व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नरक कसल्या प्रकारचे स्थळ आहे?

नरक कसल्या प्रकारचे स्थळ आहे?

प्रकरण ९

नरक कसल्या प्रकारचे स्थळ आहे?

१. वेगवेगळ्या धर्मांनी नरकाबद्दल काय शिकवले आहे?

 लोकांना यातना देण्याची जागा म्हणजे नरक असे लाखो लोकांना त्यांच्या धर्मांनी शिकवले आहे. “नरक सदैव राहील. त्यातील यातनांना अंत नाही, अशी रोमन कॅथोलिक चर्चची शिकवण आहे” असे एनसाक्लोपिडिया ब्रिटानिका मध्ये म्हटले आहे. हा ज्ञानकोश पुढे म्हणतोः “कॅथोलिकांची ही शिकवण अनेक रुढीप्रिय प्रॉटेस्टंट लोकही अजून मानतात.” नरक ही यातना भोगण्याची जागा असल्याचे हिंदू, बौद्ध व मुसलमान धर्मही शिकवतात. अशी शिकवण मिळालेले लोक सहाजिकच म्हणतात की नरक इतका वाईट असल्याने त्याबद्दल न बोललेले बरे.

२. मुलांना यज्ञात जाळण्याबद्दल देवाला काय वाटले?

त्यामुळे असा प्रश्‍न उद्‌भवतो की, सर्वसमर्थ देवाने असा यातना तळ निर्माण केला का? आसपासच्या लोकांच्या रिवाजाप्रमाणे जेव्हा इस्राएल लोकही आपल्या मुलांना यज्ञात जाळू लागले तेव्हा देवाचे काय मत होते? तो आपल्या वचनात म्हणतोः “आपल्या पुत्रांचा व आपल्या कन्यांचा अग्नीत होम करण्यासाठी बेन हिन्‍नोमच्या खोऱ्‍यातील तोफेतांत त्यांनी उच्च स्थाने बांधली आहेत. मी त्यांना असली आज्ञा केली नव्हती. ती माझ्या मनातही आली नव्हती.”यिर्मया ७:३१.

३. देव लोकांचा छळ करील असे मानणे समंजसपणा व पवित्र शास्त्राच्या विरुद्ध का आहे?

विचार कराः लोकांना अग्नीमध्ये भाजण्याची कल्पना देवाच्या मनातही कधी आली नव्हती तर आपली सेवा न करणाऱ्‍यांसाठी दाहक नरक तो बनवील का? पवित्र शास्त्र म्हणतेः “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) प्रेम करणारा देव लोकांना सतत यातना देईल का? तुम्ही असे कराल का? देवाच्या प्रीतीबद्दल माहिती असल्याने नरकाबद्दल त्याच्या वचनात काय म्हटले आहे ते पाहिले पाहिजे. नरकात कोण आणि किती वेळासाठी जातात?

शिओल व हेडीज

४. (अ) कोणत्या इब्री व ग्रीक शब्दांचे “नरक” असे भाषांतर केले आहे? (ब) किंग जेम्स व्हर्शन मध्ये शिओल या शब्दाचे भाषांतर कसे केले आहे?

वेबस्टर्स डिक्शनरी यात म्हटले आहे की, इंग्रजीतील “हेल” (नरक) हा शब्द इब्री भाषेतील शिओल व ग्रीक भाषेतील हेडीज या शब्दांचा समानार्थी शब्द आहे. जर्मन पवित्र शास्त्रात “हेल” ऐवजी होएल शब्द वापरलेला असून पोर्तुगीजमध्ये इन्फर्नो, स्पॅनिशमध्ये इन्फिअर्नो व फ्रेंचमध्ये एन्फर हे शब्द वापरले आहे. ऑथोराइज्ड किंवा किंग जेम्स व्हर्शन यात शिओल याचे भाषांतर ३१ वेळा “हेल” (नरक), ३१ वेळा “ग्रंव्ह” (कबर) व ३ वेळा “पिट” (खड्डा) असे केलेले आहे. कॅथोलिक डूए व्हर्शन मध्ये शिओलचे भाषांतर ६४ वेळा “हेल” (नरक) असे केले आहे. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात (यालाच सर्वसाधारणपणे “नवा करार” असे म्हणतात) किंग जेम्स व्हर्शन मध्ये हेडीज या शब्दाचे भाषांतर प्रत्येक वेळी “हेल” (नरक) असे केलेले आहे. (मराठी पवित्र शास्त्रात “अधोलोक” असा शब्द वापरला आहे.) हेडीज हा शब्द एकूण १० वेळा येतो.—मत्तय ११:२३; १६:१८; लूक १०:१५; १६:२३; प्रे. कृत्ये २:२७, ३१; प्रकटीकरण १:१८; ६:८; २०:१३, १४.

५. शिओल व हेडीज यांच्याबद्दल कोणता प्रश्‍न उद्‌भवतो?

तद्वत, प्रश्‍न असा आहे की, शिओल वा हेडीज कशाप्रकारची जागा आहे? किंग जेम्स व्हर्शन मध्ये शिओल या एकाच इब्री शब्दाचे नरक, कबरखड्डा असे वेगवेगळे भाषांतर केलेले आहे. तर मराठी पवित्र शास्त्रात अधोलोक असा एकच शब्द वापरला आहे. यावरुन त्या तीनही शब्दांचा अर्थ एकच असला पाहिजे. नरक वा अधोलोक याचा अर्थ मानवजातीची सार्वजनिक कबर असा असेल तर ती दुःसह यातनांची जागा असणे शक्यच नाही. मग, शिओल व हेडीज यांचा अर्थ कबर की यातना स्थळ आहे?

६. (अ) शिओल व हेडीज यांचा अर्थ एकच आहे हे पवित्र शास्त्रवरुन कसे कळते? (ब) येशू हेडीजमध्ये होता यावरुन काय समजते?

याचे उत्तर शोधण्यासाठी इब्री व ग्रीक भाषेतील अनुक्रमे शिओलहेडीज या शब्दांचा अर्थ कसा एकच आहे ते पाहू. इब्री शास्त्रवचनातील स्तोत्रसंहिता १६:१० व ग्रीक शास्त्रवचनातील प्रे. कृत्ये २:३१ पडताळून पाहिल्यास ते स्पष्ट होते. ही दोन्ही वचने पुढील पानावर दाखविण्यात आली आहेत. स्तोत्रसंहिता १६:१० येथे अधोलोकाला मूळ इब्री भाषेमध्ये शिओल हा शब्द वापरला आहे, परंतु त्यालाच प्रे. कृत्ये २:३१ येथे मूळ ग्रीक भाषेत हेडीज हा शब्द वापरलेला आहे. तसेच येशू ख्रिस्त अधोलोकात—हेडीज अथवा नरकात—होता, या मुद्याकडे लक्ष द्या. ख्रिस्ताला देवाने नरकातील अग्नीमध्ये यातना दिल्या असा अर्थ आपण घ्यावा का? नक्कीच नाही. येशू नुसता कबरेत होता.

७, ८. याकोब व त्याचा मुलगा योसेफ तसेच ईयोब यांच्या वृत्तांतावरुन शिओल ही यातनांची जागा नव्हे हे कसे सिद्ध होते?

याकोबाचा, आपला मुलगा योसेफ ठार झाला आहे असा समज होता. त्यामुळे त्याच्यासाठी शोक करताना तो म्हणालाः “मी शोक करीत शिओलात (अधोलोकी) आपल्या मुलाकडे जाईन.” (उत्पत्ती ३७:३५) या ठिकाणी शिओल याचे किंग जेम्स व्हर्शन मध्ये कबर व डुए व्हर्शन मध्ये नरक असे भाषांतर केलेले आहे. तर मग, आपला मुलगा योसेफ युगानुयुगे यातना भोगण्याच्या स्थळी गेला आहे व तेथे जाऊन त्याला भेटावे अशी याकोबाची इच्छा होती का? किंवा मुलगा मरुन तो कबरेत आहे अशी याकोबाची कल्पना होती व तो स्वतःसुद्धा मृत्युची इच्छा करीत होता?

होय, पवित्र शास्त्रीय नरकात—अधोलोकात—चांगले लोकही जातात. उदाहरणार्थ, खूप दुःख भोगत असलेला ईयोब नावाचा सद्‌गृहस्थ देवाला प्रार्थना करताना म्हणालाः “तू मला अधोलोकात [मूळ, शिओल, किंग जेम्स व्हर्शन मध्ये कबर; डुए व्हर्शन मध्ये नरक] लपवशील . . . माझी मुदत नियमित करुन मग माझी आठवण करशील तर किती बरे होईल!” (ईयोब १४:१३) विचार कराः जर शिओल ही अग्नी व यातनांची जागा असेल तर ईयोब तेथे जाऊन देव त्याची आठवण करीपर्यंत तेथे राहण्याची इच्छा धरुन होता का? यातनातून सुटण्यासाठी मरुन कबरेत जाणे बरे असे ईयोबाला वाटत होते हे उघड आहे.

९. (अ) शिओलमधील लोक कोणत्या स्थितीत असतात? (ब) तर मग, शिओल व हेडीज म्हणजे काय?

पवित्र शास्त्रात जेथे जेथे शिओल हा शब्द येतो तेथे कोठेही जीवन, कार्य अथवा यातनांशी त्याचा संबंध येत नाही. उलट, त्याचा संबंध मृत्यु व क्रियाशून्यतेशी आहे. उदाहरणार्थ, उपदेशक ९:१० विचारात घ्या. तेथे म्हटले आहेः “जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करुन कर. कारण ज्या अधोलोकाकडे [मूळ शिओल; किंग जेम्स व्हर्शन मध्ये कबर व डुए व्हर्शन मध्ये नरक] तू जायचा आहेस तेथे काही उद्योग, युक्‍तिप्रयुक्‍ति, बुद्धी व ज्ञान यांचे नाव नाही.” याचा अर्थ उघड आहे की, शिओल वा हेडीज यातनातळ नसून मानवजातीची सार्वजनिक कबर आहे. (स्तोत्रसंहिता १३९:८) पवित्र शास्त्रात उल्लेख केलेल्या अधोलोकात—नरकात—चांगली व वाईट, सर्व माणसे जातात.

नरकातून बाहेर येणे

१०, ११. माशाच्या पोटात असताना योना नरकात होता असे तो का म्हणतो?

१० नरकातून बाहेर पडता येते का? त्यासाठी योनाचे उदाहरण पाहू या. योना बुडून मरु नये म्हणून एका मोठ्या माशाने योनास गिळावे असे देवाने केले. माशाच्या पोटातून योनाने प्रार्थना केलीः “मी आपल्या संकटावस्थेत यहोवाचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या [मूळ शिओल; किंग जेम्स व्हर्शन मध्ये कबर व डुए व्हर्शन मध्ये नरक; (२:३)] उदरातून मी आरोळी केली तेव्हा तू माझा शब्द ऐकला.”—योना २:२.

११ “अधोलोकाच्या [नरकाच्या] उदरातून” म्हणजे योनाला काय म्हणायचे होते? माशाचे पोट म्हणजे धगधगता यातना तळ तर नक्कीच नव्हता. परंतु तीच योनाची कबर झाली असती. कारण स्वतःबद्दल बोलताना येशू सुद्धा म्हणालाः “जसा योना तीन दिवस व तीन रात्री माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.”—मत्तय १२:४०.

१२. (अ) नरकातील लोकांना बाहेर येणे शक्य आहे याला पुरावा काय? (ब) अधोलोक (नरक) म्हणजे कबर असल्याचा आणखी पुरावा कोणता?

१२ येशू मेला व तीन दिवस कबरेत होता. पण पवित्र शास्त्र म्हणतेः “त्याला अधोलोकात [किंग जेम्स व्हर्शन, नरक] सोडून दिले नाही. . . . त्या येशूला देवाने उठवले.” (प्रे. कृत्ये २:३१, ३२) तसेच देवाच्या आदेशाने योनाही नरकातून उठला—म्हणजे जी त्याची कबर झाली असती त्यातून बाहेर आला. कारण माशाने त्याला कोरड्या जमिनीवर ओकून टाकले. तात्पर्य, लोक नरकातून बाहेर पडू शकतात! देवाचे हर्षदायक वचन आहे की, सर्व मृतांना बाहेर टाकून नरक (हेडीज) रिकामा केला जाईल. प्रकटीकरण २०:१३ वाचल्यास हे कळून येईल. तेथे म्हटले आहेः “तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृतांस बाहेर सोडले. मृत्यु व अधोलोक [मूळ हेडीज; किंग जेम्स व्हर्शन, नरक] यांनी आपल्यामधील मृतांस बाहेर सोडले, आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला.”

गेहेन्‍ना व अग्नीचे सरोवर

१३. किंग जेम्स व्हर्शन तसेच मराठी अनुवादातील पवित्र शास्त्रात १२ वेळा येणाऱ्‍या कोणत्या ग्रीक शब्दाचे “नरक” असे भाषांतर केले आहे?

१३ तरीही कोणी आक्षेप घेऊन म्हणेलः ‘पवित्र शास्त्रात नरकाग्नीअग्नीचे सरोवर यांचा उल्लेख आहे. त्यावरुन नरक ही यातना देण्याची जागा असल्याचे सिद्ध होत नाही का?’ होय, “नरकाग्नी” व “नरकात म्हणजे कधीही न विझणाऱ्‍या अग्नीत” टाकले जाण्याबद्दल किंग जेम्स व्हर्शन सारख्या काही अनुवादात सांगितले आहे हे अगदी खरे. (मत्तय ५:२२; मार्क ९:४५) ग्रीक शास्त्रवचनांमध्ये एकूण १२ वचनांत किंग जेम्स व्हर्शन तसेच मराठी अनुवादात गेहेन्‍ना या ग्रीक शब्दाचे भाषांतर “नरक” करण्यात आले आहे. हेडीज उर्फ “नरक” ही जर केवळ कबर आहे तर गेहेन्‍ना खरोखर भाजून यातना देण्याची जागा आहे का?

१४. गेहेन्‍ना म्हणजे काय व तेथे काय करीत असत?

१४ इब्री शब्द शिओल व ग्रीक शब्द हेडीज यांचा अर्थ कबर आहे यात शंका नाही. मग, गेहेन्‍नाचा अर्थ काय? इब्री शास्त्रवचनांमध्ये गेहेन्‍नाला “हिन्‍नोम . . . चे खोरे” म्हटले आहे. यरुशलेम शहराच्या तटाबाहेर इस्राएली लोक आपल्या मुलांचा होम जेथे करीत त्या दरीला हिन्‍नोम असे नाव होते. कालांतराने योशिया या सत्शील राजाने असले घाणेरडे रिवाज बंद करण्यासाठी ती दरी भ्रष्ट केली. (२ राजे २३:१०) पुढे ती सर्व प्रकारचा कचरा टाकण्यासाठी वापरण्यात येऊ लागली.

१५. (अ) येशूच्या काळी गेहेन्‍नाचा उपयोग कसा करीत असत? (ब) तेथे कोणती गोष्ट कधीही टाकत नव्हते?

१५ येशू भूतलावर असताना गेहेन्‍ना हा यरुशलेम शहराचा कचरातळ होता. तेथे कचरा जाळण्यासाठी वारंवार गंधक टाकून अग्नी प्रज्वलित ठेवत असत. स्मिथ्स डिक्शनरी ऑफ द बायबल याच्या पहिल्या खंडात म्हटले आहेः “तो शहराचा सार्वजनिक कचरातळ झाला होता. तेथे गुन्हेगारांची प्रेते, मेलेले प्राणी व इतरही सर्व प्रकारची घाण टाकण्यात येत असे.” परंतु, त्यात कोणत्याही जिवंत प्राण्याला टाकण्यात येत नसे.

१६. कायमच्या नाशाचे प्रतिक म्हणून गेहेन्‍नाचा उपयोग होत असे याला कोणता पुरावा आहे?

१६ शहराच्या या कचरातळाबद्दल यरुशलेममधील लोकांना माहिती होती. यामुळे, “सापांनो, सापाच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड [गेहेन्‍नाची शिक्षा] कसा चुकवाल?” असे दुष्ट धार्मिक नेत्यांना येशूने म्हटले तेव्हा लोकांना त्याचा अर्थ लक्षात आला. (मत्तय २३:३३) त्या धार्मिक पुढाऱ्‍यांना यातना देण्यात येतील असे येशूच्या बोलण्याचा अर्थ मुळीच नव्हता. इस्राएल लोक त्या दरीत आपली मुले जिवंत जाळत असताना, देव म्हणाला की, अशी भयंकर गोष्ट त्याच्या मनातही आली नव्हती! तेव्हा, येशूने गेहेन्‍ना हा शब्द संपूर्ण व कायमच्या नाशाचे प्रतिक या अर्थाने वापरला हे उघड आहे. ते दुष्ट धार्मिक पुढारी पुनरुत्थानाला पात्र नव्हते असा येशूच्या बोलण्याचा अर्थ होता. टाकाऊ कचऱ्‍याप्रमाणे गेहेन्‍नामध्ये जाणाऱ्‍यांचा कायमचा नाश होईल हे येशूच्या श्रोत्यांनी जाणले.

१७. “अग्नीचे सरोवर” म्हणजे काय व त्याला कोणता पुरावा आहे?

१७ पण, पवित्र शास्त्राच्या प्रकटीकरण पुस्तकात उल्लेखिण्यात आलेले “अग्नीचे सरोवर” म्हणजे काय? त्याचा अर्थही गेहेन्‍नाप्रमाणेच आहे. तो म्हणजे जाणीवपूर्वक यातना नव्हे तर चिरकालिक मरण. पवित्र शास्त्रातच हे कसे दाखवले आहे ते प्रकटीकरण २०:१४ मध्ये पहा. “तेव्हा मरण व अधोलोक [मूळ हेडीज; किंग जेम्स व्हर्शन मध्ये नरक] ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.” अग्नीचे सरोवर म्हणजे “दुसरे मरण” याचा अर्थ ज्यापासून पुनरुत्थान नाही असे मरण. सरोवर हे प्रतिक आहे. कारण त्यात मरण व अधोलोक (नरक) टाकले आहेत. मरण व अधोलोक (नरक) यांना अक्षरशः जाळणे अशक्य आहे. पण त्यांचा नाश करणे शक्य आहे व ते केले जाईल.

१८. दियाबलाला “अग्नीच्या सरोवरात” युगानुयुग यातना दिल्या जातील याचा अर्थ काय?

१८ पण, कोणी म्हणेलः ‘सैतानाला अग्नीच्या सरोवरात युगानुयुग यातना दिल्या जातील असे पवित्र शास्त्र म्हणते, त्याचे काय?’ (प्रकटीकरण २०:१०) याचा काय अर्थ होतो? येशू भूतलावर असताना तरुंगाच्या अधिकाऱ्‍यांना “छळकरी” म्हटले जाई. येशूने दिलेल्या दाखल्यात एका माणसाबद्दल तो म्हणालाः “मग, त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून, तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणाऱ्‍यांच्या हाती दिले.” (मत्तय १८:३४) अग्नीच्या सरोवरात टाकलेले लोक, ज्यातून पुनरुत्थान नाही अशा “दुसऱ्‍या मरणात” जातात. त्यामुळे ते मृत्युमध्ये कायमचे बंदिवान होतात असे म्हटल्यासारखेच आहे. ते, जणू कायमचे मृत्युच्या तरुंगाधिकाऱ्‍याच्या ताब्यात राहतात म्हणजेच मरतात. परंतु दुष्टांचा अक्षरशः छळ होत नाही, कारण आपण मागेच पाहिल्याप्रमाणे माणूस मेल्यावर त्याचे अस्तित्वच संपते. त्याला कशाचीही जाणीव होत नाही.

श्रीमंत माणूस व लाजर

१९. श्रीमंत माणूस व लाजर यांच्याबद्दलचे येशूचे उद्‌गार उदाहरणादाखल आहेत हे कसे समजते?

१९ येशूने आणखी एक दाखला देताना म्हटलेः “दरिद्री माणूस मेला व देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात [मूळ हेडीज; किंग जेम्स व्हर्शन मध्ये नरक] यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करुन अब्राहाम व त्याच्या उराशी असलेला लाजर यांना पाहिले.” याचा काय अर्थ होतो? (लूक १६:१९-३१) अधोलोक किंवा हेडीज ही मानवजातीची सार्वजनिक कबर असून यातना देण्याची जागा नव्हे हे आपण मागेच पाहिले आहे. तेव्हा येशू वस्तुस्थिति सांगत नसून दृष्टांत वा दाखला देत आहे हे स्पष्ट आहे. यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्याः संभाषण करता येण्याइतके स्वर्ग व अधोलोक (नरक) जवळ आहेत का? शिवाय श्रीमंत माणूस खरोखरच्या जळत्या सरोवरात असेल तर बोटाच्या टोकावरील पाण्याच्या एका थेंबाने त्याची जीभ थंड करण्यास अब्राहाम लाजराला कसा पाठवेल? तर मग, येशू कशाबद्दल दाखला देत होता?

२०. (अ) श्रीमंत माणूस, (ब) लाजर, (क) त्या प्रत्येकाचे मरण यांचा अर्थ काय?

२० दाखल्यातील श्रीमंत माणूस म्हणजे येशूचा अव्हेर करुन त्याला ठार करणारे गर्विष्ठ धार्मिक नेते होय. देवाच्या पुत्राचा स्विकार करणाऱ्‍या सामान्य लोकांचे प्रतिक म्हणजे लाजर. श्रीमंत माणूस व लाजर यांचा मृत्यु म्हणजे त्यांच्या जीवनातील बदल. लाजरासारख्या उपेक्षित लोकांना येशूने आध्यात्मिक अन्‍न दिल्याने हा बदल घडून आला. कारण त्यामुळे ते लोक महान अब्राहाम—यहोवा देव—याच्या कृपाछत्राखाली आले. त्याचवेळी ईशकृपेच्या दृष्टीने ते धार्मिक नेते “मेले.” देवाने अव्हेरल्यामुळे, ख्रिस्ताच्या शिष्यांनी त्यांची दुष्कृत्ये उघडकीस आणल्यावर त्यांना यातना झाल्या. (प्रे. कृत्ये ७:५१-५७) तात्पर्य, काही मृतांना अक्षरशः जळत्या नरकात यातना दिल्या जातात अशी शिकवण हा दाखला देत नाही.

दियाबल-प्रेरित शिकवणी

२१. (अ) सैतानाने कोणती असत्ये पसरवली आहेत? (ब) “परगेटरी”ची शिकवण खोटी असल्याची खात्री का बाळगता येते?

२१ तो दियाबल होता, ज्याने हव्वेस सांगितले होते की, “तुम्ही खरोखर मरणार नाही.” (उत्पत्ती ३:४; प्रकटीकरण १२:९) पण ती मेलीच. आणि तिचा काही अंश मागे जिवंत राहिला नाही. मृत्युनंतर जीव जिवंत राहतो या असत्याची शिकवण सैतानाने सुरुवात केली. तसेच दुष्टांचे जीव नरकात वा परगेटरीमध्ये तडफडतात असे असत्यही सैतानाने पसरवले. मृत लोक बेशुद्ध असतात असे पवित्र शास्त्रात स्पष्ट दाखवले असल्याने या शिकवणी खऱ्‍या असणे शक्य नाही. खरे म्हणजे परगेटरी हा शब्द अथवा त्याची कल्पनाही पवित्र शास्त्रात आढळत नाही.

२२. (अ) या प्रकरणात आपण काय शिकलो? (ब) या माहितीचा तुमच्यावर काय परिणाम झाला?

२२ आपण पाहिलेच आहे की, नरक (अधोलोक, शिओल किंवा हेडीज) ही मृतांची विश्रांतीची जागा आहे व तेथील लोकांना भविष्याबद्दल आशाही आहे. चांगले व वाईट, दोन्ही प्रकारचे लोक तेथे जातात व पुनरुत्थानाची वाट पाहतात. गेहेन्‍ना देखील यातनांची जागा नसून पवित्र शास्त्रात कायमच्या नाशाचे प्रतिक म्हणून वापरले आहे. तसेच “अग्नीचे सरोवर” खरोखरच्या अग्नीचे स्थान नसून, ज्यातून पुनरुत्थान नाही असे “दुसरे मरण” दर्शविते. नरक ही यातना देण्याची जागा असणे अशक्य आहे. कारण अशी कल्पना देवाच्या मनात वा हृदयात आलीच नाही. शिवाय एखाद्याने पृथ्वीवर काही वर्षे चुका केल्या म्हणून मेल्यावर त्याला अखंड यातना देणे न्यायाच्या विरुद्ध आहे. मृतांबद्दल वस्तुस्थिती समजणे किती हितकारक आहे! यामुळे भीती व अंधश्रद्धांपासून सुटका मिळते.—योहान ८:३२.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८३ पानांवरील संक्षिप्त आशय]

“शिओल” या इब्री शब्दाचा व “हेडीज” या ग्रीक शब्दाचा एकच अर्थ होतो

अमेरिकन स्टँडर्ड व्हर्शन

स्तोत्रसंहिता १६:१०

प्रे. कृत्ये २:३१

[८४, ८५ पानांवरील चित्रं]

माशाने गिळल्यावर योनाने, ‘नरकाच्या उदरातून मी आरोळी केली’ असे का म्हटले?

[८६ पानांवरील चित्रं]

गेहेन्‍ना ही यरुशलेमाबाहेरची दरी होती. तिचा सार्वकालिक मृत्यु या लाक्षणिक अर्थाने वापर करण्यात आला