व्हिडिओ पाहण्यासाठी

तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता

तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता

तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता

पवित्र शास्त्र विश्‍वासार्ह नाही असे काही लोक म्हणतात. त्यांच्या या दृष्टिकोणाला आता बहुव्याप्तपणे स्विकारले जात आहे. याच कारणास्तव आज बहुतेक लोक, पवित्र शास्त्र जे म्हणते त्याकडे भरवसा ठेवता येत नाही असे समजून त्याला तुच्छ लेखतात.

पण तेच, येशू ख्रिस्ताने देवाला केलेल्या प्रार्थनेत जे म्हटले त्यामुळे भरवसा निर्माण होतो. “तुझे वचन सत्य आहे” असे तो म्हणाला. शिवाय पवित्र शास्त्र सुद्धा, प्रत्यक्षात देवाकडून प्रेरित असल्याचा दावा स्वतःच करते.—योहान १७:१७; २ तिमथ्यी ३:१६.

या विषयी तुम्हाला काय वाटते? पवित्र शास्त्रावर भाव ठेवण्याजोगे काही सबळ कारण आहे का? किंवा पवित्र शास्त्र खरेच विश्‍वासार्ह नाही, स्वतःच विरूद्ध प्रतिपादन करणारे आणि विसंगत आहे का?

ते स्वतःच विरूद्ध प्रतिपादन करते का?

पवित्र शास्त्र स्वतःच विरूद्ध प्रतिपादन करते असा काहींनी दावा केला असला तरी या विषयी एखादे तरी उदाहरण कोणी प्रस्तुत केले आहे का? जे परिक्षणास तोंड देऊ शकेल असे एकही उदाहरण आज पर्यंत आम्हाला सापडू शकले नाही. हे खरे की, काही पवित्र शास्त्र अहवालात तफावती आहेत असे भासेल. तथापि, त्या काळची परिस्थिती व तपशील या विषयीचे अज्ञान हीच त्यामागील खरी समस्या आहे.

उदाहरणार्थ, काही लोक, “काईनाला बायको कोठे मिळाली?” असा प्रश्‍न विचारून पवित्र शास्त्रात विरूद्ध तऱ्‍हेचे प्रतिपादन आहे असे सुचवितील. आदाम व हव्वा यांना काइन व हाबेल एवढीच मुले होती असे त्यांनी गृहीत धरलेले असते. परंतु ही विचारधारा, पवित्र शास्त्र जे काही म्हणते त्याच्या गैरसमजूतीवर आधारलेली आहे. पवित्र शास्त्र सांगते की, आदामास “आणखी मुले व मुली झाल्या.” (उत्पत्ती ५:४) अशा प्रकारे काईनाने आपल्या कोणा बहिणीबरोबर वा भाचीबरोबर लग्न केले असावे हे स्पष्ट आहे.

बहुधा टिकाकार विरूद्ध प्रतिपादनाच्या शोधातच असतात व काही तर लगेच म्हणतील: ‘मत्तय हा पवित्र शास्त्रातील लेखक म्हणतो की एक सेनाधिकारी येशूकडे विनंति करावयाला आला पण लूक म्हणतो की, तशी विनंति करण्यासाठी प्रतिनिधींना पाठविण्यात आले. हे असे का? यापैकीचे कोणते बरोबर आहे?’ (मत्तय ८:५, ६; लूक ७:२, ३) यात खरीच तफावत आहे का?

लोकांचे काम वा कृति याचे श्रेय जो त्याविषयी जबाबदार असतो अशा कोणा एखाद्यास दिले जाते तेव्हा व्यवहारी माणूस त्याला तफावत समजत नाही. उदाहरणार्थ, कोणा रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम महापौराकरवी नियुक्‍त करण्यात आलेला कोणी इंजिनियर आणि त्याचा कामगार वर्ग करतो. पण वृत्तांतात मात्र असे वाचण्यात येते की हा रस्ता अमुक महापौरांनी बांधला तर तो वृत्तांत चुकीचा आहे असे म्हणाल का? मुळीच नाही! याकारणास्तव, कोणा सेनाधिकाऱ्‍याने येशूला विनंति केली असे मत्तयाने म्हणणे, पण तीच विनंति काही विशिष्ठ प्रतिनिधींमार्फत करण्यात आली असे लूकने लिहिणे यात विसंगति नाही.

जसजशी अधिक माहिती मिळते तसतशा पवित्र शास्त्राविषयी वरकरणी वाटणाऱ्‍या तफावती नाहीशा होतात.

इतिहास व विज्ञान

पवित्र शास्त्राच्या ऐतिहासिक अचूकतेविषयी एकेकाळी मोठा संशय होता. उदाहरणार्थ, टिकाकारांनी पवित्र शास्त्रात उल्लेखिण्यात आलेल्या, अश्‍शुरचा राजा सर्गोन, बाबेलचा बेलशस्सर आणि रोमी सुभेदार पंतय पिलात या सारख्या व्यर्क्‍तिच्या अस्तित्वाविषयीचा प्रश्‍न उपस्थित केला होता. तथापि, अलिकडेच करण्यात आलेल्या संशोधनामध्ये पवित्र शास्त्राच्या अनेक वृत्तांताची सत्यता पटविण्यात आली. त्यामुळे मोशे पर्लमॅन या इतिहासकारांनी लिहिले: “या [संशोधना]मुळे जुन्या कराराच्या ऐतिहासिक भागाविषयीच्या खरेपणाविषयी शंका धरणारे टिकाकार एकाएकी आपले मत बदलू लागले.”

आपल्याला पवित्र शास्त्रावर भाव ठेवायचा आहे तर विज्ञानाबाबतीतही ते अचूक आहे असे दिसले पाहिजे. ते तसे आहे का? काही काळापूर्वी शास्त्रज्ञांनी पवित्र शास्त्राच्या विरोधात असे ठासून सांगीतले की विश्‍वाला सुरुवातच नाही. तथापि, खगोलशास्त्रज्ञ रॉबर्ट जेस्ट्रो यांनी अलिकडेच काही नवी माहिती दिली, जी याचे खंडण करते. त्यांनी म्हटले: “खगोल शास्त्राच्या पुराव्यावरून जगाच्या सुरुवातीबद्दल पवित्र शास्त्राच्या दृष्टीकोणाशी सहमत होणारा निष्कर्ष निघतो असे आता आम्हाला दिसून येत आहे. त्यातील बारीक तपशील भिन्‍न असला तरी खगोलशास्त्रीय व उत्पत्तीतील पवित्र शास्त्रीय अहवाल यातील महत्वपूर्ण घटक एकच आहेत.”—उत्पत्ती १:१.

पृथ्वीच्या आकाराविषयी लोकांना वाटणारा दृष्टिकोणसुद्धा त्यांनी बदलला. द वर्ल्ड बुक एनसायक्लोपिडिआ म्हणते, “अनेक प्रवासात लागलेल्या शोधांमुळे असे दिसून आले की पृथ्वी गोल असून अनेक लोकांच्या समजूती सारखी सपाट नाही.” परंतु, पवित्र शास्त्र आधीपासूनच अचूक होते! या प्रवासाच्या २,००० वर्षाआधी पवित्र शास्त्राने यशया ४०:२२ मध्ये म्हटले होते: “हाच तो पृथ्वीच्या नभोमंडळावर [वर्तुळावर] आरूढ झाला आहे,” किंवा जसे इतर भाषांतरे म्हणतात त्याप्रमाणे, “पृथ्वीच्या गोलार्धावर(डुवे), “गोलाकार पृथ्वीवर” (मोफॅट).

अशाप्रकारे लोक जितके अधिक शिकतात तितका पवित्र शास्त्रावर भाव ठेवण्यासाठी अधिक पुरावा मिळतो. ब्रिटीश वस्तुसंग्रहालयाचे माजी संचालक सर फ्रेडरीक केनयॉन यांनी लिहिले: “वाढत्या ज्ञानामुळे पवित्रशास्त्राकरवी फायदाच होतो हे जसे विश्‍वासाने कळते तसेच आतापर्यंत संपादन केलेल्या संशोधनाच्या फल निष्पत्तीतूनही दिसून येते.”

भविष्याचे भाकित करणे

पण मग, पवित्र शास्त्र भविष्याविषयीचे जे भाकित करते आणि “नीतीमान नवे आकाश व नवी पृथ्वी” यांचे अभिवचन देते त्यावर आपल्याला खराच भाव ठेवता येईल का? (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४) पवित्र शास्त्राच्या विश्‍वासार्हतेविषयीचा इतिहास कसा आहे बरे? वेळोवळी, शेकडो वर्षे आधी सांगितलेले भविष्यवाद अगदी तंतोतंपणे पूर्ण झाले!

उदाहरणार्थ, प्रबळ बाबेलोनी साम्राज्याचे पतन होईल असे पवित्र शास्त्राने, ते प्रत्यक्षात घडण्याच्या २०० वर्षे आधी भाकित केले होते. एवढेच काय पण, मेद व त्याच्याशी संधान बांधलेले पर्शियन साम्राज्य हे विजेते असतील असे नावानिशी सांगितले होते. तसेच पारसाचा राजा कोरेश हा जन्मण्यापूर्वी तोच प्रमुख विजेता असणार असे भाकित पवित्र शास्त्राने केले होते. त्यात म्हटले होते की, बाबेलोनास संरक्षण देणारे पाणी, युफ्रेटीस नदी, “आटवीन” आणि “[बाबेलोनच्या] वेशी बंद राहणार नाहीत.”—यिर्मया ५०:३८; यशया १३:१७–१९; ४४:२७–४५:१.

या सर्व घटना तंतोतंत पूर्ण झाल्या व तसा अहवाल इतिहासकार हेरोडोटसने कळविला. पवित्र शास्त्राने आणखी भाकित केले की बाबेल उद्‌ध्वस्त होईल व त्यात कोणीही वसणार नाही. आणि नेमके तेच घडले. आज बाबेल निर्जन टेकड्या झाले आहे. (यशया १३:२०–२२; यिर्मया ५१:३७, ४१–४३) याशिवाय पवित्र शास्त्रात आणखी भविष्यवाद आहेत ज्यांची नाट्यमयरित्या पूर्णता झाली.

तर मग पवित्र शास्त्र आपल्या सध्याच्या जागतिक व्यवस्थीकरणाविषयी काय भाकित करते? ते म्हणते: “या जगाचे शेवटले युग मोठ्या त्रासाच्या कठीण काळाचे असेल. माणसाला दुसरे काही नव्हे तर पैसा व मीपणा प्रिय वाटेल. ते फारच उध्दट, गर्विष्ठ व निंदा करणारे बनतील. त्यांच्यापाशी पालकांविषयीचा आदर नसेल, कृतज्ञता, दया आणि कळवळाही नसेल. . . . देवाच्या जागी सुखविलास ठेवणारी अशी ती माणसे असतील. आपण स्वतः खूपच धार्मिक आहोत असे भासविणारी पण प्रत्यक्षात तसे नसणारी अशी ती असतील.”—२ तिमथ्यी ३:१–५, द न्यू इंग्लिश बायबल.

या सर्व गोष्टींची आज आम्ही पूर्णता पाहत आहोत हे नक्की! तथापि, पवित्र शास्त्र “या जगाचे शेवटले युग” याबद्दल आणखी असे म्हणते की, “राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यांवर राज्य उठेल व जागोजागी दुष्काळ . . . होतील”, तसेच “मोठमोठे भूमिकंप होतील व जागोजागी मऱ्‍या येतील.”—मत्तय २४:७; लूक २१:११.

आज हे पवित्र शास्त्रीय भविष्यवाद नक्कीच खऱ्‍या अर्थी पूर्ण होत आहेत! तर मग, त्या अद्याप पूर्ण होणाऱ्‍या भविष्यवादाबद्दल काय जे म्हणतात की: “नीतीमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील,” आणि “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील . . . ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत”?—स्तोत्रसंहिता ३७:२९; यशया २:४.

‘हे खरे होईल असे मुळीच वाटत नाही,’ असे काही म्हणतील. तथापि, ज्या गोष्टींचे अभिवचन निर्मात्याने आमच्यासाठी देऊन ठेविले आहे त्याविषयी साशंक बनण्याचे कसलेही कारण नाही. त्याच्या वचनावर आम्हाला भरवसा ठेवता येईल! (तीत १:२) आणखी पुराव्याचे परीक्षण करण्यामुळे तुम्हाला याविषयी खात्री पटू शकेल.

अन्यथा सूचित केले नसल्यास येथे वापरलेले बायबल भाषांतर द होली बायबल मराठी—आर. व्ही. हे आहे.

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

“वाढत्या ज्ञानामुळे पवित्र शास्त्राकरवी फायदाच होतो हे जसे विश्‍वासाने कळते तसेच आतापर्यंत संपादन केलेल्या संशोधनाच्या फल निष्पत्तीतूनही दिसून येते.”