व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या धर्माला अर्थ आहे

तुमच्या धर्माला अर्थ आहे

प्रकरण ३

तुमच्या धर्माला अर्थ आहे

१. धर्माबद्दल काही लोकांचा काय समज आहे?

 ‘सर्व धर्म चांगले आहेत.’ असे अनेकांचे मत आहे. ते असेही म्हणतातः ‘एकाच ठिकाणाकडे जाणारे ते भिन्‍न मार्ग आहेत.’ हे जर खरे असेल तर तुमचा धर्म कोणता याला तितकासा अर्थ राहात नाही. कारण सर्वच धर्म देवाला स्विकाहार्य आहेत असा त्याचा अर्थ होईल. पण ते तसे आहे का?

२. (अ) परुश्‍यांनी येशूला कसे वागवले? (ब) आपला पिता कोण आहे असा दावा त्यांनी केला?

येशू ख्रिस्त भूतलावर असताना परुशी नावाचा एक धार्मिक पंथ होता. त्यांनी भक्‍तीची एक विशिष्ट पद्धत आचरली होती व ती देवास पसंद आहे अशी त्यांची श्रद्धा होती. पण त्याचबरोबर हे परुशी येशूला मारण्याचा प्रयत्न करीत होते! या कारणास्तव येशू त्यांना म्हणालाः “तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करता.” त्यांनी उत्तर दिलेः “आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे.”—योहान ८:४१.

३. परुश्‍यांच्या पित्याबद्दल येशूने काय म्हटले?

देव त्यांचा खरोखरच पिता होता का? देवाने त्यांची भक्‍ती स्वीकारली होती का? मुळीच नाही! परुशांजवळ जरी पवित्र शास्त्र असले व ते आपण अनुसरतो असे जरी त्यांचे मत होते तरी दियाबलाने त्यांना फसवले होते. तेच येशूनेहि त्यांना सांगितले. तो म्हणालाः “तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात; आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही. . . . तो लबाड व लबाडीचा बाप आहे.”—योहान ८:४४.

४. परुश्‍यांच्या धर्माकडे येशूने कोणत्या दृष्टीने पाहिले?

अशाप्रकारे, परुशांचा धर्म खोटा होता हे उघड आहे. त्यामुळे देवाचे नव्हे पण दियाबलाचे हेतू मात्र साध्य होत होते. यासाठीच येशूने त्यांचा धर्म चांगला नव्हे तर वाईट आहे असा शेरा दिला. त्या धार्मिक परुश्‍यांना तो म्हणालाः “तुम्ही लोकांना स्वर्गाच्या राज्याचे दार बंद करता. तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणाऱ्‍यांना प्रवेश करु देत नाही.” (मत्तय २३:१३) त्यांच्या खोट्या भक्‍तीमुळे येशूने त्यांना ढोंगी व विषारी साप असे संबोधले. त्यांच्या कुमार्गामुळे ते नाशाच्या वाटेवर असल्याचे त्याने सांगितले.—मत्तय २३:२५-३३.

५. एकाच ठिकाणाकडे जाणाऱ्‍या वेगवेगळ्या रस्त्यांप्रमाणे अनेक धर्म नव्हेत असे येशूने कशारितीने दाखवले?

याचाच अर्थ असा की, सर्व धर्म म्हणजे तारण मिळविण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत असे येशूने शिकविले नाही. त्याच्या डोंगरावरील प्रसिद्ध प्रवचनात येशू म्हणालाः “अरुंद दरवाजाने आत जा. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे; आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे; व ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१३, १४) देवाची भक्‍ती योग्यरित्या करीत नसल्याने बहुतांश लोक नाशाच्या मार्गावर आहेत. जीवनाकडे जाणाऱ्‍या मार्गावर फारच थोडे आहेत.

६. इस्राएल राष्ट्राच्या भक्‍तीकडे पाहून आपण काय शिकतो?

देवाला पसंत असलेल्या रितीनेच त्याची भक्‍ती करणे किती महत्वाचे आहे, ते देवाने इस्राएल राष्ट्राशी ठेवलेल्या संबंधावरुन स्पष्ट होते. त्यांच्या भोवतालच्या राष्ट्रातील खोट्या धर्मापासून दूर राहण्याचा इशारा देवाने त्यांना दिला होता. (अनुवाद ७:२५) ते लोक आपल्या देवांना स्वतःच्या मुलांचा बळी देत असत. तसेच त्यांच्यामध्ये समसंभोगासारख्या गलिच्छ लैंगिक चालीरितीहि होत्या. (लेवीय १८:२०-३०) अशा चालीरिती टाळण्याबद्दल देवाने त्यांना बजावले होते. जेव्हा ते अवज्ञा करुन इतर देवांची भक्‍ती करीत तेव्हा त्यांना शिक्षाही दिल्या. (यहोशवा २४:२०; यशया ६३:१०) अशाप्रकारे त्यांच्या धर्माला खरोखरच अर्थ होता.

आजचा धर्म—खोटा?

७, ८. (अ) महायुद्धात धर्माने कोणती भूमिका घेतली? (ब) युद्धकाळातील धर्मांच्या कृत्याबद्दल देवाला काय वाटते असे तुमचे मत आहे?

पण आजच्या शेकडो धर्मांचे काय? धर्माच्या नावाखाली केलेल्या अनेक गोष्टी देवाला पसंत नाहीत याला तुम्हीही सहमत व्हाल. ज्यातून कित्येक लाखो लोक वाचले व आज हयात आहेत त्या जागतिक महायुद्धामध्ये लढणाऱ्‍यांना विरुद्ध पक्षाच्या लोकांना ठार करण्याचे उत्तेजन त्यांच्या धर्मातून मिळाले. लंडनचे बिशप म्हणालेः “मारा त्या जर्मनांना—माराच त्यांना.” आणि दुसरीकडे कलोनच्या आर्चबिशप यांनी जर्मनांना सांगितलेः “देवाच्या नावाने आम्ही तुम्हाला आदेश देतो की, देशाच्या इभ्रतीसाठी व गौरवासाठी आपल्या रक्‍ताच्या शेवटल्या थेंबापर्यंत लढा.”

तद्वत, आपापल्या धार्मिक पुढाऱ्‍यांच्या पाठिंब्याने कॅथोलिकांनी कॅथोलिकांना मारले व प्रॉटेस्टंटांनीही तसेच केले. “आपल्या चर्चमध्येहि आपण युद्ध-ध्वज लावले आहेत. एका तोंडाने आपण ‘शांतीच्या अधिपती’ची स्तुति करतो व दुसऱ्‍याने युद्धाची प्रशंसा करतो,” असे हॅरि एमरसन फॉसडिक या पाळकांनी कबूल केले. तर मग, देवाला, त्याचे मनोगत करण्याचा दावा करीत, युद्धाला गौरवणाऱ्‍या धर्माबद्दल काय वाटत असेल असे तुमचे मत आहे?

९. (अ) वेगवेगळ्या धर्मातील लोकांनी केलेल्या अत्याचाराबद्दल अनेकांना काय वाटते? (ब) धर्म हा जगाचाच एक भाग बनतो त्यावेळी तुम्ही काय अनुमान काढाल?

सर्व इतिहासात देवाच्या नावाने वेगवेगळ्या धर्मानुयायांनी केलेल्या अत्याचारामुळे लाखो लोक देव व ख्रिस्तापासून दूर गेले आहेत. कॅथोलिक व मुसलमानांमध्ये झालेल्या क्रुसेड लढाया, हिंदू-मुसलमान व कॅथोलिक-प्रॉटेस्टंट यांच्यामध्ये झालेली युद्धे यासारख्या भयानक धार्मिक युद्धांसाठी ते देवालाच दोष देतात. ख्रिस्ताच्या नावाखाली झालेली यहुद्यांची हत्या, मध्ययुगात कॅथोलिकांनी केलेली क्रूर चौकशीसत्रे याकडे ते बोट दाखवतात. परंतु या भयानक अत्याचारांना जबाबदार असलेल्या धार्मिक पुढाऱ्‍यांनी जरी देवच आपला पिता असल्याचा दावा केला तरी, येशूने दोषी ठरवलेल्या परुशांसारखे तेहि दियाबलाचीच मुले नाहीत का? सैतान ‘या जगाचा देव’ असल्याने तो जगातील लोकांच्या धार्मिक चालीरितींवर ताबा ठेवील यात नवल ते काय?—२ करिंथकर ४:४; प्रकटीकरण १२:९.

१०. तुम्हाला पसंत नसलेल्या कोणत्या गोष्टी धर्माच्या नावाखाली केल्या जातात?

१० धर्माच्या नावाखाली चाललेल्या अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच अयोग्य वाटत असतील. अनेकदा तुम्ही ऐकले असेल की, अनैतिक व्यक्‍ती चर्चचे (किंवा इतर धार्मिक संघटनांचे) सन्माननीय सभासद असतात. कुमार्गी धर्मगुरुंना आपल्या चर्चमध्ये चांगले मानण्यात येते, असेहि तुम्ही पाहिले असेल. समसंभोग व लग्नाशिवाय लैंगिक संबंध वाईट नव्हेत असेही काही धार्मिक नेते म्हणतात. पण तुम्हाला माहीत असेलच की पवित्र शास्त्र असे म्हणत नाही. वास्तविक इस्राएल लोकांनी असे प्रकार आचरले तेव्हा देवाने त्यांना शिक्षा करवली. याच कारणास्तव त्याने सदोम व गमोरा शहरांचा नाश केला. (यहुदा ७) लवकरच तो आधुनिक काळातील सर्व खोट्या धर्मांचेहि तेच करणार आहे. पवित्र शास्त्रात अशा धर्माला वेश्‍येच्या रुपात दाखवले आहे, कारण त्याने “पृथ्वीवरील राजां”शी अनैतिक संबंध ठेवले आहेत.—प्रकटीकरण १७:१, २, १६.

देवाला मान्य असलेली भक्‍ती

११. आपली भक्‍ती देवाला पसंत पडण्यासाठी कशाची गरज आहे?

११ देव सगळ्याच धर्माविषयी आपली पसंती दाखवीत नसल्याने, ‘त्याची मान्यता असलेल्या मार्गाने मी देवाची भक्‍ती करीत आहे का?’ असा प्रश्‍न आपण स्वतःला विचारला पाहिजे. पण, होय की नाही ते आपल्याला कसे कळणार? खरी भक्‍ती कोणती हे ठरवण्याचा अधिकार कोणाही माणसाला नसून फक्‍त देवाला आहे. यास्तव आपली भक्‍ती देवाला स्विकारावीशी वाटण्यासाठी ती देवाचे वचन म्हणजे पवित्र शास्त्रासोबत पूर्णपणे सुसंगत असली पाहिजे. “देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो” असे जे एका पवित्र शास्त्र लेखकाने म्हटले आहे तसेच आपल्यालाहि वाटले पाहिजे.—रोमकर ३:३, ४.

१२. परुश्‍यांची भक्‍ती देवाला पसंत नाही असे येशू का म्हणाला?

१२ पहिल्या शतकातील परुश्‍यांना तसे मुळीच वाटत नव्हते. त्यांनी आपल्या स्वतंत्र श्रद्धा व चालीरिती निर्माण केल्या होत्या. देवाच्या वचनापेक्षा ते यांचेच अनुसरण करीत होते. परिणाम काय झाला? येशूने त्यांना सांगितलेः “तुम्ही आपल्या संप्रदायेकरुन देवाचे वचन रद्द केले आहे. अहो, ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की, ‘हे लोक वरवर माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात. कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्यांचे नियम.” (मत्तय १५:१-९; यशया २९:१३) या कारणास्तव, देवाची मान्यता हवी असल्यास आपल्या श्रद्धा पवित्र शास्त्रासोबत सुसंगत आहेत याची खात्री करुन घेतली पाहिजे.

१३. देवाची मान्यता मिळविण्यासाठी आपण काय केले पाहिजे असे येशूने सांगितले?

१३ स्वतःला योग्य वाटते ते करुन, आपला ख्रिस्तावर विश्‍वास आहे असे म्हणणे पुरेसे नाही. या विषयावर देवाचा मनोदय काय आहे ते शोधण्याची नितांत आवश्‍यकता आहे. डोंगरावरील आपल्या प्रवचनात येशूने हेच सांगितले. तो म्हणालाः “मला प्रभुजी, प्रभुजी असे म्हणणाऱ्‍या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचाच होईल.”मत्तय ७:२१.

१४. आपण “चांगली कामे” करीत असतानाही, येशू आपल्याला “अनाचार करणारे” समजण्याचा का संभव आहे?

१४ स्वतःला ‘चांगली’ वाटणारी कृत्ये आपण कदाचित ख्रिस्ताच्या नावाने करण्याचा संभव आहे. तरीही, देवाच्या इच्छेप्रमाणे कामे केली नाहीत तर या सर्वांना काहीही किंमत नाही. येशूने यानंतर उल्लेख केलेल्या लोकांसारखे आपण असू. “त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतीलः ‘प्रभो, प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालविली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत का?’ तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो, अनाचार करणाऱ्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा.’” (मत्तय ७:२२, २३) इतर लोक ज्यासाठी आपल्याला धन्यवाद देतील, आपली स्तुति करतील अशी आपल्या मनाला योग्य वाटणारी कामे आपण करीत असू; पण जे योग्य आहे असे देवाला वाटते ते आपण केले नाही तर येशूच्या दृष्टीने आपण ‘अनाचार करणारे’ ठरु.

१५. प्राचीन बिरुयातील लोकांचे अनुकरण करणे शहाणपणाचे का आहे?

१५ आज अनेक धर्म देवाच्या इच्छेप्रमाणे कार्य करीत नसल्याने, ज्या धार्मिक संघटनेशी आपण संलग्न आहोत तिची शिकवण देवाच्या वचनाशी सुसंगत आहे असे आपण गृहीत धरु शकत नाही. एखाद्या धर्मात पवित्र शास्त्र वापरले जात आहे म्हणून त्याची शिकवण व कार्य पवित्र शास्त्रावर आधारित आहे असे सिद्ध होत नाही. तसे ते आहे किंवा नाही याचे आपण स्वतः परिक्षण करणे महत्वाचे आहे. ख्रिस्ती प्रेषित पौलाने बिरुयातील लोकांना शिकवण दिली. तेव्हा त्याने सांगितलेल्या गोष्टी खऱ्‍या आहेत किंवा नाही याची शास्त्राच्या आधारे त्यांनी खात्री करुन घेतली म्हणून त्यांची प्रशंसा केली आहे. (प्रे. कृत्ये १७:१०, ११) जो धर्म देवाला पसंत असेल तो पवित्र शास्त्रासोबत हरप्रकारे सुसंगत असलाच पाहिजे. असा धर्म पवित्र शास्त्राचे काही भाग स्विकारुन बाकीच्या भागांचा अव्हेर करणार नाही.—२ तीमथ्य ३:१६.

नुसता प्रांजळपणा उपयोगाचा नाही

१६. देवाची मान्यता मिळविण्यासाठी फक्‍त प्रांजळपणा पुरेसा नाही हे येशूने कसे दाखवले?

१६ पण, ‘एखाद्याचा धर्म चुकीचा असला तरी, तो आपल्या श्रद्धांशी प्रांजळ असल्यास, असा माणूस देवाला पसंत नसेल का?’ असेही कोणी विचारील. येशूने म्हटले, आपण योग्य गोष्टी करीत आहोत असे जरी लोकांना वाटले तरी ‘अनाचार करणारे’ त्याला मंजूर नाहीत. (मत्तय ७:२२, २३) त्यामुळे देवालाही नुसता प्रांजळपणा पसंत नाही. एकदा येशू त्याच्या शिष्यांना म्हणालाः “तुमचा जीव घेणाऱ्‍या प्रत्येकाला, आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल अशी वेळ येत आहे.” (योहान १६:२) ख्रिस्ती लोकांना मारणाऱ्‍यांना मनापासून वाटत असेल की ते देवाची सेवा करीत आहेत. पण ते चूक आहे हे उघड आहे. त्यांच्या कृती देवाला मंजूर नाहीत.

१७. पौल प्रांजळ होता तरी, ख्रिस्ती बनण्यापूर्वी त्याने काय केले?

१७ ख्रिस्ती होण्यापूर्वी प्रेषित पौलाने स्तेफनाच्या खूनात सहभाग घेतला. यानंतर तो आणखी ख्रिस्ती लोकांना मारण्याचे मार्ग शोधू लागला. (प्रे. कृत्ये ८:१; ९:१, २) पौल म्हणतोः “मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करीत असे व तिचा नाश करीत असे. आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकातल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्मात पुढे गेलो होतो.” (गलतीकर १:१३, १४) होय, पौल प्रांजळ होता तरी त्यामुळे त्याचा धर्म योग्य ठरला नाही.

१८. (अ) ख्रिस्ती लोकांचा त्याने छळ केला तेव्हा पौलाचा धर्म कोणता होता? (ब) पौल व त्याच्या समकालीन लोकांना आपला धर्म बदलण्याची गरज का होती?

१८ पौल ज्या पंथाचा सभासद होता त्या पंथाने येशू ख्रिस्ताला अव्हेरल्याने, त्या पंथाला देवाने अव्हेरले. (प्रे. कृत्ये २:३६, ४०; नीतीसूत्रे १४:१२) त्यामुळे देवाची मान्यता मिळवण्यासाठी पौलाला आपला धर्म बदलणे आवश्‍यक होते. अतिशय प्रांजळ व “देवाविषयी” आस्था असलेल्या इतर काही लोकांबद्दल पौलाने लिहिले की, त्यांचा धर्म अचूक ज्ञानावर आधारलेला नसल्याने ते लोक देवाला पसंत नव्हते.—रोमकर १०:२, ३.

१९. सत्यामध्ये जगातल्या वेगवेगळ्या धर्मतत्वांचा समावेश होऊ शकत नाही असे कशावरुन दिसते?

१९ जगातल्या सर्वच धार्मिक कल्पनांना सत्यामध्ये जागा नाही. उदाहरणार्थ, एक तर माणसाचा पार्थिव देह नष्ट झाल्यावर उरणारा आत्मा आहे किंवा नाही. एक तर पृथ्वी सर्वकाळ राहील अथवा राहणार नाही. देव एकतर दुष्टतेचा नाश करील किंवा करणार नाही. अशा व इतर अनेक कल्पना एक तर बरोबर अथवा चूक आहेत. एकमेकांविरुद्ध असलेल्या दोन्ही कल्पना खऱ्‍या असू शकत नाहीत. दोघातली एक खरी असू शकेल. दोन्ही नव्हेत. एखादी चुकीची गोष्ट केवळ त्यावर प्रांजळपणे विश्‍वास ठेवून वागल्याने बरोबर ठरणार नाही.

२०. धर्माच्या बाबतीत आपल्याला योग्य त्या ‘नकाशा’प्रमाणे कसे जाता येईल?

२० तुमची ज्यावर श्रद्धा आहे ती गोष्ट चुकीची आहे असा पुरावा दिल्यास तुम्हाला कसे वाटेल? उदाहरणार्थ, तुम्ही एका मोटारीत बसून एखाद्या गावाला प्रथमच जात आहात. तुमच्याजवळ रस्त्याचा नकाशा आहे. पण तुम्ही तो नीट तपासण्याची तसदी घेतली नाही. कोणीतरी तुम्हाला रस्ता सांगितला. आणि त्याने सांगितलेला रस्ता योग्य आहे असा तुमचा प्रांजळ विश्‍वास आहे. पण समजा, तो रस्ता चुकीचा आहे. आणि कोणी ती चूक तुमच्या नजरेला आणली तर? तुम्हाजवळच्या नकाशावरुनच, तुम्ही घेतलेला रस्ता चुकीचा आहे असे त्याने दाखवले तर? तुमचा ताठा किंवा हट्टीपणा आपण चुकीच्या मार्गावर आहोत हे मान्य करण्यास अडथळा करील? मग तुमच्या पवित्र शास्त्राच्या परिक्षणावरुन आपण चुकीचा धार्मिक मार्ग आक्रमत आहोत असे समजल्यावर तो बदलण्याची तयारी दाखवा. नाशाचा प्रशस्त मार्ग टाळा. जीवनाच्या अरुंद मार्गावर चला!

देवाच्या इच्छेप्रमाणे करणे अगत्याचे

२१. (अ) सत्य जाणण्याशिवाय अधिक कशाची गरज आहे? (ब) तुम्ही करीत असलेल्या काही गोष्टी देवाला पसंत नाहीत असे कळल्यास तुम्ही काय कराल?

२१ पवित्र शास्त्रातील सत्ये जाणणे महत्वाचे आहे. पण या सत्याला अनुसरुन देवाची भक्‍ती न केल्यास हे ज्ञान कवडीमोलाचे आहे. (योहान ४:२४) सत्य आचरणे, देवाच्या इच्छेप्रमाणे करणे हे सर्वात महत्वाचे आहे. “विश्‍वास क्रियावाचून निर्जीव आहे,” असे शास्त्रवचन आहे. (याकोब २:२६) तुमचा धर्म सर्व बाबतीत पवित्र शास्त्रासोबत सुसंगत असला पाहिजे एवढेच नव्हे तर तो जीवनाच्या प्रत्येक कृतीमध्ये लागू केला गेला पाहिजे. तरच देव संतुष्ट होईल. यास्तव, देवाच्या दृष्टीने जे चूक ते आपण करीत आहोत असे समजल्यास त्यात बदल करण्याची तुमची तयारी आहे का?

२२. खरा धर्म आचरल्यास आपल्याला आता व भविष्यात कोणते फायदे होतील?

२२ देवाच्या इच्छेप्रमाणे वागल्यास तुम्हाला अलौकिक आशीर्वाद मिळतील. तुमच्यासाठी ते फायदेकारकच आहे. खरा धर्म आचरल्याने तुम्ही अधिक चांगली व्यक्‍ती—अधिक चांगला माणूस, पति वा पिता, अधिक चांगली स्त्री, पत्नी वा माता—व्हाल. तुमचे आचरण योग्य असल्याने तुम्ही चारचौघात उठून दिसाल. कारण त्यामुळे तुम्हात देवाप्रमाणे उत्तम गुण उत्पन्‍न होतील. पण याहूनहि अधिक म्हणजे नूतन भूतलावरील देवाच्या नंदनवनात उत्तम आरोग्य व आनंद यासह अनंतकाल जीवनाचा आशीर्वाद मिळविण्यास तुम्ही पात्र असाल. (२ पेत्र ३:१३) तुमच्या धर्माला अर्थ आहे यात प्रश्‍नच नाही!

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील चित्रं]

येशूला ठार मारण्याचा प्रयत्न करणारे धर्मपुढारी देवाची सेवा करीत होते का?

[२६, २७ पानांवरील चित्रं]

बहुतेक लोक नाशाच्या पसरट मार्गाने जात आहेत असे येशूने म्हटले, केवळ थोडेच जीवनाच्या अरुंद मार्गाने जात आहेत

[२९ पानांवरील चित्रं]

“आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात, परंतु कृतींनी ते त्याला नाकारतात.”—तीत १:१६.

बोलण्यात

कृतीमध्ये

[३० पानांवरील चित्रं]

वेगळ्या धर्मामुळे पौलाने ख्रिस्ती शिष्य स्तेफनाचा दगडमार करण्यात सहभाग घेतला

[३३ पानांवरील चित्रं]

तुम्ही चुकीच्या रस्त्यावर असल्यास ते कबूल करण्यास तुम्हाला गर्व किंवा उद्दामपणा मागे ठेवील का?