व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हर्मगिदोनानंतर नंदनवन झालेली पृथ्वी

हर्मगिदोनानंतर नंदनवन झालेली पृथ्वी

प्रकरण १९

हर्मगिदोनानंतर नंदनवन झालेली पृथ्वी

१. (अ) हर्मगिदोनाबद्दल सर्वसाधारण कल्पना काय आहे? (ब) पवित्र शास्त्र त्याबद्दल काय म्हणते?

 “हर्मगिदोन” हा शब्द अनेकांना भीतीदायक वाटतो. अनेकदा अपेक्षित असलेल्या तिसऱ्‍या महायुद्धाला उद्देशून जागतिक नेते हा शब्द वापरतात. पण देवाच्या नीतीमान युद्धाच्या स्थळाला पवित्र शास्त्रात हर्मगिदोन म्हटले आहे. (प्रकटीकरण १६:१४, १६) देवाचे हे युद्ध नवीन नीतीमान व्यवस्थेचा मार्ग खुला करील.

२. (अ) हर्मगिदोनात कोणाचा नाश होईल? (ब) यास्तव कोणत्या सवयी टाळणे सूज्ञतेचे ठरेल?

माणसांच्या युद्धामध्ये चांगले व वाईट सर्वच लोक मारले जातात. पण हर्मगिदोन फक्‍त वाईटांचा नाश करील. (स्तोत्रसंहिता ९२:७) यहोवा देव न्यायाधीश असेल. जे लोक त्याचे नीतीमान कायदे पाळण्यास जाणूनबुजून नकार देतील त्यांचा तो नाश करील. आजकाल व्यभिचार, दारुडेपणा, फसवणूक, खोटे बोलणे यात काहीच चूक नाही असे अनेकांना वाटते. पण देवाच्या मते या गोष्टी चूक आहेत म्हणून या गोष्टी आचरणाऱ्‍यांचा तो हर्मगिदोनात नाश करील. (१ करिंथकर ६:९, १०; प्रकटीकरण २१:८) या गोष्टींबद्दल देवाचे नियम कळल्यावर, त्या आचरणाऱ्‍या लोकांनी आपले वर्तन बदलणे आवश्‍यक आहे.

३. (अ) या सध्याच्या जगाच्या अंताची तुलना येशूने कशासोबत केली? (ब) सैतान व त्याच्या दुरात्म्यांचे काय होईल? (क) पुढील पानांवरील शास्त्रवचनांनुसार नंदनवनमय पृथ्वीवर कशी परिस्थिती उपभोगता येईल?

हर्मगिदोनानंतर या दुष्ट जगाचा कोणताही भाग मागे उरणार नाही. फक्‍त देवाची सेवा करणारे जगतील. (१ योहान २:१७) येशू ख्रिस्ताने या परिस्थितीची तुलना नोहाच्या प्रलयाशी केली. (मत्तय २४:३७-३९; २ पेत्र ३:५-७, १३; २:५) हर्मगिदोनानंतर भूतलावर फक्‍त देवाचे राज्यच सत्ता चालवील. सैतान व त्याचे दुरात्मे नाहीसे झालेले असतील. (प्रकटीकरण २०:१-३) पवित्र शास्त्रात सूचित केल्याप्रमाणे आज्ञाधारक लोक कोणते आशीर्वाद उपभोगतील याचा विचार पुढील पानांवर करु या.

 सर्व मानवजातीमध्ये शांती

  “आम्हासाठी बाल जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला . . . शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या समृद्धीला व शांतीला अंत नसणार.”—यशया ९:६, ७.

  “त्याच्या कारकीर्दीत नीतीमान उत्कर्ष पावेल, आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल. समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि [फरात] नदीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहील.”—स्तोत्रसंहिता ७२:७, ८, न्यू.व.

 युद्धाचा अंत

  “अहो या, तुम्ही यहोवाची कामे पहा. पृथ्वीत त्याने कशा अद्‌भूत घडामोडी केल्या आहेत. तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया बंद करतो.”—स्तोत्रसंहिता ४६:८, ९, न्यू.व.

 प्रत्येकाला उत्तम घर व मनाजोगे काम

  “ते घरे बांधून त्यात राहतील . . . ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि दुसरे फळ खातील असे व्हावयाचे नाही. . . . माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमांचे फळ पूर्णपणे उपभोगतील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत आणि संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत. कारण यहोवाने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्यांच्याजवळ राहतील.”—यशया ६५:२१-२३.

 गुन्हे, दंगे व दुष्टपणा यांचा अंत

  “दुष्कर्म करणाऱ्‍यांचा उच्छेद होईल. . . . थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधशील, पण त्याचा पत्ता लागणार नाही.”—स्तोत्रसंहिता ३७:९, १०.

  “दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचाऱ्‍यांचे त्यातून निर्मूलन होईल.”—नीतीसूत्रे २:२२.

 सर्व पृथ्वीचे नंदनवन

  येशू म्हणालाः “तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील.”—लूक २३:४३.

  “नीतीमान पृथ्वीचे वतन पावतील. तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्रसंहिता ३७:२९.

 सर्वांना अन्‍नाची विपुलता

  “सेनाधीश यहोवा या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी . . . उत्कृष्ट मिष्टान्‍नाची व राखून ठेवून गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करील.”—यशया २५:६.

  “भूमीत भरपूर पीक येईल, पर्वतांच्या शिखरावर ते डोलेल.” “भूमी आपला उपज देईल, देव, आमचा देव आम्हाला आशीर्वाद देईल.”—स्तोत्रसंहिता ७२:१६; ६७:६. न्यू.व.

४, ५. (अ) नंदनवनमय पृथ्वीवर कोणती परिस्थिती राहणार नाही? (ब) आज अनेक ठिकाणी माणसांना करता येत नाहीत अशा कोणत्या गोष्टी ते करु शकतील?

पहिला मानव आदाम ज्या बागेत निर्माण केला गेला तशाच नंदनवनमय पृथ्वीवर रहावेसे तुम्हाला खचित वाटेल. (उत्पत्ती २:८; लूक २३:४३) अंमळ विचार करा—तेथे युद्ध, गुन्हे, दंगे नसतील. दिवसा वा रात्रीच्या कोणत्याही प्रहरी तुम्ही भयमुक्‍त हिंडू-फिरु शकाल. दुष्टांचा अगदी मागमूस नसेल.—स्तोत्रसंहिता ३७:३५-३८

याचा हा अर्थ होतो की, लोकांना छळायला लबाड राजकीय नेते व लोभी व्यापारी नसतील. सैन्यासाठी लागणाऱ्‍या शस्त्रसामग्रीमुळे पडणारा करांचा बोजा नसेल. परवडत नाही म्हणून कोणी चांगल्या अन्‍नाविना वा आरामदायी घराविना राहणार नाही. बेरोजगारी, चलनवाढ व महागाई नसेल. आज लोकांना दुःखी करणारी संकटेच नसतील. सर्वांना मनपसंत काम असेल. ते आपल्या कष्टांची फळे पाहू व उपभोगू शकतील.

६. (अ) हर्मगिदोनातून वाचलेले लोक कोणते काम करतील? (ब) त्यांनी केलेल्या कामाला देव कसा आशीर्वाद देईल?

सर्वप्रथम हर्मगिदोनातून वाचलेल्या लोकांना या जुन्या व्यवस्थेचे पडझड झालेले अवशेष काढून टाकून पृथ्वी स्वच्छ करावी लागेल. त्यानंतर देवराज्याच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीची मशागत करुन तिला राहण्यास सुंदर बनवण्याची विशेष संधी त्यांना मिळेल. हे काम किती सुखदायक असेल! सर्व कामांना देव आशीर्वाद देईल. पिकांसाठी व गुरे पाळण्यासाठी योग्य हवामान तो पुरवील. तसेच रोग व हानीपासून त्यांचा बचाव करील.

७. (अ) देवाचे कोणते वचन पूर्ण होईल? (ब) देवाच्या वचनाप्रमाणे ख्रिस्तीजन कशाची वाट पहात आहेत?

पवित्र शास्त्रातील स्तोत्रकर्त्याच्या द्वारे आमच्या प्रेमळ निर्माणकर्त्याने दिलेले हे अभिवचन तो पूर्ण करीलः “तू आपली मूठ उघडून सर्व प्राणीमात्रांची इच्छा पूर्ण करतोस.” (स्तोत्रसंहिता १४५:१६) होय, देवाचे भय बाळगणाऱ्‍या लोकांच्या सर्व योग्य इच्छा संपूर्णपणे तृप्त केल्या जातील. पृथ्वीवरील नंदनवनात जीवन किती अद्‌भुत असेल याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही. आपल्या लोकांना आशीर्वाद देण्याच्या देवाच्या योजनेबद्दल प्रेषित पेत्र लिहितोः “ज्यामध्ये नीतीमत्व वास करते असे नवे आकाशनवी पृथ्वी यांची [देवाच्या] वचनाप्रमाणे आपण वाट पहात आहोत.”—२ पेत्र ३:१३; यशया ६५:१७; ६६:२२.

८. (अ) आपल्याला खऱ्‍याखुऱ्‍या नव्या आकाशाची गरज का नाही? (ब) “नवे आकाश” म्हणजे काय?

हे “नवे आकाश” म्हणजे काय? ते अक्षरशः नवे आकाश नव्हे. आपले सध्याचे आकाश देवाने परिपूर्ण बनवले असून त्याकरवी देवाचे गौरव होते. (स्तोत्रसंहिता ८:३; १९:१, २) “नवे आकाश” म्हणजे भूतलावर चालविण्यात येणारे नवे अधिपत्य. सध्याचे “आकाश” मानवी अधिपत्याने भरलेले आहे. हर्मगिदोनात त्यांचा नाश होईल. (२ पेत्र ३:७) त्याऐवजी देवाचे येत असलेले स्वर्गीय शासन म्हणजेच “नवे आकाश” होय. येशू ख्रिस्त या अधिपत्याचा राजा असेल. तसेच या ‘नव्या आकाशा’चे घटक म्हणून त्याचे १,४४,००० विश्‍वासू अनुयायीही त्याच्यासह हे अधिपत्य चालवतील.—प्रकटीकरण ५:९, १०; १४:१, ३.

९. (अ) “नवी पृथ्वी” म्हणजे काय? (ब) नाश होऊ घातलेली पृथ्वी कोणती?

मग, आता “नवी पृथ्वी” म्हणजे काय? तो काही नवा ग्रह नव्हे. देवाने या पृथ्वीला मनुष्यजातीसाठी अगदी योग्य असे बनवले आहे व ती सर्वकाळ राहावी अशी त्याची इच्छा आहे. (स्तोत्रसंहिता १०४:५) तद्वत, लोकांच्या एका नवीन गटाला वा समाजाला “नवी पृथ्वी” असे म्हटले आहे. पवित्र शास्त्र “पृथ्वी” हा शब्द अनेकदा या अर्थाने वापरते. उदाहरणार्थ, “सर्व पृथ्वीची [म्हणजे, लोकांची] एकच भाषा, एकच बोली होती,” असे ते म्हणते. (उत्पत्ती ११:१) जिचा नाश होणार आहे अशी “पृथ्वी” म्हणजे या सध्याच्या दुष्ट व्यवस्थेचे घटक असलेले लोक. (२ पेत्र ३:७) त्याच्या जागी येणारी “नवी पृथ्वी”, दुष्ट लोकांच्या या जगापासून स्वतःस वेगळे केलेल्या, देवाच्या सेवकांची बनेल.—योहान १७:१४; १ योहान २:१७.

१०. (अ) सध्या कोणाला व कशामध्ये जमवले जात आहे? (ब) पुढील पानांवरील शास्त्रवचनांप्रमाणे, मानवी सरकार करु शकत नाही अशा कोणत्या गोष्टी नंदनवनमय पृथ्वीवर केल्या जातील?

१० सध्या “नवी पृथ्वी” हिचे घटक होऊ घातलेले, सर्व वंशाचे व देशातील लोक ख्रिस्ती मंडळीमध्ये एकत्रित करण्यात येत आहेत. त्यांच्यामध्ये असलेली आपसातील एकता व शांती ही हर्मगिदोनानंतर नंदनवनमय पृथ्वीवर राहण्यातील सुखाची झलक आहे. खरोखर, मानवी सरकार ज्या गोष्टींची कल्पना सुद्धा करु शकत नाहीत अशा गोष्टी, देवाचे राज्य घडवून आणील. त्यातील काही आशीर्वाद आपण पुढील पानांवर पाहू या.

[१६१ पानांवरील चित्रं]

सर्व मानवजातीतील प्रेमळ बंधुभाव

“देव पक्षपाती नाही, तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रे. कृत्ये १०:३४, ३५.

“पहा, प्रत्येक राष्ट्र व वंश व लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी, कोणाला मोजता आला नाही असा, . . . मोठा लोकसमुदाय. . . . ते ह्‍यापुढे भुकेले असे राहणार नाहीत व तान्हेलेही होणार नाहीत.”—प्रकटीकरण ७:९, १६.

[१६१ पानांवरील चित्रं]

मानव व प्राणी यांजमधील शांती

“लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल. वासरु, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील, त्यांस लहान मूल वळील.”—यशया ११:६; ६५:२५.

[१६२ पानांवरील चित्रं]

आजारपण, वृद्धावस्था व मरण यांचा अंत

“तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.”—यशया ३५:५, ६.

“देव स्वतः त्यांजबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण हे नाही; शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.

[१६२ पानांवरील चित्रं]

मृतांना पुन्हा जिवंत केले जाते

“कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.”—योहान ५:२८, २९.

“समुद्राने आपल्यातील मृत मनुष्यांस बाहेर सोडले. मृत्यु व अधोलोक यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले.”—प्रकटीकरण २०:१३.

११. सध्या लोकांनी बनवलेले नंदनवन अनेकदा कशाने उद्‌ध्वस्त होते?

११ या जुन्या व्यवस्थेला जे साध्य आहे त्यापेक्षा देवाच्या राज्याखालील नंदनवन किती अधिक चांगले असेल! आजही काही लोकांनी स्वतःची राहती जागा नंदनवनासारखी सुंदर केली आहे खरी. परंतु अशा ठिकाणी एकत्र राहणारे लोक नीच, स्वार्थी व एकमेकांचा द्वेष करणारे असण्याची शक्यता आहे. शिवाय कालांतराने ते आजारी पडतात, म्हातारे होतात व मरतात. परंतु हर्मगिदोनानंतरच्या नंदनवन पृथ्वीवर मात्र सुंदर घरे, बागा व उद्यानांखेरीज अधिक खूप काही असेल.

१२, १३. (अ) हर्मगिदोनानंतर शांतीची कोणती परिस्थिती असेल? (ब) ती परिस्थिती आणण्यास कशाची गरज आहे?

१२ अंमळ विचार करा. सर्व वंशाचे व देशाचे लोक एका कुटुंबातील भावा-बहिणींप्रमाणे एकत्र रहावयास शिकतील. ते एकमेकांवर मनापासून प्रेम करतील. कोणीही स्वार्थी वा निष्ठुर नसेल. एखाद्या वंशाचा, वर्णाचा वा देशाचा असल्यामुळे कोणी कोणाचा द्वेष करणार नाहीत. दूषित पूर्वग्रहाचे अस्तित्वच संपेल. भूतलावरील सर्व एकमेकांचे खरे मित्र व शेजारी होतील. खरोखर ते आध्यात्मिक दृष्ट्याही नंदनवन असेल. “नव्या आकाशा”खालील या नंदनवनात राहणे तुम्हाला आवडेल का?

१३ शांतीने राहण्याबद्दल आजकाल लोक फार बोलतात. शिवाय त्यांनी “संयुक्‍त राष्ट्र” संघटना देखील उभारली आहे. तरीसुद्धा कधी नव्हे इतके लोकांमध्ये व राष्ट्रांमध्ये झगडे आहेत. तेव्हा गरज कशाची आहे? लोकांचे हृदय परिवर्तन झाले पाहिजे. परंतु या जगातील शासनांना ती किमया सर्वस्वी अशक्य आहे. या उलट पवित्र शास्त्रातील, देवाच्या प्रीतीचा संदेश ही गोष्ट घडवून आणीत आहे.

१४. ही नंदनवनातील परिस्थिती खरोखरच येईल असे आजच्या कोणत्या घटना सिद्ध करतात?

१४ या नीतीमान नव्या व्यवस्थेबद्दल माहिती झाल्यामुळे देवावर प्रेम करण्यास अनेक लोक प्रवृत्त झाले आहेत आणि देवाप्रमाणे तेही इतरांशी प्रेमाने वागू लागले आहेत. (१ योहान ४:९-११, २०) यामुळे त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडून येतो. आधी हिंस्र प्राण्यांप्रमाणे नीच व स्वार्थी असलेले लोक नम्र व शांतीप्रिय झाले आहेत. आज्ञाधारक मेंढरांप्रमाणे ते ख्रिस्ती कळपात एकत्रित केले जात आहेत.

१५. (अ) ख्रिस्ती लोकांचे कोणते दोन गट आहेत? (ब) “नव्या पृथ्वी” चे पहिले घटक कोण असतील?

१५ गेल्या १,९०० वर्षांपेक्षा अधिक काळ, ख्रिस्तासोबत राज्य करणाऱ्‍या १,४४,००० ख्रिस्ती जनांचा “लहान कळप” एकत्र केला जात होता. यातील खूपच थोडे अजून भूतलावर उरले आहेत आणि बहुतेकांनी स्वर्गात ख्रिस्तासह राज्य करण्यास आरंभही केला आहे. (लूक १२:३२; प्रकटीकरण २०:६) परंतु, इतर ख्रिश्‍चनांविषयी बोलताना येशू म्हणालाः “या मेंढवाड्यातील [लहान कळपातील] नाहीत अशी माझी दुसरीही मेंढरे आहेत. तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.” (योहान १०:१६) या “दुसऱ्‍या मेंढरां”चा एक “मोठा लोकसमुदाय” आता जमवला जात आहे. तेच “नवीन पृथ्वी”चे पहिले घटक असतील. या दुष्ट व्यवस्थेच्या शेवटी येणाऱ्‍या “मोठ्या संकटा”तून पार पडून नंदनवनमय पृथ्वीवर जगण्यासाठी यहोवा त्यांना संरक्षण देईल.—प्रकटीकरण ७:९, १०, १३-१५.

१६. कोणत्या चमत्कारामुळे प्राण्यांसह राहणे सुखाचे होईल?

१६ हर्मगिदोनानंतर आणखी एक चमत्कार नंदनवनातील सुखमय परिस्थितीत भर टाकील. सध्या धोकादायक असलेले सिंह, वाघ, चित्ता व अस्वल यांसारखे प्राणी शांतीने राहतील. तेव्हा वनात फिरण्यास गेल्यावर एखाद्या सिंहाची व पुढे एखाद्या मोठ्या अस्वलाची गाठ पडल्यास किती बरे वाटेल! भविष्यात कोणाला कोणाची भीती वाटणार नाही.

१७, १८. (अ) नंदनवनमय पृथ्वीवर दुःखाचे कोणते कारण उरणार नाही? (ब) अव्यंग स्वास्थ्य सर्वांना उपभोगता येईल याची खात्री आपण का बाळगावी?

१७ तथापि, घरे व बागा कितीही सुंदर असल्यास, लोक कितीही चांगले व प्रेमळ असेल वा प्राणी कितीही मैत्रीचे असले तरी आपण आजारी पडलो, वृद्ध झालो व मरण पावलो तर ते किती दुःखाचे वाटेल. पण सर्वांना परिपूर्ण आरोग्य कोणी देऊ शकेल का? मानवी सरकारांना कर्करोग, हृद्‌रोग व इतर रोगांचे निर्मूलन करण्यात अपयश लाभले आहे; आणि हे जरी जमले तरी वार्धक्य थांबवता येणार नाही, असे डॉक्टरांचे मत आहे. आपण वृद्ध होऊच, कालांतराने आपले डोळे मंदावतील, गात्रे गलित होतील, त्वचेला सुरकुत्या पडतील व शरीराच्या आतले अवयव निकामी होतील. पाठोपाठ मृत्यु येईल. हे सगळे किती दुःखद वाटते!

१८ परंतु, हर्मगिदोनानंतर नंदनवन पृथ्वीमध्ये देवाचा एक अद्‌भूत चमत्कार या गोष्टीत बदल घडवून आणील, कारण पवित्र शास्त्राचे अभिवचन आहेः “‘मी रोगी आहे’ असे एकही रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) आदामाकडून अनुवंशिकतेने आलेल्या पापामुळे जडलेल्या सर्वप्रकारच्या आजार व रोगांना निवारण करण्याची शक्‍ती, येशू ख्रिस्ताने, तो पृथ्वीवर असताना, सिद्ध केली. (मार्क २:१-१२; मत्तय १५:३०, ३१) देवराज्याच्या अधिपत्याखाली वार्धक्य देखील थांबवले जाईल. उलट म्हातारे लोक पुन्हा चिरतरुण होतील. होय, ‘त्याचे [माणसाचे] शरीर बालकाच्यापेक्षा टवटवीत होईल.’ (ईयोब ३३:२५) दररोज सकाळी आपले स्वास्थ्य आदल्या दिवशीपेक्षा बरे असलेले पाहणे किती रोमहर्षक असेल बरे!

१९. कोणता शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल व कसा?

१९ नंदनवनमय भूतलावर परिपूर्ण स्वास्थ्य व तारुण्यात असलेल्या कोणालाही मरावेसे वाटणार नाही; आणि मरण्याची गरजही राहणार नाही. कारण खंडणीच्या बलिदानाचे फायदे त्यांना मिळण्याचा अर्थच असा की, शेवटी एकदाचे “प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन” ही देवाची सर्वश्रेष्ठ देणगी उपभोगता येईल. (रोमकर ६:२३) पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे “आपल्या पायाखाली [देव] सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला [ख्रिस्ताला] राज्य केले पाहिजे. [तेव्हा] जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल, तो मृत्यु होय.”—१ करिंथकर १५:२५, २६; यशया २५:८.

२०. आज हयात असलेल्या व्यक्‍तींशिवाय आणखी कोण, नंदनवनमय पृथ्वीचा उपभोग घेईल व ते कसे शक्य होईल?

२० आता मृत्यु पावलेले लोकही नंदनवनाचा उपभोग घेतील. ते पुन्हा जिवंत होतील! तेव्हा त्या काळी मृत्युच्या बातम्यांऐवजी पुनरुत्थान झालेल्या लोकांच्या आनंदी बातम्या कळविल्या जातील. मृतातून परत आलेले आईवडील, मुले व इतरांचे स्वागत करणे हे किती हर्षदायक असेल! नंदनवनाच्या सौंदर्याला काळिमा लावण्यास कबरस्ताने, थडगी व स्मशाने राहणार नाहीत.

२१. (अ) “नवीन आकाशा”चे कायदे व सूचना कार्यवाहित आणण्यास कोण मदत करील? (ब) आपल्याला “नवे आकाश” व “नवी पृथ्वी” खरोखरच हवी असल्याचे आपण कसे प्रकट करु शकतो?

२१ तर मग, नंदनवनमय पृथ्वीवरील घडामोडीवर कोणाचा ताबा राहील व कोण तेथील कामाचे दिग्दर्शन करील? वरील “नवे आकाश” याकडून सर्व कायदे व सूचना येतील. पण भूतलावर ती कार्यवाहित करण्यासाठी विश्‍वासू माणसांची नेमणूक केली जाईल. ही माणसे स्वर्गीय राज्याचे प्रतिनिधित्व खास रितीने करीत असल्यामुळे पवित्र शास्त्र यांना “सरदार” म्हणते. (यशया ३२:१, २; स्तोत्रसंहिता ४५:१६) आजही ख्रिस्ती मंडळ्यामध्ये त्यांच्या कार्याचे दिग्दर्शन करण्यासाठी देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे माणसांची नेमणूक होते. (प्रे. कृत्ये २०:२८) हर्मगिदोनानंतर भूतलावरील घडामोडीत ख्रिस्त जातीने लक्ष देत असल्यामुळे देवराज्याच्या शासनाचे प्रतिनिधित्व करण्यास, तो योग्य माणसांची नेमणूक करील याची आपण खात्री बाळगावी. देवाचे “नवे आकाश” व “नवी पृथ्वी” यांची तुम्ही आतुरतेने वाट पहात आहात हे तुम्ही कसे प्रकट कराल? त्या नीतीमान नवीन व्यवस्थेमध्ये राहण्यासाठी जरुर ती प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी जमेल ते सर्व करुन.—२ पेत्र ३:१४.

[अभ्यासाचे प्रश्‍न]