व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण दहा आज्ञांच्या अधीन आहोत का?

आपण दहा आज्ञांच्या अधीन आहोत का?

प्रकरण २४

आपण दहा आज्ञांच्या अधीन आहोत का?

१. मोशेने लोकांना कोणते नियमशास्त्र दिले?

 आपण कोणते नियम पाळावेत अशी यहोवा देवाची अपेक्षा आहे? पवित्र शास्त्र ज्याला “मोशेचे नियमशास्त्र” अथवा “नियमशास्त्र” म्हणते ते आपण पाळले पाहिजे का? (१ राजे २:३; तीतास ३:९) यालाच ‘यहोवाचे नियमशास्त्र’ असेही म्हटले जाते, कारण ते त्याने दिले होते. (१ इतिहास १६:४०) मोशेने ते केवळ लोकांपर्यंत पोहंचविण्याचे काम केले.

२. या नियमशास्त्रात कशाकशाचा समावेश होतो?

मोशेच्या नियमशास्त्रात प्रमुख अशा १० आज्ञा असून ६०० पेक्षा अधिक वेगवेगळे नियम वा आज्ञा आहेत. मोशेने सांगितले त्याप्रमाणे “त्याने [यहोवाने] तुम्हाला आपला करार विदित करून तो पाळण्याची आज्ञा केली; हा करार म्हणजे त्या दहा आज्ञा होत. त्या त्याने दोन दगडी पाट्यांवर लिहिल्या.” (अनुवाद ४:१३; निर्गम ३१:१८) पण यहोवाने दहा आज्ञांसह कोणाला नियमशास्त्र दिले होते? ते त्याने सर्व मानवजातीला दिले का? नियमशास्त्राचा हेतू काय होता?

इस्राएलांना विशेष हेतूने दिले

३. हे नियमशास्त्र केवळ इस्राएलालाच दिलेले होते हे आपल्याला कसे कळते?

नियमशास्त्र सर्व मानवजातीला दिलेले नव्हते. यहोवाने योकोबाच्या वंशजांशी करार केला होता. ते वंशजच इस्राएलाचे राष्ट्र बनले. यहोवाने आपले नियम केवळ याच राष्ट्राला दिले. हे पवित्र शास्त्रात अनुवाद ५:१-३ व स्तोत्रसंहिता १४७:१९, २० मध्ये स्पष्ट केले आहे.

४. इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र का देण्यात आले?

प्रेषित पौलाने असा प्रश्‍न केला: “तर मग, नियमशास्त्र कशासाठी?” होय, देवाने कोणत्या हेतूने इस्राएलांना नियमशास्त्र दिले होते बरे? पौलाने उत्तर देले: “ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनामुळे लावून देण्यात आले. . . .  म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचविणारे बालरक्षक [किंवा, शिक्षक] होते.” (गलतीकर ३:१९-२४) ख्रिस्त येईल तेव्हा त्याचा स्वीकार करण्यास तयार असावे म्हणून इस्राएली लोकांचे संरक्षण व मार्गदर्शन करण्याचा नियमशास्त्राचा खास उद्देश होता. नियमशास्त्रात सांगितलेले अनेक बली, इस्राएल लोक पापी असून त्यांना एका उद्धारकाची गरज होती हे आठवण करून देत होते.—इब्रीयांस १०:१-४.

“ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे”

५. ख्रिस्त येऊन आपल्यासाठी मृत्यु पावल्यानंतर नियमशास्त्राचे काय झाले?

तो उद्धरकर्ता हा निश्‍चये येशू ख्रिस्त होता व हेच त्याच्या जन्माच्या वेळी देवदूताने घोषित केले.(लूक २:८-१४) म्हणून जेव्हा ख्रिस्त आला व त्याने आपले परिपूर्ण जीवन अर्पण केले तेव्हा नियमशास्त्राचे काय झाले? ते काढून टाकण्यात आले. “आपण ह्‍यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही,” असे पौलाने विवेचीत केले. (गलतीकर ३:२५) नियमशास्त्र काढून टाकल्यामुळे इस्राएली लोकांना दिलासा मिळाला. कारण नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात कमी पडल्याने ते सर्व लोक पापी आहेत असे निदर्शनास आणले गेले. यास्तव पौल म्हणालाः “त्याने [ख्रिस्ताने] आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरुन सोडवले.” (गलतीकर ३:१०-१४) यामुळेच पवित्र शास्त्र म्हणते की, “ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे.”—रोमकर १०:४; ६:१४.

६. (अ) नियमशास्त्र संपुष्टात आल्याने इस्राएल व इस्राएलेत्तर लोकांवर काय परिणाम झाला व का? (ब) यहोवाने नियमशास्त्राबाबत काय कृती केली?

इस्राएली लोक व नियमशास्त्राच्या अधीन नसलेल्या इतर राष्ट्रातील लोक यांच्यामध्ये नियमशास्त्र एखाद्या अडथळ्याप्रमाणे अथवा “भिंती”प्रमाणे उभे होते. तरीपण, ख्रिस्ताने आपल्या जीवनाचे यज्ञार्पण केल्यामुळे “वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र. ह्‍यासाठी की स्वतःच्या ठायी दोघांचा [इस्राएल व इस्राएलेत्तर यांचा] एक नवा मानव निर्माण” करावा. (इफिसकर २:११-१८) मोशेच्या नियमशास्त्राबाबत यहोवा देवाने स्वतः केलेल्या कृतीबद्दल आम्हाला असे वाचावयास मिळतेः “त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्याविरुद्ध असलेले [कारण ते इस्राएली लोकांना पापी म्हणून दोषी ठरवीत होते] . . . विधींचे [ज्यात दहा आज्ञांचाही समावेश होतो] ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून ते रद्द केले.” (कलस्सैकर २:१३, १४) अशा रितीने ख्रिस्ताच्या परिपूर्ण यज्ञार्पणाने नियमशास्त्र संपुष्टात आणले गेले.

७, ८. नियमशास्त्र दोन भागात विभागलेले नाही हे आपल्याला कसे कळते?

परंतु काही लोक म्हणतात की, नियमशास्त्राचे दोन भाग आहेतः दहा आज्ञा व बाकीचे नियम. त्यांचे म्हणणे आहे की, हे बाकीचे नियम संपले आहेत, परंतु दहा आज्ञा अजूनही लागू आहेत. पण ते खरे नाही. डोंगरावरील प्रवचनात येशूने दहा आज्ञा तसेच इतर नियमांचाही उल्लेख केला, त्याने त्यामध्ये फरक केला नाही. याद्वारे, येशूने दाखविले की, मोशेचे नियमशास्त्र दोन भागात विभागलेले नाही.—मत्तय ५:२१-४२.

तसेच, देवाने प्रेषित पौलाला जे लिहिण्यास प्रेरणा दिली त्याचीही नोंद घ्याः “आपण नियमशास्त्रापासून मुक्‍त झालो आहोत.” तर मग, यहुदी दहा आज्ञा सोडून इतर नियमांपासूनच मुक्‍त झाले होते का? नाही, कारण पौल पुढे काय म्हणतो ते पहाः “मला पापाची ओळख नियमशास्त्रावाचून कशानेच झाली नसती. ‘लोभ धरु नको,’ असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते.” (रोमकर ७:६, ७; निर्गम २०:१७) “लोभ धरु नको” ही दहा आज्ञांमधील शेवटची आज्ञा असल्याने इस्राएली लोक दहा आज्ञांपासून मुक्‍त करण्यात आले होते हे ओघानेच येते.

९. साप्ताहिक शब्बाथाचा नियम देखील काढून टाकण्यात आल्याचे कशावरून केळते?

याचा अर्थ, दहा आज्ञांमधील, साप्ताहिक शब्बाथ पाळण्याबाबतची चवथी आज्ञा देखील रद्द करण्यात आली असा त्याचा अर्थ आहे का? होय, असाच त्याचा अर्थ होतो. पवित्र शास्त्रात गलतीकर ४:८-११ व कलस्सैकर २:१६, १७ मध्ये जे सांगितले आहे त्यानुसार ख्रिस्ती लोक देवाने इस्राएलांना दिलेले नियम, ज्यामध्ये साप्ताहिक शब्बाथाचे तसेच वर्षातील काही विशेष दिवस पाळण्याचे आचरण समाविष्ट आहे, त्यांच्या अधीन नाहीत. ख्रिश्‍चनांनी साप्ताहिक शब्बाथ पाळण्याची काही गरज नाही हे रोमकर १४:५ वरून देखील स्पष्ट दिसते.

ख्रिश्‍चनांना लागू होणारे नियम

१०. (अ) ख्रिश्‍चन कोणत्या नियमांच्या अधीन आहेत? (ब) यातील बरेचसे नियम कोठून घेण्यात आले आहेत, आणि ते तेथून घेण्यात आले हे वाजवी का आहे?

१० ख्रिश्‍चन आता दहा आज्ञांच्या अधीन नसल्याने त्यांनी कोणतेच नियम पाळण्याची गरज नाही असा त्याचा अर्थ आहे का? मुळीच नाही. येशूने आपल्या परिपूर्ण जीवनाच्या अधिक चांगल्या बलिदानावर आधारीत असा “नवा करार” प्रस्थापित केला आहे. या नव्या कराराखाली ख्रिश्‍चन आहेत व त्यामुळे ते ख्रिस्ती नियमांच्या अधीन आहेत. (इब्रीयांस ८:७-२३; लूक २२:२०) यातील अनेक नियम मोशेच्या नियमशास्त्रातून घेतले आहेत. यात अनपेक्षित वा विचित्र असे काहीच नाही. नवीन सरकारने एखाद्या देशाच्या शासनाचा ताबा घेतल्यास अनेकदा असेच होते. आधीच्या सरकारची घटना रद्द करून नवीन घटना तिची जागा घेण्याची शक्यता आहे, पण नव्या घटनेत जुन्या घटनेचे अनेक नियम तसेच ठेवले जाऊ शकतात. याचप्रमाणे, नियमशास्त्र संपुष्टात आले, परंतु त्यातील अनेक मूलभूत नियम व तत्त्वे ख्रिस्ती धर्मात घेतली गेली.

११. ख्रिश्‍चनांना दिलेले कोणते नियम वा कोणत्या शिकवणी दहा आज्ञांसारख्याच आहेत?

११ याचा पडताळा करण्यासाठी पान २०३ वर देण्यात आलेल्या दहा आज्ञा पहा व पुढे देण्यात आलेले ख्रिस्ती नियम व शिकवणी यांची त्याच्याबरोबर तुलना करून बघा. “यहोवा तुझा देव ह्‍याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर.” (मत्तय ४:१०; १ करिंथकर १०:२०-२२) “तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर राखा.” (१ योहान ५:२१; १ करिंथकर १०:१४) “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जावो [त्याची अवहेलना न होवो, ते व्यर्थ घेतले न जावो].” (मत्तय ६:९) “मुलांनो, . . . आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा.” (इफिसकर ६:१, २) याखेरीज, खून, व्याभिचार, चोरी, खोटे बोलणे व लोभ धरणे या गोष्टीही ख्रिश्‍चनांना देण्यात आलेल्या नियमांविरुद्ध आहेत.—प्रकटीकरण २१:८; १ योहान ३:१५; इब्रीयांस १३:४; १ थेस्सलनीकाकर ४:३-७; इफिसकर ४:२५, २८; १ करिंथकर ६:९-११; लूक १२:१५; कलस्सैकर ३:५.

१२. शब्बाथाचे तत्त्व ख्रिस्ती व्यवस्थेमध्ये कशाप्रकारे घेतले गेले आहे?

१२ साप्ताहिक शब्बाथ पाळण्याची आज्ञा ख्रिश्‍चनांना दिलेली नसली तरी तिच्यापासून आपल्याला बरेचसे शिकता येते. इस्राएली लोकांना खरोखरीची [शारीरिक] विश्रांती मिळत आसे. पण ख्रिश्‍चनांनी तर आध्यात्मिक विश्रांती घेतली पाहिजे. ती कशी? विश्‍वास व आज्ञाधारकपणामुळे खरे ख्रिस्ती आपली स्वार्थी कृत्ये सोडून देतात. या स्वार्थी कृत्यात स्वतःचे नीतिमत्त्व स्थापन करण्याचा प्रयत्न समाविष्ट असतो. (इब्रीयांस ४:१०) ही आध्यात्मिक विश्रांती आठवड्यातून एकाच दिवशी नव्हे तर सर्व सात दिवस घेतली जाते. आध्यात्मिक गोष्टींकरता एक दिवस वेगळा नेमण्याच्या शब्बाथाच्या नियमामुळे आपला सर्व वेळ भौतिक फायद्यासाठी घालवण्यापासून इस्राएलांचे संरक्षण झाले. हेच तत्त्व आध्यात्मिकरित्या दररोज आचरण्यात आणल्याने अधिभौतिकवादापासून अधिक परिणामकारक संरक्षण होते.

१३. (अ) ख्रिश्‍चनांना कोणता नियम पूर्ण करण्याचे उत्तेजन दिले आहे व ते तो कसा पूर्ण करतात? (ब) येशूने कोणत्या नियमावर भर देला? (क) मोशेच्या संपूर्ण नियमशास्त्राचा पाया कोणत्या नियमावर आधारलेला आहे?

१३ अशाप्रकारे, दहा आज्ञा पाळण्यापेक्षा “ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा” असे उत्तेजन ख्रिश्‍चनांना दिलेले आहे. (गलतीकर ६:२) येशूने अनेक आज्ञा व सूचना दिल्या. त्या पाळल्याने आपण त्याचा नियम आचरू अथवा पूर्ण करू. येशूने प्रीतीच्या श्रेष्ठत्वावर विशेष भर दिला. (मत्तय २२: ३६-४०; योहान १३:३४, ३५) होय, इतरांवर प्रीती करणे हा ख्रिस्ती नियम आहे. हाच मोशेच्या संपूर्ण नियमशास्त्राचा मूल आधार होता, आणि पवित्र शास्त्रही तेच सांगते: “ ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करा’ हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पाळण्यात आले आहे.”—गलतीकर ५:१३, १४; रोमकर १३:८-१०.

१४. (अ) मोशेच्या नियमशास्त्राचा अभ्यास केल्याने व त्याचा अवलंब केल्याने कोणता फायदा होईल? (ब) प्रीती आपल्याला कशास प्रवृत्त करील?

१४ दहा आज्ञांसहित, मोशेमार्फत देवाने दिलेले नियमशास्त्र हा नीतीमान नियमांना संच होता. आज जरी आपण त्या नियमशास्त्राच्या अधीन नसलो तरी त्यातील ईश्‍वरी तत्त्वे आपल्या दृष्टीने फारच बहुमोल आहेत. त्यांच्या अभ्यासाने व अवलंबनाने थोर न्यायप्रवर्तक यहोवा देवाविषयी आपला आदर वाढेल. परंतु, विशेषतः ख्रिस्ती नियम व शिकवणींचा आभ्यास व त्यानुसारचे आचरण आपण केले पाहिजे. आम्हाला यहोवाविषयी वाटणारी प्रीती, तो आज आपल्याकडून ज्या गोष्टींची अपेक्षा धरतो त्या पूर्ण करण्यात आपल्याला प्रवृत्त करील.—१ योहान ५:३.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२०३ पानांवरील चौकट]

दहा आज्ञा

१. “मी यहोवा तुझा देव आहे . . . माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत.

२. “आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको.”

३. “तुझा देव यहोवा ह्‍याचे नाव व्यर्थ घेऊ नको.”

४. “शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण सातवा दिवस तुझा देव यहोवा ह्‍याचा शब्बाथ आहे म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू तुझा मुलगा, तुझी मुलगी . . . ह्‍यांनीही करू नये . . .”

५. “आपल्या बापाच्या व आपल्या आईचा मान राखा म्हणजे जो देश तुझा देव यहोवा तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील.”

६. “खून करू नको.”

७. “व्यभिचार करू नको.”

८. “चोरी करू नको.”

९. “आपल्या शेजाऱ्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको.”

१०. “आपल्या शेजाऱ्‍याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्‍याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको. आपल्या शेजाऱ्‍याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तु ह्‍यांचा लोभ धरू नको.“

[२०४, २०५ पानांवरील चित्रं]

नियमशास्त्राने इस्राएल व इतर लोक यांजमध्ये आडभिंत निर्माण केली होती