व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू ख्रिस्त—देवाने पाठवलेला?

येशू ख्रिस्त—देवाने पाठवलेला?

प्रकरण ६

येशू ख्रिस्त—देवाने पाठवलेला?

१, २. (अ) येशू ख्रिस्त ही खरी व्यक्‍ति होती याला काय पुरावा आहे? (ब) येशूबद्दल कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

 येशू ख्रिस्ताचे नाव आज बहुतेक सर्वांनी ऐकलेले आहे. इतर कोणत्याही माणसापेक्षा, इतिहासावर त्याची सर्वात जास्त छाप पडली. त्याचा जन्म ज्या वर्षी झाला असा लोकांचा समज आहे, त्यावर आधारलेली सनावली जगात सर्वत्र प्रचारात आहे! द वर्ल्ड बुक एनसायक्लोपिडिआ मध्ये म्हटल्याप्रमाणे “त्या वर्षापूर्वीच्या काळास इ. स. पूर्व वा ख्रिस्त पूर्व आणि नंतरच्या काळास इ. स. वा इसवी सन असे म्हणतात.”

याचाच अर्थ, येशू ही काल्पनिक व्यक्‍ती नसून तो खरोखरच या पृथ्वीवर अस्तित्वात होता. एन्सायक्लोपिडिआ ब्रिटेनिका मध्ये म्हटल्याप्रमाणे, “प्राचीन काळी ख्रिस्ती धर्माच्या विरोधकांनीही येशूच्या अस्तित्वाची शंका कधी घेतली नाही.” तर मग, येशू होता तरी कोण? त्याला खरेच देवाने पाठवले होते का? तो इतका प्रसिद्ध का आहे?

तो पृथ्वीवर येण्यापूर्वी अस्तित्वात होता

३. (अ) देवदूताच्या वचनाप्रमाणे मरिया कोणाच्या मुलाला जन्म देणार होती? (ब) कुमारी अवस्थेत येशूला जन्म देणे मरियेला कसे शक्य होते?

येशू एका कुमारिकेच्या पोटी जन्माला आला तसा, इतर कोणीही जन्माला आला नाही. त्या कुमारीचे नाव मरिया असे होते. तिच्या मुलाबद्दल एक देवदूत म्हणालाः “तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील.” (लूक १:२८-३३; मत्तय १:२०-२५) परंतु पुरुषाशी लैंगिक संबंध आलेला नसताना एखाद्या स्त्रीला मूल कसे होईल? आपल्या पवित्र आत्म्याने, यहोवाने आपल्या सामर्थ्यवान आत्मिक पुत्राचे जीवन कुमारी मरियेच्या उदरात स्थलांतरित केले. तो एक चमत्कार होता! मुले जन्माला घालण्याच्या अद्‌भूत क्षमतेसह ज्याने पहिल्या स्त्रीला उत्पन्‍न केले, त्याला, मानवी पित्याशिवाय मुलाला जन्म देण्याची क्षमता एका स्त्रीला देणे अशक्य नाही. पवित्र शास्त्र सांगतेः “काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्माला आला.”—गलतीकर ४:४.

४. (अ) बालक म्हणून जन्म घेण्याआधी येशूचे जीवन कसे होते? (ब) तो आधीच स्वर्गात राहात होता हे येशूच्या कोणत्या उद्‌गारांवरुन कळते?

याप्रकारे पृथ्वीवर मानव म्हणून जन्माला येण्यापूर्वी येशू स्वर्गात एक सामर्थ्यवान व्यक्‍ती होता. देवाप्रमाणेच त्यालाहि, मानव दृष्टीला अदृश्‍य असे आत्मिक शरीर होते. (योहान ४:२४) स्वर्गातील त्याच्या उच्च स्थानाबद्दल येशू अनेकदा बोलला. एकदा त्याने प्रार्थना केलीः “हे पित्या, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते तसे तू आपणाजवळ माझे गौरव कर.” (योहान १७:५) त्याच्या श्रोत्यांनाहि तो म्हणालाः “तुम्ही खालचे आहा, मी वरचा आहे.” “मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहिले तर?” “अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वीपासून मी आहे.”—योहान ८:२३; ६:६२; ८:५८; ३:१३; ६:५१.

५. (अ) येशूला “शब्द”, “ज्येष्ठपुत्र” व “एकुलता पुत्र” असे का म्हटले गेले? (ब) येशू देवासह कोणत्या कामात सहभागी झाला होता?

पृथ्वीवर येण्यापूर्वी येशूला देवाचा शब्द असे म्हटले जाई. स्वर्गात देवाच्या प्रवक्त्याचे काम त्याने केले असे या पदावरुन सूचित होते. तसेच त्याला देवाचा “ज्येष्ठ” व “एकुलता” पुत्र असेहि म्हटले आहे. (योहान १:१४; ३:१६; इब्रीकर १:६) याचा अर्थ, इतर सर्व आत्मिक पुत्रांच्या उत्पत्तीपूर्वी देवाने त्याला उत्पन्‍न केले तसेच देवाने स्वतः निर्माण केलेला तो एकटाच आहे असा होतो. पवित्र शास्त्र सांगते की, इतर सर्व गोष्टी उत्पन्‍न करताना हा ज्येष्ठ पुत्र देवाचा सहकारी होता. (कलस्सैकर १:१५, १६) तेव्हा, “आपल्याशी सदृश्‍य असा मनुष्य आपण करु,” असे देव बोलला तेव्हा तो आपल्या पुत्राशीच बोलत होता. होय, कालांतराने जो एका स्त्रीच्या पोटी जन्माला येऊन पृथ्वीवर आला तो हाच होता, ज्याने सृष्टीची निर्मिती करण्यात सहभाग घेतला होता! तो आधीच अगणित वर्षे आपल्या पित्यासह स्वर्गात राहात होता!—उत्पत्ती १:२६; नीतीसूत्रे ८:२२, ३०; योहान १:३.

त्याचे भूतलावरील जीवन

६. (अ) येशूचा जन्म होण्याच्या थोड्या आधी व जन्मानंतर कोणत्या घटना घडल्या? (ब) येशूचा जन्म कोठे झाला व तो कोठे वाढला?

मरीयेचा योसेफाशी वाड्‌.निश्‍चय झाला होता. परंतु ती गर्भवती आहे असे समजताच त्याला वाटले की तिने कोणा इतर पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवले असावेत. म्हणून तिच्याशी लग्न न करण्याचे त्याने ठरवले. पण जेव्हा पवित्र आत्म्याने मरीयेला गर्भधारणा झाली असल्याचे देवाने सांगितले तेव्हा योसेफाने मरियेचा पत्नी म्हणून स्वीकार केला. (मत्तय १:१८-२०, २४, २५) पुढे ते बेथलहेम गावी गेलेले असताना येशूचा जन्म झाला. (लूक २:१-७; मीखा ५:२) येशू तान्हे बाळ असताना हेरोद राजाने त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु यहोवाने योसेफास सूचना दिल्याने, आपल्या कुटुंबासह तो मिसर देशात पळून गेला. हेरोद राजाच्या मृत्युनंतर योसेफ व मरिया येशूसह गालील प्रांतातल्या नासारेथ गावी परतले. तेथे तो वाढला.—मत्तय २:१३-१५, १९-२३.

७. (अ) येशू १२ वर्षांचा असताना काय घडले? (ब) येशू वयाने वाढत असता कोणते काम शिकला?

येशू १२ वर्षांचा असताना सर्व कुटुंबासह वल्हांडणाचा सण पाळण्यासाठी, तोही यरुशलेमास गेला. तेथे असताना पंडितांची शिकवण ऐकण्यात व त्यांना प्रश्‍न विचारण्यात त्याने तीन दिवस घालवले. तेथे जमलेल्या लोकांना त्याच्या ज्ञानाबद्दल आश्‍चर्य वाटले. (लूक २:४१-५२) नासरेथ येथे लहानाचा मोठा होत असताना तो सुतारकाम शिकला. त्याचा पालक-पिता योसेफ हा स्वतः सुतार होता. त्यानेच येशूला सुतारकाम शिकवले असावे यात शंका नाही.—मार्क ६:३; मत्तय १३:५५.

८. येशू ३० वर्षांचा झाल्यावर काय घडले?

वयाच्या तिसाव्या वर्षी येशूच्या जीवनात मोठा बदल घडून आला. बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाकडे जाऊन, यार्देन नदीत संपूर्ण बुडवून बाप्तिस्मा द्यावा अशी येशूने त्याला विनंती केली. त्यानंतर पवित्र शास्त्र म्हणतेः “बाप्तिस्मा घेतल्यावर येशू पाण्यातून लागलाच वर आला. आणि पाहा, आकाश उघडले तेव्हा त्याने देवाचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला; आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे. ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’” (मत्तय ३:१६, १७) येशूला देवाने पाठवले याविषयी योहानाच्या मनात संदेहाला जागाच राहिली नाही.

९. (अ) येशू कधी ख्रिस्त झाला व तेव्हापासूनच त्याला ख्रिस्त का म्हणू लागले? (ब) बाप्तिस्म्याद्वारे येशूने स्वतःला कशासाठी अर्पण केले?

आपल्या भावी राज्याचा राजा म्हणून, आपला पवित्र आत्मा ओतून यहोवाने येशूला अभिषेक केला—म्हणजेच नेमणूक केली. अशा रीतीने आत्म्याने अभिषेक झाल्याने येशू “मशीहा” अथवा “ख्रिस्त” झाला. इब्री भाषेतील “मशीहा” व ग्रीक भाषेतील “ख्रिस्त” या शब्दांचा अर्थ “अभिषिक्‍त” असा आहे. यामुळेच तो येशू ख्रिस्त वा अभिषिक्‍त येशू झाला. त्याचा शिष्य पेत्रही म्हणाला की, “नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला.” (प्रे. कृत्ये १०:३८) तसेच देवाने त्याला ज्या कामासाठी पृथ्वीवर पाठवले होते ते करण्यासाठी, बाप्तिस्म्याच्या द्वारे येशूने स्वतःचे देवाला अर्पण केले. ते महत्वाचे काम कोणते होते?

तो भूतलावर का आला

१०. कोणती सत्ये सांगण्यासाठी येशू भूतलावर आला?

१० रोमी सुभेदार पंतय पिलात याला भूतलावर येण्याचे कारण सांगताना येशू म्हणालाः “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३७) अशी कोणती विशेष सत्ये लोकांना सांगण्यासाठी येशूला पृथ्वीवर पाठवले होते? पहिले म्हणजे त्याच्या पित्याबद्दलची सत्ये. त्याच्या पित्याच्या नावाचे “गौरव” व्हावे म्हणजेच त्याला पवित्र मानावे असे त्याने आपल्या शिष्यांना शिकवले. (मत्तय ६:९) त्याने प्रार्थना केलीः “जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले.” (योहान १७:६) तसेच तो हेही म्हणालाः “मला देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.”—लूक ४:४३.

११. (अ) येशूला त्याचे काम इतके महत्वाचे का वाटले? (ब) येशूने कोणत्या कामात कुचराई केली नाही? यास्तव आपण काय केले पाहिजे?

११ आपल्या पित्याच्या नावाची व राज्याची घोषणा करण्याच्या कामाचे येशूला किती महत्त्व वाटत असे? तो आपल्या शिष्यांना म्हणालाः “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.” (योहान ४:३४) येशूला देवाच्या कार्याचे, अन्‍नाइतके महत्व का वाटले? कारण देवाचा मानवाबद्दलचा अद्‌भुत हेतू त्याच्या राज्यामुळेच सफल होणार आहे. सर्व दुष्टपणाचा अंत करुन, देवाच्या नावाला लावलेले दूषण हेच राज्य दूर करील. (दानीएल २:४४; प्रकटीकरण २१:३, ४) त्यामुळेच देवाच्या नावाची व राज्याची घोषणा करण्यात येशूने जराहि कुचराई केली नाही. (मत्तय ४:१७; लूक ८:१; योहान १७:२६; इब्रीकर २:१२) तो सदैव खरे बोलला, मग ते लोकांना आवडो अथवा न आवडो. देवाला प्रसन्‍न करण्याची आपली इच्छा असल्यास योग्य ते आचरण करण्यासाठी त्याने आपल्याला हा कित्ता घालून दिला आहे.—१ पेत्र २:२१.

१२. दुसऱ्‍या कोणत्या महत्वाच्या कामासाठी येशू पृथ्वीवर आला?

१२ देवाच्या राज्याच्या अधिपत्याखाली आपल्याला अनंतकाल जीवन मिळावे म्हणून येशूला स्वतःचे रक्‍त सांडून मरण पत्करावे लागले. येशूच्या दोन प्रेषितांनी म्हटले की, “आपण आता [येशूच्या] रक्‍ताने नीतिमान ठरलो आहो.” “[देवाचा] पुत्र येशू याचे रक्‍त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.” (रोमकर ५:९; १ योहान १:७) येशूच्या भूतलावर येण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्याने आपल्यासाठी मरावे. तो म्हणालाः “मनुष्याचा पुत्र सेवा करुन घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला जीव [अथवा, जीवन] द्यावयास आला आहे.” (मत्तय २०:२८) पण, ख्रिस्ताने त्याचे जीवन “खंडणी” या अर्थी दिले याचा काय अर्थ होतो? आपल्या तारणासाठी त्याने रक्‍त सांडून मरण पत्करण्याची काय गरज होती?

त्याने आपले जीवन खंडणी म्हणून दिले

१३. (अ) खंडणी म्हणजे काय? (ब) पाप व मृत्युपासून आपली सुटका करण्यासाठी येशूने कोणती खंडणी भरली?

१३ एखाद्याचे अपहरण झाल्यास “खंडणी” शब्द वापरण्यात येतो. एखाद्याला पळवून नेल्यानंतर खंडणी म्हणून पैसे दिल्यास त्याला परत पाठवले जाईल असे पळवून नेणारा म्हणतो. यास्तव, बंदी माणसाला मुक्‍ती मिळवून देणारी गोष्ट म्हणजे खंडणी होय. बंदी जिवाला मुकू नये म्हणून ती गोष्ट देण्यात आलेली असते. आज्ञाधारक मानवजातीची पाप व मृत्युपासून सुटका करण्यासाठी येशूच्या अव्यंग जीवनाचे मोल देण्यात आले. (१ पेत्र १:१८, १९; इफिसकर १:७) अशा मुक्‍तीची आवश्‍यकता का पडली?

१४. येशूने देऊ केलेल्या खंडणीची आवश्‍यकता का होती?

१४ त्याचे कारण, आपला पहिला पूर्वज आदाम याने देवाविरुद्ध बंड केले. त्याच्या गैरवर्तनामुळे तो पापी झाला. कारण पवित्र शास्त्र सांगतेः “पाप स्वैराचार आहे.” (१ योहान ३:४; ५:१७) याचा परिणाम असा झाला की, देवाच्या अनंतकाल जीवनाच्या दानाला तो पात्र राहिला नाही. (रोमकर ६:२३) अशा रितीने, आदामाने स्वतःचे नंदनवनातील अव्यंग मानवी जीवन घालवले. त्याच्या भावी वंशजांचे हे अद्‌भूत भविष्यसुद्धा त्याने धुळीस मिळविले. पण, तुम्ही विचाराल की, ‘आदामाने पाप केले असताना त्याच्या वंशजावर मरण का ओढवावे?’

१५. आदामाने पाप केले असताना त्याच्या संततीला दुःख व मरण का भोगावे लागले?

१५ कारण, स्वतः पापी झाल्यावर आदामाने आपल्या मुलांना पाप व मृत्युचा वारसा दिला. आज हयात असलेली सर्व मानवजात त्याचीच वंशज आहे. (इयोब १४:४; रोमकर ५:१२) “सर्वांनी पाप केले आहे व ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत,” असे पवित्र शास्त्र म्हणते. (रोमकर ३:२३, १ राजे ८:४६) सुभक्‍त दावीदही म्हणालाः “पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.” (स्तोत्रसंहिता ५१:५) आदामाकडून अनुवंशिकतेने आलेल्या या पापामुळे सर्व लोक मरत आहेत. तर मग, येशूच्या बलिदानाद्वारे, पाप व मृत्युच्या दास्यातून सर्वांना सोडवणे कसे शक्य होत होते?

१६. (अ) खंडणीची तरतूद करताना ‘जिवाबद्दल जीव असा बदला घ्यावा’ या आपल्या नियमाचा देवाने कसा आदर केला? (ब) एकटा येशूच खंडणी का भरु शकला?

१६ इस्राएल राष्ट्राला देवाने दिलेला एक नियम येथे लागू पडतो. त्यात म्हटले आहेः “जिवाबद्दल जीव . . . असा बदला घ्यावा.” (निर्गम २१:२३; अनुवाद १९:२१) गैरवर्तनामुळे आदामाने स्वतःचे व आपल्या संततीचे भूतलावरील नंदनवनातील अव्यंग जीवन हातचे घालवले. येशू ख्रिस्ताने आपल्या अव्यंग जीवनाचे मोल देऊन आदामाने घालवलेले परत मिळवले. होय, येशूने “सर्वांसाठी अनुरुप खंडणी म्हणून स्वतःला दिले.” (१ तीमथ्य २:५, ६, न्यू. व.) आदाम जसा अव्यंग मनुष्य होता तसाच येशूहि होता, म्हणूनच येशूला “शेवटला आदाम” म्हटले आहे. (१ करिंथकर १५:४५) येशूशिवाय इतर कोणीही माणूस ही खंडणी भरु शकला नसता. कारण आतापर्यंत झालेल्या सर्व माणसांमध्ये, आदामासारखा अव्यंग माणूस एकट्या येशूशिवाय कोणीही झाला नाही.—स्तोत्रसंहिता ४९:७; लूक १:३२; ३:३८.

१७. देवाला खंडणी कधी दिली गेली?

१७ येशू ३३/ वर्षांचा होऊन मृत्यु पावला. परंतु मरणानंतर तिसऱ्‍या दिवशी त्याला जीवनाचे पुनरुत्थान मिळाले. त्यानंतर चाळीस दिवसांनी तो स्वर्गाला परतला. (प्रे. कृत्ये १:३, ९-११) तेथे, खंडणीच्या बलिदानाची किंमत घेऊन, आत्मिक स्वरुपात, “आपल्यासाठी देवासमोर” उभा राहिला. (इब्रीकर ९:१२, २४) त्यावेळी देवाला स्वर्गात खंडणी दिली गेली. तेव्हापासून मानवजातीकरिता मुक्‍तीचा मार्ग खुला झाला. पण त्याचे फायदे आपल्याला कधी मिळणार?

१८. (अ) आपल्याला आताही खंडणीचा कसा फायदा होतो? (ब) खंडणीमुळे भविष्यात कशाची शक्यता निर्माण झाली आहे?

१८ येशूने दिलेल्या खंडणीच्या बलिदानाचे फायदे आपल्याला आताही मिळू शकतात. ते कसे? त्याच्या बलिदानावर विश्‍वास ठेवल्याने आपण देवाच्या दृष्टीने निष्कलंक गणले जाऊन त्याच्या प्रेमळ मायेच्या छत्राखाली येतो. (प्रकटीकरण ७:९, १०, १३-१५) देवाबद्दल माहिती होण्यापूर्वी आपल्यापैकी अनेकांनी निघृण पापे केली असतील. आता सुद्धा आपण चुका करतो; काही तर गंभीर असतात. पण त्या खंडणीच्या आधारे, देव आपली प्रार्थना ऐकेल या विश्‍वासाने, आपण निःसंकोचपणे क्षमेची याचना करु शकतो. (१ योहान २:१, २; १ करिंथकर ६:९-११) तसेच खंडणीमुळे भविष्यात देवाच्या नीतिमान व्यवस्थेमध्ये अनंतकालिक जीवनाचे दान मिळण्याचा मार्गही मोकळा होईल. (२ पेत्र ३:१३) त्यावेळी, खंडणीवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांना पाप व मृत्युच्या बंधनातून कायमची सुटका मिळेल. अव्यंग असे अनंतकालिक जीवनाचे भविष्य त्यांच्यासमोर असेल!

१९. (अ) खंडणीच्या तरतुदीचा तुमच्यावर काय परिणाम होतो? (ब) खंडणीबद्दल आपली कृतज्ञता कशी दाखवावी असे प्रेषित पौलाने म्हटले आहे?

१९ खंडणीबद्दल माहिती झाल्याने तुम्हाला कसे वाटते? आपल्या वतीने स्वतःचा मुलगा देण्याइतकी यहोवा देवाला आपली काळजी असल्याचे कळाल्याने त्याच्याबद्दल आपल्याला मनापासून प्रेम वाटत नाही का? (योहान ३:१६; १ योहान ४:९, १०) तसेच, ख्रिस्ताच्या प्रेमाचाही विचार करा. आपल्यासाठी मरण पत्करण्यास तो स्वेच्छेने भूतलावर आला. त्याबद्दल आपण कृतज्ञ नसावे का? आपण कृतज्ञता कशी व्यक्‍त करावी हे सांगताना प्रेषित पौल म्हणालाः “तो सर्वांसाठी याकरता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरता नव्हे, तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्यासाठी जगावे.” (२ करिंथकर ५:१४, १५) देव आणि त्याचा स्वर्गीय पुत्र येशू ख्रिस्त यांची सेवा करण्यासाठी आपले आयुष्य वेचून तुम्ही आपली कृतज्ञता दाखवाल का?

येशूने चमत्कार का केले

२०. येशूने महारोग्याला बरे करण्यातून आपण काय शिकतो?

२० चमत्कार करण्याबद्दल येशू खूप प्रसिद्ध आहे. संकटग्रस्त लोकांबद्दल त्याला अपार आस्था होती. आपली देवप्रणीत शक्‍ती त्यांच्या मदतीसाठी वापरण्यास तो तत्पर होता. उदाहरणार्थ, भयंकर महारोग झालेला एक माणूस त्याच्याकडे येऊन म्हणालाः “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात.” तेव्हा येशूला “त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करुन त्याला स्पर्श केला व म्हटलेः ‘माझी इच्छा आहे, शुद्ध हो.’” आणि तो रोगी बरा झाला!—मार्क १:४०-४२.

२१. येशूने जनसमुदायाला कशी मदत केली?

२१ तसेच दुसरा एक प्रसंग पहा. याकरवी, लोकांबद्दल येशूच्या मनातील कोमल भावनांची कल्पना येईल. “मग लोकांचे थवेच्या थवे त्याच्याकडे आले. त्यांच्याबरोबर लंगडे, व्यंग, अंधळे, मुके व दुसरे पुष्कळ जण होते. त्यांना त्यांनी त्याच्या पायाशी आणून ठेवले, आणि त्याने त्यांना बरे केले. मुके बोलतात, व्यंग धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात हे पाहून लोकसमुदायाने आश्‍चर्य केले व इस्राएलाच्या देवाचे गौरव केले.”—मत्तय १५:३०, ३१.

२२. ज्यांना मदत केली त्यांच्याबद्दल येशूला मनापासून कळकळ वाटत असे हे कशावरुन दिसून येते?

२२ यानंतर येशूने पुढे जे म्हटले त्यावरुन त्याला दुःखितांबद्दल किती खरा कळवळा होता व त्यांना मदत करण्याची त्याची मनापासूनची किती इच्छा होती हे कळते. तो म्हणालाः “मला लोकांचा कळवळा येतो. कारण ते आज तीन दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काहीही नाही. कदाचित ते वाटेत कासावीस होतील. म्हणून त्यांना उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही.” तेव्हा फक्‍त सात भाकरी व काही मासे यापासून येशूने चमत्काराने “चार हजार पुरुष, शिवाय स्त्रिया व मुले” इतक्या लोकांना भोजन दिले.—मत्तय १५:३२-३८.

२३. एका विधवेच्या मुलास पुनरुत्थान देण्यास येशू कशामुळे प्रवृत्त झाला?

२३ आणखी एका प्रसंगी नाईन नावाच्या गावातून बाहेर जाणारी शवयात्रा येशूला भेटली. त्याबद्दल पवित्र शास्त्र सांगतेः “कोणा एका मृत माणासाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून, ती विधवा होती. . . . तिला पाहून प्रभुला तिचा कळवळा आला.” त्याला तिचे दुःख तीव्रतेने जाणवले. म्हणून, मृताला उद्देशून तो म्हणालाः “मुला, मी तुला सांगतो, उठ.” आणि काय आश्‍चर्य! “तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले.” विचार करा, त्या आईला काय वाटले असेल! तुम्हाला काय वाटेल? या घटनेचे वृत्त दूरवर पसरले. मग, येशू इतका प्रसिद्ध बनला त्यात नवल ते काय?—लूक ७:११-१७.

२४. येशूने केलेल्या चमत्कारामुळे भविष्याबद्दल काय कळते?

२४ परंतु येशूने केलेल्या चमत्कारांचा फायदा तात्पुरता होता. त्याने बरे केलेल्या लोकांना पुन्हा शारिरीक व्याधी उत्पन्‍न झाल्या. तसेच त्याने जिवंत केलेले पुन्हा मेले. पण त्याच्या चमत्कारांनी सिद्ध केले की, त्याला देवाने पाठवले होते, तो खरोखरच देवाचा पुत्र होता, तसेच देवाच्या शक्‍तीने सर्व मानवी समस्या सोडवता येतात. देवाच्या राज्यात काय होईल हे लहानशा प्रमाणात त्यामधून दाखवण्यात आले. त्यावेळी उपाशी लोकांना जेवण मिळेल, दुखणेकरी बरे होतील, मेलेले पुन्हा उठवले जातील! आजार, मरण वा इतर कोणत्याही समस्यांमुळे पुन्हा कधीही दुःख उत्पन्‍न होणार नाही. तो केवढा आशीर्वाद असेल!—प्रकटीकरण २१:३, ४; मत्तय ११:४, ५.

देवाच्या राज्याचा शास्ता

२५. येशूच्या जीवनाचे कोणते तीन भाग पडतात?

२५ येशूच्या जीवनाचे तीन भाग आहेत. मानव होण्यापूर्वी, देवासह स्वर्गातील अगणित वर्षे वास्तव्य हा पहिला भाग. मग मानव जन्मात पृथ्वीवर घालवलेली ३३/ वर्षे; आणि आता पुन्हा स्वर्गात आत्मिक व्यक्‍ति म्हणून घालवीत असलेले जीवन. पुनरुत्थानानंतर स्वर्गात येशूला कोणते स्थान मिळाले?

२६. भूतलावर विश्‍वासू राहिल्याने येशू कशास पात्र ठरला?

२६ येशू राजा होणार होता. देवदूताने मरियेला सांगितलेः “तो . . . युगानुयुग राज्य करील; त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३३) भूतलावरील आपल्या सेवा कार्यात देवाच्या राज्याबद्दल तो नेहमी बोलत असे. “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो,” अशी प्रार्थना करण्यास त्याने आपल्या शिष्यांना शिकविले आणि “पहिल्याने त्याचे राज्य . . . मिळविण्यास झटा” असे उत्तेजनही दिले. (मत्तय ६:१०, ३३) पृथ्वीवर असताना विश्‍वासूपणा दाखवून देवाच्या राज्याचा राजा होण्याची आपली लायकी त्याने सिद्ध केली. स्वर्गात परतल्याबरोबर त्याने राज्यकारभारास सुरुवात केली का?

२७. (अ) स्वर्गात परतल्यावर येशूने काय केले? (ब) देवाच्या राज्याचा राजा झाल्यावर येशूने कोणते पहिले काम केले?

२७ नाही. स्तोत्रसंहिता ११०:१ चा संदर्भ देऊन पौल म्हणालाः “पापाकरिता सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा [येशू] देवाच्या उजवीकडे बसला आहे; आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पादासन होईपर्यंत वाट पाहात आहे.” (इब्रीकर १०:१२, १३) “तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर” या देवाच्या आज्ञेची तो वाट पहात होता. (स्तोत्रसंहिता ११०:२) ती वेळ आल्यावर त्याने, सैतान व त्याच्या दुरात्म्यांपासून स्वर्गाला मुक्‍त करण्याचे कार्य हाती घेतले. स्वर्गातील त्या युद्धाचा निकाल सांगताना म्हटले आहेः “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाली आहेत. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे!” (प्रकटीकरण १२:१०) या आधीच्या एका प्रकरणात दाखवलेल्या वस्तुस्थितीप्रमाणे स्वर्गातील ही लढाई होऊन गेलेली असून आता येशू ख्रिस्त आपल्या शत्रूंच्या उपस्थितीत राज्य करीत आहे.

२८. (अ) लवकरच ख्रिस्त काय करील? (ब) त्याचे संरक्षण मिळवण्यास आपण काय केले पाहिजे?

२८ लवकरच पृथ्वीवरुन सर्व मानवी सरकार नाहीशी करण्यासाठी येशू व त्याचे स्वर्गीय दूत पावले टाकतील. (दानीएल २:४४; प्रकटीकरण १७:१४) पवित्र शास्त्र म्हणतेः “राष्ट्रांस मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यांवर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील.” (प्रकटीकरण १९:११-१६) या येऊ घातलेल्या नाशाच्या वेळी रक्षणास पात्र ठरण्यासाठी आपण येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवला पाहिजे. (योहान ३:३६) त्याचे शिष्य होऊन, आपला स्वर्गीय राजा या नात्याने त्याच्या अधीन राहिले पाहिजे. तुम्ही तसे कराल का?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[५८ पानांवरील चित्रं]

येशूने सुतारकाम सोडून दिले, त्याने बाप्तिस्मा घेतला, त्याचा यहोवाकडून अभिषेक झाला

[६३ पानांवरील चित्रं]

येशू परिपूर्ण मानव आदामासमान होता

[६४ पानांवरील चित्रं]

आजारी व क्षुधितांविषयी येशूला कळवळा वाटला

[६७ पानांवरील चित्रं]

मृतांचे पुनरुत्थान करण्याद्वारे येशूने, देवाचे राज्य अधिपत्य गाजवू लागेल त्यावेळी तो मोठ्या प्रमाणात काय करील याचा प्रत्यय दिला