व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रार्थनेतून मदत कशी मिळवावी

प्रार्थनेतून मदत कशी मिळवावी

प्रकरण २७

प्रार्थनेतून मदत कशी मिळवावी

१. आपल्याला देवाकडून कोणत्या मदतीची गरज असते व ती आपल्याला कशी मिळते?

 जगाच्या दुष्ट प्रभावापासून अलिप्त राहण्यासाठी ख्रिश्‍चनांना प्रार्थनेतून मिळणाऱ्‍या मदतीची विशेष गरज आहे. येशूने म्हटलेः “स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो . . . पवित्र आत्मा देईल.” (लूक ११:१३) देवाच्या वचनांचा अभ्यास करण्याची व त्याच्या संघटनेच्या सहवासात राहण्याची जशी आपल्याला गरज आहे, तशीच देवाच्या पवित्र आत्म्याची वा त्याच्या क्रियाशील शक्‍तीचीही आपल्याला गरज आहे. तथापि, पवित्र आत्मा मिळण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे.

२. (अ) प्रार्थना म्हणजे काय? (ब) प्रार्थनेचे अनेक प्रकार कोणते? (क) प्रार्थनेला महत्त्व का आहे?

प्रार्थना म्हणजे देवाशी आदरपूर्वक केलेले संभाषण. देवाला काही गोष्टी मागण्यासाठी ती विनंतीच्या स्वरुपात असते. तरीपण प्रार्थनेचे स्वरुप देवाला धन्यवाद देणे किंवा त्याची स्तुति असेही असू शकते. (१ इतिहास २९:१०-१३) आपल्या स्वर्गीय पित्याशी उत्तम संबंध ठेवण्यासाठी आपण नियमाने प्रार्थनेतून त्याच्याशी बोलले पाहिजे. (रोमकर १२:१२; इफिसकर ६:१८) मग सैतानाने वा त्याच्या जगाने आपल्यावर कितीही संकटे आणली वा प्रलोभने दाखवली तरी देवाचा पवित्र आत्मा—जो मागितल्यामुळे मिळतो—देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास आपल्याला बळ देईल.—१ करिंथकर १०:१३; इफिसकर ३:२०.

३. (अ) आपल्याला देवाकडून कोणते बळ मिळू शकते? (ब) केवळ कोणत्या मार्गाने आपल्याला देवासोबत चांगले नातेसंबंध ठेवता येतील?

देवाला न आवडणारी एखादी सवय वा कुमार्ग सोडण्यासाठी तुम्हाला प्रखर लढा द्यावा लागत असेल. तसे असल्यास देवाची मदत मागा. त्याला प्रार्थना करा. प्रेषित पौलाने हेच केले. त्याने लिहिलेः “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही राखावयास शक्‍तीमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१३; स्तोत्रसंहिता ५५:२२; १२१:१, २) अनैतिकतेच्या मार्गापासून स्वतंत्र झालेल्या एका स्त्रीने म्हटलेः “अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करण्याचे सामर्थ्य केवळ देवाकडेच आहे. त्यासाठी तुमचा यहोवाशी वैयक्‍तीक संबंध असावा लागतो व तसा वैयक्‍तीक संबंध ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रार्थना करणे.”

४. धुम्रपानाची सवय सोडण्यासाठी एका माणसाला कशी मदत मिळाली?

तरीही एखादा म्हणेलः ‘देवाच्या मदतीसाठी मी अनेक वेळा प्रार्थना केली आहे. तरी पण मला चुकीच्या गोष्टी करणे आवरता येत नाही.’ धुम्रपान करणाऱ्‍या लोकांनी असे म्हटले आहे. अशा एका माणसाला जेव्हा विचारले की, “तुम्ही कधी प्रार्थना करता?” तेव्हा तो उत्तरलाः “रात्री निजण्यापूर्वी, सकाळी जाग आल्यावर व जेव्हा मी हताश होतो व धुम्रपान करतो तेव्हा केलेल्या गोष्टीचा मला पश्‍चाताप होत असल्याचे मी यहोवाला सांगतो.” त्याच्या मित्राने म्हटलेः “वस्तुतः तुम्हाला देवाच्या मदतीची गरज ही जेव्हा तुम्ही धुम्रपानाची इच्छा करता त्या क्षणाला असते ना? तर मग, त्याच वेळी तुम्ही बळ देण्यासाठी यहोवाची प्रार्थना केली पाहिजे.” तशी प्रार्थना जेव्हा त्या माणसाने केली तेव्हा धुम्रपान थांबवण्यासाठी त्याला मदत मिळाली.

५. (अ) देवाची सेवा योग्य रितीने करण्यासाठी कशाची जरुरी आहे? (ब) पापी कृत्यांपासून दूर होण्याने अनेकदा यातना होतात असे कशावरुन दिसते?

याचा हा अर्थ नाही की, देवाला प्रार्थना केली, शिवाय त्याच्या वचनांचा अभ्यास केला व त्याच्या दृश्‍य संघटनेच्या सहवासात राहिले तर योग्य गोष्टी करणे सोपे जाईल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, होय, प्रखर लढा द्यावा लागतो व प्रसंगी दुःखही सहन करावे लागते. (१ करिंथकर ९:२७) वाईट सवयींमुळे वाईट गोष्टींबद्दल जबरदस्त आकर्षण उत्पन्‍न होत असते. यास्तव, पापी कार्यापासून दूर झाल्यास बहुधा यातना होतात. योग्य गोष्टी करण्यासाठी यातना सहन करण्याची तुमची तयारी आहे का?—१ पेत्र २:२०, २१.

देव ऐकतो अशा प्रार्थना

६. (अ) प्रार्थना करणे अनेकांना कठीण का जाते? (ब) आपल्या प्रार्थना देवाने ऐकण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे?

प्रार्थना करणे अनेकांना जड जाते. एक तरुणी म्हणालीः “जो मला दिसत नाही अशा व्यक्‍तीला प्रार्थना करणे मला कठीण जाते.” कोणाही मानवाने देवाला पाहिलेले नसल्याने प्रार्थना करण्यास व देवाने ती प्रार्थना ऐकण्यास आपल्याला विश्‍वासाची गरज आहे. यहोवा खरोखरच अस्तित्वात आहे व आपण मागितलेल्या गोष्टी करु शकतो असा आपण विश्‍वास धरला पाहिजे. (इब्रीयांस ११:६) जर आपला तसा विश्‍वास आहे व जर आपण प्रामाणिक अंतःकरणाने देवाकडे आलो तर तो आपल्याला मदत करील अशी खात्री बाळगू शकतो. (मार्क ९:२३) याच कारणास्तव, रोमी शतपति कर्नेल्य याने मार्गदर्शनासाठी प्रामाणिकपणे प्रार्थना केली तेव्हा तो देवाच्या संघटनेचा सदस्य नव्हता तरीही देवाने त्याच्या प्रार्थनेला उत्तर दिले.—प्रे. कृत्ये १०:३०-३३.

७. (अ) कोणत्या प्रकारच्या प्रार्थना देवाला संतोष देतात? (ब) देव कोणत्या प्रकारच्या प्रार्थना ऐकणार नाही?

काही लोकांना आपले विचार शब्दांत सांगणे कठीण जाते. तथापि, ह्‍या कारणास्तव त्यांनी देवाला प्रार्थना करण्याचे थांबवू नये. त्याला आपल्या गरजा कळतात व आपण काय म्हणू इच्छितो ते त्याला कळेल अशी खात्री आपण बाळगावी. (मत्तय ६:८) विचार कराः लहान मुलाचे आभाराचे साधे व प्रामाणिक शब्द तुम्हाला आवडतील की, त्याला इतर कोणी शिकवलेले खास शब्द तुम्हाला आवडतील? आपल्या स्वर्गीय पित्याला देखील आपले साधे व प्रामाणिक विचार आवडतात. (याकोब ४:६; लूक १८:९-१४) प्रार्थनेसाठी खास शब्द वा धार्मिक विधिच्या भाषेची गरज नाही. इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरलेले अपरिचित शब्द वा पांडित्याची भाषा वापरणाऱ्‍यांची तसेच अप्रामाणिकपणे त्याच त्या गोष्टींची पुनःपुन्हा पुनरावृत्तीने प्रार्थना म्हणणाऱ्‍यांचे देव ऐकणार नाही.—मत्तय ६:५, ७.

८. (अ) मनात म्हटलेल्या प्रार्थना देव ऐकतो हे कशावरुन दिसून येते? (ब) आपण कोणा विशिष्ट स्थितीत वा जागेवरच प्रार्थना केली पाहिजे असे पवित्र शास्त्र दाखवते का?

तुम्ही मनोमन केलेली प्रार्थना देखील देव ऐकू शकतो. नेहम्याने अशी मनोमन प्रार्थना केली तेव्हा देवाने त्याच्या प्रामाणिक विनंतीनुरुप हालचाल केली. तसेच हन्‍नाचेही घडले. (नेहम्या २:४-८; १ शमुवेल १:११-१३, १९, २०) तसेच प्रार्थना करताना कशा स्थितीत बसावे यालाही तितके महत्त्व नाही. तुम्ही कोणत्याही स्थितीमध्ये, कोणत्याही वेळी व कोणत्याही जागी प्रार्थना करु शकता. परंतु डोके लववणे व गुडघे टेकणे अशी नम्र स्थिती योग्य असल्याचे पवित्र शास्त्र दर्शवते. (१ राजे ८:५४; नेहम्या ८:६; दानीएल ६:१०; मार्क ११:२५; योहान ११:४१) येशूने हे दर्शविले की, इतर लोकांच्या दृष्टीआड, एकांतामध्ये वैयक्‍तीक प्रार्थना, म्हणणे चांगले असते.—मत्तय ६:६.

९. (अ) आपण आपल्या सर्व प्रार्थना कोणाला उद्देशून केल्या पाहिजेत व का? (ब) आपल्या प्रार्थना देवाला मान्य होण्यासाठी त्या कोणाच्या नावाने केल्या पाहिजेत?

प्रार्थना हा भक्‍तीचा एक भाग आहे. या कारणासाठीच, आपण केवळ आपल्या सृष्टीकर्त्या यहोवा देवाला उद्देशून प्रार्थना करणे योग्य आहे—इतर कोणालाही नव्हे. (मत्तय ४:१०) पवित्र शास्त्र दर्शविते की, ख्रिश्‍चनांनी येशू ख्रिस्तामार्फत देवाला प्रार्थना केली पाहिजे, कारण येशूने आमची पापे काढून टाकण्यासाठी आपल्या जीवनाचे यज्ञार्पण वाहिले. याचा अर्थ हा की, आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना म्हटली पाहिजे.—योहान १४:६, १४; १६:२३; इफिसकर ५:२०; १ योहान २:१, २.

१०. (अ) देवाला कोणत्या प्रार्थना मान्य नसतात? (ब) आपल्या प्रार्थना देवाने ऐकाव्या अशी इच्छा आहे तर आपण कोणती मूलभूत गरज पूर्ण केली पाहिजे?

१० पण सर्वच प्रार्थना यहोवाला संतोषजनक असतात का? पवित्र शास्त्र म्हणतेः “धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे.” (नीतीसूत्रे २८:९; १५:२९; यशया १:१५) यास्तव, देवाने आपली प्रार्थना ऐकावी अशी आपली इच्छा असल्यास आपण त्याच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे व त्याचे नियम पाळले पाहिजेत ही मूलभूत गरज आहे. तसे नसल्यास, जसा एखादा सदाचारी माणूस त्याच्या दृष्टीने अनैतिक असणारा रेडिओवरील कार्यक्रम ऐकणार नाही, तसाच देवही आपल्याकडे कान देणार नाही. पवित्र शास्त्र म्हणतेः “आपण जे काही मागतो ते त्याच्याकडून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करतो.”—१ योहान ३:२२.

११. आपण ज्याविषयी प्रार्थना करीत आहोत त्याच्यासाठी कार्य करणे याचा काय अर्थ आहे?

११ याचा अर्थ आपण जे मागतो त्याच्यासाठी कार्यही केले पाहिजे. उदाहरणार्थ, तंबाखू वा अफूची सवय सुटावी म्हणून देवाला प्रार्थना करायची आणि बाहेर जाऊन ती विकत आणायची असे करणे अयोग्य होईल. तसेच अनैतिकता टाळण्यासाठी देवाला प्रार्थना केल्यावर अनैतिक गोष्टी चित्रित करणारे वाड्‌.मय वाचणे, चित्रपट किंवा दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहणे हेही अयोग्यच होईल. तसेच जुगार ही कोणा माणसाची समस्या आहे तर ती थांबवण्यासाठी देवाला प्रार्थना करायची आणि रेसकोर्सवर किंवा जेथे जुगार चालतो त्या अड्डयावर जाणे हे बरोबर नसणार. देवाने आपली प्रार्थना ऐकावी असे जर आपल्याला वाटते तर आपण जे काही मागत असतो ते मनापासून असते हे आम्ही आपल्या वर्तनाने दाखवून दिले पाहिजे.

१२. (अ) आपल्या प्रार्थनांमध्ये आपण कशाचा समावेश करु शकतो? (ब) आपल्या प्रार्थना देवाला संतोषजनक होण्यासाठी आपण काय शिकून घेतले पाहिजे?

१२ तर मग, यहोवाला केलेल्या प्रार्थनेमध्ये आपल्याला कोणकोणत्या वैयक्‍तीक गोष्टींचा समावेश करता येईल? वास्तविकपणे, देवाशी असलेल्या आपल्या संबंधावर प्रभाव टाकणाऱ्‍या कोणत्याही गोष्टीबद्दल प्रार्थना करता येईल. त्यामध्ये शारीरिक स्वास्थ्य तसेच मुलांचे पालनपोषण यांचाही समावेश होऊ शकतो. (२ राजे २०:१-३; शास्ते १३:८) प्रेषित योहानाने लिहिलेः “आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.” (१ योहान ५:१४) महत्वाची गोष्ट अशी की आपली विनंती देवाच्या इच्छेला अनुसरुन असावी. याचा अर्थ, त्याची इच्छा काय आहे ती आपण प्रथम जाणून घेतली पाहिजे. (नीतीसूत्रे ३:५, ६) मग, प्रार्थना करताना केवळ आपल्या वैयक्‍तीक फायद्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी देवाची इच्छा व हेतू लक्षात ठेवल्यास देवाला आपल्या प्रार्थना मान्य होतील. यहोवा आपल्याला दररोज देत असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल त्याचे आभार मानणे योग्य होय.—योहान ६:११, २३; प्रे. कृत्ये १४:१६, १७.

१३. (अ) आपल्या प्रार्थनेमध्ये सर्वप्रथम कशाला महत्त्व असले पाहिजे ते येशूने कसे दाखवले? (ब) दुय्यम महत्वाच्या कोणत्या गोष्टींविषयी आपण प्रार्थना करावी?

१३ देवाला कशा प्रकारच्या प्रार्थना मान्य असतात याविषयीचे मार्गदर्शन करण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांना एक नमुनेवजा प्रार्थना शिकविली. (मत्तय ६:९-१३) देवाचे नाव, त्याचे राज्य व पृथ्वीवर त्याच्या इच्छेप्रमाणे करणे सर्वात महत्त्वाचे आहे. यानंतर, रोजची भाकर, पापांसाठी क्षमा व परिक्षेतून व त्या दुष्टापासून—सैतानापासून—मुक्‍तता अशा वैयक्‍तीक गरजांसाठी आपण विनंती करणे योग्य होईल.

दुसऱ्‍यांच्या मदतीसाठी प्रार्थना

१४. दुसऱ्‍यांसाठी केलेल्या प्रार्थनांचे महत्त्व पवित्र शास्त्र कसे दाखविते?

१४ इतरांसाठी केलेल्या प्रार्थनेचे महत्त्व येशूने स्वतः उदाहरण घालून दाखवले. (लूक २२:३२; २३:३४; योहान १७:२०) प्रेषित पौलाला अशा प्रार्थनांचे महत्त्व माहीत होते व त्याने अनेकदा इतरांना त्याच्यासाठी प्रार्थना करावयाला सांगितली. (१ थेस्सलनीकाकर ५:२५; २ थेस्सलनीकाकर ३:१; रोमकर १५:३०) तुरुंगात असताना त्याने लिहिलेः “तुमच्या प्रार्थनांच्या द्वारे माझे तुमच्याकडे येणे होईल अशी मला आशा आहे.” (फिलेमोन २२; इफिसकर ६:१८-२०) यानंतर पौलाची जी लगेचच तरुंगातून सुटका झाली त्यावरुन त्याच्यासाठी करण्यात आलेल्या प्रार्थनांचा फायदा केवढा होता हे दिसून येते.

१५. आपल्याला प्रिय वाटणाऱ्‍या व्यक्‍तींसाठी आपण कशा प्रकारच्या विनंत्या करु शकतो?

१५ तसेच पौलानेही स्वतः इतरांखातर मदतीसाठी प्रार्थना केल्या. “आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हास ह्‍या पाचारणासाठी योग्य असे मानावे.” (२ थेस्सलनीकाकर १:११) तसेच दुसऱ्‍या एका मंडळीला त्याने सांगितलेः “आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही काही वाईट करु नये . . . तुम्ही चांगले करावे.” (२ करिंथकर १३:७) आपणाला प्रिय असणाऱ्‍या व्यक्‍तींसाठी विशिष्ट विनंती देवाला सादर करण्यात पौलाचे उदाहरण अनुसरणे हे खरेच चांगले आहे. खरेच, “नीतीमानांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.”—याकोब ५:१३-१६.

१६. (अ) जरुरीची मदत मिळवण्यासाठी आपण कधी प्रार्थना करावी? (ब) प्रार्थना हा विलोभनीय हक्क का आहे?

१६ एक पवित्र शास्त्राचा अभ्यास चालविताना एक उपाध्याय नेहमी विचारतातः “दर आठवड्याच्या पवित्र शास्त्र अभ्यासाच्या वेळेशिवाय इतरही वेळी तुम्ही प्रार्थना करता का?” आपल्याला जरुर असलेली मदत मिळविण्यासाठी आपण देवाला नेहमी प्रार्थना करावयास हवी. (१ थेस्सलनीकाकर ५:१७; लूक १८:१-८) कोणा प्रिय व विश्‍वस्त मित्रासोबत जसे बोलता तसेच देवासोबतही नम्रतेने बोलण्यास शिका. खरेच, सर्व विश्‍वाच्या नियंत्याला, प्रार्थना ऐकणाऱ्‍याला प्रार्थना करता येणे व तो आपले ऐकतो हे जाणणे देखील केवढा अद्‌भूत हक्क आहे!—स्तोत्रसंहिता ६५:२.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२२७ पानांवरील चित्रं]

धुम्रपान करण्याची लहर येते तेव्हा काय करावे—मदतीसाठी प्रार्थना करावी की त्या लहरीपुढे नमते घ्यावे?

[२२९ पानांवरील चित्रं]

तुम्ही मदतीसाठी प्रार्थना करता का आणि लगेच अशा कार्यात संलग्न होता का की ज्यामुळे तुम्ही अपराधात सापडाल?

[२३० पानांवरील चित्रं]

तुम्ही एकांतात प्रार्थना करता का की, केवळ दुसऱ्‍यांसोबत असतानाच करता?