व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या सरकारची प्रजा बनणे

देवाच्या सरकारची प्रजा बनणे

प्रकरण १५

देवाच्या सरकारची प्रजा बनणे

१, २. देवाच्या सरकारचे प्रजाजन बनण्यासाठी कशाची गरज आहे?

 देवाच्या राज्य-शासनाखाली भूतलावर अनंतकाल रहावे असे तुम्हाला वाटते का? योग्य मनोवृत्ती असलेला कोणीही माणूस “होय!” असेच म्हणेल. तेथे अद्‌भुत फायदे अनुभवता येतील. परंतु ते मिळविण्यासाठी फक्‍त हात वर करुन ‘मला देवाच्या सरकारचे प्रजाजन बनायचे आहे,’ असे म्हणणे पुरेसे नाही. काही अधिक गोष्टींची जरुरी आहे.

उदाहरणार्थ, समजा, तुम्हाला दुसऱ्‍या एखाद्या देशाचे नागरिक व्हावयाचे आहे. त्यासाठी, त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी ठरवलेल्या आवश्‍यक अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. पण त्यापूर्वी त्या अटी काय आहेत याची माहिती तुम्हाला करुन घ्यावी लागेल. याचप्रमाणे देवाच्या सरकारचे प्रजाजन होण्यासाठी त्याच्या अटी तुम्हाला माहीत करुन घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतर त्या पूर्ण केल्या पाहिजेत.

ज्ञानाची आवश्‍यकता

३. देवाच्या सरकारचे प्रजाजन बनण्यासाठी एक अट कोणती आहे?

देवाच्या सरकारचे प्रजाजन होण्यासाठी महत्त्वाची एक अपेक्षा अशी की, त्याच्या “भाषे”चे ज्ञान असावे. हे अगदी वाजवी आहे. आपल्या देशाची भाषा नव्या नागरिकांना बोलता यावी अशी काही शासनांचीही अट असते. मग देवाच्या राज्य-शासनाखाली राहणाऱ्‍यांनी कोणती “भाषा” शिकली पाहिजे बरे?

४. देवाच्या लोकांनी कोणती “शुद्ध वाणी” शिकली पाहिजे?

याबद्दल यहोवा आपल्या वचनात, पवित्र शास्त्रात काय म्हणतो ते पहाः “मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन. यहोवाची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नावाचा धावा एकचित्ताने करतील.” (सफन्या ३:९) ही “शुद्ध वाणी” म्हणजे पवित्र शास्त्रात सापडणारे देवाचे सत्य, विशेषतः देवाच्या राज्य-शासनाबद्दलचे सत्य. तेव्हा देवाच्या सरकारचे प्रजाजन होण्यासाठी यहोवा व त्याची राज्य व्यवस्था यांचे ज्ञान करुन घेऊन तुम्ही ही “भाषा” शिकली पाहिजे.—कलस्सैकर १:९, १०; नीतीसूत्रे २:१-५.

५. (अ) देवाच्या सरकारबद्दल आपल्याला कोणती माहिती असली पाहिजे? (ब) सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी आपल्याला कोणत्या ज्ञानाची आवश्‍यकता आहे?

काही मानवी शासनांची अपेक्षा असते की, नागरिकत्व मिळविणाऱ्‍यांना त्यांच्या शासनाच्या इतिहासाबद्दल व कार्य-पद्धतींबद्दल थोडीफार माहिती असावी. त्याचप्रमाणे देवाच्या सरकारचे प्रजाजन व्हावयाचे आहे तर त्याबद्दल तुम्हाला अशी माहिती असली पाहिजे. हे ज्ञान तुम्हाला अनंतकाल जीवन मिळवून देईल. आपल्या पित्याला प्रार्थना करताना येशू म्हणालाः “सार्वकालिक जीवन हेच आहे की, जो तू एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.”—योहान १७:३.

६. (अ) देवाच्या सरकारच्या प्रजेला कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे देता आली पाहिजेत? (ब) ती तुम्ही देऊ शकता का?

या पुस्तकातील आधीच्या प्रकरणांचा तुम्ही अभ्यास केला असेल तर आतापर्यंत हे महत्त्वाचे ज्ञान तुम्हाला बऱ्‍याच प्रमाणात आत्मसात झाले असेल. ते तुम्ही आत्मसात केले आहे का? तर यासारख्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन ते ज्ञान मिळाल्याचे तुम्ही दाखवू शकाल काः देवाने राज्य-शासनाचा आपला हेतू प्रथम कधी प्रकट केला? त्या शासनाचे भूतलावरील प्रजाजन होण्याची प्रतिक्षा करणाऱ्‍या देवाच्या काही सेवकांची नावे कोणती? देवाच्या सरकारमध्ये किती राजे वा राज्यकर्ते असतील? हे राजे कोठून राज्य करतील? देवाच्या सरकारमध्ये राज्यकर्ते म्हणून प्रथम कोणाची निवड झाली? आपण उत्तम राजा होऊ शकतो हे येशूने कसे सिद्ध केले? देवाच्या सरकारचे प्रजाजन होण्यासाठी त्याबद्दलच्या ज्ञानापेक्षा अधिक अपेक्षा आहेत.

नीतीमान वर्तनाची अपेक्षा

७. नागरिकत्वासाठी मानवी शासनांचे कसे निरनिराळे नियम आहेत?

सध्याच्या काळातील शासनांची अपेक्षा असते की नव्या नागरिकांनी वागणूकीबद्दल काही प्रमाण—नियम—पाळले पाहिजेत. उदाहरणार्थ, पुरुषाला फक्‍त एकच बायको व स्त्रीला एकच पति असावा असे ते म्हणतील. तर दुसऱ्‍या शासनांचे नियम काहींसे वेगळे आहेत. आपल्या नागरिकांना एकाहून अधिक जोडीदार ठेवण्याची मुभा ते देतात. पण देवाच्या सरकारचे प्रजाजन होणाऱ्‍यांपासून कशा वागणुकीची अपेक्षा केली जाते? विवाहाबद्दल काय योग्य आहे असे देव म्हणतो?

८. (अ) विवाहाबद्दल देवाचे प्रमाण काय आहे? (ब) व्यभिचार म्हणजे काय व त्याबद्दल देव काय म्हणतो?

यहोवा देवाने सुरवातीलाच, आदामाला एकच बायको देऊन विवाहाविषयी प्रमाण ठरवून दिले. देव म्हणालाः “पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील व ती दोघे एकदेह होतील.” (उत्पत्ती २:२१-२४) ख्रिस्ती लोकांसाठी हेच प्रमाण आहे असे येशूने म्हटले. (मत्तय १९:४-६) विवाहीत जोडपे एकदेह झाल्याने, परक्याशी लैंगिक संबंध जोडल्यास ते विवाहाची अप्रतिष्ठा करतात. या वर्तनाला व्यभिचार म्हणतात. आणि व्यभिचाऱ्‍यांना तो दंड करील असे देव म्हणतो.—इब्रीकर १३:४; मलाखी ३:५.

९. (अ) विवाह झालेला नसताना लैंगिक संबंध करणाऱ्‍यांबद्दल देवाचा दृष्टीकोन काय आहे? (ब) जारकर्म म्हणजे काय?

याउलट, अनेक जोडपी एकत्र राहतात, लैंगिक संबंध ठेवतात, पण लग्न करीत नाहीत. स्त्री व पुरुषातील हा जवळचा संबंध चांचणी तत्त्वावर असावा असा देवाचा उद्देश नव्हता. तेव्हा लग्नाशिवाय एकत्र राहणे हे, विवाह संस्था स्थापणाऱ्‍या देवाविरुद्ध पाप आहे. यालाच जारकर्म म्हणतातत. जारकर्म म्हणजे ज्या व्यक्‍तीसोबत आपले लग्न झालेले नाही तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे. पवित्र शास्त्र म्हणतेः “देवाची इच्छा ही आहे की, . . . तुम्ही जारकर्मापासून स्वतःला दूर राखावे.” (१ थेस्सलनीकाकर ४:३-५) तेव्हा अविवाहीत व्यक्‍तीने कोणाशीही लैंगिक संबंध ठेवणे गैर आहे.

१०. इतर कोणते लैंगिक संबंध देवाच्या नियमाविरुद्ध आहेत?

१० सध्याच्या काळात अनेक पुरुष व स्त्रिया समलिंगी व्यक्‍तीशी लैंगिक वर्तन करतात,—पुरुष पुरुषांशी व स्त्रिया स्त्रियांशी. अशा व्यक्‍तींना समसंभोगी असेही म्हणतात. कधी कधी समसंभोगी स्त्रियांना ‘लेस्बियन’ असे म्हणतात. परंतु, त्यांचे वर्तन चूक व “अश्‍लील” आहे असे देवाचे वचन म्हणते. (रोमकर १:२६, २७) तसेच प्राण्याशी लैंगिक वर्तन करणेही देवाच्या नियमांविरुद्ध आहे. (लेवीय १८:२३) देवाच्या शासनाखाली राहू इच्छिणाऱ्‍याने असे अनैतिक वर्तन टाळले पाहिजे.

११. (अ) मद्य प्राशनाबद्दल देवाचा दृष्टीकोण काय आहे? (ब) आरोग्याला घातक असलेल्या कोणत्या सवयीपासून देवाच्या सरकारचे प्रजाजन होऊ इच्छिणाऱ्‍यांनी दूर रहावे?

११ योग्य प्रमाणात मद्य पिणे देवाच्या नियमाविरुद्ध नव्हे. वास्तविक थोडासा द्राक्षारस शारीरिक स्वास्थ्याला पोषक असतो असे पवित्र शास्त्र सांगते. (स्तोत्रसंहिता १०४:१५; १ तीमथ्य ५:२३) परंतु दारु पिऊन बेहोष होणे वा जेथे लोक अश्‍लील वर्तन करतात अशा बेबंद पार्ट्यांमध्ये सहभागी होणे हे देवाच्या नियमाविरुद्ध आहे. (इफिस ५:१८; १ पेत्र ४:३, ४) अनेक लोक बेहोषी वा “धुंदी” साठी मद्याशिवाय इतर मादक पदार्थही वापरतात. सुखविलासाकरता ते भांग किंवा तंबाखू खातात वा धुम्रपान करतात; तर काही विड्याची अथवा कोकोची पाने खातात. पण यामुळे त्यांचे शरीर अमंगल होते व त्यांच्या आरोग्यालाही धोका पोहचतो. तेव्हा, देवाच्या सरकारचे प्रजाजन व्हावयाची इच्छा असल्यास अशा घातक गोष्टींपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे.—२ करिंथकर ७:१.

१२. (अ) देवाच्या नियमाविरुद्ध अप्रामाणिक आचरण कोणते? (ब) अशा गोष्टी आचरणाऱ्‍याला देवाची कृपा कशी प्राप्त होईल?

१२ मानवी शासनांना गुन्हेगार लोक, नवीन नागरिक म्हणून नको असतात. यहोवाचे नियम यापेक्षाही वरच्या पातळीचे आहेत. आपण “सर्व बाबतीत चांगले वागावे” अशी त्याची अपेक्षा आहे. (इब्रीकर १३:१८) देवाचे नियम पाळले नाहीत तर लोकांना देवाच्या राज्यात राहण्याची परवानगी देण्यात येणार नाही. आजकाल लोक अनेक नियम मोडतात पण सद्‌वर्तनाचे सोंग मात्र करतात. परंतु देवाला सर्व गोष्टी दिसतात. त्याला कोणी फसवू शकत नाही. (इब्रीकर ४:१३; नीतीसूत्रे १५:३; गलतीकर ६:७, ८) खोटे बोलणे, चोरी करणे याविषयीचे देवाचे नियम मोडणारे आपल्या सरकारचे प्रजाजन होणार नाहीत याची देव काळजी घेईल. (इफिसकर ४:२५, २८; प्रकटीकरण २१:८) तरीपण देव सहनशील व क्षमाशील आहे. त्यामुळे एखादा, आपले गैरवर्तन थांबवून, चांगले वर्तन करु लागला तर देव त्याचा स्वीकार करील.—यशया ५५:७.

१३. मानवी शासनांच्या कायद्यांबद्दल देवाच्या सेवकांचा कोणता दृष्टीकोण असावा?

१३ पण मानवी शासनांचे कायदे पाळण्याबद्दल देवाची काय अपेक्षा आहे? मानवी शासने अस्तित्वात आहेत तोवर देवाच्या सेवकांनी त्या “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे” अशी देवाची अपेक्षा आहे. कर फार असले व त्या पैशाच्या विनियोगाची पद्धत आपल्याला पसंत नसली तरी कर भरले पाहिजेत. तसेच त्या शासनाचे कायदे पाळले पाहिजेत. (रोमकर १३:१, ७; तीत ३:१) याला अपवाद म्हणजे हे कायदे पाळल्याने जर देवाच्या नियमांचे उल्लंघन होत असेल तरच ते मानवी शासनाचे कायदे बंधनकारक नाहीत. अशा प्रसंगी पेत्र व इतर प्रेषितांनी म्हटल्याप्रमाणेः “आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा पाळली पाहिजे.”—प्रे. कृत्ये ५:२९.

१४. जीवनाच्या मौलिकतेबद्दल यहोवाच्या दृष्टीकोनाशी सहमत असल्याचे आपण कसे दाखवू शकतो?

१४ देवाला जीवन अतिशय मौल्यवान वाटते. ज्यांना त्याच्या सरकारचे प्रजाजन बनावयाचे आहे त्यांनी हे ध्यानात घ्यावे. मनुष्यहत्या देवाच्या नियमाविरुद्ध आहे हे उघड आहे. पण अनेकदा द्वेषाचे हत्येमध्ये पर्यावसन होते. जो कोणी सतत आपल्या सहकाऱ्‍याचा द्वेष करील तो देवाच्या सरकारचा नागरिक बनू शकणार नाही. (१ योहान ३:१५) यास्तव, आपल्या शेजाऱ्‍याला मारण्यासाठी हाती शस्त्र धरण्याबद्दल यशया २:४ मध्ये दिलेल्या आज्ञेचे पालन करणे अगत्याचे आहे. मातेच्या उदरातील, अजून जन्माला न आलेल्या बालकाचे जीवनही यहोवाला मौल्यवाने वाटते, असे देवाचे वचन दर्शविते. (निर्गम २१:२२, २३; स्तोत्रसंहिता १२७:३) आणि तरीही प्रतिवर्षी करोडो गर्भपात केले जातात. ही प्राणहानी देवाच्या नियमाविरुद्ध आहे. कारण मातेच्या उदरातील मानवी व्यक्‍ती जिवंत असून तिचा नाश करता कामा नये.

१५. देवाच्या राज्याच्या कोणत्या आज्ञा नागरिकांनी पाळल्या पाहिजेत?

१५ देवाच्या सरकारचे नागरिक होणाऱ्‍यांपासून अनैतिक गोष्टी अथवा चुका न करण्याशिवाय अधिक गोष्टींची अपेक्षा आहे. इतरांसाठी चांगल्या व निस्वार्थी गोष्टी करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. राजा येशू ख्रिस्ताने दिलेल्या ईश्‍वरी नियमाप्रमाणे त्यांनी वागले पाहिजे. “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) इतरांबद्दल प्रीती व्यक्‍त करण्याचा कित्ता ख्रिस्ताने घालून दिला. मानवजातीसाठी त्याने आपला प्राणही दिला व आपल्या अनुयायांना आज्ञा केली की, “मी जशी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.” (योहान १३:३४; १ योहान ३:१६) दुसऱ्‍यांविषयी अशाप्रकारचे निस्वार्थ प्रेम व आस्था यामुळे देवाच्या राज्य-शासनाखालील जीवन खऱ्‍या अर्थाने आनंदी बनेल.—याकोब २:८.

१६, १७. (अ) देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनात बदल घडवून आणण्यास कोणती सबळ कारणे आहेत? (ब) ते आवश्‍यक बदल करणे शक्य असल्याची खात्री आपण का बाळगावी?

१६ देवाच्या राज्य-शासनाखालील नागरिक बनण्यास, देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकांनी आपल्या जीवनात बदल केला पाहिजे असे पवित्र शास्त्र दर्शविते. (इफिसकर ४:२०-२४) तुम्ही हे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहात का? त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी त्यांचे सार्थकच होईल. असे का? कारण एखाद्या मानवी शासनाखाली थोडीशी वर्षे बरे जीवन उपभोगता येईल असा याचा अर्थ नव्हे. तर देवाच्या सत्तेच्या शासनाखाली संपूर्ण भूतलावरील नंदनवनामध्ये उत्तम आरोग्यासह अनंतकाल जीवन तुम्हाला प्राप्त होईल!

१७ देवाच्या अपेक्षा पूर्ण केल्याने तुम्हाला आताही अधिक आनंदी जीवनाचा आस्वाद घेता येईल. परंतु तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागतील. अनेक द्वेषी व लोभी व्यक्‍ती आता बदललेल्या आहेत. तसेच जारकर्मी, व्यभिचारी, समसंभोगी, दारुडे, खूनी, चोर, मादक पदार्थांचे व्यसनी व तंबाखू वापरणाऱ्‍या लोकांनी आपल्या जीवनाचा मार्ग बदलला आहे. सतत प्रयत्न व देवाच्या मदतीने त्यांनी हे यश मिळवले आहे. (१ करिंथकर ६:९-११; कलस्सैकर ३:५-९) तेव्हा देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अवघड वाटणारे बदल करण्याची गरज असेल तर हार खाऊ नका. तुम्हाला ते शक्य आहे!

देवाच्या सरकारसोबत निष्ठा

१८. त्याच्या राज्याला कोणत्या खास रितीने आपण निष्ठा व्यक्‍त करावी अशी देवाची अपेक्षा आहे?

१८ देव, त्याच्या राज्य-शासन व्यवस्थेशी नागरिकांनी एकनिष्ठ असावे याची अपेक्षा करतो यामुळे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. मानवी शासनेही आपल्या नागरिकांकडून अशीच अपेक्षा करतात. परंतु ही निष्ठा कोणत्या खास रितीने द्यावी अशी देव अपेक्षा करतो? त्याच्या प्रजेने त्याच्या राज्यासाठी हाती शस्त्रे घ्यावी अशी त्याची अपेक्षा आहे का? नाही. तर येशू ख्रिस्त व त्याच्या अनुयायांप्रमाणे ते देवाच्या राज्याचे प्रवक्‍ते वा घोषणा करणारे असावेत. (मत्तय ४:१७; १०:५-७; २४:१४) त्याचे राज्य म्हणजे काय व मानवजातीच्या समस्या ते कशा सोडवील याची सर्वांना माहिती असावी अशी यहोवाची इच्छा आहे. तुम्ही ज्या गोष्टी शिकला आहात त्या तुम्ही नातेवाईकांना, मित्रांना व इतरांना सांगितल्या आहेत का? तुम्ही त्या सांगाव्यात अशी देवाची इच्छा आहे.—रोमकर १०:१०; १ पेत्र ३:१५.

१९. (अ) देवाच्या राज्याबद्दल इतरांशी बोलताना विरोध होईल अशी अपेक्षा आपण का करावी? (ब) तुम्ही कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे दिली पाहिजेत?

१९ ख्रिस्त व त्याच्या प्रारंभीच्या अनुयायांना विरोधामुळे, देवाच्या राज्याबद्दल बोलण्यासाठी बऱ्‍याच धैर्याची गरज होती. (प्रे. कृत्ये ५:४१, ४२) आजही तीच परिस्थिती आहे. सैतानाच्या सत्तेखालील जगाला त्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार झालेला नको आहे. त्यामुळे पुढील प्रश्‍न उद्‌भवतातः तुमची भूमिका काय आहे? तुम्ही देवाच्या राज्याला निष्ठावंत पाठिंबा द्याल का? अंत येण्यापूर्वी राज्याबद्दल विस्तृत प्रमाणावर साक्ष दिली जावी अशी त्याची इच्छा आहे. त्यात तुम्ही सहभागी व्हाल का?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२८ पानांवरील चित्रं]

देवाच्या सरकारचे प्रजाजन बनणाऱ्‍यांठायी त्याविषयीचे ज्ञान असण्यास हवे

[१३१ पानांवरील चित्रं]

देवाच्या सरकारच्या प्रजाजनांनी देवाने धिक्कारलेली कार्ये टाळली पाहिजेत

[१३३ पानांवरील चित्रं]

देवाच्या सरकारच्या प्रजाजनांनी त्याविषयी इतरांना सांगितले पाहिजे