व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सार्वकालिक जीवनाचा शत्रू

सार्वकालिक जीवनाचा शत्रू

प्रकरण २

सार्वकालिक जीवनाचा शत्रू

१. आनंद व शांतीचा सर्वसाधारण अभाव असल्याने कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

 पृथ्वीतलावर आनंद—बहुतेक सर्वांना तो हवा आहे. मग असंख्य लोक दुःखी का आहेत? काय चुकते आहे? बहुतेक सर्वांनाच शांती हवी असताना राष्ट्रे लढाया का करतात व लोक एकमेकांचा द्वेष का करतात? या वाईट गोष्टी करण्यास त्यांना उद्युक्‍त करणारी एखादी शक्‍ती आहे का? ती अदृश्‍य शक्‍ती या सर्व राष्ट्रांवर अधिकार गाजवीत आहे का?

२. इतिहासातले कोणते अन्याय पाहून, मानवावर एखाद्या दुष्ट, अदृश्‍य शक्‍तीचा पगडा असावा अशी अनेकांना शंका येते?

युद्धामध्ये लोकांना गुदमरुन-भाजून मारण्यासाठी वापरलेले भयानक वायू तसेच नापाम व अणूबॉम्ब सारख्या गोष्टी वापरण्यात माणसाने दाखविलेले भयंकर क्रौर्य पाहून अनेकांना अशीच शंका येते. तसेच अग्निबाण, युद्धबद्यांच्या छावण्या, नुकतीच कंबोडियामध्ये झाल्याप्रमाणे लाखो निरपराध लोकांची सरसकट कत्तल याही गोष्टी विचारात घ्या. या सर्व वाईट गोष्टी अपघाताने झाल्या असाव्यात असे तुम्हास वाटते का? मानवाची पराकोटीची दुष्कृत्ये पाहून त्यांच्या भयानक सामर्थ्याची खात्री पटल्यावर, त्यांच्यावर एका दुष्ट, अदृश्‍य शक्‍तीचा पगडा असावा असे वाटत नाही का?

३. जगाच्या अधिपत्याबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?

यासाठी तर्कविर्तक करीत बसण्याची मुळीच गरज नाही. पवित्र शास्त्र स्पष्टच सांगते की, एक अदृश्‍य बुद्धीमान व्यक्‍ती मानव व राष्ट्रे यांच्यावर नियंत्रण करीत आहे. पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताने त्या बलशाली व्यक्‍तीला “या जगाचा अधिकारी” असे संबोधले आहे. (योहान १२:३१; १४:३०; १६:११) तो कोण आहे?

४. दियाबलाने येशूला काय दाखवले व काय देऊ केले?

येशू भूतलावर असताना त्याच्या उपाध्यपणाच्या सुरुवातीसच घडलेल्या घटनेचा विचार करु या. त्यामधून ती व्यक्‍ती कोण हे शोधण्यास आपल्याला मदत होईल. पवित्र शास्त्र सांगते की, बाप्तिस्मा घेतल्यावर येशू अरण्यात गेला. तेथे, दियाबल सैतान म्हटलेल्या एका अदृश्‍य व्यक्‍तीने त्याची परिक्षा घेतली. त्या परिक्षेच्या काही भागाचे वर्णन असे केले आहेः “पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन, त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले; आणि त्याला म्हटलेः ‘तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे तुला देईन.’”—मत्तय ४:८, ९.

५. (अ) जगातील सर्व राज्ये दियाबलाच्या मालकीची आहेत असे कशावरुन कळते? (ब) पवित्र शास्त्रानुसार “या जगाचा देव” कोण आहे?

दियाबलाने येशूस काय देऊ केले याचा जरा विचार करा. “जगातील सर्व राज्ये.” ती खरोखरीच सैतानाच्या मालकीची होती का? होय. नाहीतर त्याने ती येशूला कशी देऊ केली असती? जर ती सैतानाची नसती तर येशूने त्याची मालकी नाकारली असती. पण त्याने ती सैतानाची आहेत हे मुळीच नाकारले नाही. सैतान या जगाचा खरोखरच अदृश्‍य अधिकारी आहे! पवित्र शास्त्र स्पष्टच म्हणतेः “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) देवाचे वचन तर त्याला “या युगाचा देव” असे म्हणते.—२ करिंथकर ४:४.

६. (अ) सैतानाच्या अधिपत्याबद्दलची ही माहिती आपल्याला काय समजायला मदत देते? (ब) आपण काय केलेले सैतानाला आवडेल व म्हणून आपण काय केले पाहिजे?

या माहितीमुळे, “माझे राज्य या जगाचे नाही,” असे येशू का म्हणाला ते समजण्यास मदत होते. (योहान १८:३६) सर्वसाधारण माणसांना शांतीची इच्छा असताना राष्ट्रे एकमेकांचा द्वेष व नाश का करतात हे समजण्यासही याची मदत होते. होय, सैतान ‘सर्व जगाला ठकवीत’ आहे. (प्रकटीकरण १२:९) आपल्यालाहि फसवावयास त्याला आवडेल. देव देत असलेली सार्वकालिक जीवनाची देणगी आपल्याला मिळू नये अशीच त्याची इच्छा आहे. याकरताच त्याच्या प्रभावाने आपल्या हातून वाईट गोष्टी होऊ नयेत म्हणून आपल्याला लढा द्यावयाचा आहे. (इफिसकर ६:१२) याकरता, सैतान कोण आहे व त्याच्या काम करण्याच्या पद्धती कशा आहेत ते आम्ही जाणून घेतले पाहिजे म्हणजे आम्हास फसविण्याच्या त्याच्या प्रयत्नांना आम्हाला दूर सारता येईल.

दियाबल कोण आहे

७. आपण सैतानाला का पाहू शकत नाही?

दियाबल सैतान ही खरीखुरी व्यक्‍ती आहे. काही लोकांना वाटते तशी ती नुसती मानवजातीतील वाईट प्रवृत्ती नव्हे. मानवांना देवास जसे पाहता येत नाही तसेच सैतानासही पाहता येत नाही. देव व दियाबल हे दोघेहि आत्मिक, मानवांपेक्षा वरच्या पातळीतील, आपल्या डोळ्यांना अदृश्‍य, असे आहेत.—योहान ४:२४.

८. देवाने दियाबलाची निर्मिती केली अशी अनेकांची समज का आहे?

परंतु, ‘जर देव प्रीति आहे तर त्याने दियाबलास निर्माणच का केले?’ असे काहीजण विचारतील. (१ योहान ४:८) वस्तुस्थिती अशी आहे की, देवाने दियाबलाला निर्माण केलेले नाही. आता काही म्हणतीलः ‘देवाने जर सर्व गोष्टी निर्मिल्या असतील तर त्यानेच निश्‍चित दियाबलालाहि निर्माण केले असेल. त्याला दुसरे कोण उत्पन्‍न करील? मग, दियाबलाची उत्पत्ती झालीच कशी?’

९. (अ) देवदूत कशा प्रकारच्या व्यक्‍ती आहेत? (ब) “दियाबल” व “सैतान” या शब्दांचा अर्थ काय?

पवित्र शास्त्र सांगते की, देवाने स्वतःसारख्याच इतर अनेक आत्मिक व्यक्‍ती बनवल्या. यांना देवदूत, तसेच “देवकुमार” म्हटले आहे. (ईयोब ३८:७; स्तोत्रसंहिता १०४:४; इब्रीयांस १:७, १३, १४) देवाने त्या सर्वांना परिपूर्ण असे उत्पन्‍न केले. त्यातील एकही दियाबल व सैतान नव्हता. “दियाबल” या शब्दाचा अर्थ निंदक व “सैतान” याचा अर्थ विरोधक असा होतो.

१०. (अ) दियाबल सैतानाची निर्मिती कोणी केली? (ब) एखादा चांगला माणूस स्वतःला गुन्हेगार कसा बनवील?

१० परंतु अशी वेळ आली की देवाच्या आत्मिक पुत्रांपैकी एकाने स्वतःला दियाबल म्हणजेच खोटेपणाने दुसऱ्‍याची निंदा करणारी द्वेषजनक व्यक्‍ती बनविले. त्याने स्वतःला सैतान म्हणजे, देवाचा विरोधकही बनविले. त्याला तसे निर्माण केले नव्हते तर तो नंतर तशा प्रकारची व्यक्‍ती झाला. उदाहरणार्थ, एखादा चोर काही जन्माने चोर नसतो. तो चांगल्या कुटुंबातील असेल, त्याचे आई-वडील प्रामाणिक असतील, त्याचे भाऊ व बहिणी आज्ञापालन करणारे असतील. परंतु पैशाने मिळणाऱ्‍या गोष्टींची आसक्‍ति धरल्यामुळे तो चोर बनला असेल. तर मग, देवाच्या एका आत्मिक पुत्राने स्वतःला दियाबल सैतान कसे बनवले?

११. (अ) देवाच्या कोणत्या हेतूबद्दल एका बंडखोर देवदूताला माहिती होती? (ब) या देवदूताला कोणती इच्छा झाली व तिने त्याला काय करण्यास प्रवृत्त केले?

११ देवाने प्रथम पृथ्वी व नंतर आदाम व हव्वा यांची निर्मिती केली तेव्हा, नंतर दियाबल झालेला देवदूत समक्ष हजर होता. (ईयोब ३८:४, ७) यावेळी देवाने आदाम व हव्वेला मुले व्हावी असा दिलेला आशीर्वाद त्याने ऐकला असेल. (उत्पत्ती १:२७, २८) त्याला माहीत होते की काही काळाने देवाची भक्‍ती करणाऱ्‍या नीतीमान लोकांनी ही पृथ्वी भरुन जाईल. तोच देवाचाही हेतू होता. तथापि, या देवदूताला स्वतःच्या सौंदर्याची व बुद्धीची घमेंड चढली होती. देवाला मिळणारी भक्‍ती त्याला स्वतःला मिळावी अशी त्याची इच्छा होती. (यहेज्केल २८:१३-१५; मत्तय ४:१०) ही अयोग्य इच्छा मनातून काढून टाकण्याऐवजी तो तिच्याबद्दलच विचार करीत राहिला. त्याचा परिणाम असा झाला की, त्याला हवा असलेला सन्मान व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी त्याने पुढील कारवाईहि केली. त्याने काय केले?—याकोब १:१४, १५.

१२. (अ) तो देवदूत हव्वेशी कसा बोलला व त्याने तिला काय सांगितले? (ब) तो देवदूत दियाबल सैतान कसा झाला? (क) दियाबलाच्या स्वरुपाबद्दल काय गैरसमज आहे?

१२ या बंडखोर देवदूताने पहिली स्त्री हव्वा हिच्याशी बोलण्यासाठी एका यत्‌किंश्‍चित सापाचा उपयोग केला. शेजारचा प्राणी वा खेळणे बोलत आहे असा भास निर्माण करण्यासाठी माणसे ज्या तंत्राचा वापर करतात तसाच त्यानेहि केला. पण वास्तविक, पवित्र शास्त्रात, “जुनाट साप” म्हटलेला हा बंडखोर देवदूतच तिच्याशी बोलत होता. (प्रकटीकरण १२:९) त्याने तिला सांगितले की, देव तिला सत्य सांगत नव्हता, व तिला जरुर असलेले ज्ञान तिच्यापासून राखून ठेवत होता. (उत्पत्ती ३:१-५) हे धादांत असत्य होते. त्यामुळे तो दियाबल झाला. तसेच देवाचा विरोधक बनून तो सैतानहि झाला. तद्वत, डोक्यावर शिंगे असलेला व हातात काटेरी भाला घेऊन भूगर्भातील कुठल्याशा यातना तळावर—नरकावर—पहारा करणारा, अशी दियाबलाची प्रतिमा अगदी चुकीची आहे हे तुम्हाला आता कळालेच असेल. खरे तर, तो एक अति बलाढ्य पण दुष्ट देवदूत आहे.

जागतिक त्रासाचा उगम

१३. (अ) दियाबलाच्या भुलविण्याला हव्वेने कसा प्रतिसाद दिला? (ब) दियाबलाने काय दावे केले?

१३ त्याने हव्वेला मारलेल्या थापेचा परिणाम अगदी त्याच्या योजनेप्रमाणेच झाला. तिने त्याच्यावर विश्‍वास ठेवला व देवाची अवज्ञा केली. शिवाय आपल्या नवऱ्‍यालाही देवाची आज्ञा मोडायला लावण्यात ती यशस्वी झाली. (उत्पत्ती ३:६) देवाशिवाय माणसांचे काही अडत नाही, देवाच्या मदतीशिवाय माणसे स्वतःचा कारभार उत्तम रितीने चालवू शकतात, असा दियाबलाचा दावा होता. आदाम व हव्वा यांच्या सर्व संततीस तो देवापासून परांड्‌मुख करू शकेल असा त्याने दावा केला.

१४. देवाने सैतानाचा तात्काळ नाश का केला नाही?

१४ देव तात्काळ सैतानाचा नाश निश्‍चित करू शकला असता. परंतु, त्यामुळे सैतानाने उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली नसती. ते प्रश्‍न या सर्व गोष्टी पाहणाऱ्‍या इतर देवदूतांच्या मनात घर करून राहिले असते. याकरता देवाने सैतानाला आपले दावे सिद्ध करण्यासाठी वेळेची सवलत दिली. त्याचा परिणाम काय झाला?

१५, १६. (अ) कालांतराने दियाबलाच्या दाव्यांबद्दल काय सिद्ध झाले आहे? (ब) कोणती घटना जवळ येऊन ठेपली आहे?

१५ या सर्व काळात हेच शाबीत झाले की, देवाच्या मदतीशिवाय मानवजातीला स्वतःवर यशस्वीरित्या सत्ता चालविता येत नाही. त्यांचे सर्व प्रयत्न पूर्णतयः फोल ठरले आहेत. माणसांच्या अधिपत्याखाली लोकांना अनंत हालअपेष्टा भोगाव्या लागल्या आहे. मानवी शासनाच्या दोऱ्‍या खरे तर पडद्यामागून दियाबलच हलवीत आहे असे पवित्र शास्त्र दाखविते. तसेच देवाने दिलेल्या सवलतीच्या वेळेत सर्व लोकांना देवाच्या भक्‍तीपासून परांड्‌मुख करण्यात सैतानाला अपयश आले आहे हे देखील सिद्ध झाले आहे. नेहमीच कोणी ना कोणी देवाच्या अधिपत्याला एकनिष्ठ राहिलेले आहेत. उदाहरणार्थ, ईयोबाला देवाची सेवा करण्यापासून परावृत्त करण्याचा सैतानाने कसा अयशस्वी प्रयत्न केला ते तुम्ही पवित्र शास्त्रात वाचू शकता.—ईयोब १:६-१२.

१६ अशा रितीने दियाबलाचे दावे खोटे होते हे सिद्ध झाले आहे. देवाविरुद्ध दुष्टतेने बंड सुरु केल्यामुळे तो नाशाला पूर्णपणे पात्र आहे. आनंदाची गोष्ट अशी की सैतानाच्या शासनाचा अंत करण्याची देवाची वेळ येऊन ठेपली आहे. या दिशेने टाकलेल्या पहिल्या पावलाचे वर्णन करताना पवित्र शास्त्र, स्वर्गातील एका महत्वाच्या लढाईविषयी सांगते. ती अर्थातच, भूतलावरच्या लोकांनी पाहिली वा ऐकली नाही. पवित्र शास्त्रातील खालील वृत्तांत जरा लक्षपूर्वक वाचाः

१७. (अ) स्वर्गातल्या युद्धाचे वर्णन पवित्र शास्त्राने कसे केले आहे? (ब) त्याचा स्वर्गातील व पृथ्वीवरील व्यक्‍तींवर काय परिणाम झाला?

१७ “मग स्वर्गात युद्ध झाले. मीखाएल [पुनरुत्थित येशू ख्रिस्त] व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर आणि त्याचे दूत लढले; तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला. म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप, खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले. ‘यास्तव, स्वर्गांनो व त्यात वसणाऱ्‍यांनो, उल्हास करा. पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे. कारण सैतान, आपला काळ थोडा आहे हे ओळखून, अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.’”—प्रकटीकरण १२:७-९, १२.

१८. (अ) स्वर्गातील युद्ध कधी झाले? (ब) सैतानाला “खाली टाकण्यात” आल्यापासून भूतलावर काय घटना होत आहेत?

१८ स्वर्गात ही लढाई कधी झाली? सर्व पुराव्यानुसार ती १९१४ मध्ये सुरु झालेल्या पहिल्या महायुद्धाच्या वेळेस झाली. प्रकटीकरणात दाखविल्याप्रमाणे त्यावेळी सैतानाला स्वर्गातून हाकलून लावण्यात आले. म्हणजेच तेव्हापासून आपण त्याचा जो ‘थोडा काळ’ राहिलेला आहे त्यात जगत आहोत. सैतानाच्या जगाचे हे ‘शेवटले दिवस’ आहेत. आपण अनुभवत असलेली वाढती गुन्हेगारी, भिती, युद्धे, अन्‍नाचा तुटवडा, रोगराई व इतर दुःखद परिस्थिती, याच गोष्टींचा पुरावा आहेत.—मत्तय २४:३-१२; लूक २१:२६; २ तीमथ्य ३:१-५.

१९. (अ) आता सैतान काय करण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहे? (ब) आपण काय करणे शहाणपणाचे ठरेल?

१९ “आपला काळ थोडा राहिलेला आहे” हे माहीत असल्यामुळे सैतान, देवाची सेवा करण्यापासून लोकांना परावृत्त करण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहे. स्वतःबरोबर शक्य तितक्या जास्त लोकांना नाशाकडे ओढण्याची त्याची इच्छा आहे. कोणाला गिळावे हे शोधीत फिरणाऱ्‍या, गर्जना करणाऱ्‍या सिंहाची उपमा पवित्र शास्त्राने त्याला दिली आहे ती योग्यच आहे. (१ पेत्र ५:८, ९) आपल्याला त्याच्या जाळ्यात अडकायचे नसेल तर तो कसा हल्ला करतो व लोकांना फसवण्याचे त्याचे मार्ग कोणते आहेत त्याची माहिती करुन घेणे अत्यंत जरुरीचे आहे.—२ करिंथकर २:११.

सैतान लोकांना कसे फसवतो

२०. (अ) सैतानाचा हल्ला कितपत यशस्वी झाला आहे? (ब) त्याच्या क्लृप्त्या अनेकदा निरुपद्रवी व हितावह वाटतील अशी अपेक्षा का करावी?

२० लोकांना आपल्या कच्छपी लावण्याच्या सैतानाच्या क्लृप्त्या नेहमी सहजच लक्षात येतील असे मुळीच समजू नका. लोकांना फसविण्यात त्याचा हात कोणीच धरु शकणार नाही. गेल्या हजारो वर्षांतल्या त्याच्या युक्त्या इतक्या सफाईदार आहेत की, आज कित्येक लोकांचा त्याच्या अस्तित्वावर विश्‍वासच बसत नाही. त्यांना वाटते की दुष्टपणा व वाईट प्रवृत्त्या या कधीही न टाळता येणाऱ्‍या नैसर्गिक गोष्टी आहेत. सैतानाच्या कारवाया आधुनिक गुन्हेगारांच्या प्रमुखाप्रमाणेच असतात. वरवर ते सभ्यतेचा आव आणतात, आणि पाठीमागे सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी करतात. पवित्र शास्त्र सांगतेः “सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.” (२ करिंथकर ११:१४) म्हणूनच लोकांना फसविण्याची त्याची कारस्थाने कित्येकदा निरुपद्रवी वा हितकारकहि वाटत असतात.

२१. सैतानाने कोणती योजना वापरली आहे?

२१ जरा आठवा, सैतानाने हव्वेला, तो तिचा हितचिंतक असल्याची बतावणी केली, व मग, ती जे करते ते तिच्याच हिताचे आहे असे भासवून ती गोष्ट करण्यास फशी पाडले. (उत्पत्ती ३:४-६) आजही सैतान धूर्तपणे त्याच्या मानवी हस्तकांतर्फे लोकांच्या मनात देवाच्या सेवेपेक्षा मानवी शासनाबद्दल अधिक आदर बाळगण्यास प्रोत्साहन देत आहे. त्याद्वारे राष्ट्रवादाचा जन्म झाला व याचा परिणाम भयंकर लढाया घडल्या. अलिकडच्या काळात शांतता व सुरक्षिततेच्या शोधात असलेल्या मानवाला सैतानाने वेगवेगळ्या योजना बनविण्यास उद्युक्‍त केले आहे. त्यातील एक म्हणजे संयुक्‍त राष्ट्र संघटना होय. पण त्यामुळे जगात शांती आली का? छे, मुळीच नाही! उलट, मानवाला शांती देण्याच्या देवाच्या योजनेकडे म्हणजे “शांतीचा अधिपती” म्हटलेल्या येशू ख्रिस्ताच्या वर्चस्वाखालील त्याच्या राज्याकडे लोकांचे लक्ष जाऊ नये यासाठीच त्याचा उपयोग झाला आहे.—यशया ९:६; मत्तय ६:९, १०.

२२. आपण कोणते ज्ञान मिळवू नये असे सैतानाला वाटते?

२२ सार्वकालिक जीवन मिळवावयाचे आहे तर, आपल्याला देव, राजा झालेला त्याचा पुत्र व त्याचे राज्य यांचे अचूक ज्ञान हवे. (योहान १७:३) ते तुम्हाला मिळू नये अशी सैतानाची इच्छा आहे व यासाठी आपल्या हाती असलेल्या सर्व सामर्थ्याचा तो उपयोग करील याची खात्री बाळगा. तो हे कसे करील? एक मार्ग असा की, उपहास किंवा इतर प्रकारांनी तुम्हाला विरोध होईल. पवित्र शास्त्र सांगतेः “ख्रिस्त येशूमध्ये भक्‍तीभावाने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.”—२ तीमथ्य ३:१२.

२३. (अ) इष्ट मित्र व नातेवाईकांचा सुद्धा सैतान कसा उपयोग करण्याची शक्यता आहे? (ब) तुम्ही विरोधापुढे माघार का घेता कामा नये?

२३ तुमचा शास्त्राभ्यास आपल्याला पसंत नाही असे तुमचे इष्ट मित्र वा नातेवाईक कदाचित तुम्हाला सांगतील. स्वतः येशू ख्रिस्तानेही इशारा दिला की, “मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही.” (मत्तय १०:३६, ३७) पवित्र शास्त्रात कोणती अद्‌भूत सत्ये आहेत हे माहीत नसल्याने अतिशय सद्‌भावनेने ते तुम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील. परंतु विरोध झाल्यावर पवित्र शास्त्राचा अभ्यास तुम्ही सोडून दिल्यास देवाचे तुमच्याबद्दल काय मत होईल? तसेच, तुम्ही माघार घेतली तर, पवित्र शास्त्राचे अचूक ज्ञान हा जीवन-मरणाचा प्रश्‍न आहे हे तुम्ही आपल्या मित्रांना व प्रियजनांना कसे समजावून द्याल? देवाच्या वचनातून मिळालेली शिकवण तुम्ही आचरणात आणाल तर कालांतराने सत्य जाणून घेण्यास त्यांनाही उद्युक्‍त करु शकाल.

२४. (अ) जीवन-प्रदायक ज्ञान लोकांनी मिळवू नये म्हणून सैतान कोणता दुसरा मार्ग अवलंबितो? (ब) देवाच्या वचनाचा अभ्यास करणे तुम्हाला किती महत्वाचे वाटते?

२४ दुसरा मार्ग म्हणजे देवाला नापसंत असे एखादे अनैतिक काम करण्याचा मोह सैतान तुम्हाला पाडील. (१ करिंथकर ६:९-११) किंवा तुम्ही इतके कामात गढून गेलेले आहात की शास्त्राचा अभ्यास करायला तुम्हाला वेळच नाही असे तो तुम्हाला वाटायला लावील. पण विचार कराः या प्रकारचे ज्ञान मिळविण्यापेक्षा अधिक महत्वाचे काही असू शकेल का? भूतलावरच्या नंदनवनात सार्वकालिक जीवनाची प्राप्ती देणारे ज्ञान मिळविण्याच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ देऊ नका.

२५. आपण सैतानाला अडवीत राहिल्यास तो आपल्याला काय करु शकणार नाही?

२५ “सैतानाला अडवा” असे उत्तेजन पवित्र शास्त्र देते. तसे तुम्ही केले “म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.” (याकोब ४:७) तुम्ही सैतानाच्या हल्ल्याला विरोध केला तर तो माघार घेईल व पुन्हा कधीही तुम्हाला त्रास देणार नाही असा याचा अर्थ होतो का? नाही. त्याला हवे ते तुम्ही करावे म्हणून तो पुनःपुन्हा प्रयत्न करील. परंतु तुम्ही त्याला प्रतिकार करीत राहिलात तर देवाविरुद्ध आचरण करण्यास तो तुम्हाला प्रवृत्त करु शकणार नाही. यासाठीच पवित्र शास्त्रातील अति महत्वाचे ज्ञान मिळविण्याची दक्षता घ्या. जे शिकाल ते आचरणातहि आणा. लोकांना फसविण्याच्या सैतानाच्या आणखी एका पाशात न अडकण्यासाठी असे करणे अगत्याचे आहे. तो पाश म्हणजे खोटा धर्म.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्रं]

ही सर्व जागतिक सरकारे सैतानाची नसती तर त्याला ती ख्रिस्ताला सादर करता आली असती का?

[१९ पानांवरील चित्रं]

चोर हा जन्मापासून चोर नव्हता त्याचप्रमाणे दियाबलाची सुद्धा “दियाबल” म्हणून निर्मिती झाली नव्हती.

[२१ पानांवरील चित्रं]

स्वर्गातील युद्ध सैतान व दुरात्म्यांना खाली टाकण्याद्वारे संपले. त्याचे परिणाम आता तुम्हाला जाणवत आहेत

[२४ पानांवरील चित्रं]

तुमच्या सुरळीत चाललेल्या पवित्र शास्त्र अभ्यासाला विरोध होईल