व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनंतकालचे जीवन जगणे नुसते स्वप्न नव्हे

अनंतकालचे जीवन जगणे नुसते स्वप्न नव्हे

प्रकरण १

अनंतकालचे जीवन जगणे नुसते स्वप्न नव्हे

१, २. या पृथ्वीवर आनंदात अनंतकाल जगणे शक्य आहे यावर विश्‍वास ठेवणे कठीण का वाटते?

 पृथ्वीतलावर आनंद—तो अल्पकाळही उपभोगता येईल अशी शक्यता दिसत नाही. आजार, वार्धक्य, उपासमार, गुन्हेगारी व इतरही अनेक समस्या बहुधा जीवन दुःखी करून टाकतात. तेव्हा, तुम्ही म्हणाल की, या पृथ्वीवरच नंदनवनातील अनंतकाल जीवन जगण्याविषयी बोलणे म्हणजे सत्याकडे डोळेझाक करण्यासारखेच आहे. तुम्हाला तो वेळेचा अपव्यय वाटेल. अनंतकाल जीवन जगणे हे एक स्वप्न वाटेल.

अनेक लोक तुमच्याशी सहमत होतील यात शंका नाही. तर मग, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल अशी खात्री आम्हास का वाटावी? अनंतकालचे जीवन हे स्वप्न नव्हे असा विश्‍वास आम्हाला का वाटू द्यावा?

आम्हास विश्‍वास वाटण्याचे कारण

३. मानवांनी पृथ्वीवर आनंदात राहावे असे देवाला कशावरुन वाटते?

आम्हाला असा विश्‍वास वाटतो कारण एका सर्वोच्च शक्‍तीने, सर्वसमर्थ देवाने, आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्‍या सर्व वस्तूंसहीत ही पृथ्वी उत्पन्‍न केली आहे. त्याने ही पृथ्वी अगदी आपल्यासाठी घडवली! या पृथ्वीरुपी घरात अनंतकाल जीवनाचा आस्वाद उत्तम रितीने घेता यावा अशीच त्याने पुरुष व स्त्रीची निर्मिती केली.—स्तोत्रसंहिता ११५:१६.

४. मानवी शरीराविषयी शास्त्रज्ञांना असे काय कळले आहे की ज्यावरुन शरीर अनंतकाल जगण्यासाठी निर्माण केले होते असे दिसून येते?

मानवी शरीराच्या, स्वतःच्या नूतनीकरण करण्याच्या क्षमतेबद्दल शास्त्रज्ञांना पूर्वीपासून माहिती आहे. जरुरीप्रमाणे शरीरातील पेशी अद्‌भूतरित्या बदलल्या किंवा दुरुस्त केल्या जातात. तसे पाहिल्यास ही क्रिया सतत चालू राहायला हवी. पण तसे होत नाही, व का नाही, ते शास्त्रज्ञांना सांगता येत नाही. माणसे वृद्ध का होतात हे त्यांना अजूनही नीटसे कळलेले नाही. योग्य त्या वातावरणात माणसांना अनंतकाल जगता यायला हवे असेही ते म्हणतात.—स्तोत्रसंहिता १३९:१४.

५. पृथ्वीविषयी देवाच्या उद्देशाबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?

तर मग, पृथ्वीवर माणसांनी आनंदात अनंतकाल जगावे असा खरोखरच देवाचा उद्देश आहे का? तसे असेल तर अनंतकालिक जीवन ही काही नुसती इच्छा वा स्वप्न नाही—ते खात्रीने मिळेलच. ज्यामध्ये देवाच्या उद्देशाबद्दल लिहिले आहे, ते पवित्र शास्त्र याविषयी काय म्हणते? देवाला “पृथ्वीचा घडविणारा व कर्ता” असे संबोधून ते पुढे म्हणतेः “त्याने तिची स्थापना केली. त्याने ती निर्जन रहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडली.”—यशया ४५:१८.

६. (अ) पृथ्वीवरील आजची परिस्थिती कशी आहे? (ब) ती अशीच असावी असा देवाचा उद्देश होता का?

देवाला जशी हवी होती तशीच या पृथ्वीवरील वस्ती आहे असे तुम्हास वाटते का? पृथ्वीच्या बहुतेक सर्व भागात लोकांनी वस्ती केली आहे हे खरे. परंतु, त्यांच्या निर्मात्याच्या उद्देशाप्रमाणे आनंदाने, उत्तम रितीने, ऐक्याने एक कुटुंब असे ते राहात आहेत का? आज जग विभागलेले आहे. त्यात द्वेष आहे, गुन्हेगारी आहे, युद्ध आहे. लाखो लोक उपाशी व आजारी आहेत. इतर अनेकांना घर, काम-धंदा व खर्चाच्या चिंता आहेत. यापैकी एकही गोष्ट देवाला प्रतिष्ठा मिळवून देत नाही. तर मग, सर्वसमर्थ देवाच्या मूळ उद्देशानुसार जग वसलेले नाही हे उघड आहे.

७. पहिले मानवी जोडपे निर्माण केल्यावर देवाचा पृथ्वीविषयी काय उद्देश होता?

पहिल्या मानवी जोडप्याला निर्माण केल्यानंतर देवाने त्यांना पृथ्वीवरील नंदनवनात ठेवले. त्यांनी पृथ्वीवर अनंतकाल जीवनाचा आस्वाद घ्यावा असे त्याला वाटत होते. त्यांनी आपल्या नंदनवनाचा विस्तार सबंध पृथ्वीवर करावा अशी त्याची इच्छा होती. देवाने त्यांना दिलेल्या आज्ञेवरुन हेच दिसून येतेः “फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा; पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” (उत्पत्ती १:२८) काळाच्या ओघात ही सबंध पृथ्वी शांती व आनंदात ऐक्याने राहणाऱ्‍या नीतीमान मानवी कुटुंबाच्या सत्तेखाली आणण्याचा देवाचा उद्देश होता.

८. पहिल्या मानवी जोडप्याने देवाची अवज्ञा केली असली तरी देवाचा पृथ्वीविषयी हेतू बदललेला नाही असे का म्हणता येते?

पहिल्या मानवी जोडप्याने देवाची अवज्ञा करुन स्वतःला अनंतकाल जीवनास अपात्र ठरवले असले तरी देवाचा मूळ उद्देश बदलला नाही. तो पूर्ण झालाच पाहिजे! (यशया ५५:११) पवित्र शास्त्राचे वचन आहे की, “नीतीमान पृथ्वीचे वतन पावतील. तिच्यात ते सर्वदा वास करतील.” (स्तोत्रसंहिता ३७:२९) देवाची सेवा करणाऱ्‍यांना अनंतकाल जीवन देण्याच्या त्याच्या योजनेचा पवित्र शास्त्र अनेकदा उल्लेख करते.—योहान ३:१४-१६, ३६; यशया २५:८; प्रकटीकरण २१:३, ४.

जगण्याची इच्छा—कोठे?

९. (अ) लोकांची स्वाभाविक इच्छा काय असते? (ब) ‘देवाने त्यांच्या मनात अनंतकालाविषयी कल्पना उत्पन्‍न केली आहे’ या शास्त्रवचनाचा अर्थ काय?

आपल्याला अनंतकाल जीवन मिळावे असा देवाचा जो उद्देश आहे त्याचा आम्हाला खरोखरच आनंद वाटला पाहिजे. कारण, विचार कराः जर तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे की, तुम्हाला कोणत्या तारखेला मरण हवे आहे? आपल्याला निवड करताच येणार नाही, होय ना? तुम्हाला मरावेसे वाटत नाही व सर्वसाधारण आरोग्य असलेल्या इतर कोणाला सुद्धा मरावेसे वाटणार नाही. देवाने आपल्याला निर्माण करताना जगण्याची इच्छा दिली आहे, मरण्याची नव्हे. देवाच्या निर्मितीबद्दल सांगताना पवित्र शास्त्र म्हणतेः “त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे.” (उपदेशक ३:११) याचा अर्थ काय? न मरता सतत जगत राहावे अशी सर्वसाधारण माणसाची इच्छा असते असा याचा अर्थ आहे. अनंतकालिक भविष्याच्या या लालसेमुळेच तारुण्य टिकविण्याच्या अनेक मार्गांचा मानवाने शोध घेतला आहे.

१०. (अ) माणसाला कोठे अनंतकाल रहावे असे स्वभावतः वाटत असते? (ब) आपल्याला पृथ्वीवर अनंतकाल राहता यावे यासाठी योग्य ती कृती देव करील असा भरवसा आपल्याला का वाटावा?

१० साधारणतः, माणसांना अनंतकाल कोठे रहावेसे वाटते बरे? जेथे त्यांना राहण्याची सवय झाली आहे, तेथेच, म्हणजे या पृथ्वीवर. माणूस पृथ्वीकरता व पृथ्वी माणसांसाठी बनवली आहे. (उत्पत्ती २:८, ९, १५) पवित्र शास्त्र म्हणतेः “तू [देवाने] पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहेस की, ती कधीही ढळणार नाही.” (स्तोत्रसंहिता १०४:५) पृथ्वी ही कायमची स्थापिली गेली आहे तर मानवही अनंतकाळ जगलाच पाहिजे. अनंतकाल जगण्याच्या इच्छेसह मानवाची निर्मिती करुन, त्याची ती इच्छा अपूर्ण राहील असे तो प्रेमळ ईश्‍वर नक्कीच करणार नाही!—१ योहान ४:८; स्तोत्रसंहिता १३३:३.

तुम्ही इच्छित असलेल्या प्रकारचे जीवन

११. लोकांना अनंतकाल, आरोग्यसंपन्‍न जीवन शक्य आहे याविषयी पवित्र शास्त्र काय म्हणते?

११ पुढील पृष्ठाकडे पहा. त्यातले लोक कोणत्या प्रकारच्या जीवनाचा आस्वाद घेत आहेत? आपणही त्यांच्यामध्ये एक असावे असे तुम्हाला वाटणार नाही का? तुम्ही नक्कीच हो, म्हणाल! पहा, ते किती आरोग्यसंपन्‍न व तरुण दिसतात! हे लोक हजारो वर्षे वयाचे आहेत असे सांगितल्यास तुम्ही त्यावर विश्‍वास ठेवाल का? पवित्र शास्त्र सांगते की, वृद्ध पुन्हा तरुण होतील, रोगी बरे होतील; मूके, अंध, लुळे, बहिरे या सर्वांच्या विकृती बऱ्‍या होतील. पृथ्वीवर असताना, येशू ख्रिस्ताने अनेक व्याधिग्रस्त लोकांना बरे करण्याचे चमत्कार केले. त्याकरवी, नजीकच्या या उज्वल भविष्यात सर्व मानवांना उत्तम आरोग्य कसे प्राप्त होईल हेच तो दर्शवीत होता.—ईयोब ३३:२५; यशया ३३:२४; ३५:५, ६; मत्तय १५:३०, ३१.

१२. या चित्रांमध्ये आपल्याला कशी परिस्थिती दिसते?

१२ पहा, हे रम्य उपवनघर. ते किती सुरेख आहे! ख्रिस्ताने वचन दिल्याप्रमाणे ते खरोखर त्या नंदनवनासारखे आहे, जे अवज्ञा करणाऱ्‍या पहिल्या मानवी जोडप्याने गमाविले. (लूक २३:४३) तेथे जाणवणाऱ्‍या शांती व ऐक्याकडे विशेष लक्ष द्या. गोरे, काळे, पिवळे—सर्व वर्णाचे लोक एका कुटुंबासारखे राहात आहेत. प्राणीही अगदी शांतीने राहात आहेत. पहा, तो चिमुकला सिंहाशी कसा खेळत आहे. पण घाबरण्याचे काहीच कारण दिसत नाही. या बाबतीत आपला निर्माता म्हणतोः “चित्ता करडाजवळ बसेल; वासरु, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील. त्यांस लहान मूल वळील. . . . सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तान्हे मूल नागाच्या बिळाजवळ खेळेल.”—यशया ११:६-९.

१३. देवाचे उद्देश अमलात आल्यावर जगातून कोणत्या गोष्टी नाहीशा होतील?

१३ देवाने मानवासाठी हेतुपूर्वक उद्देशिलेल्या नंदनवनात आनंदाला पारावार नसेल. क्षुधाशमनासाठी पृथ्वी उत्तम उपज देईल. पुन्हा कधी कोणीही उपाशी राहणार नाही. (स्तोत्रसंहिता ७२:१६; ६७:६) युद्धे, गुन्हे, दंगे, एवढेच काय पण द्वेष व स्वार्थही भूतकाळात जमा होतील. होय, ते कायमचे नष्ट होतील! (स्तोत्रसंहिता ४६:८, ९; ३७:९-११) हे सर्व शक्य आहे यावर तुमचा विश्‍वास आहे का?

१४. देव अडीअडचणींचा अंत करील असा विश्‍वास तुम्हाला का वाटतो?

१४ जरा विचार कराः जर तुमच्यात तशी शक्‍ती असती तर मानवी यातनांचा तुम्ही अंत केला नसता का? तसेच माणसांना हवीहवीशी वाटणारी परिस्थिती तुम्ही निर्माण करणार नाही का? नक्कीच कराल! आपला प्रेमळ स्वर्गीय पिताहि अगदी तेच करील. तो आपल्या गरजा व अभिलाषा पूर्ण करील. कारण देवाविषयी स्तोत्रसंहिता १४५:१६ म्हणतेः “तू आपली मूठ उघडून सर्व प्राणीमात्रांची इच्छा पूर्ण करतोस.” परंतु, हे सर्व कधी होईल?

भव्य आशीर्वाद समीप आहेत

१५. (अ) जगाच्या अंताचा पृथ्वीवर काय परिणाम होईल? (ब) त्याचा दुष्ट लोकांवर काय परिणाम होईल? (क) देवाच्या इच्छेप्रमाणे करणाऱ्‍यांवर याचा काय परिणाम होईल?

१५ हे सर्व अद्‌भुत आशीर्वाद पृथ्वीवर आणण्यासाठी, देवाने दुष्टपणा व त्याला कारणीभूत असलेल्या सर्वांचा नाश करण्याचे वचन दिले आहे. त्याचवेळी त्याची सेवा करणाऱ्‍यांचे तो रक्षणही करील. कारण पवित्र शास्त्र म्हणतेः “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) केवढा हा बदल असेल! जगाचा अंत म्हणजे या पृथ्वीचा अंत नव्हे. तर नोहाच्या काळातील जलप्रलयाप्रमाणे, तो फक्‍त दुष्ट लोक व त्यांच्या चालीरितींचा अंत असेल. पण जे देवाची सेवा करतात ते त्या अंतामधून वाचतील. मग पृथ्वीवरील नवीन स्वच्छ वातावरणात सर्व अपायकारक व जुलमी लोकांपासून त्यांना सुटका मिळेल.—मत्तय २४:३, ३७-३९; नीतीसूत्रे २:२१, २२.

१६. “शेवटल्या काळी” कोणत्या घटना होतील असे भाकित केले होते?

१६ पण कोणी म्हणतीलः ‘परिस्थिती तर सुधारण्याऐवजी अधिकाधिक बिघडतच चालली आहे. मग तो भव्य बदल नजीक आहे याची आम्ही कशी काय खात्री बाळगू शकतो?’ वस्तुतः येशू ख्रिस्ताने अशा अनेक गोष्टींचे भाकित केले होते, ज्या त्याच्या भावी अनुयायांनी ध्यानात आणाव्या अशी अपेक्षा होती. याकरवी, या जगाचा अंत करण्याची देवाची वेळ आलेली आहे असे त्या घटनांवरुन त्यांना समजणार होते. येशू म्हणाला की, या व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या दिवसात मोठ-मोठ्या लढाया, अन्‍नाचा तुटवडा, मोठे भूकंप, वाढती गुन्हेगारी, दिवसेंदिवस मंदावणारी प्रीती या गोष्टी नजरेस येतील. (मत्तय २४:३-१२) तो म्हणाला, तेव्हा “राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील.” (लूक २१:२५) तसेच पवित्र शास्त्र पुढे म्हणतेः “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील.” (२ तीमथ्य ३:१-५) आपण सध्या याच घटनांचा अनुभव घेत आहोत, नाही का?

१७. विचारवंत व्यक्‍ती आजच्या परिस्थितीबद्दल काय म्हणतात?

१७ जागतिक घटनांच्या अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे की काहीतरी मोठा बदल लवकरच घडून येण्याच्या बेतात आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेतील मियामी शहराच्या हेरल्ड या वृत्तपत्राच्या संपादकांनी असे म्हटलेः “थोडीशी अक्कल असलेल्या कोणाही व्यक्‍तीला, गेल्या काही वर्षांतील भयंकर घटना पाहून कळू शकेल की, हे जग एका ऐतिहासिक बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहे. . . . मानवाच्या राहणीत त्यामुळे आमूलाग्र बदल घडून येईल.” त्याच सुरात अमेरिकन लेखक लुईस ममफोर्ड म्हणालेः “संस्कृतीची निश्‍चित अधोगती होत आहे, . . . पूर्वी संस्कृतीचा ऱ्‍हास झाल्यास ती एक स्थानिक घटना असे. आता आधुनिक दळणवळणाच्या साधनांनी व परस्पर जवळच्या संबंधानी जग आकुंचन पावले असताना संस्कृतीचा ऱ्‍हास झाल्यावर सर्व जगच रसातळाला जाईल.”

१८. (अ) जागतिक परिस्थिती भविष्याबद्दल काय दर्शविते? (ब) आजच्या शासनांची जागा कशाने भरुन निघेल?

१८ आजची जागतिक परिस्थितीच दाखविते की, आपण या सबंध व्यवस्थेच्या नाशाच्या काळात आहोत. होय, आता लवकरच पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांपासून देव तिला मुक्‍त करील. (प्रकटीकरण ११:१८) सध्याची शासने हटवून, सर्व पृथ्वीवर सत्ता चालविण्यासाठी, तो आपल्या राज्याचा मार्ग मोकळा करील. येशूने आपल्या शिष्यांना ज्याविषयी प्रार्थना करण्यास शिकवली तेच हे राज्य-सरकार होय.—दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०.

१९. अनंतकाल जगायचे असल्यास आपण काय केले पाहिजे?

१९ तुमचा, जीवनावर लोभ असेल व देवाच्या अधिपत्याखाली पृथ्वीवर अनंतकाल जीवनाची अभिलाषा धरत असाल, तर देव, त्याचे हेतू व त्याने धरलेल्या अपेक्षा यांची अचूक माहिती मिळविण्याची तुम्ही त्वरा केली पाहिजे. देवाला प्रार्थना करताना येशू ख्रिस्त म्हणालाः “सार्वकालिक जीवन हेच की, तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे ज्ञान त्यांनी संपादावे.” (योहान १७:३) आपल्याला अनंतकाल जगता येईल—ते निव्वळ स्वप्न नव्हे, ही गोष्ट किती आनंददायक आहे! परंतु देवाच्या या उत्तम आशीर्वादांचा आस्वाद आपल्याला मिळू नये अशा खटपटीत जो आहे त्या शत्रूची आपण माहिती करुन घेतली पाहिजे.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्रं]

जग असे असावे अशी देवाची इच्छा होती का?

[११ पानांवरील पानभरुन चित्र]