व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“जगाचा शेवट” अगदी जवळ आला आहे!

“जगाचा शेवट” अगदी जवळ आला आहे!

प्रकरण १८

“जगाचा शेवट” अगदी जवळ आला आहे!

१. ख्रिस्ताने स्वर्गातून राज्य करणे सुरु केले आहे असे भूतलावरील त्याच्या अनुयायांना कसे कळेल?

 येशू ख्रिस्ताने सैतान व त्याच्या दूतांना स्वर्गातून बाहेर टाकून आपली सत्ता सुरु केली तेव्हा सैतान व त्याच्या दुष्ट व्यवस्थेचा अंत जवळ आला आहे असा त्याचा अर्थ होत होता. (प्रकटीकरण १२:७-१२) परंतु, भूतलावरील ख्रिस्ताच्या अनुयायांना, त्यांच्या डोळ्यांना अदृश्‍य असणारी ही घटना स्वर्गात घडल्याचे कसे कळणार होते? राज्यसत्तेसह ख्रिस्त अदृश्‍यरित्या उपस्थित असून “या जगाचा अंत” जवळ आला आहे हे त्यांना कसे कळणार होते? येशूने दिलेले “चिन्ह” पूर्ण होत आहे किंवा नाही याची परिक्षा केल्यावरच त्यांना ते कळणार होते.

२. ख्रिस्ताच्या शिष्यांनी त्याला कोणता प्रश्‍न विचारला?

येशूच्या मृत्युपूर्वी काही दिवस आधी तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असताना त्याचे चार प्रेषित “चिन्ह” विचारण्यासाठी त्याच्यापाशी आले. त्यांचा प्रश्‍न होताः “ह्‍या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व जगाचा शेवट होण्याचे चिन्ह काय ते आम्हास सांगा.” (मत्तय २४:३, किंग जेम्स व्हर्शन.) पण ‘आपले येणे’ व “जगाचा अंत” या शब्दांचा खरोखर काय अर्थ होतो?

३. (अ) ‘आपले येणे’ व “जगाचा शेवट” या शब्दांचा काय अर्थ होतो? (ब) तर मग, ख्रिस्ताच्या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे योग्य भाषांतर कोणते?

“येणे” असे भाषांतर केलेला मूळ ग्रीक शब्द परोसिया असून त्याचा अर्थ “उपस्थिती” असा आहे. यास्तव ते “चिन्ह” आपल्याला दिसेल तेव्हा, ख्रिस्त जरी अदृश्‍य असला तरी, तो उपस्थित असून राज्याधिकाराने आला आहे असे आपल्याला कळेल. “जगाचा शेवट” ही वाक्यरचना सुद्धा दिशाभूल करणारी आहे. त्याचा अर्थ, या पृथ्वीचा शेवट होणार नाही तर सैतानाच्या व्यवस्थिकरणाचा शेवट होणार असा आहे. (२ करिंथकर ४:४) यास्तव प्रेषितांच्या प्रश्‍नाचा शब्दशः असा अर्थ आहेः “ह्‍या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या उपस्थितीचेया दुष्ट व्यवस्थेच्या अंताचे चिन्ह काय हे आम्हास सांगा.—मत्तय २४:३, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन.

४. (अ) येशूने दिलेल्या “चिन्हा”त कशाचा समावेश आहे? (ब) त्या “चिन्हां”ची बोटाच्या ठशांशी कशी तुलना करता येते?

येशूने “चिन्ह” म्हणून फक्‍त एकच घटना सांगितली नाही. त्याने अनेक घटना व परिस्थितीबद्दल सांगितले. मत्तयशिवाय इतर पवित्र शास्त्र लेखकांनी “शेवटला काळ” दाखविणाऱ्‍या इतरही घटनांचा उल्लेख केला आहे. या लेखकांनी “शेवटला काळ” म्हटलेल्या मुदतीतच ही भाकिते घडणार होती. (२ तीमथ्य ३:१-५; २ पेत्र ३:३, ४) एका माणसाच्या बोटांच्या ठशामध्ये असलेल्या रेषा दुसऱ्‍या माणसाच्या बोटांच्या ठशासोबत जुळू शकणार नाहीत. तशाच या घटना होत. “शेवटल्या काळा”तील घटनांचाही असाच अद्वितीय ठसा आहे. तो निश्‍चितपणे ओळखता येतो. कारण दुसऱ्‍या कोणात्याहि काळाचा “ठसा” असा नाही.

५, ६. पुढील पानांवरील “शेवटला काळ” याच्या ११ पुराव्यांचे परिक्षण केल्यावर “या व्यवस्थेच्या अंता”बद्दल तुम्हाला काय समजते?

या पुस्तकाच्या १६ व्या प्रकरणात, आपण, ख्रिस्त परतला असून १९१४ सालापासून शत्रुंच्या उपस्थितीमध्ये राज्य करु लागला असल्याचा पवित्र शास्त्रातील पुरावा पाहिला. आता ख्रिस्ताची उपस्थिती व सैतानाच्या दुष्ट व्यवस्थेचा “शेवटला काळ” दाखवणाऱ्‍या “चिन्हा”च्या वेगवेगळ्या लक्षणांकडे विशेष नजर टाका. पुढील चार पानांवर दिलेल्या या भाकितांचे परिक्षण करताना १९१४ पासून ते कसे पूर्ण होत आहेत याची नोंद घ्या.

 “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल.”—मत्तय २४:७.

  “चिन्हा”चा हा भाग १९१४ पासून पूर्ण झालेला तुम्ही निश्‍चितच पाहिला आहे! त्या वर्षी पहिले महायुद्ध सुरु झाले. अशी भयानक लढाई इतिहासात पूर्वी कधीच झाली नव्हती. ती सार्वत्रिक लढाई होती. १९१४ पूर्वीच्या २,४०० वर्षांत झालेल्या सर्व मोठमोठ्या लढायांपेक्षा पहिले महायुद्ध मोठे होते. तरीही, लढाई संपल्यावर अवघ्या २१ वर्षांनी दुसरे महायुद्ध सुरु झाले, आणि त्यात पहिल्या महायुद्धाच्या चौपट हानी झाली.

  त्यानंतर भयंकर लढाया होतच राहिल्या. १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यापासून, सर्व जगात १५० लढायांमध्ये २ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक लोक मारले गेले आहेत. कोणत्याही एका दिवसाचा विचार केल्यास त्या दिवशी जगात कोठे ना कोठे १२ लढाया चालू आहेत. शिवाय आणखी एका महायुद्धाची टांगती तलवार आहेच. एकट्या अमेरिकेकडे जगातील प्रत्येक पुरुष, स्त्री व बालकाला १२ वेळा मारण्याइतकी अण्वस्त्रे आहेत!

 “जागोजागी दुष्काळ . . . होतील.”—मत्तय २४:७.

  पहिल्या जागतिक युद्धानंतर इतिहासातील सर्वात वाईट दुष्काळ पडला. फक्‍त उत्तर चीनमध्ये दररोज १५,००० लोक उपासमारीने मेले. परंतु दुसऱ्‍या महायुद्धानंतर अन्‍नटंचाई आणखीनच वाढली. त्यावेळी एकचतुर्थांश जग उपासमारीने ग्रासले होते! आणि तेव्हापासून जगातल्या अनेक लोकांना पुरेसे अन्‍न मिळत नाही.

  “अपुऱ्‍या आहारामुळे होणाऱ्‍या आजारांनी अविकसनशील देशातील एक व्यक्‍ती दर ८.६ सेकंदाला मृत्यु पावते,” असे १९६७ मध्ये न्यूयॉर्क टाईम्स ने म्हटले होते. लाखो—अंदाजे दर वर्षी ५ कोटीच्या आसपास—लोक अजूनही उपासमारीने मरतात! १९८० पर्यंत जगातले एकचतुर्थांश (१,००,००,००,००० लोक) पुरेसे अन्‍न न मिळाल्यामुळे उपाशी होते. जेथे अन्‍न मुबलक आहे तेथे तर लोकांना गरीबीमुळे ते विकत घेता येत नाही.

 “जागोजागी मऱ्‍या येतील.”—लूक २१:११.

  पहिल्या जागतिक महायुद्धाच्या पाठोपाठ झालेल्या स्पॅनिश फ्ल्यूच्या साथीमध्ये जितके लोक मेले तेवढे मानवजातीच्या इतिहासातील इतर कोणत्याही साथीत मेले नाही. २ कोटी १० लोख लोक मृत्युमुखी पडले! तरीही रोग व सांथीचे थैमान चालूच आहे. दरवर्षी हृदरोग व कर्करोगाने लाखो लोक मरतात. गुप्तरोग वेगाने पसरत आहेत. विषमज्वर, गोगलगाईमुळे होणारा रोग तसेच नदीकाठी होणाऱ्‍या व अंधकरणाच्या रोगासारखे भयंकर विकार देशोदेशी विशेषतः आशिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिका खंडात पसरत आहेत.

 “जागोजागी . . . भूमिकंप होतील.”—मत्तय २४:७.

  १९१४ पासून पुढे आतापर्यंत, इतिहासात पूर्वी झाले नव्हते इतके मोठे भूमिकंप होत आहेत. इ.स. ८५६ ते १९१४ या १,००० पेक्षा अधिक वर्षात फक्‍त २४ मोठे भूमिकंप झाले. त्यात १९,७३,००० लोक मृत्यु पावले. परंतु १९१५ ते १९७८ या ६३ वर्षांच्या काळात ४३ मोठे भूमिकंप होऊन त्यात जवळजवळ १६,००,००० लोक मरण पावले.

 ‘अनीती वाढेल.’—मत्तय २४:१२.

  अनाचार व गुन्हे वाढल्याचे समाचार सर्व जगातून येतात. खून, दरोडे, बलात्कार असे हिंसक गुन्हे मोकाट सुटले आहेत. फक्‍त अमेरिकेत पाहिल्यास सरासरी प्रत्येक सेकंदाला एक गंभीर गुन्हा घडतो. अनेक ठिकाणी दिवसाढवळ्याही रस्त्यावर जाणे सुरक्षित वाटत नाही. रात्री बाहेर जाण्याची भीती वाटते. यासाठीच लोक दरवाजांना आतून कड्या-कुलुपे लावून बसतात.

 “भयाने . . . माणसे मरणोन्मुख होतील.”—लूक २१:२६.

  आज बहुधा भीती ही लोकांच्या जीवनातील सर्वात प्रबळ भावना आहे. पहिल्या अणुबॉम्बच्या स्फोटानंतर अणुशास्त्रज्ञ हेरॉल्ड सी. युरे म्हणालेः “भविष्यात आपण भीती खाऊ; भीतीत झोपू; भीतीत जगू व भीतीत मरु.” मानवजातीतील अनेकांवर हेच ओढवले आहे. आणि ते फक्‍त अणुयुद्धाच्या टांगत्या तलवारीने नव्हे तर लोकांना गुन्हे, प्रदूषण, रोग, महागाई व त्यांच्या सुरक्षिततेला व जीवनाला भेडसावणाऱ्‍या इतर अनेक गोष्टींचीही भीती वाटते.

 “आईबापास न मानणारी.”—२ तीमथ्य ३:२.

  आजकाल आपल्या मुलांवर आई-वडीलांचा बहुधा ताबा नसतो. तरुण पिढी सर्व अधिकाराविरुद्ध दंड थोपटते. त्यामुळे जगातील प्रत्येक देशाला बालगुन्हेगारीने ग्रासले आहे. काही देशातील अर्ध्याहून अधिक गुन्हे १० ते १७ वर्षे वयोगटातील मुलांनी केलेले असतात. खून, बलात्कार, हल्ले, दरोडे, चोऱ्‍या, मोटारी पळवणे या गोष्टी मुले करत आहेत. आई-वडीलांची अवज्ञा, इतिहासात इतकी सर्वसामान्य कधीही नव्हती.

 “माणसे . . . धनलोभी . . . होतील.”—२ तीमथ्य ३:२.

  आज सगळीकडे लोभ दिसतो. अनेक लोक पैशासाठी वाटेल ते करतील. ते चोऱ्‍या करतील वा जिवेही मारतील. ज्यामुळे इतर लोक आजारी पडतील वा मरतील हे माहीत आहे, अशा वस्तु बनवणे व विकण्याचे प्रकार लोभी लोकांना अपरिचित नाहीत. त्यांच्या जीवन-मार्गावरुन वा उघडही लोक पैशाला, ‘हा माझा देव आहे,’ असे म्हणतात.

 “देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी.”—२ तीमथ्य ३:४.

  आजच्या काळात बहुतेक लोक देवाला काय आवडते यापेक्षा फक्‍त त्यांना वा त्यांच्या कुटुंबाला काय आवडते याचाच विचार करतात. विशेषतः देवाला न आवडणाऱ्‍या व्यभिचार, जारकर्म, दारुडेपणा, अमली पदार्थांचा वापर यासारख्याच गोष्टी अनेकांना मनापासून आवडतात. देवाविषयीचे ज्ञान मिळवणे व त्याची सेवा करणे यापेक्षा हितकारक असणारी सुखेही अधिक गणली जातात.

 “सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य स्वरुप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी.”—२ तीमथ्य ३:५.

  जागतिक पुढारी व सामान्य माणसेही अनेकदा धार्मिकपणाचे सोंग करतात. ते मंदिरात जातील व धार्मिक कार्यासाठी वर्गणी देतील. शासकीय कर्मचारी धार्मिक पुस्तकावर हात ठेवून शपथही घेतील. पण बहुधा ते फक्‍त “सुभक्‍तीचे बाह्‍य स्वरुप” असते. पवित्र शास्त्रात दाखवल्याप्रमाणे आजच्या काळात देवाऱ्‍या खऱ्‍या भक्‍तीचा प्रभाव बहुतेक लोकांच्या जीवनात दिसून येत नाही. ते सद्‌विचारांनी प्रवृत्त झालेले नसतात.

 ‘पृथ्वीची नासाडी करणारे.’—प्रकटीकरण ११:१८.

  आपण श्‍वासोच्व्छास करतो ती हवा, पितो ते पाणी व ज्यात आपले अन्‍न उगवते ती जमीन दूषित करण्यात येत आहे. परिस्थिती इतकी गंभीर होत आहे की, “पृथ्वीचे प्रदूषण न थांबवल्यास कालांतराने मानवी जीवनासाठी हा ग्रह निरुपयोगी होईल असे मला वाटते,” असा इशारा बॅरी कॉमनर या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

वरील पुरावा पाहिल्यावर ख्रिस्ताने दिलेले “चिन्ह” व त्याच्या शिष्यांनी वर्तवलेली भाकिते आता पूर्ण होत आहेत असे स्पष्ट होत नाही का? याशिवाय आणखी पुरावे आहेत. पण पवित्र शास्त्रात सांगितलेल्या “शेवटला काळ” मध्ये आपण खरोखरच आहोत असे दर्शविण्यास वरील पुरावा पुरेसा आहे.

७. (अ) ख्रिस्ताची उपस्थिती व “शेवटला काळ” याबद्दल पवित्र शास्त्राचे भाकित उल्लेखनीय का आहे? (ब) १९१४ या वर्षाच्या आधी पवित्र शास्त्र भाकिताविरुध्द जगातील नेते काय अंदाज दर्शवीत होते?

तरीही काही म्हणतीलः ‘लढाया, दुष्काळ, रोगांच्या साथी व भूमिकंपासारख्या गोष्टी इतिहासात बऱ्‍याच वेळा झाल्या आहेत. तेव्हा, त्या पुन्हा होतील असे भाकित करणे कठीण नव्हे.’ पण विचार कराः पवित्र शास्त्राने, या गोष्टी घडतील इतकेच नव्हे तर त्या जागतिक प्रमाणावर घडतील असे सूचित केले आहे. तसेच या सर्व गोष्टी १९१४ मध्ये हयात होती त्या पिढीच्या कालमर्यादेत घडतील असेही पवित्र शास्त्राने सांगितले आहे. पण १९१४ च्या आधी जगातील नामवंत पुढारी काय भविष्य वर्तवीत होते? जागतिक शांतीसाठी पूर्वी कधी नव्हे इतकी अनुकूल परिस्थिती असल्याचे ते सांगत होते. तरीही, पवित्र शास्त्राने भाकित केलेली भयंकर संकटे वेळेवर, म्हणजे १९१४ मध्येच सुरु झाली! १९१४ मध्ये इतिहासाला नवे वळण लागले आहे असे जागतिक पुढारी आता सांगत आहेत.

८. (अ) या व्यवस्थेचा अंत कोणती पिढी पाहील असे येशूने सूचित केले? (ब) म्हणून, आपण कशाची खात्री बाळगावी?

१९१४ पासून पुढील काळाच्या गुणवैशिष्ट्याकडे लक्ष वेधल्यानंतर येशू म्हणालाः “हे सर्व [या व्यवस्थेच्या नाशासह] पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.” (मत्तय २४:३४, १४) येशूने कोणत्या पिढीबद्दल हे सांगितले होते? ज्या पिढीचे लोक १९१४ मध्ये हयात होते ती. त्या पिढीतील शिल्लक राहिलेले लोक आता खूपच वृद्ध झाले आहेत. परंतु त्यातील काही या सध्याच्या दुष्ट व्यवस्थेचा अंत पाहण्यासाठी हयात असतील. यास्तव, आपल्याला निश्‍चितपणे ही खात्री बाळगता येईल की, लवकरच सर्व दुष्टपणाचा व दुष्ट लोकांचा हर्मगिदोनात नाश होईल.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४९ पानांवरील चित्रं]

येशूने, राज्य-सत्तेतील त्याच्या अदृश्‍य उपस्थितीचा दृश्‍य पुरावा काय असेल ते त्याच्या शिष्यांना सांगितले

[१५४ पानांवरील चित्रं]

हर्मगिदोन

१९१४ मध्ये हयात राहिलेल्या पिढीतील काहीजण व्यवस्थीकरणाचा अंत पाहतील व त्यातून ते बचावतील