व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने दुष्टपणाला परवानगी का दिली?

देवाने दुष्टपणाला परवानगी का दिली?

प्रकरण ११

देवाने दुष्टपणाला परवानगी का दिली?

१. (अ) जगात आज कोणती परिस्थिती आहे? (ब) काही लोकांची तक्रार काय आहे?

 जगात जिकडे पहाल तिकडे गुन्हे द्वेष आणि समस्या आहेत. याचे परिणाम बहुधा निरपराध लोकांना सहन करावे लागतात. यासाठी काही लोक देवाला दोष देतात. ते म्हणतातः ‘जर देव आहे तर या सर्व भयानक गोष्टी तो का घडू देतो?’

२. (अ) कोण दुष्टपणा करीत आहे? (ब) जगातील बहुतेक दुःखे कशी टाळता येतील?

पण या सर्व वाईट गोष्टी कोण करीत आहे? देव नव्हे, तर लोक करीत आहेत. देव दुष्कृत्यांचा निषेध करतो. वास्तविक, लोकांनी देवाचे नियम पाळल्यास जगातील बहुतेक दुःखे टाळता येतील. तो आपल्याला प्रेम करण्याचा आदेश देतो. मानवी दुःखांना कारणीभूत असलेल्या खून, चोऱ्‍या, व्यभिचार, लोभ, दारुडेपणा व इतर गोष्टी त्याने निषिद्ध ठरवल्या आहेत. (रोमकर १३:९; इफिसकर ५:३, १८) देवाने आदाम व हव्वेला उत्तम मेंदू, शरीर व जीवनाचा पूर्ण उपभोग घेण्याच्या कुवतीसह निर्माण केले. त्यांना किंवा त्यांच्या मुलांना त्रास वा दुःख सोसावे लागावे असे त्याला कधीच वाटले नाही.

३. (अ) दुष्टपणाला कोण जबाबदार आहे? (ब) सैतानाच्या परिक्षेचा आदाम व हव्वेला प्रतिकार करता आला असता हे कशावरुन दिसून येते?

दियाबल सैतानाने पृथ्वीवर दुष्टपणाला सुरवात केली. पण आदाम व हव्वेचाही दोष होताच. दियाबलाने परिक्षा घेताच प्रतिकार न करता येण्याइतके काही ते दुर्बल नव्हते. कालांतराने येशू या परिपूर्ण मनुष्याने सैतानाला सांगितल्याप्रमाणे त्यांनाही, त्याला, “निघून जा,” असे म्हणता आले असते. (मत्तय ४:१०) पण त्यांनी तसे केले नाही. परिणामी त्यांच्यामध्ये व्यंग उत्पन्‍न झाले. त्यांच्यासह त्यांच्या सर्व वंशजांना अनुवंशिकतेने अपूर्णत्व आले. त्याच्याच अनुषंगाने, आजारपण, शोक व मृत्युही आले. (रोमकर ५:१२) परंतु, देवाने हे दुःख चालूच राहण्यास परवानगी का दिली आहे?

४. प्रेमळ देव, अल्पकाळासाठी दुष्टपणाला परवानगी देईल हे समजण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळते?

मानवी दुःखे शतकानुशतके चालू द्यावयाला, देवाला कोणतेच सबळ कारण नाही असे एखाद्याला प्रथम वाटेल. पण असा निष्कर्ष काढणे योग्य आहे का? एखादा दोष सुधारण्यासाठी आपल्या मुलांवर मनापासून प्रेम करणारे पालक सुद्धा त्रासदायक शस्त्रक्रिया होऊ देतात ना? होय, अल्पकाळ त्रास सोसावा लागण्यास परवानगी देण्याने मुलांना भविष्यात अधिक चांगले स्वास्थ्य उपभोगणे शक्य झाले आहे. तर मग, देवाने दुष्टपणाला परवानगी दिल्याने कोणता फायदा झाला आहे?

एका अतिमहत्त्वाच्या वादाचा निकाल लागणे आहे

५. (अ) सैतान देवाच्या विरुद्ध कसे बोलला? (ब) सैतानाने हव्वेला काय वचन दिले?

एदेन बागेत देवाविरुद्ध झालेल्या बंडामुळे एक अत्यंत महत्त्वाचा वाद वा प्रश्‍न उभा राहिला. देवाने दुष्टपणाला परवानगी का दिली ते समजण्यासाठी आपण हा प्रश्‍न तपासला पाहिजे. यहोवा देवाने आदामाला बागेतील एका विशिष्ट झाडाचे फळ खाऊ नये असे बजावले होते. आदामाने ते खाल्ल्यास काय होणार होते? देव म्हणालाः “तू खचित मरशील.” (उत्पत्ती २:१७) परंतु सैतानाने नेमके उलटे सांगितले. त्याने आदामाची बायको हव्वा हिला पुढाकार घेऊन निषिद्ध झाडाचे फळ खाण्यास सांगितले. तो म्हणालाः “तुम्ही खरोखर मरणार नाही.” खरे म्हणजे, तो पुढे तिला असेही म्हणालाः “देवाला ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल.”—उत्पत्ती ३:१-५.

६. (अ) हव्वेने देवाची अवज्ञा का केली? (ब) निषिद्ध झाडाचे फळ खाण्याचा काय अर्थ झाला?

हव्वेने देवाची अवज्ञा केली व फळ खाल्ले. का बरे? हव्वेने सैतानावर विश्‍वास ठेवला. देवाची अवज्ञा केल्याने आपला फायदा होईल असा स्वार्थी विचार तिने केला. यापुढे तिला व आदामाला देवाला जाब द्यावा लागणार नाही, त्याच्या नियमांनुसार वागावे लागणार नाही असे तिला वाटले. “चांगले” काय व “वाईट” काय याचा निर्णय त्यांना स्वतःला घेता येईल. हव्वेच्या इच्छेला अनुसरुन आदामानेही फळ खाल्ले. देवाविरुद्ध मानवाच्या पहिल्या पापाबद्दल चर्चा करताना जरुसलेम बायबल मध्ये तळटिपेत म्हटले आहे, “हे पाप म्हणजे चांगले काय व वाईट काय हे स्वतः ठरवून व त्याप्रमाणे वागून पूर्ण नैतिक स्वातंत्र्याचा दावा करण्याचे सामर्थ्य. . . . पहिले पाप हा देवाच्या सार्वभौमत्वावर हल्ला होता.” म्हणजेच मानवाचा परिपूर्ण अधिपति वा वरिष्ठ असण्याच्या देवाच्या हक्कावरील तो हल्ला होता.

७. (अ) मानवाच्या अवज्ञेने कोणता वाद उपस्थित झाला? (ब) या वादासंबंधाने कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली पाहिजेत?

तेव्हा निषिद्ध फळ खाऊन, आदाम व हव्वा देवाच्या अधिपत्याखालून बाहेर पडले. स्वतःच्या निर्णयानुसार काय चांगले व काय वाईट ते ठरवून त्यांनी हे पाऊल स्वतःच उचलले. त्यामुळे उद्‌भवलेला महत्त्वाचा वाद किंवा प्रश्‍न म्हणजेः देवाला मानवाचा परिपूर्ण अधिपति होण्याचा अधिकार आहे का? दुसऱ्‍या शब्दात, मानवांसाठी चांगले व वाईट काय ते ठरवण्याचा यहोवाला अधिकार आहे का? कोणते आचरण चांगले व कोणते नाही हे तो ठरवणार का? की मानवच स्वतःवर अधिपत्य चालविण्याचे काम अधिक चांगल्या रितीने करू शकतो? कोणाचा अधिपत्य गाजविण्याचा मार्ग सर्वोत्तम आहे? सैतानाच्या अदृश्‍य मार्गदर्शनाखाली, यहोवाच्या मार्गदर्शनाशिवाय, मानवी अधिकार चालवण्यात अधिक यशस्वी होईल का? किंवा पृथ्वीवर चिरशांती आणील असे एक नीतीमान शासन स्थापन करण्यासाठी देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे का? देवाच्या सार्वभौमत्वावर व मानवाचा परिपूर्ण व एकमेव अधिपति होण्याच्या त्याच्या हक्कावर झालेल्या हल्ल्याने हे सर्व प्रश्‍न उपस्थित केले गेले.

८. यहोवाने बंडखोरांचा तात्काळ नाश का केला नाही?

बंड झाल्याबरोबर यहोवा देव त्या तिन्ही बंडखोरांचा नाश करु शकला असता. सैतान, आदाम व हव्वा यांच्यापेक्षा तो प्रबळ होता यात वादच नव्हता. परंतु त्यांचा नाश केल्याने प्रश्‍नांचा समर्पक निकाल लागला नसता. उदाहरणार्थ, देवाच्या मदतीशिवाय मानव स्वतःवर यशस्वीरित्या शासन करुन शकतात का या महत्त्वाच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळालेच नसते. यासाठीच प्रस्तुत झालेल्या महत्त्वपूर्ण वादाचा निकाल लावण्याकरता देवाने वेळ दिला.

वादविषयाचा निकाल लावणे

९, १०. देवाच्या मार्गदर्शनाशिवाय स्वतःवर राज्य करण्याच्या मानवी प्रयत्नांचे काय फळ प्राप्त झाले?

आता बराच काळ लोटला आहे तर याचा परिणाम काय झाला? तुम्ही काय म्हणाल? देवाच्या मदतीशिवाय स्वतःवर शासन करण्यात मानव यशस्वी झाला आहे असे गेल्या ६,००० वर्षांच्या इतिहासावरुन दिसून आले आहे का? सर्वांना आनंद व सुख देईल असे उत्तम शासन मानवाने स्थापन केले आहे का? की इतिहासाने यिर्मया संदेष्ट्याचे ते म्हणणे की, “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही” हे खरे असल्याचे दाखविले आहे?—यिर्मया १०:२३.

१० सबंध इतिहासात प्रत्येक प्रकारच्या शासनाचे प्रयोग करुन झाले. पण सर्वांना खरा आनंद व सुरक्षितता यातल्या एकानेही मिळवून दिलेली नाही. काही लोक प्रगतीच्या चिन्हांकडे बोट दाखवतील. परंतु, धनुष्य बाणांऐवजी अणुबॉम्ब आणल्याने, तसेच आणखी एका जागतिक युद्धाच्या भीतीने जग ग्रासलेले असताना, खरी प्रगति झाली असे कोणी म्हणू शकेल का? माणसे चंद्रावर चालू शकतात पण पृथ्वीवर मात्र एकमेकांसोबत शांततेने राहू शकत नसतील तर त्याला काय प्रगति म्हणायची? आधुनिक सुखसोयींनी युक्‍त घरे असली तरीही त्यात राहणारी कुटुंबे अनेक वादविवादांनी भंगलेली असल्यास मानवाला त्यांचा काय फायदा? रस्तोरस्ती दंगे, जीव व वित्ताची हानी, तसेच सर्वत्र माजलेला अनाचार या गोष्टी अभिमानास्पद आहेत का? मुळीच नाही! परंतु देवाच्या मदतीशिवाय शासन चालवण्याच्या मानवी प्रयत्नांची ती फळे आहेत.—नीतीसूत्रे १९:३.

११. तर मग, मानवाला कशाची गरज आहे?

११ हा पुरावा सर्वांना समजेल असाच आहे. देवापासून स्वतंत्र शासन करण्याचे मानवी प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत. त्यांच्यामुळे मानवाला पुष्कळ त्रास भोगावा लागला आहे. पवित्र शास्त्र म्हणतेः “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.” (उपदेशक ८:९) तात्पर्य, आपले व्यवहार व्यवस्थित चालवण्यासाठी मानवाला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. जसे देवाने मानवाला अन्‍न खाण्याच्या व पाणी पिण्याच्या गरजेसह निर्माण केले तसे देवाच्या नियमांच्या पालनाच्या गरजेसह माणूस बनवला होता. अन्‍न व पाण्याच्या शारीरिक भुकेकडे दुर्लक्ष केल्याने जसा माणसाला त्रास होईल तसाच देवाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने माणूस त्रासात पडेल हे तितकेच खरे आहे.—नीतीसूत्रे ३:५, ६.

इतका विलंब का?

१२. वाद मिटवण्यासाठी देवाने इतका दीर्घ काळ का लावला?

१२ कोणी विचारीलः ‘देवाने हा वाद मिटविण्यासाठी आतापर्यंत सुमारे ६,००० वर्षांचा दीर्घ काळ का दिला? हा वाद खूप पूर्वीच समाधानकारकपणे मिटवता आला नसता का?’ देवाने पूर्वीच हस्तक्षेप केला असता तर मानवाला, वेगवेगळे प्रयोग करण्यास मला संधी दिली गेली नाही असा आरोप करता आला असता. परंतु आता सर्व प्रजाजनांच्या गरजा पूर्ण करणारे शासन तसेच सर्वांच्या उत्कर्षात भर घालणारे वैज्ञानिक शोध लावण्यास मानवाला भरपूर वेळ मिळाला आहे. गेल्या अनेक शतकात मानवांनी सर्व प्रकारच्या शासनांचे प्रयोग करुन पाहिले. तसेच विज्ञान क्षेत्रात त्यांनी मोठी प्रगति साध्य केली. त्यांनी अणुशक्‍तीवर ताबा मिळवला असून चंद्रापर्यंत सफर केली आहे. पण त्याचा परिपाक काय झाला? त्यामुळे मानवजातीला आशीर्वादित ठरणारी नवी व्यवस्था त्याला आणता आली का?

१३. (अ) मानवाने वैज्ञानिक प्रगति करुन देखील आज परिस्थिती कशी आहे? (ब) त्यामुळे काय सिद्ध होते?

१३ छे, छे! उलट पूर्वीपेक्षा आता जगात जास्त दुःख व क्लेश दिसतात. गुन्हे, प्रदूषण, लढाई, कुटुंबाचा ऱ्‍हास व इतर प्रश्‍न अशा थराला गेले आहेत की मानवाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे, असे वैज्ञानिकांचे मत बनले आहे. होय, सुमारे ६,००० वर्षांच्या स्वराज्याच्या अनुभवानंतर व वैज्ञानिक “प्रगती”चे एक शिखर गाठल्यावर मानवजात आत्मनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे! देवाशिवाय स्वतःवर यशस्वीरित्या ताबा चालवणे अशक्य असल्याचे किती उघड झाले आहे! त्यामुळेच वाद मिटवण्यास देवाने पुरेसा अवधी दिला नाही असा आरोप आता कोणीही करु शकत नाही.

१४. सैतानाने उपस्थित केलेल्या दुसऱ्‍या महत्त्वाच्या वादाचे परिक्षण आपण का करावे?

१४ सैतानाच्या अधिपत्याखाली मानवाला दुष्टपणाची परवानगी देण्यास देवाला खरोखरच सबळ कारण आहे. सैतानाने बंड पुकारल्याने आणखी एक वाद उपस्थित झाला. तो मिटविण्यासाठी देखील वेळेची गरज होती. त्या वादाचे परिक्षण केल्यास, देवाने दुष्टपणाला परवानगी का दिली ते समजण्यास अधिक मदत होईल. या वादात तुम्ही विशेष रस घेतला पाहिजे कारण त्यामध्ये तुम्ही वैयक्‍तीकपणे गोवलेले आहात.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१०० पानांवरील चित्रं]

कोणी पालक आपल्या प्रिय मुलाला उचित कारणामुळेच वेदनादायक शस्त्रक्रियेतून जाऊ देतात. मानवाला त्रास सहन करण्यासाठी दिलेल्या तात्कालिक परवानगीमध्येही देवाचा चांगला उद्देश आहे

[१०१ पानांवरील चित्रं]

आदाम हव्वेने निषिद्ध फळ खाऊन देवाच्या अधिपत्याचा त्याग केला. चांगले काय किंवा वाईट काय याबद्दल त्यांनी स्वतःच निर्णय घेण्यास आरंभ केला

[१०३ पानांवरील चित्रं]

मानवाला अन्‍न खाण्याच्या व पाणी पिण्याच्या गरजेसह जसे निर्माण केले गेले तसेच देवाच्या मार्गदर्शनाच्या गरजेसह त्याला बनविण्यात आले होते