व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ताचे परतणे—कसे दिसेल?

ख्रिस्ताचे परतणे—कसे दिसेल?

प्रकरण १७

ख्रिस्ताचे परतणे—कसे दिसेल?

१. (अ) ख्रिस्ताने काय वचन दिले? (ब) ख्रिस्ताच्या परतण्याची का गरज आहे?

 “मी पुन्हा येईन.” (योहान १४:३, पं.र.) येशू आपल्या मृत्युच्या आदल्या रात्री आपल्या अनुयायांसोबत असताना त्याने त्यांना वरील अभिवचन दिले. सामर्थ्यशाली राज्याद्वारे येशूच्या परतण्याने मानवजातीला मिळणाऱ्‍या शांतता, स्वास्थ्य, जीवनाची कधी नव्हे इतकी गरज आज उत्पन्‍न झाली आहे या विधानाशी बहुधा तुम्हीही सहमत असाल. पण ख्रिस्त कसा परतणार? त्याला कोण व कशा रितीने पाहतील?

२. (अ) ख्रिस्त परतल्यावर आपल्या प्रेषितांसह इतर अभिषिक्‍त अनुयायांना तो कोठे रहावयास नेणार? (ब) तेथे त्यांना कोणत्या प्रकारचे शरीर मिळणार?

परतल्यावर ख्रिस्त भूतलावर राहण्यास येत नाही. उलट त्याच्याबरोबर राज्य करणारे, त्याच्यासह राहण्यास स्वर्गाला नेले जातात. आपल्या प्रेषितांना येशूने सांगितलेः “[मी] पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. ह्‍यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.” (योहान १४:३) यास्तव, ख्रिस्त परतला म्हणजे स्वर्गाला नेल्या जाणाऱ्‍या व्यक्‍ती आत्मिक होतात व ख्रिस्ताला त्याच्या गौरवी आत्मिक अवस्थेमध्ये पाहतात. (१ करिंथकर १५:४४) परंतु स्वर्गाला न जाणारी बाकीची माणसे, ख्रिस्त परतला की त्याला पाहतील का?

त्याला मानवी रुपात का परतता येत नाही

३. मानव ख्रिस्ताला पुन्हा कधीच पाहणार नाहीत असा कोणता पवित्र शास्त्र पुरावा आहे?

त्याच रात्री येशू आपल्या प्रेषितांना पुढे म्हणालाः “आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही.” (योहान १४:१९) “जग” म्हणजे मानवजात. म्हणजेच, त्याच्या स्वर्गारोहणानंतर, भूतलावरचे लोक त्याला पाहणार नाहीत असे येशूने स्पष्ट केले. प्रेषित पौल लिहितोः “जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्‍यापुढे त्याला तसे ओळखत नाही.”—२ करिंथकर ५:१६.

४. एक बलशाली अदृश्‍य आत्मिक व्यक्‍तीच्या स्वरुपात ख्रिस्त परततो असे कशावरुन कळते?

तरीही, अनेकांचा असा विश्‍वास आहे की, ज्या मानवी शरीराने ख्रिस्त मरण पावला, त्याच शरीराने तो परत येईल व भूतलावर राहणारे सर्व त्याला पाहतील. परंतु पवित्र शास्त्र म्हणते की, ख्रिस्त सर्व देवदूतांसह परतेल व “आपल्या वैभवी राजासनावर बसेल.” (मत्तय २५:३१) जर ख्रिस्त मानवरुपामध्ये येऊन भूतलावरच्या राजासनावर बसला तर तो देवदूतांपेक्षा खालच्या पदावर असेल. परंतु तो देवाच्या सर्व आत्मिक पुत्रांमध्ये सर्वात जास्त बलशाली व वैभवशाली स्वरुपामध्ये येतो, व म्हणूनच त्यांच्याप्रमाणेच अदृश्‍य राहणार.—फिलिप्पैकर २:८-११.

५. मानवी शरीराने ख्रिस्त का परतू शकत नाही?

या उलट, १९०० वर्षांपूर्वी, येशूने स्वतःला कनिष्ठ करुन मानव बनण्याची गरज होती. त्याने स्वतःचे परिपूर्ण मानवी जीवन आपल्यासाठी खंडणी म्हणून देण्याची गरज होती. हे स्पष्ट करताना एकदा येशू म्हणालाः “जी भाकर मी देईन, ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” (योहान ६:५१) अशारितीने, सर्व मानवजातीसाठी येशूने स्वतःच्या भौतिक शरीराचा बली अर्पण केला. या बलिदानाचा परिणाम कितपत राहणार होता? प्रेषित पौल सांगतोः “आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहो.” (इब्रीयांस १०:१०) जगाला जीवन मिळावे म्हणून आपला देह दिल्यावर तो परत घेऊन ख्रिस्ताला मानव बनता येत नव्हते. या मूलभूत कारणासाठी जो देह त्याने कायमचा अर्पण केला त्या शरीराने तो परत येऊ शकत नाही.

भौतिक देह स्वर्गाला जात नाही

६. ख्रिस्त भौतिक शरीरानेच स्वर्गास गेला असा अनेक लोकांचा का विश्‍वास आहे?

तथापि, काहींचा असा विश्‍वास आहे की येशूने आपला भौतिक देह स्वर्गाला नेला. याची स्पष्टता करताना ते म्हणतात की, येशू मृतातून उठवला गेल्यावर कबरेमध्ये त्याचे भौतिक शरीर नव्हते. (मार्क १६:५-७) तसेच आपण जिवंत आहो असे आपल्या शिष्यांना दाखवण्यासाठी त्याने त्यांना भौतिक शरीरात दर्शन दिले होते असेही ते म्हणतात. एकदा तर, आपले खरोखरच पुनरुत्थान झाले आहे यावर थोमाचा विश्‍वास बसावा म्हणून येशूने त्याला आपल्या कुशीतील व्रणात हात घालावयास दिला. (योहान २०:२४-२७) तर मग, हे सर्व, ज्या शरीरात तो मेला त्याच शरीराने त्याला पुन्हा जिवंत करण्यात आले असेच सिद्ध करीत नाही का?

७. ख्रिस्त आत्मिक व्यक्‍ती होऊन स्वर्गास गेला हे कशाने सिद्ध होते?

नाही, तसे नाही. पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट रुपात सांगते की, “ख्रिस्तानेही पापाबद्दल . . . एकदा मरण सोसले. तो देहरुपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला.” (१ पेत्र ३:१८) हाडामांसाचे शरीर असलेली माणसे स्वर्गामध्ये जगू शकत नाहीत. स्वर्गीय पुनरुत्थानाबद्दल पवित्र शास्त्र म्हणतेः “भौतिक शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. . . . मांस व रक्‍त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही.” (१ करिंथकर १५:४४-५०) स्वर्गात फक्‍त आत्मिक शरीरे असलेल्या आत्मिक व्यक्‍तीच राहू शकतात.

८. ख्रिस्ताच्या मानवी शरीराचे काय झाले?

मग, आता येशूच्या भौतिक शरीराचे काय झाले? त्याच्या शिष्यांना तर कबर रिकामीच दिसली, हो ना? होय, कारण देवाने येशूचे शरीर नाहीसे केले. पण देवाने तसे का केले? कारण त्यामुळे पवित्र शास्त्रात लिहिलेले वचन पूर्ण झाले. (स्तोत्रसंहिता १६:१०; प्रे. कृत्ये २:३१) अशा रितीने, जसे पूर्वी यहोवाने मोशाचे शरीर नाहीसे केले तसे येशूचे शरीर नाहीसे करणे त्याला उचित वाटले. (अनुवाद ३४:५, ६) कबरेमध्ये शरीर तसेच राहिले असते तर तो मृतातून उठला आहे असे येशूच्या शिष्यांच्या ध्यानात आले नसते, कारण त्यावेळी त्यांनी आत्मिक गोष्टींचे मर्म पूर्णपणे जाणले नव्हते.

९. पुनरुत्थान झालेल्या येशूच्या, रुपांतर होणाऱ्‍या शरीराच्या व्रणात हात घालणे थोमाला कसे शक्य होते?

परंतु, प्रेषित थोमा येशूच्या कुशीतील व्रणात हात घालू शकला हे पाहता, ज्या शरीरात येशूला खांबावर खिळले होते त्याच शरीराने तो मृतातून उठवला गेला असे दिसून येत नाही का? नाही. जशी पूर्वी देवदूतांनी रुपांतर होणारी भौतिक शरीरे धारण केली तसेच येशूनेही केले. आपण कोण आहो याबद्दल थोमाची खात्री पटवण्यासाठी त्याने व्रण असलेल्या शरीराचा उपयोग केला. जसे अब्राहामाचे आदरातिथ्य स्विकारणारे देवदूत खाऊ-पिऊ शकत होते तसाच तोही पूर्ण मानवी दिसत व वाटत असे.—उत्पत्ती १८:८; इब्रीयांस १३:२.

१०. येशू वेगवेगळी भौतिक शरीरे धारण करु शकला हे कशावरुन दिसते?

१० ज्या शरीराने मेला तशाच शरीराने येशू थोमाला दिसला तरी आपल्या अनुयायांसमोर अवतरताना त्याने निरनिराळी शरीरे धारण केली. याच कारणास्तव मरिया मग्दालियाला प्रथम तो माळी असावा असे वाटले. इतर प्रसंगी त्याच्या शिष्यांनी त्याला प्रथम ओळखले नाही. अशा प्रसंगी त्याच्या स्वरुपामुळे नव्हे तर त्याचा एखादा शब्द वा हावभाव याकरवी त्यांनी त्याला ओळखले.—योहान २०:१४-१६; २१:६, ७; लूक २४:३०, ३१.

११, १२. (अ) येशूने पृथ्वी कशी सोडली? (ब) तर मग, ख्रिस्त कशाप्रकारे परतण्याची आपण अपेक्षा करावी?

११ पुनरुत्थानानंतर येशूने ४० दिवस भौतिक शरीरामध्ये आपल्या शिष्यांना दर्शन दिले. (प्रे. कृत्ये १:३) त्यानंतर तो स्वर्गास गेला. आता काही असे विचारतीलः ‘या प्रसंगी जे दोन देवदूत तेथे उपस्थित होते त्यांनी प्रेषितांना असे सांगितले नव्हते का की, ख्रिस्त हा, “तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल”?’ (प्रे. कृत्ये १:११) होय, त्यांनी तसे म्हटले होते. पण त्यांनी काय म्हटले ते लक्षात घ्या. त्यांनी हे म्हटले की, “तसाच”, त्याच शरीरात नव्हे. तर मग, येशू कशाप्रकारे गेला? गाजावाजा न करता, शांतपणे. फक्‍त त्याच्या प्रेषितांनाच याबद्दल माहिती होती, जगाला नव्हती.

१२ स्वर्गाला जाताना येशू आपल्या प्रेषितांना सोडून कशाप्रकारे गेला त्याचे पवित्र शास्त्रातील वर्णन पहाः “त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला, आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले.” (प्रे. कृत्ये १:९) येशू आकाशात जाऊ लागला तेव्हा एका ढगाने त्याला प्रेषितांच्या नजरेसमोरुन दूर केले. त्यामुळे जाणारा येशू त्यांच्या नजरेपासून अदृश्‍य झाला. ते त्याला पाहू शकले नाहीत. त्यानंतर आत्मिक शरीराने तो स्वर्गास गेला. (१ पेत्र ३:१८) याकरताच, त्याचे परतणे देखील अदृश्‍य आत्मिक शरीराने असेल.

प्रत्येक डोळा त्याला कसा पाहील

१३. ख्रिस्त मेघासह परत येईल तेव्हा “प्रत्येक डोळा त्याला पाहील” या वाक्याचा अर्थ काय समजावा?

१३ मग, आता प्रकटीकरण १:७ मधील शब्दांचा अर्थ काय समजावा? तेथे प्रेषित योहान लिहितोः “पहा, तो मेघासहित येतो. प्रत्येक डोळा त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे उर बडवून घेतील.” येथे पवित्र शास्त्र शारीरिक डोळ्यांनी पाहण्याबद्दल बोलत नाही, तर समजणे, जाणणे या अर्थाने पाहणे असे ते म्हणते. एखाद्या व्यक्‍तीला एखादी गोष्ट समजली वा त्याने ती जाणली तेव्हा तो “मला असं दिसतं” असे म्हणतो. याच कारणास्तव पवित्र शास्त्र सुद्धा प्रत्यक्षात “अंतःचक्षूं”नी ओळखण्याविषयी भाष्य करते. (इफिसकर १:१८) तद्वत, “प्रत्येक डोळा त्याला पाहील” याचा अर्थ, ख्रिस्त उपस्थित असल्याचे त्यांना कळेल, जाणवेल वा ओळखता येईल असा आहे.

१४. (अ) “ज्यांनी त्याला भोसकले” ते, म्हणजे कोण आहेत असे समजावे? (ब) सर्वांना शेवटी ख्रिस्ताची उपस्थिती कळली तेव्हा अतोनात दुःख का होईल?

१४ येशूला ज्यांनी “भोसकले” त्या व्यक्‍ती आता भूतलावर हयात नाहीत. यामुळेच ते, पहिल्या शतकातील दुष्ट छळप्रवर्तक, प्रातिनिधिकरित्या, आजच्या काळात येशूच्या अनुयायांना त्रास देणाऱ्‍या लोकांना सूचित करतात. (मत्तय २५:४०, ४५) येशूने अशा दुष्टांचा नाश करण्याची वेळ लवकरच येईल. याविषयी त्यांना आगाऊ सूचनाही देण्यात आलेली आहे. जेव्हा यांचा नाश करण्यात येईल तेव्हा त्यांना काय घडत आहे ते “दिसेल”, किंवा समजेल. त्यावेळी त्यांचे दुःख खरोखर फार मोठे असेल!

येशू पृथ्वीवर परत येतो का?

१५. “परतणे” हा शब्द अनेकदा कोणत्या अर्थाने वापरला जातो?

१५ परतण्याचा शब्दशः अर्थ, एखाद्या ठिकाणी जाणे असा नेहमीच होत नाही. या कारणास्तव, आजारी माणूस बरा झाल्यावर त्याला ‘परत आरोग्य मिळाले’ असे म्हटले जाते. याचप्रमाणे कोणी माजी अधिकारी ‘परत सत्तेवर आला’ असेही म्हटले जाते. देवाने अब्राहामाला सांगितलेः “पुढील वसंत ऋतुत नेमलेल्या समयी मी तुजकडे परत येईन. तेव्हा सारेला मुलगा होईल.” (उत्पत्ती १८:१४; २१:१) यहोवाच्या परतण्याचा अर्थ, त्याचे अक्षरशः परतणे नसून, आपण दिलेल्या वचनानुरुप सारेकडे लक्ष देणे असा होतो.

१६. (अ) येशू पृथ्वीवर कोणत्या रितीने परत येतो? (ब) ख्रिस्त कधी परतला व तेव्हा काय घडले?

१६ त्याचप्रमाणे, येशूच्या परतण्याचा अर्थही त्याचे अक्षरशः पृथ्वीवर येणे नव्हे. तर तो पृथ्वीची सत्ता हाती घेऊन तिच्याकडे लक्ष देतो असा आहे. ते करण्यासाठी त्याने आपले स्वर्गीय सिंहासन सोडून पृथ्वीवर येण्याची काहीच गरज नाही. पवित्र शास्त्र पुराव्यावरुन ख्रिस्ताने परतण्याचा व सत्ता हाती घेण्याचा देवाचा समय १९१४ साली आला असे आपण मागील प्रकरणात पाहिले. त्यावेळी स्वर्गात घोषणा झालीः “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाली आहेत.”—प्रकटीकरण १२:१०.

१७. ख्रिस्ताचे परतणे अदृश्‍य असल्यामुळे तो परतला आहे असे आपल्याला कळण्यासाठी त्याने काय केले?

१७ जर ख्रिस्ताचे परतणे अदृश्‍य आहे तर तो खरोखरच परतला असल्याची खात्री करण्याचा काही मार्ग आहे का? होय, आहे. तो अदृश्‍यपणे उपस्थित आहे व जगाचा अंत जवळ आलेला आहे असे दर्शविणारे दृश्‍य “चिन्ह” ख्रिस्ताने स्वतःच सांगितलेले आहे. त्या ‘चिन्हा’चे आपण परिक्षण करु या.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४२ पानांवरील चित्रं]

ख्रिस्ताने आपले शरीर यज्ञार्पण म्हणून दिले. त्याला ते परत घेता येत नाही व पुन्हा मानव बनता येत नाही

[१४४ पानांवरील चित्रं]

येशूचे पुनरुत्थान झाल्यावर तो मरिया मग्दालियेला माळी असा का वाटला?

[१४५ पानांवरील चित्रं]

येशूने थोमाला आपला हात कोणत्या भौतिक शरीरात घालण्यास सांगितला?

[१४७ पानांवरील चित्रं]

ख्रिस्ताने पृथ्वी ज्या पद्धतीने सोडली त्याच पद्धतीने त्याला परतायचे होते; तर मग, तो कसा वर गेला?