देवाने दु:खाला परवानगी का दिली
भाग ६
देवाने दु:खाला परवानगी का दिली
१, २. देवाने आमच्या पहिल्या पालकांना दिलेल्या उत्तम सुरवातीला त्यांनी कसे बिघडवले?
काय बिघडले? एदेन नंदनवनात देवाने आमच्या पालकांना घालून दिलेली उत्तम सुरवात कशामुळे बिघडली? नंदनवनाची शांती व ऐक्य याऐवजी, दुष्टाई व दु:ख हजारो वर्षांसाठी का प्रचलित आहे?
२ याचे कारण असे की, आदाम व हव्वेने त्यांच्या इच्छा स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला. त्यांना देवापासून व त्याच्या नियमांपासून विलग राहून प्रगती करण्यासाठी निर्माण केले नाही हे ते पूर्णपणे विसरुन गेले. त्यांनी देवापासून मुक्त राहण्याचा निर्णय घेतला, व असा विचार केला की ह्यामुळे त्यांचे जीवन सुधारेल. या कारणास्तव त्यांनी देवाने दिलेल्या इच्छा स्वातंत्र्याच्या मर्यादेच्या बाहेर पाऊल टाकले.—उत्पत्ती, अध्याय ३.
विश्वव्याप्त सार्वभौमत्वाचा वादविषय
३-५. देवाने आदाम व हव्वेला लगेचच नाश करुन नव्याने सुरुवात का केली नाही?
३ देवाने आदाम व हव्वेचा नाश करुन दुसऱ्या एका जोडप्याद्वारे पुन्हा सुरुवात का केली नाही? कारण त्याचे विश्वव्याप्त सार्वभौमत्व, म्हणजेच अधिकार करण्याचा त्याचा हक्क, ज्याला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, ह्याला आव्हान करण्यात आले होते.
४ प्रश्न असा होता: अधिकार चालवण्याचा हक्क कोणास आहे, व कोणाचा अधिकार योग्य आहे? तो सर्वसमर्थ व सर्व प्राण्यांचा सृष्टीकर्ता असल्याने त्यांवर अधिकार चालवण्याचा त्याचाच हक्क आहे. तो सर्वबाबतीत सुज्ञ आहे, म्हणूनच त्याचे राज्य सर्व प्राण्यांसाठी सर्वात उत्तम आहे. पण आता देवाच्या अधिकाराला आव्हान केले गेले. त्याची सृष्टी—मानव—याचे काही चुकले होते का? यात मानवी सत्वाचा प्रश्न कसा गोवलेला आहे हे आपण नंतर पाहणार आहोत.
५ मनुष्य देवापासून स्वतंत्र झाल्यामुळे, आणखी एक प्रश्न उद्भवला: देवाच्या अधिकाराविना मानव चांगले असे काही करु शकेल का? सृष्टिकर्त्याला याचे उत्तर नक्कीच माहीत होते, परंतु मानवांना ते कळून येण्यासाठी त्यांना हवे असलेले संपूर्ण स्वातंत्र्य देणे हा खात्रीचा मार्ग होता. त्यांच्या इच्छा स्वातंत्र्याचा मार्ग त्यांनी स्वत:च स्वीकारला, म्हणून देवाने त्यांना परवानगी दिली.
६, ७. देवाने मानवजातीला एवढ्या लांब काळासाठी संपूर्ण स्वातंत्र्याची परवानगी का दिली?
६ संपूर्ण स्वातंत्र्याचा उपयोग करण्यासाठी पुरेसा वेळ देऊन, देव हे एकदाचेच शाबित करणार होता की, मनुष्य देवाच्या शासनाच्या अधीन सुस्थितीत राहू शकतो की त्याच्या स्वत:च्या शासनाखाली राहू शकतो. आणि मानवाने राजनैतिक, औद्योगिक, वैज्ञानिक व वैद्यकीय उच्चांक मिळवण्यासाठी राखलेले ध्येय साध्य करण्यासाठी पुष्कळ वेळेची गरज होती व ती त्याने त्यांना दिली.
७ या कारणास्तव, मानवी शासन देवाशिवाय सुरळीत चालू शकते की नाही हे दाखवण्यासाठी त्याने मनुष्याला स्वतंत्र सर्वाधिकार दिला. अशाप्रकारे मनुष्य दया व निष्ठुरता, प्रेम व द्वेष, धार्मिकता व अधार्मिकता यातून निवड करु शकला. पण त्याला त्याच्या निवडींच्या परिणामांना देखील निवडावे लागले: चांगुलपणा व शांती किंवा दुष्टाई व दु:ख.
आत्मिक प्राण्यांची बंडाळी
८, ९. (अ) आत्मिक क्षेत्रात बंडाळी कशी सुरु झाली? (ब) आदाम व हव्वेव्यतिरिक्त सैतानाने बंड करण्यास कोणाला प्रवृत्त केले?
८ आता लक्ष देण्याजोगे येथे दुसरे कारण आहे. देवाच्या शासनाविरुद्ध बंड करणारे केवळ आमचे मूळ पालक नव्हते. पण त्याकाळी अजून कोण अस्तित्वात होते? ते आत्मिक प्राणी होते. देवाने मनुष्याला निर्माण करण्याआधी, त्याने उच्च प्रकारचे जीवन बनविले, स्वर्गीय राज्यात राहण्यासाठी मोठ्या संख्येने देवदूतांना निर्माण केले. त्यांनाही इच्छा स्वातंत्र्य बहाल करुन बनवले होते, आणि यांनी देखील देवाच्या शासनाखाली अधीन राहण्याची गरज होती.—ईयोब ३८:७; स्तोत्रसंहिता १०४:४; प्रकटीकरण ५:११.
९ पवित्र शास्त्र दाखवते की पहिली बंडाळी स्वर्गात झाली. एका आत्मिक प्राण्याला पूर्णपणे स्वातंत्र्य हवे होते. मानवांनी त्याची भक्ति करावी अशीही त्याची इच्छा होती. (मत्तय ४:८, ९) हाच आत्मिक बंडखोर आदाम व हव्वेला बंड करण्यास चिथावणी देणारा ठरला. त्याने असा खोटा दावा केला की देव त्यांच्यापासून काहीतरी चांगले हिरावून घेत आहे. (उत्पत्ती ३:१-५) या कारणामुळे त्याला दियाबल (निंदक) व सैतान (विरोधक) म्हटले आहे. यानंतर त्याने इतर आत्मिक प्राण्यांना बंड करण्यास प्रवृत्त केले. त्यांना दुरात्मे म्हणून ओळखले गेले.—अनुवाद ३२:१७; प्रकटीकरण १२:९; १६:१४
१०. आत्मिक प्राण्यांच्या व मनुष्यांच्या बंडाळीचा काय परिणाम झाला?
१० देवाविरुद्ध बंड करुन, मानवांनी, सैतान व त्याच्या दुरात्म्यांच्या प्रभावाखाली स्वत:ला अधीन केले. यास्तव, पवित्र शास्त्र सैतानाला “विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने अंधळी” करणारा या “युगाचा देव” असे म्हणते. तद्वत, देवाचे वचन म्हणते की “सगळे जग त्या दुष्टाच्या अधीन आहे.” स्वत: येशूने सैतानाला “जगाचा अधिकारी” असे म्हटले आहे.—२ करिंथकर ४:४; १ योहान ५:१९; योहान १२:३१.
दोन वादविषय
११. दुसऱ्या कोणत्या वादविषयासंबंधाने सैतानाने देवास आव्हान केले?
११ सैतानाने देवाला आव्हान देणारा दुसरा एक वादविषय उठवला. वस्तुत: त्याने देवाला दोष दिला की, त्याने मानवजातीला चुकीच्या मार्गाने बनविले तसेच दबावाखाली आल्यानंतर कोणीही चांगली गोष्ट करु शकणार नाही. खरे म्हणजे, त्याने दावा केला की परिक्षेत असताना ते देवाला शाप देतील. (ईयोब २:१-५) अशाप्रकारे सैतानाने मानव सृष्टीच्या सात्विकतेची शंका उपस्थित केली.
१२-१४. सैतानाने उठविलेल्या दोन वादविषयांचे सत्य काळ कसा प्रकट करील?
१२ यामुळेच, देवाने सुज्ञ प्राण्यांना हा वादविषय व देवाच्या विश्वव्याप्त सार्वभौमत्वाचा वादविषय कशा रितीने सोडविला जाऊ शकतो हे पाहण्यासाठी भरपूर वेळ दिला. (निर्गम ९:१६ पडताळा.) मानवी इतिहासाद्वारे ओघाओघाने घडणारा अनुभव ह्या दोन वादविषयांची सत्यता प्रकट करणार होता.
१३ सर्वात प्रथम, देवाच्या शासनाची अचूकता, विश्वव्याप्त सार्वभौमत्वाच्या वादविषयाबद्दल काळ काय प्रकट करील? मानवाला देवापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने शासन करता येईल का? देवापासून विभक्त असलेले मानवी शासन युद्धे, हिंसा व अन्याय यापासून अलिप्त अशा आनंदी जगाची हमी देईल का? गरिबीला दूर करून कोणी सर्वांना समृध्दी देऊ शकेल का? आजार, वृद्धापकाळ आणि मरण यावर कोणी विजय मिळू शकेल का? देवाचे शासन हे सर्व करण्यास रचलेले होते.—उत्पत्ती १:२६-३१.
१४ दुसऱ्या वादविषयासंबंधाने, मानवी सृष्टीच्या मूल्याबद्दल वेळ काय प्रकट करील? मानवजातीला ज्याप्रकारे बनविले तो देवाचा मार्ग चुकीचा होता का? परिक्षा होत असतानाच एखादा योग्य ते करु शकेल? मानवाच्या स्वतंत्र शासनाऐवजी देवाचे शासन हवे असे काही लोक दाखवतील का?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चित्रं]
देवाने मानवांना त्यांच्या संपादनाच्या उच्चांकास येण्यासाठी अनुमती दिली
[चित्राचे श्रेय]
Shuttle: Based on NASA photo