व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही सैतानी जगाच्या बाजूचे की देवाच्या नव्या व्यवस्थीकरणाच्या बाजूचे?

तुम्ही सैतानी जगाच्या बाजूचे की देवाच्या नव्या व्यवस्थीकरणाच्या बाजूचे?

प्रकरण २५

तुम्ही सैतानी जगाच्या बाजूचे की देवाच्या नव्या व्यवस्थीकरणाच्या बाजूचे?

१. तुम्ही देवाच्या नवीन व्यवस्थीकरणाच्या बाजूने आहात हे कशाने निश्‍चित सिद्ध होते?

 तुम्ही देवाच्या नीतीमान नव्या व्यवस्थीकरणाच्या बाजूने आहात का, आणि ते यावे अशी तुमची इच्छा आहे का? तुम्ही सैतानाच्या विरुद्ध आहात का व त्याचे जग निघून जावे असे तुम्हाला वाटते का? तुम्ही या दोन्ही प्रश्‍नांना जरुर होय, म्हणाल. पण तेवढेच पुरेसे आहे का? शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ अशी एक जुनी म्हण आहे. देवाच्या नव्या व्यवस्थेवर तुमचा विश्‍वास आहे तर ते, तुम्ही ज्या रितीने आपले जीवन जगता त्यावरुन सिद्ध होईल.—मत्तय ७:२१-२३; १५:७, ८.

२. (अ) आपण ज्यांची सेवा करु शकू असे दोन धनी कोण आहेत? (ब) आपण कोणाचे दास वा सेवक आहोत हे कसे दिसून येते?

खरे पाहता, तुमचा जीवनमार्ग दोन धन्यांपैकी एकालाच संतोष देऊ शकेल. तुम्ही एकतर यहोवा देवाच्या व तसे नाही तर दियाबल सैतानाच्या सेवेत राहाल. पवित्र शास्त्रातील एक तत्त्व आपल्याला याविषयीची योग्य रसिकता दाखवू शकेल. ते म्हणतेः “आज्ञापालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहा.” (रोमकर ६:१६) तर मग, तुम्ही कोणाची आज्ञा पाळता? तुम्ही कोणाची इच्छा आचरता? तुमचे उत्तर काहीही असो, पण तुम्ही जर या जगाचे कुमार्ग अवलंबत असाल तर खरा देव यहोवा याची सेवा तुम्ही करीत असणे शक्य नाही.

सैतानाचे जग—ते काय आहे?

३. (अ) या जगाचा अधिकारी कोण असल्याचे पवित्र शास्त्र दर्शविते? (ब) येशूने प्रार्थना करताना, आपले शिष्य व जग यातील फरक कसा दाखवला?

येशूने सैतानाला “या जगाचा अधिपती” असे संबोधले. तसेच प्रेषित योहानाने म्हटलेः “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (योहान १२:३१; १ योहान ५:१९) देवाला प्रार्थना करताना, येशूने, आपल्या शिष्यांचा, ते या सैतानी जगाचे भाग आहेत असा उल्लेख केला नाही हे ध्यानात घ्या. तो म्हणालाः “त्यांच्यासाठी [आपल्या शिष्यांसाठी] मी विनंति करतो, मी जगासाठी विनंति करीत नाही. . . . जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत.” (योहान १७:९, १६; १५:१८, १९) यावरुन हे स्पष्ट दिसते की, खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी स्वतःला या जगापासून वेगळे ठेवले पाहिजे.

४. (अ) योहान ३:१६ मध्ये कशाचा उल्लेख “जग” असा करण्यात आलेला आहे? (ब) ख्रिस्ताच्या अनुयायांनी ज्यापासून वेगळे राहावे असे “जग” कोणते?

परंतु, येशूने जेव्हा “जगासाठी” असे म्हटले तेव्हा तो कशाला अनुलक्षून ते म्हणत होता? पवित्र शास्त्रात “जग” या संज्ञेचा काही वेळा केवळ सर्वसाधारण मानवजात असा अर्थ होतो. या मानवजातीच्या जगासाठी खंडणी म्हणून आपले जीवन देण्यासाठी देवाने आपल्या पुत्राला पाठविले. (योहान ३:१६) तरी देखील सैतानाने मानवजातीमधील बहुतेकांना देवाविरुद्ध संघटित केले आहे. या कारणामुळे, सैतानाचे जग म्हणजे देवाच्या दृश्‍य संघटनेला सोडून किंवा देवाच्या दृश्‍य संघटनेच्या बाहेरचा संघटित मानवी समाज हा होय. अशा या जगापासून खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी वेगळे राहिले पाहिजे.—याकोब १:२७.

५. जगाचा एक प्रमुख भाग कोणता व पवित्र शास्त्रात तो कोणत्या रुपात दाखवण्यात आला आहे?

सैतानाचे जग, म्हणजे त्याचा संघटित मानवी समाज हा अनेक निकटवर्तीय भागांनी मिळून बनलेला आहे. खोटा धर्म हा त्यातील एक भाग होय. पवित्र शास्त्रात खोटा धर्म, “मोठी बाबेल” हे नाव असलेल्या मोठ्या कळवंतीणीच्या वा वेश्‍येच्या रुपात चितारण्यात आला आहे. ते जागतिक स्वरुपाचे साम्राज्य आहे हे त्या वेश्‍येला, ती “पृथ्वीवरील राजांवर राज्य करणारी” आहे असे सूचित केल्यामुळे लक्षात येते. (प्रकटीकरण १७:१, ५, १८) तथापि, मोठी बाबेल ही जगव्याप्त धार्मिक साम्राज्य आहे हे कशावरुन सिद्ध होते?

६, ७. (अ) मोठी बाबेल हे धार्मिक साम्राज्य असल्याचे कशाने सिद्ध होते? (ब) खोटा धर्म व राजकीय सरकार यांजमध्ये कसा संबंध चालत आला आहे?

वस्तुतः “तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले” असे म्हटलेले असल्यामुळे मोठी बाबेल जगव्याप्त राजकीय साम्राज्य असणे शक्य नाही. शिवाय, तिचा नाश होतो त्यावेळी जगातील “व्यापारी” दूर उभे राहून शोक करीत असल्याचे दाखविले गेल्यामुळे ती जगव्याप्त व्यापारी साम्राज्यही नव्हे. (प्रकटीकरण १७:२; १८:१५) तथापि, “सर्व राष्ट्रे [तिच्या] चेटकाने ठकविली गेली” हे पवित्र शास्त्रातील विधान लक्षात घेता ती खरोखरीच धार्मिक साम्राज्य आहे हे स्पष्टरित्या दिसून येते.—प्रकटीकरण १८:२३.

मोठी बाबेल व “श्‍वापद” यांच्यामध्ये असणाऱ्‍या संबंधावरुन सुद्धा ती धार्मिक साम्राज्य असल्याचे सिद्ध होते. पवित्र शास्त्रात अशी श्‍वापदे राजकीय सरकारांचे प्रतिनिधित्व करतात. (दानीएल ८:२०, २१) मोठी बाबेल ही, “दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्‍वापदावर बसलेली” आहे असे तिचे वर्णन आहे. याचा अर्थ हा होतो की, ती या “श्‍वापदा”वर अथवा जागतिक सरकारांवर आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करीत होती. (प्रकटीकरण १७:३) शिवाय हे खरेच आहे की, इतिहासामध्ये धर्म हा नेहमी राजकारणात मिसळत राहिला आणि अनेकदा तर काय करावे हे तो सरकारांना सांगत राहिला. या दृष्टीने पाहता, तिने खरोखरच “पृथ्वीच्या राजांवर राज्य केले” आहे.—प्रकटीकरण १७:१८.

८. सैतानाच्या जगाचा आणखी एक महत्त्वाचा भाग कोणता, व पवित्र शास्त्रामध्ये त्याचे चित्रण कसे करण्यात आले आहे?

ती राजकारणी सरकारे सैतानाच्या जगाचा दुसरा महत्त्वाचा भाग होत. यांना पवित्र शास्त्रात श्‍वापदांची उपमा देण्यात आली आहे हे आपण आधीच पाहिले आहे. (दानीएल ७:१-८, १७, २३) या श्‍वापदासारख्या सरकारांना त्यांचा अधिकार सैतानाकडून मिळतो हे योहानाने लिहिलेल्या त्याच्या दृष्टांतातून दिसून येते. तो लिहितोः “मी एक श्‍वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला दहा शिंगे व सात डोकी असून . . . त्याला अजगराने आपली शक्‍ती दिली.” (प्रकटीकरण १३:१, २; १२:९) याशिवाय, ही राज्ये किंवा सरकारे सैतानाच्या जगाचा भाग आहेत याचा अधिक पुरावा म्हणजे ही राज्ये येशूला बहाल करण्याच्या आमिषाने सैतानाने त्याची परिक्षा घेतली. सैतान त्यांचा अधिपती नसता तर त्याला असे करता येणे जमले नसते.—मत्तय ४:८, ९.

९. (अ) प्रकटीकरण १८:११ मध्ये सैतानाच्या जगाच्या आणखी एका भागाचे कसे वर्णन करण्यात आले आहे? (ब) तो काय करतो व कशाची चालना देतो की ज्यामुळे सैतान हा त्याच्या पाठीशी आहे हे सिद्ध होते?

सैतानाच्या जगाचा आणखी एक भाग म्हणजे लोभी व जुलमी व्यापारी व्यवस्था, जिचा प्रकटीकरण १८:११ मध्ये “व्यापारी” या नावाने उल्लेख आहे. ही व्यापारी व्यवस्था, लोकात, त्याने उत्पादित केलेल्या वस्तुंची खरेदी करण्याची स्वार्थी लालसा वाढविण्याची खटपट करीत राहते. खरे म्हणजे, या अशा वस्तु असतात ज्या कदाचित लोकांना जरुरीच्या नसतात किंबहुना त्यांचे यांच्याशिवायही चालू शकते. याचवेळी ही लोभी व्यापारी व्यवस्था अन्‍नाचे साठे लपवून ठेवून लोकांना अन्‍न विकत घेणे न परवडल्यामुळे उपासमारीने मरु देते. दुसरीकडे संपूर्ण मानवी कुटुंबाचा संहार करण्याची क्षमता असलेली युद्धाची अस्रे बनवून नफा मिळवण्यासाठी विकली जातात. अशारितीने सैतानी जगताची व्यापारी व्यवस्था, खोटा धर्म व राजकीय सरकारे स्वार्थ, गुन्हे व भयानक लढाया यांना प्रोत्साहन देतात.

१०, ११. (अ) सैतानाच्या जगाचा आणखी एक प्रकार कोणता आहे? (ब) या प्रकारात गुंतण्यापासून दूर राहावे यासाठी कोणते इशारे पवित्र शास्त्राने दिले आहेत?

१० दियाबल सैतानाच्या कह्‍याखाली संघटित असणारा मानवी समाज खरोखर दुष्ट व भ्रष्ट आहे. तो देवाच्या नीतीमान नियमांना विरोध करतो व सर्व प्रकारच्या अनैतिक व्यवहारांनी भरलेला आहे. यासाठीच स्वैरवर्तन व अनैतिक आचरण हा सैतानी जगताचा आणखी एक गुणविशेष आहे असे म्हणता येईल. याच कारणामुळे इतर राष्ट्रांच्या वाईट चालीरिती ख्रिश्‍चनांनी टाळाव्या असा इशारा प्रेषित पौल व पेत्र यांनी त्यांना दिला आहे.—इफिसकर २:१-३; ४:१७-१९; १ पेत्र ४:३, ४.

११ या जगाच्या अयोग्य वासना व अनैतिक मार्ग यांविरुद्ध ख्रिश्‍चनांनी जागरुक राहण्याच्या गरजेवर प्रेषित योहानानेही विशेष जोर दिला. त्याने लिहिलेः “जगावर व जगातील गोष्टींवर प्रीती करु नका; जर कोणी जगावर प्रीती करतो तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे, देहाची वासना, डोळ्यांची वासनासंसाराची फुशारकी ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.” (१ योहान २:१५, १६) याकोब या शिष्याने म्हटलेः “जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.”—याकोब ४:४.

या जगाचे असणे कसे टाळावे

१२, १३. (अ) ख्रिश्‍चनांनी या जगात राहिले पाहिजे हे येशूने कसे दाखवले? (ब) या जगात राहून देखील त्याचा भाग न बनणे कसे शक्य आहे?

१२ जोपर्यंत सैतानाचे जग अस्तित्वात आहे तोवर ख्रिस्तीजनांना त्यात राहणे भाग आहे. येशूने आपल्या पित्याला प्रार्थना करताना तेच दर्शविलेः “तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही.” पण पुढे येशू म्हणालाः “ते जगाचे नाहीत.” (योहान १७:१५, १६) तर मग, सैतानाच्या जगात राहून देखील त्याचे न राहणे कसे शक्य आहे?

१३ आजच्या संघटित मानवी समाजाच्या लोकांमध्ये तुम्ही राहात आहात. यामध्ये व्यभिचारी, लोभी व इतर वाईट गोष्टी करणाऱ्‍या लोकांचा समावेश आहे. तुम्ही कदाचित त्यांच्यासोबत काम करीत असाल, शाळेत जात असाल, जेवत असाल व अशाच इतर कामात सहभागी होत असाल. (१ करिंथकर ५:९, १०) देवाप्रमाणे तुम्हीही त्यांच्यावर प्रीती दाखवीत असाल. (योहान ३:१६) पण लोक करीत असलेल्या वाईट गोष्टींवर खरे ख्रिस्ती प्रीती करीत नाहीत. ते त्यांची वृत्ती, कृति व जीवनातील ध्येये आत्मसात करीत नाहीत. ते त्यांच्या भ्रष्ट धर्म व राजकारणात थोडासाही भाग घेत नाहीत. त्यांना उपजिविकेसाठी जरी अनेकदा व्यापारी जगतात काम करावे लागत असेल तरी ते धंद्यामध्ये अप्रामाणिक व्यवहार करीत नाही. तसेच भौतिक गोष्टी संपादित करणे हे आपले जीवनध्येय बनवीत नाही. ते देवाच्या नव्या व्यवस्थीकरणाच्या बाजूचे असल्याने सैतानाच्या जगातील लोकांची वाईट संगत टाळतात. (१ करिंथकर १५:३३; स्तोत्रसंहिता १:१; २६:३-६, ९, १०) परिणामी, ते सैतानी जगतात राहतात पण त्याचा भाग बनत नाहीत.

१४. तुम्ही देवाच्या नव्या व्यवस्थीकरणाच्या बाजूचे असाल तर पवित्र शास्त्रातील कोणती आज्ञा पाळाल?

१४ तुमच्याविषयी काय म्हणता येईल? तुम्हाला सैतानाच्या जगाचे व्हावयाचे आहे का? की तुम्ही देवाच्या नव्या व्यवस्थीकरणाच्या बाजूने आहात? जर देवाच्या नव्या व्यवस्थीकरणाच्या बाजूचे आहात तर हे जग व त्याच्या खोट्या धर्मापासून तुम्ही वेगळे राहाल. तुम्ही ही आज्ञा ऐकालः “माझ्या लोकांनो, . . . तिच्यामधून [मोठी बाबेल] निघा.” (प्रकटीकरण १८:४) परंतु, मोठ्या बाबेलमधून निघण्यामध्ये, खोट्या धर्माशी संबंध तोडण्यापेक्षाही अधिक अशा काही गोष्टी आहेत. जगाच्या धार्मिक उत्सवांमध्ये भाग न घेणे हे देखील त्यातच मोडते.—२ करिंथकर ६:१४-१८.

१५. (अ) ख्रिश्‍चनांना येशूच्या जन्मदिनाऐवजी काय पाळण्याची आज्ञा देण्यात आली आहे? (ब) अतिशय थंडीच्या हिंवाळ्यामध्ये येशूचा जन्म झाला असणे शक्य नाही हे कशावरुन दिसून येते? (क) येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी २५ डिसेंबर ही तारीख का निवडण्यात आली?

१५ आजकाल नाताळ हा मोठा धार्मिक सण मानला जातो. परंतु आरंभीच्या ख्रिस्ती लोकांनी तो कधीच साजरा केला नाही असे इतिहास दाखवितो. येशूने त्याच्या अनुयायांना त्याच्या मृत्युचा स्मरणदिन आचरण्यास सांगितला, जन्माचा नव्हे. (१ करिंथकर ११:२४-२६) खरे म्हणजे, डिसेंबर २५ ही येशूच्या जन्माची तारीख नाहीच. ती असणे शक्यच नाही कारण पवित्र शास्त्र दाखविते की, त्याच्या जन्माच्या वेळी मेंढपाळ रात्रीच्या वेळीही शेतात होते. गारव्याच्या व पावसाळी हिवाळ्याच्या दिवसात ते तेथे असू शकणार नव्हते. (लूक २:८-१२) डिसेंबर २५ ही येशूच्या जन्मदिवस साजरा करण्याची तारीख ठरविण्यात आली ती यासाठी की, द वर्ल्ड बुक एनसायक्लोपिडिया विवेचीत करते त्याप्रमाणेः “रोममधील लोक आधीपासूनच तो दिवस शनी देवीची मेजवानी या नावाने सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करीत असत.”

१६. (अ) आणखी कोणत्या प्रमुख सणांचा उगम गैर-ख्रिस्ती होता? (ब) खरे ख्रिस्ती कोणत्या चांगल्या कारणास्तव नाताळ व ईस्टर साजरा करीत नाही?

१६ ईस्टर हा आणखी एक महत्वाचा धार्मिक सण होय. दक्षिण अमेरिकेतील काही देशात साजरा केला जाणारा पवित्र सप्ताह त्याच्यासारखाच असतो. परंतु, आरंभीच्या ख्रिस्तीजनांनी ईस्टर सण कधी साजरा केला नाही. कारण याचाही उगम ख्रिस्तेत्तर सणात झाला होता. द एनसायक्लोपिडिआ ब्रिटेनिका म्हणतेः “नव्या करारामध्ये ईस्टर सण साजरा करण्याविषयी उल्लेख नाही.” वस्तुतः नाताळ व ईस्टर हे सण ख्रिस्ती नसले तरी आणि त्यांचा उगम खोट्या दैवतांच्या उपासनेतून झालेला आहे त्यामुळे काही फरक पडतो का? खरे व खोटे यांची सांगड घालण्याविरुद्ध इशारा देताना प्रेषित पौल म्हणाला की, “थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते.” (गलतीकर ५:९) त्याने आरंभीच्या काही ख्रिश्‍चनांना म्हटले की, जे दिवस मोशेच्या नियमानुसार पाळले जात असत पण देवाने ख्रिस्ती लोकांसाठी रद्द केले होते ते त्यांनी पाळणे अयोग्य होते. (गलतीकर ४:१०, ११) तर मग, जे सण पाळावे असे देवाने कधीच सांगितले नाही व जे खोट्या धर्मातून सामोरे आले आहेत अशा सणांपासून ख्रिस्ती लोकांनी दूर राहणे किती महत्त्वाचे आहे बरे!

१७. (अ) ज्या सुट्ट्यांमुळे मानव वा राष्ट्रांचा सन्मान होतो त्यात काय चूक आहे? (ब) ख्रिश्‍चनांनी कोणते मार्गाक्रमण अनुसरावे ते पवित्र शास्त्र कसे दाखवते?

१७ जगात काही सुट्ट्या लोकांच्या सन्मानार्थ पाळल्या जातात. तर काही राष्ट्रांना वा जागतिक संस्थांना सन्मान व गौरव देण्यासाठी पाळल्या जातात. परंतु मानवांना भक्‍तीवजा सन्मान देण्याच्या तसेच ज्या गोष्टी केवळ देवच करु शकतो त्यांच्या पूर्ततेसाठी मानवी संस्थांना विसंबून राहण्याच्या विरुद्ध पवित्र शास्त्र आपल्याला इशारा देते. (प्रे. कृत्ये १०:२५, २६; १२:२१-२३; प्रकटीकरण १९:१०; यिर्मया १७:५-७) यास्तव ज्या सुट्ट्यांमुळे मानवाचा वा मानवी संस्थेचा गौरव होतो त्या देवाच्या इच्छेला अनुसरुन नाहीत आणि खरे ख्रिश्‍चन त्यामध्ये सहभागी होणार नाहीत.—रोमकर १२:२.

१८. (अ) सन्मान देण्यास व उपासना करण्यास मानवाने कोणत्या गोष्टी बनविल्या आहेत? (ब) एखाद्या गोष्टीला भक्‍तीवजा सन्मान देण्याबद्दल देवाचा नियम काय म्हणतो?

१८ मानवाने अनेक गोष्टी बनवल्या असून त्यांना सन्मान देण्यास व त्यांची उपासना करण्यास लोकांना सांगण्यात येते. त्यातील काही धातूच्या वा लाकडी असतात. इतर काही कापडाच्या असून त्यावर आकाशातील वा पृथ्वीवरील वस्तूंची प्रतिकृती विणलेली असते किंवा चित्रित केलेली असते. अशा वस्तूला भक्‍तीवजा सन्मान लोकांनी द्यावा असा कायदा एखादे राष्ट्र करील. पण देवाचा कायदा म्हणतो की, त्याच्या सेवकांनी असे करु नये. (निर्गम २०:४, ५; मत्तय ४:१०) अशा परिस्थितीत देवाच्या लोकांनी काय केले आहे?

१९. (अ) बाबेलच्या राजाने सर्व लोकांना काय करण्याची आज्ञा दिली? (ब) ख्रिश्‍चनांनी कोणाचे उदाहरण अनुसरणे योग्य ठरेल?

१९ प्राचीन बाबेलमध्ये नबुखद्‌नेस्सर राजाने सोन्याची एक भव्य मूर्ति बनवली आणि सर्वांनी त्या मूर्तीला दंडवत करावा असा हुकूम सोडला. तो म्हणालाः “जो कोणी तिला [मूर्तीला] साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील.” पवित्र शास्त्र सांगते की, शद्रख, मेशख व अबेद्‌नेगो या तीन इब्री तरुणांनी राजाच्या हुकुमाप्रमाणे करण्याचे नाकारले. ते का बरे? कारण त्यामध्ये भक्‍ती गोवलेली होती, व ते केवळ यहोवाचीच भक्‍ती करीत होते. त्यांनी जे केले ते देवाला मान्य वाटले त्यामुळे त्याने राजाच्या क्रोधापासून त्यांना वाचवले. इतकेच नव्हे तर, यहोवाच्या या सेवकांचा त्याच्या राज्याला धोका नाही असेही नबुखद्‌नेस्सर राजाच्या लक्षात आले व म्हणून त्याने त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी एक कायदा जारी केला. (दानीएल ३:१-३०) या तरुणांच्या विश्‍वासूपणाचे तुम्हाला कौतुक वाटत नाही का? देवाचे सर्व कायदे पाळून आपण खरोखरीच त्याच्या नव्या व्यवस्थीकरणाच्या बाजूचे आहोत असे तुम्ही दाखवाल का?—प्रे. कृत्ये ५:२९.

२०. लैंगिक नैतिकतेविषयीचे देवाचे नियम आपण मोडावे म्हणून सैतान कोणते अनेक मार्ग अवलंबितो?

२० आपण यहोवाची सेवा करावी असे सैतानाला नक्कीच वाटत नाही. आपण त्याचीच सेवा करावी असे त्याला वाटते. आपण ज्याच्या आज्ञा पाळतो त्याचे दास व सेवक होतो हे सैतानाला ठाऊक असल्याने, त्याला जे हवे ते आपण करावे अशा प्रयत्नात तो असतो. (रोमकर ६:१६) दूरदर्शन, चित्रपट, काही नृत्यप्रकार, अश्‍लील वांड्‌.मय अशा अनेक मार्गांनी अविवाहीत व्यक्‍तींच्या लैंगिक संबंधाला व व्यभिचाराला सैतान उत्तेजन देतो. असे वर्तन जनमान्य व योग्यही असल्याचे भासवले जाते. परंतु हे देवाच्या नियमांविरुद्ध आहे. (इब्रीयांस १३:४; इफिसकर ५:३-५) असे वर्तन करणारी व्यक्‍ती खरोखर आपण सैतानाच्या जगाच्या बाजूने आहोत असे दाखवत असते.

२१. याशिवाय आणखी कोणते रितीरिवाज पाळल्याने ती व्यक्‍ती सैतानाच्या जगाच्या बाजूने आहे असे प्रदर्शित होईल?

२१ सैतानाच्या जगाने लोकप्रिय केलेले परंतु देवाच्या नियमांविरुद्ध असलेले इतरही रितीरिवाज आहेत. त्यातील एक म्हणजे झिंगण्यापर्यंत मद्यप्राशन करणे. (१ करिंथकर ६:९, १०) दुसरे म्हणजे विपरीत सुखासाठी गांजा व अफूसारख्या मादक पदार्थांचा वापर करणे तसेच तंबाखूचा वापर करणे. या गोष्टी शरीराला अपायकारक असून नैतिकदृष्ट्या अशुद्ध असतात. त्यांचा वापर, “देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध” करावे या देवाच्या शिकवणींच्या अगदी विरुद्ध आहे. (२ करिंथकर ७:१) तंबाखूचे धुम्रपान केल्यामुळे त्याच्या धुरामध्ये श्‍वासोच्व्छास कराव्या लागणाऱ्‍या शेजारच्या लोकांच्या स्वास्थ्याला धोका पोहंचतो. त्यामुळे धुम्रपान करणारा माणूस, ख्रिस्ती माणसाने आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करावी या देवाच्या नियमाचा भंग करीत असतो.—मत्तय २२:३९.

२२. (अ) पवित्र शास्त्र रक्‍ताविषयी काय म्हणते? (ब) रक्‍त संक्रमण स्विकारणे हे रक्‍त “खाणे” यापेक्षा वेगळे नाही ते कसे? (क) ‘रक्‍त वर्ज्य करणे’ म्हणजे ते शरीरात मुळीच न घेणे असे कशावरुन दिसून येते?

२२ जगातील अनेक भागांमध्ये प्रचलित असलेला आणखी एक रिवाज म्हणजे रक्‍ताचे सेवन करणे. यात, योग्य रीतीने रक्‍त वाहू न दिलेले प्राणी खाणे, किंवा रक्‍त काढून अन्‍नामध्ये त्याचा समावेश करणे हे येते. तथापि, देवाच्या वचनात रक्‍त खाण्याला सक्‍त मनाई केलेली आहे. (उत्पत्ती ९:३, ४; लेवीय १७:१०) मग, रक्‍त संक्रमण स्विकारण्याविषयी काय? काही लोक म्हणतील की, असे हे रक्‍त संक्रमण म्हणजे रक्‍त “सेवन” करणे नव्हे. परंतु एखाद्या रोग्याला तोंडाने अन्‍न खाता येत नसेल तर ते, रक्‍त ज्या पद्धतीने शरीरात संक्रमित केले जाते त्याच पद्धतीने अन्‍न भरविले जावे अशी डॉक्टर शिफारस करीत नाही का? पवित्र शास्त्र म्हणते की, “रक्‍त . . . वर्ज्य” करा. (प्रे. कृत्ये १५:२०, २९) याचा काय अर्थ होतो? तुम्ही मद्य पिऊ नका असे तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले तर ते तोंडावाटे न घेता शरीरात संक्रमित करता येईल असा त्यांच्या म्हणण्याचा तुम्ही अर्थ घ्याल का? मुळीच नाही! याचप्रमाणे, ‘रक्‍त वर्ज्य करणे’ म्हणजे ते आपल्या शरीरात मुळीच न घेणे होय.

२३. (अ) तुम्ही कोणता निर्णय घेतला पाहिजे? (ब) तुम्ही निर्णय घेतलेला आहे हे कशाने प्रदर्शित होईल?

२३ तुम्ही या जगाचे नसून देवाच्या नव्या व्यवस्थीकरणाच्या बाजूने आहात असे देवाला तुम्ही दाखवून दिले पाहिजे. यासाठी दृढ निर्धार हवा. यहोवाची सेवा करण्याचा, त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा पक्का निश्‍चय करण्याची गरज आहे. प्राचीन काळी काही इस्राएली लोक जसे घोटाळ्यात पडले होते तसे तुम्ही नसावे. (१ राजे १८:२१) कारण लक्षात ठेवा की, तुम्ही यहोवाची सेवा करीत नाहीत तर सैतानाची सेवा करीत असता. तुम्ही म्हणाल, मी देवाच्या नव्या व्यवस्थीकरणाच्या बाजूने आहे, पण तुमचे वर्तन काय सांगते? देवाला नापसंत असलेले व त्याच्या नीतीमान नवीन व्यवस्थेमध्ये नसतील असे सर्व रितीरिवाज टाळणे हे आपण देवाच्या नव्या व्यवस्थीकरणाच्या बाजूने असण्यात गोवलेले आहे.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२०९ पानांवरील चित्रं]

येशू ज्यासाठी प्रार्थना करणार नव्हता आणि त्याचे शिष्य ज्याचा भाग असणार नव्हते ते जग कोणते आहे?

[२११ पानांवरील चित्रं]

पवित्र शास्त्रात खोट्या धर्माला मद्याने धुंद असणारी वेश्‍या व जागतिक सरकारला, ती ज्यावर स्वार झाली आहे त्या जंगली श्‍वापदाच्या रुपात चितारण्यात आले आहे

[२११ पानांवरील चित्रं]

स्वैराचारी जीवन हे सैतानी जगाचे अंग आहे. त्याचप्रमाणे लोभिष्ट व्यापार व्यवस्था ही देखील त्याचा प्रमुख भाग आहे

[२१३ पानांवरील चित्रं]

येशूचा जन्म झाला त्यावेळी मेंढपाळ रात्रीही शेतात आपले कळप राखीत बसले होते, त्यामुळे त्याचा जन्म डिसेंबर २५ तारखेला झालेला नाही

[२१४ पानांवरील चित्रं]

राजाने स्थापिलेल्या मूर्तीची भक्‍ती करण्याचे देवाच्या सेवकांनी नाकारले. यासारख्या परिस्थितीत तुम्ही काय कराल?