व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरा धर्म ओळखणे

खरा धर्म ओळखणे

प्रकरण २२

खरा धर्म ओळखणे

१. पहिल्या शतकात खरा धर्म कोण आचरीत होते?

 पहिल्या शतकात खरा धर्म कोण आचरीत होते याबद्दल शंका घेता येणार नाही. ते येशू ख्रिस्ताचे अनुयायी होते. ते सर्व एकाच ख्रिस्ती संघटनेचे सदस्य होते. पण आज कशी परिस्थिती आहे? खरा धर्म आचरणाऱ्‍यांना आज कसे ओळखता येईल?

२. खरा धर्म आचरणाऱ्‍यांना कसे ओळखावे?

ते समजावून सांगताना येशू म्हणालाः “त्यांच्या फळावरुन तुम्ही त्यांना ओळखाल. . . . प्रत्येक चांगले झाड चांगली फळे देते. पण वाईट झाड वाईट फळे देते. . . . म्हणून त्यांच्या फळावरुन तुम्ही त्यांना ओळखाल.” (मत्तय ७:१६-२०) देवाच्या खऱ्‍या उपासकांनी कशी उत्तम फळे उत्पन्‍न करावीत अशी अपेक्षा तुम्ही कराल? त्यांनी सध्या काय शिकवण्यास व करण्यास हवे?

देवाच्या नावाचे गौरव

३, ४. (अ) येशूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये प्रथम कोणती विनंती केली होती? (ब) येशूने देवाच्या नावाला कसे पवित्र मानले?

येशूने आपल्या अनुयायांना सांगितलेल्या प्रार्थनेला अनुसरुन देवाचे खरे उपासक कार्य करतील. तेथे येशूने सांगितलेली पहिली गोष्ट हीः “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) देवाचे नाव पवित्र मानणे म्हणजे काय? येशूने ते कसे पवित्र मानले?

येशूने केलेल्या प्रार्थनेतून ही गोष्ट दृष्टीस येते. तो आपल्या पित्याला म्हणालाः “जी माणसे जगातून तू मला दिली, त्यांना मी तुझे नाव प्रगट केले.” (योहान १७:६) होय, यहोवा हे देवाचे नाव आहे हे येशूने इतरांना कळवले. हे नाव वापरण्यात तो मागे राहिला नाही. आपल्या पित्याचे नाव सर्व जगात गौरवले जावे असा देवाचा उद्देश आहे हे येशूला माहीत होते. यासाठीच, त्या नावाची घोषणा करण्याचा व त्याला पवित्र मानण्याचा कित्ता येशूने घालून दिला.—योहान १२:२८; यशया १२:४,५.

५. (अ) ख्रिस्ती मंडळी देवाच्या नावाशी कशी निगडीत आहे? (ब) तारणप्राप्तीसाठी आपण काय केले पाहिजे?

खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीचे अस्तित्वच देवाच्या नावाशी निगडीत होते हे पवित्र शास्त्र दाखविते. प्रेषित पेत्राने स्पष्टीकरण दिले की, “परराष्ट्रीयातून आपल्या नावासाठी लोक काढून घ्यावे” म्हणून देवाने त्यांची भेट घेतली. (प्रे. कृत्ये १५:१४) तेव्हा, देवाच्या खऱ्‍या भक्‍तांनी त्याच्या नावाला आदर दाखवला पाहिजे. तसेच सर्व जगात ते कळवले पाहिजे. खरे म्हणजे, तारणप्राप्तीसाठी ते नाव माहीत असणे आवश्‍यक आहे. पवित्र शास्त्र म्हणतेः “जो कोणी यहोवाचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.”—रोमकर १०:१३, १४.

६. (अ) बहुतेक चर्चसंस्था देवाचे नाव पवित्र मानतात का? (ब) देवाच्या नावाची साक्ष देणारे कोणी आहेत का?

तर मग, आज, देवाचे नाव पवित्र मानून त्याला सर्व पृथ्वीवर कोण प्रसिद्धी देत आहेत? चर्चमध्ये यहोवाचे नाव सर्वसाधारणपणे टाळले जाते. काहींनी तर आपल्या भाषांतरातून त्याचे उच्चाटन केले आहे. परंतु, यहोवाचे नाव घेऊन आपल्या शेजाऱ्‍याशी तुम्ही वारंवार बोललात, तर ते तुमचा संबंध कोणत्या संस्थेशी जोडतील? याबाबतीत, एकाच गटाचे लोक येशूचे उदाहरण अनुसरीत आहेत. येशूप्रमाणे देवाची सेवा करावी व त्याच्या नावाची साक्ष द्यावी हाच त्यांच्या जीवनाचा प्रमुख उद्देश आहे. याकरताच, त्यांनी “यहोवाचे साक्षीदार” असे शास्त्रवचनीय नाव धारण केले आहे.—यशया ४३:१०-१२.

देवाच्या राज्याची घोषणा

७. देवाच्या राज्याचे महत्त्व येशूने कसे दाखवले?

येशूने शिकवलेल्या प्रार्थनेत देवाच्या राज्याचे महत्त्व देखील दाखवण्यात आले आहे. “तुझे राज्य येवो,” अशी त्याने लोकांना प्रार्थना करावयास शिकविले. (मत्तय ६:१०) मानवजातीच्या सर्व समस्यांवर, देवाचे राज्य हा एकमेव तोडगा आहे, यावर त्याने वारंवार भर दिला. येशू व त्याच्या शिष्यांनी “गावोगावी,” व “घरोघरी” जाऊन त्या राज्याचा प्रचार केला. (लूक ८:१; प्रे. कृत्ये ५:४२; २०:२०) देवाचे राज्य हाच त्यांच्या प्रचाराचा व शिकवणीचा गाभा होता.

८. या “शेवटल्या काळा”मध्ये येशूने त्याच्या खऱ्‍या अनुयायांकरवी कोणता संदेश घोषित केला जाईल असे सांगितले?

आता आमच्या दिवसाविषयी काय? देवाच्या खऱ्‍या ख्रिस्ती संघटनेची मध्यवर्ती शिकवण काय आहे? या “शेवटल्या काळा”विषयी भविष्य करताना येशू म्हणालाः “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) तेव्हा, आज देवाच्या लोकांचा प्रमुख संदेश त्या राज्याबद्दलच असला पाहिजे.

९. आज कोणते लोक राज्याच्या संदेशाचा प्रचार करीत आहेत?

विचार कराः एखादी व्यक्‍ती तुमच्या दाराशी येऊन देवाचे राज्य हीच मानवजातीची खरी आशा असल्याचे सांगू लागली तर तुम्ही तिचा संबंध कोणत्या संस्थेशी जोडाल? यहोवाच्या साक्षीदारांशिवाय इतर कोणत्याही धर्माचे लोक देवाच्या राज्याबद्दल तुमच्याशी बोलले आहेत का? त्यांच्यातील बहुतेकांना तर ते काय आहे याचा थांगपत्ताही नाही! देवाच्या सरकारविषयी ते मूक आहेत. पण त्या राज्याची वार्ता जगाला हादरविणारी आहे. दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते की, हेच राज्य ‘बाकीच्या सर्व सरकारांचे चूर्ण करुन त्यांस नष्ट करील व ते एकटेच पृथ्वीवर आपले अधिपत्य करील.’—दानीएल २:४४.

देवाच्या वचनाचा आदर

१०. देवाच्या वचनाला येशूने कसा आदर प्रदर्शित केला?

१० खरा धर्म आचरणाऱ्‍यांना ओळखण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्यांची पवित्र शास्त्राकडे पाहण्याची वृत्ती. येशूने देवाच्या वचनाला नेहमी आदर दाखवला. कोणत्याही विषयावर प्रमाण म्हणून तो वारंवार त्याचा उल्लेख करीत असे. (मत्तय ४:४, ७, १०; १९:४-६) तसेच पवित्र शास्त्राच्या शिकवणींप्रमाणे आचरण करुन येशूने त्याला आदर दाखविला. त्याने पवित्र शास्त्राला कधीही कमी लेखले नाही. उलटपक्षी, पवित्र शास्त्राशी सहमत असलेली शिकवण देण्यात मागे पडलेल्या व आपल्या कल्पनांना महत्त्व देऊन पवित्र शास्त्राच्या शिकवणींना कमकुवत करणाऱ्‍यांचा त्याने धिक्कार केला.—मार्क ७:९-१३.

११. देवाच्या वचनाबद्दल चर्चची वृत्ती बहुधा कशी असते?

११ ख्रिस्ताने घालून दिलेल्या या उदाहरणाच्या बाबतीत, ख्रिस्ती धर्मजगतातील चर्च संस्थांची तुलना केल्यास काय दिसून येते? त्यांना पवित्र शास्त्राबद्दल गाढ आदर आहे का? आदामाचा पापामध्ये अधःपात, नोहाच्या काळातील प्रलय, योना व मोठा मासा आणि पवित्र शास्त्रातील इतरही अनेक वृत्तांतावर आजकालच्या पुष्कळ पाळकांचा विश्‍वास नाही. तसेच मनुष्य हा देवाने घडवला नसून उत्क्रांतीने सामोरा आला असे ते म्हणतात. त्यांच्या अशा वर्तनाने पवित्र शास्त्राला आदर दाखविण्यास ते इतरांना उत्तेजन देतात का? याचप्रमाणे, विवाहबाह्‍य संबंध गैर नव्हेत अथवा समलिंगी संबंध वा बहुपत्नीत्वही योग्य असल्याचा काही चर्च पुढाऱ्‍यांचा दावा आहे. असे लोक इतरांना पवित्र शास्त्रातून मार्गदर्शन घेण्यास उत्तेजन देत आहेत असे तुम्ही म्हणाल का? देवाचा पुत्र व त्याच्या प्रेषितांचे उदाहरण ते निश्‍चितच अनुसरत नाहीत.—मत्तय १५:१८, १९; रोमकर १:२४-२७.

१२. (अ) ज्यांच्याजवळ पवित्र शास्त्र आहे अशा अनेक लोकांची देखील उपासना देवाला का पसंत नाही? (ब) जाणूनबुजून गैरवर्तन करणाऱ्‍यांना जर चर्चमध्ये सन्मानाने ठेवून घेतले जात असेल तर आपण काय अनुमान काढले पाहिजे?

१२ चर्चचे काही सदस्य आपल्याजवळ पवित्र शास्त्र बाळगतात व ते त्याचा अभ्यासही करतात. परंतु, ज्या रितीने ते आपले जीवन व्यतीत करतात त्यावरुन ते पवित्र शास्त्राला अनुसरुन वागत नाहीत असे दिसून येते. अशा व्यक्‍तींबद्दल पवित्र शास्त्र म्हणतेः “आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात, परंतु कृतींनी ते त्याला नाकारतात.” (तीत १:१६, २ तीमथ्य ३:५) जुगारी, दारुडे वा इतर गैरकृत्ये करणाऱ्‍या चर्चच्या सदस्यांना चर्चमध्ये सन्मानाने ठेवून घेतले जात असल्यास त्यावरुन काय दिसून येते? त्यांच्या धार्मिक संस्थेला देवाची मान्यता नाही, याचाच तो पुरावा आहे.—१ करिंथकर ५:११-१३.

१३. आपल्या चर्चच्या सर्व शिकवणी पवित्र शास्त्रानुसार नसल्याचे एखाद्याच्या लक्षात आल्यावर त्याला कोणता गंभीर निर्णय घ्यावा लागेल?

१३ या पुस्तकातील आधीची प्रकरणे व त्यातील पवित्र शास्त्र वचनांवर तुम्ही विचार केला असेल तर देवाच्या वचनातील मूलभूत शिकवणींची तुम्हाला ओळख झाली आहे. परंतु तुम्ही ज्या धार्मिक संस्थेशी संबंध ठेवून आहात तिच्या शिकवणी देवाच्या वचनांशी जुळत नसतील तर काय? तर मग, तुम्हापुढे गंभीर समस्या आहे. ती म्हणजे, पवित्र शास्त्राची सत्यता मानावी की पवित्र शास्त्राचा पाठिंबा नसलेल्या शिकवणी जोपासण्यासाठी पवित्र शास्त्राचा अव्हेर करावा. तुम्ही काय करायचे ते तुम्हालाच ठरवायचे आहे. तथापि, तुम्ही सर्व गोष्टींचा सारासार विचार करावा. कारण तुम्ही घेणाऱ्‍या निर्णयावरच, देवापुढील तुमचे स्थान व पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाल जीवन प्राप्त करण्याची संधि अवलंबून आहे.

जगापासून वेगळे राहणे

१४. (अ) खऱ्‍या धर्माला ओळखण्याची दुसरी खूण कोणती? (ब) खऱ्‍या उपासकांनी ही अपेक्षा पूर्ण करणे का महत्त्वाचे आहे?

१४ येशूने म्हटल्याप्रमाणे, खरा धर्म आचरणाऱ्‍यांना ओळखण्याची आणखी एक खूण म्हणजे, “ते जगाचे नाहीत.” (योहान १७:१४) याचा अर्थ देवाचे खरे उपासक या भ्रष्ट जगापासून व त्याच्या व्यवहारापासून वेगळे राहतात. येशू ख्रिस्ताने राजकीय अधिपती होण्याचे नाकारले. (योहान ६:१५) पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सैतान या जगाचा अधिकारी आहे हे लक्षात घेतल्यास, जगापासून वेगळे राहण्याचे महत्त्व तुमच्या चांगले ध्यानात येईल. (योहान १२:३१; २ करिंथकर ४:४) या गोष्टीचे गांभिर्य पवित्र शास्त्रातील पुढील विधानावरुन अधिकपणे दिसून येतेः “जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी ठरला आहे.”—याकोब ४:४.

१५. (अ) तुम्हाला माहीत असलेल्या चर्चसंस्था खरोखरीच “या जगाच्या” नाहीत काय? (ब) ही अट पूर्ण करणारा एखादा धर्म तुम्हाला माहीत आहे का?

१५ तुमच्या समाजातील चर्चमध्ये या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जात आहे असे तुम्हाला दिसून येते का? पाळक व मंडळीचे सदस्य खरोखरीच “या जगाचे नाहीत,” असे दिसते का? किंवा राष्ट्रवाद, राजकारण व वर्गवारी संघर्षामध्ये ते आकंठ बुडालेले आहेत? या प्रश्‍नांची उत्तरे देणे कठीण नाही. कारण चर्चच्या कार्याबद्दल बहुतेक सर्वांना माहिती आहे. तसेच यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याचे परिक्षण करणेही सोपे आहे. तसे केल्याने तुम्हाला दिसून येईल की, जगापासून, त्याच्या राजकीय व्यवहारापासून तसेच त्याच्या स्वार्थी, अनैतिक व हिंसक मार्गापासून दूर राहून ते खरोखरीच ख्रिस्त व त्याच्या आरंभीच्या अनुयायांच्या उदाहरणाचे अनुकरण करीत आहेत.—१ योहान २:१५-१७.

आपसातील प्रेम

१६. ख्रिस्ताच्या खऱ्‍या अनुयायांना ओळखण्याचा एक महत्त्वाचा मार्ग कोणता?

१६ ख्रिस्ताच्या खऱ्‍या शिष्यांना ओळखण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे त्यांचे आपसातील प्रेम. येशू म्हणालाः “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) तुम्हाला माहीत असलेल्या धार्मिक संघटनांमध्ये अशी प्रीती आहे का? उदाहरणार्थ, ते ज्या देशात राहतात ते, एकमेकांविरुद्ध युद्धास उभे ठाकल्यावर अशा संस्था काय करतात?

१७. आपसात प्रेम राखण्याच्या अपेक्षेबद्दल धार्मिक संस्था व त्यांचे सदस्य कसे आढळतात?

१७ बहुधा काय घडते ते तुम्हाला माहीतच आहे. संसारासक्‍त लोकांच्या आज्ञेवरुन वेगवेगळ्या धार्मिक संस्थांचे सदस्य युद्धभूमीवर जाऊन दुसऱ्‍या देशातील आपल्याच धर्म-बंधूंचे शिरकाण करतात. अशा रितीने, एक कॅथोलिक दुसऱ्‍या कॅथोलिक माणसाला, एक प्रॉटेस्टंट दुसऱ्‍या प्रॉटेस्टंट माणसाला, एक मुसलमान दुसऱ्‍या मुसलमान माणसाला ठार करतो. असे वर्तन देवाच्या वचनाला अनुसरुन असल्याचे व त्यात ईश्‍वरी वृत्ती प्रदर्शित होते असे तुम्हाला वाटते का?—१ योहान ३:१०-१२.

१८. आपसात प्रेम राखण्यामध्ये यहोवाचे साक्षीदार कसे आढळतात?

१८ एकमेकांवर प्रेम करण्याच्या बाबतीत यहोवाचे साक्षीदार कसे आहेत? ते संसारी धर्मांचा मार्ग अनुसरत नाहीत. युद्धभूमीवर आपल्या धर्मबंधूंची कत्तल ते करीत नाहीत. “मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणत, इतर देशातील, जमातीतील व वर्णाच्या आपल्या बंधूंचा द्वेष करण्याचा खोटेपणा ते करीत नाहीत. (१ योहान ४:२०, २१) उलट, ते इतर प्रकारांनी देखील प्रेम प्रकट करतात. कसे? आपल्या शेजाऱ्‍यांशी केलेल्या व्यवहारातून व इतरांना देवाबद्दल शिकण्यास मदत करुन.—गलतीकर ६:१०.

एक खरा धर्म

१९. खरा धर्म एकच आहे असे म्हणणे शास्त्राला व तर्काला अनुसरुन कसे आहे?

१९ एकच खरा धर्म असावा हे तर्कशुद्ध आहे. खरा देव “अव्यवस्था माजवणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे” या वस्तुस्थितीशी ते सुसंगतच आहे. (१ करिंथकर १४:३३) वास्तविकपणे, “एकच विश्‍वास” असल्याचे पवित्र शास्त्र सांगते. (इफिसकर ४:५) असे असल्यास, आज खऱ्‍या उपासकांच्या संस्थेमध्ये कोण बसते बरे?

२०. (अ) आतापर्यंतच्या पुराव्यानुसार कोण खरे उपासक असल्याचे हे पुस्तक दर्शविते? (ब) तुम्हालाही तसेच वाटते का? (क) यहोवाच्या साक्षीदारांची चांगली ओळख करुन घेण्याचा उत्तम मार्ग कोणता?

२० यहोवाचे साक्षीदारच ते खरे उपासक असल्याचे आम्ही निर्भिडपणे सांगतो. तुम्हाला याची खात्री पटावी म्हणून त्यांचा अधिक परिचय करुन घेण्यास आम्ही आपल्याला पाचारण करतो. याचा उत्तम मार्ग म्हणजे यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्यसभागृहातील सभांना उपस्थित राहणे. खरा धर्म आचरल्याने आता मोठे समाधान मिळते व पृथ्वीवरील नंदनवनामध्ये अनंतकाल जीवन उपभोगण्याचा मार्ग खुला होतो असे पवित्र शास्त्र दाखवीत असल्याने असे संशोधन करणे तुमच्याच फायद्याचे आहे. (अनुवाद ३०:१९, २०) त्यासाठी आम्ही आपणास हार्दिक निमंत्रण देतो. आत्ताच संशोधन का करु नये?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८५ पानांवरील चित्रं]

तुम्ही, यहोवा व त्याचे राज्य याविषयी कोणाशी बोलणी कराल तर लोक तुमचा संबंध कोणत्या धर्माशी जोडतील?

[१८६ पानांवरील चित्रं]

कोणी माणूस देवाच्या वचनानुरुपचे आचरण करीत नाही तर तो त्या वचनाचा आदर करीत असतो का?

[१८९ पानांवरील चित्रं]

येशूने राजकीय अधिपती होण्याचे नाकारले

[१९० पानांवरील चित्रं]

यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना येण्याचे तुम्हाला हार्दिक निमंत्रण आहे