मृत्युच्या वेळी काय होते?
प्रकरण ८
मृत्युच्या वेळी काय होते?
१. मृतांबद्दल लोक बहुधा कोणते प्रश्न विचारतात?
एकाद्या प्रिय व्यक्तिच्या मृत्युने कसे सुनेसुने वाटते ते कदाचित तुम्हाला माहीत असेल. किती उदास व हताश वाटते! तेव्हा सहाजिकच मनात प्रश्न येतात की, एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यास तिचे काय होते? ती कोठे इतरत्र जिवंत असते का? जे जिवंत आहेत त्यांना मृत्यु पावलेल्यांचा सहवास या भूतलावर पुन्हा मिळेल का?
२. पहिला माणूस आदाम याच्या मृत्युच्या वेळी काय झाले?
२ मृत्युच्या वेळी आदामाचे काय झाले याचे परिक्षण केल्यास वरील प्रश्नांची उत्तरे देण्यात मदत होईल. आदामाने पाप केल्यावर देवाने त्याला सांगितलेः “तू . . . अंती पुन्हा मातीस जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ती ३:१९) याचा अर्थ लक्षात घ्या. देवाने मातीपासून आदामास घडविण्यापूर्वी तो नव्हता. तो अस्तित्वातच नव्हता. यास्तव तो मेल्यावर परत अस्तित्वहीन स्थितीला परतला.
३. (अ) मृत्यु म्हणजे काय? (ब) मृतांच्या स्थितीबद्दल उपदेशक ९:५, १० काय म्हणते?
३ साध्या शब्दात, जीवनाच्या विरुद्ध मृत्यु होय. हेच, पवित्र शास्त्रात उपदेशक ९:५, १० मध्ये दाखवले आहे. “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते, पण मृतांस तर काहीच कळत नाही. त्यास आणखी फलप्राप्ती व्हावयाची नसते. त्यांचे स्मरण कोणास राहात नाही. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्चून कर. कारण ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्ति-प्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.”
४. (अ) मृत्युनंतर माणसाच्या विचारशक्तीचे काय होते? (ब) मृत्युनंतर माणसाच्या जाणीवेचे कार्य का थांबते?
४ याचा अर्थ, मृतांस काही करता येत नाही की काही जाणवत नाही असा होतो. पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे त्यांना विचारही नसतात. कारण “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो. तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो, त्याचवेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” (स्तोत्रसंहिता १४६:३, ४) मृत्युच्या वेळी माणसाचा आत्मा, त्याची श्वासोच्व्छासावर टिकवली जाणारी जीवन-शक्ती ‘जाते.’ ती अस्तित्वात राहात नाही. त्यामुळे विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असलेल्या श्रवण, दृष्टि, स्पर्श, गंध व रुचीच्या संवेदना थांबतात. पवित्र शास्त्रानुसार, मृत व्यक्ती संपूर्ण बेशुद्धावस्थेत जाते.
५. (अ) मृत मानव व मृत जनावरांची स्थिती सारखीच असल्याचे पवित्र शास्त्र कसे दाखवते? (ब) मानव व जनावरांना जगवणारा “आत्मा” काय आहे?
५ मेल्यावर माणसे व जनावरे सुद्धा त्याच संपूर्ण बेशुद्धावस्थेत असतात. पवित्र शास्त्रात हा मुद्दा कसा सांगितला आहे ते पहाः “हा मरतो तसाच तोही मरतो. त्या सर्वांचा आत्मा सारखाच आहे. पशूंपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही कारण सर्वकाही व्यर्थ आहे! सर्व एकाच स्थानी जातात. सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन्हा मातीस मिळतात. (उपदेशक ३:१९, २०) ज्या ‘आत्म्या’मुळे जनावरे जगतात त्याच्याचमुळे माणसेही जगतात. जेव्हा हा “आत्मा” किंवा अदृश्य जीवन-शक्ति जाते तेव्हा मानव व जनावरे दोघे, ज्या मातीपासून बनले, तिलाच परत मिळतात.
जीव मरतो
६. जनावरे सुद्धा जीव असल्याचे पवित्र शास्त्र कसे दाखवते?
६ काहींनी असे म्हटले आहे की, माणसात व जनावरांत फरक आहे, कारण माणसाला जीव आहे तसा जनावरांना नसतो. परंतु, उत्पत्ती १:२० व ३० मध्ये म्हटले आहे की, देवाने पाण्यात राहण्यासाठी “जिवंत जीव” निर्माण केले. तसेच जनावरांना “जीवन” असते. काही पवित्र शास्त्र भाषांतरात “जीव” या शब्दाऐवजी अशा ठिकाणी “प्राणी” आणि “जीवन” असे शब्द वापरण्यात आले आहेत. परंतु त्याच्या समासामध्ये मूळ भाषेत “जीव” हा शब्द असल्याचे सांगितले आहे. पवित्र शास्त्रात अनेकदा जनावरांना जीव म्हटले आहे. त्यापैकी एकाचा उल्लेख गणना ३१:२८ मध्ये सापडतो. तेथे, “माणसे, गाई-बैल, गाढवे व शेरडे-मेंढरे यांच्यापैकी प्रत्येक पाचशांमागे एक जीव घ्यावा” असे म्हटले आहे.
७. जनावरांचे व माणसांचेही जीव मरतात असे पवित्र शास्त्रातील कोणत्या वचनांवरुन सिद्ध होते?
७ जनावरे जीव असल्यामुळे ते मरतात तेव्हा त्यांचे जीवही मरतात. पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे “त्यातील [समुद्रातील] जीव मरुन गेले.” (प्रकटीकरण १६:३) आता, मानवी जीवाचे काय? देवाने माणसाला जीवसह निर्माण केलेले नाही असे आपण मागील प्रकरणात पाहिलेच आहे. माणूस स्वतःच जीव आहे. माणूस मरतो तेव्हा त्याचा जीव मरतो. हे खरे असल्याचे पवित्र शास्त्र वारंवार सांगते. जीव अमर आहे अथवा तो मरत नाही असे पवित्र शास्त्र कधीच म्हणत नाही. स्तोत्रसंहिता २२:२९ म्हणतेः “धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करतील. ज्याला आपला जीव वाचवता येत नाही तोही नमेल.” “जो जीव पाप करील तो मरेल” असे यहेज्केल १८:४ व २० मध्ये स्पष्ट आहे. (न्यू. व.) तसेच यहोशवा १०:२८-३९ पहाल तर त्यात जीव मरण्याबद्दल अथवा त्याचा नाश होण्याबद्दल सात वेळा उल्लेख केला आहे.
८. मानवी जीव—येशू ख्रिस्त—मरण पावल्याचे आपल्याला कसे समजते?
८ येशू ख्रिस्ताविषयीचे भविष्य सांगताना पवित्र शास्त्र म्हणतेः “आपला जीव वाहू देऊन तो मृत्यु पावला. . . . त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले.” (यशया ५३:१२) एका जिवाने (आदामाने) पाप केले व मानवजातीसाठी खंडणी भरण्यासाठी त्याच तोलामोलाच्या जीवाचे (एका माणसाचे) बलिदान करण्याची आवश्यकता होती, असे खंडणीची शिकवणही सिद्ध करते. ख्रिस्ताने मरणापर्यंत आपला जीव वाहू देऊन खंडणी भरली. मानवी जीव—येशू—मरण पावला.
९. ‘देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जातो’ याचा अर्थ काय?
९ आपण पूर्वीच पाहिल्याप्रमाणे आपल्या जीवाहून “आत्मा” हा वेगळाच आहे. आत्मा ही आपली जीवनशक्ती आहे. ती माणसांच्या व जनावरांच्या शरीरातील प्रत्येक पेशीत असते. ती श्वसनाद्वारे टिकविली वा जिवंत राखली जाते. पण मग, मृत्युच्या वेळी ‘माती पूर्ववत मातीस मिळते व देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जातो’ असे जे पवित्र शास्त्रात म्हटले त्याचा काय अर्थ आहे? (उपदेशक १२:७) मृत्युच्या वेळी सर्व पेशींमधून आत्मा हळूहळू निघून जातो व शरीर कुजण्याची क्रिया सुरु होते. परंतु आत्मा अक्षरशः पृथ्वी सोडून अंतराळामधून देवाकडे जातो असा याचा अर्थ नव्हे. तर, यापुढे आपल्या भावी जीवनाची सर्व आशा पूर्णपणे देवावर अवलंबून आहे. देवाच्या सामर्थ्याने आपल्याला आत्मा वा जीवनशक्ती परत दिली तरच आपण पुन्हा जगू शकू.—स्तोत्रसंहिता १०४:२९, ३०.
चार दिवस मृतावस्थेत असलेला माणूस—लाजर
१०. लाजर मेला होता तरी त्याच्या स्थितीबद्दल येशू काय म्हणाला?
१० चार दिवस मृतावस्थेत असलेल्या लाजराला जे झाले त्यावरुन मृतांची अवस्था समजण्यास आपल्याला मदत होईल. येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले होतेः “आपला मित्र लाजर झोपला आहे. पण मी त्याला झोपेतून उठवावयास जात आहे.” परंतु शिष्य त्याला म्हणालेः “प्रभुजी, त्याला झोप लागली असेल तर तो बरा होईल.” तेव्हा येशूने त्यांना स्पष्ट सांगितलेः “लाजर मेला आहे.” लाजर मेला असताना तो झोपला आहे असे येशू का म्हणाला?
११. येशूने मृत लाजरासाठी काय केले?
११ लाजराच्या गावाजवळ येशू आला तेव्हा लाजराची बहीण मार्था त्याला भेटली. लवकरच ते इतर लोकांसह लाजराला जेथे ठेवले होते त्या कबरेजवळ पोहंचले. ती एक गुहा होती. तिच्या तोंडावर एक दगड ठेवला होता. येशूने म्हटलेः “दगड बाजूला सारा.” लाजराला मरुन चार दिवस झाले असल्याने मार्था म्हणालीः “प्रभुजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल.” पण तरीही लोकांनी दगड काढला. तेव्हा येशूने हाक मारुन म्हटलेः “लाजरा, बाहेर ये!” आणि तो आला! प्रेतवस्त्रात गुंडाळलेला लाजर जिवंत बाहेर आला. येशू म्हणालाः “याला मोकळे करुन जाऊ द्या.”—योहान ११:११-४४.
१२, १३. (अ) मेला असताना लाजर बेशुद्ध होता असे आपण का म्हणू शकतो? (ब) लाजर मेला होता तरी तो झोपला आहे असे येशू का म्हणाला?
१२ आता विचार कराः मेलेला असताना चार दिवस लाजराची कोणती अवस्था होती? तो स्वर्गाला गेला होता का? तो चांगला माणूस होता. त्यामुळेच तो स्वर्गाला गेला असता तर त्याने निश्चितच त्याविषयी सांगितले असते. पण स्वर्गात गेल्याबद्दल तो काहीही बोलला नाही. येशूने म्हटल्याप्रमाणे लाजर खरेच मेला होता. मग तो झोपला आहे असे येशूने सुरुवातीला आपल्या शिष्यांना का सांगितले?
१३ पवित्र शास्त्रात म्हटले आहेः “मृतांस तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) त्यानुसार येशूलाही माहीत होते की, लाजर बेशुद्ध होता. परंतु जिवंताला झोपेतून उठवता येते. तसे, देवाने त्याला दिलेल्या सामर्थ्याद्वारे लाजराला मरणनिद्रेतून जागे करणे शक्य असल्याचे येशू दाखवत होता.
१४. मृतांना उठवण्याची शक्ति येशूमध्ये आहे या माहितीमुळे आपण काय करण्यास प्रवृत्त व्हावे?
१४ मनुष्य गाढ झोपेत असला म्हणजे त्याला काही आठवत नाही. मृतांचेहि तसेच असते. त्यांना कशाचीही जाणीव नसते. ते अस्तित्वातच नसतात. पण यथाकाळी देवाने खंडणीचे मोल लागू केलेल्या सर्व मृतांना जीवनासाठी उठवले जाईल. (योहान ५:२८) यामुळे, आपल्याला देवाची मर्जी संपादन करण्याची इच्छा झाली पाहिजे. तसे केल्याने, जरी मरण पावलो तरी देव आपली आठवण ठेवील व पुन्हा जिवंत करील.—१ थेस्सलनीकाकर ४:१३, १४.
[अभ्यासाचे प्रश्न]
[७६ पानांवरील चित्रं]
आदाम – मातीतून घडविला . . . मातीत परतला
[७८ पानांवरील चित्रं]
येशूने पुनरुत्थान करण्याआधी लाजराची काय अवस्था होती?