देवाची त्याच्या नियमानुसार भक्ती करा
देवाची त्याच्या नियमानुसार भक्ती करा
देवाला केलेल्या प्रार्थनेत येशूने म्हटलेः “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे, व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे ज्ञान मिळवावे.” (योहान १७:३) पण कोणत्या प्रकारचे ज्ञान? “[देवाची] अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या अचूक ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीमथ्य २:४) या वाक्याच्या उत्तरार्धाचा अनुवाद द ॲम्प्लीफाईड बायबल असा देतेः “[ईश्वरी] सत्य सविस्तरपणे आणि अचूकपणे जाणावे.”
अशाप्रकारे आम्ही देव आणि त्याच्या उद्देशाविषयीची अचूक माहिती ईश्वरी सत्याच्या अनुषंगाने ग्रहण करावी अशी देवाची इच्छा आहे. देवाचे वचन, पवित्र शास्त्र हे त्या सत्याचा उगम आहे. (योहान १७:१७; २ तीमथ्य ३:१६, १७) पवित्र शास्त्र देवाविषयी जे काही सांगते ते लोकांनी अचूकपणे ग्रहण केल्यावर त्यांची दशा रोमकरांस पत्र १०:२, ३ मध्ये वर्णिण्यात आलेल्या लोकांसारखी राहणार नाही. यांना “देवाविषयी आस्था [होती], पण ती यथार्थ ज्ञानाला अनुसरुन” नव्हती. तसेच ते शमरोनी लोकांसारखे राहणार नाही ज्यांच्याविषयी येशूने म्हटले होते की, “तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता.”—योहान ४:२२.
यास्तव आपल्याला देवाची संमती मिळवावयाची आहे तर स्वतःला हे विचारणे उपयुक्त ठरेलः स्वतःविषयी देव काय म्हणतो? आपली भक्ती कशी व्हावी अशी त्याची इच्छा आहे? त्याचे उद्देश काय आहेत आणि आपण त्याच्या या उद्देशात कसे बसू शकतो? या प्रश्नांना सत्याचे अचूक ज्ञान बरोबर उत्तरे देते. याकरवी आपल्याला देवाची भक्ती त्याच्या नियमांना अनुसरुन करणे जमू शकेल.
देवाचा अपमान
“जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन,” असे देव म्हणतो. (१ शमुवेल २:३०) देवाच्या बरोबरीचा कोणी आहे असे म्हणणे देवाचा आदर करण्यासारखे आहे का? मरीया ही “देवाची माता” आहे आणि “निर्माता व त्याची निर्मिती यांजमध्ये रदबदली करणारी आहे” असे जे न्यू कॅथोलिक एनसायक्लोपिडिआ तिच्याविषयी सांगते त्याप्रमाणे म्हणणे देवाचा आदर करणारे ठरते का? नाही. या कल्पना देवाचा अपमान करतात. त्याच्या बरोबरीचा कोणीही नाही; किंवा त्याला कोणतीही दैहिक माता नाही, कारण येशू देव नव्हता. शिवाय “रदबदली करणारी” अशी कोणीही असू शकत नाही; कारण देवाने “देव व मानव ह्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ” नेमला आहे.—१ तीमथ्य २:५; १ योहान २:१, २.
त्रैक्याच्या तत्वाने देवाच्या खऱ्या स्थानाविषयी लोकांच्या समजणूकीत सरभेसळ करुन ती प्रदूषित केली हे निर्विवाद खरे आहे. हे तत्व लोकांना विश्वाचा सार्वभौम यहोवा देव याला अचूकपणे जाणण्यापासून आणि त्याची, त्याच्या नियमांनी भक्ती करण्यापासून परावृत्त करते. हन्स कंग या वेदांत्यांनी म्हटलेः “देवाचा एकपणा व अद्वितीयपणा यात एखाद्याने भर टाकून तो एकपणा व अद्वितीयपणा का भष्ट्र करावा?” पण हेच त्रैक्याच्या तत्त्वाने घडवून आणले आहे.
त्रैक्यावर विश्वास ठेवणारे “देवाची जाणीव अचूक ज्ञानाने” ठेवीत नाहीत. (रोमकर १:२८) तेच वचन असेही म्हणतेः “देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.” ही “अनुचित कर्मे” काय आहेत त्याविषयीची माहिती २९ ते ३१ वचने देतात, ज्यापैकीची काही ‘खून, कलह, वचनभंग करणे, ममताहीन, निर्दय’ ही आहेत. याच गोष्टी त्रैक्याचा पुरस्कार करणारे धर्म आचरत आहेत.
उदाहरणार्थ, त्रैक्यवाद्यांनी त्रैक्य न मानणाऱ्या लोकांचा छळ केला व त्यांना ठार देखील मारले. याहीपेक्षा ते अधिक पुढे गेले. त्यांनी त्रैक्य मानणाऱ्या आपल्याच सहबांधवांची युद्धकाळात कत्तल केली. कॅथोलिकांनी कॅथोलिकांना, कर्मठ पंथीयांनी त्यांच्याच सदस्यांना, प्रॉटेस्टंट पंथीयांनी त्यांच्याच लोकांचा युद्धात संहार करावा यापेक्षा दुसरे ‘अनुचित कर्म’ ते काय असणार? आणि तेही त्याच त्रैक देवाच्या नामात!
तथापि, येशूने अगदी साधेपणात हे म्हटले होतेः “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) देवाचे वचन या विषयाचा आणखी विस्तार करुन म्हणतेः “ह्यावरुन देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतातः जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही.” जे आपल्या आध्यात्मिक बांधवांचा वध करतात अशांना ते वचन “काइन त्या दुष्टाचा [सैतान] होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला” त्याची उपमा देते.—१ योहान ३:१०-१२.
अशाप्रकारे देवाविषयी गोंधळ निर्माण करणाऱ्या तत्वांच्या शिक्षणामुळे त्यांनी देवाच्या नियमांचा भग करणारा मार्ग चोखाळला. खरे म्हणजे सबंध ख्रिस्ती धर्मजगतात जे घडले त्याविषयीचे वर्णन देताना डॅनिश वेदांतीय सोरेन किर्कगार्ड म्हणालेः “ख्रिस्ती धर्म जगताने ख्रिस्ती धर्माविषयीची जाण जाणून न घेता त्याला साफ उडवून टाकले आहे.”
ख्रिस्ती धर्मजगताची आध्यात्मिक स्थिती पौलाने दिलेल्या वर्णनानुरुप तंतोतंत जुळणारी आहेः “आपण देवाला ओळखतो
असे ते बोलून दाखवतात; परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत.”—तीतास १:१६.या सद्य दुष्ट व्यवस्थीकरणाचा देव जेव्हा लवकरच नाश करील त्यावेळी तो त्रैक्यवादी ख्रिस्ती धर्मजगताकडून जाब विचारील. त्याच्या देव-निंदात्मक कृती आणि शिकवणींमुळे तो त्याचा भयंकर रितीने न्याय करील.—मत्तय २४:१४, ३४; २५:३१-३४, ४१, ४६; प्रकटीकरण १७:१-६, १६; १८:१-८, २०, २४; १९:१७-२१.
त्रैक्याचा धिक्कार करा
देवाच्या सत्याची कोणाबरोबरही हातमिळवणी करता येणार नाही. तेव्हा देवाची भक्ती त्याच्या नियमांना अनुसरुन करावयाची आहे तर त्रैक्याच्या तत्त्वाचा धिक्कार केला पाहिजे. ते तत्त्व संदेष्टे, येशू, प्रेषित आणि आरंभीचे ख्रिस्तीजन जे विश्वास ठेवून होते व ज्याचा प्रचार करीत होते त्याच्या विरुद्ध आहे. देव आपल्या प्रेरित वचनात स्वतःबद्दल जी माहिती सांगत आहे त्याच्या विरुद्ध ते आहे. यामुळेच तो आम्हाला सूचना करतोः “मीच देव आहे, दुसरा कोणी देव नव्हे, मजसमान कोणीच नाही हे कबूल करा.”—यशया ४६:९, टु.इं.व्ह.
देवाविषयीचा गोंधळ निर्माण करुन आणि त्याला गूढ बनवून त्याची उद्दिष्टे पूणे होत नसतात. उलटपक्षी, लोक जितके अधिकाधिक देव व त्याच्या उद्देशांविषयी गोंधळात पडतात तितक्या अधिकपणे देवाचा शत्रु दियाबल सैतान ‘या जगाचा देव’ याचे फावले जाते. ‘विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने अंधळी करावी’ याकरताच तर तो अशा खोट्या शिकवणींचा प्रसार करुन आहे. (२ करिंथकर ४:४) याशिवाय त्रैक्याचे तत्व धर्मपुढाऱ्यांची आस्था पुरी करते ते या अर्थी की या तत्त्वामुळेच त्यांना लोकांवर आपला जम धरता येतो आणि याकरवीच ते हे प्रदर्शित करतात की, हे असे तत्त्व आहे जे केवळ वेदांत्यांनाच समजू शकते.—पहा योहान ८:४४.
तथापि, देवाविषयीचे अचूक ज्ञान बंधमुक्त करते. एकतर ते आपल्याला, देवाच्या वचनाविरुद्ध शिकवल्या जाणाऱ्या शिक्षणापासून आणि ज्या संस्था धर्मत्यागी बनल्या आहेत त्यापासून मुक्त करते. येशूने म्हटलेच होते की, “सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करील.”—योहान ८:३२.
देवाचा सार्वभौम या नात्याने आदर करुन आणि त्याच्या नियमांकरवी त्याची भक्ती करुन आपल्याला, तो लवकरच अभक्त ख्रिस्तीधर्मजगतावर जो दंड आणणार आहे तो टाळता येईल. याऐवजी, जेव्हा हे व्यवस्थीकरण संपुष्टात येईल तेव्हा देवाची मर्जी आपल्याला मिळणार याकडे आपली दृष्टी लागून राहीलः “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७.
[३१ पानांवरील चित्रं]
फ्रान्समधील ही शतकांची जुनी असणारी कलाकृती “कुमारी” मरीया हिला त्रैक्याकरवी मुकुटमंडीत करण्यात येत असल्याचे दाखविते. त्रैक्यावरील विश्वासाकरवी मरीयेला “देवाची माता” असे विभूषण प्राप्त झाले