देव—तो कोण आहे?
प्रकरण ४
देव—तो कोण आहे?
१. (अ) लोक कोणकोणत्या देवांना भजतात? (ब) दैवते व देव यांच्यामध्ये पवित्र शास्त्र काय फरक दाखवते?
आज जगभर अनेक देवांची उपासना होत आहे. शिंटो, बौद्ध, हिंदू व वन्य जमातींच्या धर्मांमध्ये शेकडो देव आहेत. झीयस [ज्युपितर] व हरमिस [मर्क्युरी] यांसारखे देव येशूच्या शिष्यांच्या काळी पूजिले जात. (प्रे. कृत्ये १४:११, १२) तद्वत, “बरीच दैवते” आहेत. याच्याशी पवित्र शास्त्रहि सहमत आहे. पण ते पुढे म्हणतेः “तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे. त्याच्यापासून अवघे झाले.” (१ करिंथकर ८:५, ६) ‘हा देव कोण?’ असे तुम्हाला विचारले तर तुम्ही काय उत्तर द्याल?
२. लोकांची देवाबद्दल कोणती वेगवेगळी मते आहेत?
२ अनेक म्हणतील, ‘तो प्रभु आहे.’ इतर म्हणतील, ‘ती स्वर्गातील आत्मिक व्यक्ती आहे.’ शब्दकोषात देवाला ‘परमेश्वर’ म्हटले आहे. देवाचे नाव विचारल्यास कोणी म्हणतात, ‘येशू.’ देव ही व्यक्ती नसून सर्वत्र वास करणारी अति बलवान शक्ती आहे असे इतर अनेकांना वाटते. काहींना तर देवाच्या अस्तित्वाचीच शंका येते. त्याच्या अस्तित्वाची खात्री आपल्याला करता येते का?
देव खरोखरी अस्तित्वात आहे
३. घर कसे बनते?
३ एखादी सुंदर इमारत पाहिली की, ‘ही कोणी बनविली असेल?’ असा विचार तुमच्या मनाला चाटून जातो का? ‘ती कोणी बनवलीच नाही, आपोआप बनली’ असे तुम्हाला कोणी सांगितले तर त्यावर विश्वास ठेवाल का? नक्कीच नाही. एका पवित्र शास्त्र लेखकाने म्हटल्याप्रमाणे, “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते.” सर्वांनाच ते माहीत आहे. मग, “सर्वकाही बांधणारा देवच आहे” असे त्या लेखकाचे तर्कशुद्ध अनुमानहि आपण स्विकारु नये का?—इब्रीयांस ३:४.
४. लाखो कोटी तारे कसे बनले?
४ या विश्वातील कोट्यावधि अगणित ताऱ्यांकडे बघा. त्यांचे अवकाशातील भ्रमण परस्पर संबंधातील नियंत्रण करणाऱ्या नियमांप्रमाणे नसते का? “ह्यांना कोणी उत्पन्न केले?” असा प्रश्न प्राचीन काळी विचारला गेला. त्याचे उत्तर मोठे मार्मिक आहे. “जो त्यांच्या सैन्याची मोजणी करुन त्यांस बाहेर आणतो, जो सर्वांस नावांनी हाका मारतो” त्याने. (यशया ४०:२६) तर मग, या कोट्यावधि ताऱ्यांनी स्वतःला बनवले व अद्भुत रीतीने, कोणाच्याहि मार्गदर्शनाविना या सूर्यमालिका बनवल्या असे समजणे वेडेपणाच होईल.—स्तोत्रसंहिता १४:१.
५. (अ) आपोआप वेगवेगळे भाग जुळून यंत्र बनण्याची किती शक्यता आहे? (ब) यापासून आपल्या विश्वाबद्दल काय कळते?
५ उच्चकोटीच्या रचनेचे हे विश्व आपोआप बनणे शक्यच नाही. त्यासाठी एक प्रचंड शक्तीशाली व बुद्धिमान निर्माता असलाच पाहिजे. (स्तोत्रसंहिता १९:१, २) ‘देवाच्या अस्तित्वावर तुमचा विश्वास का आहे?’ असे एका कारखानदाराला विचारल्यावर तो म्हणाला की, त्याच्या कारखान्यामध्ये १७ भागांचे एक यंत्र कसे जोडावे हे शिकण्यासाठी एका मुलीला दोन दिवस लागतात. तो म्हणालाः “मी एक साधा घरगुती उपकरणांचा उत्पादक आहे. पण मला इतके कळते की, या यंत्राचे १७ भाग एका डब्यात भरुन १७ कोटी वर्षे जरी हालवले तरी तुम्हाला कधीही यंत्र करुन मिळणार नाही.” अनेक प्रकारच्या जीवांनी युक्त अशी पृथ्वी धरुन हे विश्व त्या यंत्रापेक्षा कितीतरी गुंतागुंतीचे आहे. आणि त्या एका यंत्राला बनवण्यासाठी जर कोणा कुशल व्यक्तीची आवश्यकता असते तर सर्व काही निर्माण करण्यासाठी सर्वसमर्थ देवाची जरुरी नाही का?—प्रकटीकरण ४:११; प्रे. कृत्ये १४:१५-१७; १७:२४-२६.
देव खरीच व्यक्ती आहे?
६. देव एक खरी व्यक्ती आहे असा विश्वास आपल्याला का वाटतो?
६ बहुतेक लोकांचा देवावर विश्वास असला तरी अनेक त्याचा व्यक्ती म्हणून विचार करत नाहीत. तसा तो आहे का? जेथे बुद्धि असते तेथे मन असते हे समजण्यासारखे आहे. उदाहरणार्थ, आपण म्हणतोः ‘माझे मन द्विधा झाले.’ तसेच जेथे मन आहे तेथे मेंदू असतो, आणि तो एका निश्चित आकाराच्या शरीरात असतो. तेव्हा, सर्वकाही बनवणारे उच्चकोटीचे मन एका महान व्यक्तीचे, सर्वसमर्थ देवाचे आहे. त्याचे शरीर भौतिक नसून आत्मिक आहे. आत्मिक व्यक्तींना शरीर असते? होय. पवित्र शास्त्र म्हणतेः “जर भौतिक शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरहि आहे.”—१ करिंथकर १५:४४; योहान ४:२४.
७. (अ) देवाची राहण्याची जागा आहे असे कशावरुन कळते? (ब) त्याला शरीर आहे असे कशावरुन समजते?
७ देवाला आत्मिक शरीर असल्याने त्याच्या राहण्याची जागाहि असणारच. स्वर्ग हे देवाचे “निवासस्थान” आहे असे पवित्र शास्त्र सांगते. (१ राजे ८:४३) तसेच, “ख्रिस्त . . . आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.” (इब्रीयांस ९:२४) काही माणसांना देवासह स्वर्गात राहण्याचा बहुमान मिळेल. त्यावेळी त्यांना आत्मिक शरीरे मिळतील. पवित्र शास्त्र म्हणतेः “तेव्हा ते देवाला पाहतील व त्याच्यासारखे होतील.” (१ योहान ३:२) या सर्वावरुनहि, देव ही व्यक्ती आहे व त्याला शरीर आहे असे कळते.
८, ९. (अ) विजेच्या जनित्राच्या उदाहरणाने देवाची दूरवर कार्य करणारी शक्ती कशी समजते? (ब) देवाचा पवित्र आत्मा म्हणजे काय व तो काय करु शकतो?
८ पण कोणाला शंका येईल की, ‘देव एक व्यक्ती असून स्वर्गात राहात असेल तर सर्वत्र होणाऱ्या एकूण एक गोष्टी त्याला कशा दिसतात? आणि त्याची शक्ती विश्वाच्या कानाकोपऱ्यात कशी जाणवते?’ (२ इतिहास १६:९) देव जरी एक व्यक्ती आहे तरी व्यक्ती असण्यामुळे त्याच्या शक्ती व महानतेवर मुळीच मर्यादा पडत नाहीत व यामुळेच त्याच्याबद्दलचा आपला आदर तसूभरही कमी होता कामा नये. (१ इतिहास २९:११-१३) वीज-निर्मिती करणाऱ्या जनित्राचा विचार केल्यास हे समजणे सोपे होईल.
९ असे जनित्र एखाद्या गावामध्ये अथवा जवळच बांधलेले असते. पण प्रकाश व उर्जा देणारी त्याची वीज सर्व गावभर खेळवली जाते. देवाचेहि तसेच आहे. तो स्वर्गात असतो. (यशया ५७:१५; स्तोत्रसंहिता १२३:१) तरीही त्याचा पवित्र आत्मा म्हणजेच त्याची अदृश्य शक्ती संपूर्ण विश्वामध्ये सर्वत्र जाणवते. त्याच्या पवित्र आत्म्याद्वारेच देवाने आकाश, पृथ्वी व सर्व जिवांची उत्पत्ती केली. (स्तोत्रसंहिता ३३:६; उत्पत्ती १:२; स्तोत्रसंहिता १०४:३०) या सर्व गोष्टी निर्माण करण्यासाठी देवाच्या शारीरिक उपस्थितीची गरज नव्हती. तो जरी दूर असला तरी त्याला हवे ते करण्यासाठी आपला पवित्र आत्मा तो पाठवू शकतो. हा देव किती अद्भुत आहे!—यिर्मया १०:१२; दानीएल ४:३५.
देव कशाप्रकारची व्यक्ती आहे
१०. देवाची ओळख होण्याचा एक मार्ग कोणता?
१० त्याच्याशी आपली चांगली ओळख झाल्यास त्याच्याबद्दल आपल्यामध्ये प्रेम निर्माण होईल, असा तो देव आहे का? तुम्ही म्हणाल, ‘असेल, पण त्याला आपण पाहू शकत नसल्यामुळे त्याच्याशी कशी ओळख होईल?’ (योहान १:१८) पवित्र शास्त्रात एक मार्ग सांगितला आहे. ते म्हणतेः “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरुन ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.” (रोमकर १:२०) म्हणजेच, देवाने बनवलेल्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला, त्यावर चिंतन केले तर देव कसा आहे ते समजण्यास मदत होते.
११. त्याने निर्माण केलेल्या गोष्टींवरुन देवाबद्दल आपल्याला काय कळते?
११ ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाकडे टाकलेला एकच दृष्टीक्षेप देवाच्या मोठेपणाची व अद्भुत शक्तीची कल्पना देतो. (स्तोत्रसंहिता ८:३, ४; यशया ४०:२६) शिवाय, पृथ्वी विचारात घ्या. पृथ्वीला सूर्यापासून योग्य तेवढीच उष्णता व प्रकाश मिळावा अशा अंतरावर देवाने तिला ठेवली आहे. जलचक्राचाहि विचार करा. पावसाने पृथ्वीवर पाणी पडते. ते नदीमार्फत समुद्रात जाते. सूर्यामुळे समुद्राचे पाणी वाफेच्या रुपात आकाशात जाते. तीच वाफ पाणी बनून पावसाने पृथ्वीवर परत येते. (उपदेशक १:७) माणसांना व प्राण्यांना लागणारे अन्न, निवारा व सर्व गोष्टींसाठी देवाने इतर अनेक चक्रे स्थापन केली आहेत! या सर्व अद्भुत गोष्टी आपल्याला देवाबद्दल काय सांगतात? हेच की, तो बुद्धिमान व उदार असून आपण निर्माण केलेल्या गोष्टींची काळजी घेतो.—नीतीसूत्रे ३:१९, २०; स्तोत्रसंहिता १०४:१३-१५, २४, २५.
१२. स्वतःचे शरीर देवाबद्दल तुम्हाला काय शिकविते?
१२ आपले शरीरच पहा ना. ते, नुसत्या जगण्यापेक्षा निश्चितच आणखी इतरही हेतूंनी बनवलेले आहे, हे अगदी उघड आहे. जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी त्याची अगदी आश्चर्यकारक पद्धतीने रचना केलेली आहे. (स्तोत्रसंहिता १३९:१४) आपल्या डोळ्यांना फक्त काळा आणि पांढरा रंग दिसत नसून इतरहि अनेक रंग दिसतात. आणि आपल्या भोवतालचे जग पहा, निरनिराळ्या मोहक रंगांची मुक्त हस्ताने उधळणच झाली आहे. आपण वास आणि चवही घेऊ शकतो. याकारणास्तव, भोजन ही नुसती गरज नसून आनंददायक कार्य आहे. अशा प्रकारच्या जाणीवा जगण्यासाठी अत्यावश्यक नव्हेत, तर प्रेमळ आणि उदार देवाकडून मिळालेले उपहार आहेत.—उत्पत्ती २:९; १ योहान ४:८.
१३. मानवाशी व्यवहार करण्याच्या देवाच्या पद्धतीवरुन त्याच्याविषयी काय कळते?
१३ देवाचा माणसांशी झालेल्या व्यवहारावरुनही तो कसा आहे ते कळून येते. त्याला न्यायाची तीव्र जाणीव आहे. तो कोणा विशिष्ठ वंशाच्या लोकांवर खास मर्जी करीत नाही. (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) तो क्षमाशील व दयाळू आहे. देवाने मिसराच्या दास्यातून इस्राएल लोकांना मुक्त केले तरी त्यांनी अनेकदा देवाची अवज्ञा केली आणि त्याला दुःखी केले. पवित्र शास्त्र म्हणतेः “त्यांनी अरण्यात त्याला दुःख दिले . . . व इस्राएलाच्या पवित्र प्रभूस चिडविले.” अशा इस्राएल राष्ट्राशी देवाने केलेल्या व्यवहाराबद्दल पवित्र शास्त्र म्हणतेः “तो कनवाळू असल्यामुळे . . . ते नश्वर आहेत . . . याची त्याने आठवण केली.” (स्तोत्रसंहिता ७८:३८-४१; १०३:८, १३, १४) परंतु, त्याच्या सेवकांनी त्याच्या नियमांबद्दल आज्ञाधारकपणा दाखविल्यास देवाला आनंद होतो. (नीतीसूत्रे २७:११) शत्रू त्याच्या उपासकांना छळतात तेव्हा त्याच्या मनातील भावना कशा असतात हे वर्णिताना देव म्हणतोः “जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो माझ्या डोळ्यांच्या बुब्बुळालाच स्पर्श करील.” (जखर्या २:८) सर्व वंश व जातीच्या क्षुद्र मानवाबद्दल ज्याला इतकी आपुलकी वाटते त्या देवाबद्दल तुम्हाला प्रेम वाटणार नाही का?—यशया ४०:२२; योहान ३:१६.
देव येशू किंवा त्रैक्य आहे का?
१४. त्रैक्याची शिकवण काय आहे?
१४ हा इतका चांगला देव कोण आहे? कोणी म्हणतात, त्याचे नाव येशू आहे. पवित्र शास्त्रात “त्रैक्य” हा शब्द नसला तरी कोणी म्हणतात की, देव हा त्रैक्य आहे. त्रैक्याच्या शिकवणीनुसार एका देवात तीन व्यक्ती आहेत. याचा अर्थ, “एक देव, पिता, पुत्र व पवित्र आत्मा.” हे एक गूढ आहे असे कबूल करुन देखील अनेक धार्मिक संस्था तशीच शिकवण शिकवतात. देवासंबंधी अशा कल्पना सत्याला धरुन आहेत का?
१५. देव व येशू या असमान दोन व्यक्ती आहेत हे शास्त्रामधून कसे कळते?
१५ येशूने कधी तरी म्हटले का की तो स्वतः देव होता? कधीच नाही. उलट पवित्र शास्त्रात त्याला “देवाचा पुत्र” म्हटले आहे. आणि “माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे,” असे त्याने स्वतः म्हटले आहे. (योहान १०:३४-३६; १४:२८) तसेच काही गोष्टी त्याला किंवा देवदूतांनाही अज्ञात असून फक्त पित्याला माहीत आहेत हे त्याने स्पष्ट केले. (मार्क १३:३२) शिवाय येशूने देवाला प्रार्थना करताना एकदा म्हटले की, “माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” (लूक २२:४२) जर येशू स्वतःच सर्वसमर्थ देव असता तर त्याने स्वतःला प्रार्थना केली नसती, नाही का? खरे म्हणजे त्याच्या मृत्युनंतर “त्या येशूला देवाने उठविले,” असे शास्त्रवचने म्हणतात. (प्रे. कृत्ये २:३२) यावरुन सर्वसमर्थ देव आणि येशू या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत हे स्पष्ट आहे. मृत्यु, पुनरुत्थान व स्वर्गाराहेणानंतरहि येशू त्याच्या पित्याच्या बरोबरीचा नाही.—१ करिंथकर ११:३; १५:२८.
१६. येशूला “देव” म्हटलेले असले तरी तो सर्वसमर्थ देव का नाही?
१६ पण कोणी विचारीलः ‘पवित्र शास्त्रात येशूला देव म्हटलेले नाही का?’ होय, ते खरे आहे. पण, तसे म्हटल्यास सैतानालाहि देव म्हटले आहे. (२ करिंथकर ४:४) योहान १:१ मध्ये जेथे येशूला “शब्द” म्हटले आहे, तेथे काही पवित्र शास्त्र अनुवादांमध्ये असे म्हटले आहेः “प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता; आणि शब्द देव होता.” पण पहा २ ऱ्या वचनात म्हटले आहे की “शब्द प्रारंभी देवासह होता.” माणसांनी येशूला पाहिले आहे. पण १८ वे वचन म्हणतेः “देवाला कोणीही कधीच पाहिले नाही.” या कारणास्तव १ ल्या वचनाच्या काही अनुवादात मूळ कल्पना अचूकपणे मांडताना म्हटले आहेः “शब्द देवासह होता व शब्द दैवी होता.” अथवा “एक देव” होता. म्हणजेच “शब्द” देवासारखा शक्तीशाली होता. तेव्हा येशू सर्वसमर्थ देव नव्हता हे उघड आहे. स्वतः येशूनेच पित्याबद्दल बोलताना “माझा देव” व “एकच खरा देव” असे शब्द वापरले.—योहान २०:१७; १७:३.
१७. येशूच्या शिष्यांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाल्याने ती एक व्यक्ती नव्हे हे कसे कळते?
१७ त्रैक्यामधील तथाकथित तिसरी व्यक्ती म्हणजे “पवित्र आत्म्या”बद्दल म्हणाल तर आपण मागेच पाहिल्याप्रमाणे ती व्यक्ती नसून देवाची कार्यकारी शक्ती आहे. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने म्हटले की, तो जसा पाण्याने बाप्तिस्मा देत असे तसा येशू पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल. जसे पाणी हे व्यक्ती नाही तसा पवित्र आत्माहि व्यक्ती नव्हे. (मत्तय ३:११) येशूच्या मृत्यु व पुनरुत्थानानंतर यरुशलेमात जमलेल्या त्याच्या शिष्यांवर जेव्हा पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला तेव्हा योहानाचे ते भाकित पूर्ण झाले. पवित्र शास्त्र म्हणतेः “ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले.” (प्रे. कृत्ये २:४) ते एखाद्या व्यक्तीने “परिपूर्ण” झाले होते का? नाही. तर त्यांच्यात देवाच्या पवित्र आत्म्याचा संचार झाला होता. या वस्तुस्थितिनुसार लक्षात येईल की, पवित्र शास्त्र त्रैक्याची शिकवण देत नाही. येशू पृथ्वीवर येण्यापूर्वीपासूनच मिसर व बाबेलोनमध्ये देवांच्या त्रिमूर्ती भजल्या जात.
देवाचे नाव
१८. (अ) “देव” हे सर्वसमर्थ देवाचे वैयक्तिक नाव आहे का? (ब) त्याचे वैयक्तिक नाव काय आहे?
१८ तुमच्या माहितीतल्या सर्वांना नावे आहेत. इतरांपासून वेगळे ओळखण्यासाठी देवालाहि स्वतःचे नाव आहे. कोणी म्हणतील, ‘“देव” हेच त्याचे नाव नाही का?’ नाही. “देव” हे एक पद आहे, जसे “राष्ट्रपति”, “राजा”, अथवा “न्यायाधीश.” पवित्र शास्त्रात देवाचे नाव जवळजवळ ७,००० वेळा सापडते. उदाहरणार्थ, स्तोत्रसंहिता ८३:१८ मध्ये म्हटले आहेः “तू, केवळ तूच यहोवा या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.” अथवा “परमेश्वर” असा शब्द वापरुन तळटीपेमध्ये “मुळात, यहोवा” असा खुलासा केला आहे. तसेच बहुधा सर्व शास्त्र आवृत्तींमध्ये प्रकटीकरण १९:१-६ मध्ये “अलेलूया” अथवा “हालेलूया” म्हणताना देवाच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. कारण त्याचा अर्थ “याहचे गौरव असो” असा आहे. तेथे “याह” हे यहोवाचे संक्षिप्त रुप वापरलेले आहे.
१९. (अ) आपल्या शास्त्रात देवाचे नाव पाहून काहींना आश्चर्य का वाटते? (ब) किंग जेम्स आवृत्तीमध्ये देवाचे नाव कोठे आढळते?
१९ देवाचे नाव आपल्या पवित्र शास्त्रात पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. याचे कारण त्यांच्या शास्त्रात देवाच्या नावाचा क्वचितच उल्लेख केला आहे. उदाहरणार्थ, किंग जेम्स आवृत्तीमध्ये यहोवा हे नाव निर्गम ६:३; स्तोत्रसंहिता ८३:१८ व यशया १२:२ आणि २६:४ येथेच वापरले आहे. पण जेथे जेथे देवाच्या नावाचे भाषांतर केले आहे तेथे “प्रभू” किंवा “देव” हे शब्द ठळक मोठ्या अक्षरात लिहिलेले आहेत. त्यामुळे ‘प्रभू’ व ‘देव’ या सर्वनामापेक्षा ते वेगळे असल्याचे सूचित केले आहे. उदाहरणार्थ, स्तोत्रसंहिता ११०:१ पहा.
२०. (अ) देवाचे नाव बहुधा का वापरलेले नसते? (ब) ते का वापरावे?
२० तुम्ही कदाचित विचारालः ‘पवित्र शास्त्रामध्ये मुळात जेथे देवाचे नाव येते त्या प्रत्येक ठिकाणी ते का वापरलेले नाही? तसेच, ‘प्रभू’ व ‘देव’ असे शब्द त्याऐवजी का वापरले आहेत?’ अमेरिकन स्टँडर्ड आवृत्तीच्या प्रस्तावनेत, हे नाव आधी का वापरले नव्हते व आता का वापरले आहे याचा खुलासा केलेला आहे. त्यात म्हटले आहेः “अमेरिकन अनुवादकांना, सर्व बाजूंचा साकल्याने विचार केल्यावर एकमताने वाटते की, देवाचे नाव अतिशय पवित्र असल्याने त्याचा उच्चारहि करु नये, या यहुदी अंधश्रद्धेचा इंग्लिश वा इतर कोणत्याहि भाषांतरामध्ये पगडा बसविला जाता कामा नये. . . . म्हणून ज्या पदाला ते सर्वथा पात्र आहे तेथे, अनेक पवित्र गोष्टींशी संलग्न असलेल्या, या व्यक्तिगत नावाची, पुनर्स्थापना केली आहे.” या इंग्लिश अनुवादकांना वाटले की, ज्या कारणांनी देवाचे नाव वगळण्यात आले ती कारणे योग्य नव्हेत. यासाठीच त्यांनी ते पवित्र शास्त्रात पुन्हा समाविष्ट केले.
२१. यहोवा या नावाबद्दल कॅथोलिक डुए आवृत्ती काय म्हणते?
२१ “यहोवा” हे देवाचे नाव नसल्यामुळे ते वापरु नये असेहि कोणी म्हणतील. उदाहरणार्थ, कॅथोलिक डुए आवृत्तीमध्ये देवाचे नाव वापरलेले नाही. परंतु निर्गम ६:३ येथील तळटीपेत म्हटले आहेः “काही आधुनिक लोकांनी यहोवा हे नाव बनवले आहे. इब्री भाषेमधल्या मूळ नावाचा खरा उच्चार अनेक वर्षे न वापरल्यामुळे नष्ट झाला आहे.”
२२. (अ) इब्री भाषेत देवाचे नाव कसे लिहिले आहे? (ब) देवाच्या नावाचा मूळ उच्चार समजण्यामध्ये कोणता पेच पडला आहे?
२२ होय, कॅथोलिक शास्त्राने म्हटल्याप्रमाणे मूळ इब्री ग्रंथामध्ये देवाचे नाव आहे. पवित्र शास्त्राची पहिली ३९ पुस्तके इब्री भाषेतच लिहिलेली होती. तेथे YHWH या चार इब्री वर्णांनी देवाचे नाव लिहिलेले आहे. ज्यांची योग्य उच्चाराला मदत होते त्या अ, आ, इ, ई वगैरे स्वरांशिवाय प्राचीन इब्री भाषा लिहिली जात असे. त्यामुळे पेच असा आहे की, YHWH या व्यंजनाबरोबर कोणते स्वर वापरत असत हे सांगणे अशक्य झाले आहे.
२३. इंग्रजी शब्द “building” याऐवजी “bldg.” शब्दाच्या वापराने देवाच्या नावाच्या उच्चाराबद्दल पडलेला पेच कसा कळतो?
२३ समस्या नीट कळण्यासाठी आपण “building” हा इंग्रजी शब्द विचारात घेऊ या. समजा, हा शब्द “bldg.” अशा रितीने लिहिण्याची पद्धत पडली आणि हळू हळू त्याचा उच्चार करणेही बंद झाले. तर मग, १,००० वर्षांनंतरच्या माणसाने तो लिहिलेला पाहिला तर त्याचा उच्चार कसा करावा हे त्याला कसे कळणार? त्याने त्याचा उच्चार इतरांकडून ऐकला नसल्याने व त्याबरोबर कोणते स्वर वापरतात याचीही त्याला कल्पना नसल्यामुळे, त्याला खात्रीने काहीच सांगता येणार नाही. देवाच्या नावाचेही तसेच आहे. “याव्हे” असा खरा उच्चार असल्याचे काही तज्ञांचे मत असले तरी त्याचा उच्चार कसा करत असत ते कोणालाही नक्की माहीत नाही. परंतु, “यहोवा” हा उच्चार अनेक शतकांपासून प्रचारात आहे व तोच बहुतेकांना माहीत आहे.
२४. (अ) देवाचे नाव वापरणे कसे सुसंगत आहे? (ब) प्रे. कृत्ये १५:१४ प्रमाणे देवाचे नाव वापरणे महत्वाचे का आहे?
२४ मुळात खरा उच्चार कसा होता हे माहीत नसताना सुद्धा देवाच्या नावाचा उच्चार आपण करावा का? आपण पवित्र शास्त्रातील अनेक लोकांची नाव वापरतो. मूळ इब्री भाषेत त्यांचे उच्चार जसे होते तसे न म्हणताही आपण आज ती नावे वापरतो. उदाहरणार्थ, येशूचे नाव मूळ इब्री भाषेत “येशुआ” आहे. तसेच पवित्र शास्त्रात प्रकट केल्याप्रमाणे देवाचे नाव वापरणे योग्य आहे. मग तो, “याव्हे,” “यहोवा,” अथवा आपापल्या भाषेत रुढ झालेला इतर कोणताही उच्चार असो. त्या नावाचा उच्चार करण्यात उणे पडणे हीच मोठी चूक आहे. का बरे? कारण जे त्याच्या नावाचा वापर करीत नाही, ते “आपल्या नावाकरता” जे लोक देवाने निवडले आहेत, तेच म्हणून ओळखले जाणार नाहीत. (प्रे. कृत्ये १५:१४) त्याचे नाव नुसते माहीत असणे पुरेसे नाही; तर, येशूने भूतलावर असताना जसा इतरांपुढे देवाच्या नावाचा गौरव केला तसा आपणही केला पाहिजे.—मत्तय ६:९; योहान १७:६, २६.
हेतुबद्ध देव
२५. (अ) देवाबद्दल कोणती गोष्ट समजणे कठीण वाटेल? (ब) यहोवाने निर्मिती का सुरु केली?
२५ आपल्याला समजण्यास जरी कठीण वाटत असले तरी देवाला सुरुवात नाही व अंतही नाही. तो “सनातन राजा” आहे. (स्तोत्रसंहिता ९०:२; १ तीमथ्य १:१७) निर्मिती सुरु करण्यापूर्वी विश्वाच्या अवकाशात यहोवा एकटाच होता. परंतु तो स्वयंपूर्ण असल्याने व त्याला कशाचीही उणीव नसल्याने, त्याला एकटेपणा वाटला नसणार. प्रीतीमुळे त्याने निर्मिती कार्य सुरु केले. इतरांनाही जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी जीवन दिले. प्रथम देवाने स्वतःसारख्या आत्मिक व्यक्ती निर्माण केल्या. मानवासाठी पृथ्वी बनवण्यापूर्वीच देवाची स्वर्गीय पुत्रांची मोठी संस्था होती. जीवनात व त्याने सोपवलेली कामे करण्यात त्यांना आनंद मिळावा असा त्याचा हेतू होता.—इयोब ३८:४, ७.
२६. देवाचा पृथ्वीबद्दल संकल्प पूर्ण होईल अशी खात्री का वाटते?
२६ पृथ्वी बनवल्यानंतर तिच्यावर सुंदर नंदनवन केलेल्या भागात यहोवाने आदाम व हव्वा या जोडप्याला वसवले. त्यांना, देवाची आज्ञा पाळणारी व उपासना करणारी मुले व्हावी, तसेच त्या सर्वांनी मिळून नंदनवनाची व्याप्ति संपूर्ण पृथ्वीवर पसरावी असा यहोवाचा हेतू होता. (उत्पत्ती १:२७, २८) परंतु, आपण आधीच पाहिल्याप्रमाणे त्या उदात्त हेतूमध्ये बाधा आली. आदाम व हव्वेने त्याची अवज्ञा करण्याचा निर्णय घेतला व त्याचा हेतू पूर्ण झाला नाही. पण तो आता पूर्ण होईल. कारण आपला हेतू पूर्णत्वाला न नेणे म्हणजे देवाने पराभव पत्करल्यासारखे होईल. आणि तो असे कधीही करणार नाही! “माझा मनोरथ मी पूर्ण करीन. . . . मी बोलतो तसे घडवूनही आणतो,” असे तो म्हणतो.—यशया ४६:१०, ११.
२७. (अ) आपणास देवाला का जाब द्यावा लागेल? (ब) तद्वत, आपण कोणत्या गोष्टीचा गंभीर विचार केला पाहिजे?
२७ देवाच्या मनोरथाप्रमाणे आपले स्थान कोणते ते तुम्हाला दिसले का? देवाची इच्छा काय ते न पाहता स्वतःच्या मनाप्रमाणे वागणे नव्हे. सैतान, आदाम व हव्वा यांनी ते केले. त्यांना देवाचा हेतू माहीत होता तरी त्यांनी तो आचरला नाही. त्यासाठी देवाने त्यांना जबाबदार धरले. आपणासही देवाला जाब द्यावा लागेल का? होय. कारण देवापासूनच आपल्याला जीवन मिळाले आहे. आपले जीवन सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे. (स्तोत्रसंहिता ३६:९; मत्तय ५:४५) तर मग, देवाचा आपल्याबद्दलचा हेतू आपण किती प्रमाणात आचरतो? अनंतकाल जीवनाची संधी त्यावर अवलंबून असल्याने आपण या गोष्टींचा गंभीर विचार केला पाहिजे.
यहोवाची भक्ती कशी करावी
२८. देवाची भक्ती करण्यासाठी लोक कशाचा उपयोग करतात?
२८ आपण यहोवाची भक्ती कशी करतो हे महत्वाचे आहे. आपल्याला जशी शिकवण मिळाली त्यापेक्षा वेगळी असली, तरी देव सांगतो त्या रीतीनेच त्याची भक्ती केली पाहिजे. उदाहरणार्थ, उपासनेमध्ये मूर्ती वापरण्याचा काही लोकांचा प्रघात आहे. आपण मूर्तीची भक्ती करत नसून, तिला पाहून व स्पर्श करुन देवाची भक्ती करण्यास मदत होते असे ते म्हणतील. पण मूर्तीच्या मदतीने आपण देवाची भक्ती करावी अशी देवाची इच्छा आहे का?
२९. उपासनेमध्ये मूर्ती वापरणे चूक आहे हे पवित्र शास्त्रामध्ये कसे दाखवले आहे?
२९ मुळीच नाही. आणि याच कारणासाठी, देवाने इस्राएल लोकांना कोणत्याहि दृश्य आकृतीमध्ये दर्शन दिले नाही याची मोशाने त्यांना आठवण करुन दिली. (अनुवाद ४:१५-१९) एवढेच नव्हे तर दशाज्ञामधील एक म्हणतेः “आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, त्यांच्या पाया पडू नको, त्यांची सेवा करू नको.” (निर्गम २०:४, ५) फक्त यहोवाचीच भक्ती केली पाहिजे. मूर्ती बनवणे, तिच्या पाया पडणे, अथवा यहोवाला सोडून इतर कोणाही व कशाचीही भक्ती करणे कसे चूक आहे ते पवित्र शास्त्रात पुनःपुन्हा दाखविले आहे.—यशया ४४:१४-२०; ४६:६, ७; स्तोत्रसंहिता ११५:४-८.
३०. (अ) येशू व त्याच्या प्रेषितांच्या कोणत्या उद्गारांवरुन मूर्तीचा उपयोग अयोग्य असल्याचे कळते? (ब) अनुवाद ७:२५ प्रमाणे मूर्तींचे काय केले पाहिजे?
३० येशूनेहि उपासनेमध्ये मूर्ती वापरल्या नाहीत. तो म्हणालाः “देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” (योहान ४:२४) या उपदेशाप्रमाणे येशूच्या आरंभीच्या शिष्यांनीही भक्तीसाठी मूर्तीचा उपयोग केला नाही. पौलाने लिहिलेः “आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही.” (२ करिंथकर ५:७) तसेच प्रेषित योहानाने इशारा दिला की, “तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर राखा.” (१ योहान ५:२१) आपल्या घरातच सभोवार पाहून आपण हा उपदेश पाळत आहोत की नाही हे का पाहू नये?—अनुवाद ७:२५.
३१. (अ) देवाच्या एखाद्या नियमामागील कारण कळले नसले तरी कशामुळे आपण तो पाळण्यास उद्युक्त होऊ? (ब) आपण काय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे व कोणते निमंत्रण स्विकारले पाहिजे?
३१ यहोवा आपला निर्माता असल्याने त्याच्या सांगण्यानुसार भक्ती केल्याने आपल्याला खरा आनंद मिळेल. (यिर्मया १४:२२) त्याच्या अपेक्षा आपल्या भल्यासाठी, आपलेच चिरंतन कल्याण अनुलक्षून असतात असे पवित्र शास्त्र दाखवते. आपले ज्ञान व अनुभव मर्यादित असल्याने काही वेळा देवाच्या एखाद्या नियमाचे महत्व आपण जाणणार नाही. अथवा त्यापासून आपला फायदा कसा होतो हे समजणार नाही. परंतु आपल्यापेक्षा देवाला अधिक कळते हा दृढ विश्वास त्याचे नियम पाळण्यास आपल्याला उद्युक्त करील. (स्तोत्रसंहिता १९:७-११) तर मग, “याहो, या, यहोवा जो आपला उत्पन्नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करु. त्याला नमन करु. कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत” हे निमंत्रण स्विकारुन यहोवाबद्दल शक्य ते सर्व करण्यासाठी झटून प्रयत्न करु या.—स्तोत्रसंहिता ९५:६, ७.
[अभ्यासाचे प्रश्न]
[३४, ३५ पानांवरील चित्रं]
घर बांधणारा कोणी आहे . . . तर गुंतागुंतीच्या विश्वाचा सुद्धा कोणी निर्माता असलाच पाहिजे
[३९ पानांवरील चित्रं]
येशूने देवाकडे प्रार्थना करुन आपल्या इच्छेप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे व्हावे असे मागितल्यामुळे ते दोघे एकच व्यक्ती असू शकत नाही
[४१ पानांवरील चित्रं]
पवित्र आत्म्याने एकाच वेळी १२० शिष्यांना भरले गेले तर ती व्यक्ती कशी असणार?
[४२ पानांवरील संक्षिप्त आशय]
किंग जेम्स या इंग्रजी पवित्र शास्त्र आवृत्तीमध्ये देवाचे नाव या चार वचनात आढळते
[४५ पानांवरील चित्रं]
भक्ती करताना मूर्त्यांचा वापर करणे योग्य आहे का?