देव कोण आहे?
पाठ २
देव कोण आहे?
खरा देव कोण आहे व त्याचे नाव काय? (१, २)
त्याचे शरीर कशाचे आहे? (३)
त्याचे कोणते उल्लेखनीय गुण आहेत? (४)
त्याची उपासना करताना आपण मूर्ती आणि प्रतिकांचा उपयोग करावा का? (५)
कोणत्या दोन मार्गांनी आपण देवाबद्दल शिकू शकतो? (६)
१. लोक अनेक वस्तूंची उपासना करतात. परंतु बायबल आपल्याला सांगते, की केवळ एकच खरा देव आहे. त्यानेच स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्वकाही निर्माण केले. त्याने आपल्याला जीवन दिल्यामुळे आपण त्याचीच उपासना केली पाहिजे.—१ करिंथकर ८:५, ६; प्रकटीकरण ४:११.
२. देवाला अनेक पदव्या असल्या तरी त्याचे एकच नाव आहे. यहोवा हे ते नाव आहे. पुष्कळ बायबलमध्ये देवाचे नाव काढून त्याऐवजी प्रभू किंवा देव या पदव्या दिल्या आहेत. परंतु बायबलचे लिखाण झाले तेव्हा त्यामध्ये सुमारे ७,००० वेळा यहोवाचे नाव होते!—निर्गम ३:१५; स्तोत्र ८३:१८.
३. यहोवाला शरीर आहे, परंतु ते आपल्यासारखे नाही. “देव आत्मा आहे,” असे बायबल म्हणते. (योहान ४:२४) आत्मा जीवनाचाच एक प्रकार आहे जो आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. कोणाही मानवाने देवाला कधीच पाहिलेले नाही. स्वर्गामध्ये यहोवाचे वास्तव्य आहे, पण तो सर्व काही पाहू शकतो. (स्तोत्र ११:४, ५; योहान १:१८) परंतु पवित्र आत्मा म्हणजे काय? तो देवाप्रमाणे व्यक्ती नाही. उलट ती देवाची कार्यकारी शक्ती आहे.—स्तोत्र १०४:३०.
४. बायबल आपल्याला यहोवाचे व्यक्तिमत्त्व प्रकट करते. ते, प्रीती, न्याय, बुद्धी आणि शक्ती हे त्याचे उल्लेखनीय गुण असल्याचे दाखवते. (अनुवाद ३२:४; ईयोब १२:१३; यशया ४०:२६; १ योहान ४:८) तो दयाळू, कृपाळू, क्षमाशील, उदार आणि सहनशील देखील आहे, असे बायबल आपल्याला सांगते. आज्ञाधारक मुलांप्रमाणे आपण त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.—इफिसकर ५:१, २.
५. उपासना करताना आपण मूर्ती, चित्रे किंवा प्रतीकांसमोर साष्टांग दंडवत घातला पाहिजे किंवा त्यांना प्रार्थना केली पाहीजे का? नाही! (निर्गम २०:४, ५) यहोवा म्हणतो, की आपण केवळ त्याचीच उपासना करावी. तो आपले वैभव कोणाला किंवा कशालाही देणार नाही. मूर्तींना आपली मदत करण्याची शक्ती नाही.—स्तोत्र ११५:४-८; यशया ४२:८.
६. आपण देवाची चांगल्याप्रकारे ओळख कशी करू शकतो? त्याने निर्माण केलेल्या सृष्टीचे निरीक्षण करणे व ती सृष्टी आपल्याला काय सुचवते यावर खोल विचार करणे, हा एक मार्ग होय. देव शक्तिशाली आणि बुद्धिमान आहे हे त्याची सृष्टी प्रकट करते. त्याने जे सर्वकाही बनवले त्यासर्वातून त्याची प्रीती दिसून येते. (स्तोत्र १९:१-६; रोमकर १:२०) देवाविषयी शिकण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, बायबलचा अभ्यास करणे होय. त्यामध्ये तो कसा आहे याबद्दलची खूप माहिती आपल्याला सांगतो. तसेच, तो आपल्याला त्याचे उद्देश आणि आपण काय केले पाहिजे तेही सांगतो.—आमोस ३:७; २ तीमथ्य ३:१६, १७.
[५ पानांवरील चित्रं]
आपण देवाविषयी सृष्टी आणि बायबल यांमधून शिकतो