. तोमानेकतर्फे.
१९७५: “आणि शब्द हा एक देव (किंवा, दैवी प्रकारातील) होता.” डास इव्हॅन्जिलियम नॅच जोहानस, सिगफ्रेड स्कल्झतर्फे.
१९७८: “आणि लोगस देवासारखा होता.” डास इव्हॅन्जिलियम नॅच जोहानस, जोहानस शेंडरतर्फे.
योहान १:१ मध्ये थि․ऑसʹ (देव) या ग्रीक नामाचा दोनदा प्रयोग आला आहे. पहिला प्रयोग सर्वसमर्थ देवास अनुलक्षून आहे ज्याच्यासोबत शब्द होता (“आणि शब्द [लोʹगस] देवासह [थि․ऑसʹचे एक रुप] होता”). या पहिल्या थि․ऑसʹ शब्दाआधी टोन हा शब्द येतो, हे ग्रीक भाषेतील निश्चित उपपद आहे ज्यामुळे एका वेगळ्या व्यक्तीची ओळख मिळते व ती या प्रकरणात सर्वसमर्थ देव आहे (“आणि शब्द [आणखी एका] देवासह होता“).
पण तेच योहान १:१ मध्ये दुसऱ्यांदा आलेल्या थि․ऑसʹ च्या अनुषंगाने कोणतेही उपपद वापरण्यात आलेले नाही. याकारणास्तव त्याचे शब्दशः भाषांतर “शब्द देव होता” असे वाचले जाईल. तथापि, आपण पाहिले त्याप्रमाणे किंत्येक भाषांतरे दुसऱ्या थि․ऑसʹ (विधेय नाम) बद्दल “दैवी,” “देवासारखा,” किंवा “एक देव” असे भाषांतर देतात. हे ते कोणत्या अधिकाराने करतात?
कोईन ग्रीक भाषेत (“द”) हे निश्चित उपपद होते पण त्यात (“अ” किंवा “ॲन”) सारखे अनिश्चित उपपद नव्हते. यास्तव एखाद्या विधेय नामाच्या आधी कसलेही निश्चित उपपद नसले तर ते संदर्भानुसार अनिश्चित असते.
जर्नल ऑफ बिब्लिकल लिटरेचर म्हणते की, “ज्या क्रियापदाआधी उपपद नसणारे विधेय असते ते क्रियापद प्रामुख्यत्वे गुणवत्तेचा अर्थ देते.” ते जर्नल याविषयीचे परिक्षण करताना सांगते की, लोʹगस याला देवासारखी उपमा देता येईल. ते योहान १:१ विषयी असेही म्हणतेः “विधेयाची गुणवत्ता ही येथे इतकी महत्वाची आहे की, येथे नाम [थि․ऑसʹ] याला निश्चित रुप मिळत नाही.”
अशाप्रकारे योहान १:१ शब्द याची गुणवत्ता सामोरी आणते आणि म्हणते की तो “दैवी,” “देवासारखा,” “एक देव” होता, पण सर्वसमर्थ देव नव्हता. हे विवेचन पवित्र शास्त्राच्या इतर भागाशी सुसंगत आहे. कारण येथे “शब्द” म्हणण्यात आलेल्या येशूला देवाचा प्रवक्ता म्हणून चितारले आहे तर इतरत्र त्याला आज्ञाधारक सेवक; त्याचा वरिष्ठ, सर्वसमर्थ देव याने पृथ्वीवर पाठविलेला असे दाखविले गेले आहे.
आणखी अशी पुष्कळ शास्त्रवचने दाखवता येतील ज्यामध्ये इतर भाषेच्या भाषांतरकारांनी “अ” (किंवा “एक”) या उपपदाचा प्रयोग ग्रीक वाक्यात त्याच रचनेने घडवून आणला आहे. उदाहरणार्थ, मार्क ६:४९ मध्ये शिष्यांनी येशूला पाण्यावरुन चालताना पाहिल्याचा वृत्तांत आहे तेथे किंग जेम्स व्हर्शन म्हणतेः “हे एक भूत आहे असे त्यांना वाटले.” कोईन ग्रीक भाषेत “भूत” याच्या आधी “अ” (किंवा “एक”) हे उपपद नाही. तरीपण इतर भाषेतील बहुतेक सर्व भाषांतरकार ते उपपद वाक्याची जुळणी संदर्भास अनुलक्षून करता यावी म्हणून घालतात. याचप्रमाणे योहान १:१ म्हणते त्यानुसार शब्द देवासह होता म्हणून तो स्वतः (सर्वसमर्थ) देव असू शकत नाही, तर तो “एक देव” किंवा “दैवी” होता.
अमेरिकन स्टँडर्ड व्हर्शन वर काम केलेल्या जोसेफ हेन्री थायर या वेदांतीय व प्रामाण्यांनी साधेपणात असे म्हटलेः “लोगस हा दैवी होता पण तो स्वतः देव किंवा ईश्वर नव्हता.” तसेच जेसुईट जॉन एल. मॅकॅन्झी यांनी आपल्या डिक्शनरी ऑफ द बायबल मध्ये लिहिलेः “योहान १:१ चे असे अचूक भाषांतर व्हावयास हवे . . . ‘शब्द हा दैवी गुणवत्तेचा होता.’”
नियमाचा भंग?
तथापि काहींचे असे म्हणणे आहे की, अशाप्रकारच्या भाषांतराच्या सादरतेमुळे कोईन ग्रीकच्या व्याकरणाच्या नियमाचा भंग केला जातो. हे व्याकरण ग्रीक प्रामाण्य ई. सी. कॉलवेल यांनी मागे १९३३ मध्ये प्रसिद्ध केले होते. या प्रामाण्यांचे असे प्रतिपादन आहे की, ग्रीक भाषेत विधेय नामाला “क्रियापदानंतर [निश्चित] पद असते; ते क्रियापदाआधी नसते.” याचा हा अर्थ होतो की, क्रियापदानंतर आलेल्या विधेय नामासंबंधाने असे समजण्यास हवे की त्याच्या आधी निश्चित पद (“द”) आहे. योहान १:१ मध्ये दुसरे नाम (थि․ऑसʹ), विधेय रुपाचे, क्रियापदाआधी येते—“आणि [थि․ऑसʹ] होता शब्द.” या कारणास्तव कॉलवेल यांचा दावा आहे की, योहान १:१ असे वाचण्यात यावेः “आणि (हा) देव होता शब्द.”
पण आता, योहान ८:४४ मध्ये आढळणाऱ्या दोन उदाहरणांचा विचार करा. येथे येशू दियाबलाविषयी म्हणतोः “तो . . . एक मनुष्यघातक होता” आणि “तो एक लबाड . . . आहे.” जसे आपण योहान १:१ च्या बाबतीत पाहिले तसेच येथे ग्रीक भाषेत विधेय नामे (“मनुष्यघातक” व “लबाड”) क्रियापदांच्या (“होता” व “आहे”) आधी येतात. आता या दोन्ही नामांच्या आधी कसलेही अनिश्चित उपपद नाही, कारण कोईन ग्रीक भाषेत कोणतेही अनिश्चित उपपद वापरण्यात येत नव्हते. तरीपण बहुतेक भाषांतर “एक” हा शब्द घालतात ते यासाठी की, ग्रीक व्याकरण तसेच संदर्भ त्याची गरज दाखवितो.—मार्क ११:३२; योहान ४:१९; ६:७०; ९:१७; १०:१; १२:६ हे देखील पहा.
कॉलवेल यांना विधेयक नामाविषयी कबूली द्यावी लागली कारण त्यांनी म्हटलेः “जेव्हा संदर्भ तशी गरज दाखवितो तेव्हा [“एक” किंवा “एखादा”] या अनिश्चित रुपाची मांडणी जोडावी लागते.” अशाप्रकारे ते कबूल करतात की, संदर्भ गरज दाखवितो तर भाषांतरकाराला या प्रकारच्या वाक्यरचनेत नामापुढे अनिश्चित उपपद घालता येईल.
तर मग, योहान १:१ मध्ये संदर्भ अनिश्चित उपपदाची मागणी करतो का? होय, कारण सबंध पवित्र शास्त्राची ही साक्ष आहे की, येशू हा सर्वसमर्थ देव नाही. अशाप्रकारे, कॉलवेल यांच्या व्याकरणाविषयीचा प्रश्नार्थक नियम नव्हे तर संदर्भाने भाषांतरकाराला अशा प्रकरणात मार्गदर्शन दिले पाहिजे. हेच, योहान १:१ च्या कित्येक भाषांतरामध्ये तसेच इतर ठिकाणी जे “एक” हे अनिश्चित उपपद घालण्यात आले त्यावरुन दिसते आणि यामुळे कित्येक प्रामाण्य तसेच देवाचे वचन देखील कृत्रिम नियमांविषयी आपले सहमत का दर्शवीत नाही ते स्पष्ट होते.
मतभेद नाही
येशू ख्रिस्ताला “एक देव” म्हटल्यामुळे केवळ एकच देव आहे या पवित्र शास्त्राच्या शिक्षणाच्या बाबतीत काही मतभेद निर्माण होतो का? नाही. कारण पवित्र शास्त्रात ही संज्ञा वेळोवेळी प्रबळ प्राणीमात्रांसाठी वापरण्यात आलेली आहे. स्तोत्रसंहिता ८:५ मध्ये आम्ही वाचतोः “तू त्याला [मानवाला] देवांपेक्षा [इब्री, ʼएलो․हीमʹ] (म्हणजे, देवदूतांपेक्षा) किंचित कमी असे केले आहे.” येशूने देव आहोत असे म्हटले या यहुद्यांनी केलेल्या आरोपाचे खंडण करताना येशूने हे परिक्षण केले की, “ज्यांना देवाचे वचन देण्यात आले आहे त्यांना [मानवी न्यायधिशांना] नियमशास्त्राने देव म्हटले” आहे. (योहान १०:३४, ३५; जे.बा. स्तोत्रसंहिता ८२:१-६) सैतानाला देखील २ करिंथकर ४:४ मध्ये “या युगाचा देव” असे संबोधण्यात आले आहे.
पण येशूला दिव्यदूत, अपूर्ण मानव किंवा सैतानापेक्षा अधिक उच्च पद आहे. त्यांना जर “देव”, सामर्थ्यवान असे म्हटले गेले आहे तर येशूसंबंधाने तो “एक देव” आहे असे म्हणता येईल व तो तसा आहे. यहोवा देवासोबत राखलेल्या अद्वितीय पदामुळेच येशू हा “समर्थ देव” आहे.—योहान १:१; यशया ९:६.
पण “समर्थ देव” या संज्ञेमुळे येशू हा निदान काही अंशी तरी यहोवा देवाशी तुल्य आहे असा अर्थ निघत नाही का? मुळीच नाही. यशयाने, येशूला ज्या चार नावाने संबोधण्यात येईल असे भाकित केले होते त्यापैकीचे हे एक नाम आहे. आता, येशूला जर “समर्थ” असे म्हटले आहे तर “सर्वसमर्थ” असा एकटाच कोणीतरी दुसरा आहे हे लक्षात येत नाही का? समजा, ज्यांना देव म्हटले गेले व जे कमी वा कनिष्ठ पदावर होते असे इतर काही अस्तित्वात आहेत तर मग, यहोवा देवाला “सर्वसमर्थ” म्हणणे इतके अर्थसूचक वाटले नसते. पण वस्तुतः ते इतर अस्तित्वातच नाहीत.
इंग्लंडमधील बुलेटीन ऑफ द जॉन रायलँडस् लायब्ररी परिक्षण देते की, कार्ल राहनर या कॅथोलिक वेदांत प्रामाण्यांच्या मते, योहान १:१ सारख्या शास्त्रवचनांमध्ये ख्रिस्ताच्या संदर्भात थि․ऑसʹ याचा वापर झालेला असला तरी “यातील कोणाही प्रकारात ‘थिऑस’चा वापर येशूला सर्वोच्च देव असे दाखविण्यासाठी केलेला नाही. येशू ज्याच्यासोबत होता त्या देवाला नव्या करारात ‘हो थिऑस’ म्हणजे सर्वोच्च देव असे दाखविले गेले आहे.” पुढे हेच बुलेटीन म्हणतेः “येशू हा ‘देव’ आहे असा स्विकार विश्वासूजनांनी करावा असे नव्या कराराच्या लेखकांनी मानले होते तर मग, नव्या करारात या विश्वासाचा अंगीकार कोठेही दिसून येत नाही त्याचे स्पष्टीकरण कसे देता येईल?”
पण मग, थोमाने योहान २०:२८ मध्ये येशूविषयी “माझा प्रभु, माझा देव” असे जे उद्गार काढले त्याबद्दल काय? त्या विशिष्ट आश्चर्यकारक परिस्थितीत भारावून जाऊन ते उद्गार थोमाने काढल्यामुळे त्याला येशू “एक देव” वाटला. काही प्रामाण्य असे सांगतात की, थोमाने ते उद्गार आश्चर्याने भावनावश होऊन येशूला उद्गारले पण वस्तुतः ते देवाला अनुलक्षून होते. काहीही असले तरी, येशू हा सर्वसमर्थ देव आहे असा थोमाचा विश्वास नव्हता असे आपल्याला सांगता येईल, कारण त्याला व इतर प्रेषितांना, येशूने स्वतःच्या बाबतीत देव असल्याचा दावा कधीही केला नव्हता हे चांगले माहीत होते. यहोवा हाच “एकच खरा देव” असल्याचे शिक्षण येशूने दिल्याचे त्यांना ठाऊक होते.—योहान १७:३.
येथे परत, मागचा पुढचा संदर्भ, आपल्याला योग्य समज देतो. काही दिवसांआधी पुनरुत्थित येशूने मरीया मग्दालिया हिला आपल्या सर्व शिष्यांना हे सांगावे असे म्हटले होतेः “माझा पिता व तुमचा पिता, माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.” (योहान २०:१७) येशूचे सामर्थ्यवान आत्मा असे पुनरुत्थान झाले होते तरीही यहोवा त्याचा देवच होता. येशूने, त्याला वैभव मिळाल्यावर सुद्धा, यहोवाला, पवित्र शास्त्राच्या शेवटल्या पुस्तकात याच पद्धतीने संबोधिले आहे.—प्रकटीकरण १:५, ६; ३:२, १२.
थोमाने आश्चर्यकारकपणे जे काही उद्गारले त्याच्या तीन वचनानंतर लगेच म्हणजे योहान २०:३१ मध्ये पवित्र शास्त्र प्रकरणाची अधिक स्पष्टता देताना म्हणतेः “येशू हा [सर्वसमर्थ देव नव्हे तर] देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा . . . म्हणून ही [वचने] लिहिली आहेत.” आता “पुत्र” म्हटला तर तो, निसर्गतः जसा पिता व पुत्र असतो त्या अर्थी खरा पुत्र असला पाहिजे; त्रैक्याच्या देवपणातील कोणी गूढ भाग नव्हे.
पवित्र शास्त्रासोबत सुसंगत असले पाहिजे
आणखी काही शास्त्रवचने त्रैक्यास हातभार लावतात असा दावा केला जातो. पण ही शास्त्रवचने, आता ज्यांची चर्चा करण्यात आली आहेत त्यांच्यासारखीच आहेत. यांचे काळजीपूर्वक परिक्षण केले तर ती वास्तविक असा आधार देत नाहीत असेच दिसेल. ही शास्त्रवचने याची स्पष्टता देतात की, त्रैक्याविषयी आधार असण्याचा दावा केला जातो तेव्हा स्वतःला हे विचारुन पाहिले पाहिजेः जे प्रतिपादन मांडले जाते ते संपूर्ण पवित्र शास्त्राच्या शिक्षणाशी सुसंगत आहे का, जे हे सांगते की यहोवा देव हा एकटाच सार्वभौम आहे? जर नाही, तर ते प्रतिपादन चुकीचे आहे.
आपण हेही लक्षात घेण्यास हवे की, त्रैक्याप्रीत्यर्थ आधार म्हणून दाखविलेल्या एकाही वचनाने देव, येशू आणि पवित्र आत्मा हे, कोणा गूढ देवपणात एक आहेत असे सिद्ध केले नाही. पवित्र शास्त्रातील एकही वचन ते तिघे पदार्थ, सामर्थ्य आणि सनातनत्व यात एकच आहेत असे म्हणत नाही. सर्वसमर्थ देव यहोवा हा एकटाच सर्वोच्च आहे, येशू हा त्याचा निर्मित पुत्र आहे आणि पवित्र आत्मा ही देवाची क्रियाशील शक्ती आहे हे दाखविण्यात पवित्र शास्त्र सुसंगत आहे.
[२४ पानांवरील चौकट]
“ख्रिस्त हा . . . पित्याच्या सत्वाचा आहे असे सिद्ध करण्यासाठी प्राचीन लोकांनी [योहान १०:३०] चा चुकीचा वापर केला.” —कॉमेंट्री ऑन द गॉस्पल अकॉर्डिंग टू जॉन, जॉन केल्विनतर्फे.
[२७ पानांवरील चौकट]
जो कोणी इतर व्यक्ती“सह” किंवा बरोबर आहे तो दुसऱ्या व्यक्तीसारखा नसतो.
[२४ पानांवरील चौकट]
“लोगस हा दैवी होता पण तो स्वतः देव किंवा ईश्वर नव्हता.”—जोसेफ हेन्री थायर, पवित्र शास्त्र प्रामाण्य.
[२५ पानांवरील चित्रं]
येशूने देवाला हे प्रार्थिले की, जसे तो व त्याचा पिता हे “एक” आहेत तसेच त्याच्या शिष्यांनी देखील “एक” व्हावे
[२६ पानांवरील चित्रं]
आपण देवाच्या बरोबरीचे नाहीत हे दाखविण्यासाठी येशूने यहुद्यांना म्हटले की, त्याला ‘स्वतःच्या इच्छेप्रमाणे काहीच करता येत नाही, तर जे काही तो पित्याला करताना पाहतो तेच करतो’
[२९ पानांवरील चित्रं]
पवित्र शास्त्र मानव, दिव्यदूत आणि सैतान या सर्वांना “देव” किंवा सामर्थ्यकारी असल्याचे संबोधिते तर मग, स्वर्गात वरिष्ठ पदी असलेल्या येशूला “एक देव” असे योग्यपणे म्हणता येते