व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाची दृश्‍य संघटना

देवाची दृश्‍य संघटना

प्रकरण २३

देवाची दृश्‍य संघटना

१. देवाच्या अदृश्‍य संघटनेबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?

 देवाची एक दृश्‍य संघटना आहे याची खात्री आपण का बाळगू शकतो? याचे एक कारण म्हणजे, त्याची एक अदृश्‍य संघटना देखील आहे. स्वर्गामध्ये आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी यहोवाने करुब, सराफ व इतर अनेक देवदूत निर्माण केले. (उत्पत्ती ३:२४; यशया ६:२, ३; स्तोत्रसंहिता १०३:२०) या सर्वांवर, सर्वांहून मोठा असा, येशू ख्रिस्त हा सर्वश्रेष्ठ देवदूत आहे. (१ थेस्सलनीकाकर ४:१६; यहुदा ९; प्रकटीकरण १२:७) देवदूतांना “सिंहासने किंवा प्रभुत्व किंवा सत्ता किंवा अधिकार” यामध्ये संघटित करण्यात आले आहे असे पवित्र शास्त्र वर्णन देते. (कलस्सैकर १:१६; इफिसकर १:२१) ते सर्व, यहोवाने त्यांच्यासाठी नेमलेले काम एकजुटीने करीत असता त्याच्या आज्ञेत राहतात.—दानीएल ७:९, १०; ईयोब १:६; २:१.

२. देवाने आपले भौतिक विश्‍व ज्या रितीने बनवले आहे त्यावरुन तो संघटनेला अतिशय महत्त्व देतो हे कसे दिसून येते?

देवाच्या भौतिक निर्मितीचे निरीक्षण केल्यास, तो संघटनेला किती महत्त्व देतो याची आपल्याला कल्पना मिळते. उदाहरणार्थ, विश्‍वामध्ये हजारो कोटी तारे असून मोठमोठ्या तारामंडलांमध्ये त्यांची रचना करण्यात आली आहे. ही तारामंडले तसेच या तारामंडलातील प्रत्येक तारा व ग्रहसुद्धा अंतरिक्षात शिस्तबद्ध रितीने मार्गक्रमण करतात. उदाहरणार्थ, आपला पृथ्वी ग्रह, आपल्या जवळात जवळ असणारा तारा म्हणजे सूर्याभोवती बरोबर ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे व ४५.५१ सेकंदात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. होय, हे भौतिक विश्‍व अतिशय संघटित आहे!

३. देवाची अदृश्‍य निर्मिती कार्ये तसेच त्याने घडलेले भौतिक विश्‍व यामधील उत्तम संघटना आपल्याला काय शिकवते?

देवाच्या अदृश्‍य निर्मितीतील तसेच भौतिक विश्‍वातील संघटना आपल्याला काही शिकवते का? होय, यहोवा हा संघटनाप्रिय देव आहे अशी शिकवण ती आपल्याला देते. तर मग, असा हा देव, त्याच्यावर नितांत प्रीती करणाऱ्‍या पृथ्वीवरील मानवांना मार्गदर्शन व संघटनेविना खचितच सोडून देणार नाही.

देवाची दृश्‍य संघटना—प्राचीन व अर्वाचीन

४, ५. अब्राहामाच्या काळी तसेच इस्राएल राष्ट्र अस्तित्वात असताना देवाने लोकांना संघटित करुन मार्गदर्शन केले हे आपल्याला कसे कळते?

यहोवाने आपल्या सेवकांना नेहमीच संघटनात्मकरित्या मार्गदर्शन दिले असे पवित्र शास्त्र दाखविते. उदाहरणार्थ, अब्राहामासारख्या विश्‍वासू माणसांनी स्वतः पुढाकार घेऊन यहोवाच्या भक्‍तीमध्ये आपल्या कुटुंबियांना व घरच्या दासांना निरविले. यहोवाने अब्राहामासोबत बोलणी करुन त्याच्याविषयी असणारी इच्छा त्याला प्रकटविली. (उत्पत्ती १२:१) ही त्याची इच्छा अब्राहामाने इतरांना कळवावी अशी देवाने त्याला सूचना केली. याविषयी तो अब्राहामाला म्हणालाः “मी [अब्राहामाची] निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांस व आपल्या पश्‍चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि न्यायनीतीने वागण्यासाठी यहोवाचा मार्ग आचरावा.” (उत्पत्ती १८:१९) येथे यहोवाची भक्‍ती योग्य रितीने करण्यासाठी लोकांच्या एका समूहाची शिस्तबद्ध रचना करण्यात आलेली आढळून येते.

कालांतराने इस्राएलांची संख्या वाढून लाखात गेल्यावर, संघटित रचनेपासून स्वतंत्र रितीने, आपापल्या मताप्रमाणे भक्‍ती करण्यास देवाने लोकांना परवानगी दिली नाही. इस्राएलांचे, संघटितरित्या उपासना करणाऱ्‍यांचे राष्ट्र बनवले गेले. इस्राएल राष्ट्राला “यहोवाची मंडळी” असे म्हटले जात असे. (गणना २०:४; १ इतिहास २८:८) त्या काळी तुम्ही यहोवाचे उपासक असता तर तुम्हाला त्या उपासक मंडळीचे सभासद व्हावे लागले असते; तुम्हाला स्वतंत्र आराधना आचरता येणार नव्हती.—स्तोत्रसंहिता १४७:१९, २०.

६. (अ) ख्रिस्ताच्या अनुयायांवर आपली कृपा असल्याचे देवाने कसे दाखवले? (ब) ख्रिस्ती लोकांना उपासनेसाठी संघटित करण्यात आले होते याला काय पुरावा आहे?

पण पहिल्या शतकामध्ये कशी परिस्थिती होती? पवित्र शास्त्र दाखविते की, यहोवाची कृपा, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अनुयायांवर होती. यहोवाने त्यांच्यावर आपला पवित्र आत्मा ओतला. इस्राएल राष्ट्राऐवजी तो आता या ख्रिस्ती मंडळीचा वापर करीत होता हे दाखविण्यासाठी त्याने आरंभीच्या काही ख्रिश्‍चनांना दुखणाईतांस बरे करण्याची, मृतांना जिवंत करण्याची व इतर चमत्कार करण्याची शक्‍ती दिली. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे वाचन करताना ख्रिस्ती लोक उपासनेसाठी संघटित केलेले होते ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. खरे म्हणजे, या कारणासाठीच त्यांना एकत्र मिळण्याची आज्ञा देण्यात आली होती. (इब्रीयांस १०:२४, २५) यास्तव, तुम्ही पहिल्या शतकामध्ये यहोवाचे खरे उपासक असता तर तुम्हाला त्याच्या ख्रिस्ती संघटनेचे सदस्य व्हावे लागले असते.

७. कोणत्याही काळात यहोवाने एकाहून अधिक संघटनांचा उपयोग केला नसल्याचे आपल्याला कसे कळते?

यहोवाने कोणत्याही कालखंडामध्ये एकाहून अधिक संघटनेचा उपयोग केला का? नोहाच्या काळी केवळ नोहा व त्याच्यासह तारवात असलेल्यांनाच देवाचे संरक्षण लाभले व ते जलप्रलयातून वाचले. (१ पेत्र ३:२०) तसेच पहिल्या शतकात देखील दोन किंवा अधिक ख्रिस्ती संघटना नव्हत्या. देवाने फक्‍त एकाच संघटनेसोबत आपले दळणवळण राखले. त्यावेळी फक्‍त “एकच प्रभु, एक विश्‍वास व एक बाप्तिस्मा” होता. (इफिसकर ४:५) याचप्रमाणे आमच्या काळात देखील देवाच्या लोकांसाठी आध्यात्मिक शिकवणीचा एकच स्रोत असेल असे येशू ख्रिस्ताने भाकित केले.

८. आमच्या काळात देवाची फक्‍त एकच दृश्‍य संघटना असेल हे येशूने कसे दर्शविले?

राज्यसत्तेतील आपल्या उपस्थितीबद्दल सांगताना येशू म्हणालाः “ज्या विश्‍वासू व बुद्धीमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे असा कोण? धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी खचित सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.” (मत्तय २४:४५-४७) तर मग, ख्रिस्ताला, १९१४ मध्ये राज्याधिकारासह परतल्यावर आध्यात्मिक “अन्‍न” किंवा माहिती देणारा कोणी “विश्‍वासू व बुद्धीमान दास” आढळला का? होय, त्याच्या १,४४,००० “बंधू”पैकी पृथ्वीवर उरलेल्यांचा बनलेला असा एक “दास” त्याला आढळला. (प्रकटीकरण १२:१०; १४:१, ३) १९१४ पासून या दासाने पुरविलेले “अन्‍न” लाखो लोकांनी स्विकारुन त्यांच्यासह खऱ्‍या धर्माचे आचरण केले आहे. देवाच्या सेवकांनी मिळून बनलेल्या या संघटनेला “यहोवाचे साक्षीदार” या नावाने ओळखले जाते.

९. (अ) देवाचे सेवक यहोवाचे साक्षीदार असे नाव का लावून घेतात? (ब) ते आपल्या उपासना स्थळांना राज्य सभागृह असे का म्हणतात?

यहोवाचे साक्षीदार आपल्या कामामध्ये देव व त्याच्या वचनाचे मार्गदर्शन घेतात. यहोवाचे साक्षीदार हे त्यांचे नावच सांगते की, ख्रिस्ताप्रमाणे यांचे प्रमुख कार्य, यहोवा देवाचे नाव व राज्य याविषयी साक्ष देणे हे आहे. (योहान १७:६; प्रकटीकरण १:५) तसेच भक्‍तीसाठी एकत्रित होण्याच्या जागांना ते राज्य सभागृह असे म्हणतात, कारण मशीहा वा ख्रिस्तामार्फत चालवलेले देवाचे राज्य हीच संपूर्ण पवित्र शास्त्राची मध्यवर्ती कल्पना आहे. पहिल्या शतकातील ख्रिस्ती धर्माला देवाची मर्जी असल्याचे स्पष्ट असल्याने यहोवाचे साक्षीदार आपली संघटना त्या धर्तीवर आधारुन आहेत. पूर्वीच्या ख्रिस्ती संघटनेवर आपण थोडा दृष्टीक्षेप टाकून त्या व आजच्या देवाच्या दृश्‍य संघटनेमधील साम्य पाहू या.

पहिल्या शतकातील नमुना

१०. पहिल्या शतकातील ख्रिस्ती संघटनेची काही वैशिष्ट्ये सांगा.

१० पहिल्या शतकामध्ये ख्रिस्ती लोक जेथे कोठे असत तेथे ते भक्‍तीसाठी गटागटामध्ये एकत्र जमत असत. ह्‍या मंडळ्या परस्पर सहवास व अभ्यासासाठी नियमितपणे एकत्र येत असत. (इब्रीयांस १०:२४, २५) ख्रिस्ताप्रमाणे, देवाच्या राज्याचा प्रचार करणे व शिकवण देणे हे त्यांचेही प्रमुख कार्य होते. (मत्तय ४:१७; २८:१९, २०) मंडळीतील एखादा सभासद कुमार्गाला लागल्यास त्याला मंडळीमधून बाहेर काढले जात असे.—१ करिंथकर ५:९-१३; २ योहान १०, ११.

११, १२. (अ) प्राचीन ख्रिस्ती मंडळ्यांना यरुशलेमातील प्रेषित व “वडील जन” यांच्याकडून मार्गदर्शन मिळत असे हे कशावरुन सिद्ध होते? (ब) “ईश्‍वरशासित” मार्गदर्शन याचा अर्थ काय? (क) असे मार्गदर्शन मंडळ्यांनी स्विकारल्यामुळे काय परिणाम झाला?

११ पहिल्या शतकातील या ख्रिस्ती मंडळ्या एकमेकांपासून स्वतंत्र, कोणत्याही बाबतीत आपापला निर्णय घेणाऱ्‍या होत्या का? नाही. पवित्र शास्त्र दाखविते की, त्या एकाच ख्रिस्ती विश्‍वासात एकवटलेल्या होत्या. सर्व मंडळ्यांना एकाच उगमाकडून मार्गदर्शन मिळत असे. जेव्हा सुंतेबद्दल वाद उत्पन्‍न झाला तेव्हा प्रत्येक मंडळीने वा प्रत्येक व्यक्‍तीने आपण काय करावे याचा निर्णय घेतला नाही. तर उलट, असे ठरविण्यात आले की, प्रेषित पौल व बर्णबा यांनी “ह्‍या वादासंबंधाने यरुशलेमातील प्रेषित व वडीलवर्ग ह्‍यांजकडे जावे.” तेथील प्रौढ माणसांनी देवाचे वचन व त्याचा “पवित्र आत्मा” यांच्या मदतीने निर्णय घेतल्यावर इतर मंडळ्यांना त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी विश्‍वसनीय माणसांना पाठवले.—प्रे. कृत्ये १५:२, २७-२९.

१२ असे हे ईश्‍वरशासित किंवा देवाकडील मार्गदर्शन मंडळ्यांना मिळाल्यावर काय परिणाम झाला? पवित्र शास्त्र म्हणतेः “तेव्हा त्यांनी [पौल व त्याचे सहकारी] नगरांमधून जाता जाता यरुशलेमातील प्रेषित व वडील ह्‍यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळावयास नेमून दिले. ह्‍यावरुन मंडळ्या विश्‍वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली.” (प्रे. कृत्ये १६:४, ५) होय, यरुशलेमातील वडील मंडळाने घेतलेल्या निर्णयाला सर्व मंडळ्यांनी सहकार्य दिले व त्या विश्‍वासात अधिक दृढ झाल्या.

आजचे इश्‍वरशासित मार्गदर्शन

१३. (अ) पृथ्वीवरील कोणत्या स्थानापासून व माणसांच्या कोणत्या मंडळामार्फत देवाच्या आजच्या दृश्‍य संघटनेला मार्गदर्शन मिळते? (ब) नियमन मंडळाचा “विश्‍वासू व बुद्धीमान दास” याजशी काय संबंध आहे?

१३ देवाच्या आजच्या दृश्‍य संघटनेला देखील ईश्‍वरशासित मार्गदर्शन मिळत आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या, न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथील प्रमुख कार्यालयात जगाच्या निरनिराळ्या भागातून आलेल्या ख्रिस्ती वडील लोकांचे एक नियमन मंडळ आहे. ते देवाच्या लोकांच्या जागतिक कार्यावर जरुर ती देखरेख करते. हे नियमन मंडळ, “विश्‍वासू व बुद्धीमान दास” वर्गाच्या सदस्यांचे मिळून बनलेले आहे. ते विश्‍वासू “दासा”च्या प्रवक्‍ता याचे काम करते.

१४. देवाच्या लोकांचे नियमन मंडळ कोणत्याही विषयावरील निर्णय घेण्यासाठी कशाचा आधार घेते?

१४ यरुशलेमातील प्रेषित व वडीलवर्गाप्रमाणे नियमन मंडळातील माणसांनाही देवाच्या सेवेमध्ये अनेक वर्षांचा अनुभव असतो. परंतु, ते निर्णय घेताना मानवी सूज्ञानावर अवलंबून राहात नाहीत. ईश्‍वरशासित पद्धतींचे स्वतःवर वर्चस्व लावून घेतल्यामुळे ते यरुशलेमातील प्राचीन नियमन मंडळाचे उदाहरण अनुसरुन आपले निर्णय देवाच्या वचनावर आधारीत आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार घेतात.—प्रे. कृत्ये १५:१३-१७, २८, २९.

जागतिक संघटनेचे दिग्दर्शन

१५. शेवटल्या काळात देवाची एक मोठी संघटना पृथ्वीवर असेल असे मत्तय २४:१४ मधील येशूचे शब्द का दर्शवतात?

१५ शेवटल्या काळी पृथ्वीवर देवाची संघटना केवढी मोठी असेल याची कल्पना देताना येशू ख्रिस्त म्हणालाः “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) देवाच्या प्रस्थापित राज्याबद्दल पृथ्वीवरील हजारो करोडो लोकांना सांगण्यास केवढे प्रचंड कार्य करावे लागेल याची कल्पना करा. तर मग, मार्गदर्शन व दिग्दर्शनासाठी नियमन मंडळाकडे पाहणारी आधुनिक काळातील ख्रिस्ती संघटना हे प्रचंड कार्य करण्यास सुसज्ज आहे का?

१६. (अ) यहोवाच्या साक्षीदारांनी अनेक मोठे छापखाने का उभारले आहेत? (ब) या छापखान्यात काय उत्पादन होते?

१६ जगभरामध्ये २०० पेक्षा अधिक देश व बेटांमध्ये यहोवाचे साक्षीदार सध्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करीत आहेत. १९८८ मध्ये ३५,००,००० पेक्षा अधिक राज्य-प्रचारकांना हे काम सिद्धीस नेण्यामध्ये मदत करण्यासाठी अनेक देशात मोठमोठे छापखाने उभारले गेले आहेत. तेथे पवित्र शास्त्रे व पवित्र शास्त्रविषयक साहित्य मोठ्या प्रमाणावर निर्माण केले जाते. कामाच्या दर दिवशी सर्वसाधारणपणे २० लाखाहून अधिक वॉचटावरअवेक! ही मासिके या छापखान्यातून छापून बाहेर पाठवली जातात.

१७. (अ) हे पवित्र शास्त्रीय साहित्य का बनवले जाते? (ब) तुम्हाला कसले पाचारण करण्यात येत आहे?

१७ यहोवाच्या उदात्त हेतूबद्दल माहिती घेण्यास लोकांना मदत व्हावी म्हणून हे सर्व पवित्र शास्त्राधारित साहित्य तयार केले जाते. वस्तुतः टेहळणी बुरुज मासिकाचा मथळा “यहोवाच्या राज्याचा प्रकाशक” असाच आहे. या पवित्र शास्त्र साहित्याचा प्रसार करण्याच्या कामात सहभागी होण्यास, तसेच त्यामधील पवित्र शास्त्रीय सत्ये इतरांना विषद करण्यासाठी आम्ही आपल्याला पाचारण करतो. उदाहरणार्थ, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकामधून तुम्ही शिकलेली महत्त्वाची माहिती ज्याला देता येईल असा कोणी आहे का?

१८. (अ) देवाची आजची संघटना कशा प्रकारची आहे? (ब) देवाच्या लोकांना आता अधिक उत्तेजनाची का गरज आहे?

१८ पहिल्या शतकाप्रमाणेच वर्तमान काळातही देवाची संघटना ही समर्पण केलेल्या व बाप्तिस्मा घेतलेल्या राज्य-प्रचारकांची संघटना आहे. प्रचाराच्या या कार्यात तिच्या सर्व सभासदांना साहाय्य करण्यासाठी तिची स्थापना करण्यात आली आहे. सैतान व त्याच्या प्रभावाखाली राहणाऱ्‍या व्यक्‍तींचा राज्याच्या संदेशाला विरोध असल्याने संघटनेच्या सभासदांना बऱ्‍याच उत्तेजनाची व आध्यात्मिक बळकटी देण्याची जरुरी असते. अशा विरोधकांनी राज्याच्या संदेशाचा प्रचार केल्यामुळे येशूला ठार केले, त्यामुळे त्याच्या अनुयायांचाही छळ होईल असा इशारा पवित्र शास्त्र देते.—योहान १५:१९, २०; २ तीमथ्य ३:१२.

१९. (अ) सध्या देवाच्या लोकांना साहाय्य व बळकटी देण्यासाठी कोणाची योजना करण्यात आली आहे? (ब) ज्यामुळे मंडळी भ्रष्ट होईल अशा वाईट प्रभावापासून मंडळीला कसे संरक्षण दिले जाते?

१९ पहिल्या शतकाप्रमाणेच आजही प्रत्येक मंडळीला साहाय्य व बळकटी देण्यासाठी “वडील जन” किंवा वडीलांची नेमणूक केली जाते. हे वडील, वेगवेगळ्या समस्यांना तोंड देण्यासाठी, पवित्र शास्त्राचा सल्ला देऊन, तुमची मदत करु शकतात. याचप्रमाणे, ते “देवाच्या कळपा”चे संरक्षण देखील करतात. मंडळीतील एखादी व्यक्‍ती कुमार्गाला लागली व आपला मार्ग बदलण्यास तयार नसली तर अशा व्यक्‍तीला मंडळीतून बाहेर काढण्याचे वा बहिष्कृत करण्याचे काम हे “वडील जन” करतात. अशा रितीने, मंडळी आध्यात्मिकरित्या निकोप व शुद्ध राखली जाते.—तीत १:५; १ पेत्र ५:१-३; यशया ३२:१, २; १ करिंथकर ५:१३.

२०. (अ) पहिल्या शतकातील नियमन मंडळाने कोणाला व कशासाठी पाठवले? (ब) आज नियमन मंडळ कोणाला पाठवते?

२० देवाच्या लोकांना शिक्षण व उत्तेजन देण्यासाठी यरुशलेमातील नियमन मंडळ जसे पौल व सीला यासारख्या विशेष प्रतिनिधींना पाठवीत असे, तसेच या शेवटल्या काळात आजचे नियमन मंडळ देखील करते. (प्रे. कृत्ये १५:२४-२७, ३०-३२) बहुधा वर्षातून दोनदा, विभागीय देखरेखे म्हटलेल्या अनुभवी सेवकाला एका आठवडाभर त्याच्या विभागातील प्रत्येक मंडळीत राहण्यास पाठवले जाते.

२१. देवाच्या लोकांच्या मंडळ्यांना विभागीय देखरेखे कशी मदत देतात?

२१ सर्व जगात यहोवाच्या साक्षीदारांच्या ६०,००० पेक्षा अधिक मंडळ्या आहेत. यांना विभागामध्ये वाटलेले असते. साधारणपणे २० मंडळ्यांचा एक विभाग होतो. आपल्या विभागातील मंडळ्यांना भेटी देताना हे विभागीय देखरेखे तेथील राज्य प्रचारकांसोबत प्रचार करण्याच्या व शिक्षण देण्याच्या कामात सहभागी होऊन राज्याची साक्ष वाढवितात. तसेच ते, प्रचारकांचे उपाध्यपण सुधारण्यासाठी मदत म्हणून आवश्‍यक असे प्रस्ताव देखील त्यांना देतात.—प्रे. कृत्ये २०:२०, २१.

२२. (अ) याशिवाय, देवाच्या लोकांना बळकट करण्यासाठी वर्षातून दोनदा कशाचे आयोजन केले जाते? (ब) तुम्हाला कशाचे निमंत्रण दिले जाते आहे?

२२ याशिवाय, बहुधा वर्षातून दोनदा प्रत्येक विभागातील मंडळ्या एक किंवा दोन दिवसांच्या विभागीय संमेलनासाठी एकत्र जमतात. त्यामुळे त्यांना अधिक उत्तेजन व बळकटी मिळते. अशा प्रसंगी दोन-तीनशे पासून २,००० किंवा अधिकही व्यक्‍ती उपस्थित असतात. तुमच्या भागात होणाऱ्‍या येत्या संमेलनाला उपस्थित राहण्यास आम्ही आपल्याला निमंत्रण देतो. तुम्हाला ते संमेलन आध्यात्मिकरित्या उत्तेजक व वैयक्‍तीकरित्या फायद्याचे वाटेल अशी आम्हाला खात्री आहे.

२३. (अ) वर्षातून एकदा आणखी कोणते संमेलन भरवले जाते? (ब) असे एक संमेलन किती मोठे होते?

२३ या व्यतिरिक्‍त ज्याला प्रांतिय अधिवेशन म्हणतात अशी अधिक दिवस चालणारी अधिक मोठी सभा वर्षातून एकदा भरवली जाते. तेथे उपस्थित राहिल्यास असे अधिवेशन किती सुखावह व आध्यात्मिकदृष्ट्या फायदेशीर असते ते तुम्हाला स्वतःला पाहता येईल. काही वर्षी प्रांतिय अधिवेशनाऐवजी अधिक मोठे राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय संमेलन भरवले जाते. १९५८ मध्ये न्यूयॉर्क शहराच्या यांकी स्टेडियम व पोलो ग्राऊंडवर आठ दिवस भरविण्यात आलेले अधिवेशन आतापर्यंत भरलेल्या एका स्थानावरील संमेलनातील सर्वात मोठे होते. त्या प्रसंगी “देवाच्या राज्याचा अंमल सुरु झाला आहे—जगाचा अंत जवळ आहे का?” या जाहीर व्याख्यानाला २,५३,९२२ लोक हजर होते. या अधिवेशनानंतर अशा मोठ्या जमावाची व्यवस्था इतरत्र करण्यासाठी एकही पुरेशी जागा आढळून न आल्यामुळे अनेक प्रमुख शहरांमध्ये मोठी अधिवेशने घेण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

मंडळ्यातील सभा

२४. देवाच्या लोकांच्या मंडळ्यामध्ये कोणत्या पाच साप्ताहिक सभा भरवल्या जातात?

२४ यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ सर्व मंडळ्यांमध्ये चालणाऱ्‍या संघटित पवित्र शास्त्र शिक्षणाच्या कार्यक्रमाचीही व्यवस्था करते. प्रत्येक मंडळीमध्ये आठवड्याला पाच सभा होतात. ईश्‍वरशासित उपाध्यपण शाळा, सेवा सभा, जाहीर व्याख्यान, टेहळणी बुरुज अभ्यास सभा आणि मंडळीचा पुस्तक अभ्यास या त्या सभा होत. तुम्हाला अजून त्यांची माहिती झालेली नसण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही त्याविषयीची थोडक्यात माहिती देत आहोत.

२५, २६. ईश्‍वरशासित उपाध्यपणाची शाळा व सेवा सभा कोणता उद्देश पार पाडतात?

२५ देवाच्या राज्याबद्दल इतरांशी प्रभावीपणे बोलण्यास विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने ईश्‍वरशासित उपाध्यपणाच्या शाळेची रचना करण्यात आली आहे. त्यात नाव नोंदवलेले विद्यार्थी, वेळोवेळी, सर्व उपस्थितांना उद्देशून पवित्र शास्त्र विषयांवर लहानसे भाषण देतात. मग, विद्यार्थ्याच्या अधिक प्रगतिसाठी एक अनुभवी वडील सूचना देतात.

२६ बहुधा याच सायंकाळी सेवा सभाही भरवली जाते. या सभेची रुपरेषा आमची राज्य सेवा या साहित्यात दिली जाते. हे दोन किंवा अधिक पानांचे नियमन मंडळाने संपादन केलेले दर महिन्याला प्रसिद्ध होणारे प्रकाशन आहे. या सभेत राज्याच्या संदेशाविषयी इतरांना प्रभावीपणे बोलण्यासंबंधीच्या व्यवहार्य सूचना दिल्या जातात व प्रात्यक्षिके दाखवली जातात. अशाच रितीने येशूने देखील त्याच्या अनुयायांना प्रोत्साहन दिले आणि आपापली सेवा कशी पार पाडावी याविषयीच्या सूचना प्रस्तुत केल्या.—योहान २१:१५-१७; मत्तय १०:५-१४.

२७, २८. जाहीर व्याख्यान, टेहळणी बुरुज अभ्यास सभा व मंडळीचा पुस्तक अभ्यास या कशा प्रकारच्या सभा होत?

२७ जाहीर व्याख्यानाची सभा तसेच टेहळणी बुरुज अभ्यासाची सभा या बहुधा रविवारी सांयकाळी आयोजित केल्या जातात. जाहीर व्याख्यानामध्ये एखादा अनुभवी उपाध्याय पवित्र शास्त्रावर आधारीत असणारे भाषण देतो. या सभेला, नव्याने आस्था घेणाऱ्‍या लोकांना आमंत्रित करण्याचे खास प्रयत्न केले जातात. टेहळणी बुरुज अभ्यास सभेत नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या टेहळणी बुरुज मासिकातील पवित्र शास्त्रावर आधारीत असणाऱ्‍या एका लेखाची प्रश्‍नोत्तर रुपाने चर्चा होते.

२८ वर सांगितलेल्या सभांसाठी संपूर्ण मंडळी राज्य सभागृहात एकत्रित होत असली तरी प्रत्येक आठवड्याला होणाऱ्‍या मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी लोक लहान लहान गटाने खाजगी घरांमध्ये एकत्र येतात. तेथे होणाऱ्‍या पवित्र शास्त्रीय चर्चेच्या आधारासाठी तुम्ही आता वाचत असलेल्या पुस्तकासारखेच एखादे प्रकाशन वापरण्यात येते. हा अभ्यास साधारणतः एक तासभर चालतो.

२९. (अ) खरे ख्रिस्ती दर वर्षी कोणता स्मारकविधि पाळतात? (ब) भाकर व द्राक्षारस यामध्ये कोण उचितरित्या सहभागी होतात?

२९ या नियमित सभांखेरीज, यहोवाचे साक्षीदार दर वर्षाला येशूच्या मृत्युचे स्मरण करण्यासाठी एक खास सभा घेतात. आपल्या मृत्युच्या संस्मरणाची योजना करताना येशू म्हणलाः “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९, २०) एका अतिशय साध्या समारंभामध्ये येशूने द्राक्षारस व बेखमीर भाकरीचा वापर करुन, तो मानवजातीसाठी आपल्या जीवनाचे जे यज्ञार्पण वाहणार होता त्याची सूचकता स्पष्ट केली. या कारणास्तव, दर वर्षी होणाऱ्‍या या स्मारकविधीच्या भोजनाला ख्रिस्ताच्या १,४४,००० अभिषिक्‍त अनुयायांपैकी पृथ्वीवर शिल्लक राहिलेले लोक उपस्थित राहून तेथे असणाऱ्‍या भाकरी व द्राक्षारसाची सहभागिता घेऊन आपली स्वर्गीय आशा प्रकट करतात.

३०. (अ) याशिवाय या स्मारकविधीला कोण उचितपणे उपस्थित राहतात, आणि यांची भावी आशा काय आहे? (ब) अशा व्यक्‍तींचे येशूने कसे वर्णन केले?

३० राज्य सभागृहात होणाऱ्‍या या स्मारकविधीच्या समारंभास जगभरात इतर लाखो लोक निरिक्षक या नात्याने आनंदाने उपस्थित राहतात. या लोकांना या समारंभाकरवी, यहोवा देव व येशू ख्रिस्त यांनी पाप व मृत्युपासून सुटका प्रदान करण्यासाठी काय केले याचे स्मरण मिळते. परंतु, स्वर्गीय जीवनाची आशा धरण्याऐवजी नंदनवनमय पृथ्वीवर अनंतकाल जगण्याच्या भावी आशेने ते आनंदीत होतात. ते स्वतःला बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाप्रमाणे समजतात, ज्याने ख्रिस्ताच्या १,४४,००० सदस्यांनी बनलेल्या संयुक्‍त वधूचा भाग असण्याऐवजी, “वराचा मित्र” असण्याचे पसंत केले. (योहान ३:२९) हे लाखो लोक येशूने उल्लेखिलेल्या “दुसरी मेंढरे” यातील आहेत. हे “लहान कळपा”चे सदस्य नव्हेत. परंतु, येशूने म्हटल्याप्रमाणे ते “लहान कळपा”शी एकरुप होऊन कार्य करतात. यामुळेच, सर्वांचा मिळून “एक कळप” तयार होतो.—योहान १०:१६; लूक १२:३२.

देवाची त्याच्या संघटनेसोबत मिळून सेवा करणे

३१. खोट्या धर्मात राहून त्याचबरोबर देवाच्या संघटनेत सहभागी होऊ पाहणाऱ्‍यांना देवाची मान्यता नाही याला काय पुरावा आहे?

३१ प्राचीन काळाप्रमाणेच आताही यहोवा देवाची एक दृश्‍य संघटना आहे हे किती स्पष्ट दिसते आहे! तिच्याद्वारे तो लोकांना त्याच्या नव्या नीतीमान जगात राहण्याचे प्रशिक्षण देत आहे. तथापि, आपल्याला एकाच वेळी देवाच्या संघटनेत व खोट्या धर्मात राहता येणार नाही. देवाचे वचन म्हणतेः “तुम्ही विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर जडून विजोड होऊ नका; कारण धर्म व अधर्म यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा कसा मिलाफ होणार? . . . विश्‍वास ठेवणारा व विश्‍वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?” यासाठीच देवाची आज्ञा आहे की, “त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा.”—२ करिंथकर ६:१४-१७.

३२. (अ) आपल्याला “त्यांच्यामधून निघा”वयाचे असेल तर आपण काय केले पाहिजे? (ब) देवाच्या दृश्‍य ईश्‍वरशासित संघटनेसह देवाची सेवा करण्याची विधायक कृती केल्यास आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील?

३२ “त्यांच्यामधून निघा” याचा काय अर्थ होतो? यहोवा देव ज्या संघटनेचा उपयोग करीत आहे तिच्याशिवाय इतर कोणत्याही धार्मिक संस्थेचे सदस्य राहून वा तिला पाठिंबा देऊन आपल्याला या आज्ञेचे पालन करता येणार नाही. यासाठीच, आपणातील कोणी अजूनही अशा खोट्या धार्मिक संस्थेमध्ये असल्यास त्यातून अंग काढून घेत असल्याची नोटीस आपण त्या संस्थेला दिली पाहिजे. खोटा धर्म आचरणाऱ्‍यांमधून आपण आत्ताच निघून देवाच्या दृश्‍य अशा ईश्‍वरशासित संघटनेत राहून त्याची सेवा करण्याची विधायक कृती आचरल्यास आम्ही त्या लोकांपैकी एक बनू, ज्यांच्याविषयी देव असे म्हणतोः “मी त्यांच्यामध्ये वास करुन राहीन. मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील.”—२ करिंथकर ६:१६.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१९२ पानांवरील चित्रं]

जलप्रलयाच्या वेळी देवाला एकापेक्षा अधिक संघटना होत्या का?

[१९६, १९७ पानांवरील चित्रं]

यहोवाच्या साक्षीदारांची जागतिक प्रधान कार्यालये

नियामक कार्यालये

संगणक व्यवस्था

ब्रुकलिन छापखाने

रोटरी छापखाने

पुस्तक बांधणी

प्रकाशने वितरण विभाग

[१९७ पानांवरील चित्रं]

वॉचटावर छापखान्यांपैकी काही

ब्राझिल

इंग्लंड

दक्षिण आफ्रिका

वॉलकिल, न्यूयॉर्क

कॅनडा

[१९८ पानांवरील चित्रं]

न्यूयॉर्कमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनातील २,५३,९२२ ची उपस्थिती

पोलो ग्राउंड

यांकी स्टेडियम

[२०१ पानांवरील चित्रं]

यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये चालविण्यात येणारा पवित्र शास्त्रीय सूचना प्रदान करण्याचा कार्यक्रम